लखनऊतले दिवस - श्रीमती श्रुति सडोलीकर-काटकर

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

विख्यात गायिका श्रीमती श्रुति सडोलीकर-काटकर फेब्रुवारी, २००९ ते सप्टेंबर, २०१५ या साधारण सहा वर्षांच्या काळात लखनऊ इथल्या भातखंडे संगीत संस्थानच्या विश्वविद्यालयात कुलपती म्हणून कार्यरत होत्या. संगीतविश्वात भातखंडे संस्थानाचं महत्त्व फार मोठं आहे. या विश्वविद्यालयातल्या व्यवस्थापनात अन् एकूणच संगीताच्या अभ्यासक्रमात त्यांनी अतिशय सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम केलं. भल्या-बुर्‍या अनुभवाला कणखरपणे सामोरं जात कुलपती म्हणून यशस्वी कारकीर्द पूर्ण केली...

***

२७ फेब्रुवारी, २००९. दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी राज्यपाल, उत्तर प्रदेश यांच्या ऑफिसमध्ये मी गेले. बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी बाहेर आले ती भातखंडे संगीत संस्थान अभिमत विद्यापीठाची (सम विश्वविद्यालय) कुलपती (व्हाईस चान्सलर) म्हणून. त्या तीन मिनिटांच्या मुलाखतीनं माझं सगळं जग बदलून गेलं. एरवी तानपुर्‍याच्या स्वरांनी सुरू होणारा आणि संपणारा दिवस फायलींच्या ढिगाआड कधी संपला हे कळू नये, असं होऊ लागलं. अशा बदलाची मी कधीच कल्पना केली नव्हती. इंग्रजीत ज्याला ‘आऊट ऑफ द ब्लू’ म्हणतात, तशी ही नियुक्ती झाली.

२००८च्या डिसेंबरमध्ये डॉ. अशोक रानडे यांच्या प्रेमळ आग्रहामुळे मी मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात प्रोफेसर म्हणून (सर्व विहित प्रक्रिया पूर्ण करून - जाहिरातीनुसार अर्ज भरून, मुलाखत देऊन, त्यात निवड केली गेल्यानंतर) रुजू झाले. वेळापत्रकाप्रमाणे वर्ग घेताना मजा वाटत होती. अन्य वर्गातली मुलं, सगळे वर्ग संपले, की पाचच्या पुढे संध्याकाळी साडेसात-आठ वाजेपर्यंत शिकत बसत, घरी येऊन शिकत. छान भट्टी जमली होती. इतकी वर्षं ‘नोकरी करायची नाही’ हा हट्ट मी धरला होता, तो रानडे सरांसाठी सोडला. काही नवे उपक्रमही सुरू केले. जरा रुळतेय तोवर अचानक ‘कुलपती’ म्हणून माझी नियुक्ती लखनऊला झाली. मी अस्वस्थ झाले. पण उत्तर प्रदेशचे राज्यपाल म्हणाले, “माझ्या सर्व कमिटीनं तुमच्याबद्दल फार उत्कृष्ट रिपोर्ट दिला आहे. मला बाहेरच्या प्रांतातली व्यक्तीच हवी आहे. तुम्ही उत्कृष्ट कलाकार आहातच; पण तुमचा बायो-डेटा एक्सेप्शनल आहे. तुमचा विविध प्रकारचा अनुभव संस्थेला खूप उपयोगी ठरेल. शिवाय तुम्ही एक महिला आहात.’’
मी म्हटलं, “पण सर, मी पूर्वी कधी नोकरी केलेली नाही. मला कसं काय जमेल?’’
“नो, नो, मॅडम. धिस इज नॉट अ जॉब. ही नोकरी नाही. हे सन्माननीय पद आहे. याचा तुम्ही स्वीकार करा.’’
“पण आमच्या कुलगुरूंची परवानगी...’’
“ती आम्ही बघतो. ही डायरेक्ट अपॉईंटमेंट आहे. तुमच्या पतींना आपण इथं राहायला बोलवू. आता तुमची संस्था पाहायला जाऊन या.’’
मी तंद्रीतच त्या ऑफिसमधून बाहेर पडले. कोणत्याही प्रकारचा अर्ज न करता मी निवडले गेले. हे एवढं मोठं पद मला झेपेल का? अशा विचारात मी पडले. राज्यपाल्यांच्या काही वाक्यांचा अर्थ त्यावेळी लागला नाही; पण नंतर अनुभवानं त्यांची दूरदृष्टी लक्षात येऊ लागली.

भातखंडे संगीत संस्थानचे प्रभारी-कार्यकारी कुलपती मला न्यायला आले. मी नवीन कुलपती आहे हे ऐकताच त्यांचा चेहरा धपकन पडला. गाडीत बसताक्षणी त्यांनी पत्नीला फोन केला - “माझा घात झाला.’’ ते बंगालीत बोलत होते. त्यांना कल्पनाही नव्हती, की मी बंगाली छान वाचू, बोलू व समजू शकते. बोलणं संपताक्षणी मी तिथं न जाणं, कुलपती म्हणून पद न स्वीकारणंच कसं योग्य आहे याचा त्यांनी पाढा वाचला. माझ्या लक्षात आलं, की राज्यपाल बाहेरच्या प्रांतातली व्यक्ती का शोधत होते. स्थानिक राजकारण आणि शासन- प्रशासनाशी याचा किती गहिरा संबंध असू शकतो याचा अंदाज येऊ लागला.

प्रत्यक्ष संस्थेत गेल्यावर बर्‍यापैकी स्वागत झालं. कुणीतरी नवा प्राणी बघितल्यासारखं काहींच्या डोळ्यांतले भाव मला नवीन होते. याच शहरात कित्येकदा गाण्याच्या कार्यक्रमासाठी मी येऊन गेले होते. त्यावेळी मला साथसंगत करणारी मंडळीसुद्धा भेटली. पण ‘ह्या इथं काय करताहेत’ असा भाव त्यांना त्यांच्या चेहर्‍यावरून लपवता आला नाही.

मी व्ही.व्ही.आय.पी. गेस्ट हाऊसवर परतताक्षणी निरनिराळ्या स्थानिक वृत्तपत्रांच्या पत्रकारांचे फोन सुरू झाले. आजवर, पत्रकार म्हणजे संगीत समीक्षक, एवढाच माझा-त्यांचा संबंध होता. एखाद्या अशा उच्च पदावर अधिकारी म्हणून बसलं, की पत्रकार कसे वागतात याची कल्पना पुढे लगेच येऊ लागली.

मी प्रत्यक्ष चार्ज घेतला १२ मार्च, २००९ रोजी, पण नियमित कामावर रुजू झाले १ एप्रिल रोजी. राज्यपाल म्हणाले होते, लवकरात लवकर ऑफिसात बसा. पण माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम केल्याशिवाय मला निघणं शक्य नाही हे मी सांगितल्यावर ते राजी झाले, पण जरा नाखुशीनंच.

मी १ एप्रिलला आले लखनऊला, तर वर्तमानपत्रात भले मोठे मथळे माझं स्वागत करायला हजर होते. ‘एक महिला कुलपती लाभूनही होस्टेलमध्ये मुली सुरक्षित नाहीत.’ ‘भातखंडे छात्रावासात भूत दिसलं.’ इत्यादी इत्यादी. मला लक्षात आलं, की मी इथं कुलपती म्हणून येऊ नये अशी गर्भित धमकी देण्यात आली होती, त्याचीच ही पुढची पायरी आहे. नंतर कळलं, की काही मुलींना माझ्या गैरहजेरीत मुद्दाम खोटी तक्रार करायला लावली होती.

आयुष्यात प्रथमच मी टेबलावर फाईल्सचा ढीग घेऊन बसले. फाईल समोर आल्यावर लगेच सही करून द्यायची नाही, हे मी स्वत:ला बजावलं. ऑफिसच्या गैरशैक्षिक कर्मचार्‍यांनी माझ्या ऑफिसमध्ये येऊन एकेक करून स्वत:ची ओळख करून दिली, तर त्यातही एक-दोघांनी आपला हुद्दा वाढवून मला सांगितला. त्यांना असं का वाटलं, की मला खरी परिस्थिती कळणार नाही? की मी तितके दिवस टिकणार नाही अशी खात्री होती त्यांना? पूर्व कार्यकारी कुलपतीनं २७ फेब्रुवारीला जी अनेक कारणं दिली होती (मी लखनऊला न यावं म्हणून), त्यात एक असंही होतं - “मॅडम, हा इन्स्टिट्यूटसमोरचा रस्ता आहे ना, त्यावर आजवर दहा माणसं मेलीत.’ ’ मी टोला हाणला, “अहो, मी इथं रस्त्यावर मरायला आलेली नाही. मी सामान्य स्त्री नाही. मला फटके द्यायला येतात.’’ तो फारच नाराज झाला. माझी ‘संस्था’ मी पाहून आले. गेस्ट हाऊसवर पोहोचले नाही तोवर पत्रकारांचे फोन सुरू झाले. आता तुमचे पुढचे प्लॅन काय आहेत? हे विचारण्यासाठी. राजभवनाकडून त्यांना अधिकृत प्रेसनोट मिळाली होती माझ्या नियुक्तीची.

लगेचच एक अधिकारी म्हणून काय काय करावं लागतं, कसे छोटे-छोटे पण महत्त्वाचे निर्णय घेऊन सबंध वर्षाच्या कामाचा आराखडा आखावा लागतो, याचे अनुभव येऊ लागले. वकिलाबरोबर बैठका घेऊन संस्थेतली मागच्या काळातली, आताची न्यायालयीन प्रकरणं समजून घ्यायचा अनुभव आला. त्या-त्या कर्मचार्‍यांचे न्यायालयाधीन दावे (रिट्स), त्यांच्या मागण्या, संस्थेची भूमिका, या सर्वांवर पर्याय, कर्मचार्‍यांचं हित कशात आहे इत्यादी सर्व बाजूंनी विचार करण्यासाठी मला शासनादेशांचा मोठा थोरला संग्रहसुद्धा सतत वाचावा लागत होता. शिवाय संस्था शासनाद्वारे अनुदानित असली, तरी ‘स्वायत्त’ता जपून, विश्वविद्यालय म्हणून संचालित करताना विश्वविद्यालय अनुदान आयोगाच्या (यू.जी.सी.च्या) नियमांनी बांधले आहे हे भान ठेवून निर्णय घेणं आणि त्याप्रमाणे वकिलाला पुढच्या सूचना देणं, ही तारेवरची कसरत सुरू झाली.

शाळा-कॉलेजात असताना, अभ्यास करताना मी झपाटल्यासारखी वाचत असे. दिवसाचे वीस-बावीस तास वाचन हा माझा शिरस्ता होता. रात्री अकरानंतर पहाटे पाच-साडेपाच वाजेपर्यंत मी गॅलरीत बसून वाचत असे. दिवसा घरात नाही तर कॉलेजच्या वाचनालयात मी सलग आठ ते दहा तास ठाण मांडून अधाशासारखी लिहीत-वाचत असे. आपल्या अभ्यासाचे विषय सोडून अन्य विषयही मला वर्ज्य नव्हते. त्यामुळे माझी आई म्हणायची, “तुझा हा नादिष्टपणा पुढे आयुष्यात उपयोगी आला तर बरं, नाही तर काय करशील?’’ पण वाचनाची गोडी मला आई-भाऊंनीच लावली, कारण दोघंही सतत विविध विषय वाचायचे आणि त्यावर चर्चाही करायचे, हे आम्ही लहानपणी पाहिलं होतं. चांगलं नाटक, एखादी मैफल, संवाद, चर्चा यावर नेहमीच ते दोघं बोलत असत. म्हणायचे, “वाचशील तर वाचशील!’’ भाऊंचा (वडिलांचा) एक आवडला श्लोक होता -
‘विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व या जगा माजी ।
न दिसे एकही वस्तू विद्येने जी असाध्य आहे जी ॥’

ह्या वाचनसंस्काराचे माझ्यावर अनंत उपकार झाले आहेत. एका ठिकाणी ठिय्या देऊन तासचे तास बसून कुठलंही काम करणं, मैफली करणं मला कधी जड गेलं नाही. माझे कामाचे निश्चित असे तास नव्हतेच, की अमुक वाजता मस्टरवर सही झालीच पाहिजे. घरी रात्री मी झोपेपर्यंत अर्जंट कागदपत्रांवर सह्या करायला कर्मचारी त्या फाईल्स घेऊन येत. पहिल्या-पहिल्यांदा मी दहाच्या ठोक्याला ऑफिसमध्ये जाई. रोज एकेशदहा पैकी जमतील तितक्या कर्मचारी आणि शिक्षकांच्या व्यक्तिगत पत्रावली, अगदी एकही पान न वगळता वाचून काढल्या. त्यामुळे त्यांच्या अर्हतेपासून नियुक्ती, चिकित्सा, अवकाश, उपार्जित अवकाश, आकस्मिक अवकाश वगैरेची स्थिती इत्यादी सर्व माहिती माझ्या डोक्यात जमा होत गेली. आजही कुणाबद्दलचा एखादा कागद फाईलच्या तळपासून कितवा, डावीकडे की उजवीकडे माहिती आहे हे माझ्या डोळ्यांसमोर लगेच उभं राहतं. दिवसभराच्या कामानंतर घरी यायला (समोरच आहे) सहज रात्रीचे साडेआठ-नऊ होत होते.

रात्रीच्या जेवणानंतर महाराष्ट्रात, मुंबईत आज काय घडलं याची उत्सुकता; नाटक, जुने सिनेमे, जुनी गाणी, ‘सह्याद्रीच्या पाऊलखुणा’मधल्या दिग्गज कलाकारांचे कार्यक्रम, बातम्या या सर्वांची भूक शिल्लक असेच. त्यानंतर झोपण्याआधी काही वाचन. त्यात हिंदी साहित्यिक, संगीतशास्त्र, अध्यात्म, जुन्या बंदिशींची उजळणी आणि काही बंदिशींचं नोटेशन करून ठेवणं, नव्या बंदिशी बांधणं, त्या ताबडतोब स्वरलेखन करून ठेवणं या उद्योगात सहजच पहाटेचे तीन वगैरे वाजत होते. मग झोप यायची.

आमच्या संस्थेच्या आणि माझ्या घराच्या आवारात, सर्वत्र कचराच दिसायचा. भिंती तर आपल्या हक्काच्या. त्यावर पान-गुटख्याच्या पिचकार्‍या मारून रंगवणं हे आद्य कर्तव्य अगदी मनोभावे बजावलं जात होतं. ‘बाबांनो, हे विद्येचं मंदिर आहे. तुमची रोजीरोटी तुम्हाला हे मंदिर देतं, त्याचा असा अपमान करून नका’ अशी कळकळीची भाषा ना शिक्षकांना समजत होती, ना कर्मचार्‍यांना; तर विद्यार्थ्यांना कळणार कशी? कोणताही जिना, भिंतींचे कोपरे स्वच्छ नव्हते. शेवटी एके दिवशी मी फतवा काढला - सगळ्यांच्या पगारातून स्वच्छता आणि रंगरंगोटीसाठी दर महिन्याला १०, २०, ५०, १०० रुपये कापून घेतले जातील. जे थुंकतात ते तर देतीलच, पण न थुंकणारेही देतील आणि थुंकणार्‍यांना त्यापासून रोखतील. सगळे रागावले. मी म्हटलं, “मीसुद्धा देते. सरकारनं काय म्हणून दर दोन महिन्यांनी पैसे द्यायचे? आमचं अनुदान थुंकण्यातच जाणार का?’’

दुसरं असंही फर्मान मी काढलं, की ज्या शिफ्टची कामाची वेळ असेल त्या वेळेत हजर झालंच पाहिजे. फार तर पंधरा मिनिटं उशीर चालेल. ट्रॅफिक जॅमचं कारण रोज चालणार नाही. माहीत आहे यावेळी ट्रॅफिक जॅम असतो, तर अर्धा तास आधी घरून निघा. यावर एका महाभागानं कारण दिलं - “मॅडम, मैं पिछले तीस सालों से यहाँ हूँ। कभी पौने बारासे पहले घर नहीं छोडा।’’

त्याची वेळ होती बारा ते पाच. म्हटलं, “तीस वर्षांत गाड्या आणि माणसं दीडशे पटींनी वाढलीत. नोकरी हवी असेल तर सवय बदला, नाही तर घरी बसून भजन करा.’’

आमच्या संस्थेत यू.जी. आणि पी.जी., म्हणजे विश्वविद्यालयीन वर्ग बारा ते पाच या वेळात आणि डिप्लोमाचे वर्ग दुपारी दोन ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत असतात. कित्येक लोकांचा ‘लौकिक’ असा, की “मॅम, ये तो कभी क्लास में होते ही नहीं।’’

यायचं, एकाच दिवशी मागच्या-पुढच्या चार-चार दिवसांच्या सह्या ठोकून, थंडी असेल तर उन्हात लॉजवर खुर्च्या टाकून शेकत बसायचं, नाही तर वर्गात बसून मुलांकरवी चहा, समोसे, पान आणवून (अर्थातच आपले पैसे खर्च न करता) एखाद-दीड तास वेळ काढायचा आणि सुटायचं. जर शिक्षक असे, तर संगतकार तरी का वर्गात टिकतील?
एक मनुष्य मला भेटून म्हणाला, “मॅम, मी इथंच शिकलो. खूप दिवसांनी परतलोय. ‘अमके’ माझे शिक्षक होते.’’ मी चकित झाले. कारण ते नाव आमच्या शिक्षकांच्या (आजी किंवा माजी, कोणत्याच) यादीत नव्हतं. वर्गक्रमांक विचारला. त्यावरून शोध लागला, की मूळ त्या वर्गाचे जे शिक्षक होते, त्यांनी आपला वर्ग त्या ‘अमुक’ना सब-लेट (भाड्यानं) केला होता! कहर आहे की नाही? ही घटना वीस वर्षांपूर्वीची होती. पण त्यानं त्यावेळच्या कारभारावर केवढं प्रश्नचिन्ह उभं राहिलं!!

दोन तास लवकर पळणं, ह्या प्रकारालाही आळा घालावा लागला. न सांगता पळणार्‍यांच्या नोंदी ठेवणं सुरू झालं. दिवसात कामाचे एकूण पाच तास आणि त्यातही अर्धी सुट्टी हवी. बँक, डॉक्टर, औषधं आणणं ही कामं तर याच वेळात सर्वांना करायची असायची. या सार्‍या पळवाटा बंद केल्यामुळे वर्गावर्गातून गाणं-बजावणं, नृत्याचे तत्कार इमारतीत भरून राहू लागले.

पण आतून विरोध सुरू झाला तो हे सगळं करण्यामुळे नाही, तर कायद्याच्या, नियमांच्या विरुद्ध जाऊन शासनातल्या एका अधिकार्‍याच्या फोनवरच्या निर्देशाला मी अमलात आणायला स्पष्ट नकार दिला म्हणून. अनियमित नियुक्त्या तशाच पुढे चालू ठेवायला मी नकार दिला आणि ‘मला ऑर्डर्स देऊ नका. मी तुमच्याकडून ऑर्डर घेण्यासाठी इथं बसले नाही’ असं ठाम सांगितल्यानं त्या अधिकार्‍याला धक्का बसला, कारण त्याला ‘आपण सांगू ते सगळे ऐकतात’ असं वाटत होतं आणि तसं पूर्वी घडलंही होतं. त्यानं पुढे याचा वचपा काढला. तो नंतर सांगेनच.

एक-दोन महिन्यात त्या अनियमित नियुक्त्या आणि काही अन्य मुद्दे जे शासनाच्या अखत्यारीतले होते, त्यांना घेऊन ७६ शिक्षक आणि कर्मचारी संपावर गेले. मला बर्‍याच नव्या गोष्टी या काळात समजल्या.

मी येण्यापूर्वीच्या काळात आमच्या संस्थेत एक शिक्षक-कर्मचारी संघ अस्तित्वात होता. पूर्व-कुलपतींच्या काळात त्याचं अस्तित्व नव्हतं. मधल्या अठरा महिन्यांच्या काळात संस्थेची अनेक महत्त्वाच्या बाजूंनी फार वाईट अवस्था करण्यात आली. काही निर्णय संस्थेच्या सर्वनाशाला कारणीभूत होतील असे घेतले गेले. अनेक शिक्षकांवर अन्याय झाला. ह्या सर्वाला कारणीभूत विघातक शक्ती एकत्र झाल्या आणि ज्यांना यातलं काही कळण्याची जरुरी नाही, पण जे संस्थेच्या पटावर हजेरी लावतात, अशांना हाताशी धरून, सामील करून (संख्याबळ दाखवण्यासाठी) संप सुरू केला गेला. या संघाला साथ होती शासनातल्या एका महासंघाची. त्यांचे सदस्य येऊन आपल्या ‘अजेंड्या’प्रमाणे संपाची कार्यवाही एक-एक पायरी पुढे नेत होते. त्यांच्या मीटिंग्ज होत होत्या आणि ते पुढे जात होते.
संपाबद्दल पहिल्यांदा मला सूचना दिली गेली आणि सांगितलं की, ‘आम्ही काम बंद करू, हळूहळू संप तीव्र होईल, वगैरे.’ त्यांच्या मागण्या दिल्याच नाहीत. अचानक ‘मुर्दाबाद’, ‘चले जाओ’, ‘वापीस लौटो’ वगैरे आरोळ्या सुरू झाल्या. जे लोक (काही शिक्षक आणि कर्मचारी) संपात सामील नव्हते, त्यांच्या प्रत्येकाच्या नावे ह्या आरोळ्या उठत होत्या. मी विद्यार्थी आणि संप न करणार्‍यांच्या सुरक्षेसाठी पोलीस बोलावले. त्या लोकांपैकी मुख्य लोकांना बैठकीसाठी बोलावूनही ते येत नव्हते. त्यांना पूर्ण जाणीव होती, की त्यांनी मागण्या केलेल्यापैकी संस्था किती मागण्या पूर्ण करू शकते आणि शासन किती. पण त्यांचा संपाचा मेन्यू पूर्ण करून त्यांना त्यांची ताकद दाखवायची होती. दुसरा जो महासंघ होता, त्याचा नेता आणि संपकरी माझ्या ऑफिसच्या खिडकीखालीच अचकट-विचकट बोलत. ‘कुलपती चले जाओ’ वगैरे नारे लगावत. तो नेता कामगारशक्ती आणि अधिकारांबद्दल मोठ्यानं भाषण देत असे. या प्रसंगात पोलिसांनी मात्र मला खूप सहकार्य केलं. पोलीस अधिकार्‍यांचं एक वेगळं सुसंस्कृत रूपही मी पाहिलं. पांडेजी नावाचे एक अधिकारी होते, ते माझी उद्विग्नता पाहून गीतेतले श्लोक म्हणून दाखवत. माझ्याशी चर्चा करत. मला म्हणायचे, “तुम्ही इथं एकट्या राहता, पण या संग्रामात एकट्या नाही आहात. आम्ही आहोत ना!’’ त्यांचे अन्य सहकारी वातावरण हलकंफुलकं राखायला मदत करत. चोवीस तास माझ्या संस्थेत पोलीस पहारा होता. घरावरही त्यांची नजर होती. मी एकटी नव्हते याची मला खात्री होती.

शासनातल्या एका अधिकार्‍याला यावेळी मध्यस्थीसाठी बोलावून हा संप तोडावा अशी सूचना आली. त्याप्रमाणे अधिकारी व्यक्ती आली. पण मी सांगितलं, तो महासंघ नेता जर आला, तर तो तुम्हाला हवा आहे म्हणून. मला त्याची गरज नाही. हा मामला मी आणि माझे कर्मचारी, शिक्षक यांतला आहे. तो एक अक्षर बोलला तर चालणार नाही.

आमची बैठक संपाच्या तेराव्या दिवशी रात्री संपली. काही मुद्दे लिहून दोन्ही बाजूंच्या सह्या झाल्या आणि संस्थेचं कामकाज पुन्हा मार्गी लागलं.

त्याआधीची एक गोष्ट राहूनच गेली. माझी नियुक्ती करणारे राज्यपाल श्री. टी. व्ही. राजेश्वर यांचा कार्यकाळ संपून नवे राज्यपाल श्री. बी. एल. जोशी यांचा शपथविधी होणार होता. त्या कार्यक्रमाला मी निघाले. माझी गाडी संस्थेसमोरून जाताना पाहिलं, की खूप मोठा जमाव दारातच कोंडाळं करून उभा आहे. संप चालूच होता त्या वेळी. पोलीस काही बायकांना हटवायचा प्रयत्न करत होते. त्या आमच्या संस्थेतल्या दिसत नव्हत्या. नंतर कळलं, की पेट्रोलमध्ये बुडवून एक साडी नेसलेली बाहुली (माझी प्रतिकृती) जाळण्याचा विधी सुरू होता. त्याकाळात माझी बदनामी नसणारी बातमी नाही असा एकही पेपर बहुधा छापला गेला नाही. माझी बाजू न ऐकता (न विचारताच खरं तर) धडाधड आरोप आणि संस्थेच्या र्हासाचं रडगाणं (नक्राश्रू) छापलं जात होतं. त्यातल्या एका प्रतिष्ठित वर्तमानपत्राला शेवटी मी कायद्याचा धाक दाखवला, तेव्हा त्यांनी माझं नावच टाकलं. पण हा सारा संपाचा मेन्यू पूर्ण केल्यानंतरच संप मोडला. संपाची बैठक संपेपर्यंत, खरोखरच तो महासंघ नेता अवाक्षरही बोलला नाही. जाताना त्यानं हात जोडून माफी मागितली. म्हणाला, “आपके बारे में कुछ नहीं जानता था। जो इन लोगोंने बताया उससे आप बहुत अलग हो। मैंने गलतसलत कहा, मुझे माफ कीजिये।’’

तो किती मनापासून बोलला, खरं किती खोटं किती याचा मी फार विचार केला नाही. “ठीक है’’ म्हटलं. त्या संपाच्या काळातलं वेतन मी संपकर्‍यांंना दिलं. म्हटलं, ‘त्यांच्या पोराबाळांना का उपवास?’

संस्थेच्या कारभारात यू.जी.सी.च्या नियमांनुसार अॅकॅडेमिक कौन्सिल फायनान्स कमिटी आणि बोर्ड ऑफ मॅनेजमेंट या तीन प्रमुख समित्यांच्या बैठका, त्यांचे अजेंडा, कार्यवृत्त (मिनिट्स) या सार्‍यात मी गुरफटून गेले. कारण अनेक महत्त्वाचे निर्णय या त्या तिन्ही समित्या घेतात आणि त्याची कार्यवाही मला करायची असे. या सर्व कामाची भाषा अर्थातच कार्यालयीन हिंदी होती. माझी हिंदी बोली कधीच ‘बंबैय्या हिंदी’ नव्हती. पण राजभवन, शासन, इतर संस्था यांच्याशी होणारा व्यवहार एका वेगळ्या दर्जाचा - संस्कृतनिष्ठ फार नाही, पण काही प्रादेशिक, उर्दू शब्दांच्या मिश्रणानं झालेल्या हिंदीत होता.

त्यापुढची पायरी म्हणजे न्यायालयीन हिंदी. तिथं कामकाज इंग्लिशमध्येच चालतं. लखनऊ खंडपीठात संस्थेविरुद्ध अनेक दावे होते. काहींचं विस्तारण न करता जैसे थे परिस्थिती चालू ठेवल्यानं अनेकांचे फायदे होत होते. पण दाव्यांचं निस्तारण न करता येणं हे संस्थेच्या प्रशासनाचं आणि संस्थेच्या वकिलाचंच अपयश नव्हे का? मी पूर्वीच्या वकिलाचं करारपत्र पाहिलं. ते केव्हाच संपलं होतं. ना त्याचं नूतनीकरण झालं, ना नवा वकील आला. मी पूर्वीच्या वकिलाच्या कार्यपद्धतीचा गोषवारा घेऊन तात्काळ नवा वकील नेमला. हा आणखी एक नवा धक्का जुन्या सिस्टिमला. काही पडीक दावे, केवळ दुर्लक्ष केल्यानं दाव्यांच्या यादीत संख्या वाढवण्यापुरते होते. काही संस्थेची बाजून न मांडल्यानं पडून होते. त्या सर्वांचं काम मार्गाला लावलं. कोणत्याही संस्थेच्या वेबसाईटवर दावे भरमसाठ असणं हे भूषणावह निश्चित नाही.

म्हणे म्हणेपर्यंत नोव्हेंबर आला. तोवर मला बाहेर लोक सभासमारंभांमध्ये ‘अरे, आप वो भातखंडे की नयी व्ही.सी. है ना? अब कैसा चल रहा है?’ म्हणून ओळख देऊ लागले होते. रोटरीसारख्या संस्थांनी मला अॅवॉर्ड्स देऊन गौरव केला. “आप कुछ अच्छा कर रही है इसीलिए इतनी खलबली मची है। आगे बढिये।’’ असं साड्यांचे दुकानदारही मला ओळखून म्हणू लागले. माझ्या गाडीच्या पुढे संस्थेची पाटी आहे. ती वाचून भाजीवालेही ड्रायव्हरला म्हणत, “यही है ना वो मॅम?’’ मला गंमत वाटली, की सामान्य वाटणारी माणसंही विचारतात, विचार करतात.
नोव्हेंबरच्या ११ तारखेला पुन्हा संपाचं रणशिंग फुंगलं गेलं. काही लोक पुन्हा संपात सामील झाले. पूर्वीच्या लोकांपैकी काहीजण, आपण चुकून संपात गेलो, आता नाही, असं सांगत कामावर आले. यावेळच्या संपात त्या लोकांची पांचाईत झाली. एक तर थंडीचा वाढता जोर, धुकं, पाऊस, पोलीसही त्यांची नाटकं ओळखून होते. काही पूर्वीचे त्यांचे समर्थक दूर झालेले अशा स्थिती. ‘आमरण उपोषण’ वगैरेही झालं. मेन्यूच होता ना तसा! काही महिलांनी माकडटोप्या घालून शालीत गुरफटलेले फोटोही दिले. काही कर्मचार्‍यांना भूक न आवरल्यानं रात्री पोलिसांच्या हजेरीत समोसे कांबळीत लपून खावे लागले. पुन्हा नारेबाजी. यावेळी पत्रकार फार उत्साहित नव्हते; पण सक्रिय होते. पुन्हा माझी आणि संस्थेची बदनामी करणारा मजकूर छापणं क्रमप्राप्तच होतं. मी अजिबात न बधता निर्विकारपणे गायनाचे वर्ग घेत होते. काही वाद्यांच्या वर्गातही शिकवत होते. जे संपात सामील नव्हते, अशा शिक्षकांनी शिकायला येणार्‍या विद्यार्थ्यांना आपल्या वर्गाव्यतिरिक्त वेळ देऊन शिकवलं. संपकर्‍यांनी मुलांना जुलैप्रमाणे याही संपकाळात “खबरदार वर्गात गेलात आणि दुसर्‍याकडून शिकलात तर. वार्षिक परीक्षेला पाहून घे.’’ अशा धमक्या दिल्या. काही मुलं बधली; पण काही मुलं इमानदारीत येऊन शिकत होती. मी शनिवारी, सुट्टीच्या दिवशी किंवा रविवारी चार-चार तास घरी मुलांना शिकवत होते. मुलांना तर ते हवंच होतं, कारण ती यू ट्यूब, कॅसेट, सीडीवर माझी गाणी ऐकत होती. “यह तो हमारा भाग्य है कि इस बहाने हम आपसे सीख सकते हैं।’’ असं म्हणत होती.

या सर्व संपकाळानं संस्थेची फार बदनामी झाली. संपातल्या मागण्या शासनस्तरावरच प्रलंबित होत्या. एखाद-दोन मुद्दे पूर्ण करणं तांत्रिकदृष्ट्या कठीण होतं, कारण यू.जी.सी.चे नियम लागू होणारे शिक्षक आणि शासकीय नियमांवर चालणारा कर्मचारीवर्ग, ही आवळ्या-भोपळ्याची मोट बांधायची कशी? या खेपेला जे समर्थक एकदा संपकर्‍यांना भेटले, ते पुन्हा फिरकले नाहीत. मी निर्विकारपणे सगळं पाहत होते. त्यावेळी धारा १४४ लावली गेल्यानं जथ्यानं गोळा होऊन शांतताभंग केला तर सरळ ‘आतच’ रवानगी होऊ शकत होती. पोलीस संपकर्‍यांना सांगत - “बस्स, मॅडमका आदेश नहीं है, वरना आपकी मुश्कीलें बढ सकती हैं।’’ मी म्हटलं, “त्यांना काहीही करू दे. ३० डिसेंबरला मी टाळं लावेन. पुढे बघू काय होतं ते. काम नाही तर पगार नाही.’’ ३० डिसेंबरला संध्याकाळी मंडळी बैठकीसाठी आली. त्यांचे पंचवीस-तीस लोक आणि मी एकटी! महासंघाच्या नेत्याला मी माझ्या कॅम्पसमध्ये यायलाच मनाई केली होती. माझ्या बरोबरीनं दोन्ही संपात सातत्यानं संस्थेसाठी काम करणार्‍या शिक्षकांना टेन्शन आलं. “मॅडम, काही वाटलं तर बोलवा.’’ मी ‘थँक यू’ म्हटलं.

संपकर्‍यांनी मागण्यांबद्दल बोलणी केली. जे शक्य आणि सत्य आहे ते मी सांगितलं; पण लिखित स्वरूपात काहीही द्यायला नकार दिला. कारण संप २९ जुलैला मिटला आणि ३० जुलैला माझ्याविरुद्ध अनेक तक्रारींचा एक गठ्ठा (जुनाच) ७६ लोकांच्या सह्यांनिशी यू.जी.सी.मध्ये पोहोचला होता, तो मी स्वत: पाहिला होता. त्यामुळे या लोकांना “कोणत्याही प्रकारे तुमच्यावर मी विश्वास ठेवत नाही’’ असंच सांगावं लागलं. यावेळी मात्र मी हजेरी पृष्ठांवर टेपच लावल्यानं त्यांना पूर्वीसारख्या सह्या करता आल्या नाहीत. अजूनही त्या काळातलं वेतन त्यांना मिळालेलं नाही. शासनादेशाचं वाचन अशा ठिकाणी फार उपयोगी ठरतं. जो संघ पंजीकृत (रजिस्टर्ड) नाही, त्याच्याबरोबर चर्चाही करण्याची गरज नाही, असा जी.ओ.च आहे.

हाही डाव उलटला, खिशावर भारी पडला. तरी मला ‘दोन दिन में’ पळवून लावण्याची स्वप्नं पाहणारे महाभाग गप्प बसले नाहीत. जानेवारीत एका मुलीच्या काही प्रकरणात मला आणि काही शिक्षक व अधिकार्‍यांना गोवून धारा ३०२ आमच्यावर काही काळ का होईना लावून, ती टीव्हीवरून प्रदर्शित करून काही वरिष्ठ लोकांनी माझ्यावर सूड घेण्याचं समाधान मिळवलं, असं मला कळलं. मी तेव्हा मुंबईत सुट्टीवर आले होते. पण मथितार्थ एवढाच, की लढाई तर खरीच, पण तिचा दर्जा घसरला की लढायला मजा येत नाही हे कळलंच नाही या लेाकांना. त्यांना शिक्षा करायला मला चार पायर्‍या उतरून खाली यावं लागणार असेल, तर ते माझ्या पदाला, मला शोभेल का? बरं, शिक्षा करणारी मी कोण? उपरवाल्याची लाठी आवाज करत नाही, याचं प्रत्यंतर तिथं अनेकांच्या उदाहरणांनी नंतर सिद्ध झालं.

अशीही अग्निपरीक्षा पार करून भातखंडे संगीत संस्थान डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये मी एक-दीड वर्षं पूर्ण केलं. या काळात संगीत कलेच्या रसिकांनी माझ्याशी खूप छान मैत्रीचे बंध निर्माण केले. तिथल्या ललित कला अकादमीमध्ये मी ‘संगीत आणि अन्य कलांमधील नातं’, आंचलिक विज्ञान केंद्रातर्फे आयोजित ‘वर्षामंगल’ या वृक्षदिंडीत आमच्या संस्थेद्वारे ‘वर्षाऋतू आणि त्यावर आधारित माझ्या रचनांवर नृत्य’ हे कार्यक्रम सादर केले. निरनिराळ्या सामाजिक संस्थांशी माझ्या संस्थेच्या वृंदगान समूहाला मी जोडून दिलं.

अतिशय छान प्रसंग म्हणजे ‘शहीद स्मृती समारोह समिती’ या श्री. खत्री यांच्या संस्थेतर्फे सादर होणार्‍या ‘चाफेकर बंधू व रानडे’ या हुतात्म्यांच्या स्मृतीला अध्यक्ष म्हणून आदरांजली वाहण्याची संधी मला २००९पासून २०१५पर्यंत मिळाली. वर्षभरात स्वातंत्र्यसंग्रमात बलिदान करणार्‍या, प्रेरणास्रोत बनलेल्यांना ही समिती श्रद्धांजलीचे कार्यक्रम करते. त्यांच्या कार्याचा एक घटक बनण्याचं भाग्य (मला मुंबईत फार क्वचित मिळालं) सातत्यानं लखनऊमध्ये मिळालं, हा एक वेगळाच योग म्हणायचा.

कोणत्याही विश्वविद्यालयाचं कार्य मुख्य म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना पदवी, उपाधी देणं. त्यासाठी दीक्षान्त समारोहाचं आयोजन केलं जातं. एका समारंभात शेजारी बसलो असता राज्यपालांनी मला सांगितलं, “तुमच्या संस्थेचा दीक्षान्त समारोह आयोजित व्हायला हवा. संस्थेला डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळून दहा वर्षं झालीत ना?’’ मला हुरूप आला. मी लगेच बैठक बोलावली. आमच्या पाच विभागांचे (गायन, तंत्रवाद्य, अवनद्ध वाद्य, नृत्य आणि संगीतशास्त्र) विभागाध्यक्ष जमवून ही कल्पना सांगितली. तत्पूर्वी कधीच दीक्षान्त समारंभ झाला नसल्यानं काय काय करावं लागतं यासाठी लखनऊ विश्वविद्यालय, मुंबईतलं एस.एन.डी.टी. वगैरेमधले सुहृद गाठले. त्यांनीही मनमोकळेपणानं सगळी माहिती दिली. विविध समित्या स्थापन झाल्या. दीक्षान्त समारोहाचा स्टॅच्यूट करून प्रबंध परिषदेतून (बोर्ड ऑफ मॅनेजमेंट) त्याचं अनुमोदन झाल्यावर समारोहाचे बाकीचे तपशील भरताना मुख्य भूमिका दामाजीपंतांची होती. नुकताच संप मिटला होता. अजून धग बाकी होती. मी काही भव्य करते आहे म्हणताच - “अपने पास इतना बजट ही नहीं है।’’ अशी सूचना मिळाली. सरकारकडे आता मागितलं, तरी मिळायचं तेव्हाच मिळणार. त्यांना काय घाई आहे? शिवाय दीक्षान्तचाही एक मौसम असतो. नोव्हेंबर ते मार्च या काळात राज्यपाल ज्या विश्वविद्यालयांचे कुलाधिपती (चान्सलर) असतात (उत्तर प्रदेशचे राज्यपाल चोवीस विश्वविद्यालयांचे चान्सलर आहेत.), त्या सर्व कुलपतींना ते तारखांची निवड करून देतात. पूर्ण डिसेंबर आणि जानेवारीचा पहिला आठवडा थंडीचा कहर आणि दाट धुकं, पाऊस यामुळे निरुपयोगी असतात. अंगावर दहा-दहा कपडे घातले, तरच तुम्ही आजारी न पडता राहू शकता. सूर्यदर्शन दुर्मिळ होतं; झालंच तर चंद्र वाटण्याइतका सूर्य गरीब बापुडवाणा दिसतो. प्रवासाची सगळीच साधनं बेभरवशाची ठरतात. त्यामुळे त्यावर्षी दीक्षान्त झाला नाही. काही मंडळी मनाविरुद्ध काही समित्यांवर बसली होती. त्यांनी तत्काळ ‘साई सुट्ट्योऽऽ’ म्हणून अंग काढून घेतलं. कारण वर्गात शिकवण्याव्यतिरिक्त काम करायचं म्हणजे किती त्रास!

हा अनुभव मला अपेक्षितच होता, कारण जुलै २००९च्या संपानंतर लगेचच यू.जी.सी.चे निरीक्षक दलाचे लोक आमच्याकडे येणार होते. त्यासाठी आम्हा सर्वांनाच दक्षतेनं आपल्या संस्थेची सगळी परंपरा आणि कार्यपद्धती प्रदर्शित करायची होती. त्यावेळी संप न केलेल्यांनीच सारी जबाबदारी उचलली. संप करणार्‍यांनी त्या दलाकडे ‘ह्या संस्थेचा डीम्ड विद्यालयाचा दर्जा काढून घ्या’ असं निवेदन सादर केलं! घ्या! काय बोलणार यापुढं!! कारण कित्येक अर्हता नसलेले लोक, आपल्याला पुढे भविष्य फार मोठं नाही म्हणून संस्थेलाच मोठं होण्यापासून रोखत होते. यू.जी.सी.च्या दलानं माझी धडपड, संप या सगळ्याचा सहानुभूतीपूर्वक विचार केला. त्रुटिपूर्ण गोष्टी कशा नीट मार्गावर आणायच्या याबद्दल सूचनाही दिल्या. त्यानंतर संस्थेसंबंधी जेव्हा केव्हा मला अडचणी आल्या, प्रश्न पडले, तेव्हा मी प्रत्यक्ष दिल्लीला जाऊन किंवा फोनवरून त्यांचा सल्ला घेऊन कामं पुढे रेटू शकले. त्यांच्या मदतीबद्दल मी आजही त्यांचे आभार मानते.

मला पहिल्या नकारघंटेनंतर पुढच्या वर्षी दीक्षान्तचं आयोजन करायला तब्बल एक वर्षाचा अवकाश मिळाला होता. मी बजेटवर नजर ठेवायला सुरुवात केली. दर महिनाअखेर खात्यात काय शिल्लक आहे, याचा हिशेब मागू लागले. बजेट येताच ‘यातले इतके दीक्षान्तसाठी ठेवा’ असं सांगून ठेवत गेले. मग पुन्हा समित्या बनल्या. या समारोहात वापरले जाणारे घोळदार गाऊन्स आणि टोप्या यांना फाटा दिला, कारण त्याचं भाडंच लाखात जातं. आणि ते संस्थेसाठी शिवून घेऊन त्यांची निगा कोण राखणार? त्याऐवजी पुढे-पाठीत (व्ही) आकारात छान, कोणाच्याही डोक्यातून खांद्यावर अलगद बसेल अशा कॉलरचं (अंगवस्त्रं-उत्तरीयाचंच वेगळं रूप) डिझाईन सर्वसंमत करून नक्की केलं. ह्या निरनिराळ्या रंगांच्या कॉलर्सवर संस्थेचं बोधचिन्ह आणि पूर्ण नाव पुढे हिंदीत व मागे इंग्लिशमध्ये एम्ब्रॉयडरी करून घेतलं. ठेवण्यासाठी जागा कमी लागते; सन्माननीय कुलाधिपती, मुख्य अतिथींच्या गळ्यात घालताना अवघड होत नाही आणि पदकं गळ्यात घालताना टोप्या पडत नाहीत. अशा पद्धतीच्या या कॉलरची सध्याचे उत्तर प्रदेशचे राज्यपाल मा. श्री. राम नाईक प्रत्येक ठिकाणी तारीफ करतात आणि डगला-टोपी रद्दबातल करण्याचा आग्रह करतात.

पहिला दीक्षान्त समारोह मी ‘सफेद बारादरी’ या ऐतिहासिक देखण्या वास्तूत करायचा ठरवला. कारण १९२५ला तिथंच जी ‘ऑल इंडिया म्युझिक कॉन्फरन्स’ भरली, जिच्यात देशभरातल्या शास्त्रीय संगीत क्षेत्रातल्या तालेवार गायक-वादकांनी सहभाग घेतला, जिथं झालेल्या चर्चा, परिसंवादामुळे भातखंडे या ‘चतुर पंडितां’ना आपल्या ‘हिंदुस्थानी संगीत पद्धती’ या जगप्रसिद्ध ग्रंथांसाठी माहितीचं भांडार मिळालं, त्या कॉन्फरन्सनं श्रीमान राय उमानाथ बली, राय राजेश्वर बली आणि राजा नबाब अली यांना उत्तर प्रदेशात शास्त्रीय संगीत शिक्षण देणारी एक अधिकृत संस्था हवी, अशी प्रेरणा मिळून आजच्या आमच्या संस्थेचं बीजारोपण झालं त्याची ही वास्तू साक्षीदार आहे. ‘मॉरिस कॉलेज’ या नावानं सुरू झालेली ही संस्था मधल्या काळात (१९६६ ते २००० या काळात) शासकीय महाविद्यालय म्हणून कार्यरत होती. भातखंडे यांनी अभ्यासक्रम आखून दिला आणि बली कुटुंबानं वास्तू आणि परिसर दिला पं. श्री. ना. रातंजनकर यांनी गुर्वाज्ञेप्रमाणं संस्थेचा तन-मन-धन समर्पित करून सांभाळ केला, संवर्धन केलं. अनेक महनीय संगीतज्ज्ञांनी या संस्थेला देश-विदेशात ख्याती मिळवून दिली. पूर्वीप्रमाणेच आजही जगभरातून विद्यार्थी इथं शिकायला येतात. तर अशा ८०पेक्षा जास्त वर्ष चाललेल्या (१९२६ ते २०१५) संस्थेला केंद्र सरकारनं सन २००० ऑक्टोबरमध्ये स्वायत्तशासी डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा बहाल केला. अशा उज्ज्वल परंपरा असलेल्या संस्थेचा पहिलावहिला दीक्षान्त समारोह अशा प्रेरणादायी वास्तूत होणं हेच उचित नव्हे का?

या समारोहाचे मुख्य अतिथी होते पं. जसराज. त्यांनी समारोहानंतर गायनानं आमच्या संस्थेला आणि विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले. या दीक्षान्त समारोहात नुसत्या डिग्य्राच नव्हे, तर पदकंही दिली गेली पाहिजेत, या विचारानं मी राय उमानाथ बली यांचे पौत्र स्वरेश्वर बली यांना गळ घातली. त्यांनी तत्काळ युनिव्हर्सिटी टॉपरला आपल्या आजोबांच्या नावे सुवर्णपदक देण्याची तयारी दर्शवली. त्या पदकाच्या कारागिरीसाठी मी त्यांना जयपूरमधले माझे सराफ मित्र जोडून दिले. ते अत्यंत देखणं असं पदक देताना फार छान वाटतं. मीही (एम.ए.) एम.पी.ए. गायन विषयातल्या सर्वोच्च गुणांसाठी माझ्या वडिलांच्या नावे एक सुवर्णपदक आणि काही नगद दिली. बघता-बघता सर्व विषयांसाठी आमच्या शिक्षकांकडून, त्यांच्या प्रोत्साहनानं पूर्वीच्या शिक्षकांच्या नातेवाइकांकडून, असे अनेक पदक-पुरस्कार जमा झाले. आरसपानी शुभ्रवास्तूतला तो सोहळा होण्यापूर्वी अनेक अडचणीही आल्या. तांत्रिक आणि आधिभौतिकही! पण त्या सर्वांवर मात करून एक देखणा सोहळा दि. १० फेब्रुवारी २०१२ रोजी दिमाखात पार पडला.

या समारोहामुळे जे पूर्वी विरोधात होते, त्यांनाही आपल्या विरोधाची धार बोथट करावी लागली. मी मनात कोणताी राग, द्वेष किंवा सूडबुद्धी न ठेवता सर्वांनाच त्यात सहभागी करून घेतलं होतं. उसनं का होईना, हसून सगळं साजरं झालं; यातच सारं आलं. या प्रसंगी स्मरणिकाही प्रकाशित झाली. त्यानंतरचे दीक्षान्त समारोह “मॅम, अब तो अपना सारा प्लॅन तैयार है। चिंता की कोई बात नहीं।’’ या चालीवर दि. ६ मार्च २०१३, दि. २१ डिसेंबर २०१३ आणि दि. २० नोव्हेंबर २०१४ या तारखांना धडाक्यात साजरे झाले. प्रतिवर्षी विद्यार्थ्यांच्या पदकांच्या संख्येत भर पडत गेली. पं. हरिप्रसाद चौरसियाजी, पं. बिरजू महाराजजी आणि विदुषी प्रभा अत्रे यांनी या समारोहाचं अध्यक्षस्थान भूषवलं. आपले कार्यक्रम सादर करून हरिजी, बिरजू महाराजजी यांनी ते दिवस गाजवले. या समारोहांच्या दुसर्‍या दिवशी आमच्या संस्थेतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले गेले. दोन वर्षांपूर्वी मी कालिदासाच्या काव्यातल्या षड्ऋतूंवर आधारित काव्यरचना (हिंदीत) करून त्याला संगीत दिलं आणि संस्थेत शिकणार्‍या कथक, भरतनाट्यम्, मणिपुरी आणि लोकनृत्याच्या विद्यार्थीवर्गाकडून दोन तासांचा एक कार्यक्रम सादर केला. याप्रसंगी सगळ्या स्टाफला जेवणही दिलं जातं. हे सहभोजनाचे प्रसंग बर्‍यापैकी अधिक वेळा आणले जातात.

भातखंडे संगीत संस्थान जेव्हा शासकीय महाविद्यालय झालं त्यावेळी काही प्रथा बंद पडल्या. तत्पूर्वी रातंजनकर गुरुजींनी आपले गुरू भातखंडे यांच्या स्मरणार्थ अखंड ७२ तासांचा स्वरांजलीचा कार्यक्रम सुरू केला होता. एक कलाकार आपला कार्यक्रम करून उठल्यावर दुसरा त्या जागी येईपर्यंत तानपुरे अखंड वाजते ठेवले जात. सर्वांत शेवटी पहाटे तीन वाजताच्या सुमारास श्री. ना. रातंजनकर गायला बसत आणि मग सूर्योदयाला कार्यक्रमाची सांगता होत असे.

पं. मोहनराव कल्याणपूरकर हे कथक नृथ्याचे शिक्षक स्वत: अत्यंत व्यासंगी कलाकार होते. रोहिणी भाटे या त्यांच्याकडे शिकत. त्यांनी व रातंजनकरांनी नृत्यनाटिका आणि संगीतिका बसवून त्यांचं अप्रतिम सादरीकरण केलं होतं. एक जर्नलही निघत असे. मधल्या काळात हे सारं कुठे गहाळ झालं, हे सर्वांचं संगीताशी एकारूप होणं कुठे हरवलं, काही समजत नाही.

ज्यावेळी १९२६ला ही संस्था स्थापन झाली, तेव्हा तालुकदार लोकांनी, जमीनदारांनी पैसा दिला आणि आपल्या घरातल्या लेकी-सुनांना ‘मॅरिस कॉलेज’मध्ये संगीत, गायन, वादन, नृत्याची अधिकृत संथा घेण्यासाठी, निपुण, विशारद अशा उपाधी मिळवण्यासाठी दाखल केलं.

मला भाऊ सांगत, “कोणी कलाकार कार्यक्रमांच्या निमित्तानं अलाहाबाद, कानपूरला येतोय असं कळलं, की अण्णासाहेब (रातंजनकर) त्याला आपल्या संस्थेत बोलावत. ‘माझ्या विद्यार्थ्यांना काही शिकवा हो’ असं सांगत. शिकवल्यावर परत जाताना हळूच काही रक्कम त्या कलाकाराला देत, एक भेट म्हणून. अर्थात, कुणी क्वचितच ती घेत. ‘अहो अण्णासाहेब, तुम्ही एवढं मोठं काम करताय, आमचाही खारीचा वाटा असू द्या!’ असं म्हणून पुनरागमन करण्यासाठी निघत. ही भेट अण्णासाहेब स्वत:च्या खिशातून देत. संस्थेच्या खात्यातून नाही.’’

अण्णासाहेब खैरागढला कुलपती म्हणून लखनऊ सोडून गेले. जवळजवळ सव्वीस-सत्तावीस वर्षं त्यांनी संस्थेसाठी घाम गाळला. संस्थेत चांगली माणसं आणली आणि संस्था मोठी केली. नंतर ते मुंबईत असताना १९६५-६६ साली बल्लभ संगीतालयाच्या इमारत निधीसाठी त्यांनी ‘गीत सरिता’ ही तानसेनच्या जीवनावर आधारित संगीतिका बसवली. त्यात भाऊंनी हरिदास स्वामी आणि नन्हे खाँ हे डबलरोल केले आणि अपघातानंच मी छोटा तानसने झाले. त्यावेळी शाळा सुटली की साडेपाच-सहाला संध्याकाळी मी भाऊंबरोबर तालमीला जात असे. घरी परतायला दुसर्‍या दिवशी सकाळचे सहा-साडेसहा वाजत असत. रात्रभर तालीम होत असे.

माझ्या आवाजावर अण्णासाहेब फार खुश असत. माझं पहिलंच पद विंगेतून मी प्रवेश करताना तारसप्तकातल्या ‘सा’पासून सुरू होई. ऑर्गन लांब असे. पण मी बरोबर माझ्या पट्टीत सणसणीत सुरुवात करत असे, त्याचं त्यांना फार कौतुक वाटायचं. मला ग्रँट रोडला घरीसुद्धा घेऊन जात. त्यांचे लाड मला अजून आठवतात. त्यामुळेच ‘भातखंडे संगीत महाविद्यालया’ची कुलपती म्हणून त्या खुर्चीवर बसताना माझं मन भरून आलं. अशा दिग्गज व्यक्तीच्या पदावर बसून त्यांच्या संस्थेचा सांभाळ करायचा ही केवढी मोठी जबाबदारी ईश्वरानं माझ्या ओटीत टाकली!

मला नियुक्तीच्या वेळी “शिवाय तुम्ही महिला आहात, हे फार छान आहे’’ असं तत्कालीन राज्यपाल म्हणाले होते, ते का, याचा उलडा होईल असे काही प्रसंग संस्थेत घडले. संस्थेतल्या एक-दोन महिलांची वर्तणूक पाहून पुरुष अधिकारीसुद्धा दबकून राहतील असं दिसत होतं. त्यांनी दंबगाई करायचा प्रयत्न केल्यावर कायद्याचा बडगा आणि अनुशासन या दोन अस्त्रांचा वापर करावाच लागला मला. त्यांच्या प्रत्येक चालीला काटशह देण्यासाठी सुप्रीम कोर्टाचीही माझी तयारी झाली. एका प्रकरणात दिल्लीला खेटे घालावे लागले. पण संस्थेच्या हितासाठी ते अनिवार्यच होतं. वाईट एवढंच वाटतं, की समानतेच्या युगात, स्त्रियांना आरक्षण मागण्याच्या काळात आपलं बाईपण वापरून, परिस्थितीचा गैरफायदा घेतला जावा, हे किती अश्लाघ्य आहे! समानता फक्त आपल्या फायद्याकरता हवी असते का?

अशीच एक कहाणी एका पीएच.डी.ची! त्या विद्यार्थ्याच्या प्रबंधाचा स्तर इतका वाईट होता आणि इतक्या मोठ्या त्रुटी होत्या, की त्याला डॉक्टरेट देणं म्हणजे संस्थेची बौद्धिक दिवाळखोरी जाहीर करणं ठरलं असतं. त्याला त्याच्या त्रुटी मी समजावून दिल्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी दोन-अडीच तास लेक्चर दिलं. तर त्यानं फक्त एक कॉपी-पेस्ट नमुना आणून दिला आणि दुसर्‍याच दिवशी सरळ कोर्टात गेला. ‘मला जे करायचं ते मी करून दिलंय. आता काही शिल्लक नाही.’ असा दावा संस्थेविरुद्ध केला. त्याच्या केसमध्ये मी पाच वेळा जजसाहेबांसमोर गेले. त्याला डिग्री मिळाली नाहीच; पण जजसाहेब संगीताबद्दल अधिक जाणून घ्यायला मात्र उत्सुक झाले. आता त्यांची बदली झाली आहे. पण माझ्या पाच वेळच्या ‘पेशी’मध्ये कोर्टात ‘रस, काव्य, भाव, संगीत’ या चर्चा मात्र काही काळ वातावरणात होत्या.

याच काळात कोर्टाच्या बार असोसिएशन वगैरेतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी निमंत्रण आल्याबरोबर मी आमचे शिक्षक आणि साथीदारांचे कार्यक्रम करून दिले. दोन-तीनदा मलासुद्धा गाण्याची विनंती झाली. त्यामुळे काव्य, राग, रस, भाव या चर्चेच्या वेळी मी जे काही बोलले होते, त्याचं प्रात्यक्षिकही मला देता आलं. परिणामी ज्युडिशिअरीच्या सदस्यांशी माझा परिचय झाला. माझ्याबद्दल पेपरात केलेली बेछूट विधानं, आरोप यांची आपोआपच काय व्हायची ती गत झाली. त्यामुळे माझी नियुक्ती आणि माझी गुणवत्ता याबद्दल संशय व्यक्त करणारी, (खरं तर ‘नियुक्ती रद्दच करा’ असं म्हणणारी) जनहित याचिका समोर आल्यावर जजसाहेबांनी, “का त्या जगविख्यात कलाकाराच्या मागे लागलाय तुम्ही? त्यांची गुणवत्ता समजण्याची तुमची कुवत आहे का?’’ असं म्हणून तत्काळ जी खारीज केली.

या साडेसहा वर्षांच्या काळात मला माझाच नव्यानं शोध लागला काही बाबतीत. मी लहानपणापासून रागीट होतेच. खूपच होते. कारण मला अन्याय खपत नाही. दुसर्‍यानं तिसर्‍यावर अन्याय केला तर ते मला चालत नाही, तर माझ्यावर विनाकारण कुभांड रचून, माझी बदनामी करून, मला मन:स्ताप देणार्‍यांनी माझ्यावर अन्याय केला तर तो मला कसा सहन होईल? त्याचा प्रतिकार कायद्याच्या चौकटीत राहून मला करायला हवाच होता; तो मी केला. पण त्याचबरोबर संस्थेच्या हितासाठी कर्मचार्‍यांचं हित सांभाळणंही आवश्यक होतं. त्यांच्या ज्या मागण्या शासनाकडून २००६पासून पूर्ण झाल्या नव्हत्या, त्यासाठी मला कंबर कसावी लागली.

ज्या लोकांनी मला हाकलवून लावण्यासाठी सगळे हथकंडे आजमावले; खुनाच्या, भ्रष्टाचाराच्या आरोपांपासून ते दारात भाताच्या डोंगरावर गुलाब, लिंबू ठेवणं, ऑफिसच्या दारावर जादूटोण्याच्या वस्तू लटकण्यापर्यंत सगळे प्रकार करून झाले, त्याच लोकांच्या आर्थिक फायद्यासाठी मी किती उंबरठे झिजवले याची गणती नाही. पार दिल्लीपर्यंत जाऊन गार्‍हाणं मांडलं. शेवटी काम झालं. ज्या दिवशी सर्वांच्या खात्यात पैसे जमा झाले, कित्येक वर्षांची थकबाकी आली, तेव्हा मनात विचार आला, ‘मी जर पूर्वीची श्रुति असते, तर ही खटपट केली असती का? या लोकांना मी मदत केली असती का?’ हो. श्रुति तीच आहे; पण आता वाढत्या वयाबरोबर व्यवहार आणि आपल्या पदाची जबाबदारी याची प्रगल्भता मला असंच वागायला लावणार, कारण मी संस्थाप्रमुख आहे. संस्था चालली पाहिजे, तीसुद्धा सुव्यवस्थितपणे!

बाहेरच्या देशातले आणि भारतातले अनेक संगीतप्रेमी या संस्थेच्या दर्शनासाठी नेहमीच येत असतात. काही जुन्या काळातले शिकलेले लोक सत्तर-पंच्याहत्तराव्या वर्षी आपल्या तिसर्‍या पिढीला - “हे बघ माझं संगीत विद्यायलय’’ म्हणून मोठ्या अभिमानानं दाखवायला आणतात. काही माझे चाहतेही “लखनऊमध्ये आल्यावर तुम्हाला प्रशासकाच्या भूमिकेत पाहायला आलो’’ म्हणून मुद्दाम भेटून गेले.

शासनाकडून संस्थेच्या संगीत भवन (संगीत शिक्षण वर्गांची इमारत) आणि प्रशासनिक भवन यांच्या अनुरक्षणासाठी फंड आल्यावर जागोजाग होणारी गळती, दुरुस्त्या, रंगरंगोटी करून घेतली. पण कशी मनोवृत्ती आहे पहा! ज्या दिवशी संगीत भवनाच्या रंगरंगोटीचं काम संपलं, त्याच दिवशी संध्याकाळी घरी जाताना कुणीतरी भिंतीवर पानाची पिचकारी मारून आपली लायकी दाखवली. बहुतेक जण हळहळले, काहींनी “क्या करेंगे? किस किस को रोकेंगे?’’ असं म्हणून खांदे उडवून काढता पाय घेतला. अर्थात, पुन्हा रंगाचा एक हात मारल्यावर तसा प्रयत्न अजून झाला नाही पुन्हा. तुम्ही कितीही झटून त्यांना चांगलं वातावरण द्या, ते आपल्यासारखंच सारं करायला पाहतात. अशांना कोण सुधारणार?

पण “इतके दिवस आम्ही ह्या दारासमोरून हजारदा गेलो, आताच या संस्थेची चमकदार वास्तू नजरेत भरली म्हणून आम्ही तुम्हाला खास बधाई द्यायला आलो’’ असं म्हणणारे काही लोक जेव्हा माझ्या ऑफिसात येऊन अभिनंदन करून गेले, तेव्हा माझ्या धडपडीचं चीज झालं. हे काम करणारा कॉन्ट्रॅक्टर - “मॅडम, तुमच्यासाठी काय करू?’’ म्हणून सारखा विचारायचा.

आमच्या कर्मचारी निवासामागे एक चारखांबी छोटं देऊळ होतं; पण कचर्‍याचे ढीग इतके असत, की ते ओलांडून देवापर्यंत पोहोचणं म्हणजे दिव्यच होतं. मी दुसर्‍या जागी स्वच्छता करून घेतली. भूमिपूजन करून नवीन देऊळ बांधून घेतलं. त्या छोटेखानी देवळात शुभदिवशी विधिपूर्वक देवांची प्रतिष्ठापना केली. त्या दिवशी मला अतीव समाधान झालं.

मुंबईत हिंदू कॉलनीतल्या एका खोलीच्या घरात मी वयाची एकोणपन्नास वर्षं राहिले. काही मैत्रिणींकडे, कोल्हापूरला आजीच्या बंगल्यात गुलाब, जाई, चमेली, मोगरा, आंबे, चिंचा, जांभळं यांची लयलूट होती. आपल्या दारातलं फूल आपण कधी देवाला वाहू का? असं मला नेहमी वाटायचं. ती माझी हौस लखनऊनं पूर्ण केली.
पाच झोपण्याच्या खोल्या, एक ड्रॉईंग रूम, जेवणघर, चार न्हाणीघरं, दोन साठवणीच्या खोल्या, एक स्वयंपाकघर, दोन गच्च्या - एक लहान, एक मोठी गच्ची, एक गॅरेज अशा बंगल्याच्या भोवती वेगवेगळ्या जातीच्या लिंबांची झाडं, शेवगा भराला आल्यावर खोल्या भरून जातील असं पीक देत होत्या. जमीन इथं तर खुलीच आहे. टाकलं बी की पीक सुरूच! भेंडी, मुळा, बीट, वांगी, मिरची, मेथी, पालक, शेपू, फ्लावर, कोथिंबीर, कोबी, दुधी, भोपळा (हिरवा), करवंद आणि उन्हाळ्यात वेगवेगळ्या जातीच्या कैर्‍या आणि आंबे यांनी घर भरून जाई. मी मुंबईला यायला निघाले, की एअरपोर्टवर माझ्या सामानातले कार्डबोर्डचे भाज्या-फळांनी भरलेले खोके बघून ‘भाजीवाली/सब्जीवाली मॅडम’ म्हणूनच पहिल्यांदा माझी ख्याती झाली. नंतर मी ‘सब्जीवाली व्ही. सी. मॅडम’ या पदावर कायम झाले. काही महिला कर्मचारी लिंबांच्या किंवा आंब्यांच्या पिशवीवर हक्कच सांगून फोन करायच्या. मी जवळजवळ दर आठवड्याला एकदा तरी मुंबई-दिल्लीसाठी विमानतळावर जात होते. बहुधा कार्यक्रमासाठी, नाही तर मीटिंगसाठी. माझी विमानाची वेळ सांगून फोन केला की, “मॅम, सीट ठेवतेय. लिंबं आणताय ना?’’ असा सौदाच करायच्या पोरी. कारण एकेक लिंबू नारळाएवढं! आपल्या अंगणातला बहरलेला पारिजात, पपईच्या फुलांचा आणि मधुमालतीचा मादक सुगंध वर्षभर मन प्रसन्न ठेवायचा; ताजी फुलं देवाला वाहताना मी नतमस्तक होत होते. माझ्या सार्‍या इच्छा देवानं पूर्ण केल्या. मोसमाप्रमाणं फुलांची रोपं आणून माळ्याबरोबर त्यांची निगा राखताना होणारा आनंद हा अवर्णनीयच म्हणायचा.

पण म्हणतात ना, सारं काही हवं तसं मिळालं तरी सुखही दुखतं. एक तर माझे पती आणि मुलगी हे दोघं मुंबईला. बागेतल्या फुला-फळांचे, झाडा-पानांचे, भाज्यांचे, आकाशाचे रंग बदलतानाचे फोटो पाठवून त्यांना दृष्टिसुखात सहभागी करण्याचा प्रयत्न करत होते. पण ते काही खरं नव्हतं. माझे पती कधीमधी येऊन राहत होते.

मी संस्थेत रेकॉर्डिंगच्या तंत्रज्ञानासंदर्भात एक छोटा अभ्यासक्रम पुनरुज्जीवित केला. त्यासाठी मुंबईहून मुंबई युनिव्हर्सिटीचे श्री. मनोहर कुंटे आणि माझा मुलगा श्रीनिधी हे व्याख्यानं देत. या अभ्यासक्रमानंतर मुलांना प्रमाणपत्रंही दिली जात. मी त्या अभ्यासक्रमाला ‘ऑडिओ आणि स्पीच थेरपी’ची जोड दिली. त्यासाठी मुंबईच्या डॉ. अनुराधा बंटवाल या माझ्या शिष्येला पाचारण केलं. त्यामुळे आधी कान, कानाची रचना, त्याचे विकार, उपाय, स्वरयंत्र, आवाज, त्याचा वापर, त्याचे विकार आणि उपचार याची पृष्ठभूमी तयार करून नंतर साऊंड रेकॉर्डिंग, ध्वनिसंकलन (एडिटिंग) वगैरे संबंधित विषयांवरची व्याख्यानं होत. श्रीनिधी तेवढ्यापुरताच आठ दिवस इकडे राहून जात असे. पण या अभ्यासक्रमानं इकडच्या मुलांना खूप फायदा झाला. फक्त गायनच नव्हे, तर तबला, सतार, गिटार, व्हायोलिन शिकणार्‍यांनाही त्याचा फायदा झाला. नव्या रोजगाराची दिशा नाही दाखवली, तर नुसती डिग्री घेऊन मुलं दिशाहीन भटकत राहतात.

आमच्याकडे वर्षातून दोनदा तरी समस्त विश्वविद्यालयां-मधल्या कुलपतींची संमेलनं भरवली जातात. त्याच्या अध्यक्षस्थानी कुलाधिपती-राज्यपाल महोदय आणि प्रमुख अतिथी मुख्यमंत्री महोदय असतात. अशाच एका बैठकीत कुलपतींनी आपले वार्षिक प्रगतीचे अहवाल सादर करून मागण्या मांडल्या. माझी वेळ येईपर्यंत वेळ संपत आली होती. मी काही न मागता पुढच्या पाच वर्षांत या संस्थेचं भावी स्वरूप काय असावं याबद्दल फक्त सहा मुद्दे मांडले. वेळ संपली. त्यानंतर मा. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू झालं. त्यांचं पहिलंच वाक्य होतं, “भातखंडे संगीत संस्थानच्या कुलपतींनी जी भविष्यासंबंधी योजना सादर केली आहे, त्यासाठी त्यांच्या विश्वविद्यालयाचा विस्तार आणखी मोठ्या जागेत व्हावा म्हणून एक अधिक (दुसरा) परिसर आणि त्यासाठी लागणारं सर्व तर्‍हेचं साहाय्य दिलं जाईल.’’ हे ऐकल्यावर सगळे जण म्हणाले, “मॅडम, आपने कुछ नहीं मांगा और आपको सबकुछ मिल गया।’’ मुख्यमंत्री याविषयासंबंधी खूप रस घेऊन पुढचे आदेश देत आहेत.

या कुलपतीपदानं मी खूप वेगळ्या सामाजिक स्तराबरोबर वेगळ्या भूमिकेतून मिसळत गेले. पूर्वीही उद्योगपती, मंत्री, जजेस, वकील, सामाजिक कार्यकर्ते भेटत होते. इतर परिचितही होते. पण एक प्रशासक म्हणून आणि कलाकार म्हणून भेटण्यात फरक नक्कीच आहे. सरकारच्या नीती-धोरणांचा परिणाम आपल्या दैनंदिन कामावर कलाकार म्हणून पडायचा संबंधच नव्हता. पण संस्था चालवताना रोजच्या पेपरमधल्या प्रत्येक बातमीकडे फार बारकाईनं पाहावं लागतं, हे मी नव्यानं शिकले.

या प्रदेशातले थंडीचे दिवस खाणंपिणं आणि रंगरूप, गंध या बाबतीत उत्तम असतात. थंडी ओसरता-ओसरता विविधरंगी फुलांचे ताटवे फुलायला लागतात बंगल्या-बंगल्यात. शेवंती आणि अनेक आकर्षक फुलांची, फळांची, भाज्यांची प्रदर्शनं भरतात. राजभवनमध्ये दोन दिवस सर्वांना मुक्त प्रवेश असतो, कारण राज्यभरातली उत्कृष्ट फळ-फुलं तिथं स्पर्धेसाठी येतात. कित्येक विभागात राजभवनच पहिला क्रमांक, ढाल, पदकं मिळवतं. त्यावेळी आकर्षक पुष्परचनांसमोर कुटुंबातल्या सदस्यांचे फोटो काढणार्‍यांची झुंबड उडालेली असते. रोपं विकत मिळतात, मध मिळतो आणि थंडीतला रविवार असूनही माणसं उत्साहानं या प्रदर्शनांचा आनंद लुटतात. आकर्षक फुला-फळांबरोबरच हवेतली थंडी आणि मंदसर उन्हाचा आनंदही आगळाच असतो.

हे जे दिवस मी लखनऊत उपभोगले, ते खरंच सुंदर दिवस! लखनऊपासून जवळच अख्तरीबाईंचं गाव फैजाबाद, त्याच्या जवळ अयोध्या. तिथं आमच्या एका मित्रामुळे रामलल्लाचं दर्शन मी अनेक वेळा घेऊ शकले. पण अयोध्येच्या रामाच्या डोक्यावर जीर्णशीर्ण ताडपत्री पाहून मी हादरले. कोर्टाच्या आदेशानंतर हल्लीच नवी काही व्यवस्था झालेली पाहून मनात म्हटलं, ‘रामभाऊ, तुमचं छप्पर बदलणं कायद्याच्या हातात आहे म्हणा की!’ सीतेला कैकयीनं भेट दिलेलं कनकभवन आणि हनुमानगढीसुद्धा अनेकदा पाहुण्यांच्या निमित्तानं पाहून झालं.
कल्पना नसताना नैमिष्यारण्यही पाहून झालं. वाटेत दुतर्फा पेपरमिंटच्या रोपांची शेती पाहिली. निमसार म्हणजेच नैमिष्यारण्य! छान जागा आहे. तिथला पाच हजारापेक्षाही जास्त वर्षांचा जुना वटवृक्ष हा भारतातल्या चार तितक्याच जुन्या वटवृक्षांपैकी एक आहे. तिथंच व्यासांनी उपनिषदं लिहिली असं म्हणतात. समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेली एक महाकाय हनुमान मूर्तीही आहे. श्री वल्लभाचार्य (पुष्टि संप्रदायाचे प्रवर्तक) यांचीही तपश्चर्येची गादी तिथं आहे. नृसिंहादी देवतांची मंदिरं आहेत. वर्षभर तिथं दक्षिणेकडून येणार्‍या भक्तांची रीघ असते. नैमिष्यारण्यातल्या चक्रावर्त तलावातही लोक मोक्षासाठी डुबक्या घेतात. आपल्या नाशिकप्रमाणे अयोध्येतही स्वर्गद्वार या ठिकाणी काळाराम मंदिर आहे. रामनवमीला त्या देवळात अनेक कलाकार येऊन गायनसेवा करतात. एकदा मलाही योग आला.

या ठिकाणी जाण्याचे रस्ते अतिशय प्रशस्त आणि छान आहेत. खरे हाय-वे आहेत. प्रवासाचा शीण येत नाही. कधी सवड असेल, तर एकटीच असले तरी मी ड्रायव्हरला गाडी काढायला सांगून सकाळी सहाला निघाले, की नैमिष्यारण्यातून दर्शन करून दुपारच्या जवेणाला घरी हजर होत असे. माझं हिंदी साहित्याचं वाचनही इथंच अधिक झालं. कोणत्याही वेळी कुठंही हिंदीत उत्स्फूर्त भाषण करताना त्याचा मला फार उपयोग झाला.

संस्थेतली कडक शिस्त मी पाळत गेले, त्यामुळे एक सुसूत्रता सर्व कामात येऊ लागली आणि कारभार व्यवस्थित सुरू झाला. पाच वर्षांचा कार्यकाळ संपून पुढे आणखी दीड वर्षं मला अधिक मिळालं. या काळात संस्थेचं हित हेच माझं ध्येय होतं. व्यक्तिगत स्वार्थच नसल्यानं ‘इदं न मम’ या वृत्तीनं जी या संस्थेची आणि संगीतकलेची सेवा मला करता आली, ते माझं महद्भाग्य!

प्रतिवर्षी परीक्षा आणि निकाल वक्तशीरपणे पार पाडून माझ्या परीक्षा विभागानं मोठंच काम केलं. विद्यार्थ्यांची संख्या प्रतिवर्षी माझ्या कार्यकाळात शंभरनं वाढली, हे लक्षणीयच म्हणायचं. त्या मुलांच्या डोळ्यांत, मी संस्थेतून बाहेर पडताना आलेलं पाणी, हीच माझी कमाई!

मुलांना कितीही शिकवलं, तरी जोवर त्या विद्येचं लोकांच्या समोर प्रात्यक्षिक होत नाही, तोवर खरं नाही. लखनऊच्या हनुमान सेतूवरच्या हनुमान मंदिरात फार वर्षांपूर्वी गायन होत असे. एक रिटायर्ड सरकारी ऑफिसर माझ्याकडे आले. त्यांच्याशी बोलताना त्यांनी तो विषय काढला. ते त्या प्रसिद्ध मंदिराचे एक कार्यकर्ते होते. मी शनिवारी संध्याकाळी आमच्या मुलांच्या गटांचं भजन, शास्त्रीय गायन-वादन करण्याची परवानगी दिली. मंदिरात येणार्‍या भक्तांपुढे आमच्या विद्यार्थ्यांना गाण्याचा अनुभव मिळू लागला. काही शिक्षकही त्या दर शनिवारच्या सेवेत हजेरी लावू लागले. त्यांच्या वर्धापन दिनादिवशी मीही कार्यक्रम केले. भातखंडेंच्या मुलांची ही सेवा आता अव्याहत चालू आहे. तसंच आमच्या संस्थेच्या प्रांगणातही, उन्हाळा कमी झाला, की कडाक्याची थंडी पडण्यापूर्वी मी दर शनिवारी दुपारी १ ते ५ कार्यक्रम ठेवले. वेगवेगळ्या वर्गांच्या मुलांना संधी मिळावी, मुलांना कार्यक्रम संयोजन, निवेदन यांचा अनुभव देण्यासाठी मुलांनीच याची आखणी करावी अशी व्यवस्था असते. या सर्वांमुळे फार उत्तम न गाता, वाजवता किंवा नाचता येणार्‍या विद्यार्थ्यांच्या प्रदर्शनात खूप सकारात्मक बदल घडून आला. मुलं आपण होऊन “पुढच्या कार्यक्रमात मी सहभागी होणार’’ असं सांगण्याची हिंमत करून मेहनत घ्यायला लागली.

ज्या बेगम अख्तरना मी देवासमान मानलं, ज्यांच्या गायकीनं आजही मी अभिभूत होते, भारावून जाते, त्यांची मज़ार त्यांच्या आईच्या मज़ारीशेजारीच पसंदबाग या भागात आहे. बेगमजींच्या त्या आमराईवर अतिक्रमणं एवढी आणि अशी झाली होती, की मज़ारी सोडून सर्वत्र लोक राहू लागले आणि अर्थातच गचाळ, घाण राहणीमानामुळे तिथं जनावरं येऊन बसत, त्यांची घाणही पडलेली असे. पुण्याहून श्री. सतीश टाकसाळे दरवर्षी त्यांच्या स्मृतिदिनी लखनऊला येऊन मज़ारी साफसूफ करून बेगमजींना सेवा अर्पण करत. इथल्या सनतकदा/सद्भावना ट्रस्ट या समाजसेवी संस्थेनं या मज़ारींच्या जागेचा कायापालट केला. आज शुभ्र संगमरवरावर देखणं नक्षीकाम केलेल्या त्या मज़ारींना बाजूला भिंती उभारून संरक्षण दिलं आहे. इतरांप्रमाणे मीही त्या गंगाजळीत माझी एक ओंजळ अर्पण केली आणि वर्धापनाच्या दिवशी तिथं बेगमजींच्या प्रसिद्ध रचना गायले. इतकी भारावून गेले, की काही क्षण गाताच येईना मला.

बेगमजी एकदा माझ्या आवाजाची तारीफ ऐकून माझ्या घरी भरपावसात पंचेचाळीस पायर्‍या चढून भिजलेल्या अवस्थेत माझे गुरुजी गुलुभाई जसदनवाला यांच्याबरोबर आल्या होत्या. येताना साथीसाठी महंमद अहमद खाँ व असगर अली यांनासुद्धा आणलं आणि माझं गाणं ऐकलं होतं. माझ्या विनंतीला मान देऊन स्वत:ही गायल्या होत्या. त्यांचं ते प्रसादस्वरूप गाणं मी रेकॉर्ड करून घेतलं. तो माझा एक बहुमोल ठेवा आहे.

बेगम अख्तर याही आमच्या संस्थेत १९७४ साली काही काळ गुरू म्हणून कार्यरत होत्या. दुर्दैवानं त्याच वर्षी त्यांचं देहावसान झालं. त्यांना आमच्याकडून श्रद्धांजली म्हणून लखनऊत भरणार्‍या फोटो प्रदर्शन आणि परिसंवादासाठी मी संस्थेचा हॉल उपलब्ध करून दिला. तेवढीच आपल्याकडून - संस्थेकडून सेवा. खरं तर मंचीय कलाकार ‘संस्थांतून कलाकार घडतात का?’ म्हणून उपरोधिकपणानं प्रश्न करतात. पण बेगमजी एवढ्या मोठ्या ख्यातकीर्त कलाकार असूनही विद्यार्थ्यांसाठी रुजू झाल्या. तसंच पं. व्ही. जी. जोग आणि उत्साद थिरकवा खाँ साहेबही या संस्थेत गुरू म्हणून काही काळ राहिले. काही नामवंत शिष्यही तयार झाले.

सोळाशे विद्यार्थी ही संख्या संगीत (गायन, वादन, नृत्य) या विषयासाठी लक्षणीय आहे. यात बाहेरच्या देशातले अनेक विद्यार्थीही आहेत. ही संख्या दरवर्षी वाढते आहे. संस्थेची पुण्याई खूप मोठी आहे. कितीही संकटं आली, बदनामी झाली, तरी प्रामाणिक हेतू मनात बाळगून जर सचोटीनं काम केलं, तर ते देवी सरस्वतीच्या चरणी रुजू झाल्याशिवाय राहत नाही, ही आई-वडील आणि गुरुजनांची शिकवण, त्यांचे संस्कारच मला या नव्या पर्वात उपयोगी पडले. सुरुवात खळबळीनं झाली, पण त्यावर उपाय योजून तारू भरकटू न देता आपला कार्यकाळ मी पूर्ण केला याचं अतिव आत्मिक समाधान मला नक्कीच मिळालं.

जयपूर-अजौली घराण्याची गायिका याचबरोबर भातखंडे संगीत संस्थान डीम्ड युनिव्हर्सिटीची कुलपती ही एक नवी ओळख मला मिळाली. नव्या जगाचा अनुभव मिळाला याबद्दल मी परमेश्वराची अत्यंत आभारी आहे.
माझ्या धडपडीला अनेक शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांनी मनापासून दाद दिली. अनेक सभा-समारंभांचं अध्यक्षपद मला देण्यात आलं. अगदी निघता निघता, म्हणजे ५ आणि ६ सप्टेंबर २०१५ रोजी मला दोन संस्थांकडून ‘शिक्षण क्षेत्रातल्या बहुमूल्य कामगिरी’साठीचे दोन पुरस्कार मोठ्या समारंभपूर्वक देण्यात आले. त्यातला एक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावानं दिला आहे. याच कार्यकाळात मला केंद्रीय संगीत नाटक अकदामीचा पुरस्कार आणि डॉ. प्रभा अत्रे यांच्या स्वरयोगिनी प्रभा अत्रे पुरस्काराचा (पुणे) लाभ झाला. त्यामुळे गाण्याच्या क्षेत्रातही मी कार्यरत राहिले आणि संगीत-शिक्षणाच्या कार्यक्षेत्राला माझ्या अनुभवाची जोड देता आली, हे दुहेरी सद्भाग्यच म्हणायला हवं!

***

पूर्वप्रसिद्धी - 'इत्यादी' - २०१५

***

'इत्यादी' दिवाळी अंकातला हा लेख मायबोली.कॉमवर पुनर्मुद्रित करण्यास परवानगी दिल्याबद्दल श्री. आशीष पाटकर व मनोविकास प्रकाशन यांचे मनःपूर्वल आभार.

***
प्रकार: 

फारच छान लेख! श्रुती सडोलीकर यांची फॅन आहे मी! एकदम करारी आणि प्रसन्न व्यक्तीमत्व आहे त्यांचं!
त्यांना आलेल्या अडचणी वाचून मात्र चिडचिड झाली. किती विघ्नसंतोषी लोक असतात.

वाह, अजून एक जबरदस्त व्यक्तिमत्वाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद चिनूक्स!!

सुरेख! श्रीमती श्रुति सडोलीकर-काटकर ह्यांचा हा बडा खयाल अगदी जमून गेला आहे. त्यांनी घेतलेल्या कष्टांबद्दल वाचून 'अजून अशी माणसे समाजात आहेत' असं वाटून छान वाटलं. खूपच जोरदार व्यक्तिमत्व आणि तरीही सांगण्याची प्रसन्न शैली. हा लेख इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद चिनूक्स!

लेख आवडला. सुनीताबाईंनी 'आहे मनोहर तरी'त मांडलेले शिक्षणक्षेत्रातले काही अनुभव आठवून गेले. अशा प्रतिभावंत व्यक्तींचा वा कलाकारांचा वेळ, शक्ती, उर्जा भ्रष्ट व्यवस्थेशी लढण्यात खर्ची पडावी, हे किती मोठं नुकसान!

वा! प्रेरणादायी लेख आहे. लेखाची भाषा आणि ओघही काय सुरेख आहे!

प्रशासकीय कामकाजात एकदा का माणूस अडकला की त्याला बाकी काही करायला फुरसदच मिळत नाही, मिळू दिली जात नाही. उत्तर प्रदेशात राहून शिस्तीनं आणि ठामपणानं काम करणा-या श्रुतीताईंनी आपल्यातला कलाकारही जिवंत ठेवला याचं फार कौतुक वाटलं. हॅट्स ऑफ टु हर.

{{{ बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी बाहेर आले ती भातखंडे संगीत संस्थान अभिमत विद्यापीठाची (सम विश्वविद्यालय) कुलपती (व्हाईस चान्सलर) म्हणून. }}}

हे नक्की का? कारण कुलपती म्हणजे चान्सलर आणि कुलगुरु म्हणजे व्हाईस चान्सलर अशी माहिती आहे. कुलपती अर्थात चान्सलर हे शक्यतो राज्यपाल स्वतःच असतात.

लेख अतिशय आवडला!

अशा प्रतिभावंत व्यक्तींचा वा कलाकारांचा वेळ, शक्ती, उर्जा भ्रष्ट व्यवस्थेशी लढण्यात खर्ची पडावी, हे किती मोठं नुकसान! >> +१

श्री. खत्री यांच्या संस्थेतर्फे सादर होणार्‍या ‘चाफेकर बंधू व रानडे’ या हुतात्म्यांच्या स्मृतीला >> चापेकर.

अंगवस्त्र हा शब्दही भलत्याच अर्थाने वापरलाय. लेखात अनेक मराठी शब्दांऐवजी हथकंडे, समारोह असे हिंदी शब्द वापरले गेलेत. तसेच एम्ब्रॉयडरी या इंग्रजी शब्दाऐवजी कशिदा हा शब्द वापरायला हवा होता.

लेख बराचसा आत्मप्रौढीचे प्रदर्शन करणारा वाटला.

अतिशय सुरेख लेख. शिक्षणक्षेत्रातलं राजकारण किती समर्थपणे सांभाळलं हे वाचून कौतुक वाटलं. असे कुलगुरु भारतातील सर्वच विद्यापीठांना मिळूदेत ही इच्छा
हा लेख इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल चिनूक्सचे मनःपूर्वक आभार

सुरेख लेख!

शिक्षणाच्या ठिकाणचं राजकारण सांभाळून स्वतःमधला कलावंत न हरवता यशस्वी होणं हे खरंच महान आहे! आभार चिनूक्स.

>>>> बाप्रे! केव्हढा खडतर प्रवास हा, तरीही she came out with flying colors!! ग्रेट.
>>>> चिनूक्सा, खूप खूप धन्यवाद. <<<<<

अगदी अगदी.
सर्व लेख, अक्षर अन अक्षर नीट लक्ष देऊन वाचला, समजला, उमजला.
हा इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
बाईंचे कौतुक काय शब्दात करावे? तिथे माझे शब्दकौशल्य थिटे पडते आहे, अन लेखातील तपशील आशयरुपात आठवुन मनातल्या मनातच दिग्मुढ व्हायला होते आहे.
पण अशाही व्यक्तिरेखा असतात, अन त्या असतात, म्हणून हे जग चालते, या उक्तिची खात्री पटली.
शृती सडोलीकर, यांना सादर प्रणाम. Happy

किती खडतर प्रवास आहे हा! ज्या सहजतेने त्यांनी लिहिलंय तेवढा सहज तो नक्कीच नसणार! आभार चिनूक्स.

वाह! एका शास्त्रीय संगिताच्या गायिकेचं वेगळंच रुप बघायला मिळालं. सुंदर लेख. धन्यवाद, चिनुक्स.

सुरेख लेख..
गायिका म्हणून माहीती होतीच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू माहित झाला.

धन्यवाद चिन्मय Happy

Pages