लॉर्ड टेनिसन आणि जी.ए.कुलकर्णी यांची "शलॉट".....

Submitted by अशोक. on 10 July, 2016 - 13:05

~ परवा ८ जुलै रोजी पर्सी शेलीची जयंती होती. त्या निमित्ताने त्याच्या "Ode to the West Wind" चे वाचन करत असताना पहिल्या ओळीतील "O Wild West Wind, thou breath of Autumn's being...." पासून त्याने केलेले अतिशय सुंदर असे निसर्ग वर्णन भावत असतानाच मला आठवत गेली लॉर्ड टेनिसनची जगप्रसिद्ध कविता "The Lady of Shalott". हळवी आणि करूण रसाचा वापर केलेली ही एका तरुणीची शोकांतिका. ह्या दीर्घ कवितेत टेनिसनने एका युवतीची कहाणी प्रकट करून सांगितली आहे. इंग्रजी साहित्यातील "Ode" या गीत प्रकारातील ही चार भागाची कविता. आपल्याकडील पोवाडा गटात येणारी...नायिकेला प्रधानस्थानी ठेवून केलेली रचना...तिचे सुखदु:ख, स्वप्ने, इच्छा, आयुष्य आणि अखेर या सर्वांवर कवीने वाहिलेली एक आदरांजलीच म्हटली पाहिजे. शब्दसौंदर्याचित्राचा कवी अशी ख्याती असलेल्या टेनिसनने "लेडी ऑफ शलॉट" मध्येही शब्दांची अशीच मुक्त उधळण केली आहे. या कवितेत शलॉट या बेट ठिकाणाच्या युवतीला एकटेपणाचा शाप आहे आणि तो कशासाठी आहे त्याची वाच्यता नाही. मध्ययुगीन काळातील किंग आर्थर आणि त्याचे कॅमेलॉट येथील सरदार यांच्या राज्यातील घडामोडीचा हा प्रदेश. सर लान्सेलॉट हा असाच एक उमदा सरदार. त्याच्यावर जीव टाकणा-या अनेकापैकी शलॉटची ही एक तरुण स्त्री...जिने कधीच त्याच्यासमवेत एका ओळीचाही संवाद साधलेला नाही. शलॉट...एक छोटेसे बेट...शांतपणे पहुडलेले चहुबाजूंनी...शेजारून तितक्याच शांतपणे वाहणारी नदी, सोबतीला एक होडी...आणि अशा गूढ वातावरणात...स्वप्नात राहाणारी ही शापीत युवती. तिच्याकडील आरशातून बाह्य जग पाहाणारी. तिला शाप आहे (कशामुळे ? हे विचारण्यात अर्थ नसतो. मध्ययुगीय प्रथेतील साहित्यातून....अगदी शेक्सपीअरच्या नाटकांतूनही...अशा चेटूकविद्येवर सर्रास विश्वास ठेवल्याची, तसेच भूतप्रेत आत्मा हे घटक आपल्यात नित्यनेमाने हजर असतात असेही मानले जात असे) असा की ती जर ह्या एकाकीपणाच्या जाळ्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करून बाहेरचे सत्यविश्व पाहायला जाईल त्यावेळी तिचा अंत होईल. प्रकल्पकतेच्या (Fantasy) अंगणातील हा खेळ असल्याने असे घडले असेलच का यावर वाद होत राहिले आहेत. "फॅन्टसी" मध्ये हे घडू शकते वा घडविण्याचा कवी आणि लेखक याना मोकळीक असल्याने ह्या गोष्टी मान्य केल्या गेल्या आहेत. शलॉटच्या या युवतीला इतरांप्रमाणे जगण्याची आस आहे ओढ आहे. जेव्हा ती किंग आर्थरच्या कॅमेलॉट या राजधानीतून बेटाच्या भागाकडे आलेल्या उमद्या सरदार लॅन्सेलॉटला गाताना पाहते त्यावेळी लेडीला मोह होतो त्याला पाहाण्याचा....टेनिसनचे वर्णन सुंदरच आहे इथे...

"His broad, clear brow in sunlight glow'd
On burnish'd hooves his war-horse trode;
From underneath his helmet flow'd
His coal-black curls as on he rode...As he rode down to Camelot.
She left the web, she left the loom,
She made three paces thro' the room,
She saw the water-lily bloom,
She saw the helment and the plume,
She look'd down to Camelot
Out flew the web and floated wise;
The mirror crack'd from side to side;
'The curse is come upon me,' cried....The Lady of Shalott

~ आरसा तडकला...दुभंगला आणि युवतीला शाप भोगला. ती जाणते लॅन्सेलॉटला भेटल्याशिवाय आपला अंत होणार...ती मान्य करते नियतीचा हा इशारा.....Down she came and found a boat....Beneath a willo left afloat, And round about the prow she wrote...."The Lady of Shalott'.....The first house by the water-side, Singing in her song she died....The Lady of Shalott . तिच्या शापाविषयी माहीत असलेले कॅमेलॉटचे बरेच नागरीक जमतात....दुर्दैवी पोरीच्या वाट्याला अखेरीस मृत्यू आल्याचे पाहून हळहळ व्यक्त करतात. राजवाड्याकडील बरेचसे सरदारही ते दृश्य पाहतात. त्यात लॉर्ड लॅन्सेलॉटही आहेत...."Who is this ? and what is here ? And in the lighted palace neaer died the sound of royal cheer; And they cross'd themselves for fear, Akl the knights at Camelot....

But Lancelot mused a little space; He said, "She has a lovely face; God in his mercy send her grace....The Lady of Shalott..."

सन १८३३ (आणखीन सोळासतरा वर्षांनी २०० वर्षे पूर्ण होतील कवितेला) मध्ये लिहिलेली ही कविता इंग्रजी साहित्यातील एक दर्जेदार आणि लोकप्रिय म्हणून प्रसिद्ध झाली. पुढे ती अनेक विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात अभ्यासासाठी लावली गेली....अर्थात एकूणच लॉर्ड टेनिसनच्या कवितांना हा मान मिळाला. आपल्याकडील इंग्रजी अभ्यासक्रमात अर्थातच शेली, बायरन, कीट्स आणि टेनिसन यांच्या काव्यसंपत्तीला आदराचे स्थान आहेच. इंग्रजी विषय शिकविणार्याा सर्वच शिक्षक-प्राध्यापकांना या कवितेबद्दल माहीत असणार यात शंका नाही....

....इथे मला आठवतात असेच एक सर्व विद्यार्थी वर्गात मान्यता पावलेले इंग्रजीचे प्राध्यापक जी.ए.कुलकर्णी. मराठी साहित्यात त्यानी आपल्या कथाविश्वात असे काही प्रयोग केले आहेत की त्यांच्या कथा वाचताना काल्पनिकतेसोबतीने जाणवते की त्यानी त्यांच्या आवडीच्या कवी तसेच आवडलेल्या इंग्रजी कवितांचा आधार घेऊनही लक्षणीय अशी कथानिर्मिती केली आहे आणि एक प्रकारे त्याना आदर असलेल्या कवींप्रती कृतज्ञतेची भावनाही प्रकट केली आहे. "लेडी ऑफ शलॉट" त्यांच्या मनी वसलेली होती आणि त्या युवतीला त्यानी आपल्या भाषेत आणि भागात आणले....एकाकीपणाच्या शापासोबतच. "पारवा" कथासंग्रहात समाविष्ट झालेली जी.ए.कुलकर्णी यांची "शलॉट" ही कथा...पुरेसे आहे नावच की कथानक आणि नायिका टेनिसनच्या कल्पनेतील असून तिचेही भवितव्य वाट्याला आलेल्या एकाकीपणामुळे तिच्या नशिबात काय आहे हे शलॉट माहीत असलेल्या वाचकाला जाणवणारच. "काशी" हे जी.ए.च्या नायिकेचे नाव. छळवादी बापाने काशीला वर्षानुवर्षे घरात कोंडून ठेवले होते आणि बाप मेल्यावर अर्थातच तिला स्वतंत्र झाल्याची भावना येते आणि ती प्रथमच घराबाहेर पडते. बाहेरच्या गावात काय चालले आहे याची तिला नीटशी कल्पना नसल्यामुळे ती आनंद नसल्यासारखे होते आणि पुन्हा घरच्या अंधारात परतते. घराच्या खिडकीतून पाहिलेले जग आणि बाहेरचे जग यातील भेद ती अजमावण्याचा प्रयत्न करीत राहते. बापाचे मोडक्यातोडक्या अवस्थेतील दुकान तिच्या वाट्याला आले आहे. तिथेच ती दोर्यालची कलाकुसर करीत बाहेर पाहात वेळ घालवीत बसते. रस्त्यावरील जे काही हलतेबोलते जग दिसते ती ते मनी साठवून ठेवत आहे. टेनिसनची नायिका Fairy Lady of Shallot अशा सुंदर वर्णनाने वाचकासमोर येते. पण जी.एं. ची काशी तशी नाही. आपले सरड्यासारखे दिसणारे पाय तिने रस्त्यावर टाकलेलेच नव्हते. टेनिसनची युवती "There she weaves by night and day...A magic web with colors gay..." प्रमाणेच जी.एं.ची काशीदेखील दुकानात दोर्याeचे विणकाम करीत वेळ घालवत बसलेली आहे. शलॉटकडे आरसा आहे, त्यातून ती बाहेरच्या जगातील प्रतिबिंबे पाहाते तर काशी दुकानाच्या फळ्यातून बाहेरच्या हालचाली टिपत आहे. फॅन्टॅसी (प्रकल्पकता) मध्ये जे काही येत असते ते व्यवहारी जगात येईलच याची खात्री नसतेच. तो एक चाळा असतो मनाचा....वा ज्या काही इच्छा दबून गेल्या आहेत त्याना स्वप्नात गुंफण्याचा.

कल्पनारम्यतेतून तिने वास्तवाला स्पर्श करता कामा नये असाच जणू एक अलिखित शापच असतो अशा नायिकांना. जीवनाची ओढ तर कॅमेलॉटच्या लेडीला आणि कर्नाटकातील एका खेडेगावातील तितक्याच मोडक्या गल्लीतील काशीला असणे क्रमप्राप्तच.....जीवन तर हवेच पण ते आरशातील प्रतिबिंबापुरतेच मर्यादित ठेवण्याची जीवघेणी अट. मृत्यूची ओढ असत नाही...कसलेही जीवन समोर येणार असेल तर ते भोगण्याची तयारी असण्याचे घट्ट मन यांच्याजवळ असेल असे नाही....दुहेरी ताण दोघींच्याही आयुष्यात आहे आणि बाहेरचे जगही बापाप्रमाणेच क्रूर असणार अशी एक दाहक भीती काशीच्या मनी रुतून बसली आहे.....देवाने दिलेले हे सरड्यासारखे पाय घेऊन आपण बाहेरच्या जगात उभे राहू शकत नाही ही जाणीव तिला अस्वस्थ करीत राहते....तरीही ती जगतेच. टेनिसनच्या कवितेपेक्षा वास्तवाच्या जवळ नेण्याची जी.एं.ची इच्छाशक्ती या कथेत प्रकट होते. आपण सगळेच या विश्वचक्रात अडकलेलो आहोत, असहाय्यतेची तसेच एकटेपणाचीही भावना मधी वस्ती करून आहे. जायचे तर आहे पण जाता येत नाही. स्वप्ने पाहाणे हा निसर्गदत्त आशीर्वाद आहे....आणि प्रत्येकाला किमान स्वप्नात तरी आपण सुंदर पाहिले पाहिजे अगदी स्वच्छ आरशासारखे असे वाटणे गैर नाही. अर्थात टीचभर दुकानाच्या आणि घराच्या जागेबाहेर काहीच न पाहिलेल्या काशीने स्वप्नात तरी काय पाह्यचे ? हा एक सलणारा प्रश्न....तिचे शरीर, मन, परिस्थिती याकडे पाहता तिच्याकडे काही अलौकिक नाही. इतरांच्या नजरेत एक क्षुद्र जीव या पलिकडे तिच्या अस्तित्त्वाला काहीच अर्थ नाही...महत्त्व तर नाहीच. काशीच्या मनोराज्यात जायची वाचकाला जणू परवानगीच नाही. त्याने फक्त जी.एं.च्या शब्दांपाठोपाठ जायचे आणि शलॉटचा शेवट कसा होतो तसा काशीचा दाखविला गेलेला नाही, पण अटळ काय आहे अखेरीस त्याची कल्पना आपणच करायची. फॅन्टॅसी आणि रीअॅहलिटी या दोन विकल्पात जी.ए. वास्तववादाला जवळ करतात हे तर त्यांचे वाचक जाणतातच. शलॉटमधील युवती आपला शेवट काय आहे हे माहीत झाल्यावर बोट घेऊन अखेरच्या प्रवासाला निघते. काशी वाट्याला आलेले आयुष्य भोगत राहाणार... अखेरपर्यंत...जसे नियतीने तिच्या कपाळी लिहिले आहे अगदी तसेच.

"काजळमाया....रमलखुणा...पिंगळावेळ" या कथासंग्रहातून प्रामुख्याने रूपककथांचे सामर्थ्य घेऊन येणारे जी.ए.कुलकर्णी "निळासावळा, पारवा, हिरवे रावे, रक्तचंदन" या त्यांच्या पहिल्या चार कथासंग्रहात सर्वसामान्य म्हटल्या जाणार्या. स्त्रीपुरुषांच्या नशिबाविषयी, नियतीचक्रात त्यांची होणारी ससेहोलपट आणि अगतिकता याविषयी ओढीने लिहिणारे....आणि तन्मयतेनेसुद्धा....जी.ए. भेटत राहतात. विशेषतः वेदना आणि शारीरिक व्यंग असलेल्या पात्रांविषयी त्याना मनस्वी ओढ वाटते...."मुखवटा" मधील पांगळी मंगल, "नाग" मधील वेळ आणि संधी सापडताच आंधळ्या वासनेने लडबडून गेलेला अगतिक रावजी, जुगारी आकड्याच्या लालसेने एका अनावर क्षणाने गल्ल्यातील पैशाचा अपहार करून त्याबद्दल शिक्षा भोगून पुढे बायकोच्या माहेरी कुत्र्यागत राहायला लागलेला बापू काळुस्कर....आणि स्वतःचा कसलाही दोष नसतानाही एकाकीपणाचा शाप भोगणारी काशी....प्रत्येकाची भाषा वेगळी, अनुभव वेगळे निराळे आहेत...पण नियतीने यांच्या कपाळावर जो भोग लिहिला आहे त्यापासून यांची सुटका नाही...लेखक जी.ए.कुलकर्णी त्यांच्यावर माया करीत असले तरी त्यांना भोगापासून सुटका दाखवत नाही. किंबहुना ते त्यांचे कामही नव्हेच अशीच त्यांची भूमिका..."मी पाहिले, मी जाणले आणि मी ते शब्दांत मांडले...." इतक्या वर्तुळात या लेखकाने आपल्या लिखाणाची मर्यादा ठेवली. बाकी सारे वाचक आणि त्याची आकलनशक्ती.

शांता शेळके यानी जी.ए.कुलकर्णी यानी आपल्या लेखाचे शीर्षक "नियतीच्या सर्फफणेखालचे जी.एं.चे कथाविश्व" असे दिले होते. ते वाचताच अंगावर सर्रकन काटा आला होता. शांताबाईंसारखी एक कवयित्री ह्या कथा वाचताना किती गुंतून जात असत याची कल्पना तुम्हाआम्हाला निश्चित जाणवेल. नियतीने समोर आणलेले कथेतील नायक असो वा नायिका असो....ती कधी दारिद्र्यामुळे, शारीरिक व्यथेमुळे वा व्यंगामुळे, बुद्धीच्या अभावामुळे....रुपहीनतेमुळेही, मोहाच्या क्षणी घडलेल्या गुन्ह्याबद्दल वाटत असलेल्या दोषरुखरुखीमुळे....आपसूकच जगापासून अलग होऊन एकाकी पडतात... जगतात हे खरे, पण त्याना नसते कुणाची सोबत...हे एकाकीपणाचे शल्य तर जीवघेणेच.

शेवटचे थेंब निथळून जाण्यासाठी भांडे पालथे घालावे तसे आपले आयुष्य पालथे घातले आहे....अशीच भावना मनी ठेवून रिते आणि उपयोगशून्य आयुष्य घालविण्याचे नशिबी आलेले अनेक लोक आपल्यासमोर आहेत....त्यांच्या वेदनांना आपल्या अलौकिक शब्दसामर्थ्याने अचूक रंगरुपआकार देणारे जी.ए.कुलकर्णी....ज्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचे स्मरण करावे तुम्हासोबत म्हणून हे चार शब्द !!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशोकमामा - तुमचे लेख हे वाचकांना एक पर्वणीच असते.....

जी. एं.वरचे तुमचे निखळ प्रेम तर सगळ्यांना माहितच आहे, पण त्यांच्या प्रतिभाशाली भरजरी पैठणीचा पदर उलगडून दाखवावा तुमच्या सारख्या मर्मज्ञानेच .... काय नजाकतीने तुम्ही लिहिता - पुन्हा पुन्हा वाचत रहावा असा हा लेख -
आणि या काशीचे जन्मस्थळ म्हणजे - टेनिसनसाहेबांची "लेडी ऑफ शलॉट" ची शोकांतिका....
टेनिसनसाहेबांच्या उत्तुंग प्रतिभेची ओळख ज्या सुरेख पद्धतीने करुन दिलीत त्यामुळे हा पूर्ण लेख एका वेगळ्याच उंचीवर गेलाय ...

अनेकानेक धन्यवाद.... अजून असेच सुंदर सुंदर लेख लवकर लवकर येऊदेत...

____/\____

मनापासून तुम्हाला धन्यवाद शशांक. इतक्या आत्मियतेने तुम्ही लेख वाचला आणि वाचल्याबद्दलचे समाधानही सुंदर भाषेत लिहून पाठविले. मलाही आनंद होतोच.

जी.ए.कुलकर्णी....नावच असे जादूच्या भाराने भरून गेले आहे की केवळ त्याच्या छायेत जरी आलो तरी त्याच्या करामतीची धुंदी आपल्या मनावर पसरूनच जाते. एकातून दुसरी आणि दुसरीतून तिसरी कथा...असा हा मोहात टाकणारा प्रवास आहे. गेल्या आठवड्यात वाचलेली कथा या आठवड्यात चुकून जरी तुमच्या हातात आली तरीही आपण अगदी नव्यानेच हे सारे वाचत आहोत असेच वाटत राहाते.....ही एक अद्भुत शक्तीच शशांक.

अशोक, अतिशय सुंदर लेख ! कितीदाही वाचले तरी जी एं च्या गोष्टी नव्याने आकळत राहतात. त्यातली माणसे, त्यांची दु:खं मनाला भिडत जातात .
मला शलॉट इतकी नाही आवडायची आधी..त्या पेक्षा राधी, बाधा किंवा काकणे सुद्धा.. अधिक आवडायच्या . पण तुमच्या ह्या लेखाने 'शलॉट' कडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली.
जी एं बद्दल असं काही वाचायला मिळालं तरी त्यांची पुस्तके वाचल्या सारखाच निळा, तृप्त आनंद मनाला होतो! Happy

अशोकजी , सुन्दर रसग्रहण .
माझ्या आईचे Tennyson आवडते लेखक. ( M.A. English च्या) आभ्यासात चिन्तन केलेले , बरेच काही गप्पान्च्या ओघात तिच्या बोलण्यात यायचे.

आणि जी. ए. हे माझेही अतिशय आवडते !
त्यान्च्या कथान्चा प्रभाव मनावर खूप काळ टिकतो. त्यातून बाहेर पडणे महा कठीण !
स्वामी ..... आणि ती कबूतरे उडविणार्याची गोष्ट ......
नकोच आठवायला......
झपाटलेपण येते.

आंबट गोड....तुम्ही ज्या कथांचा प्रतिसादात उल्लेख केला आहे, त्या सार्‍या मी वाचल्या आहेत, अभ्यासल्या आहेत. प्रत्येक कथेत प्रखरतेने येणारी त्या त्या स्त्री ची कहाणी वाचकाला सुन्न करून टाकते....विशेषतः "राधा"... किती आणि काय लिहावे, हा प्रश्न नेहमी माझ्यासमोर येऊन उभा राहतो....म्हणजे आपली पात्रता तरी आहे का ती जे भोगत आहे त्याचे वर्णन करण्याची ? असा प्रश्न सतावत राहतो...तरीही ती कथा खाली ठेववत नाहीच.

ही जी.ए. जादू.

पशुपत....खूप आनंद झाला मला....तुमच्या मातोश्री इंग्लिश विषय घेऊन एम.ए. झाल्या होत्या. नक्कीच त्याना लॉर्ड टेनिसन संदर्भात अधिकचे ज्ञान असणारच. नशीबवान आहात तुम्ही.

"...कबूतरे उडविणार्याची गोष्ट ...." ~ ती तर वेडच लावते कथा..."चंद्रावळ".

छान लेख अशोकजी. आणि मी ही कथा अनेकदा वाचलेली आहे. मेन स्ट्रीम जीवनाच्या बाहेर जगू पाहणार्‍यांचे भावविश्व अचूक चितारलेले असते. बाधा पण मला आवड्ते. कवठे मधला मेंट ली डिसेबल्ड मुलगा पण.

जी एं बद्दल असं काही वाचायला मिळालं तरी त्यांची पुस्तके वाचल्या सारखाच निळा, तृप्त आनंद मनाला होतो! +१

पण तक्रार नेहेमीचीच, मामा, तुम्ही जास्त लिहित नाही.

मामा, अतिशय सुंदर रसग्रहण. पिंगळावेळ वगळता जीएंची इतर पुस्तके वाचली नाहीत पण आता मात्र नक्कीच वाचावी लागतील.

____/\____

अमा....

"कवठे" ~ तसा विचार केला तर सरळ मनाच्या पण मानसिकदृष्ट्या अधू असलेल्या एका हरकाम्या युवकाची कहाणी. पण कमळी प्रवेश करते आणि ती त्याला तसे न मानता जेव्हा मित्राप्रमाणे त्याच्याशी बोलते, फिरते, सायंकाळच्या वेळीस कवठ्याच्या बागेत मोहात पाडणार्‍या गोष्टी करते, त्यावेळी जाणवते की या कथेचा सुखान्त होणार आहे....जी.ए.कुलकर्णी यांच्या बहुतांशी कथांचे शेवट वाचकाच्या मनाला वेदनेने घरे पाडतात....पण "कवठे" सणसणीत अपवाद.

"जेनेसिस"....अ‍ॅडम आणि ईव्ह ची ही कथा.....खुद्द जी.एं.ची अतिशय आवडती (चंद्रावळ प्रमाणे).

हर्पेन....

~ तक्रारीबद्दल तक्रार ईल्ला ! मान्यच आहे. पण एखादी जरी कथा घेतली....तीवर काही लिहिण्यासाठी, तर मी त्यात इतका गुंतून आणि गुंग होऊन जातो की शेवटचे पान आले तरी अधाशासारखा आणखीन एकदा वाचू या असेच म्हणत राहतो. तसेच त्यानंतरही त्या संदर्भात लिखाण झाले की....पुढे काही दिवस त्या पुस्तकांपासून दूर राहाणे हिताचेच अशीच भावना मनी वसलेली असते.

जी.ए.जादू अशीच आहे....हे तुम्हालाही अर्थात माहीत आहेच.

खूप खूप सुरेख लिहिलं आहे!
अनेकानेक धन्यवाद.... अजून असेच सुंदर सुंदर लेख लवकर लवकर येऊदेत...>+१

सर्वश्री नरेश माने, संशोधक, पद्मावति, अन्जू, रावी, भुईकमळ, अनय...

~ तुम्हा सर्वांचे मन:पूर्वक आभार. या निमित्ताने जी.ए.कुलकर्णी यांच्याविषयी आपल्या सर्वांमध्ये आदराचे जे स्थान आहे ते पाहून खूपच आनंद झाला.

अशोक, सध्या संक्षिप्त प्रतिसादच देऊ शकतो. खूपच छान झालाय लेख. मी 'काशी' खूप पूर्वी वाचली होती, पण तेव्हा शॅलॉटशी संबंध माहीत नव्हता आणि जाणवलाही नव्हता. तुमच्या लेखामुळे आता परत वाचेन. ह्या नवीन दृष्टीबद्दल धन्यवाद!

शलॉट हे कथेचे नाव का हा पडलेला प्रश्न तुम्ही दूर केलात.

पारवा हा तसा इतरांपेक्षा वेगळा कथासंग्रह. यातली पात्रे व त्यांचे द्वंद्व थोडे कमी रखरखीत आहे. पिंगळावेळ मधला बळवंत मास्तर किंवा लक्ष्मी वा गुंतवळ मधला सरदारजी वगैरे कथात जीएंची लेखणी अधिक तीक्ष्ण आहे.

जीएंच्या सर्व प्रकाशित कथा या विविध कथासंग्रहात समाविष्ट झाल्या आहेत की अशा काही कथा आहेत ज्या नियतकालिकांमधून प्रकाशित झाल्या मात्र कथासंग्रहात नाहीत? तसेच अमूक १०-१२ कथांना एका संग्रहात घ्यायचे यावर जीएंचे विवेचन आहे का काही? त्यांच्या पत्रव्यवहारात काही वाचल्याचे स्मरते पण पूर्ण मजकूर लक्षात नाही.

भास्कराचार्य....

~ ती कथा प्रसिद्ध झाली होती आणि १९६० च्या "पारवा" या त्यांच्या दुस-या कथासंग्रहात (त्या अगोदर एक वर्ष म्हणजे १९५९ मध्ये "निळासावळा" संग्रहाने त्यांच्या पुस्तकांची सुरुवात झाली होती) त्यातील "शलॉट" हे असे एकमेव नाव असे होते की (त्यावेळेच्याही) सर्वसामान्य वाचकांना नावाचा खुलासा आवश्यक वाटला होता. ज्यानी इंग्रजी या विषयात आपले पदवी वा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते त्यांच्या वाचनात लॉर्ड टेनिसनची या नावाची कविता आली होती....आणि जर तो वर्ग मराठी साहित्याचाही प्रेमी वाचक असेल तर त्याला या दोन शीर्षकांची (कविता आणि कथा) सांगड घालणे शक्य होतेच. आपल्या जी.एं.चे वैशिष्ट्य असे की टेनिसनच्या एलेन (शलॉटची नायिका) चे रुपडे कवीने जर परीप्रमाणे सजविले असले तर इकडे काशी तशी नाही.....एक प्रकारची परिस्थितीने गांजलेली... निर्बल... शरीराने आणि मनानेही जीवन (कसेबसे) जगणारी खेडेगावातील एक मुलगी...जिच्या आयुष्यात वेदनेशिवाय बाकी काहीच नाही (पण मनी एखादा लॉर्ड लान्सेलॉट असणे गैर नाही)...असे चित्र जेव्हा जी.ए.सारखा "चित्रकार" रंगवितो त्यावेळी जाणवते की जीवन म्हणजे सुखच सुख असते सर्वत्र असे नाही.

कथा पुन्हा जरूर वाचा तुम्ही....या खेपेच्या वाचनाने जी.ए. अधिक समजत जातील....ही देखील एक करामतच त्यांच्या साहित्याची...दुस-या खेपेस वाचताना नवी दृष्टी लावता येते.

धन्यवाद.

अशोक, या चर्चे मुळे काल पुन्हा पिंगळावेळ मधली 'लक्ष्मी' कथा काढून वाचली. तुम्ही म्हणता तसंच, जी एंची धारदार लेखणी जाणवली. अक्षरश: रडायला आले. मन उदास होऊन गेले......
सगळी जी एंच्या लेखणीची किमया. खरंच आपण भाग्यवान आहोत की मराठीतील ही अप्रतिम शब्द लेणी आपल्याला वाचायला मिळतात, अनुभवता येतात ..आपण जर कुणी बंगाली असतो तर काय समजलं असतं? फार उत्तुंग प्रतिभेचा थोर लेखक.

टण्या....

~ जी.ए. प्रेम ज्याला ज्याला आहे त्यांच्या मनी (अनेक वर्षे ओलांडून गेली तरीही..) असे जे काही प्रश्न त्यांच्यासंबंधी तसेच लेखनासंदर्भानेदेखील उमटत असतात त्यावरून एक बाब निश्चित की आपण सारेच त्या व्यक्तीच्या आणि लिखाणाच्या प्रेमात तर आहोतच पण निर्मितीविषयी सतत जागे असलेले औत्सुक्य मनी ठेवून असतोच. शलॉटला ६० वर्षे झाली असतील तर खुद्द जी.ए. आपल्यातून निघून जाण्यालाही ३० वर्षे होत आली तरीही त्या कथांच्या मोहिनीपासून आपण क्षणभरही दूर होऊ इच्छित नाही....ही भाग्य लाभलेले जी.ए. सतत आपल्यासोबत असतील हा विश्वास फ़ार मोठा आहे.

पारवा कथासंग्रहात तुम्ही म्हणता तसले द्वंद्व कमी आहे हे मान्य पण जी.ए. ना अत्यंत काही अटळ अशा शोकांतिकांचे चित्र तयार करायचे होते तर तिथे कथेतील अन्य कशापेक्षाही नायक वा नायिकेच्या आजुबाजूला पसरलेल्या सुन्न करणा-या स्थितीचे अपरिहार्य असे वर्णन त्यानी गडदपणे चित्रीत केल्याचे दिसत्ये. "बळी..." मधील अंधश्रद्ध ग्रामीण जीवन, "रात्र झाली गोकुळी" मधील दैन्यावस्था....शिवाय तुम्हाला नको असले तरी अशा जीवनवाटीत एरव्ही निरुपद्रवी वाटणारे प्राणी सतत येत असतात तेही एक प्रकारची असहाय्य वेदनेचेच प्रतिक आहेत....शलॉटमधील सरडा..."रात्र झाली गोकुळी" मधील घराला लागलेली घूस, "बळी" मधील बेडूक....ह्या प्रतिमा खूप बोलक्या आहेत. रक्तचंदन, काजळमाया, पिंगळावेळ या कथांतील जी.एं.ची लेखणी तीक्ष्ण झाल्याचे नंतर आपल्याला जाणवते.

त्यांच्या सर्वच कथा (ज्या त्या त्या वेळी विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाल्या होत्या) ते हयात असताना निघालेल्या आठ कथासंग्रहात आलेल्या नाहीत. मात्र त्यानी अगदी त्यांच्या सुरुवातीच्या काळात लिहिलेल्या कथा कटाक्षाने संग्रहात घेण्याचे टाळले. खुद्द जी.ए. आपल्या कथासंग्रहाची दुसरी आवृत्ती काढायला उत्सुक नसत (त्या कारणांची इथे चर्चा अनावश्यक आहे). मात्र त्यांच्या निधनानंतर कुसुमगुंजा, आकाशफुले, सोनपावले असे जे काही संग्रह प्रकाशित झाले आहेत त्यात अप्रसिद्ध कथांचाही समावेश आहे.

काही सदस्यांनी आपुलकीने "शलॉट" च्या नायिकेचे चित्र असल्यास इथे द्यावे अशी सूचना केली आहे.... एक आहे तसे चित्र.....तेच देत आहे.aryashallot.jpg

जीएंची पाणमाय कथा वाचा.डोळ्यात पाणी येतंच.
प्लॉट साधारण लक्ष्मी कथेसारखाच.(लक्ष्मी म्हणजे तीच ना, ज्यात ती नागाला हात लावते आणि तो सोन्याचा होतो?)

होय mi_anu. लक्ष्मी ती खिडकीतून बाहेर पडणा-या सर्पाच्या शेपटीला हात लावते....आणि तेवढा शेपटीचाच तुकडा सोन्याचा होऊन घरी आत पडतो. वास्तविक तितकेच सोने आपल्या नशिबी आहे म्हणून तिच्या नव-याने आणि मुलाने समाधान मानायला हवे असताना तो नालायक बिनकामाचा नवरा उलट ह्या बायकोलाच "बेअक्कल, सगळा साप धरायला तुला काय झालं होतं ? नशिबातच नाही" असे झिडकारून विचारतो....असल्या वृत्तीचेही लोक.