एक मृत्युपत्र: पल दो पल का शायर, काही गोष्टी आणि "जान्हवीची आई!"

Submitted by मार्गी on 8 July, 2016 - 00:50


सर्वांना नमस्कार! हे एक प्रत्यक्षात लिहिलेलं पत्र आहे. एका काकाच्या मृत्युनंतर तीन महिन्यांनी त्याच्या आई- पत्नी (माझी आजी- मावशी) आणि मुलींना (माझ्या बहिणींना) लिहिलेलं. ह्यामधला आशय आपल्या सर्वांसोबत- आपल्या प्रत्येकासोबत शेअर करावासा वाटला म्हणून फक्त नावं बदलून हे पत्र आहे तसं इथे देतोय. थोडं मोठं आहे, पण शेअर करावं असं वाटलं. खूप खूप धन्यवाद.

|| ॐ ||

दि. २७ एप्रिल २०१६

ती. आजी, ती. मावशी आणि मिताली- प्राजक्ता!

तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. अगदी सविस्तर आणि मनमोकळेपणाने बोलायचं आहे. तुम्हांला माहितीच आहे की मी किती अबोल आहे! त्यामुळे समोरासमोर बोलताना मला कंठ फुटत नाही. म्हणून लिहून बोलतोय. खूप दिवसांपासून मनात होतं की तुमच्याशी बोलावं. अनेक गोष्टी आहेत. अनेक गोष्टी शेअर करायच्या आहेत. आणि तुमच्याशी बोलत असताना मी हे स्वत:शी सुद्धा बोलतोय. स्वत:ला ह्या गोष्टी परत सांगतोय.

मावशी आणि आजी, तुमच्याशी बोलताना जाणवतं की, तुम्ही सध्या स्वत:ला खूप कामात ठेवण्याचा प्रयत्न करता. सतत काही ना काही करता. प्रवचनं ऐकता. मावशीही म्हणते की, मनाला काही उद्योग हवा. मी समजू शकतो. पण त्याबरोबर हेही खरंच की आपण ज्या स्थितीतून जातोय, त्यामध्ये आपल्याला खूप त्रास होतोय आणि त्या स्थितीतून बाहेर पडायला खूप वेळ लागेल. किंवा कदाचित आपण पूर्णपणे त्यातून बाहेरही पडू शकणार नाही. मला एक- दोन गोष्टींकडे तुमचं लक्ष वेधून घ्यायचं आहे.

मी बॉसना लिहिलेल्या पत्रातही म्हणालो होतो तेच इथेही म्हणेन. बॉस शरीराच्या रूपाने आपल्यामध्ये नाहीत. पण शरीर काही अंतिम सत्य नाही. शरीर हा एक मुक्काम, शरीर एक तात्पुरता निवारा ना. आणि शरीर व नाम- रूप हे तर अगदी क्षणभंगूर. चेतना त्याहून जास्त महत्त्वाची जी २५ फेब्रुवारी १९५६ च्या आधी अस्तित्वात होती आणि ३१ जानेवारी २०१६ च्या नंतरही अस्तित्वात आहे. Form is temporary, formless existence is permanent. त्यामुळे त्या शरीराचा; त्या मनाचा; त्या नाम- रूपाचा जास्त विचार करणं त्रासदायक तर आहेच पण त्या चेतनेसाठीसुद्धा योग्य नाही. थोडं सविस्तर बोलतो.

आपण समुद्र किनाऱ्यावर उभे आहोत. आपल्याला सूर्य मावळताना दिसतो. हळु हळु सूर्य क्षितिजाखाली बुडतो. आपल्या दृष्टीने सूर्यास्त होतो. पण हा खरोखर सूर्याचा अस्त आहे का, सूर्याचा अंत आहे का? आपल्या नजरेने नक्कीच आहे. पण जर थोडी दृष्टी व्यापक केली; समजा आपण स्वत:ला अंतराळाच्या पातळीवर नेऊन बघितलं तर काय दिसेल? तर कळेल की सूर्याचा अस्त होतच नाही. फक्त आपण ज्या अँगलने बघत होतो, तिथून तो आता दिसत नाहीय. पण तो प्रकाशित आहेच, दुसऱ्या अँगलने दिसतोय. काही दुसरे लोक असतील ज्यांना तो सूर्योदय म्हणून दिसेल. मावशी- आजी तुम्ही इतके प्रवचनं ऐकता, वाचता, मला सांगा जन्म आणि मृत्यु हे एकाच नदीचे दोन किनारे नाहीत का? जन्म होतो तेव्हा कोणाच्या तरी मृत्युनंतरच तो होतो आणि जेव्हा मृत्यु होतो, तेव्हाही ती पुढच्या जन्माची, पुढच्या गतीची नांदीच नसते का? म्हणून त्याचं इतकं दु:ख करायचं का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाम- रूपावरची इतकी आसक्ती त्या चेतनेच्या पुढच्या प्रवासात बाधा आणत असते. तुम्ही अनेक ठिकाणी वाचलं असेल की, जन्मलेल्या बाळाला पूर्व जन्माची स्मृती असते. किमान दिड वर्षापर्यंत. आणि मग हळु हळु नव्या जन्मातली नाती व प्रभाव त्याच्यावर असलेला मागच्या जन्माचा प्रभाव पुसून टाकतात. पण जेव्हा मूल बोलायला लागतं, तोपर्यंत ही पूर्वस्मृती काहीशी असते. आणि म्हणून आसक्ती असते. आणि ही आसक्ती त्या चेतनेच्या पुढच्या जन्मामध्ये बाधा निर्माण करू शकते.

मृत्युनंतरच्या दिवसांमध्ये जे संस्कार करतात; जे विधी करतात; त्यातही हाच उद्देश असतो. टप्प्या टप्प्याने चेतनेलाही शरीरापासून दूर करतात आणि जवळच्या लोकांनाही त्या शरीरापासून दूर करतात. आणि हे तेरा दिवसांमध्ये टप्प्या टप्प्याने केलं जातं. त्या वेळेस विलाप करू नका म्हणतात कारण चेतना तिथे उपस्थित असते आणि विलाप केला तर चेतनाही तिथे घुटमळत राहते, तिच्या पुढच्या प्रवासाला बाधा पोहचते.

प्राजक्ता- मिताली, तुमच्यासाठी थोडं जड होईल, तुम्हांला पटणार नाही, पण मावशी- आजींना कळू शकेल. मृत्यु हा किनारा ओलांडल्यानंतर पुन: चेतनेचा प्रवास सुरू होतो. ज्या पातळीवर ती चेतना असेल, त्यानुसार ती पुन: शरीर धारण करते; गर्भामध्ये प्रवेश करते. आणि शक्यतो आपल्याला जीवनाविषयी इतकी आसक्ती असते; इतक्या मोठ्या संख्येमध्ये इच्छा- आकांक्षा आणि वासना अतृप्त असतात की, मृत्युनंतर अगदी लगेच आपली चेतना दुसऱ्या गर्भात प्रवेश करते. त्यामुळे जी चेतना बॉसच्या शरीरात होती, ती आता पुढे गेली असणार. एखाद्या गर्भामध्ये त्या चेतनेनी प्रवेश केला असणार. तिच्या पुढच्या प्रगतीची सुरुवात झाली असणार. त्यामुळे आपण जर आता त्या नाम- रूपाला; त्या शरीराला व त्या व्यक्तिमत्वाला अजून चिकटून बसलो; त्याप्रति आसक्त राहिलो, तर ती चेतनाही आसक्त होऊ शकते आणि म्हणून पुढच्या प्रवासात तिला बाधा येऊ शकते.

आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्येही हे बघतोच ना. प्राजक्ता- मिताली, तुम्ही परभणी सोडून जेव्हा पुढच्या शिक्षणाला गेलात, तेव्हा तुम्हांला घरची प्रचंड आठवण येत असणार. घरच्यांनाही तुमची तितकीच आठवण यायची. पण मला सांगा, एकदा घर सोडून इंजिनिअरिंग किंवा क्लासेस जॉईन केल्यावर सतत घरची आठवण येत राहिली तर काय होईल? किंवा आई- बाबांनी तुम्हांला दिवसातून चार वेळेस फोन करून विरह होतोय असं सांगितलं तर काय होईल? मान्य आहे की, मन जुन्या गोष्टींकडे ओढ घेतं. मनाची नाळ जोडलेली असते. एका मर्यादेपर्यंत स्वाभाविक आहे. पण पुढे आपल्याला त्यातून बाहेर पडावंच लागतं ना. तरच आपण पुढच्या शिक्षणावर फोकस करू शकतो किंवा तुम्ही शिक्षणासाठी बाहेर पडल्यानंतर घरात तयार झालेली पोकळी घरच्यांना स्वीकारावीच लागते; ती स्वीकारून पुढे जावं लागतं. मावशी- आजी, हे अगदी तसंच आहे. जीवन म्हणजे एक शिक्षण आणि एक प्रवास. चेतना एका टप्प्यानंतर पुढच्या मार्गाला जाते. आणि आपणसुद्धा आपल्या मार्गाला लागायला हवं. थोडं वेगळ्या शब्दात सांगायचं तर जीवन म्हणजे एक ट्रेनचा मोठा प्रवास आहे. आपण ट्रेनमध्ये बसतो, तेव्हा अगदी लहान बाळ असतो आणि एकटे असतो. सगळ्यात पहिले आपल्याला मिळते ती आई आणि नंतर बाबा व इतर कुटुंबीय. हळु हळु आपल्याला ह्या सह- प्रवाशांची सोबत होते. ट्रेन एक एक स्टेशन मागे टाकत पुढे जाते. आपण सगळे सह- प्रवासी असतो. म्हणजे जरी आपण सोबत असलो तरी प्रत्येकाचा प्रवास हा समांतर चालू असतो; पृथक चालू असतो. आणि सोबतीमुळे घनिष्ठ संबंध तयार होतात. इतके की, आपण सगळ्यांमध्ये स्वत:ला आयडेंटीफाय करायला लागतो. पण हळु हळु जशी ट्रेन पुढच्या स्टेशनांवर येते, तसे एक एक प्रवासी उतरत जातात आणि नवीन ट्रेन पकडतात. प्रत्येक सह प्रवाशाशी आपलं नातं जोडलेलं असल्यामुळे आपल्याला वाईट वाटतं. दु:ख होतं. पण हा जीवनाचा नियम असतो ज्याला आपण काहीही करू शकत नाही. आणि आपल्याला जरी वाटत असतं की, सगळ्या जणांचं मूळ स्टेशन आणि डेस्टिनेशन एकच आहे; एकच असलं पाहिजे; सगळ्यांनी एकाच जागी एकत्र उतरायला हवं, तरी ते शक्य नसतं. त्यामुळे सोबतीचे प्रवासी उतरतातच.

पण आपण उतरलेल्या प्रवाशांमध्ये मन गुंतवून ठेवतो का? द बर्निंग ट्रेन ह्या पिक्चरमध्ये एक मस्त गाणं आहे. मावशीला माहिती असेल.

पल दो पल का साथ हमारा
पल दो पल के याराने हैं

प्राजक्ता, मिताली तुम्ही बघितलं आहे ना की प्रवासात आपल्याला असे गमतीदार लोक सोबत मिळतात की वाटतं हे नेहमी सोबत असावेत. पण तसं नसतं. कॉलेजमध्ये किती छान मित्र- मैत्रिणी मिळतात. पण तेही एका टप्प्यानंतर दुरावतात. हेही तसंच आहे. इथे सगळे जण प्रवासी आहेत. काही अंतरापर्यंतच सोबत जाणारे आहेत. त्यामुळे एकदा ताटातूट झाल्यानंतर विरह त्रास देतो, दु:ख देतो, पण इथे आपल्याला हे समजलं पाहिजे की, विरह म्हणजे काही शेवट नाही. ताटातूट म्हणजे शेवट नाही. आपण ज्या ट्रेनमध्ये असतो, त्या ट्रेनमधून आपला सह प्रवासी उतरतो. आपली ट्रेन पुढे जाते व तो मागे राहिलेला दिसतो. पण खरोखर हे असंच आहे का? नाही. त्यालाही पुढची कोणती तरी ट्रेन मिळतेच. तो त्याच्या डेस्टिनेशनच्या स्टेशनचा प्रवास सुरू करतो. कदाचित त्याला पुढे अजून चांगली ट्रेन मिळू शकते, अजून चांगले प्रवासीही मिळू‌ शकतात. आणि तेच आपल्याबाबतही आहे. जर आपण सतत मागे मान वळवून बघत राहिलो, तर आपल्या समोर जे आहे, तेच आपल्याला बघता येणार नाही.

मै पल दो पल का शायर हूँ
पल दो पल मेरी कहानी है
पल दो पल मेरी हस्ती है
पल दो पल मेरी जवानी है ...

मुझसे पहले कितने शायर
आए और आकर चले गए...
कुछ आहें भर कर लौट गए
कुछ नग़मे गाकर चले गए...

वो भी एक पल का किस्सा थे
मैं भी एक पल का किस्सा हूँ
कल तुमसे जुदा हो जाऊँगा
जो आज तुम्हारा हिस्सा हूँ
मैं पल दो पल का शायर हूँ ...

कल और आएंगे नगमों की
खिलती कलियाँ चुनने वाले
मुझसे बेहतर कहने वाले
तुमसे बेहतर सुनने वाले

कल कोई मुझको याद करे
क्यूँ कोई मुझको याद करे
मत रूक ज़माना मेरे लिये
क्यूँ वक़्त अपना बरबाद करे
मैं पल दो पल का शायर हूँ …

आजी- मावशी! मला तुम्हांला असंही विचारायचं आहे की, तुम्ही जे इतकं भागवत- महाभारत ऐकता वाचता, त्यामध्ये अनेक ठिकाणी दिलेलं आहे ना की, शरीर नश्वर आहे. शरीर मरणधर्मा आहे. आणि चेतना तर अजन्मा असते. मग तरीही आपल्याला शरीराची इतकी ओढ का वाटते? शरीराविषयी इतकी आसक्ती का वाटते? जर इतक्या ठिकाणी असं सांगितलं आहे, तर मग कळतंय पण वळत नाही, असं आपलं का होतं? त्याचं एक कारण असं असावं की, आपल्याला ही 'थिअरी' माहिती आहे, पण आपण त्याचा कधी अनुभव घेतलेला नाही. म्हणजे आपण शरीर नसून आपण चेतना आहोत, हे आपल्याला ऐकून माहिती आहे, पण आपण कधी त्याचा अनुभव घेतलेला नाही. म्हणून आपण चेतनेच्या ऐवजी शरीरासोबतच तादात्म्य करतो. स्वत:ला शरीराशीच आयडेंटीफाय करतो. पण जर आपल्याला स्वत:मध्ये शरीर वेगळं व चेतना वेगळी हे बघता येत असेल किंवा मी शरीर नाही, हे जाणवलं असेल, तर आपोआप आपण स्वत:च्या शरीराबद्दल तर अनासक्त होतोच, पण दुसऱ्यांच्या शरीराचीही आसक्ती ठेवत नाही. किंवा गरजेपेक्षा जास्त शरीरामध्ये गुंतून पडत नाही. आणि मग त्या वेळी आपल्याला शरीर आणि नाम- रूपापलीकडे असलेल्या चेतनेची उपस्थिती जाणवते; दिसते. आणि मग त्या वेळी मृत्युबद्दल शोक करण्याचं कारणच उरत नाही. कारण फक्त शरीर संपलं, हे आपण प्रत्यक्ष बघत असतो.

आणि ही गोष्ट किंवा ही दृष्टी इतकी अवघड नाहीय. आपण थोडे डोळस राहिलो तर आपल्याला असे अनेक अनुभव निसर्गत:च येत असतात ज्यावेळी कळतं‌ की, आपण शरीर नाही आहोत. रात्री शरीर झोपतं. सात- आठ तास शरीर झोपलेलं असतं. पण 'आपण' झोपतो का? आपण झोपलो असतो तर 'स्वप्न' कोण बघतो? किंवा रात्री मस्त झोप लागली, हे कोण बघत असतो? किंवा आपण झोपलो असताना कोणी अचानक आपल्याला हाक मारली तर जागं कोण होतं? आपण जागे होतो की शरीर जागं होतं? किंवा जर आपण शरीर असू तर शरीरातला प्रत्येक भाग आपला तुकडा असायला हवा म्हणजे सांगता यायला हवं की, डोकं, हा आपला २०% भाग, हात हे आपले २०% भाग असं असं. पण आपण असं कधीच सांगू शकत नाही. आणि ज्यांना डोळे नसतात किंवा ज्यांचा पाय अधू असतो, त्यांनाही काही अपूर्णत्व येत नाही. की ते १०% किंवा २०% कमी आहेत. किंवा जेव्हा आपला हात भाजतो, तेव्हा आपला १०% भाग भाजत नाही. शरीराचाच घटक भाजला असतो.

मुळात आपण शरीर नाही, हे खूप स्वाभाविक सत्य आहे. निसर्गत: असलेली घटना आहे. पण लहानपणाच्या संस्कारांमुळे आपण स्वत:ला शरीर मानायला लागतो. जन्मलेल्या बाळाला तर शरीर काय 'स्व' ची सुद्धा जाणीव नसते. अहंकारही नसतो. त्याला फक्त आई माहिती असते- तू माहिती असते. त्याला/ तिला 'मी' सुद्धा नसतो. फक्त तू- आईचा भाव असतो. हळु हळु मग त्याला मीपणाची जाणीव व्हायला लागते. हळु हळु त्याची चेतना तोंडासोबत आयडेंटीफाय होते. कारण दुध पिणं हे काम बाळ तोंडाने करतं. संपूर्ण शरीरामध्ये चेतना तोंडाशी तादात्म्य झाल्यामुळे लहान बाळं प्रत्येक गोष्ट तोंडानेच टेस्ट करतात. प्रत्येक ठिकाणी तोंड लावायला बघतात. अगदी त्यांचे हात- पायही ते तोंडाशी नेतात. हळु हळु मग त्यांना पूर्ण शरीराची जाणीव होत जाते आणि मग सामाजिक संस्कारांमुळे- आजूबाजूचे लोक 'तू म्हणजे शरीर' असा भाव ठेवत असल्यामुळे शरीरासोबत तादात्म्य होतं. पण हे फक्त तादात्म्य आहे; स्वत:ला शरीर मानून चालणं आहे; स्वत: शरीर होणं नाहीय.

आणि शरीर शरीर म्हणजे तरी काय? आपल्याला आपल्या स्वत:च्या शरीराची खरोखर किती माहिती आहे? आपण स्वत:च्या शरीराला किती ओळखतो? किंवा शरीरामध्ये आत जे काही प्रचंड मोठं फंक्शन सुरू असतं, त्याचं नियंत्रण दूरच, त्याची साधी जाणीव तरी आपल्याला असते का? एकाच वेळी शेकडो प्रक्रिया होत असतात. आणि ते शरीर स्वत: करतं. अन्न पोटात गेलं तर त्याचं पचन सुरू होतं. ते शरीर ऑटोमॅटिक प्रकारे करतं. आपण ते करत नाही. म्हणजेच आपण शरीर नाही. आणि शरीर हे एक डिव्हाईस आहे; एक यंत्र मात्र आहे. निसर्गामध्ये निर्माण होणारं एक उपकरण मात्र आहे. निसर्गामधली एक संपदा आहे. निसर्गाचा एक अविष्कार आहे. आणि आपलं शरीर हे निसर्गाने निर्माण केलं आहे. आपण पूर्णपणे वेगळे आहोत; आपलं शरीरही आपण निर्माण करू शकत नाही. ते निसर्गच करत असतो.

आणि थोडं सूक्ष्म अर्थाने, ज्याप्रमाणे आपण शरीर नाहीय, त्याप्रमाणे आपण मन म्हणजे 'अहंकार' किंवा इगोसुद्धा नाहीय. कारण जन्मत: आपल्याला 'मी भाव' नसतो. जन्मलेल्या बाळाला काहीही अहंकार नसतो. त्याला शरीर असतं पण शरीरासोबत तादात्म्य नसतं आणि मनसुद्धा नसतं. आश्चर्य वाटेल, पण बघा ना. मन म्हणजे काय? विचार, वासना, इच्छा, आसक्ती ह्यांचा समुच्चय म्हणजे मन. ज्याप्रमाणे शरीरही आपण नाही, त्याप्रमाणे मनही आपण नाही. मनसुद्धा एक डिव्हाईस आहे. फक्त हा निसर्गाने नाही तर समाजाने बनवलेला डिव्हाईस आहे. मन म्हणजे सगळे सामाजिक संस्कार. लहान बाळाला कोणतीही इच्छा नसते, आसक्ती नसते, वासना नसते. ते चेतनेचं शुद्ध रूप असतं. पण हळु हळु जसं बाळ मोठं होतं, तशा त्याला इच्छा होतात, वासना निर्माण होतात- हेच खेळणं हवं. ते दाखव. हे दे. हे नको. तिथून मनाचा प्रवास सुरू होतो. पण आपण निश्चित मन नसतो. कारण आपण मनामुळे प्रभावित नक्की होतो; पण मनाशी एकरूप नक्कीच नसतो. कारण आपण स्वत:च्या मनाविरुद्ध जाऊ शकतो. मनामध्ये काय आहे, काय विचार आहेत, हे बघू शकतो. ते बदलू शकतो. मन हे कंप्युटरप्रमाणे प्रोसेसिंग युनिट आहे. मनाकडे संस्कार असतात, मेमरी असते, त्यावर प्रोसेस करण्याची क्षमता असते. पण ती वापरणारे आपण वेगळे असतो.

नागसेन हा एक प्रसिद्ध भिक्षु होता. एकदा राजाने त्याला दरबारात बोलावलं. नागसेनसाठी रथ पाठवला. नागसेन रथावर बसूनच आला. राजाने विचारलं, नागसेन महाराज, आपलं स्वागत आहे! नागसेन म्हणाला, स्वागताबद्दल धन्यवाद, पण इथे नागसेन कोणीही नाहीय. राजाला आश्चर्य वाटलं. त्याने विचारलं, नागसेन तर तुम्हीच आहात ना. त्यावर नागसेनने विचारलं- हा रथ आहे, बरोबर? राजा म्हणाला- बरोबर. मग नागसेनने सेवकाला सांगितलं, रथाचे घोडे वेगळे करा. घोडे वेगळे केले गेले. त्याने राजाला विचारलं, रथ आहे का? राजा म्हणाला- हो. पण राजा अस्वस्थ झाला. मग नागसेन म्हणाला, रथाची चाकं वेगळी करा. चाकं वेगळी झाली. मग तो म्हणाला अजून रथ आहे का? राजा म्हणाला- आहे पण आता रथाची अवस्था वाईट आहे. मग नागसेनने रथाचं आसन वेगळं करायला सांगितलं. आता तर रथ शिल्लकच राहिला नाही. मग नागसेन म्हणाला, मन किंवा अहंकार हेसुद्धा रथाप्रमाणे वेगळ्या वेगळ्या वस्तुंनी एकत्र येऊन बनलं आहे. विचार, इच्छा, संस्कार, वासना, आसक्ती ह्यामुळे बनलं आहे. 'नागसेन' कोणीही नाहीय. फक्त एक जोडलेलं उपकरण आहे.

आजी- मावशी व प्राजक्ता- मिताली! आपण मनसुद्धा नाही, हे अनुभवण्याच्याही सोप्या युक्त्या आहेत. मन हे शरीरासारखं पण प्रोग्रामिंग करणारं उपकरण आहे. भावना, मेमरी, इच्छा, ह्यांच्यावर प्रोसेसिंग करणारं ते कंप्युटरसारखं यंत्र आहे. आणि मन हे एका स्क्रीनसारखं आहे. त्यावर अनेक गोष्टी डिस्प्ले होत राहतात. आणि आपण मनापेक्षा वेगळे आणि मनावर नियंत्रण असलेले आहोत. पण आपलं तादात्म्य शरीरासोबत असेल तर शरीराने खाण्याच्या ऐवजी आपणच खात सुटतो, तसं जर तादात्म्य मनासोबत असेल तर आपणही मन सांगेल तसं वाहवत जातो. पण मुळात आपण मन नाही. मनाचा आपल्यावर प्रचंड प्रभाव असतो; प्रत्येकाकडे असलेलं मनसुद्धा वेगळं असतं, पण तरीही आपण आणि मन ह्यामध्ये एक अंतर असतं.

कल्पना करा की आपण रस्त्यावरून जातोय. आणि बाजूने एक दारूडा भेलकांडत जातोय. तो आपल्याकडे बघून काही तरी बरळतो आणि हातवारे करतो. आपली प्रतिक्रिया काय होईल? एक तिडीक येईल, एक संताप येईल. बरोबर? पण ही प्रतिक्रिया किंवा ही तिडीक- संताप आपल्यामध्ये आला आहे की मनामध्ये आला आहे? थोडा विचार केला तर कळेल की, जेव्हा त्याने असे हातवारे केले व तो बरळला, तेव्हा आपल्या मनामध्ये त्याची नोंद आली आणि आपण त्या नोंदीचा अर्थ लावला. त्यावर प्रोसेसिंग केलं. हे घडतं अर्ध्या सेकंदाच्या आत. पण त्यामध्ये मनाने केलेल्या नोंदीबरोबर आपल्या मनाने लावलेला अर्थसुद्धा असतो. आपण संतापलो. पण जर आपण थोडी सजगता ठेवली असती व त्याच्या तशा वागण्याचा अर्थ तसा घेतला नसता; आपल्या मनाप्रमाणे त्याचा अर्थ घेतला नसता, तर? तर आपल्याला संताप आला नसता आणि त्रासही झाला नसता. मन म्हणालं की, तो बरळतोय म्हणून संताप येतो. पण जर आपण सजग राहिलो आणि मन काय म्हणतंय, काय प्रोसेसिंग करतंय हे बघितलं तर एका क्षणात आपण मनापेक्षा दूर होऊन आपली प्रतिक्रिया- मनाची कृती नियंत्रित करू शकतो.

किंवा दुसरं उदाहरण. आपण एका ठिकाणावरून जात असताना मोठ्या आवाजात तमाशाचं गाणं लावलं असेल तर आपल्याला कसं वाटतं? किंवा बँड लावून एखाद्या राजकीय पक्षाचा प्रचार सुरू असेल तर आपल्याला कसं वाटतं? आपण त्याचा एक अर्थ लावतो. कारण तसा अर्थ लावणारं मन आपल्याकडे आहे. आणि आपण तसा अर्थ लावतो, म्हणूनच आपली तशी प्रतिक्रिया होते. आपलं मन अर्थ लावतं आणि प्रतिक्रिया देते. पण जर थोडी सजगता ठेवली तर आपण मनाच्या मागे जाण्यापासून स्वत:ला थांबवू शकतो. आणि ज्याच्याकडे दुसरं मन असेल तो दुसरी प्रतिक्रिया देतो. एखादा तमिळ माणूस जर तिथे असेल, तर त्याला ते काहीच कळणार नाही. त्याचं मनही प्रतिक्रिया देईल, पण ती‌ वेगळी असेल. थोडक्यात मन असं प्रोसेसिंग युनिट आहे- स्क्रीनसारखं आहे ज्यावर खूप काही डिस्प्ले होत असतं. आपल्याला वाटतं की, ते आपण डिस्प्ले करतो, पण ते मन डिस्प्ले करत असतं आणि आपण तिथून अलग असतो. पण तादात्म्य असल्यामुळे आपल्याला आपण वेगळे आहोत, हे स्पष्ट कळत नाही. पण थोडं खोलात जाऊन बघितलं तर कळतं की, मन प्रत्येक वेळी आपल्याला काही सांगतं, पण ते ऐकणं किंवा न ऐकणं हे आपल्यावर अवलंबून असतं.

एकदा एक साधू रस्त्याने जात होता. जवळच एक मोठं झाड होतं. तो जात असताना अचानक एक फांदी त्याच्या अंगावर पडली. त्याला खरचटलं. पण तो शांत राहिला. झाडाची काय चूक? त्यामुळे आपल्या रस्त्याने पुढे गेला. हे एका माणसाने बघितलं. नंतर थोड्या वेळाने तो साधूच्या समोर आला आणि त्याने एक मोठा दगड घेतला आणि त्याच्यावर फेकला. साधू एक क्षण थबकला आणि लगेच पुढे निघाला. त्या माणसाला राहावलं नाही. त्याने त्या साधूला विचारलं, 'बाबा तुम्ही झाडावर रागवले नाहीत, हे बरोबर. पण तुम्ही माझ्यावर का रागवले नाहीत? मी तर मुद्दाम तुम्हांला दगड मारला होता ना.' त्यावर साधू म्हणाला, 'एक क्षण मीसुद्धा असाच विचार केला. पण मग माझ्या लक्षात आलं की, फांदी माझ्या अंगावर पडणे हा जसा योगायोग होता, तसं तुझ्या मनात असा विचार येणे आणि तू मला दगडाने मारणं, हासुद्धा योगायोगच होता ना. थोडा वेगळा असेल, पण होता योगायोगच. मग जर झाडावर रागवलो नाही, तर तुझ्यावर कसं रागवू?'

तिथे आपलं मन म्हणालं असतं त्या माणसाला उत्तर दिलं पाहिजे. त्याला चांगला धडा शिकवला पाहिजे. आणि आपण रागावलो असतो. त्या साधूचं मनही तसंच म्हणालं. पण त्याने मनाला थोडं बाजूला ठेवलं आणि सजगता स्वत:वर ठेवली. शांतपणे विचार केला. आणि मग रागाचं कारणच उरलं नाही. उलट त्याला हसू आलं. किंवा दोन चेहरे असलेलं चित्र घ्या. आपण बघताना एका वेळेस एक चेहरा दिसतो. त्यावेळेस दुसरा दिसत नाही. आणि दुसरा चेहरा बघताना पहिला दिसत नाही. हा मनाने त्या आकृतीचा लावलेला अर्थ असतो. आपलं मन असं खूप प्रोसेसिंग करत असतं. पण आपण थोडं भान ठेवलं, थोडं अवधान ठेवलं तर त्या मनाच्या प्रोसेसिंगपासून स्वत:ला वेगळं करू शकतो. आणि म्हणून समोर काहीही परिस्थिती असेल; कोणताही प्रसंग असेल, तरी मनावर नियंत्रण ठेवू शकतो; स्वत:ला शांत ठेवू शकतो.

त्यामुळे आजी- मावशी व मिताली- प्राजक्ता, मला इतकंच म्हणायचं आहे की, आपल्या मनामध्ये दु:ख आहे; होणारच. पण आपल्याला थोडं मनाच्या पलीकडेही बघायला पाहिजे. जीवनाच्या व्यापक परिस्थितीकडे डोळसपणे बघायला पाहिजे. वरवर दिसतो तो मृत्यु तर येणारच. आलेलाच आहे. शरीराच्या संदर्भात बघितलं तर प्रत्येक दिवशी कित्येक पेशी जन्मतात आणि मरतात. निसर्गामध्ये सतत जन्म- मृत्यु सुरू असतात. आपल्या श्वासामुळे कित्येक जीव सतत मरतात. वरवर दिसतो तो जन्म आणि मृत्यु हा निसर्गाचा नियमच आहे. जातस्य ही ध्रुवो मृत्यु| जन्मतो तो मरणारच. किंबहुना जन्मापासूनच मृत्यु सुरू होतो; मृत्युची प्रोसेस सुरू होते व ती पुढे कुठेतरी संपते.

आपण मृत्युमुळे शोक करतो कारण आपण मृत्युला स्वीकारलेलं नसतं. किंवा आपलं मन अशी कल्पना करत असतं की, सर्व काही दीर्घकाळ टिकेल, सर्व काही सुंदर राहील; सर्व काही अनंत राहील. पण वस्तुस्थिती ही नाहीय. शरीर मरणधर्मा आहे. वरवर दिसणाऱ्या गोष्टी जाणाऱ्या आहेत. आपण इथून एक दिवस जाणार आहोत. किंबहुना वरवर दिसतं ते जीवन इतकं अस्थिर आहे की, इथे पुढच्या दिवसाची गॅरंटी देता येत नाही. आपलं मन म्हणतं की, असं काहीही होणार नाही- सगळं ठीक होईल. पण जीवन आपल्या मनापेक्षा खूप विराट आहे. तिथे वेगळीच गणितं असतात. तिथे वेगळेच नियम असतात. त्या विराट रंगमंचावर आपली भुमिका अगदी छोटीशी. क्षणभंगुर. त्यामुळे जे जाणते लोक आहेत, ते ह्या क्षणभंगुराला स्वीकारतात आणि मग येणारा प्रत्येक क्षण बोनस बनतो. प्रत्येक क्षण जीवनदायी बनतो. जिथे प्रत्येकाचं तिकिट कन्फर्म आहे, फक्त डेट माहिती नाहीय, तिथे सोबत व्यतित होणारा प्रत्येक क्षण आनंदाचा होतो. मग तिथे अमुक हट्ट, अट्टाहास, हेच हवं, तेच हवं, हेच उभं करायचंय, असा हव्यास उरत नाही. राहतो तो फक्त आनंदाचा भाव.

म्हणून मला परत परत वाटतं की, जीवनाला पूर्णपणे आहे तसं स्वीकारायला हवं. तरच ह्या जीवनातून महाजीवनाकडे जाण्याचा प्रवास सुरू होऊ शकतो. जर आपण लौकिक जन्म- मृत्युमध्ये अडकून राहिलो तर ह्या जन्म मृत्युच्या पलीकडे असलेलं महाजीवन आपण समजू शकत नाही. आणि त्यासाठी आधी स्वत:च्या शरीराचा मृत्युही स्वीकारावा लागेल. स्वत:च्या इच्छा- आकांक्षा ह्याही एक दिवस मरतील, हेही स्वीकारावं लागेल. आणि एकदा हे स्वीकारलं की, मग कशाचाच काहीच त्रास होऊ शकत नाही. कारण जोपर्यंत आपण एखादी गोष्ट समग्रतेने स्वीकारत नाही, तोपर्यंत त्याचा त्रास होतो आणि एकदा ती स्वीकारली, की आपला त्रास कमी होत जातो.

प्राजक्ता- मिताली, तुम्हांला थोडं जड वाटत असेल. तुमच्या भाषेमध्ये बोलतो. तुमच्या फिजिक्समधला न्यूटनचा नियम बघा ना हेच सांगतो. ऊर्जा तयारसुद्धा करता येत नाही आणि ऊर्जा नष्टही करता येत नाही. ऊर्जा फक्त फॉर्म बदलत राहते. चेतना म्हणजे शुद्ध ऊर्जा. तिच्या प्रवासामध्ये ती वेगवेगळ्या टप्प्यांवर फॉर्म बदलते. एकच फॉर्म सदैव टिकत नाही. त्याचे नियम असतात. त्या त्या टप्प्यानुसार फॉर्म बदलणारच. म्हणून त्या फॉर्मविषयी फार पजेसिव्ह होण्याचं कारण नाही. आणि त्या फॉर्ममध्ये जी फॉर्मलेस ऊर्जा आहे, ती‌ तर नष्ट होऊच शकत नाही.

मृत्युचा त्रास होण्याचं किंवा मृत्युला न स्वीकारण्याचं एक कारण म्हणजे आपण आपल्या ओंजळीत जे जीवन आलं आहे, ते पूर्णपणे झोकून देऊन जगत नाही. आपल्याला जे काही चार क्षण मिळाले आहेत, ते आपण पूर्णपणे जगत नाही. आपलं मन त्या चार क्षणांमध्ये कधीच थांबत नाही. जेव्हा आपण १९९५ मध्ये असतो, तेव्हा आपल्या मनात २००५ चा विचार सुरू असतो किंवा १९८५ बद्दल पश्चात्ताप सुरू असतो. आणि जेव्हा २००५ खरं येतं, तेव्हा आपलं मन परत भविष्यात नाही तर भूतकाळात असतं. त्यामुळे आपण हमखास वर्तमानाचा क्षण जगायचं चुकतो. आणि जे जाणते लोक वर्तमानाचा क्षण पूर्णपणे जगतात, ते इतके तृप्त होतात की भविष्यकाळाची किंवा भूतकाळाची जाणीवच उरत नाही. आणि जीवन जर खऱ्या अर्थाने जगलो तर आणखी जगायला मिळावं, आणखी अनेक गोष्टी‌ व्हाव्यात, हे हे असं पाहिजे अशा प्रकारच्या वासनाही उरत नाहीत. आनंदाचा एक क्षण जीवन सार्थक करण्यासाठी पुरेसा असतो. सुख एक तर तेव्हा मिळतं जेव्हा आपला दृष्टीकोण सुखकारक असतो. आपण आनंदी तर सर्व जग आनंदात. आपल्याकडे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळवण्याचं स्किल असेल तर आपण हमखास आनंदी होऊ शकतो. पण जर आपण अटी‌ ठेवल्या की अमुक अमुक झालं तरच मी आनंदी होईन, तर मी कधीच आनंदी होऊ शकणार नाही. आणि जीवन आपल्याला पुन: पुन: शिकवत राहतं की, अशा अपेक्षा व अटी ठेवून सुख मिळत नसतं. निवड कशाची करायची- समोर असलेल्या गोष्टीतून आनंद मिळवायचा की तो पोस्टपोन करत राहायचा हे आपल्या हातामध्ये असतं. तो आपला निर्णयच असतो.

आणखी एक गोष्ट म्हणजे आपण इतर लाख गोष्टींचा विचार करतो, परंतु आपली सजगता स्वत:वर कधीच नसते. आपण नेहमी समोरच्या माणसाचाच विचार करतो. तो काय म्हणाला, हा माणूस असा कसा बोलला ह्यावरच आपण जास्त फोकस करतो. कधीही जर समोर दोन गोष्टी असतील तर आपला फोकस स्वत:ऐवजी समोरच्या गोष्टीकडेच जातो. हीसुद्धा मनाची ठरलेली सवय आहे जी आपण थोड्या प्रयत्नाने बदलू शकतो. ह्याविषयी एक गोष्ट आठवते. युरोपीयन संत जॉर्ज गुरजीफने एक आठवण सांगितली आहे. तो जेव्हा लहान होता, तेव्हा त्याचे वडील वारले. ते मृत्युशय्येवर असताना त्यांनी जॉर्जला जवळ बोलावून सांगितलं, 'तुला देण्यासाठी माझ्याकडे काहीही नाहीय. फक्त एक गोष्ट मी तुला देऊ शकतो जी माझ्या वडिलांनी मला दिली होती. जेव्हा केव्हा तुला कोणी काही बोलेल तेव्हा त्यावर लगेच उत्तर देऊ नकोस. त्यांना इतकंच सांग की मी त्याचं उत्तर चोवीस तासांनी देईन. चोवीस तास त्यावर विचार कर आणि मग उत्तर दे.' जॉर्ज गुरजीफने म्हंटलं आहे की, हे सूत्र फार उपयोगी ठरलं. जेव्हा कोणी त्याला काहीही बोलायचा, तेव्हा तो लगेच उत्तर न देता त्यावर विचार करायचा. चोवीस तास हा मोठा काळ असतो. त्यामुळे आपोआप त्याला शांतपणे त्यावर विचार करता यायचा. जर कोणी काही अपशब्द बोललं असेल किंवा काही चुकीचं बोललं असेल तर ते व्यर्थ होतं हे गुरजीफला जाणवायचं. मग त्यावर काहीच उत्तर द्यायचीही गरज पडायची नाही. आणि जर कोणी जे बोललं ते बरोबर असेल, त्यात थोडा अर्थ असेल, तर तो दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे जाऊन त्यांना धन्यवाद द्यायचा. इतका वेळ विचार केल्यामुळे राग, संताप, आदळ आपट होण्याची शक्यताच राहिली नाही. कारण जर चुकीचं बोलला असेल तर ते विचारात घेण्याचीही गरज नसायची आणि जर योग्य बोलला असेल तर ते मान्य करता यायचं. असो.

आजी- मावशी, मिताली- प्राजक्ता, मी हे स्वत:ला नेहमी सांगायचा प्रयत्न करतो. पत्रातून हे तुमच्याशी जसं शेअर करतोय, तसंच माझ्याशीही शेअर करतोय. स्वत:ला ती परत परत आठवण करून देतोय. कारण अशी सजगता ठेवणं खूप अवघड आहे. प्रत्येक प्रसंगामध्ये, प्रत्येक वेळेस जन्मानुजन्माच्या सवयींमुळे आपलं मन ठरलेल्या मार्गाने जाऊन उत्तर देतं. त्याला तिथून थांबवण्यासाठी सजगतेची एक गॅप लागते. सवयीने ती आत्मसात करता येते. आणि मग आपण यंत्रवत प्रतिक्रिया देण्याच्या ऐवजी जाणीवपूर्वक- बोधपूर्वक प्रतिसाद देऊ शकतो.

मावशी आणि आजी, मला दिसतंय की, तुम्हांला काही लोकांचा खूप राग येतो. काकाने त्याच्या मित्रांसाठी इतकं काही केलं, पण आता सगळेच मित्र अक्षरश: उलटले आहेत. संताप येणं स्वाभाविक आहे. पण काकाने जेव्हा हे सगळं केलं (काय काय त्याने केलं हा अगदी वेगळ्या पत्राचा विषय आहे!) तेव्हा त्याने मनामध्ये 'मला काय मिळेल,' अशी किंचितही अपेक्षा ठेवली होती का? किंवा पूर्वी आजोबा असताना- अगदी पूर्वी आपल्या घरी नेहमी कोणी ना कोणी जेवायला किंवा मुक्कामाला असायचे. अनेक जण नेहमी वार ठरवून जेवायला यायचे. आजोबांनी कित्येकांना मोठी मदत केलेली आहे. आणि त्यापैकीही अनेक जण आज ते मान्यही करायला तयार नाहीत असं दिसतं. इथेही मनात संताप येणं स्वाभाविक आहे. पण आजोबांनी हे सगळं केलं, तेव्हा त्यांनी 'मला त्यातून काय मिळेल' असा विचार कुठे केला होता. त्यांनी तर फक्त 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन|' म्हणूनच त्यांना उत्स्फूर्तपणे जे करावसं वाटलं ते त्यांनी केलं. उपकार म्हणून कधीच काही केलं नाही. काकाही ज्यांना कोणाला मदत करायचा, त्यामध्ये मलाही तशीच मदत मिळेल, अशी परतफेडीची अपेक्षा ठेवायचा नाही. त्यामुळे ह्या गोष्टीवरून स्वत:ला का त्रास करून घ्यायचा?

अजून एक गोष्ट थोडी बोलायची होती. मावशी- आजी तुम्ही इतकं देव- धर्म करता, इतके प्रवचन ऐकता. मला एक प्रश्न नेहमी पडतो. जर आपला देवावर विश्वास आहे; एक नियंता परमेश्वर आहे, असं आपण मानतो, तर मग आपल्या तक्रारी कशा काय शिल्लक राहतात? किंवा मग 'देव सगळं चांगलं करेल' असं आपण का म्हणतो? म्हणजे देव आत्ता चांगलं करत नाहीय, म्हणून आपल्याला वाटतं की नंतर तरी तो सगळं चांगलं करेल. पण जर देव आहे तर मग जे होतं आहे, ते सगळं तोच तर करतो आहे. जर सर्वव्यापी परमेश्वर आहे, तर प्रत्येक अन् प्रत्येक गोष्ट त्याच्याच इच्छेने होते आहे. त्याला जे करायचं आहे, तो ते करतोच आहे. जर हा भाव आपल्या मनामध्ये असेल तर वरवर बघता अशुभ वाटणारंही शुभ वाटतं. शेवटी ईश्वरेच्छा. तो जे करेल ते ठीक. तो जर असे दिवस दाखवत असेल तर तेही ठीक. मी का म्हणून मग तक्रार करायची व त्याच्या कार्यामध्ये त्याला सूचना द्यायच्या- की माझ्यासाठी अमुक अमुक कर. मला हे समजत नाही. सर्वव्यापी नियंता सर्व गोष्टी करत असेल तर आपण प्रत्येक क्षणी आनंदमय राहायला हवं. जर ईश्वराची इच्छा असेल तर सर्व काही शुभ आहे. तक्रार उरूच कशी शकते? तक्रार उरते ह्याचा अर्थ आपण ईश्वराहून स्वत:ला वेगळे समजतो. किंवा ईश्वराच्या कक्षेबाहेरही काही आहे, असं मानतो ज्यामुळे आपल्याला म्हणावं लागतं, देवा मला मदत कर आणि आत्ता ईश्वराची कृपा नाही असं वाटतं. पण खरी श्रद्धा असेल तर तो माणूस फक्त ईश्वराप्रती कृतज्ञ राहील. किंबहुना सगळ्या अगदी सगळ्या आणि तथा कथित अशुभ गोष्टींमध्येही त्याला फक्त भगवत्ताच दिसेल. कारण ज्याची ईश्वरावर खरोखर भक्ती असेल, त्याला ईश्वराहून वेगळं दिसूच शकत नाही. म्हणतात ना, पाण्यात असलेल्या माशाला पाण्यात असेपर्यंत पाणी काय असतं, हे कळत नाही. कारण तो पाण्यातच असतो. पण त्याला किनाऱ्यावर फेकलं तर त्याला क्षणात पाणी काय हे कळायला लागतं. आपलं तसंच आहे. पण मासा तरी पाण्याबाहेर येऊ शकतो. आपण ईश्वराच्या बाहेर येऊही शकत नाही.

जर सगळीकडे ईश्वर आहे तर मग तो दु:खामध्येही आहे; आपण जीवनात ज्या गोष्टी नाकारतो; त्यामध्येही आहे. असं कसं असू शकेल की ईश्वर फक्त आनंद, सुख, समाधान, सौख्य, कल्याण ह्यामध्येच आहे. तसं असेल तर तो फारच सीमित होईल. अपूर्ण होईल. पण ईश्वर दोन्हीमध्ये आहे. दोन्हीमध्ये त्याला बघता यायला पाहिजे. प्रत्येक दोन टोकांमध्ये तो असतो- सुख- दु:ख, आनंद- कष्ट, समाधान- असंतोष, चांगलं- वाईट, स्वच्छ- अस्वच्छ. जर हा भाव आपल्या मनात येऊ शकला तर मग मन किती हलकं होईल! मग कोणताच ताण राहणार नाही. आणि आपण खऱ्या अर्थाने फक्त 'उपकरण' होऊ; एक साधन होऊ. आणि तुम्ही ऐकता त्या भागवतामध्ये जगाला ईश्वराची लीला म्हंटलं आहे. लीला म्हणजे खेळ. हा सगळा त्याचा रंगमंच आहे. तो अनेक रूपांनी व अनेक प्रकारांनी खेळतोय. त्याने प्रत्येकाला एक एक भुमिका दिलेली आहे. आपण एक नाटकातलं पात्र म्हणून आपल्याला मिळालेली भुमिका फक्त पार पाडायची. करणारे आपण नाही. किंबहुना आपलं 'करणं' किंवा 'कर्तृत्व' अगदी कणभर. जे आहे ते सगळं 'होणं' आहे; त्याचं करणं आहे. आणि सगळं काही ईश्वरमय आहे म्हणून सर्व गोष्टींमध्ये तोच आहे. अगदी वरवर पाहता आपण ज्या गोष्टींकडे नाक मुरडतो, त्यातही तोच आहे. सर्व हिंसाचार, कटकटी, ताण- तणाव, तथाकथित अशुभ गोष्टी ह्यामध्येही तोच आहे.

रवींद्रनाथ टागोरांच्या दोन गोष्टी आठवतात. एकदा ते एका रात्री नावेत बसले होते. त्यांनी एक तंबू केला होता व त्यात ते मेणबत्ती लावून वाचत बसले होते. बराच वेळ वाचन झाल्यावर झोपताना त्यांनी मेणबत्ती फुंकर मारून विझवली. त्याक्षणी त्या तंबूमध्ये फिकट चंद्रप्रकाश पसरला! तेव्हा रवींद्रनाथांना जाणीव झाली की, माझ्या प्रायव्हेट मेणबत्तीमुळे मला हा सर्वव्यापी प्रकाश दिसत नव्हता. जोपर्यंत आपण स्वत:ला वेगळं मानतो, तोपर्यंत ईश्वराची जाणीव होऊ शकत नाही. त्यांची दुसरी गोष्ट. त्यांना गीतांजलीसाठी नोबेल पारितोषक मिळालं तेव्हा सगळीकडे त्यांचा सत्कार सुरू झाला. लोक सारखे भेटायला यायला लागले. त्यामध्ये एकदा एक जण आला. तो जरा वेगळाच दिसत होता. त्याने रवीन्द्रनाथांना विचारलं, 'खरं सांग, तुला ईश्वराचा साक्षात्कार झालाय का?' कारण गीतांजली म्हणजे ईश्वराची गीते आहेत. त्यावर रवींद्रनाथ अस्वस्थ झाले. हा कोण उद्धट माणूस आलाय असं त्यांना वाटलं. तो माणूस परत म्हणाला, 'तुला ईश्वर खरंच दिसला आहे का? तुला माझ्यामध्येही तोच ईश्वर दिसतोय का?' रवीन्द्रनाथ मनात म्हणाले, मला सगळीकडे ईश्वर दिसतोय फक्त हा उद्धट माणूस सोडून. त्यानंतर ते एका दिवशी सकाळी फिरायला गेले. परत आले तेव्हा सूर्य उगवत होता आणि रस्त्याच्या जवळ किरणं पसरली होती. एका नाल्यामध्ये सूर्य किरण चमकत होते, एका नदीमध्ये प्रकाश पसरला होता. रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यामध्येही सूर्यप्रकाश चमकत होता. रवीन्द्रनाथांचं लक्ष लोकांनी मलमूत्र केलेल्या जागी गेलं. तिथेही पसरलेल्या पाण्यामध्ये सूर्य दिसत होता! त्याक्षणी त्यांना एकदम जाणीव झाली की, सूर्य तर सगळ्या ठिकाणी आहे! एकाच ऊर्जेचा अविष्कार सर्वत्र आहे!

जे. कृष्णमूर्ती‌ ह्या प्रकारच्या दृष्टीला 'चॉईसलेस अवेअरनेस' म्हणजे 'अखंड सजगता' म्हणतात. जे आहे ते सर्व त्याचंच आहे. त्यामुळे मग चिंता, संताप, कष्ट हे काहीच उरत नाही. ताण कधी होतो, चिंता कधी होतात जेव्हा आपण जीवनातल्या थोड्याच गोष्टी निवडून त्यांना संपूर्ण जीवन समजतो तेव्हा. ठेविले अनंत तैसेची राहावे असं वाटतं तेव्हा. असं वाटणं स्वाभाविक आहे. पण आपण थोडे जरी डोळे उघडून जीवनाच्या अथांग पसाऱ्याचा विचार केला तर स्वत:च्या क्षुद्र इच्छा- आकांक्षांवर हसू आल्याशिवाय राहवत नाही. आपण कोण? इवलिशी पृथ्वी कुठे, ती सूर्यमाला कुठे, ती आकाशगंगा, तो विश्वाचा पसारा. आपण करतो ते ताण, संताप, अट्टाहास म्हणजे अक्षरश: वीतभर गजरा आणि गावभर तोरा! नाही तर काय!

शेवटी इतकंच म्हणेन की, ज्याच्याकडे सजगता आहे; ज्याला स्वत:कडे बघण्याची दृष्टी आहे; तो प्रत्येक तथा कथित अशुभ प्रसंगांमध्येही मंगलच बघतो. प्रत्येक प्रसंगांचा सदुपयोग करतो. म्हणून मला पुन: पुन: वाटतं की, आपल्या सर्वांवर हा जो प्रसंग आला आहे, त्यामधून आपले डोळे उघडण्यासाठी खूप काही शिकण्यासारखं आहे. झालेला मृत्यु काकाचा नाही तर आपल्या सर्वांचा आहे, असं लक्षात घ्यायला पाहिजे. कारण तिकिट तर प्रत्येकाचंच आहे. उगीच कशाला ते नाकारायचं? ही जाणीव जर आपण ठेवू शकलो तर ह्या तथा कथित अशुभ प्रसंगातूनही खूप काही संपदा मिळवता येऊ शकेल. आणि अशुभ बिशुभ काही नसतं. ते आपल्या दृष्टीवर अवलंबून आहे. एकदा एक जण बुद्धांवर थुंकला. बुद्ध शांत राहिले. तो माणूस परत थुंकला. बुद्धांचा शिष्य आनंद त्याच्या अंगावर धावून जाणार, इतक्यात बुद्धांनी त्याला शांत केलं. बुद्ध म्हणाले, तो थुंकला हे खरं. पण तू का तुझा समतोल सोडलास? त्याच्या मनात इतकं काही दाटलं होतं, की त्याला ते बोलून सांगणं शक्य नव्हतं, म्हणून तो थुंकला. मला त्याची भाषा कळाली. ती मी समजून घेतली. आणि तो थुंकला हे बरंच झालं. कारण त्या निमित्ताने मला तुझी चाचपणी करता आली. तुझा राग अजूनही टिकून आहे, हे मला कळालं. मग मी कशाला त्याच्यावर रागवू?

आणि मावशी- आजी, प्राजक्ता- मिताली, बाहेरची परिस्थिती हे फक्त निमित्त असतं. निव्वळ निमित्त. आपल्या आतमध्ये जे काही आहे, ते बाहेर काढणारं एक निमित्त. जर आपल्या मनातच असंख्य अस्वस्थता- ताण- चिंता असतील, तर बाहेर काहीही होवो, तेच बाहेर येणार. किंबहुना मनातून आपण वाटच बघत असतो की, कधी असा प्रसंग येईल जेव्हा मला राग बाहेर काढता येईल. मी जेव्हा ट्रॅफिकमध्ये बाईक चालवतो, तेव्हा ट्रॅफिक जाममुळे हळु हळु माझी चिडचिड होते. इतकी की सतत हॉर्नवर बोट धरूनच चालावं असं वाटतं. आणि मग तेव्हा तर मी वाटच बघत राहतो समोर कोण आडवा येईल, ज्याच्यावर मला मोठ्ठा हॉर्न वाजवून माझा सगळा राग बाहेर काढता येईल! इतकं हे स्पष्ट आहे. जर माझ्या मनात अजिबात राग किंवा संताप नसता तर समोर कितीही गर्दी होवो, कितीही जाम होवो, मला राग आलाच नसता.

त्यामुळे सतत बाहेरच्या गोष्टींवर फोकस करण्याऐवजी आपल्या मनात काय आहे, हेसुद्धा बघत राहायला पाहिजे. जर मनाच्या विहिरीमध्ये रागाचं, संतापाचं, ताणाचं पाणी नसेल तर बाहेरून कितीही घागरी टाका, ते बाहेर येणारच नाही. ह्याचा अर्थ असा नाही की, राग किंवा दु:ख दाबून टाकायचं. नाही. तर ते स्वीकारायचं. त्यामध्येही शेवटी ईश्वर आहेच. ईश्वराने जर दु:खच, संतापच दिला, तर तेही ठीक. मी ते स्वीकारेन. त्याविषयी डोळस होईन. जाणीवपूर्वक राग करेन. ऑटोमेटिक यंत्रवत न करता थोडे डोळे उघडे ठेवून राग करीन. असं‌ झालं की गंमत होते. मग राग करताच येत नाही. जी जखम आपण उघडी करतो, ती हळु हळु आपोआप बरी होत जाते. म्हणून जखमा दाबायच्या नाहीत, लपवून ठेवायच्या नाहीत. असो. . .

चला, माझं चऱ्हाट फारच मोठं झालं. पण अशा गोष्टी तुमच्याशी सविस्तर बोलायच्या होत्या. अजून एक मुद्दा आठवला! तो बोलून घेतो आणि थांबतो! प्लीज!

आपण अनेकदा ऐकतो- तुमच्या भागवतात किंवा अन्यत्र सांगतात ना की, आपण अहंभाव सोडला पाहिजे. कर्ताभाव सोडला पाहिजे. साक्षीभाव ठेवायला पाहिजे. किंवा आपण ऐकतो की, अमुक अमुक संतांनी कर्ताभाव सोडला. ते ईश्वराला शरण गेले इ. इ. त्यावर मला इतकंच वाटतं की, कर्ताभाव सोडणं ही एक गोष्ट झाली. पण आपण आधी 'कर्ता' असायला तर पाहिजे ना मुळात! आणि जर आपण 'कर्ते' असू, तर कर्ताभाव कसा काय सोडता येणार? किंवा कर्ताभाव सोडणं, हीसुद्धा एक कृतीच झाली ना! एक तर आपण पूर्ण कर्ता असू किंवा मग पूर्ण उपकरण मात्र असू! आणि जाणकार लोक हेच सांगतात की, आपण कर्ता असूच शकत नाही. आपण फक्त माध्यम आहोत; उपकरण मात्र आहोत. करतो आपण पण करविता वेगळाच आहे! त्यामुळे मग चिंता कशाची? समुद्रातल्या माशाला तरी समुद्राच्या बाहेर जायचा चान्स आहे, आपल्याला तोही नाही!

आपल्याला असुरक्षितता वाटते अनेकदा की माझं कसं होईल. माझं सगळं ठीक होईल ना. असं वाटणं स्वाभाविक आहे. पण जरा खोलात जाऊन बघितलं तर कळतं की, आपण स्वत:ला वैश्विक चेतनेचा भाग समजत नसल्यामुळेच असं वाटू शकतं. आपण कोणी वेगळे नाही. आपण काही विश्व चेतनेपासून तुटलेले नाही. त्यामुळे हे विश्व चालवणारी चेतना आपल्यालाही मार्ग देईल. बाळ जन्माला यायच्या आधीपासून त्याच्या पोषणाची सगळी व्यवस्था तयार झालेली असते. निसर्गामध्येही प्रत्येक प्राण्यासाठी- प्रत्येक पक्ष्यासाठी सगळी व्यवस्था असते. एक तरी पक्षी- प्राणी किंवा झाड असं आहे का ज्याला टेन्शन वाटतं, ज्याच्यासमोर चिंता असते- स्वत:ची प्रायव्हेट टारगेटस असतात? ते तर आपोआप सर्व काही करतात. त्यांच्यातला निसर्ग त्यांच्याकडून ते करून घेतो. तसंच माणसाचंही आहे. चेतना ज्या स्थितीमध्ये असते, त्यानुसार तिला दिशा मिळत जाते. निसर्गामध्ये कोणावरही अन्याय नसतो. त्या त्या चेतनेच्या स्तरानुसार गोष्टी ठरत जातात. आपल्याला त्रास होतो कारण आपण स्वत:ला ईश्वराहून वेगळे मानतो किंवा स्वत:ला ईश्वरापेक्षा शहाणे मानतो आणि म्हणून स्वत:च्या बळावर सगळं करू बघतो. त्यातलं जे ईश्वराला मान्य असतं, तितकं होतं. बाकी होत नाही. पण आपल्या त्रासाला आपणच कारणीभूत असतो ना. असो. . .

चला! खूपच जास्त बोलत गेलो. आपण एक साधन म्हणून, एक माध्यम म्हणून आपल्याला जे शक्य आहे; जे आपल्या हातात आहे, तितकंच करत राहायचं. वर्तमानाचा क्षण खरोखर जगायचा. भूतकाळात व भविष्यकाळात जगायचं नाही. मिताली- प्राजक्ता क्रिकेटच्या भाषेमध्ये आपण फक्त आत्ता जो बॉल टाकला जातोय, त्यावर फोकस करायचा. एकावेळी एका बॉलवर फोकस. विपश्यनेमध्ये त्याला 'इस क्षण की सच्चाई' म्हणतात. जर आपण आत्ताच्या क्षणाची पुरेशी काळजी घेतली तर आपोआप सगळं सुरळित होतं. आपल्या मर्यादेमध्ये जितकं असेल त्यानुसार.

जाणकार लोक म्हणतात की जीवन ही एक संधी आहे; एक विद्यापीठ आहे ज्यामध्ये आपण महाजीवनाकडे जाऊ शकतो. म्हणून मला आजी- मावशीला इतकंच सांगायचं आहे की, आपल्याला हे जे दु:ख मिळालं आहे, त्याचा आपण आपल्या प्रगतीसाठी वापर करूया. धर्मामध्ये प्रगतीसाठी दु:ख हा सगळ्यात मोठा धडा मानला गेला आहे ना. दु:खामध्ये आपल्याला जे दिसतं ते सुखामध्ये दिसूच शकत नाही. दु:खामध्ये डोळे उघडतात.

सॉक्रेटिसची एक गोष्ट आहे. सॉक्रेटिसचं त्याच्या बायकोशी असलेलं भांडण प्रसिद्ध होतं. तुमच्या जान्हवीच्या आईसारखी ती बाई असणार! ती सॉक्रेटिसला मारहाण करायची, तापलेला चहा त्याच्या अंगावर ओतायची! एकदा एक तरुण सॉक्रेटिसकडे आला. त्याने सॉक्रेटिसला विचारलं, 'महाशय मी लग्न करू का नको करू ह्यावर मला मार्गदर्शन करा ना. तुम्ही इतके अनुभवी आहात!' सॉक्रेटिसने ओळखलं, की त्याला लग्न करायचं नाहीय, म्हणूनच तो माझ्याकडे आला आहे. त्याला वाटतंय की, मी त्याला सांगेन की लग्न नको रे करू बाबा, प्रचंड त्रास होतो. पण सॉक्रेटिस त्याला म्हणाला, 'हे पाहा, लग्न कर. फार फार तर काय होईल? दोनच शक्यता आहेत. एक तर तुला सुंदर सुविद्य पत्नी मिळेल. तसं झालं तर आनंदच मिळेल तुला. आणि जरी भांडखोर, कटकटी बायको मिळाली, तरी त्यातही तुझं भलंच आहे. माझ्याकडे बघ. माझी बायको इतकी संतापी- शीघ्रकोपी असल्यामुळेच मी साक्षी बनलो. दुसरा मार्गच नव्हता. जेव्हा बायको गरम चहा अंगावर ओतते, अंगावर धावून येते, तेव्हा साक्षी व्हावंच लागतं!'

दु:खामधूनही मार्ग सापडू शकतो. दु:खामुळे डोळे उघडू शकतात. आपला माणूस गेल्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे. आपण ती डोळे उघडून बघायला पाहिजे. ह्या पोकळीमध्ये; ह्या अंधारात आपण आपला फोकस स्वत:कडे नेला पाहिजे. पण आपण शक्यतो काय करतो, एक तर त्याच्या आठवणींमधून ही पोकळी बुजवण्याचा प्रयत्न करतो. किंवा त्रागा करतो, तक्रारी करत बसतो आणि ती पोकळी भरून काढायला बघतो. किंवा नवीन इच्छा, नवीन गोष्टींकडे जातो. त्याऐवजी आपण काकासोबत आपल्याही एका भागाचा मृत्यु झालाय अशा नजरेने बघितलं तर आपल्याला आपलाही मृत्यु त्यात दिसेल आणि हळु हळु मृत्युपलीकडची वाटही दिसू शकेल. . . . असो. प्राजक्ता, सॉरी! फारच जड झालं ना. . . . पण जे वाटलं ते बोललो. हे एका वेळी फक्त एका बाजूचे मनात आलेले विचार आहेत. केवळ एक मत म्हणूनच त्यावर विचार करा. बाकी काही नाही.

शेवट एका गाण्याने करतो! मलासुद्धा गाणी आवडतात! आजीच्या तरुणपणच्या वेळचं गाणं आहे ज्यामध्ये सगळ्या धर्माचं सार आहे-

मैं जिंदगी का साथ निभाता चला गया
हर फ़िक्र को धुवें में उडाता चला गया

बरबादियों का शौक मनाना फिजुल था, मनाना फिजुल था, मनाना फिजुल था,
बरबादियों का जश्न मनाता चला गया
मैं जिंदगी का साथ निभाता चला गया....

जो मिल गया उसी को मुक़द्दर समझ लिया, मुक़द्दर समझ लिया, मुक़द्दर समझ लिया
जो खो गया मैं उसको भुलाता चला गया
मैं जिंदगी का साथ निभाता चलाता गया...

गम और ख़ुशी में फर्क ना महसूस हो जहाँ, ना महसूस हो जहाँ, ना महसूस हो जहाँ
मैं दिल हो उस मुक़ाम में लाता चला गया...
मैं जिंदगी का साथ निभाता चलाता गया…

मैं जिंदगी का साथ निभाता चला गया
हर फ़िक्र को धुवें में उडाता चला गया...

******
माझे सर्व लेख एकत्र इथे आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी लिहिले आहे...बर्याच गोष्टींचा परामर्श घेतला आहे तुम्ही...
डोक्यात विचारांचा भुंगा, भुगा पाडायला लागला आता Happy

-प्रसन्न

बापरे.... कसल अफाट आहे हे! रविन्द्रनाथ टागोर, जे. कृष्णमुर्ती सगळेच आवडते. अगदी साध्या सोप्या भाषेत जन्म-मृत्यु, आत्म्याचा प्रवास... सगळाच उहापोह घेतलाय. __/\__
निवान्तपणे अक्षर न अक्षर वाचणार आहे!

जे. कृष्णमूर्ती‌ ह्या प्रकारच्या दृष्टीला 'चॉईसलेस अवेअरनेस' म्हणजे 'अखंड सजगता' म्हणतात.>>>>>> अशा अनेक सुंदर विचारांनी ओतप्रोत व्यापून टाकलेला एक अप्रतिम लेख..... कुणालाही सहज अंतर्मुख करायला भाग पाडेल असा....

अनेकानेक धन्यवाद ..... Happy

अप्रतिम लेख..... कुणालाही अंतर्मुख होण्यास भाग पाडेल असा... कुठल्याही प्रसंगात अगदी मार्गदर्शक ठरावा असा..

सर्वांना नमस्कार. आजच्या परिस्थितीमध्ये हा लेख काही जणांसोबत शेअर केला. काही जणांनी प्रतिक्रिया दिली की, कोरोनामुळे जवळच्यांच्या विरहाचं दु:ख हा लेख वाचल्यावर थोडं हलकं झालं. इतरांनाही हा लेख वाचून हलकं वाटू शकेल. दु:खावर थोडी फुंकर बसू शकेल. त्यामुळे हा लेख वर आणत आहे. धन्यवाद.