माध्यमांमधील मराठी

Submitted by बे-डर on 23 June, 2016 - 16:06

मराठीविषयी सातत्यानं चर्चा सुरू असते. वृत्तपत्रं, दूरचित्रवाणी यांची भाषा, त्या माध्यमांमधील जाहिरातींचे (चुकीचे) अनुवाद, खरं तर भाषांतर; चुकीची वाक्यरचना, इंग्रजी धाटणीची वाक्यरचना, अतिरिक्त विशेषणांचा वापर, चुकीच्या शब्दांचा सर्रास वापर, इंग्रजी किंवा मराठी शब्दांची अयोग्य संक्षिप्त रूपं (त्यांची चुकीची पूर्ण रूप), परभाषांतील नावांच्या चुका... अशा अनेक गोष्टी आढळतात. त्याबद्दल संताप, हताशपणा, वैफल्य अशा भावना व्यक्त केल्या जातात. काही जण दुर्लक्ष करतात, तर काही जण हसून साजरं करतात.

मी 28 वर्षं मराठी पत्रकारितेत आहे. शास्त्रीय दृष्टिकोणातून मी मराठीचा अभ्यास केला नाही; पण वाचत, निरीक्षण करीत, काही वेळा शोधत राहिलो. अलीकडं मराठीच्या वापराविषयी मोठ्या प्रमाणात बेफिकीरी जाणवते. अनेकांना शब्दांविषयी प्रेम, आस्था नसते, असं जाणवतं. ‘चूक-बरोबर जाऊ द्या. समजल्याशी कारण!’, असाच खूप जणांचा सूर असतो. त्याच वेळी याबाबत आस्था असणारीही बरीच मंडळी भेटली, काहींचं वाचता आलं. त्यात पत्रकार, लेखक, वाचक, प्राध्यापक... असे सगळ्याच क्षेत्रांतील आहेत.

अनेकदा मराठी वृत्तपत्रांतल्या चुका दाखविल्या जातात. पण बरोबर काय हेच सांगितलं जात नाही. या धाग्यावर चुका दाखवून बरोबर/योग्य काय आहे, हे सांगावं, असं मी सुचवू इच्छितो. त्यानं काही अंशी तरी परिणाम साधला जाईल. कारण इंग्रजी ‘डिक्शनरी’ पाहायची सवय असली, तरी मराठी शब्दकोश चाळताना फार कुणी दिसत नाही. जिल्हा वृत्तपत्रांमधून किंवा मोठ्या वृत्तपत्रांच्या जिल्हा आवृत्त्यांमधून इंग्रजी वृत्तपत्रं, मराठी वा इंग्रजी शब्दकोश पाहायला मिळत नाहीत. असं दिशादर्शक काही नसल्यामुळं अशुद्ध शब्दच वारंवार वापरण्याची सवय होऊन तेच शुद्ध असं मनात बसतं.

त्याची काही उदाहरणं...
1) एका अनुदिनीवरील (ब्लॉग) लेखावर काही प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यात एका वाचकानं लेखकाचं कौतुक करताना ‘तुम्हाला चरणस्पर्श’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. इथं वाचकाला जो आदर व्यक्त करायचा आहे, त्याच्या अगदी उलट त्याच्या शब्दांमुळे घडलं आहे. त्याचा अर्थ ‘तुम्हाला लाथ मारतो/मारते’ असा होत नाही का?

2) एका तरुण पत्रकाराने काल ‘वाणवा’ की ‘वानवा’ अशी शंका विचारली. त्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना वेगवेगळ्या शब्दकोशांमध्ये ‘वानवा’ म्हणजे शंका, संदिग्धता असा अर्थ असल्याचं दिसलं. मी तरी आजवर हा शब्द उणीव, कमतरता याच अर्थानं वापरत आलो आहे.

अरुण फडके यांच्या ‘मराठी लेखन-कोश’मध्ये दिलेली माहिती अशी - वानवा (पु) - सामान्यरूप - वानव्या- आणि वानवा (स्त्री) - सामान्यरूप - वानवे-

हे वाचल्यावर प्रश्न पडला की, हा शब्द पुल्लिंगी कोणत्या अर्थाने वापरतात?

3) योजना राबविणे, योजनेअंतर्गत असे शब्द वृत्तपत्रांत नेहमीच दिसतात. यातील ‘योजनेअंतर्गत’चं एक तर ‘योजनेंतर्गत’ असं लिहिलं पाहिजे. मी ते साधं ‘योजनेत’ किंवा ‘योजनेमध्ये’ असं वापरतो. ‘यांनी प्रतिपादन केले’ या वाक्याचाही नेहमीच वापर होतो. यातील ‘प्रतिपादन’ चुकीच्या अर्थाने वापरलं जातं, असं वाटतं. ‘राबविणे’ यालाही चांगला पर्याय शोधण्याची खरोखर गरज आहे.

4) हल्ली ‘कर्जे स्वस्त’ किंवा ‘कर्जे महाग’ अशी शीर्षकं नेहमी दिसतात. ‘कर्ज’ शब्दाचं अनेकवचन ‘कर्जे’ असं होत का? कृपया जाणकारांनी माहिती द्यावी, ही विनंती.

5) आता लवकरच ऑलिम्पिक आहे. त्यातील अनेक विदेशी खेळाडूंच्या नावाचे मराठी उच्चारण-लेखन आणि इंग्रजी स्पेलिंग यात खूप फरक असतो. नुकत्याच झालेल्या ‘इंडियन प्रीमियर लीग’मध्ये हैदराबादकडून खेळणाऱ्या ऑनरिकस याचा उच्चार दूरचित्रवाणीवरील हिंदी समीक्षक ‘हेन्रीकस’ करीत होते. काही मराठी वृत्तपत्रांमध्ये ते ‘हेनरीकेज’ किंवा ‘हेन्रीक्स’ असं येत होतं. ते सामने थेट दाखविणाऱ्या वाहिनीवर मात्र देवनागरी लिपीत सातत्यानं त्याचा उल्लेख ‘ऑनरीकेज’ असाच दाखवित होते. दूरचित्रवाणीच्या क्रीडा वाहिन्या सातत्यानं पाहणाऱ्या एका मित्रानं ते नाव ‘ऑनरिकस’ असंच बरोबर असल्याचं कळविलं.

6) ‘शकणे’ याचा मोठा शाप मराठी वृत्तपत्रसृष्टीला लागला आहे. ‘याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही’, ‘त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही’ किंवा ‘नेमके कारण समजू शकले नाही’ ही वाक्यरचना चुकीची आहे. त्या ऐवजी ‘माहिती मिळाली नाही’, ‘त्यांच्याशी संपर्क झाला नाही किंवा साधता आला नाही’ आणि ‘नेमके कारण समजले नाही’ ही वाक्यं अधिक योग्य आहेत.

7) विविध प्रकारे (विविध आणि प्रकार हे समानार्थीच शब्द आहेत), दबाव, पाणी फेरले, इतिहास रचला हे नेहमीचे चुकीचे शब्द अगदी रूढ झाले आहेत. या वेळी, त्या वेळी, काही तरी, जरा तरी असे दोन वेगवेगळे शब्द सगळीकडे एकत्र करून लिहिले जातात. ‘1995मध्ये’ या ऐवजी ‘1995 मध्ये’ असं वेगवेगळं लिहिलं जातं. मराठी साहित्य संमेलन किंवा नाट्य संमेलन यांच्या बोधचिन्हांमध्येही असंच लिहिलं जातं - 79 वे साहित्य संमेलन. एक तर ते अक्षरी ‘एकोणऐंशीवे’ असं लिहावं किंवा आकड्याला पुढचे ‘वे’ जोडूनच घेतले पाहिजे.

अशा असंख्य बाबी आहेत. येणाऱ्या शंका, दिसणाऱ्या चुका इथे मांडणार आहे. आपणही त्यात सहभागी व्हावे, ही विनंती. पण केवळ चुका दाखवायच्या नाहीत, तर बरोबर काय आहे, हे सांगायचे आहे. त्यासाठी ‘मायबोली’कर मंडळींनी मदत करावी, अशी विनंती. ही माहिती ठरावीक काळाने काही मराठी पत्रकार, वाचक यांना इ-मेलने पाठविण्याचा विचार आहे. म्हणजे त्यांच्या मनात शंका असतील, तर उत्तरे मिळतील, आपणहून मिळत असलेल्या माहितीमुळेही काही जण मराठीच्या बिनचूक वापराकडे वळतील, किमान तशी काळजी घ्यावी, असं तरी त्यांना वाटेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज ऑफीस मधे लंच साठी बिर्याणी ऑर्डर केली होते, त्यातील दोन कंटेनर्स उरले. चुकुन जास्त ऑर्डर केले गेले. तेव्हा एक मराठी कलिग म्ह्णाला ' अरे दोन कंटेनर्स वाचले' . 'बच गये' चे शब्द्शः भाषांतर.

उपयुक्त धागा आहे, धन्यवाद.
इथल्या मुद्द्यांमुळे व्यक्तिगत पातळीवरही भाषा सुधारायला मदत होईल.

एक शंका आहे, एखादी गोष्ट करायला जमणार नसेल तर 'मी हे करू शकणार नाही' हे नम्रपणे कसं सांगायचं मग? दर वेळी 'माफ करा'ने सुरूवात करण्यासारखा प्रसंग असतोच असं नाही.
मला हे जमणार नाही किंवा मी हे करणार नाही असं म्हणायचं का? ह्या दोन्ही वाक्यात एक छुपं औद्धत्य आहे.
मराठीत अनौपचारीक राहून नम्रता सांभाळणे जरा जिकिरीचेच होते. एकतर रोखठोकपणा नाहीतर थेट कृत्रिम औपचारीकता.

हल्ली ऐकलेली एक वाक्यरचना म्हणजे "खूप त्रास होणार नसेल तर कृपया हे हे करू शकाल का?". हे म्हणजे इफ इट्स नॉट टू मच ऑफ अ ट्रबल च शब्दशः भाषांतर ! मराठीत ही वाक्यरचना खटकते.

ओके वावे, मान्य. दर वेळी ’टाकणे’ म्हणजे फ़ेकून देणे नाही.
पण मी जो संदर्भ दिला आहे- पदार्थ तयार होत असताना त्यात घटकपदार्थ ’टाकायचे’ का ’घालायचे’? Happy

मराठीत अनौपचारीक राहून नम्रता सांभाळणे जरा जिकिरीचेच होते. एकतर रोखठोकपणा नाहीतर थेट कृत्रिम औपचारीकता.>> बरोबर आहे. आपण दोन्हीतला समतोल साधायचा प्रयत्न करायचा. ’कसं बोलता’ हेही महत्त्वाचं असतं. पण दुस-या भाषेतून थेट भाषांतर नको.
सॉरी आणि थॅन्क यु मराठी लोकांनी सर्रास एकमेकांना म्हणावं अशी अपेक्षाच नसावी Proud

सई, माफ करा पेक्षा, "प्रामाणिक पणे सांगायचे तर मला नाही जमणार किंवा मी नाही करु शकणार " हे कसे वाटते ?..

माझ्याच्याने होणार नाही, असे पण म्हणता येईल.. पण कुणी नाही वापरत अशी वाक्यरचना आता.

मी पण वाचतेय हा धागा. खुपच उपयोगी पडेल. ज्ञानात भर पडते आहे.

पूनम ला अनुमोदन, पदार्थात घटकपदार्थ 'घालावेत' किंवा 'मिसळावेत' टाकू नयेत.

परवाच मी एक चिड आणणारी जाहीरात फेबु वर लिहिली होती. रेडिओ (विविधभारती) वर टिळक महाराष्ट्र विद्यालयाच्या जाहीरातीत एक बाई नवर्‍याला म्हणते की 'आधीच आपल्या राजूला शाळेत 'टाकायला' उशिर झालाय. ऐकताना प्रचंड चिड चिड होते. Angry

आणि जनमानसात एक गोष्ट नक्की आहे की रेडिओ/टिव्ही/ईन्टरनेट वर जे असते ते सगळे बरोबर. मग ती वेळ असो, किंवा भाषा. Sad

अजून काही: चूक व कंसात बरोबर
१. सहभाग घेतला ( भाग घेतला / सहभाग होता )
२. तू तिथे जाणार नाही आहेस (जाउ नकोस)
३. तू माझी मदत कर ( मला म कर )

काही सिरियल्स मध्ये खुद्द काही पात्र आपण असं बोलुया नको किंवा करुया नको असे संवाद म्हणतात.
Angry (खास करून ती जानी, :राग:)

आपण असं बोलायला नको, किंवा करायला नको ही रूपं जास्त योग्य आहेत.

आता जरा एका मराठीत रूढ केलेल्या पण मूळ इं शब्दाबाबत :
'फूलस्केप' कागद हा नेहेमीचा वापर. एकदा एक पत्रकार भाषणात म्हणाले, 'हाफस्केप' कागद !!!
ही गोची मूळ इं शब्द नीट माहित नसल्याने होते.( ८०% लोकांची ! ).
foolscap हे स्पेलिंग व 'फूल्झcap' हा उच्चार आहे ! (full चा काहीही संबंध नाही )
तेव्हा 'हाफस्केप' हा अजब शोध आहे !!
जिज्ञासूंनी 'foolscap' ची व्युत्पत्ती जरूर वाचावी..... मस्त आहे !

पाककलेतले जूने शब्दप्रयोग

फोडणीत मिरच्या टाका.

त्यात मोहरी तडतडवा.

त्यात पुरेसे पाणी ओता.

आता वाटण लावा.

त्यात तांदूळ वैरा.

वर खोबरे शिवरा.

कोथिंबीरीने सजवा.

वर लिंबू पिळा.

हवे असल्यास गुलाबपाणी शिंपडा.

आता सगळ्यासाठी टाका, वापरतात.

छान धागा...छान माहिती मिळत आहे...

चर्चा भाषेवर आहे त्या वर माझा/मला पडलेला एक साधा प्रश्न...!! कदाचीत थोडासा अवान्तर असेल..
कोणत्या ही भाषे मध्ये लिपी ला अन्यनसाधारण महत्व आहे..

मराठी ही शेकडो वर्ष मोडीलिपी मध्ये लिहली गेली...मोडी हिच मराठीची लिपी होती...
आणि मग अगदीच अलीकडे (२० व्या शतकातच) ... देवनागरी ही दुसर्‍या भाषेची लिपी आपण स्वीकारली...तिही इतक्या सहज....!!!

दुसर्‍या भाषेची लिपी आपण स्वीकारली तर मग त्या भाषे मधुन आलेल्या काही शब्दाना विरोध का?

टीव्ही, सिनेमांकडून चालवलेले धेडगुजरीकरण आणि परप्रांतियांबरोबर रोजच्या दैनंदिन जीवनातल्या वाढत्या संभाषणाचा चुकीचा प्रभाव ह्याबरोबरच मराठी आणि हिंदीची लिपी एक असणे हे मराठी संभाषणाच्या र्‍हासाचे अजून एक महत्त्वाचे कारण. ईतर तमिळ, तेलगू, मल्याळम भाषांची मराठी एवढी वाईट परिस्थिती नसेल असे मला वाटते.
ह्याला भाषेचा र्‍हास म्हणावे की ऊत्क्रांती, ज्ञानेश्वर, शिवाजीची मराठीही आता ऊरली नाही, तिच्यावरही सुलतानी कोसळलीच असेल तेव्हा.
आता आपण कुठल्या मराठीचा वंश चालवतोय तेच कळंत नाहीये तर मग 'अर्थ पोचतोय तर चालतंय' ऐकायचं आणि गप्प बसायचं.

धागा आवडला. इतक्या लोकान्समोर टिव्ही वर असे बोलताना लोकाना अजिबात चूक वाटत नाही हे जास्त खटकते. ती भाषा खूप तान्त्रिक झाली आहे. सहजपणा जाऊन त्यात नाट्यही जास्त आले आहे. त्यामुळे अजून त्रास होतो.

बाकी शुद्धलेखनाच्या चुका यावर अजून एक वेगळा धागा येऊ शकतो.
विद्या.

माझ्याच्यानं होणार नाही हे जमण्यातलं आहे Happy आपण कसं सांगतो त्यावर अवलंबून, हेसुद्धा बरोबर.

खरंच आहे, दरवेळी सॉरी किंवा थँक्यु कशाला म्हणायला पाहिजे? नवपालकांमधे हे हल्ली सर्रास बघायला मिळतंय. आपण कुणाही पोराटोरांना काहीतरी खाऊ द्यावा, छान दिसतेय म्हणावं किंवा तत्सम काहीही केलं की त्या पोरट्यांना लगेच मागून त्याचा बाबा नाहीतर आई 'थँक्यु म्हण आंटींना' असं प्राँप्टिंग करतात! त्यांना 'अहो कशाला, राहू दे' म्हणलं, की आपल्यालाच 'अहो असं कसं, मॅनर्स आहेत' असलं काहीतरी ऐकावं लागतं Uhoh

हो!!! जे मॅनर्स आहेत, आणि ते पाळलेच पाहिजेत. मराठी लोक म्यानर्लेस असतील तर बदला. इंग्रजी शब्द वापरायचे नसतील तर मराठी निर्माण करा. पण मॅनर्स पाळणाऱ्या लोकांच्या चुका काढणे अशक्य आहे.

अमितव, मुद्दा सुटतोय बहुतेक. उठसूठ औपचारीक होण्याबद्दल आहे ते. त्यातही ५-६ वयोगटातल्या किंवा त्याहून लहान मुलांबद्दल. मॅनर्स पाळणे, न पाळण्याबद्दल आणि मोठ्यांबद्दल नाही ते. मराठी किंवा इंग्रजी शब्द वापरण्याबद्दलही नाही.
मात्र दोन संस्कृतीत शिष्टाचारांचा फरक असू शकतो, तो मान्य केला जाऊन योग्य ते बदल आपलेसे केले पाहिजेत.

बे-डर, विषयांतर केल्याबद्दल क्षमस्व.

मॅनर्सही औपचारिकता नाही असं मला वाटतं. दोन संस्कृतीत फरक हा मुद्दा काही अंशी मान्य. पण आज शहरात आपण जे वागतो त्यातील किती गोष्टी आपण परकीयांकडून घेतल्या आहेत? अदबशीर वागणे, मोठ्यांचा आदर करणे ह्या गोष्टी लहान मुलांना आपण शिकवतो ना? कोणी आपल्याला काही दिलं/ मदत केली/ आपल्याला आनंद होईल असं वागलं तर ते त्या व्यक्तीपर्यंत पोचलं पाहिजे बरोबर? मग ते लहान मुलांना शिकवलं तरच कळेल ना?
लहान मुलांना ते शब्दात व्यक्त करून सांगायला जर कोणी पालक शिकवत असतील तर त्यांना हसणे मला आवडले नाही. तुम्हाला नसेल आवडत लहान मुलांना सांगणे तर व्यक्तिगत निवड समजू शकतो पण दुसरा करतोय तर त्याची टिंगल हा सूर तुमच्या पहिल्या पोस्ट मध्ये वाटला म्हणून लिहिलं.

लहान मुलाने काही बारीक चूक केली तर सॉरीची गरज नाही, हे बरेचदा लोक म्हणतात. तो त्यांचा चांगुलपणा. असं जर मला कुणी म्हणालं तर मी त्याना सांगतो, की आज तो लहान आहे, पण उद्या मोठा झाला आणि असं वागला आणि माफी मागितली नाही तर ते तुम्हाला आवडेल का? त्यामुळे हे मॅनर्स लहान वयातच शिकवावे.

विषयांतर झालं, विपुत बोलू.

हसण्याचा प्रश्नच येत नाही. टिंगल/टरसुद्धा नाही, उलट आपण त्यावर काय बोलावं ते मला सूचत नाही. चिमुरड्यांबाबतीत फार काटेकोर होण्याची आवश्यकता नसते. ती नुसती छानशी हसली तरी पुरतं आणि ती मोठी होत जातील तसतसं सांगितलं शिकवलं जातंच, आपल्याला बघत त्यांची तीसुद्धा शिकत असतात (आणि तेच जास्त प्रभावी!). अर्थात हेही माझं वैयक्तिक मत आहे. ते मी पहिल्या पोस्टमध्येही लिहायला हवं होतं.

Happy

मस्त धागा आहे. वाचायला आवडेलच आणि त्यातून माझ्या स्वतःच्या अनेक चुका सुधारायला मदत होईल हे नक्की. Happy

सध्या बर्‍याच वाहिन्यांवर पाककृतींच्या व्हिडिओ मधे शेवटी 'सर्व्ह करा' हे सर्रास असतं - जसे कोथिंबीरीने सजवून/फ्रिजमध्ये गार करून/ गरमागरम 'सर्व्ह करा'. मला प्रचंड राग येतो हे ऐकलं की. वाढा किंवा खायला द्या किंवा खायला घ्या हे इतकं कठीण आहे का? Happy

वरील सर्व लिहिणार्‍यांची कळकळ, भाषेविषयी असलेली आस्था बघून, माझ्या म्हातार्‍या पेठी मनाला फार आनंद झाला,
आजकालचे धेडगुजरी, (धेडहिंदी, धेडिंग्रजी, असे शब्द वापरावेत का? ) ऐकून, वाचून कधी कधी छातीत कळ येते! मन विषण्ण होते - मी जी पूर्वी मराठी पुस्तके वाचली त्यातील भाषेची गोडी जास्त वाटते कारण ती भाषा आजकालच्या मानाने फारच शुद्ध मराठी होती असे वाटते.

(इथे आणखी काहीतरी बरेच रटाळ लिहीले होते, पण त्यावरील प्रतिसाद वाचून, त्याला उत्तर म्हणून ते खालीलप्रमाणे बदलले आहे. -

नाही.
पण, डोक्यात विचार आले, म्हणून लिहून टाकले झाले.
हे असले काही काही मायबोलीवर, मराठीवर लिहीलेले वाचले की विचारधारा सुरू होते. म्हणून लिहून टाकले. तर आता संपादित करून ते "पुसून" टाकतो. इथे कुठे विनोदाचा बीबी असल्यास सांगा म्हणजे मन विचार करायचे थांबेल.

सई, सहमत. मलाही लहान मुलांच्या तोंडून थँक्यू आणि सॉरी ऐकवत नाही. एकतर त्यांना त्याचा अर्थ कळत नाही, दिलेली वस्तू उघडून पाहायची त्यांना घाई असते, तर आईबाबा आधी थँक्यू म्हण चा घोषा लावतात. थँक्यू सॉरी हे मनापासून आले पाहिजे आणि पालकांच्या वागण्यात जर ते असेल तर मुलेही आपोआप शिकतात.

Pages