माध्यमांमधील मराठी

Submitted by बे-डर on 23 June, 2016 - 16:06

मराठीविषयी सातत्यानं चर्चा सुरू असते. वृत्तपत्रं, दूरचित्रवाणी यांची भाषा, त्या माध्यमांमधील जाहिरातींचे (चुकीचे) अनुवाद, खरं तर भाषांतर; चुकीची वाक्यरचना, इंग्रजी धाटणीची वाक्यरचना, अतिरिक्त विशेषणांचा वापर, चुकीच्या शब्दांचा सर्रास वापर, इंग्रजी किंवा मराठी शब्दांची अयोग्य संक्षिप्त रूपं (त्यांची चुकीची पूर्ण रूप), परभाषांतील नावांच्या चुका... अशा अनेक गोष्टी आढळतात. त्याबद्दल संताप, हताशपणा, वैफल्य अशा भावना व्यक्त केल्या जातात. काही जण दुर्लक्ष करतात, तर काही जण हसून साजरं करतात.

मी 28 वर्षं मराठी पत्रकारितेत आहे. शास्त्रीय दृष्टिकोणातून मी मराठीचा अभ्यास केला नाही; पण वाचत, निरीक्षण करीत, काही वेळा शोधत राहिलो. अलीकडं मराठीच्या वापराविषयी मोठ्या प्रमाणात बेफिकीरी जाणवते. अनेकांना शब्दांविषयी प्रेम, आस्था नसते, असं जाणवतं. ‘चूक-बरोबर जाऊ द्या. समजल्याशी कारण!’, असाच खूप जणांचा सूर असतो. त्याच वेळी याबाबत आस्था असणारीही बरीच मंडळी भेटली, काहींचं वाचता आलं. त्यात पत्रकार, लेखक, वाचक, प्राध्यापक... असे सगळ्याच क्षेत्रांतील आहेत.

अनेकदा मराठी वृत्तपत्रांतल्या चुका दाखविल्या जातात. पण बरोबर काय हेच सांगितलं जात नाही. या धाग्यावर चुका दाखवून बरोबर/योग्य काय आहे, हे सांगावं, असं मी सुचवू इच्छितो. त्यानं काही अंशी तरी परिणाम साधला जाईल. कारण इंग्रजी ‘डिक्शनरी’ पाहायची सवय असली, तरी मराठी शब्दकोश चाळताना फार कुणी दिसत नाही. जिल्हा वृत्तपत्रांमधून किंवा मोठ्या वृत्तपत्रांच्या जिल्हा आवृत्त्यांमधून इंग्रजी वृत्तपत्रं, मराठी वा इंग्रजी शब्दकोश पाहायला मिळत नाहीत. असं दिशादर्शक काही नसल्यामुळं अशुद्ध शब्दच वारंवार वापरण्याची सवय होऊन तेच शुद्ध असं मनात बसतं.

त्याची काही उदाहरणं...
1) एका अनुदिनीवरील (ब्लॉग) लेखावर काही प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यात एका वाचकानं लेखकाचं कौतुक करताना ‘तुम्हाला चरणस्पर्श’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. इथं वाचकाला जो आदर व्यक्त करायचा आहे, त्याच्या अगदी उलट त्याच्या शब्दांमुळे घडलं आहे. त्याचा अर्थ ‘तुम्हाला लाथ मारतो/मारते’ असा होत नाही का?

2) एका तरुण पत्रकाराने काल ‘वाणवा’ की ‘वानवा’ अशी शंका विचारली. त्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना वेगवेगळ्या शब्दकोशांमध्ये ‘वानवा’ म्हणजे शंका, संदिग्धता असा अर्थ असल्याचं दिसलं. मी तरी आजवर हा शब्द उणीव, कमतरता याच अर्थानं वापरत आलो आहे.

अरुण फडके यांच्या ‘मराठी लेखन-कोश’मध्ये दिलेली माहिती अशी - वानवा (पु) - सामान्यरूप - वानव्या- आणि वानवा (स्त्री) - सामान्यरूप - वानवे-

हे वाचल्यावर प्रश्न पडला की, हा शब्द पुल्लिंगी कोणत्या अर्थाने वापरतात?

3) योजना राबविणे, योजनेअंतर्गत असे शब्द वृत्तपत्रांत नेहमीच दिसतात. यातील ‘योजनेअंतर्गत’चं एक तर ‘योजनेंतर्गत’ असं लिहिलं पाहिजे. मी ते साधं ‘योजनेत’ किंवा ‘योजनेमध्ये’ असं वापरतो. ‘यांनी प्रतिपादन केले’ या वाक्याचाही नेहमीच वापर होतो. यातील ‘प्रतिपादन’ चुकीच्या अर्थाने वापरलं जातं, असं वाटतं. ‘राबविणे’ यालाही चांगला पर्याय शोधण्याची खरोखर गरज आहे.

4) हल्ली ‘कर्जे स्वस्त’ किंवा ‘कर्जे महाग’ अशी शीर्षकं नेहमी दिसतात. ‘कर्ज’ शब्दाचं अनेकवचन ‘कर्जे’ असं होत का? कृपया जाणकारांनी माहिती द्यावी, ही विनंती.

5) आता लवकरच ऑलिम्पिक आहे. त्यातील अनेक विदेशी खेळाडूंच्या नावाचे मराठी उच्चारण-लेखन आणि इंग्रजी स्पेलिंग यात खूप फरक असतो. नुकत्याच झालेल्या ‘इंडियन प्रीमियर लीग’मध्ये हैदराबादकडून खेळणाऱ्या ऑनरिकस याचा उच्चार दूरचित्रवाणीवरील हिंदी समीक्षक ‘हेन्रीकस’ करीत होते. काही मराठी वृत्तपत्रांमध्ये ते ‘हेनरीकेज’ किंवा ‘हेन्रीक्स’ असं येत होतं. ते सामने थेट दाखविणाऱ्या वाहिनीवर मात्र देवनागरी लिपीत सातत्यानं त्याचा उल्लेख ‘ऑनरीकेज’ असाच दाखवित होते. दूरचित्रवाणीच्या क्रीडा वाहिन्या सातत्यानं पाहणाऱ्या एका मित्रानं ते नाव ‘ऑनरिकस’ असंच बरोबर असल्याचं कळविलं.

6) ‘शकणे’ याचा मोठा शाप मराठी वृत्तपत्रसृष्टीला लागला आहे. ‘याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही’, ‘त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही’ किंवा ‘नेमके कारण समजू शकले नाही’ ही वाक्यरचना चुकीची आहे. त्या ऐवजी ‘माहिती मिळाली नाही’, ‘त्यांच्याशी संपर्क झाला नाही किंवा साधता आला नाही’ आणि ‘नेमके कारण समजले नाही’ ही वाक्यं अधिक योग्य आहेत.

7) विविध प्रकारे (विविध आणि प्रकार हे समानार्थीच शब्द आहेत), दबाव, पाणी फेरले, इतिहास रचला हे नेहमीचे चुकीचे शब्द अगदी रूढ झाले आहेत. या वेळी, त्या वेळी, काही तरी, जरा तरी असे दोन वेगवेगळे शब्द सगळीकडे एकत्र करून लिहिले जातात. ‘1995मध्ये’ या ऐवजी ‘1995 मध्ये’ असं वेगवेगळं लिहिलं जातं. मराठी साहित्य संमेलन किंवा नाट्य संमेलन यांच्या बोधचिन्हांमध्येही असंच लिहिलं जातं - 79 वे साहित्य संमेलन. एक तर ते अक्षरी ‘एकोणऐंशीवे’ असं लिहावं किंवा आकड्याला पुढचे ‘वे’ जोडूनच घेतले पाहिजे.

अशा असंख्य बाबी आहेत. येणाऱ्या शंका, दिसणाऱ्या चुका इथे मांडणार आहे. आपणही त्यात सहभागी व्हावे, ही विनंती. पण केवळ चुका दाखवायच्या नाहीत, तर बरोबर काय आहे, हे सांगायचे आहे. त्यासाठी ‘मायबोली’कर मंडळींनी मदत करावी, अशी विनंती. ही माहिती ठरावीक काळाने काही मराठी पत्रकार, वाचक यांना इ-मेलने पाठविण्याचा विचार आहे. म्हणजे त्यांच्या मनात शंका असतील, तर उत्तरे मिळतील, आपणहून मिळत असलेल्या माहितीमुळेही काही जण मराठीच्या बिनचूक वापराकडे वळतील, किमान तशी काळजी घ्यावी, असं तरी त्यांना वाटेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून मला सतत खटकते ती वाक्यरचना जसे १. आपण करुयात नको.. २. आपण जाउयात नको..३. आपण नको जाउयात... हा काय प्रकार..कर्ता , कर्म आणि क्रियापद ही आपली मराठीची वाक्यरचना..मग हे सोपे ,साधे सोडून असे का?

भाषांतरकाराला किती पैसे मिळतात ते पाहिलं तर याच आणि असल्याच दर्जाचे काम मिळत राहील याबद्दल निश्चिंत रहा. त्यातही भाषांतरकाराला पैसे देण्याऐवजी मशिन ट्रान्स्लेट फुकटात करून मिळालं तर कुणाला नकोय? मग "बॉटम लाईन इज स्टेफ्री" याचे भाषांतर "तळ ओळ आहे स्वतंत्र रहा" हे वाचायला तयार रहाच. भाषांतरकाराला पैसे कमी मिळतात कारण त्या-त्या भाषेच्या ग्राहकपेठेला अनुसरून बजेट इतकंच असं काहीतरी ठरवलेलं असतं म्हणे!!! शिवाय मी जितक्या पैशांत काम करते त्याहून निम्म्या पैशांमध्ये काम करायला कुणीनाकुणीतरी कायम तयार अस्तंच परिणामी दर्जा हवाच असा क्लायंटचा आग्रह नसला तरी उत्तम!

बरेच हिंदी भाषांतरकार कमी पैशांतच "मराठीदेखील" करून देतात. वास्तविक त्यांची मराठी ही केवळ "स्पोकन मराठी" म्हणायच्या दर्जाची असते पण ज्या लोकांना या दोन्ही भाषांचा गंध नसतो त्यांना चाल्तंय.
चुका आढळल्या तर मी शक्यतो त्या ब्रँडच्या सोशल मीडीयावर किमान पोस्ट टाकते. मध्यंतरी एका ज्वेलरी शोरूमच्या जाहिरातीत अक्षम्य चुका होत्या, त्यांच्या फेसबूक पेजावर कळवलं तर त्यांनी दिलगिरीचा मेसेज केला आणि परत अशा चुका होणार नाही याची काळजी घेऊ असं सांगितलं. आजवर इतर कुठल्याही ब्रँडने इतकीदेखील तसदी घेतलेली नाही!

असो! फार लिहित नाही!!

अन्तर्नाद या मासिकाने एक 'व्याकरण सल्लागार' व्यक्ती नेमलेली आहे. त्यामुळे त्यात खरोखर शुद्ध मराठी वाचायला मिळते. याचे अनुकरण व्हावे.

घेऊयात, करूयात, इ. बद्दल अनुमोदन. हे विचित्र वाटते. (चुकीचेही आहे ना?)

बे-डर, आपण कोणते पुस्तक लिहिले आहे, हे जाणून घ्यायला आवडेल.

चांगली मराठी असा आग्रह धरणारे जास्त उरले नाहीत, असे समजायचे का ? अनेकांना ते चालते, किंवा खटकत नाही..

इतर भाषेचे म्हणून पोर्तुगीज भाषेचे एक उदाहरण देतो. पोर्तुगाल मधे बोलतात ती आणि ब्राझिल मधे बोलतात ती भाषा पोर्तुगीजच असली, तरी ती एकमेकांना समजत नाही, एवढी वेगळी झालीय.

इथे अंगोलात तर त्यावर चिनी संस्कारही झालेत... पण हि भाषा यांची मूळ भाषा नसल्याने, व्याकरणदृष्ट्या योग्य बोलण्याचा कुणी आग्रहच धरत नाही. ( आम्ही जे बोलतो ते समजून घेतात. )

हिरो डुएट scooter च्या जाहिरातीमध्ये ती लग्न होणारी मुलगी चावी हातात देताना वडलांना सांगते "...जेव्हा पण माझी आठवण येईल..."

"जब भी मेरी याद आयेगी" चं शब्दशः भाषांतर Uhoh

Happy

"इथे मुंबई मरत आहे खोली दाखवा" (*) हे भाषांतर पूर्वी एक विनोद म्हणून वाचले होते. सध्या खरेच असे केलेले दिसले तरी आश्चर्य वाटणार नाही Happy
(*) Here is (the) Bombay Dyeing showroom चे

सध्या खरेच असे केलेले दिसले तरी आश्चर्य वाटणार नाही >> मला वाटतही नाही, प्रोफेशनल एथिक्समुळे इथे उदाहरणे देऊ शकत नाही इतकंच. अन्यथा असे अनेक "विनोद" वाचून मला वेड लागायची पाळी येते. हे विनोद निस्तरावेही लागतात. ते का निस्तरलेत याचं भलंमोठं स्पष्टीकरणही द्यावं लागतं. भाषांतर नको पण प्रूफरीडींग आवर म्हणायची पाळी येते. असो!!! चालायचंच!!

आजच्या सकाळमध्ये एका बातमीत 'धुवाधार पाऊस' असे लिहिले होते. हिंदीमध्ये 'धुआँधार' म्हणतात, तर मराठीत 'मुसळधार' म्हणतात. 'धुवाधार' काय आहे? धारेला धुवा? त्यांनी साहजिकपणे माझी प्रतिक्रिया न छापता दुर्लक्ष केले.

आपण भवतालाची, पर्यावरणाची, शिक्षणाची, वन्यप्राण्यांची...समस्त जगाची काळजी घेत आहोत, असे दाखविणाऱ्या बातम्या, वृत्तलेख दैनिकांमध्ये प्रसिद्ध होत असतात. त्यात मागणी, आवाहन, आव्हान, काळजी, आपुलकी इत्यादी इत्यादी भावना व्यक्त करताना अलीकडच्या काही वर्षांमध्ये हटकून वापरले जाणारे आणि हमखास खटकणारे शब्द -

वनप्रेमी
प्राणिप्रेमी
पक्षिप्रेमी
श्वानप्रेमी
गोवंशप्रेमी
पर्यावरणप्रेमी
शिक्षणप्रेमी
क्रीडाप्रेमी
संगीतप्रेमी
नाट्यप्रेमी
साहित्यप्रेमी
.
.
.
एखाद्या शहरातील/गावातील पालिकेचे-महापालिकेचे उद्यान वेळेआधीच बंद होत असेल, तर त्याची तक्रार करणारी एखादी बातमी प्रसिद्ध होईल. त्यात कोणी कदाचित असेही लिहिण्याची भीती वाटते, `उद्यान लवकर बंद केल्याने पर्यावरण व निसर्गप्रेमी नागरिकांची कुचंबणा होत आहे. उद्यान नेहमीप्रमाणेच रात्री नऊ वाजेपर्यंत उघडे ठेवण्याची मागणी `प्रेमप्रेमी` नागरिकांनी केली आहे!`

... आणि मायमराठीला `समृद्ध` करणारा हा एक शब्द अजून कसा कोणाच्या डोक्यातून प्रसवला गेला नाही, याचे आश्चर्यही वाटते.
प्रदूषणविरोधीप्रेमी (!)

बेडर,
क्रीडाप्रेमी, नाट्यप्रेमी, साहित्यप्रेमी ह्या आणि इतर शब्दांत नक्की काय खटकतंय?
नाटकावर प्रेम/ काळजी करणारा तो नाट्यप्रेमी. कोणीही नवीन शब्द तयार केला की मायमराठीला `समृद्ध`करणारा शब्द अशी हेटाळणी करण्याचे कारण कळले नाही.

बेडर, मलाही तुम्हाला नक्की काय खटकतंय ते कळले नाही.

शिवाय सध्या 'लोकार्पण' हा शब्द अनेक ठिकाणी वाचतो. हा शब्द बरोबर आहे का? त्याचा उगम कसा झाला?

(मला संस्कृत-सदृश संधी केलेला हा शब्द पाहिला की 'लोक' म्हणजे भूलोक, भुवर्लोक वगैरे असल्यासारखे वाटते).

हा धागा पहिल्या दिवसापासून वाचत आहे. सर्वांचेच प्रतिसाद आवडत आहेत. काही उदाहरणे अजून येथे आली नाहीत असेही वाटत आहे.

आणखी एक विचार असाही मनात आला की ह्यापुढे असे होणारच बहुधा! प्रमाण भाषेचे महत्व कमी होत जाणार. संस्कृती आणि विविधभाषिक एकमेकांत मिसळत जाणार. त्यामुळे आपण किती आग्रही असावे ह्याचाही विचार करायला लागेल बहुधा. चिडचिड होणार हे अर्थातच मान्य.

आधी मराठीमध्ये 'मी तुला पाहिलेले, तू मला दिसलेला' हेच कुठून आले ह्याचाही विचार व्हावा. नागपूराहून 'पाऊस येऊन राह्यलाच का' वगैरे येणे समजू शकतो. (समजू शकतो म्हणजे असे होऊ शकते इतके मान्य आहे, व्हावे असे नव्हे). असेच सर्वत्र होते, होणार हेही मान्य आहे. पण प्रमाण भाषा म्हणून माध्यमांनी सुपर काळजी घ्यावी. आता ही काळजीसुद्धा घ्यावी की तिचीही गरज नाही असा विचार करण्याची अवस्था आणण्यात आलेली आहे.

लहान मुले शाळेत काय वाट्टेल ती भाषा नकळतपणे शिकत आहेत हे माझ्या मुलीच्या बोलण्यावरून गेले अनेक महिने लक्षात येत आहे. त्यामुळे, घरातच प्रमाण भाषा शिकवली जावी असे वाटू लागले आहे.

अमितव, शंतनू, सायो, बेफिकीर...

साहित्यप्रेमी, नाट्यप्रेमी, संगीतप्रेमी...हे शब्द त्या अर्थाने खटकणारे नाहीत, हे आपले म्हणणे योग्य आहे. पण ते सरसकट आणि फार सैलपणे वापरले जातात. मला त्या धर्तीवर तयार केल्या जाणाऱ्या इतर शब्दांकडे लक्ष वेधायचे होते. (मी हे शब्द त्या यादीत टाकून चूक केली, हे मान्य.) `शिक्षणप्रेमी नागरिकांकडून`, `पर्यावरणप्रेमी जनतेकडून` असे शब्दप्रयोग केले जातात, तेव्हा त्यातला पोकळपणा जाणवतो.

प्राणिप्रेमी की प्राणीप्रेमी आणि पक्षिप्रेमी की पक्षीप्रेमी? सरावाने ऱ्हस्व वापरले; दीर्घ नाही. अरुण फडके यांच्या कोशात काही दिसले नाही त्याबद्दल. शोध घ्यावा लागेल.

प्रमाणभाषेचे महत्त्व कमी होत जाणार, हा मुद्दा एकदम रास्त. पण त्याबद्दल काही प्रमाणात आग्रही राहिलेच पाहिजे. ज्यांना पटते, त्यांच्यापर्यंत आपण आपल्या परीने पोहोचलेच पाहिजे. माध्यमे यात कमी पडत आहेत.

लोकार्पण हिंदी शब्द आहे. त्याला मध्यंतरी एक योग्य मराठी शब्द सापडला होता. त्यात काही वेळा उद्घाटन अभिप्रेत आहे, तर काही वेळा ती सेवा, तो उपक्रम जनतेच्या वापरासाठी खुला करणे अभिप्रेत आहे.

मुले अभ्यास करायला मागत नाहीत
<<
Children do not want to study.

-.-.-

ते आता राहिले नाहीत.
<<
वें अब नही रहें.

एकदा माझा ’अनुभव’मधला एक लेख वाचून एका प्रसिद्ध लेखकाने मला फोन केला होता. त्यांनी लेख आवडल्याचं सांगितलं, पण अगदी साधेपणाने माझी एक चूकही दाखवून दिली. ती होती ’अजून’ आणि ’आणखी’ या शब्दांच्या वापराबद्दलची.

’अजून’ - हा कालदर्शक शब्द आहे. (तो अजून आला नाही. बस यायला अजून वेळ आहे. मुलं अजूनही खेळत आहेत.)

’आणखी’ - हा संख्यादर्शक शब्द आहे. (quantity या अर्थी). (आणखी एक पोळी वाढू का? आणखी दोघाजणांची मदत लागेल. मला आणखी शंभर रुपये दे.)

पण आपण सर्रास 'आणखी'च्या जागी 'अजून' वापरतो. माझ्या त्या लेखात ३ ठिकाणी असा वापर झाला होता. तो त्यांनी दाखवून दिला.
तेव्हापासून मी या दोन शब्दांचा काटेकोरपणे वापर करते. Proud

अजून आणि आणखी.. खरेच काळजी घ्यायला हवी..

सहज एक शंका आली, जी गोष्ट / वस्तू मोजता येत नाही त्याबाबतीतही आणखी वापरावे का ?

चहा हवाय आणखी ?
मार हवाय आणखी ? हे बरोबर आहे ना ?

छान धागा...आजकाल मराठी वाहिन्यांच्या बक्षीस समारंभामध्ये कुणास 'जीवन गौरव' देताना 'त्या' ठराविक व्यक्तिला "आपण अमुक केले आहे" , "आपण योगदान दिले आहे" असे मला फार खटकते... हिंदी मधुन 'आप' म्हणतात 'तुम्ही' ला, म्ह्णून मराठीत 'आपण' !!!

अजुन थोडी भाजी घे वगैरे सतत वापरत आलो. पण कधी वेगळे जाणवले नाही. किंवा कदाचित अशा वाक्यात काळ पण दर्शवला जातो (अजुनही ती व्यक्ती जेवत आहे) व संख्या पण, म्हणुन असेल चालत असेल का?

बेडर, ===प्रेमी चे समजले पण त्याला दुसरा शब्द काय?

आपण बद्दल... बरोबर. Happy ... विनोदी वाटते ऐकायला.

"अजुन थोडी भाजी घे वगैरे सतत वापरत आलो. पण कधी वेगळे जाणवले नाही." - ही चर्चा माध्यमात वापरत असलेल्या प्रमाण भाषेविषयी आहे. बोली भाषेत व्याकरणाचे नियम वाकवले जाणं स्वाभाविक आहे. किंबहूना सरावातून आलेली सहजता आणी त्यातून बोली भाषेत झालेले संकर / व्याकरणविषयक प्रमाद हे त्या बोली भाषेची गोडी वाढवतात. माहिती-प्रसारण क्षेत्रातल्या माध्यमातून प्रमाण भाषा वापरली जावी हा ह्या चर्चेचा मुद्दा आहे.

आजच दै. सकाळ मधे 'गब्बर सिंग नावाची व्यक्ती खांबाला उलटी 'लटकला' असं वाचलं. हा बहुदा मुद्रणदोष असेल, पण तरिही खटकल्याशिवाय राहिलं नाही.

उषा | "आपण योगदान दिले आहे" फार खटकते... हिंदी मधुन 'आप' म्हणतात 'तुम्ही' ला म्ह्णून मराठीत 'आपण' !!!

>>>>>

हे काही तेवढ पटल नाही... "आपण" हे योग्या वाटल मला तर..

द्वितिय पुरुष "तू" - you
"तुम्ही" - हे formal
"आपण" - हे खुपच formal

अस आहे बहुतेक...

"आपण" हे प्रथम पुरुष वाचक म्हणुन पण वापरला जात उ.दा...

"आम्ही हे केले.. " (We did it, excluding "you")
"आपण हे काम करु.. ( इथे आपण हे समवेषक अर्थाने आहे.. We will do it - "including you" )

हिन्दी मधे अ ही व्यक्ती ब बद्दल क शी बोलताना "ब" चा उल्लेख "आप" असा करते आदरार्थी (अनेकदा समारंभात प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देताना) त्याबद्दल ते म्हंटले आहे बहुधा. मराठी त्या दृष्टीने "आपण" वापरायची पद्धत नाही.

बेडर, सैलसर आणि सढळ पणे एखाद्याचं कौतुक किंवा टीका करणे आणि शब्द गुळगुळीत करून टाकणे ही आपली पद्धतच आहे. त्या सैलवापराबद्दल तुम्हाला म्हणायचं आहे हे तुमच्या दुसऱ्या पोस्टमधून समजलं. आधी शब्दच चूक आहे असं वाटलं होतं, आणि पटत न्हवत.
ललिता-प्रीति, आणखी आणि अजून इंटरेस्टिंग. खाण्याच्या पदार्थाच्या बाबतीत 'अजून' खूप वापरतो असं वाटून गेलं. धन्यवाद. Happy

ललिता-प्रीति - `आणखी` आणि `अजून` याबाबत आमच्या एका नातेवाईक बाईंनी आठवी-नववीत असतानाच अडवलं. `ते आणखी आले नाहीत,` `आणखी वेळ आहे`... असं मी बोलत असे. त्यावर त्यांनी `अजून`ला `आणखी` कसं काय म्हणतोस, असं विचारलं. त्या काही फार शिकलेल्या वगैरे नव्हत्या. पण तेव्हापासून ते डोक्यात, बोलण्यात आणि लिहिण्यातही कायमचं बसलं.

दिनेश - चहा ना, आणखी दिला तरी चालेल!
चुकांबद्दल तुम्ही अजूनही मारता का?
नको हो नको, आणखी मार!

बहुधा की बहुदा? एकदा, अनेकदा, कैकदा या चालीवर बहुदा योग्य वाटतं. एक जुनी गोष्ट आठवते. `प्रेस्टिज`च्या सर्जेराव घोरपडे यांनी `एकादा` असा शब्द वापरला होता. तो `एखादा` आहे, असं ठामपणे सांगितल्यावर त्यांनी मोठ्या मनानं दुरुस्ती केली. वाचन, लेखन, अनुभव या साऱ्याच बाबतींत ते किती तरी मोठे होते. नंतर वाटू लागलं त्यांनी वापरलेला `एकादा` शब्दच कदाचित योग्य असावा. ते कोडं अजून सुटलेलं नाही.

अमितव व सुनिधी - कोणत्याही शब्दाला `प्रेमी` जोडून कृत्रिम शब्द तयार करणे अयोग्य वाटते. वाचताना तो खडा दाताखाली येतोच.

उषा - `योगदान` असेल तर ते एक वेळ चालेल. पण `योगदान दिले` मराठी वाटत नाही. त्या ऐवजी वाटा उचलला, भाग घेतला, सहभागी झाला असे काही अधिक बरे वाटेल. `आपण` मात्र morpankhis यांनी म्हटल्याप्रमाणं काहीसे आदरवाचक, अधिक औपचारिक संबोधन आहे. प्रत्येक वेळी ते सर्वसमावेशक असेलच असे नाही.
फारएण्ड यांनी हिंदीचा दाखला दिल्यामुळं शालेय पाठ्यपुस्तकं आठवली. धड्याच्या शीर्षकाखाली लेखक/लेखिका यांचा चार ओळीत परिचय असे. त्यात त्यांना `आप` अशाच आदरानं संबोधलेलं असे.

फेरफटका - वाचायला चांगलं वाटतं म्हणून ऐंशीच्या दशकानंतर नियतकालिकांमध्ये सर्रास बोली भाषेत लेखन येऊ लागलं. त्याचं अनुकरण वृत्तपत्रांनीही केले. बहुतेक `एकच षट्कार`, `चंदेरी` या पाक्षिकांनी त्याची सुरुवात केली आणि `महानगर` सायंदैनिकानं ते अजून रुळवलं. (नभोवाणी-दूरचित्रवाणी यांची भाषा बोलीच असणं स्वाभाविक आणि आवश्यक आहेही.) पण मग त्याचं फारच अनुकरण झालं. मुंबईतल्या एका सायंदैनिकाने बोलतो तसचं छापण्याचं ठरवलं होतं; म्हणून मग त्यांच्याकडे `गुरवार` असं लिहायचे. तिथे काम करणाऱ्या एका मित्राला तेव्हा विचारलं होतं, असंच लिहायचं तर मग तुम्ही `शन्वार` का लिहीत नाही?

इथेच मायबोलीवर भलेभले (ल्या) खालील शब्दप्रयोग वापरताना आढळलेत.

उदा.

१. त्यानं मग खिशातून काही वस्तू काढल्या जशा की दोरा, कागद इ, / मला गोड पदार्थ खायला आवडतात जसे की गुलाबजाम, शिरा वगैरे.

यात जशा / जसे की हा अत्यंत हास्यास्पद प्रयोग आहे. हिंदीतल्या जैसे की चं शब्दशः भाषांतर. किंवा इंग्रजीतलं लाईक. मराठीत उदाहरणार्थ हा शब्द वापरून ही वाक्य सहज लिहिता / बोलता येतील. पण नाही!

२. वाढदिवसाच्या खूप सार्‍या शुभेच्छा!!! आईग्गं. ढेर सारी शुभकामनाएं चं तंतोतंत मराठीकरण का रे बाबांनो?

खूप शुभेच्छा द्या. हार्दिक शुभेच्छा द्या, मनःपूर्वक शुभेच्छा द्या ना.

Pages