मराठीविषयी सातत्यानं चर्चा सुरू असते. वृत्तपत्रं, दूरचित्रवाणी यांची भाषा, त्या माध्यमांमधील जाहिरातींचे (चुकीचे) अनुवाद, खरं तर भाषांतर; चुकीची वाक्यरचना, इंग्रजी धाटणीची वाक्यरचना, अतिरिक्त विशेषणांचा वापर, चुकीच्या शब्दांचा सर्रास वापर, इंग्रजी किंवा मराठी शब्दांची अयोग्य संक्षिप्त रूपं (त्यांची चुकीची पूर्ण रूप), परभाषांतील नावांच्या चुका... अशा अनेक गोष्टी आढळतात. त्याबद्दल संताप, हताशपणा, वैफल्य अशा भावना व्यक्त केल्या जातात. काही जण दुर्लक्ष करतात, तर काही जण हसून साजरं करतात.
मी 28 वर्षं मराठी पत्रकारितेत आहे. शास्त्रीय दृष्टिकोणातून मी मराठीचा अभ्यास केला नाही; पण वाचत, निरीक्षण करीत, काही वेळा शोधत राहिलो. अलीकडं मराठीच्या वापराविषयी मोठ्या प्रमाणात बेफिकीरी जाणवते. अनेकांना शब्दांविषयी प्रेम, आस्था नसते, असं जाणवतं. ‘चूक-बरोबर जाऊ द्या. समजल्याशी कारण!’, असाच खूप जणांचा सूर असतो. त्याच वेळी याबाबत आस्था असणारीही बरीच मंडळी भेटली, काहींचं वाचता आलं. त्यात पत्रकार, लेखक, वाचक, प्राध्यापक... असे सगळ्याच क्षेत्रांतील आहेत.
अनेकदा मराठी वृत्तपत्रांतल्या चुका दाखविल्या जातात. पण बरोबर काय हेच सांगितलं जात नाही. या धाग्यावर चुका दाखवून बरोबर/योग्य काय आहे, हे सांगावं, असं मी सुचवू इच्छितो. त्यानं काही अंशी तरी परिणाम साधला जाईल. कारण इंग्रजी ‘डिक्शनरी’ पाहायची सवय असली, तरी मराठी शब्दकोश चाळताना फार कुणी दिसत नाही. जिल्हा वृत्तपत्रांमधून किंवा मोठ्या वृत्तपत्रांच्या जिल्हा आवृत्त्यांमधून इंग्रजी वृत्तपत्रं, मराठी वा इंग्रजी शब्दकोश पाहायला मिळत नाहीत. असं दिशादर्शक काही नसल्यामुळं अशुद्ध शब्दच वारंवार वापरण्याची सवय होऊन तेच शुद्ध असं मनात बसतं.
त्याची काही उदाहरणं...
1) एका अनुदिनीवरील (ब्लॉग) लेखावर काही प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यात एका वाचकानं लेखकाचं कौतुक करताना ‘तुम्हाला चरणस्पर्श’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. इथं वाचकाला जो आदर व्यक्त करायचा आहे, त्याच्या अगदी उलट त्याच्या शब्दांमुळे घडलं आहे. त्याचा अर्थ ‘तुम्हाला लाथ मारतो/मारते’ असा होत नाही का?
2) एका तरुण पत्रकाराने काल ‘वाणवा’ की ‘वानवा’ अशी शंका विचारली. त्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना वेगवेगळ्या शब्दकोशांमध्ये ‘वानवा’ म्हणजे शंका, संदिग्धता असा अर्थ असल्याचं दिसलं. मी तरी आजवर हा शब्द उणीव, कमतरता याच अर्थानं वापरत आलो आहे.
अरुण फडके यांच्या ‘मराठी लेखन-कोश’मध्ये दिलेली माहिती अशी - वानवा (पु) - सामान्यरूप - वानव्या- आणि वानवा (स्त्री) - सामान्यरूप - वानवे-
हे वाचल्यावर प्रश्न पडला की, हा शब्द पुल्लिंगी कोणत्या अर्थाने वापरतात?
3) योजना राबविणे, योजनेअंतर्गत असे शब्द वृत्तपत्रांत नेहमीच दिसतात. यातील ‘योजनेअंतर्गत’चं एक तर ‘योजनेंतर्गत’ असं लिहिलं पाहिजे. मी ते साधं ‘योजनेत’ किंवा ‘योजनेमध्ये’ असं वापरतो. ‘यांनी प्रतिपादन केले’ या वाक्याचाही नेहमीच वापर होतो. यातील ‘प्रतिपादन’ चुकीच्या अर्थाने वापरलं जातं, असं वाटतं. ‘राबविणे’ यालाही चांगला पर्याय शोधण्याची खरोखर गरज आहे.
4) हल्ली ‘कर्जे स्वस्त’ किंवा ‘कर्जे महाग’ अशी शीर्षकं नेहमी दिसतात. ‘कर्ज’ शब्दाचं अनेकवचन ‘कर्जे’ असं होत का? कृपया जाणकारांनी माहिती द्यावी, ही विनंती.
5) आता लवकरच ऑलिम्पिक आहे. त्यातील अनेक विदेशी खेळाडूंच्या नावाचे मराठी उच्चारण-लेखन आणि इंग्रजी स्पेलिंग यात खूप फरक असतो. नुकत्याच झालेल्या ‘इंडियन प्रीमियर लीग’मध्ये हैदराबादकडून खेळणाऱ्या ऑनरिकस याचा उच्चार दूरचित्रवाणीवरील हिंदी समीक्षक ‘हेन्रीकस’ करीत होते. काही मराठी वृत्तपत्रांमध्ये ते ‘हेनरीकेज’ किंवा ‘हेन्रीक्स’ असं येत होतं. ते सामने थेट दाखविणाऱ्या वाहिनीवर मात्र देवनागरी लिपीत सातत्यानं त्याचा उल्लेख ‘ऑनरीकेज’ असाच दाखवित होते. दूरचित्रवाणीच्या क्रीडा वाहिन्या सातत्यानं पाहणाऱ्या एका मित्रानं ते नाव ‘ऑनरिकस’ असंच बरोबर असल्याचं कळविलं.
6) ‘शकणे’ याचा मोठा शाप मराठी वृत्तपत्रसृष्टीला लागला आहे. ‘याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही’, ‘त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही’ किंवा ‘नेमके कारण समजू शकले नाही’ ही वाक्यरचना चुकीची आहे. त्या ऐवजी ‘माहिती मिळाली नाही’, ‘त्यांच्याशी संपर्क झाला नाही किंवा साधता आला नाही’ आणि ‘नेमके कारण समजले नाही’ ही वाक्यं अधिक योग्य आहेत.
7) विविध प्रकारे (विविध आणि प्रकार हे समानार्थीच शब्द आहेत), दबाव, पाणी फेरले, इतिहास रचला हे नेहमीचे चुकीचे शब्द अगदी रूढ झाले आहेत. या वेळी, त्या वेळी, काही तरी, जरा तरी असे दोन वेगवेगळे शब्द सगळीकडे एकत्र करून लिहिले जातात. ‘1995मध्ये’ या ऐवजी ‘1995 मध्ये’ असं वेगवेगळं लिहिलं जातं. मराठी साहित्य संमेलन किंवा नाट्य संमेलन यांच्या बोधचिन्हांमध्येही असंच लिहिलं जातं - 79 वे साहित्य संमेलन. एक तर ते अक्षरी ‘एकोणऐंशीवे’ असं लिहावं किंवा आकड्याला पुढचे ‘वे’ जोडूनच घेतले पाहिजे.
अशा असंख्य बाबी आहेत. येणाऱ्या शंका, दिसणाऱ्या चुका इथे मांडणार आहे. आपणही त्यात सहभागी व्हावे, ही विनंती. पण केवळ चुका दाखवायच्या नाहीत, तर बरोबर काय आहे, हे सांगायचे आहे. त्यासाठी ‘मायबोली’कर मंडळींनी मदत करावी, अशी विनंती. ही माहिती ठरावीक काळाने काही मराठी पत्रकार, वाचक यांना इ-मेलने पाठविण्याचा विचार आहे. म्हणजे त्यांच्या मनात शंका असतील, तर उत्तरे मिळतील, आपणहून मिळत असलेल्या माहितीमुळेही काही जण मराठीच्या बिनचूक वापराकडे वळतील, किमान तशी काळजी घ्यावी, असं तरी त्यांना वाटेल.
थॅन्क्यू आणि सॉरी, जेव्हा
थॅन्क्यू आणि सॉरी, जेव्हा लहान मूले म्हणतात ( किंवा त्यांना भाग पाडले जाते ) त्यात केवळ त्या शब्दाचा उच्चार असतो. पण ज्या वेळी त्याना मनापासून ते म्हणायचे असते तेव्हा आभारासाठी गोड हसू, गळ्यात हात घालणे, पापा घेणे आणि क्षमेसाठी खाली मान घालणे, डोळ्यात पाणी येणे असे आपसूक घडते... ते जास्त प्रामाणिक असते.
सर्व्ह करा हे पुर्वीच्या
सर्व्ह करा हे पुर्वीच्या मराठी पाककृती पुस्तकातून आलेय.. त्या काळात बायकांनी केवळ रांधायचे आणि वाढायचे हिच प्रथा होती. ओगले आज्जी काय किंवा बर्वे काकू काय, त्यांनी कधीही वाढून घ्या आणि खा.. असे लिहिले नसेल.
अजून काही खटकणार्या गोश्टी १.
अजून काही खटकणार्या गोश्टी
१. मला पुस्तक "भेटले" ; रिक्शा "भेटली" ..... हे सर्रास वापरले जाते. पुस्तक , रिक्शा या निर्जीव वस्तू "मिळतात" आणी सजीव माणसे "भेटतात"
२. तो मला बोलला ; ते बोल्ले .. हे सतत ऐकायला येते. त्याजागी तो "म्हणाला" ; ते "म्हणाले" असे आले पाहिजे
इन्ग्रजी भाशेतल्या फ्रेझेसचा वापरही खूप क्रुत्रीम वाटतो , उदा " मी उगाचच रिअॅक्ट झालो ". पण या साठी मराठीतला योग्य वाक्प्रचार आठवत नाही. कुणी सुचवेल का ?
तसेच "जेवण बनवले" हा थेट "खाना बनाया" चा शब्दा - नुवाद आहे, त्यासाठी मराठीत "स्वयम्पाक केला" असा अनुवाद केला पाहिजे.
आजकाल इन्ग्रजी माध्यमात शिकलेल्या मन्ड्ळीन्नी हा भाषेचा अपभ्रन्श चालवलेला आहे. त्यातच हिन्दी भाषिक लोकान्च्या सलगीतून फ्रेझेस बोलीभाषेत येत आहेत . त्या शब्दानुवाद करून वापरण्या ऐवजीवजी "अनुवादित" करून वापरल्या गेल्या पाहिजेत. मराठी भाषेची परिमाणे तयार करणारे तरी प्रमाण मराठी जाणणारे हवेत.
तरुण लोकांत तर भेटणे या
तरुण लोकांत तर भेटणे या क्रियापदाचा अतिरेक होतोय.. आणि त्यांना सांगूनही पटत नाहीच.
मी उगाचच रिअॅक्ट झालो ...
याच्या जागी.. मी उगाचच चिडलो, मी उगाचच मनाला लावून घेतले, मी उगाचच उलट बोललो.. असे किती तरी पर्याय आहेत.
विद्या बालनच्या स्वच्छ भारत
विद्या बालनच्या स्वच्छ भारत जाहिरातीच्या मराठी भाषांतरात 'और नहीं तो क्या' वगैरेचं स्वच्छ सुटसुटीत 'अजून नाहीतर काय काकू? तुम्ही लोकं तर समजत नाही, म्हणलं ह्या माशांनाच सांगावं' केलंय
मराठी पेपरातल्या छापील
मराठी पेपरातल्या छापील जाहिराती मी कधीकधी करमणूक म्हणून वाचते. कधी कधी तर हहपुवा लागते.
वस्तू भेटली हे तर तिडीक
वस्तू भेटली हे तर तिडीक जाणारं आहे.
दर्शक हे चूक, प्रेक्षक हे बरोबर. पण सर्रास "हमारे दर्शकोंको..." किंवा मराठीतही काही वेळा "आमचे दर्शक..." वगैरे चुकीचं चाललेलं असतं.
अजून काही..
काट्याची टक्कर- कांटे की टक्कर. (चुरशीची लढत किंवा संदर्भाने जो योग्य असेल तो शब्द मिळत नाही का?)
पाणी फेरले - पाणी फिरवलं(आम्ही तर चक्क 'अगदी बोळा फिरवलास!' असं म्हणतो खासगीत!)
करूयात/ बोलूयात/ आणूयात/ म्हणूयात.. यामधे शेवटी 'त' नकोय, पण मालिकांपासून सगळीकडे हेच आहे.
अजूनही खूप आहेत.
बोलूयात, करुयात मधला त मला
बोलूयात, करुयात मधला त मला अनेक वर्षे छळतोय. मी पहिल्यांदा अवचटांच्या लेखनात वाचले तसे, मग असे लक्षात आले कि पुण्याचे माझे मित्र सर्रास असे बोलतात.. मूळ मात्र माहित नाही.
पुर्वी रेडीओवर जे बातम्या
पुर्वी रेडीओवर जे बातम्या देत, त्यांचे मराठी अत्यंत सुंदर असे, हि परंपरा दूरदर्शनवर पण चालू राहिली.... त्यांचा आवाज आणि स्वर दोन्ही योग्य असायचे.
आता बातम्या देणारे इतके उत्तेजित का झालेले असतात ते कळत नाही. कुठलीही आणि कसलीही बातमी ते तशीच सांगतात. प्रचंड घाई असते त्यामूळे वाक्यरचनेकडे वगैरे लक्षच नसते.
मला वाटते, पुर्वी दूरदर्शनवरील बातम्या देणारे स्वतः भाषांतर करत असत. आणि मूळातच ते भाषातज्ञ असत.
दिनेशदा, अजुनही आकाशवाणी आणि
दिनेशदा, अजुनही आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर बातम्यांची भाषा चांगल्या प्रकारे टिकून आहे.
खूप जणी, मी साडी घातली', 'मी
खूप जणी, मी साडी घातली', 'मी आली-गेली' म्हणतात. नेसली, मी आले, गेले म्हणावे.
मी तो अनुभव शेयर केला, मला
मी तो अनुभव शेयर केला, मला रिलेट झाले, तो डिजर्विंग आहे.... हे पण यादीत घालता येईल.
पण आता ही वाक्येच इतकी अजब आहेत की मला ती मराठीतुन लिहिताच येत नाहियेत. मराठी कच्चे आहे बहुतेक
कोणीतरी लिहाल तर पहा.
मधल्या काही प्रतिक्रिया
मधल्या काही प्रतिक्रिया पाहिल्या तर या धाग्यावरची चर्चा भरकटली होती. उदाहरणार्थ लहान मुलांना सार्वजनिक जीवनातले उपचार शिकवावेत की नाही, इत्यादी...पण गाडी परत रुळावर आली आहे. यात प्रामुख्याने वृत्तपत्रे, नभोवाणी व दूरचित्रवाणी यावरील भाषिक चुका मांडून दुरुस्तीही सुचवावी. यांनी शुद्धलेखनाचा मुद्दा घेतला आहे. त्याबाबतही मायबोलीकरांनी अवश्य लिहावे, अशी विनंती.
धेडगुजरी असा शब्द काही जणांनी वापरला आहे. तो औपचारिक व सभ्य जगात मान्य नाही. अलीकडच्या काळात तो वापरणे गैर समजले जाते. जातीचा (तुच्छतापूर्वक) उल्लेख असलेले शब्द टाळावेत. त्यातून फार काही अनर्थ होत नाही; पण गैरसमज वाढीस लागतात. त्याचप्रमाणे ‘ब्राह्मणी’, ‘बहुजनांची’, ‘सदाशिव पेठी’ असा गोंधळही नको. आपण सारे प्रमाण भाषेविषयीच बोलतो आहे. त्याला ललित लेखन अर्थातच अपवाद आहे. ते कोणी कोणत्या भाषेत करावे आणि कोणाला ते आवडावे वा नावडावे, हा व्यक्तिगत प्रश्न आहे. फक्त ललित लेखनात भाषिक चुका असतील, तर त्या अवश्य मांडू आणि चर्चा करू.
आकाशवाणीच्या बातम्यांबद्दल...अलीकडच्या काही वर्षांत पुणे-मुंबई-दिल्लीच्या मराठी बातम्या ऐकताना एक गोष्ट लक्षात आली ती अशी - बहुतेक साऱ्या वाक्यांचा शेवट ‘आहे’ याच क्रियापदानं होतो. तो ऐकायला बरं वाटत नाही आणि योग्यही नसावं. ‘पंतप्रधान’ऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द वापरणं ही प्रसार भारतीची शैली-पुस्तिका असावी.
लिंबूटिंबू - मुद्रितशोधकांचा मुद्दा एकदम योग्य. ‘टाइम्स’ समूहानं याची सुरुवात केली. इंग्रजीमध्ये ‘प्रूफरीडिंग’ची विविध सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. पण मराठीत ती नाहीत. त्यामुळे इंग्रजी वृत्तपत्रांचे जाऊ द्या; मराठी वृत्तपत्रे-नियतकालिके-पुस्तके यासाठी अजूनही या जमातीची गरज आहेच.
महेश - पात्रता नसलेले (असे समजून चालू) या व्यवसायांमध्ये असले, तरी त्यांची इच्छा असल्यास पात्रता वाढविता येते. त्यासाठीच तर हा धागा आहे.
वावे - ‘टाकू’बाबत तुमचं म्हणणं काहीसं पटतंय. पण ते बोली भाषेतलं झालं. तसं तर आपण ‘चहा ठेवू’ असंही म्हणतोच की. पण लिहिताना काही तरी प्रमाणीकरण हवं.
सई - ‘मला नाही हे जमणार’ किंवा ‘मला नाही हे करणं शक्य’ असं म्हणता येतंच की. दिलगिरीचा सूर लावता येतोच, त्यासाठी तसे शब्दच हवेत असं नाही.
दक्षिणा - > आणि जनमानसात एक गोष्ट नक्की आहे की रेडिओ/टिव्ही/ईन्टरनेट वर जे असते ते सगळे बरोबर. मग ती वेळ असो, किंवा भाषा. < सहमत आहे. असे मत पूर्वी मुद्रित जे जे काही, ते ते बरोबर असे होते.
कुमार 1 - ‘फूल्झ कॅप’ची माहिती पूर्वीही वाचली होती. असेच परवा एकदा ‘प्री-पोन’विषयी वाचले. ‘पोस्ट-पोन’च्या विरुद्धार्थी म्हणून वरील शब्द वापरणे चुकीचे आहे, असे एका अभ्यासकाने सांगितले होते. ‘इनिंग्स’ (किंवा ‘इनिंग्ज’) शब्दाबद्दलही शंका आहे. आपल्याकडे अनेकवचनी म्हणून ‘इनिंग्स’ वापरतात. खरे तर एकवचनी शब्दही ‘इनिंग्स’ असाच आहे, असे वाचल्याचे आठवते. आपल्याला माहिती असेल, तर कृपया लिहावे.
दिनेश - आपण दिलेली उदाहरणे फारच छान. त्याचा उपयोग करून घेईन. मित्रांना इ-मेल पाठविताना त्यात ही सर्व क्रियापदे ‘टाकीन’!
morpankhis – विरोध इतर भाषांमधून आलेल्या शब्दांना नाही. त्यांचा अचूक वापर व्हावा आणि आपल्या भाषेत शब्द उपलब्ध असताना अन्य भाषेचे शब्द केवळ वेगळे म्हणून वापरायचे का? का वापरायचे?
हायझेनबर्ग - दक्षिणेतील भाषांनी तर रोमन अंक सरसकट वापरात आणले आहेत. आपल्याकडेही दैनिक लोकमत काही वर्षांपासून तेच करीत आहे.
नन्द्या 43 - तुमच्या वाचनात येणारी अलीकडची मराठी उदाहरणं टाकली तरी चालतील. त्यासाठी वेगळा विनोदी धागा उघडण्याची गरजच पडणार नाही!
पशुपत - ‘भेटणे’ आणि ‘मिळणे’ सर्रास वापरले जाते. आमचा एक कार्यालयीन सहकारी म्हणायचा - ‘आज नाही बातमी देणं जमणार ती. त्याची कागदपत्रं भेटली नाहीत.’ त्यावर एक-दोन वेळा मी त्याला विचारले होते, ‘कागदपत्रं नाही भेटली तर नाही भेटली. पण संबंधित माणूस तुला मिळला की नाही?’
‘तो मला बोलला’, ‘बोलला ना राव तो’ हे मुंबईत फार ऐकू येतं. हाक मारण्याला आता ‘आवाज दिला’, ‘आवाज टाकला’ म्हणतात.
भगवती - असेच काही शब्दप्रयोग. भांडे घासायची आहेत ना. प्रत्यक्षात मोरीमध्ये भांड्याचा ढिगारा पडलेला असतो. एक भांडे आणि अनेक भांडी, हे समजावून सांगावं लागतं. आमच्याकडे बाया ‘भाजीला आणलं’, ‘भाजीला आणायला चालले’ असं नेहमीच म्हणताना ऐकू येतं.
जिज्ञासा – तुमच्या उदाहरणांची वाट पाहत आहोत.
बे-डर, धेड गुजरी ला असभ्य का
बे-डर,
धेड गुजरी ला असभ्य का मानतात ते कळले नाही. तो अधेड गुजरी चा अपभ्रंश आहे ना ?
मी वाचले होते त्या प्रमाणे या दोन राज्यांच्या सीमेवरच्या बायका नऊवारी साडी नेसतात पण पदर उलटा घेतात, म्हणून त्यांच्यासाठी हा शब्द वापरतात. हा संदर्भ बरोबर नाही का ?
महेश, तसे असेल तर खरेच छान !
मराठीत प्रदीप भिडे, अनंत भावे, मानसिंग पवार , विनायक पटवर्धन या दूरदर्शन वरील निवेदकांचे मराठी फारच सुंदर असे.
सर्व्हे हा इंग्रजी आणि
सर्व्हे हा इंग्रजी आणि सर्वेक्षण हा मराठी शब्द एकत्र करून चक्क सर्व्हेक्षण असा शब्द काही ठिकाणी वाचला आहे.
दुसरं असं की पूर्वी क्रिकेटच्या बातम्यांमध्ये सामना, फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक, बळी, झेल, त्रिफळाचीत असे शब्द वापरले जायचे. आता मात्र हे शब्द जवळजवळ हद्दपार झाले आहेत. हे शब्द सोपे आहेत, तरीही का वापरले जात नाहीत?
१. "आजचा हा कार्यक्रम आपण
१. "आजचा हा कार्यक्रम आपण इथेच संपवीत आहोत. तर पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी आपल्या आवडत्या वाहिनीवर/कार्यक्रमात ज्याचे नाव आहे अबक."
असा शेवट अजूनही दूरदर्शन आणि आकाशवाणी वरच्या बऱ्याच साप्ताहिक कार्यक्रमांमध्ये ऐकू येतो. हे वाक्य मला खटकते. याच दिवशी याच वेळी हे बहुधा same day same time चे रुपांतर असावे जे चुकीचे आहे. पुढच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी कोणी जर कार्यक्रम पाहू लागले तर त्यांना त्या वेळी कार्यक्रमाच्या शेवटी असलेले हे वाक्यच ऐकायला मिळेल! शिवाय same day मध्ये आठवड्याचा वार अपेक्षित आहे. मराठीत दिवस म्हणजे वार नाही. तेव्हा याच दिवशी च्या ऐवजी याच वारी असे हवे. ह्या वाक्याऐवजी - "पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात बुधवारी रात्री साडे नऊ वाजता आपल्या आवडत्या वाहिनीवर/कार्यक्रमात ज्याचे नाव आहे अबक" अशी रचना हवी.
२. बऱ्याच वेळा विशेषण आणि क्रियाविशेषणाची जागा चुकलेली असते. त्यातून पुलंच्या अतिविशाल महिला मंडळ सारखी विनोदी किंवा अर्थहीन वाक्ये छापली जातात. (नेमके उदाहरण डोळ्यासमोर नाही म्हणून देत नाहीये).
३. मुद्रित माध्यमांची अजून एक प्रचंड खटकणारी गोष्ट म्हणजे स्वामित्वहक्काविषयी असलेली प्रचंड बेपर्वाई. कोणत्याही वृत्तपत्राची पुरवणी उघडली की त्याच्या मागच्या आणि पुढच्या पानांवर जाहिरात सदृश्य टाकावू मजकूर भरलेला असतो. उदा. उन्हाळ्यात शीतपेये टाळा किंवा पावसाळ्यात पायांची काळजी कशी घ्याल वगैरे वगैरे. ह्या मजकुरासोबत ज्या प्रतिमा असतात त्या कुठून मिळवलेल्या असतात? गुगल वरून उतरवून घेऊन छापून मोकळे होतात सगळे! त्या प्रताधिकारमुक्त आहेत की नाहीत ह्याची काहीही शहानिशा कोणी करत असेल असे वाटत नाही. इथे मला पाकिस्तानी वृत्तपत्र डॉन चे उदाहरण द्यावेसे वाटते. त्यांच्या आवृत्तीत जर कोणत्याही प्रतिमा वापरल्या असतील तर त्यांचा स्रोत आवर्जून जाहीर केला जातो. त्या प्रताधिकारमुक्त आहेत हेही छापलेले असते. ह्या बाबतीत आपण अत्यंत गचाळ माणसे आहोत.
४.
ही २७ डिसेंबर २०१५ रोजी लोकसत्ता मध्ये छापून आलेली आयकर विभागाची जाहिरात आहे. १ जानेवारी २०१६ च्या प्रभावापासून हे with effect from चं चुकीचं भाषांतर केल्याने आणि विद्यमान आणि सद्य ह्या दोन शब्दांच्या अर्थातला फरक न कळल्यामुळे कपाळावर हात मारून घेण्याच्या लायकीचा मजकूर छापून आला आहे.
५.
ही २८ डिसेंबर २०१४ रोजी लोकसत्ता मध्ये छापून आलेली केसरीची जाहिरात आहे. हे केसरी टूर आणि वीणाज वर्ल्ड वाले लोकं दिवसेंदिवस डोक्यात जायला लागले आहेत माझ्या! म्हणे माय मराठीचा अमृताहून गोड बोल! डोंबल! इंग्रजी शब्द खड्यासारखे प्रत्येक वाक्यात पेरलेले असतात! ह्यांच्या जाहिरातींचे जे कोणी copy writers असतील त्यांची इयत्ता पहिली ते चौथीसाठी एका मराठी शाळेची फी भरायला मी तयार आहे. इतकं वाईट मराठी मी कुठेही वाचलेलं नाही. धड मराठीतून लिहून जाहिरात करा नाहीतर सरळ छान इंग्रजीतून. उगीच फॉरवर्ड असल्याचा आव आणून आपला मराठी भाषेच्या ज्ञानाचं "बॅकवर्ड" पण सिद्ध करू नका!
६. आता थोडे विनोदी! ह्यात भाषेचा संबंध नाही. परंतू एका लेखाशेजारी दुसरा कोणता मजकूर येतो याचा फारसा विचार न करता केवळ जागेचा विचार करून मजकूर छापल्याने अशी गमतीशीर पाने तयार होतात! १४ फेब्रुवारी २०१५ च्या चतुरंगमध्ये डावीकडे संतसंग आणि उजवीकडे 50 shades of gray पाहून धन्य वाटले
हम लोगों को समझ सको तो समझो दिलबर जानी! जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी!
जिज्ञासा हुडकून हुडकून चपखल
जिज्ञासा
हुडकून हुडकून चपखल उदाहरणं
नेहमी दिसत असूनही लक्षातसुद्धा न आलेली.
आपणसुद्धा ह्या चुकांना किती सराईत झालोय ते जाणवलं!
केसरी आणि वीणा स्वतःच लिहून जे असेल तसंच छापतात बहुतेक. ते किंवा त्यांची जाहिरात कंपनी कॉपी रायटर्स बाळगत असतील असं वाटत नाही.
छान धागा. मला "व्यस्त आहे"
छान धागा.
मला "व्यस्त आहे" च्या सध्याच्या उपयोगाबद्दल असाच वैताग येतो. पूर्वी मग्न, गर्क वगैरे म्हणत. मराठीत व्यस्त हा फक्त एक संख्येचा प्रकार होता, सम व व्यस्त. आजकाल हिन्दीतून तेथील अर्थाने मराठीत आला आहे.
मला सहसा असे दिसले आहे की अर्धवट हिंदी-मराठी मिश्रण असलेले असे शब्द वापरणे हे 'कूल' समजले जाते. त्यामुळे असले प्रकार कायम दिसतात.
मला बोली मराठीत धन्यवाद्/आभार खटकत नाही, पण 'माफ करा' हे अजूनही कृत्रिम वाटते.
यातले बरेच शब्द/ शब्दप्रयोग
यातले बरेच शब्द/ शब्दप्रयोग हिंदीतून आलेले आहेत.
आणखी एक म्हणजे गृहशोभिका सारखी मासिके, भास्कर सारखी हिंदीतून मराठीत आलेली दैनिके किंवा वर उल्लेख केलेली दैनिक वर्तमानपत्रातील पानपूरके. एखाद्या भाषांतर्याला दोन पाने हिंदी मजकूर देऊन "ताबडतोब मराठी कर !" असे सांगितले तर हेच होणार.
( जाता जाता : गृहशोभिका मधील महिला मॉडेल्स इतक्या तुपकट का दिसतात? मेक अप करताना फाउंडेशन ऐवजी डालडा लावतात की काय ? )
सम आणि विषम असे आहे ना?
सम आणि विषम असे आहे ना?
हो बरोबर आहे ये.ब. -
हो बरोबर आहे ये.ब. - संख्यांच्या बाबतीत सम आणि विषम असते. गुणोत्तराचे प्रमाण सम व व्यस्त (as in inversely proportional) असे ते लिहायला हवे होते
जिज्ञासा - पहिला मुद्दा एकदम
जिज्ञासा - पहिला मुद्दा एकदम मान्य. विशेषणांचा तर अलीकडे काळात अतिरेक झाला आहे. निघण्याआधीच मोर्चा विराट असतो. एखाद-दुसरे पुस्तक नावावर असलेला ‘प्रसिद्ध साहित्यिक’ असतो. (अस्मादिकांचं एकच पुस्तक असूनही अजून कोणीही साहित्यिक असा उल्लेख करीत नाही, याचं वैषम्य वाटत राहतंच.) छोट्या छोट्या गोष्टींनी खळबळ माजते. (याचं एक उदाहरण – मध्यंतरी एका तालुक्याच्या गावी संध्याकाळच्या वेळी मोठी चोरी झाली. तेथील वार्ताहरला ते माहीत नव्हते. कळविल्यावर त्याने अर्ध्या-पाऊण तासात बातमी पाठविली. तिच्या पहिल्याच परिच्छेदात ‘या घटनेने परिसरात मोठी खळबळ माजली आहे,’ असे प्रतिक्षिप्त क्रियेसारखे वाक्य होतेच. म्हणजे त्या लेकाला घटना घडलेली माहीत नव्हती, पण परिसरात खळबळ उडाल्याचे लगेच समजले!)
स्वामित्व हक्काविषयी असलेली बेपर्वाई मान्य आहे. याबाबत पुण्याचे लेखक-छायाचित्रकार (नाव विसरलो. देवीदास बागूल असावेत बहुतेक.) यांनी दैनिक केसरीला मोठा धडा शिकविला होता. ते सारे प्रकरण मुद्रित माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांनी मुळापासून वाचावे. कोठे काय मांडावे, कोणत्या मजकुराशेजारी कोणता मजकूर शोभून दिसतो (किमान विसंगत वाटत नाही), याचे भानही मांडणीत करावे लागते. केवळ मेक-अप चांगला करून भागत नाही.
जाहिरातींचा अऩुवादाची जबाबदारी कोणाचीच नसावी असे दिसते. अनेकदा समोर दिसते ते चूक आहे, हे कळत असूनही काही करता येत नाही. गेल्या तीन दशकांमध्ये श्रद्धांजलीच्या (विशेषतः दहाव्याच्या) जाहिरातींमध्ये ‘दुःखांकित’ असा शब्द ‘स्नेहांकित’च्या चालीवर रूढ झाला आहे.
फारएण्ड - व्यस्तविषयी बऱ्याच
फारएण्ड - व्यस्तविषयी बऱ्याच वेळा सांगून झाले आहे. सारे काम `उरकण्यात’ ‘व्यस्त’ असतात.
आणखी दोन गोष्टी – अन्न सुरक्षितता अभियान – याला मराठीत ‘अन्न शाश्वती मोहीम किंवा योजना’ असे का म्हणू नये? प्रा. मनोहर राईलकर यांनी हा योग्य शब्दप्रयोग सुचविला आहे. ‘सर्व शिक्षा अभियान’ असेच मराठीत प्रसिद्ध होते. ‘सर्वांना शिक्षण मोहीम’ असे त्याचे करावे.
विजय कुलकर्णी – हिंदी
विजय कुलकर्णी – हिंदी वृत्तपत्रे-मासिके-नियतकालिके यांचे मराठी ‘संस्करण’ फारच ‘दिव्य’ असते! पण हे काम झटपट करण्यासाठी ‘भाषांतऱ्या’ तेवढा चांगला निवडावा लागतो. त्याला वेतनही बरे द्यावे लागते, हेच मान्य नाही.
आणखी एक नवा बोलीभाषेत आलेला
आणखी एक नवा बोलीभाषेत आलेला वाक्प्रचार
" मुले आभ्यास करायला मागत नाहीत"
" कुणीही व्यायाम करायला मागत नाही"
हे कोठून आले आहे कळत नाही.....
एक डोक्यात जाणारी अॅड. टीकली
एक डोक्यात जाणारी अॅड. टीकली लावून 'शहरासाठी तयार'!? > शहरासाठी पण नाही चक्क 'शहर तयार' . लोकसत्ता मधे ही अॅड पाहून मला हसायला ही आले आणि कीव सुद्धा आली.
विषय चांगला आणि सतत अस्वस्थ
विषय चांगला आणि सतत अस्वस्थ करणारा.. प्रमाण भाषेचा वापर व आग्रह निदान माध्यमामध्ये तरी असावा हीच माफक इच्छा.
मी स्वतः माध्यमात काम केल्यामुळे पदोपदी जाणवणारा हा भाग आहे. भाषेच्या विद्यार्थयांचाच नाही तर माध्यमातील लोकांचा कटाक्ष असावयास हवा. दुर्दैवाने तो नसतो या साठी मोठी जागृती आणि जाणत्या लोकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे
मला वाटते की १९८५ - ८६ नन्तर
मला वाटते की १९८५ - ८६ नन्तर आपली materialistic (मराठी शब्द सुचत नाही) खूप प्रगती झाली म्हणजे छपाई तन्त्रज्ञान , दूरदर्शन प्रक्शेपण तन्त्रज्ञान वगैरे...... पण माणसा ची व्यासन्ग करण्याची व्रुत्ती आणी कुणाकडून व्यासन्गाची अपेक्शा करणे या गोष्टी कालबाह्य झाल्या. उत्क्रुष्ठ्तेच्या परिमाणानाच आपण हद्दपार केले.
मी जे करतो तेच प्रमाण ; तेच सर्वोत्तम ही विचारधारा समाजात रूढ झाली.
खूप छान चर्चा. शिकायला
खूप छान चर्चा. शिकायला मिळतय.
मला खटकणारं - मी हे करेल. ती, तो, ते .. करेल. पण मी 'करेन'.
आणि हो.... ते 'करूयात, बोलूयात'... आता सर्रास वापरतात सगळेच. तो शेवटला 'त' कधी घुसला?
गेलेली, केलेलं असलं बोलल्यावर थांबवून 'गेले होते', 'केलं होतं' असं सुधारून घेतलं होतं वडिलधार्यांनी.
मुले अभ्यास करायला मागत नाहीत
मुले अभ्यास करायला मागत नाहीत हा प्रयोग नवीन? मी माझ्या आधीच्या पिढीच्या तोंडी ऐकलाय.
कट्यार चित्रपटात सदाशिवच्या तोंडी पंडितजींबद्दल एक वाक्य आहे. --- ते आता राहिले नाहीत.....
Pages