मराठीविषयी सातत्यानं चर्चा सुरू असते. वृत्तपत्रं, दूरचित्रवाणी यांची भाषा, त्या माध्यमांमधील जाहिरातींचे (चुकीचे) अनुवाद, खरं तर भाषांतर; चुकीची वाक्यरचना, इंग्रजी धाटणीची वाक्यरचना, अतिरिक्त विशेषणांचा वापर, चुकीच्या शब्दांचा सर्रास वापर, इंग्रजी किंवा मराठी शब्दांची अयोग्य संक्षिप्त रूपं (त्यांची चुकीची पूर्ण रूप), परभाषांतील नावांच्या चुका... अशा अनेक गोष्टी आढळतात. त्याबद्दल संताप, हताशपणा, वैफल्य अशा भावना व्यक्त केल्या जातात. काही जण दुर्लक्ष करतात, तर काही जण हसून साजरं करतात.
मी 28 वर्षं मराठी पत्रकारितेत आहे. शास्त्रीय दृष्टिकोणातून मी मराठीचा अभ्यास केला नाही; पण वाचत, निरीक्षण करीत, काही वेळा शोधत राहिलो. अलीकडं मराठीच्या वापराविषयी मोठ्या प्रमाणात बेफिकीरी जाणवते. अनेकांना शब्दांविषयी प्रेम, आस्था नसते, असं जाणवतं. ‘चूक-बरोबर जाऊ द्या. समजल्याशी कारण!’, असाच खूप जणांचा सूर असतो. त्याच वेळी याबाबत आस्था असणारीही बरीच मंडळी भेटली, काहींचं वाचता आलं. त्यात पत्रकार, लेखक, वाचक, प्राध्यापक... असे सगळ्याच क्षेत्रांतील आहेत.
अनेकदा मराठी वृत्तपत्रांतल्या चुका दाखविल्या जातात. पण बरोबर काय हेच सांगितलं जात नाही. या धाग्यावर चुका दाखवून बरोबर/योग्य काय आहे, हे सांगावं, असं मी सुचवू इच्छितो. त्यानं काही अंशी तरी परिणाम साधला जाईल. कारण इंग्रजी ‘डिक्शनरी’ पाहायची सवय असली, तरी मराठी शब्दकोश चाळताना फार कुणी दिसत नाही. जिल्हा वृत्तपत्रांमधून किंवा मोठ्या वृत्तपत्रांच्या जिल्हा आवृत्त्यांमधून इंग्रजी वृत्तपत्रं, मराठी वा इंग्रजी शब्दकोश पाहायला मिळत नाहीत. असं दिशादर्शक काही नसल्यामुळं अशुद्ध शब्दच वारंवार वापरण्याची सवय होऊन तेच शुद्ध असं मनात बसतं.
त्याची काही उदाहरणं...
1) एका अनुदिनीवरील (ब्लॉग) लेखावर काही प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यात एका वाचकानं लेखकाचं कौतुक करताना ‘तुम्हाला चरणस्पर्श’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. इथं वाचकाला जो आदर व्यक्त करायचा आहे, त्याच्या अगदी उलट त्याच्या शब्दांमुळे घडलं आहे. त्याचा अर्थ ‘तुम्हाला लाथ मारतो/मारते’ असा होत नाही का?
2) एका तरुण पत्रकाराने काल ‘वाणवा’ की ‘वानवा’ अशी शंका विचारली. त्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना वेगवेगळ्या शब्दकोशांमध्ये ‘वानवा’ म्हणजे शंका, संदिग्धता असा अर्थ असल्याचं दिसलं. मी तरी आजवर हा शब्द उणीव, कमतरता याच अर्थानं वापरत आलो आहे.
अरुण फडके यांच्या ‘मराठी लेखन-कोश’मध्ये दिलेली माहिती अशी - वानवा (पु) - सामान्यरूप - वानव्या- आणि वानवा (स्त्री) - सामान्यरूप - वानवे-
हे वाचल्यावर प्रश्न पडला की, हा शब्द पुल्लिंगी कोणत्या अर्थाने वापरतात?
3) योजना राबविणे, योजनेअंतर्गत असे शब्द वृत्तपत्रांत नेहमीच दिसतात. यातील ‘योजनेअंतर्गत’चं एक तर ‘योजनेंतर्गत’ असं लिहिलं पाहिजे. मी ते साधं ‘योजनेत’ किंवा ‘योजनेमध्ये’ असं वापरतो. ‘यांनी प्रतिपादन केले’ या वाक्याचाही नेहमीच वापर होतो. यातील ‘प्रतिपादन’ चुकीच्या अर्थाने वापरलं जातं, असं वाटतं. ‘राबविणे’ यालाही चांगला पर्याय शोधण्याची खरोखर गरज आहे.
4) हल्ली ‘कर्जे स्वस्त’ किंवा ‘कर्जे महाग’ अशी शीर्षकं नेहमी दिसतात. ‘कर्ज’ शब्दाचं अनेकवचन ‘कर्जे’ असं होत का? कृपया जाणकारांनी माहिती द्यावी, ही विनंती.
5) आता लवकरच ऑलिम्पिक आहे. त्यातील अनेक विदेशी खेळाडूंच्या नावाचे मराठी उच्चारण-लेखन आणि इंग्रजी स्पेलिंग यात खूप फरक असतो. नुकत्याच झालेल्या ‘इंडियन प्रीमियर लीग’मध्ये हैदराबादकडून खेळणाऱ्या ऑनरिकस याचा उच्चार दूरचित्रवाणीवरील हिंदी समीक्षक ‘हेन्रीकस’ करीत होते. काही मराठी वृत्तपत्रांमध्ये ते ‘हेनरीकेज’ किंवा ‘हेन्रीक्स’ असं येत होतं. ते सामने थेट दाखविणाऱ्या वाहिनीवर मात्र देवनागरी लिपीत सातत्यानं त्याचा उल्लेख ‘ऑनरीकेज’ असाच दाखवित होते. दूरचित्रवाणीच्या क्रीडा वाहिन्या सातत्यानं पाहणाऱ्या एका मित्रानं ते नाव ‘ऑनरिकस’ असंच बरोबर असल्याचं कळविलं.
6) ‘शकणे’ याचा मोठा शाप मराठी वृत्तपत्रसृष्टीला लागला आहे. ‘याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही’, ‘त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही’ किंवा ‘नेमके कारण समजू शकले नाही’ ही वाक्यरचना चुकीची आहे. त्या ऐवजी ‘माहिती मिळाली नाही’, ‘त्यांच्याशी संपर्क झाला नाही किंवा साधता आला नाही’ आणि ‘नेमके कारण समजले नाही’ ही वाक्यं अधिक योग्य आहेत.
7) विविध प्रकारे (विविध आणि प्रकार हे समानार्थीच शब्द आहेत), दबाव, पाणी फेरले, इतिहास रचला हे नेहमीचे चुकीचे शब्द अगदी रूढ झाले आहेत. या वेळी, त्या वेळी, काही तरी, जरा तरी असे दोन वेगवेगळे शब्द सगळीकडे एकत्र करून लिहिले जातात. ‘1995मध्ये’ या ऐवजी ‘1995 मध्ये’ असं वेगवेगळं लिहिलं जातं. मराठी साहित्य संमेलन किंवा नाट्य संमेलन यांच्या बोधचिन्हांमध्येही असंच लिहिलं जातं - 79 वे साहित्य संमेलन. एक तर ते अक्षरी ‘एकोणऐंशीवे’ असं लिहावं किंवा आकड्याला पुढचे ‘वे’ जोडूनच घेतले पाहिजे.
अशा असंख्य बाबी आहेत. येणाऱ्या शंका, दिसणाऱ्या चुका इथे मांडणार आहे. आपणही त्यात सहभागी व्हावे, ही विनंती. पण केवळ चुका दाखवायच्या नाहीत, तर बरोबर काय आहे, हे सांगायचे आहे. त्यासाठी ‘मायबोली’कर मंडळींनी मदत करावी, अशी विनंती. ही माहिती ठरावीक काळाने काही मराठी पत्रकार, वाचक यांना इ-मेलने पाठविण्याचा विचार आहे. म्हणजे त्यांच्या मनात शंका असतील, तर उत्तरे मिळतील, आपणहून मिळत असलेल्या माहितीमुळेही काही जण मराठीच्या बिनचूक वापराकडे वळतील, किमान तशी काळजी घ्यावी, असं तरी त्यांना वाटेल.
बऱ्याच प्रतिक्रिया ह्या
बऱ्याच प्रतिक्रिया ह्या भाषारक्षण/ भाषाशुद्धी/ जुन्याचा आग्रह अशाकडे झुकणाऱ्या वाटू लागल्या आहेत.
इंग्रजीत फोबिया मॅनिआ किंवा असे अनेक प्रत्यय लावून किती शब्द आहेत. असे शब्दांचे वेगवेगळे आयाम तयार करायचे की सगळं दाताखाली खटकून घ्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. भाषेला पुढे टिकाव धरायचा असेल तर ती प्रवाही ठेवणे आणि बदल स्वीकारणे हेच श्रेयस्कर हे माझं मत.
अमितव ... अनुमोदन.. भाषा ही
अमितव ... अनुमोदन..
भाषा ही प्रवाही हवी...
मला वाटत नियम हे व्याकरणाचे असतात (आहेत).. शब्द कसे बनतात वा कसे बनवु नयेत याचे असे नियम असतात का माहित नाही...
असे नियम असतील तर नवीन शब्द येणार कसे मग ?
भाषे मध्ये कधी ना कधी, कोणी ना कोणी नवीन शब्दची भर घालतच आलय ना..
की डायरेक्ट Version 1.0 मध्ये सगळे शब्द एकदमच आले..
'प्रमाण भाषा' ही देखिल
'प्रमाण भाषा' ही देखिल काळानुसार बदलत जाते असे एक निरिक्षण आहे. सध्या ज्या वेगाने बदलते आहे, त्या वेगाने नसेल, पण सध्या सगळ्याच गोष्टी अफाट वेगाने बदलत आहेत! आता काही प्रश्न -
१. माध्यमांमध्ये भाषा शुद्ध असावी हे मान्य, परंतु प्रमाण भाषेत होणारे बदल 'शुद्ध' म्हणून गणले जातात का?
२. कोणते बदल आत्मसात करायला हरकत नाही हे कोण आणि कसे ठरवणार?
३. येथे अनेक जण 'कानांना कसे तरी वाटते' हा निकष का लावत आहेत? ज्या अर्थी त्या शब्दांना माध्यमात मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे आणि बहुसंख्य लोकांना त्याचा काही प्रॉब्लेम वाटत नाही (किंवा त्यांच्या कानांना कसे तरी वाटत नाही), त्या अर्थी ते स्वीकारले गेले आहेत असा अर्थ होत नाही काय?
प्रमाण भाषा आणि बोली भाषा ह्यांमध्ये फरक असणार, पण तो जितका जास्त वाढत जाईल तितकी प्रमाण भाषेची नाळ समाजापासून तुटत जाईल, असे मला वाटते.
छान चर्चा. शिकायला मिळतय. मला
छान चर्चा. शिकायला मिळतय.
मला खटकणारं - मी हे करेल. ती, तो, ते .. करेल. >>>> हे करेल वगैरे मायबोलीवर देखील वाचलं आहे
जाई, 'मी करेल....ती/तो/ते
जाई,
'मी करेल....ती/तो/ते करेल...'यावर उघड उघड इंग्रजीची छाप आहे. इंग्रजीमध्ये आय विल् डू, यू/ही/शी/इट्/दे विल डू अशी रचना असते. हाच प्रभाव मराठीवर पडतो आहे. हिंदी आणि इंग्लिशच्या प्रभावाचे दुसरे उदाहरण म्हणजे नपुंसक लिंगाचा संकोच होणे. नपुंसक लिंग स्पष्टपणे दर्शवणारे मराठीतले अनुस्वार पासष्ठ वर्षांपूर्वी काढून टाकण्यात आले. त्यामुळे शब्दांची लिंगे माहीत नसतील तर वाक्यातील व्याकरणाद्वारे ती कळून येण्याचा मार्ग उरला नाही. अलीकडे ऋण, धाबे (घराचे छप्पर) हे शब्द अनेकदा पुंलिंगी वापरले जातात. उदा. 'त्याचे माझ्यावर खूप ऋण आहेत. ते मला कधीच फेडता येणार नाहीत.' धाब्याच्या घरावर गारा आदळल्या तर (किंवा इतरही कारणाने : उदा. चोरांनी दगड फेकणे, वादळात धाब्यावर झाडाची फांदी कोसळणे इ.) तर दण दण आवाज येतो. त्यामुळे छातीत धडकी भरते. पण अलीकडे हे घराचे धाबे म्हणजे दोन तीन पंजाबी धाबे (ढाबे) असावेत अशा प्रकारे धाबे हा नपुंसकलिंगी शब्द धाबा या पुंलिंगी स्वरूपात वापरला जातो. पुस्तक हा शब्द स्त्रीलिंगी वापरला जातो आणि नोटबुकलाही अलीकडे वहीऐवजी पुस्तक म्हटले जाते.
मी आली, मी गेली या रचनेतूनही जाणवते की प्रथम पुरुषासाठी वेगळी रूपे वापरण्याचा नियम लोप पावत आहे. 'मी आला, मी गेला' ही पुंलिंगी रूपे अजून कशी प्रचलित झाली नाहीत याचेच नवल वाटते.'
मला वाटते, संपर्कक्रांतीच्या युगात हे अटळ आहे.
धुँवाधार की धुवाँधार? या
धुँवाधार की धुवाँधार?
या शब्दाची व्यूत्पत्ती किंवा अर्थ सांगता येईल का? पावसाच्या बातम्यांमध्ये या दोन्ही प्रकारचे शब्द वापरले जातात.
धुवाँधार बरोबर आहे. पण तो
धुवाँधार बरोबर आहे. पण तो हिंदी शब्द आहे. मराठीत धो धो कोसळणार्या पावसाला मुसळधार असं विशेषण आहे.
हीरा, पोस्ट आवडली . तुम्ही
हीरा, पोस्ट आवडली . तुम्ही म्हणता ते खरे आहे . काही वर्षांनी व्याकरणविषयक नियम बदललेही जातील.
दोन भाषिक एकत्र आले कि मग
दोन भाषिक एकत्र आले कि मग तूलना होतात आणि मग अनुकरण होते किंवा आंधळेपणाने अनुवाद होतो. गोव्याच्या भाषेत आदरार्थी बहुवचन नाही, पण मग त्यांना मराठीत तसे बोलताना संकोच वाटतो, मग ते तूम्ही च्या जागी, आपण वापरतात. आता हा आपण म्हणजे त्यात बोलणारा पण आला कि फक्त ऐकणारा, हा माझा गोंधळ.
मराठीत, शुभेच्छा फारच कमी प्रसंगात दिल्या जात असत... परवा तर मला आषाढी एकादशीच्या पण शुभेच्छा दिल्या गेल्या.
हीरा, काळाच्या ओघात शब्द
हीरा, काळाच्या ओघात शब्द बदलतातच. अजून हा शब्द पुर्वी बोलताना आवर्जून अजुनी असा म्हणत अस्त.
जावयांस हवे, करावयांस हवे, असे शब्दप्रयोग माझी राजापुरची आजी नेहमीच करायची. नंतरच्या पिढीत ते झाले नाहीत.
टोच्या आणि फेरफटका, धुँवाधार
टोच्या आणि फेरफटका,
धुँवाधार की धुवाँधार - दोन्ही चुकीचे आहेत. हिन्दीत 'धुआँधार' असा शब्द आहे. त्याचा अर्थ 'धुए की तरह' किंवा 'मूसलाधार' असा केला जातो. मराठी शब्द फेरफटका यांनी सांगितल्याप्रमाणे 'मुसळधार' असा आहे.
गर्भधारणेच्या अडीच तास आधी
गर्भधारणेच्या अडीच तास आधी लसूण खाल्ल्यास त्याचा वास स्तनपान करताना दुधाला येतोच.
- See more at: http://www.loksatta.com/lifestyle-news/garlic-is-harmful-for-pregnant-wo...
आत्ताच लोकसत्तेत वाचलं. कसलं भाषातर असावं कोणास ठावूक. गर्भधारणेच्या आधी खाल्लेला वास कित्ती टिकतो बघा.
In a recent study, the food chemists at FAU examined the milk of breast feeding mothers who had eaten raw garlic an average of 2.5 hours earlier. First, the milk was analysed in a sensory test by olfactory experts who found a garlic and cabbage-like odour in the samples.
इथे रिपोर्ट आहे.
धन्स फेरफटका, दिनेश.
धन्स फेरफटका, दिनेश.
उपयुक्त धागा
उपयुक्त धागा
चांगला धागा आहे हा.
चांगला धागा आहे हा.
माझ्या तर खूप चुका होत असाव्यात. मला खूप कौतुक करायचं असेल तर मी भारी, मस्त/मस्तंय म्हणते. हे चूक की बरोबर?
चहा टाक हे मी मायबोलीवर पहिल्यांदा वाचलं. आमच्याकडे चहा ठेवते असं म्हणतात.
उच्चारांचं तर विचारायलाच नको.
land mark ह्या इंग्लिश
land mark ह्या इंग्लिश शब्दाला मराठीत योग्य प्रतिशब्द कोणता? मला माहीत होता पण आता अजिबात आठवत नाही. त्या शब्दामध्ये
' खुणा ' किंवा खूण हा जोड शब्द होता हे नक्की. उदा. पाऊलखुणा.
कुणीतरी सांगा.
रानभुली - बोलण्यात आणि
रानभुली - बोलण्यात आणि (प्रमाण भाषेतील) लिहिण्यात फरक असतो, तो त्या त्या भागानुसार असतो. सवयीनं होतो. 'चहा टाकला/चहा टाक थोडासा' किंवा 'चहा ठेव' असं बोललं जातंच. (कथा, कादंबऱ्या पाहिल्या, तर त्यातही ही वाक्यं नक्कीच असतील.) ते रूढ झालं आहे. 'चहा कर/चहा केला/चहा करतेस का?' असं पाहिजे मग.
'भारी' शब्द आता कौतुकासाठी सहज वापरला जातो. त्याचे अनेक अर्थ आहेत - जड, वजनदार, वरच्या दर्जाचा, फार किमतीचा, महत्त्वाचा किंवा योग्यतेचा, अधिक मोठा, शहाणा काटक्यांची किंवा गवताची मोळी इत्यादी (संदर्भ - मराठी बृहद्कोश) त्यामुळे कौतुक करण्यासाठी हा शब्द वापरण्यात काहीच चूक नाही, असे वाटते.
हीरा - श्री. एन. बी. रानडे
हीरा - श्री. एन. बी. रानडे ह्यांच्या इंग्लिश-मराठी डिक्शनरीमध्ये land-mark शब्दाचा दिलेला अर्थ असा : शिवेची खूण, मेरेची खूण, शीव, हद्द, क्षेत्रमर्यादाचिन्ह.
आपण पत्त्यामध्ये land-mark विचारतो. त्या अर्थाने 'ठळक खूण' किंवा 'जवळची मोठी खूण' असं म्हणता येईल का?
आभार. पण मी वाचलेला शब्द यांत
आभार. पण मी वाचलेला शब्द यांत नाही.
जुने लेखक उदा. श्री. म. माटे, आचार्य अत्रे, य.गो जोशी आणि इतरही अनेक जुन्या लेखकांच्या लिखाणात असे कितीतरी सुंदर, समर्पक आणि चपखल शब्द सापडतात जे आज वापरातून बाहेर टाकले जाऊ लागले आहेत. अशा शब्दांचा पुनर्वापर सुरू झाला तर अनेक इंग्लिश शब्दांना सोपा असा (मुद्दाम घडविलेला नव्हे) देशी पर्याय मिळू शकेल.
ह्यातही माझे वैयक्तिक निरीक्षण असे आहे की मध्य महाराष्ट्र म्हणजे मराठवाडा, ' देश ' ह्या टापूतल्या लेखकांकडे यादवी भाषेतून परिवर्तित झालेल्या देशी शब्दांचा पुष्कळ साठा होता. ते शब्द भले मूळ संस्कृतमधून आलेले असोत पण त्यांचे रूप अगदी मराठमोळे बनून गेले होते . सहज, सोपे, समर्पक असे हे शब्द आज वाचताना फार लोभस वाटतात.
>>land mark ह्या इंग्लिश
>>land mark ह्या इंग्लिश शब्दाला मराठीत योग्य प्रतिशब्द कोणता?
स्थानदर्शक खूण म्हणू शकता पण ते जरा जास्तच पुस्तकी वाटते.... बोलीभाषेत जवळची खूण वगैरेच ऐकलेले आहे!
land mark ह्या इंग्लिश
क्षमस्व. चुकीचा प्रतिसाद काढून टाकत आहे.
स्वरूप +1
स्वरूप +1
गावी राहिलेले नाही. तिकडे असेल एखादा शब्द.
धाग्याच्या सुरुवातीला धाडस
धाग्याच्या सुरुवातीला धाडस ह्या शब्दापासून बनलेल्या विशेषणा विषयी थोडी चर्चा आहे. आळस- आळशी हा नियम धाडस शब्दाला बहुतेक लागू पडत नसावा. आळस पुंल्लिंगी आहे तर धाडस नपुंसक लिंगी. पाडस- पाडसाला, साहस - साहसी; पण वारस - वारशी. तसेच पडसे (एकारांत) - पडशाने(पडश्याने)
मागची पाने आज चाळली तेव्हा इतकी जुनी चर्चा दिसली.
काल 'शुभलग्न ऑनलाईन ' मध्ये
काल 'शुभलग्न ऑनलाईन ' मध्ये पासवर्ड ला मराठी प्रतिशब्द 'संकेतशब्द' ऐकायला मिळाला
हीरा,
हीरा,
ते मी एका भाषातज्ज्ञांचे लेखात वाचले होते.
पण, हे पहा :
धाडस dhāḍasa a धाडशी or धाडसी a Bold, daring, dauntless.
(मोल्सवर्थ शब्दकोश)
…. दोन्ही दिलेत !
'पाडस' शब्दावरून आठवलं. गायी
'पाडस' शब्दावरून आठवलं. गायी-म्हशींच्या संदर्भात तान्ही आणि पाडशी हे शब्द वापरलेले मी गावाकडे ऐकले आहेत. तान्ही म्हणजे नुकतीच व्यायलेली, जिचं वासरू बरंच लहान आहे अशी, तर पाडशी म्हणजे जरा मोठं झालेलं वासरू असलेली. (तान्ही म्हैस जास्त दूध देते, पाडशीचं दूध कमी झालेलं असतं)
एस टी च्या कुठल्यातरी सूचना
एस टी च्या कुठल्यातरी सूचना फलकावर 'प्रवाशी' असा शब्दही वाचलेला आठवतो.
Pages