ऑस्ट्रेलियातील आमचे पक्षीजगत

Submitted by सुमुक्ता on 17 December, 2014 - 13:27

लग्न होऊन पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया ला गेले तेव्हा सगळच नवीन होते. नवीन संसार, नवीन देश, भाषा नवीन नसली तरी उच्चारण ऐकले की "आपल्याला नक्की इंग्रजी येत ना?" अशी शंका यायची. तिथे गेल्या गेल्या जाणवलेली आणि आवडलेली गोष्ट म्हणजे आमच्या घराच्या आसपास कायम विविध प्रकारचे पक्षी यायचे!!! घराला छान गच्ची असल्यामुळे पक्षीनिरीक्षण करण्यात तासन तास अगदी मजेत वेळ जात होता. जेव्हा नोकरी करत नव्हते तेव्हा घरात कधी एकटेपणा जाणवला नाही, तो ह्याच पक्ष्यांमुळे. मला खरतरं पक्षीनिरीक्षणाचा विशेष अनुभव नाही. भारतात असताना एक-दोनदा मित्रमैत्रिणींच्या आग्रहाखातर अग्निपंख (flemingos) बघायला भिगवण जवळ जाऊन आले होते. एवढेच काय ते माझे पक्षीनिरीक्षण. पण ऑस्ट्रेलिया मध्ये मात्र अगदी घरबसल्या मला पक्षीनिरीक्षणाची गंमत अनुभवायला मिळाली.

सुरुवातीला मला घरी स्थिरस्थावर करून दिल्यानंतर नवरा ऑफिस ला जाऊ लागला. आम्ही राहत होतो तो भाग अतिशय शांत होता. पहिल्या दिवशी नवरा ऑफिसला गेल्यावर घरातील शांतता अंगावर यायला लागली. पुण्यामध्ये घरी (ते ही गावात) एवढ्या शांततेची कधी सवयच नव्हती. हळूहळू मला त्या शांततेची भीती वाटायला लागली. नवऱ्याला फोन करावा का असा विचार करत होते पण मग "तो मला भित्री म्हणेल" अशी पण भीती वाटायला लागली. मग तशीच बसले. भारतातून पुस्तके आणली होती त्यातील एक पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि अचानक "हू हू हू" असा रडल्यासारखा आवाज आला. बराच वेळ कानोसा घेतला तरी आवाज कसला आहे ते कळेना. हिंदी, इंग्रजी, मराठी मध्ये असतील नसतील ते सगळे भयपट आठवायला लागले. थोड्या वेळाने आवाज गच्चीच्या बाजूनी येतो आहे असे जाणवले . हिय्या करून गच्चीचे दार उघडले तर ऑस्ट्रेलिया मधला माझा पहिला मित्र माझ्या नजरेस पडला "Mourning Dove". रडल्यासारखा आवाज काढतो म्हणून Mourning!! त्याला पाहिल्यावर माझे मलाच हसू आले. नंतर रोज दुपारी मला साथ करण्याचे काम तो न चुकता करीत असे. मी आणि माझ्या नवऱ्याने त्याचे नाव सोनू पक्षी ठेवले. त्याला खायला द्यावे म्हणून आम्ही एक दिवस जाऊन Bird Food ची पिशवी घेऊन आलो. हळूहळू त्याला ह्या Bird Food ची सवय झाली आणि मग तो सकाळ-संध्याकाळ यायला लागला. थोड्याच दिवसात हा सोनू पक्षी आमचा नैसर्गिक अलार्म झाला. सकाळी सकाळी जोरजोरात आवाज करून खायला मागायला लागला. अगदी शनिवार-रविवारी सुद्धा त्याला खायला देण्यासाठी आम्ही सहा वाजता उठायचो. अजूनही ऑस्ट्रेलियाच्या घराची आठवण झाली की आमचा सोनू पक्षी हमखास आठवतो.

Mourning Dove
AustrliaBirds_Mourning Dove.jpg

एकदा सोनू पक्ष्यासाठी खाणे ठेवायला गेले तर बाहेर असलेल्या गवतावर एक पंचरंगी पोपटांची जोडी दिसली. मग त्यांच्यासाठी थोडेसे खाणे बाहेरच्या गवतावर टाकायला लागले.

रोजेला (पंचरंगी पोपट)
AustrliaBirds_Rosella.jpg

आमच्या गच्चीचे दार उघडले की समोरच्या रस्त्यावर एक झाड होते. त्या झाडावर व्हाईट कॉकटू नावाचे पोपट असंख्यांनी येउन बसायचे. झाडाला लागणारी फळे खायला ते ह्या झाडावर मुक्काम करून होते. खालच्या फोटोमधील दृश्य जवळ जवळ रोज पहायला मिळायचे. हा व्हाईट कॉकटूचा थवाच्या थवा संध्याकाळ झाली की एकदम उडायला लागायचा. ते पाहून मिळणारा आनंद आणि समाधान ह्याची तुलना करणे केवळ अशक्य.

व्हाईट कॉकटू
AustrliaBirds_White Cockatoo.jpg

झाडावर बसलेला व्हाईट कॉकटूंचा थवा
AustrliaBirds_White Cockatoo on tree.JPG

ह्या झाडाशेजारच्या झाडावर वेगळ्या जातीचे आणि थोडे वेगळे रंग असलेले पोपट कायम दिसायचे.

लॉरीकीट (निराळ्या जातीचे पंचरंगी पोपट)
AustrliaBirds_Lorikeet.JPG

आमच्या घरासमोर एक मोठे खेळाचे मैदान होते. तिथे संध्याकाळच्या वेळी आम्ही फेरफटका मारायला जायचो. ह्या मैदानावरील गवतावर गाला नावाचे पोपट दिसायचे. हे पोपट इतके खेळकर असतात की त्यांचे खेळ बघता बघता आमचा फेरफटका आम्ही विसरूनच जायचो.

गालांचा थवा
AustrliaBirds_Galah_flock.jpg

तिथेच मॅगपाय नावाचे काळ्या पांढऱ्या रंगाचे पक्षी दिसायचे. हे पक्षी स्वतःच्या प्रदेशात इतरांना अजिबात येऊ देत नाहीत अतिशय territorial असतात. त्यामुळे बऱ्याच वेळा इतर पक्षांशी भांडताना दिसायचे. माणसे सुद्धा ह्या पक्षाच्या जवळ गेल्यास तो त्यांच्या अंगावर धावून जातो . (ह्या पक्षाचा फोटो माझ्या कॉम्प्युटर वर सापडत नाही. जर सापडला तर अपलोड करीन). ह्याच मैदानात सल्फर क्रेस्टेड कॉकटू नावाचे पांढरे पोपट सुद्धा दिसायचे. त्यांच्या डोक्यावर पिवळ्या रंगाचा तुरा असतो आणि त्यामुळे हे पोपट अतिशय रुबाबदार दिसतात.

सल्फर क्रेस्टेड कॉकटू
AustrliaBirds_Sulphur Crested Cockatoo.jpg

माझा नवरा न्युकासल विद्यापीठामध्ये नोकरी करत होता. यथावकाश मलाही तिथेच नोकरी मिळाली. आम्ही ऑफिस ला एकत्रच जाणेयेणे करत होतो. न्युकासल विद्यापीठामध्ये घनदाट झाडी असल्याने अनेक प्राणी आणि पक्षी दिसतात मी तर बऱ्याच वेळा छोटी कांगारू (wallabies) पण पहिली आहेत. माझा नोकरीचा पहिला दिवस संपवून आम्ही घरी निघालो होतो आणि अचानक झाडांवरून अनेक माणसे मोठमोठ्यांदा हसत असावीत असा आवाज आला. हा आवाज इतका मोठा होता की थोड्या वेळ मी फारच घाबरून गेले होते. नवऱ्याकडे विचारणा केली असता समजले की हे लाफिंग कूकाबुरा नावाचे पक्षी आहेत. हे पक्षी जगातील सर्वात मोठे kingfishers आहेत आणि ऑस्ट्रेलियन लोकं ह्याला गमतीने लाफिंग जॅकअॅस म्हणतात. कधीतरी घरी येताना मी एकटी असले की ह्या लाफिंग जॅकअॅसेस मुळे मला दाट झाडीची भीती वाटत नसे.

लाफिंग जॅकअॅस
AustrliaBirds_Laughing Kukaburra.jpg

न्युकासल पासून २.५ तासाच्या अंतरावर सिडनी असल्यामुळे आणि न्युकासल ला वीकेंड घालवणे फारच कंटाळवाणे असल्यामुळे खूप वेळा आमचे सिडनी ला जाणे व्हायचे. आम्ही ज्या हॉटेल मध्ये राहायचो त्याच्या जवळपास आम्हाला कायम बाकदार चोच असणारे आयबीस नावाचे पक्षी दिसायचे.

आयबीस
AustrliaBirds_Ibis.JPG

न्युकासल पासून जवळच नेल्सन बे नावाची एक जागा होती. शनिवार रविवारी बऱ्याच वेळा आम्ही तिथेही जायचो. तिथे समुद्रकिनाऱ्यावर भले थोरले पेलिकन दिसायचे. अगदी शांत आणि निडर पक्षी. आपण अगदी जवळ गेलो तरीही घाबरणार नाही. मात्र त्याच्या जवळ जाऊन फोटो काढायची मला भीती वाटायची.

पेलिकन चा थवा
AustrliaBirds_Pelicans.jpg

न्युकासल, सिडनी च्या बीचवर सीगल्स तर खूप दिसायचे. स्कॉटलंड ला आल्यानंतर फक्त सीगल्सच दिसतात त्यामुळे त्याचा अप्रूप राहिलेले नाही.

सीगल्स आणि त्यांची पिल्ले
AustrliaBirds_Seagulls.JPG

न्युकासल ते सिडनी आगगाडीतून जाताना खूप वेळा इमू दिसायचे. इमू हा शहामृगासारखा दिसणारा पण आकाराने लहान पक्षी आहे. सिडनी जवळचे फेदरडेल वाइल्डलाइफ़ पार्क मध्ये ह्या पक्षाला हाताने खाऊ घालता येते. एका आइसक्रीम च्या कोनात चारा भरून इमू समोर धरायचा असतो. खरेतर मी खूप घाबरले होते पण नवऱ्याच्या आग्रहास्तव प्रयत्न केला. चारा भरलेला कोन एका इमू समोर धरला. त्या इमू ची उंची माझ्याएवढी होती, त्यानी माझ्या हातातील चाऱ्यावर इतक्या जोरात चोच मारली की मी घाबरून पळत सुटले होते.

इमू
AustrliaBirds_Emu.jpg

खूप वेळा आमच्या घरासमोरील रस्त्यावरून बदकांचा थवा सुद्धा चालत जाताना दिसायचा. हे दृश्य तर फारच गोंडस असायचे. बदकाची पिल्ले त्यांच्या आईच्या मागेमागे लुटूलुटू जाताना पहिली की खूप मजा वाटायची.

बदके
AustrliaBirds_Ducks.jpg

आमचे नशीब चांगले म्हणून आम्हाला अक्षरशः घरबसल्या पक्षीनिरीक्षण करता येत होते. नियमित दिसणारे पक्षी सोडल्यास थोडेसे गावाबाहेर गेले की पक्षांच्या अनेक जाती दिसतात. त्यातही पोपटांच्या (cockatoo) इतक्या जाती असतात हे मला इथे आल्यावरच कळले. ऑस्ट्रेलिया हा पोपटांचा प्रदेश आहे. त्यातील नेहेमी दिसणाऱ्या पोपटांचे फोटो वरती दिले आहेत.पक्षी/प्राणी संग्रहालयात सुद्धा विविध पक्षांच्या शेकडो जातींचा संग्रह दिसतो. सगळ्या पक्षांबद्दल लिहायचे तर एक वेगळी लेखमालिका चालू करावी लागेल.

पोटापाण्याच्या व्यवसायार्थ ऑस्ट्रेलिया सोडून आम्ही स्कॉटलंडला आलो. येथील सौंदर्य निराळेच आहे; पण विविधरंगी, विविधढंगी पक्षी इतक्या नियमितपणे परत दिसलेच नाहीत. आजतागायत हृदयाचा एक खास कोपरा जपला आहे तो ऑस्ट्रेलियाच्या पक्षीजगतासाठी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला ऑस्ट्रेलियात आल्यापासून सुरुवातीला हे वेगळे पक्षी बघून खूप भारी वाटलं होतं, पण नंतर त्यांचे कर्णकर्कश्श आवाज ऐकून आता कान पार किटले आहेत. बरेचसे पक्षी नुसते बघायलाच चांगले दिसतात पण त्यांनी तोंड उघडले की नको नको होते Happy

असो!

अर्रे काय मस्त मस्त पक्षी घरबसल्या बघायला मिळत होते! लिहिलंय पण अगदी साधंसुधं त्यामुळे खूप आवडलं.>>>>+१.
दिनेश.,फिल्म सुरेख आहे.धन्यवाद!

सुंदर लेखन आणि फोटोही.
पक्षीनिरीक्षणाचा अनुभव नाही म्हणतेस, पण इतक्या सार्‍या पक्ष्यांची नावे, वर्णनानिशी लिहीली आहेस की गं, अगदी अभ्यासपूर्ण लेखन !

नवीन प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.

पक्षीनिरीक्षणाचा अनुभव नाही म्हणतेस, पण इतक्या सार्‍या पक्ष्यांची नावे, वर्णनानिशी लिहीली आहेस की गं, अगदी अभ्यासपूर्ण लेखन !>>>> माझा नवरा पक्षी, प्राणी आणि किटकप्रेमी आहे. त्याच्यामुळे खूप माहिती मिळाली आणि जास्तीत जास्त माहिती मिळविण्याकडे कल वाढला. नाहीतर लग्नाआधी मला प्राण्यांची विशेष आवड नव्हती आणि महिती तर त्याहून नव्हती Happy

मला ऑस्ट्रेलियात आल्यापासून सुरुवातीला हे वेगळे पक्षी बघून खूप भारी वाटलं होतं, पण नंतर त्यांचे कर्णकर्कश्श आवाज ऐकून आता कान पार किटले आहेत. बरेचसे पक्षी नुसते बघायलाच चांगले दिसतात पण त्यांनी तोंड उघडले की नको नको होते >>> ईंग्लंडमध्ये येउन रहा. इथल्यासारखे कंटाळवाणे प्राणीजगत कोठेच नसेल. येथे आल्यावरच मला ऑस्ट्रेलियातील जीवनाची किंमत कळली Happy

मॅगपीज बद्दल लिहीलं नाही ? केवढेच्या काय आवाज करत इकडुन तिकडे फिरत असतात>>> मॅगपाय बद्दल लिहिले आहे की. पण त्यांचे फोटो सापडलेच नाहीत.

आज हा लेख वाचला. फार छान लिहिलाय व फोटो पण आवडले.> + १

तुम्हाला त्या प्रदेशात राहायला मिळाले, भाग्यवान आहात.
२००१ मध्ये आम्ही सिडनी - गोल्ड कोस्ट सिनिक ड्राईव्ह केले होते त्यावेळी आम्ही न्यु कॅसल नेल्सन बे ला भेट दिली होती . आम्हाला हा भाग खुप आवड्ला म्हणुन न्यु कॅसल मध्ये २ दिवस राहिलो होतो. तिथे आणि सिडनी - गोल्ड कोस्ट राईड मध्ये बरेच पक्षी, कोलाला आणि कांगारु बघितले होते. माझ्याकडे ०.५ मेगा पिक्सल चा कॅमेरा आणि १६ मेगा मेमरी असल्याने जास्त फोटो घेता आले न्हवते. न्यु कॅसल रेलेवे स्थानकाचा फोटो घेतला होता .

DSC00210.JPG

Pages