आईस्क्रीम, कुल्फी इ. इ. की आणखी काही?

Submitted by मुंबई ग्राहक पं... on 25 April, 2016 - 01:27

आपण जे खातो ते ‘तेच’ आहे का, असा प्रश्न आपल्याला सहसा पडत नाही, म्हणजे बटाटेवडा मागितला आणि मका पॅटीस समोर आले, तर ओळखतोच की पटकन! किंवा तेलपोळीला कुणी पुरणपोळी म्हणू लागले तर त्याला वेडयातच काढू की नाही? पण बाजारात मिळणा-या सगळ्याच पदार्थाबाबत आपल्याला पुरेशी माहिती असतेच, असं नाही होऊ शकत.

plain-pista-mini[1].jpg

शिवाय आता अन्नप्रक्रिया उद्योगाने व त्यासंदर्भातील संशोधन व तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केलीय, की नित्य नवीन नवीन चवीचे, आकारा-प्रकाराचे पदार्थ, छान छान रंगीबेरंगी वेस्टनामधून आपल्याला जणू बोलावीत असतात. या, या, मला घ्या, खाऊन तरी बघा, असा आग्रह करीत असतात.
म्हणूनच, आपण नक्की काय खातोय, याची माहिती कशी करून घ्यावी. याचा गृहपाठ करायला हवाच. मुंबई ग्राहक पंचायतीचा शिक्षण विभाग त्यासाठी खाद्यपदार्थाच्या वेष्टनावर काय असावे, ते कसे वाचून समजून घ्यावे, यासाठी सर्व वयोगटांसाठी प्रबोधनपर शिबिरे आयोजित करीत असतो. तरीही एक प्रश्न उरतो तो म्हणजे काही पदार्थ असतात. त्यावरचे वेष्टन वाचून समजून घेऊन मग खरेदी करायची हे शक्यच नाही. त्यापैकी महत्त्वाचा पदार्थ म्हणजे आईस्क्रीम.
उन्हाळा वाढत जातो. तशी आईस्क्रीम, कुल्फी आणि थंडगार पन्हे, सरबत यांची मागणी वाढत जाते. टेट्रॉपॅकमधली लस्सीसुद्धा पटकन प्यायली नाही तर ‘गरम’ होईल. म्हणून आपण ती बनवणा-या कंपनीचे नाव, किंमत काही न बघता, तिच्यात स्ट्रॉ खूपसून ती तोंडाला लावतो. अशा परिस्थितीत आईस्क्रीमचे वेष्टन वाचून ते समजून घेऊन मग खाण्याची कल्पना तरी शक्य आहे का? अहो, ते वितळून जाईल ना!
चॉकोबार असेल तर वरचा चॉकलेटचा थर वेडावाकडा होऊन निसटेल, कोनात घेतलं असले तर ओघळून बाहेरच सांडेल, शिवाय आईस्क्रीम म्हणजे आईस्क्रीम, त्यात काय वेगळे असणार? अगदी बरोबर त्यात वेगळे असतात ते स्वाद. जसे की चॉकलेट, व्हॅनिला, बटरस्कॉच, ब्लॅक करंट इ. इ. अगदी नुसती ही नावे लिहितानासुद्धा माझ्याच तोंडाला पाणी सुटते.
मग प्रत्यक्ष विकत घेऊन खाताना ते ग्राहक पंचायतीने शिकवलेले मुद्दे कसे बरे आठवणार? पण तरीही आरोग्याबाबत जागरूक असणा-या आमच्या सदराच्या ग्राहक, वाचकांना हे माहीत हवे की ‘आईस्क्रीम’सारखी दिसणारी, भासणारी पण ‘आईस्क्रीम’च्या व्याख्येत न बसणारी उत्पादनेसुद्धा मार्केटमध्ये आहेत. त्यांच्या वेष्टनावर किंवा जाहिरातीतसुद्धा कधीही ‘आईस्क्रीम’ असा शब्द नसतो. पण सामान्य ग्राहकाला ती ‘आईस्क्रीम’च वाटतात. त्या प्रकाराला म्हणतात ‘फ्रोझन डेझर्ट’.
त्यामध्ये पण बटरस्कॉच, व्हॅनिला, चॉकलेट असे प्रकार असतात. पण आईस्क्रीम म्हणवून घेण्याची मूळ अट म्हणजे केवळ दुग्धजन्य क्रीमच त्यात नसते. त्यात वनस्पतीजन्य ‘फॅट’/तेल/ हायड्रोजनेटेड वनस्पतीजन्य फॅट असते.
आता हे तेल बाजारात उपलब्ध असणारे पाम, शेंगदाणा, कनोला इ. कोणतेही एक (अगर अनेकही) असते. ते नक्की कोणते हे वेष्टनावर सांगणे बंधनकारक नाही. शिवाय त्यात मिल्क सॉलिड्स असतात, जे आईस्क्रीममध्येही असतात. मात्र प्रोटीन दुग्धजन्यच असेल असे नाही. काही फ्रोझन डेझर्टवर ‘सोया प्रोटीन’ असे ‘घटकपदार्थाच्या’ यादीत आढळून आले आहे.
यासाठी या दोन समान भासणा-या व दिसणा-या उत्पादनांमधला फरक आपण समजून घेऊन मग ते खरेदी करावे, फ्रोझन डेझर्टला जे/गे लाटोज असेही नाव आहे, ते स्टॉल्सवर ‘कोन’मधून मिळते. मात्र तिथेही आईस्क्रीम असा शब्द नसतो. शिवाय आईस्क्रीमबाबत आपणाकडे ठोस प्रमाणीकरण (standardisation of product) आहे. म्हणजे कसे की, त्यात कमीत कमी १० टक्के मिल्क क्रीम (स्निग्धता) हवे व चांगल्या आईस्क्रीममध्ये क्रीम १२ टक्के हवे. साखर १५ टक्के त्यानंतर मग दुग्धजन्य घनपदार्थ (एसएनएफ) फळे, स्वाद इ. पण मुळात क्रीम व साखरेचे प्रमाण ठरलेले आहे.
तसेच त्यात ‘शुगर फ्री’सदृश रसायने नसली पाहिजेत. पाहा बरे, आईस्क्रीममधले क्रीम आणि साखरेचे प्रमाण हे एखाद्या क्रीम कुकीपेक्षा खूप कमी आहे. सॉफ्टीमध्ये तर केवळ ६ टक्केपर्यंत फॅट असावी आणि साखर १२ ते १५ टक्के. यावरून कळेल की मर्यादेत खाल्ले तर आईस्क्रीम/ सॉफ्टी आपल्याला खूप सारी साखर किंवा फॅट देत नाहीत.
मात्र डेझर्टबाबत असे निश्चित प्रमाण आढळत नाही. शिवाय त्यातील फॅट, प्रोटीन इ. सर्वाना सोसतील असे नाही. त्यामुळे जर कधी खास करून बालके/ वृद्धांना एखादे फ्रोझन डेझर्ट खाऊन त्रास झाला, तर त्याबाबत जागरूक राहायला हवे. शिवाय ‘हायड्रोजनेटेड् फॅट’ ही आरोग्यासाठी उपकारक समजली जात नाहीत. त्यामुळेच तिचे नियमित सेवन, कदाचित आपल्या नकळत होत असेल, तर त्याचीही काळजी आपणच घेतली पाहिजे.
जे खवय्ये आपली रसना परजून असतात. त्यांना जिभेवर ठेवलेला थंडगार तुकडा आईस्क्रीमचा की फ्रोजन डेझर्टचा हे कळू शकते. ज्याला ‘माऊथफील’ असे म्हणतात, तो या दोन पदार्थाचा वेगळा असतो आणि हो, कुल्फीचा त्याहून वेगळा. ‘कुल्फी’ म्हणजे एकदम ‘जड’ बरे का! ती विकली जाते वजनावर, तर आधीचे दोन भिडू मापाने. म्हणजे मि.ली.च्या प्रमाणात. कारण आईस्क्रीमच्या प्रकारानुसार त्यात ७० ते ९५ टक्के हवा असू शकते. सॉफ्टीत ३० ते ५० टक्के. त्यामुळे ते तोंडात बोचत नाही.
सर्वसामान्य ग्राहकांनाही हे तपशील माहीत असायला हवेत. जेणेकरून आपण जे खातोय ते ‘तेच’ आहे हे समजेल. त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आपल्या आरोग्याशी या सा-या गोष्टी थेट जोडलेल्या आहेत, म्हणून त्या जाणून घ्यायलाच हव्यात.
- वसुंधरा देवधर, मुंबई ग्राहक पंचायत
पुर्वप्रसिध्दी - दैनिक प्रहार - प्रतिबिंब
मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभाग
सदर लेख मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे असे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हॉट्सअ‍ॅप वर एक चांगला लेख फिरतोय. तुमच्या लेखामुळे कन्फर्म झाले. थोडक्यात काय, तर आपण थंड डाल्डा / वनस्पती तूप आईस्क्रीम म्हणून खात असतो.

व्हॉट्स अ‍ॅप वरून साभार

वरील एक फोरवार्डेड मेसेज वाचण्यात आला त्याचा सारांश असा होता की डालड्या पासून आईस्क्रीम बनवली जाते आधी वाचून विश्वास बसला नाही मग थोडे नेट सर्फिंग केले आणि लक्षात आले की यात सत्य आहे मग चर्चा सुरु झाली आणि अतिशय भयानक सत्य समोर आले
आईस्क्रीम च्या नावाखाली डालडा खाऊ घालणाऱ्या कंपन्या तो पदार्थ आईस्क्रीम या नावाने विकू शकत नाहीत तर त्यांना तो पदार्थ frozen dessert या नावाने विकावा लागतो आणि त्यावर स्पस्टपणे frozen dessert contains edible oil असे लिहावे लागते पण आपण त्या आईस्क्रीम सदृश्य पदार्थाच्या एवढे प्रेमात पडलो आहोत कि त्यात काय आहे हे वाचण्याचे कष्ट घेत नाही आणि vegetable oil म्हणजे डालडा हे देखील बऱ्याच जणांना माहित नसते मग समर्थनार्थ काही प्रॉडक्ट्स च्या रॅपरचे फोटोज पाठवले

IMG-20160409-WA0005.jpgIMG-20160409-WA0003.jpgIMG-20160409-WA0004.jpgIMG-20160409-WA0002.jpg

आइसक्रीम खा...पण हे वाचा बड्या बड्याकंपन्या आकर्षक आउटलेट्स उघडूनखवैय्ये मंडळींना मेजवानी देण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतो आहोतपरवाच आपल्या चिपळूण मधेहि बस्किन रॉबिन या आंतरराष्ट्रिय ब्रैंडच आऊटलेट सुरु झालय. पण याचआईस्क्रमच्या पडद्यामागे अनेक गोष्टीआहेत. कदाचित त्या पासून आपणअनभिज्ञच आहोत.

मागे एकदा रत्नागिरी ला मिरजोळे एम आय डी सी मधे एका क्लाएंट बरोबर मिटींगसाठी माझ्या एका सरांबरोबर एका हॉटेलमध्ये गेलो होतो. तेव्हा माझ्या क्लायंटने अजून एका माणसाबरोबर ओळख करुन दिली . तोमाणूस मुंबई मधे आईस्क्रीमचे निरनिराळे आणिनवनवीन फ्लेवर्स बनवतो आणिआईस्क्रीम कंपन्यांना विकतो. आता त्याला स्वतःचे माझ्या क्लायंट बरोबर आउटलेट उघडायचे होते त्यासाठी त्याला तिथे किंवा झाड़गाव एम आय डी सी मधे प्लांट सुरु करायचा होता .त्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट करा म्हणून तो मला व सराना  पटवत होता. तो जे काही सांगत होता ते ऐकून मी उडालोच.

त्याच्या म्हणण्यानुसार त्याने अनेकनवीन फ्लेवर्स बनवले आहेत. जे काहीकंपन्यांनी विकत घेतली असून सध्या मार्केटमध्ये लोकांना खूप आवडताहेत. तेआवडणाऱ्यात मीही एक होतोच.

तो म्हणाला ; “आता मी ग्वाहा(पेरू) आणि चॉकलेटआईस्क्रीम मध्ये ४ -४नवीन फ्लेवर्स बनवलेआहेत. जे मला आता कुठल्याच कंपनीला विकायचे नाहीयेत. हे फ्लेवर्स लोकांनाखूप आवडणार आहेत. ज्याचा आपल्याला आउटलेट उघडून फायदाउठवता येईल. ”

प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करताना आम्हाला उपलब्ध मार्केट त्याची सध्याची परिस्थिति प्रोडक्टचा वाव त्याला उपलब्ध असणारा पर्याय ,लागणारा पैसा, लागणार वेळ ब्रेक ईवन पॉइंट वगैरे गोष्टी विचारात घ्याव्या लागतात म्हणून मी त्याला एक साधा प्रश्न विचारला की ; “समजा आपण आउटलेटउघडलं आणि तुझे फ्लेवर लोकांना आवडले नाही तर तू त्या चॉकलेट किंवा पेरू फ्लेवरचे जे उत्पादन करशील ते किती दिवस राहू शकत? लोकांना ते आवडे पर्यंत जो काळ जाईल तोवर ते आईस्क्रीम वायाजाणार नाही का ? मग ते नुकसान कुणी सोसायच?”. पुढे माझेअनेक प्रश्न होतेच. वीजखर्च, दुध , कच्चा माल वाहतूक इत्यादी.

त्यावर तो आपले तंत्रज्ञान किती भारी आहे हे सांगताना म्हणाला की ;“त्याची काही काळजी करू नका. मुळात हे आईस्क्रीम कधीच खराब होत नाही.अगदी आठ दिवस लाईट नसले तरीही...”

आम्ही चकित झालो . सरांनी विचारलं ;“ते कस काय? दुध आहे ते खराब होणारच.”

तो तत्काळ म्हणाला ; “छे छे. दुधापासूनआईस्क्रीम बनवण्याचे दिवस केव्हाचसंपलेत. ”

“मग कशापासून बनवतोस बाबा आईस्क्रीम ?”

“डालडा तुपापासून!”

“काय डालडा तूऽऽऽऽप?” होय डालडा-वनस्पति तूप दचकलात ना
पण काय आहे सर
“आज काळ एखाद दोन कंपन्या सोडल्यातर सगळे डालडाच वापरतात आणित्यामुळेच ते परवडतं. आजकाल आईस्क्रीममध्ये एकही थेंब दुध नसतं. डालडाला थोडी प्रोसेस केली आणि त्यात फ्लेवर्स मिक्स केले की कळतही नाही की ते डालडातूप आहे. शिवाय ते दुधाच्याआईस्क्रीमपेक्षा खाताना जास्त मऊ लागतं.त्यामघे जो दुधाच्या आइसक्रीम मधे बर्फाचा कचकचित पणा काही वेळा येतो तो येत नाही आणि तेच लोकांना आवडतं.दूसर म्हणजे डालडा आईस्क्रीम जिभेवर येताच त्वरित विरघळते आणि गिळले जाते. शिवाय थंडपणा आणि तुपकटपणा यामधून तोंडात जे तयार होते ते नक्की काय आहे हा विचार लोक करीत नाहीत. पण तेच लोकांना आवडते. लोक अशाच स्वादाला पसंती देतात. ”

तो भरात येऊन त्याच्या तंत्राचमार्केटिंग करत होता आणि आम्ही आमचा इतिहास पोटात ढवळत बसलो होतो.

पुढे तो सांगत होता; “डालडाआईस्क्रीमचं वैशिष्ट्य असं की ते डालडा सामान्य तापमानात कितीही काळ राहिला तरीही अजिबात खराब होत नाही.हे आपण घरात बघतच असतो याउलट दुधाला मात्र सारखं फ्रीजिंग लागतं. शिवाय दुधाच्या आईस्क्रीमला काही दिवसांनी वास येतो. आणि १०-१२ दिवसात ते खराब होऊन जातं. त्यामुळेखर्च वाढतो. डालडा आईस्क्रीम वर्ष भर जरी फ्रीजच्या बाहेर राहिलं तरी फरक पडत नाही, त्याचे फ्लेवर्सही खराब होत. नाहीत.

डालडा आईस्क्रीमसाठी लाईटखुपच कमी लागते. १० डिग्रीतापमानातही त्याचा आईस्क्रीम फील येतो. तर दुधाच्या आईस्क्रीमसाठी उणे तापमानाची (नक्की किती ते आत्ता आठवत नाही.) गरज असते. सहाजिकच दुधाच्याआईस्क्रीमच्या विजेचा खर्च वाढतो.

शिवाय दुधापेक्षा डालडा कच्चामाल म्हणून जास्त स्वस्त आहे. तस ते हाताळणी आणि प्रोसेसलाही खूप सोपेआहे. दुधाचे रोजचे कलेक्शन, त्याचे फ्रीजिंग आणि साठवण याचा विचार करता त्याची जी बेसिक किंमत होते. त्या किंमतीतही लोकांना ते आईस्क्रीम खाण परवडू शकत नाही. डालडा आईस्क्रीममध्ये खूप मोठे प्रोफिट मार्जिन आहे.म्हणूनच आजकाल इतके पॉश आईस्क्रीमआउटलेट निघू शकतात. ”

“डालडा आईस्क्रीम उत्पादनाचाआणखी एक फायदा असा आहे की एकच प्रोडक्शन युनिट चालवून भारत भर कुठेही आपण याचे वितरण करू शकतो.तेही कमी खर्चात. दुधाच्या आईस्क्रीमला तो बेनिफिट नाही. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रोडक्शन युनिट सुरु करावेलागेल.ह्यामुळेच जर आज तुम्ही मार्केट मधल्या प्रतितयश कंपन्याच्या आइसक्रीम चे प्रोडक्शन ठिकाण बघितल तर ते हरियाणा , मध्यप्रदेश इकडचे दिसेल आता त्याच कारण कळल"

तो रंगात आला होता. त्याने त्याचे नवीन नुकतेच बाजारात आलेले फ्लेवर टेस्ट करायला दिले.मला डालडा आईस्क्रिम खाल्ल्यामुळे नक्की काय तोटा होतो ते माहीत नाही.पण त्यानंतर आईस्क्रीम खायची मजा निघून गेली इतकं नक्की.

ह्यापुढे आइसक्रीम खाताना ब्रैंड महत्वाचा नसून त्याचे कंटेंट किंवा इंग्रीडियंट बघा ते महत्वाचे आहे. बाकी तुमचे निर्णय आणि आरोग्य दोन्हीही तुमच्याच हातात आहे ....
Frwrd

अमुल कंपनी यात सामिल असेल?:अओ: कारण घरी अमुलचे आईस्क्रीम बर्‍याच वेळा आणले जाते.

कापोचे धन्यवाद मनापासुन. वाचुन हबकायला झाले.

अमुल कंपनीची मी (वाचून) खाल्लेली तरी आईसक्रिम्सच होती. क्वालिटी वॉल्सची फ्रोझन डेझर्ट्स जास्त प्रमाणात आहेत. बाकीच्या कंपन्यांची कल्पना नाही.

जी आईसक्रिम्स पॅकमध्ये मिळतात त्यावर वाचता येते पण आज आईसक्रिम्स पार्लर्स खूप झाली आहेत. तिथे आईसक्रिम्स एका डब्यात ठेवलेले असते. ते स्कूपने कोनमध्ये किंवा कपमध्ये काढून देतात. त्यांच्याबाबतीत खरा धोका आहे. कारण त्यांचे घटक जाणून घेता येत नाही. छायाताई, त्यांच्या बाबतीत काही करता येणार नाही का?

माझ्या अनुभवावरून, फ्रोझन डेझर्ट्स खूप सावकाश विरघळतात, अगदी भर उन्हाळ्यात सुध्दा. आणि ती प्रचंड तुपकट लागतात. ज्यांना तुपकट्/तेलकट जेवण आवडत नाही त्यांना हा गुणधर्म चटकन ओळखता येतो.

प्रचंड उपयुक्त माहिती! धन्यवाद.
कपोचेंच्या विस्तृत प्रतिसादानी डोळे आणखीनच उघडले!

चांगली माहिती. निदान ह्यापुढे क्वालिटी वॉल्स वा तत्सम फ्रोझन डेझर्ट आणले तर तो informed choice असेल. ( तो व्हॉटसअ‍ॅप मेसेजही वाचला होता काही दिवसांपूर्वी )

पण ह्यावर अजून सविस्तर विवेचन व्हायला हवे आहे, विशेषतः तेल वापरलेले आईसक्रीम इतर आईसक्रीम्सपेक्षा तब्येतीला वाईट असते का ह्यावर.

एनडी टिव्हीवरचा लेख वरच्या लेखातल्यासारखीच माहिती देतो आहे. त्या लेखानुसार दुग्धजन्य फॅट्स वापरलेले आईसक्रीम आणि वनस्पतीजन्य फॅट्स वापरलेले प्रोझन डेझर्ट ह्यात कॅलरीज सारख्याच असल्या तरी फ्रोझन डेझर्ट्समध्ये जास्त प्रमाणात हायड्रोजनेटेड ऑईल्स / ट्रान्स फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स आहेत त्यामुळे आईसक्रीमच्या तुलनेत ती आरोग्यासाठी जास्त हानीकारक आहेत.

क्वालिटी वॉल्सने त्यांच्या साईट्सवर त्यांच्या फ्रोझन डेझर्ट्समध्ये डालडा ( हायड्रोजनेटेड ऑईल ) असते किंवा ट्रान्स फॅट्स असतात ह्याला अफवा म्हटले आहे आणि ह्या आरोपांचे खंडन केले आहे. त्यांचे स्पष्टीकरण इथे वाचता येईल.

क्वालिटी वॉल्सच्या फ्रोझन डेझर्ट्सचा कॅलरी तक्ता इथे बघता येईल. त्यात ट्रान्स फॅट्स शून्य आहेत असे दाखवत आहेत.

लॉजिक लावायला गेले तर फ्रोझन डेझर्टमध्ये साधे वनस्पती तेल ( डालडा नव्हे ) असेल तर त्यातले तेल दुग्धजन्य फॅट्सपेक्षा हेल्दी असायला हवे ( सॅचुरेटेड फॅट्स किंवा कॉलेस्टेरॉल नसल्याने ) उदा. लोणी वापरुन केलेल्या केकपेक्षा तेल वापरुन केलेला केक हेल्दी वाटतो.

दुसरीकडे मदर डेअरीच्या कोन्समधील आईसक्रीमचा 'माऊथफील' वॉल्सच्या आईसक्रीमसारखाच आहे ( नॅचरल्सचे आईसक्रीम ह्या 'माऊथफील' बाबतीत वेगळे वाटते. बाकी सगळी मुलायम, ओशट लागणारी व्हेजिटेबल ऑईल घातलेलीच असणार ) पण त्यांनी त्यांच्या साईटवर त्याला आईसक्रीमच म्हटले आहे, फ्रोझन डेझर्ट नाही.

वनस्पती तूप म्हणजेच डालडा नाही?
डालडा हा ब्रॅण्ड आहे असा समज होता ़ >>> मी व्हेजिटेबल ऑईलचे वनस्पती तेल असे शब्दशः भाषांतर केले आहे. ह्यात वनस्पतीच्या बियांपासून काढलेली शेंगदाणा, मका, करडई, सोयाबीन, सरकी, राईसब्रान ( ? ) अशी सगळी तेले येतात ( तिळाचे तेल पण येते का ते माहीत नाही. )
डालडाला आपण वनस्पती तूप म्हणतो कारण ते तुपासारखे घट्ट, थिजलेले दिसते.

हल्ली ही वनस्पतीजन्य तेलेही तब्येतीला चांगली नाहीत अशा आशयाचे खूप लेख वाचायला मिळतात.

एकंदरीत खूप गुंतागुंत आहे.

वरची पोस्ट मी क्वालिटी वॉल्सच्या समर्थनार्थ लिहिलेली नाही. मीही उत्तरेच शोधते आहे. व्हेजिटेबल ऑईल म्हणजे नक्की कुठले तेल ? ते किती प्रमाणात प्रोसेस्ड असते ह्या गोष्टी त्यांनी गुलदस्त्यातच ठेवलेल्या आहेत.

मि अमूल आइसक्रीम कंपनीत कोऑर्डिनेटर या पदावर काम करतो. आणि म्हणून मि आपणास हे खात्रीपूर्वक सांगू शकतो की अमूलचे आइस्क्रिमच नव्हे तर प्रत्येक उत्पाद हे गाई, म्हशीच्या शुद्ध दुधानेच बनविले जातात. तसेच FDA च्या नियमानुसार आइसक्रीम मधे 10% फॅट आवश्यक असले तरी अमूल आइसक्रीम मधे 13% ते 15% मिल्क क्रीम फॅट आम्ही ठेवतो.

अमूल म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी स्थापन केलेली एक शेतकऱ्यांची कोऑपरेटिव सोसायटी आहे. बक्कळ फायदा मिळावा म्हणून स्थापन झालेली व्यावसायिक कंपनी नव्हे.

धन्यवाद.. ग्राहक पंचायत आणि कापोचे.

मूळात कुणाच्या लक्षात जर एखाद्या ब्रांड बद्दल काही आले तर इथे तसे सांगण्यात काही कायदेशीर अडचणी येतील का ? नसतील तर प्रत्येकानेच आपापल्या लक्षात जे येईल ते इथे सांगावेच.

हल्ली ही वनस्पतीजन्य तेलेही तब्येतीला चांगली नाहीत अशा आशयाचे खूप लेख वाचायला मिळतात>>
ओमेगा-६ युक्त तेल हे ओमेगा-३ युक्त तेलाच्या तुलनेत कमी खायला हवे.
तसेच हायड्रोजनेटेड ऑईल म्हणजेच डालडा, मार्गारीन हे ट्रांस फॅट प्रकारात मोडते, जे आरोग्यासाठी घातक आहे.

खूपच माहितीपूर्ण लेख. कपोचेंच्या पोस्टही खूपच महत्वपूर्ण आहेत. दोघांचेही धन्यवाद!

हा सिझन सुरु झाल्यापासून आईस्क्रीम खाल्लंच नाहीये. 'डालडा' खायचा तो सुध्दा इतके पैसे मोजून -हे अजिबात अपील होत नाही!

सर्वांचे आभार. ही माहिती व्हॉट्स अप वर मिळालेली आहे. पडताळून पाहिलेली नव्हती, पण वाचताना एकंदरीत शंका घेण्यासारखं काही आढळलं नाही. गुगळल्यानंतर काही शंका फिटल्या. त्या आधी एकदा मदर डेअरीचं आणि एकदा अमूलचा फॅमिली पॅक आणला होता. दोन्ही वेळा माझ्या मुलाला उलट्या झाल्या. त्याला ते पचलं नव्हतं. नंतर दिनशॉचं आईस्क्रीम खाल्लं तेव्हां तूपासारखी चव लागली. दुकानदाराला विचारलं तर काहीच बोलला नाही.

हा फॉर्वर्ड मिळाल्यानंतर त्या दुकानदाराला फ्रोजन डेझर्ट नको, आईस्क्रीम असेल त्तर दाखव असं म्हटलं. तर त्याने हळू बोलायला सांगितले. मग कुल्फीत तूप नसतं असं सांगून कुल्फी दिली. पण कुल्फीचीही चव शेवटी शेवटी तूपासारखीच जाणवली. तेव्हांच मायबोलीवर ही माहिती द्यावी असं वाटू लागलं होतं. पण म्हटलं कुणीतरी काढेलच धागा !! आणि नेमकं ग्राहक पंचायती सारख्या आयडीने धागा काढला.

दुस-या एका धाग्यावर एक फॉर्वर्ड पोस्ट केला आहे. त्यात सुरूवातीला वनस्पती तूप / डालडा बनवण्याची पद्धत दिलेली आहे. माहितीसाठी दिलेय. गुगळून घ्यावे ही विनंती.

http://www.maayboli.com/node/52042?page=4#comment-3848943

दिनेशदा आपण ब्रॅण्ड्सची बदनामी करत नाही आहोत. ते आईस्क्रीम नाही, फ्रोजन डेझर्ट आहे हे आपण स्पष्ट करतोय. त्यांच्या पॅकिंगवर तेच लिहीलेलं आहे. त्यावर हायड्रोजनेटेड एडीबल ऑईल्स असे म्हटलेले आहे. आपणही तेच सांगतोय.

आईस्क्रीम मधे बर्फाचे बारीक कण असतात.

अमुल फसवत नाहीये याबद्दल निदान मला तरी खात्री आहे. कारण जर अमुलचे आईस्क्रीम जर दुधापासुन बनले नसते तर लाईट गेल्यावर सुद्धा त्याच्या चवीत फरक पडला नसता. पण जेव्हा मी घरी आईस्क्रीम आणले होते ( तेव्हा लाईट २ तास गेले होते तरी मी विसरुन ते आणले) तेव्हा ते दुध कसे वितळते त्या पद्धतीने वेगळी चव लागत होती.

कापोचे खूप धन्यवाद फोटो पण दिल्याबद्दल.

सेम मेसेज ८-१० दिवसांपूर्वी मलाही आला होता.इथे शेयर करायचे सुचले नव्हते.

क्वालिटी वॉल्स खाल्ल्यानंतर जिभेवर आणि घशाकडे ओशट थर येतो.ते फील अमूलचे आईसक्रीम खाऊन नाही येत. काही कुल्फ्या खाल्लानंतर असेच अनईझी वाटते.नॅचरल्सचे आईसक्रीमकसे वाटते हे उद्या खाऊन पाहिले पाहिजे.

एखाद्या ब्रांड बद्दल काही आले तर इथे तसे सांगण्यात काही कायदेशीर अडचणी येतील का ? >>
उत्पादक मंडळी पॅक वर " frozen desert" असं छापून एक प्रकारे आम्ही आधीच सांगितलं होतं, विकत घेताना तुम्ही ते नाही पाहिलं त्याला आम्ही काय करणार असला पवित्रा घेऊ शकतात, त्यावर ग्राहक म्हणून काय आपली भूमिका काय असावी ?
तसंच वर काही जणांनी म्हटल्या प्रमाणे, कागदी/प्लॅस्टिकच्या डब्यातून ज्याची विक्री होते अश्या ठिकाणी छापलेला मजकूर वाचायची सोय असते, पण मोठ मोठ्या देशी- विदेशी आईस्क्रीम पार्लर मधे डब्यात घालून ठेवलेले फ्लेवर्स, आपल्याला हवे तसे स्कूप ने काढून देतात, अश्या वेळी आपण नक्की काय खातोय हे कसं समजणार ?

या दोन बातम्या सगळं चित्र स्पष्ट करतात. जुन्या बातम्या आहेत. इकॉनॉमिक टाईम्स किंवा बिझनेस स्टँडर्ड मध्य अशा बातम्या छापल्या की कर्तव्य पार पाडल्याचे समाधान मिळत असावे. लहान मुलांच्या , मोठेही, आरोग्याशी चाललेल्या या प्रकाराबद्दल माध्यमे उदासीन का?

https://m.reddit.com/r/india/comments/4ekc6q/

http://articles.economictimes.indiatimes.com/2012-05-16/news/31726638_1_...

आईस क्रिम बरीच वर्षे आवडत आणि खात नसल्याने ते डालडा आहे हे कळून विशेष फरक पडला नाही.घरच्यांना नॅचरल्स खूप आवडते.
काल नॅचरल्स चा पॅक पाहिला त्यावर घटकांमध्ये व्हेज ऑइल नव्हते.पण नॅचरल्स पण फ्रिज मध्ये जास्त दिवस राहिल्यास बरेच तेलकट होते/आईसक्रिम चे चमचे खूप ओशट असतात असे जाणवते(कदाचित साय/क्रिम मुळे पण असू शकेल.)
अमूल आणि नॅचरल्स सोडून बाकी आईसक्रिमात एक इसेन्स चा वास असतो तोही आवडत नाही.
खरंतर 'कंटेन्स एडिबल ऑइल' लिहीणे पण मिसगायडिंग, 'कंटेन्स हायड्रोजनेटेड एडिबल ऑइल' लिहीणे योग्य.दोन्हीच्या गुणधर्मात बराच फरक आहे.शिवाय एक आईसक्रिम कप म्हणजे क्पभर फ्रुट इसेन्स वाले डालडा असेल तर 'कंटेन्स' लिहीणे सोयीस्करपणा आहे.' मेड अप ऑफ' बरोबर.
उन्हाळ्यात आमची पहिली पसंती कोल्ड कॉफी आणि खर्‍या आंब्याचा मँगो मिल्कशेक.

Pages