आईस्क्रीम, कुल्फी इ. इ. की आणखी काही?

Submitted by मुंबई ग्राहक पं... on 25 April, 2016 - 01:27

आपण जे खातो ते ‘तेच’ आहे का, असा प्रश्न आपल्याला सहसा पडत नाही, म्हणजे बटाटेवडा मागितला आणि मका पॅटीस समोर आले, तर ओळखतोच की पटकन! किंवा तेलपोळीला कुणी पुरणपोळी म्हणू लागले तर त्याला वेडयातच काढू की नाही? पण बाजारात मिळणा-या सगळ्याच पदार्थाबाबत आपल्याला पुरेशी माहिती असतेच, असं नाही होऊ शकत.

plain-pista-mini[1].jpg

शिवाय आता अन्नप्रक्रिया उद्योगाने व त्यासंदर्भातील संशोधन व तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केलीय, की नित्य नवीन नवीन चवीचे, आकारा-प्रकाराचे पदार्थ, छान छान रंगीबेरंगी वेस्टनामधून आपल्याला जणू बोलावीत असतात. या, या, मला घ्या, खाऊन तरी बघा, असा आग्रह करीत असतात.
म्हणूनच, आपण नक्की काय खातोय, याची माहिती कशी करून घ्यावी. याचा गृहपाठ करायला हवाच. मुंबई ग्राहक पंचायतीचा शिक्षण विभाग त्यासाठी खाद्यपदार्थाच्या वेष्टनावर काय असावे, ते कसे वाचून समजून घ्यावे, यासाठी सर्व वयोगटांसाठी प्रबोधनपर शिबिरे आयोजित करीत असतो. तरीही एक प्रश्न उरतो तो म्हणजे काही पदार्थ असतात. त्यावरचे वेष्टन वाचून समजून घेऊन मग खरेदी करायची हे शक्यच नाही. त्यापैकी महत्त्वाचा पदार्थ म्हणजे आईस्क्रीम.
उन्हाळा वाढत जातो. तशी आईस्क्रीम, कुल्फी आणि थंडगार पन्हे, सरबत यांची मागणी वाढत जाते. टेट्रॉपॅकमधली लस्सीसुद्धा पटकन प्यायली नाही तर ‘गरम’ होईल. म्हणून आपण ती बनवणा-या कंपनीचे नाव, किंमत काही न बघता, तिच्यात स्ट्रॉ खूपसून ती तोंडाला लावतो. अशा परिस्थितीत आईस्क्रीमचे वेष्टन वाचून ते समजून घेऊन मग खाण्याची कल्पना तरी शक्य आहे का? अहो, ते वितळून जाईल ना!
चॉकोबार असेल तर वरचा चॉकलेटचा थर वेडावाकडा होऊन निसटेल, कोनात घेतलं असले तर ओघळून बाहेरच सांडेल, शिवाय आईस्क्रीम म्हणजे आईस्क्रीम, त्यात काय वेगळे असणार? अगदी बरोबर त्यात वेगळे असतात ते स्वाद. जसे की चॉकलेट, व्हॅनिला, बटरस्कॉच, ब्लॅक करंट इ. इ. अगदी नुसती ही नावे लिहितानासुद्धा माझ्याच तोंडाला पाणी सुटते.
मग प्रत्यक्ष विकत घेऊन खाताना ते ग्राहक पंचायतीने शिकवलेले मुद्दे कसे बरे आठवणार? पण तरीही आरोग्याबाबत जागरूक असणा-या आमच्या सदराच्या ग्राहक, वाचकांना हे माहीत हवे की ‘आईस्क्रीम’सारखी दिसणारी, भासणारी पण ‘आईस्क्रीम’च्या व्याख्येत न बसणारी उत्पादनेसुद्धा मार्केटमध्ये आहेत. त्यांच्या वेष्टनावर किंवा जाहिरातीतसुद्धा कधीही ‘आईस्क्रीम’ असा शब्द नसतो. पण सामान्य ग्राहकाला ती ‘आईस्क्रीम’च वाटतात. त्या प्रकाराला म्हणतात ‘फ्रोझन डेझर्ट’.
त्यामध्ये पण बटरस्कॉच, व्हॅनिला, चॉकलेट असे प्रकार असतात. पण आईस्क्रीम म्हणवून घेण्याची मूळ अट म्हणजे केवळ दुग्धजन्य क्रीमच त्यात नसते. त्यात वनस्पतीजन्य ‘फॅट’/तेल/ हायड्रोजनेटेड वनस्पतीजन्य फॅट असते.
आता हे तेल बाजारात उपलब्ध असणारे पाम, शेंगदाणा, कनोला इ. कोणतेही एक (अगर अनेकही) असते. ते नक्की कोणते हे वेष्टनावर सांगणे बंधनकारक नाही. शिवाय त्यात मिल्क सॉलिड्स असतात, जे आईस्क्रीममध्येही असतात. मात्र प्रोटीन दुग्धजन्यच असेल असे नाही. काही फ्रोझन डेझर्टवर ‘सोया प्रोटीन’ असे ‘घटकपदार्थाच्या’ यादीत आढळून आले आहे.
यासाठी या दोन समान भासणा-या व दिसणा-या उत्पादनांमधला फरक आपण समजून घेऊन मग ते खरेदी करावे, फ्रोझन डेझर्टला जे/गे लाटोज असेही नाव आहे, ते स्टॉल्सवर ‘कोन’मधून मिळते. मात्र तिथेही आईस्क्रीम असा शब्द नसतो. शिवाय आईस्क्रीमबाबत आपणाकडे ठोस प्रमाणीकरण (standardisation of product) आहे. म्हणजे कसे की, त्यात कमीत कमी १० टक्के मिल्क क्रीम (स्निग्धता) हवे व चांगल्या आईस्क्रीममध्ये क्रीम १२ टक्के हवे. साखर १५ टक्के त्यानंतर मग दुग्धजन्य घनपदार्थ (एसएनएफ) फळे, स्वाद इ. पण मुळात क्रीम व साखरेचे प्रमाण ठरलेले आहे.
तसेच त्यात ‘शुगर फ्री’सदृश रसायने नसली पाहिजेत. पाहा बरे, आईस्क्रीममधले क्रीम आणि साखरेचे प्रमाण हे एखाद्या क्रीम कुकीपेक्षा खूप कमी आहे. सॉफ्टीमध्ये तर केवळ ६ टक्केपर्यंत फॅट असावी आणि साखर १२ ते १५ टक्के. यावरून कळेल की मर्यादेत खाल्ले तर आईस्क्रीम/ सॉफ्टी आपल्याला खूप सारी साखर किंवा फॅट देत नाहीत.
मात्र डेझर्टबाबत असे निश्चित प्रमाण आढळत नाही. शिवाय त्यातील फॅट, प्रोटीन इ. सर्वाना सोसतील असे नाही. त्यामुळे जर कधी खास करून बालके/ वृद्धांना एखादे फ्रोझन डेझर्ट खाऊन त्रास झाला, तर त्याबाबत जागरूक राहायला हवे. शिवाय ‘हायड्रोजनेटेड् फॅट’ ही आरोग्यासाठी उपकारक समजली जात नाहीत. त्यामुळेच तिचे नियमित सेवन, कदाचित आपल्या नकळत होत असेल, तर त्याचीही काळजी आपणच घेतली पाहिजे.
जे खवय्ये आपली रसना परजून असतात. त्यांना जिभेवर ठेवलेला थंडगार तुकडा आईस्क्रीमचा की फ्रोजन डेझर्टचा हे कळू शकते. ज्याला ‘माऊथफील’ असे म्हणतात, तो या दोन पदार्थाचा वेगळा असतो आणि हो, कुल्फीचा त्याहून वेगळा. ‘कुल्फी’ म्हणजे एकदम ‘जड’ बरे का! ती विकली जाते वजनावर, तर आधीचे दोन भिडू मापाने. म्हणजे मि.ली.च्या प्रमाणात. कारण आईस्क्रीमच्या प्रकारानुसार त्यात ७० ते ९५ टक्के हवा असू शकते. सॉफ्टीत ३० ते ५० टक्के. त्यामुळे ते तोंडात बोचत नाही.
सर्वसामान्य ग्राहकांनाही हे तपशील माहीत असायला हवेत. जेणेकरून आपण जे खातोय ते ‘तेच’ आहे हे समजेल. त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आपल्या आरोग्याशी या सा-या गोष्टी थेट जोडलेल्या आहेत, म्हणून त्या जाणून घ्यायलाच हव्यात.
- वसुंधरा देवधर, मुंबई ग्राहक पंचायत
पुर्वप्रसिध्दी - दैनिक प्रहार - प्रतिबिंब
मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभाग
सदर लेख मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे असे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हॉट्स अप वरचे फॉरवर्ड काही दिवसांपूर्वी वाचले होते....तेव्हापासुन आईस्क्रीम खायची खरच भिती वाटते आहे...
तो मॅसेज वाचल्यापासुन आम्ही बाहेर आईस्क्रीम खाणं खरच बंद केलयं....अगदी समारंभात सुद्धा जेवणानंतर जे आईस्क्रीम असते ते खाण पण सोडुन दिलय....

परवा बरेच दिवसांनी नॅचरल्स चं आईस्क्रीम आणलं....त्याच्या बॉक्स वर कंटेंट्स पाहिले तेव्हा " मिल्क सॉलीड्स आणि मॅन्गो पल्प " एवढच छापलेलं होतं.....आणि आईस्क्रीम अज्जिबात तुपकट वगैरे लागलं नाही....उलट मधे मधे हल्के हल्के बर्फाचे तुकडे पण लागत होते...त्यामुळे माझ्यापुरतं मी समाधान करुन घेतलय की नॅचरल्स आईस्क्रीम त्यातल्या त्यात चांगलं आहे.....
खत्री बंधुंचं आईस्क्रीम खातना पण सेम अनुभव आला....त्यामुळे असे एक दोन ठरावीकच ब्रॅन्ड यापुढे खायचे असं मनाशी ठरवलय...

(त्या आधी एकदा मदर डेअरीचं आणि एकदा अमूलचा फॅमिली पॅक आणला होता. दोन्ही वेळा माझ्या मुलाला उलट्या झाल्या. त्याला ते पचलं नव्हतं.)
कापोचे,तुमच्या मुलाला उलट्या झाल्या कारण अमूल व मदर डेअरी ही दोन्ही उत्पादने संपूर्ण दुधापासून बनवली जातात आणि दुध पचण्या साठी जड असते. आणि म्हणूनच तुमच्या मुलाला शुद्ध दुध न पचल्यान्या उलट्या झाल्या....

बाळबोध प्रश्नः ही लिंक (अर्थातच लेखकाच्या नावानिशी) फेबुवर शेअर केली तर चालेल का?

बाकी घरी केलेली कोल्ड कॉफी आणि मँगो मिल्कशेकला आमच्या घरी पर्याय नाही. रुचिपालट म्हणून अमूलचं छोटं कप आईस्क्रीम. त्यामुळे फार काळजी नाही. पण कुटूंबातील इतरांना सांगायला पाहिजे.

रच्याकने, कॉर्नेटो वगैरे किंगकोन्स कशात मोडतात (वितळतात Wink ) म्हणे?

कॉर्नेटो क्वालिटी वॉल्सचं आहे. सो अ‍ॅव्हॉईड.
इथे मबोवर मुग्धटली यांची घरगुती आईस्क्रीमची रेसिपी आहे ती ट्राय करता येईल. एकदम सेफ आणि स्वस्तही पडेल. पण त्यातही मिल्क पावडर आहे. ती कशापासून बनवतात देव जाणे.

मी, वाडीलाल चे ५ आणि १० रूपयांचे आइसक्रीम कप पाहिले. त्यावर लिहिलंय- Medium Fat Frozen Dessert. आणि त्याच्या Ingredients मध्ये Edible Veg. Oil चा उल्लेख आहे.

Pages