आउटलायर:पुस्तक परिचय

Submitted by अश्विनी कंठी on 3 April, 2016 - 21:27

आपण आपल्या आजूबाजूला लोकांना आयुष्यात यशस्वी झालेले पाहतो आणि त्यातल्या कित्येकांचे वर्णन ‘स्वकर्तृत्वावर पुढे आलेला’ असे ऐकतो. परंतु यशस्वी होण्याकरता हुशारी आणि कर्तुत्व सोडून इतरही अनेक घटक कारणीभूत असतात असे माल्कम ग्लाड्वेल या लेखकाला वाटते. या इतर ‘अदृश्य’ घटकांचा शोध त्याने त्याच्या ‘आउटलायर’ या पुस्तकामधून घेतला आहे. लेखकाच्या मते यशस्वी होण्याकरता ‘हुशारी’ हा जरी मुलभूत घटक आवश्यक असला तरी एका ठराविक टप्प्यानंतर, बुद्धी आणि यश यांचा संबंध नसतो. नाहीतर प्रत्येक हुशार माणूस यशस्वी झाला असता.

यापैकी सगळ्यात पहिला ‘अदृश्य’ घटक म्हणजे ‘जगावेगळ्या संधी आणि नशीब’. ज्या हुशार लोकांना त्यांच्या नशिबाने चांगल्या संधी मिळवून दिल्या, ते आयुष्यात कमालीचे यशस्वी झाले. उदाहरणार्थ बिल गेट्स. बिल गेट्स निश्चितच हुशार होते, पण त्याच जोडीला त्यांच्या नशिबाने त्यांना योग्य वेळी साथ दिली. लेखक म्हणतो की जर बिल गेट्सचा जन्म १० वर्ष आधी झाला असता, त्यांना शाळेमध्ये साठीच्या दशकात कॉम्प्यूटर अमर्याद प्रमणात वापरायला मिळाला नसता (जे त्या काळी फार दुर्मिळ होते), त्यांनी विसाव्या वर्षाआधीच दहा हजार तासांहून अधिक प्रोग्रामिंग करण्याचा सराव केला नसता, तर ते आज इतके यशस्वी झाले नसते. लेखकाने बिल गेट्स यांना मिळालेल्या एक नाही, दोन नाही, तर तब्बल ९ जगावेगळ्या संधींची जंत्रीच मांडली आहे. या सर्व संधींचा त्यांच्या यशात खूप मोठा वाटा आहे. स्वतः बिल गेट्सनी या संधींचा उल्लेख ‘incredible series of lucky events’ असा केला आहे.

दुसरा घटक आहे ‘पूरक आणि पोषक वातावरण’. घरातले वातावरण, पालकांचा सुशिक्षितपणा यावर देखील बरेचसे यश अवलंबून असते. सुशिक्षित पालक सजगतेने मुलांना घडवतात. त्यामुळे मुले जास्त आत्मविश्वासपूर्ण आणि अनुभव संपन्न बनतात . अश्या मुलांची उन्हाळ्याची सुट्टी काहीतरी नवीन शिकण्यात जाते. त्यांना समाजात कसे वावरायचे हे माहीत असते. मुलांच्या भविष्याला पालक आकार देतात, जागरूक पालकांमुळे मुलांना भावनिक आणि आर्थिक आधार मिळतो, समाजात ओळखी तयार होतात, ज्याचा त्यांच्या यशात मोलाचा वाटा असतो.

पुढचा घटक म्हणजे ‘सांस्कृतिक वारसा, धर्म आणि सामाजिक पार्श्वभूमी’. एशिअन मुले गणितात हुशार असतात. गणित शिकण्याकरता सातत्याने कष्ट करण्याची गरज असते. लेखकाच्या मते, असे कष्ट करणे हे एशिअन मुलांच्या रक्तातच असते, कारण त्यांच्या देशात शेकडो वर्ष चालत आलेली भातशेती त्यांना सतत कष्ट करायला शिकवते. पाश्चिमात्य देशांमध्ये शेतकरी वर्षातून फक्त चार महिने काम करतात आणि उरलेले आठ महिने आराम करतात. पण एशिअन देशांमध्ये शेतकरी बारा महिने शेती किंवा शेतीला पूरक अश्या कामांमध्ये बुडून गेलेला असतो. या जीवनशैलीमुळे एकूणच समाजाला सातत्याने कष्ट करण्याची सवय लागते. हीच सवय विद्यार्थीदशेत एशिअन मुलांच्या अभ्यासातून दिसून येते. शिवाय ही मुले वर्षाला २४० दिवस शाळेत जातात (त्यांच्या तुलनेने, अमेरिकन मुले दरवर्षी फक्त १८० दिवस शाळेत जातात).

लेखकाचा एक आवडता सिद्धांत आहे आणि तो म्हणजे कोणत्याही विषयात प्राविण्य मिळवण्याकरता दहा हजार तासांचा सराव आवश्यक असतो. याकरता ते बीटल्स या गाजजेल्या रॉक बँडचे उदाहरण देतात. बीटल्सच्या लोकप्रियतेचे श्रेय लेखक त्यांनी केलेल्या दहा हजार तासांच्या सरावाला देतो. ज्यामुळे त्यांना संगीतात कौशल्य प्राप्त झाले आणि ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोचले.

याच जोडीला लेखकाला असे वाटते की एखाद्याचा जन्म कधी झाला या गोष्टीवर सुद्धा यश अवलंबून असते. अमेरिकेत सॉकर खेळणारे खेळाडू लहानपणापासून प्रशिक्षण घेत असतात. शाळा-कॉलेजात त्या त्या वर्षीचे संघ डिसेंबरपर्यंत वयोमर्यादा असलेल्या खेळाडूंचे बनवले जातात. अश्या वेळी ज्या खेळाडूंचा जन्म जानेवारी महिन्यात झाला असेल त्यांना, डिसेंबरमध्ये जन्म झालेल्या खेळाडूंपेक्षा नेहमीच जास्त काळ प्रशिक्षण मिळते, ते जास्त काळ सराव करतात आणि म्हणूनच त्यांची अंतिम फेरीनंतर संघात निवड होते आणि ते आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू बनतात.

या आणि यासारख्या अजून कित्येक गोष्टींवर माणसाचे यश अवलंबून असते हे लेखकाने भरपूर संशोधन करून, पद्धतशीर अभ्यास करून दाखवून दिले आहे. त्यांचे हे सिद्धांत वाचणे म्हणजे उत्कंठावर्धक तर आहेच, शिवाय बुद्धीला खाद्यदेखील आहे. या लेखकाची विचार करण्याची पद्धत नेहमीच प्रचलित असलेल्या समजांना छेद देत, वाचकाला वेगळ्या दृष्टीने विचार करायला लावणारी आहे. हे सगळे मुद्दे लेखकाच्या शैलीत वाचणे खूप इंटरेस्टिंग आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users