माझा एकमेव ड्यु आयडी ( - मदर वॉरिअर)

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

मायबोलीवर येऊन १३-१५ वर्शं झाली तरी माझा एकच आयडी कायम होता तो म्हणजे बस्के. लोकं ड्युआय का काढतात ह्याचे नवल मात्र कायम वाटायचे. एक म्हणजे गरज काय, अन दुसरे म्हणजे हे सर्व मॅनेज करणे किती अवघड जात असेल?

दोन्ही प्रश्नांची उत्तरं मला मिळाली यथावकाश. मला ड्यु आय घेऊन का होईना पण व्यक्त होण्याची गरज पडली. आणि ते सर्व, दोन दोन आयडेंटिट्या मॅनेज करणे किती अवघड जाते हे ही समजले.

तीन वर्षापूर्वी माझ्या आयुष्यात एक वादळ आले. पहिले एक दिड वर्षं आपलं आपलं मॅनेज करून नेलं निभावून. पण हळूहळू व्यक्त होण्याची गरज ( तीही नॉर्मल, अ‍ॅडल्ट लोकांबरोबर) प्रॉपर संभाषणाची गरज खूप भासू लागली. माझे सोशल लाईफ आधीच तसे कमीच होते व ह्या नवीन परिस्थितीमुळे चांगलेच हँपर झाले होते.

हिच ती गरज व मीच ती मदर वॉरीअर.

सुरवातीला केवळ ऑटीझमबद्दल माहिती पोचवणे व जमेल तितके व्यक्त होणे इतकाच उद्देश होता. व तो पार पाडणे जमतही होते. मात्र हळूहळू मला ह्या दोन दोन आयडेंटिट्यांचा खूप त्रास होऊ लागला. मी बस्के म्हणून मायबोलीवर येणे बरेच कमी केले. कारण चुकून इकडचा संदर्भ तिकडे देणे वगैरे होणे मला तेव्हा परवडण्यासारखे नव्हते.

बरेच ड्युआय सुखाने नांदत असतात. मग मलाच का आयडेंटिटी रिव्हिल करायची आहे? कारण मी अशी मूळात नाहीये. मला जे जसे आहे ते तसे बोलायला, व्यक्त व्हायला आवडते. पण गेल्या काही वर्षात सिचुएशनमुळे व मी तयार केलेल्या ह्या कप्प्यांमुळे मला नॉर्मल संभाषण अवघड बनत गेले. मुलांच्या गप्पा होत असताना मी एकदम शांत बसणार. काही म्हणजे काहीच बोलता येत नाही. कारण ना कोणाला माहित आहे ऑटीझमबद्दल, न मला नॉर्मली बोलता येतंय मुलांचे चिमखडे बोल वगैरे बाबत. शिवाय मला स्वतःला स्प्लिट पर्सनालिटी आहे की काय असे वाटावे इतका गोंधळ सुरू झाला. ज्या मैत्रिणी मुलाचा ऑटीझम जाणून आहेत त्यांनी बस्केला विचारले मवॉ तू आहेस का? बस्के म्हणणार नाही. बस्केच्या ओळखीच्या आयडींशी मदर वॉरिअर , कोण तुम्ही, कुठे असता करत बोलणार! सगळा खरंच सावळा गोंधळ!
माझ्या आधीच कॉम्प्लीकेटेड असलेल्या आयुष्यात हा गोंधळ मला वाढवायचा नव्हता. तो असा वाढेल असे वाटलेही नव्हते. पण झाले खरे तसे.

शिवाय ह्यासर्वात ऑटीझम अवेअरनेसचे काय? मी माझ्या नाव/गावासकट जेव्हा ऑटीझमबद्दल बोलीन, तेव्हा तो जास्त लोकांपर्यंत पोचेल रादर दॅन मवॉमार्फत.
कोण मवॉ? कोण जाणे. तिच्यावर कोणी का विश्वास ठेवावा?

असं सगळं होऊ लागले. अन मला हे अनबेअरेबल झाले. सो... मी, बस्के, भाग्यश्री - मीच मदर वॉरीअर, स्वमग्नता एकलकोंडेकर आहे. इथून पुढे ऑटीझम विभागात बस्केच लिहीत जाईल. Mother warrior, goodbye! You gave me tremendous support when it was truly needed!
थँक्स मायबोलीकर्स, मवॉला इतके सांभाळून घेतल्याबद्दल!

विषय: 
प्रकार: 

आम्ही जर मुलाच्या ऑटीझममुळे मुखवट्यामागे लपणार असू तर उद्या ह्यातून मुलाला काय मेसेज जाईल? प्रॉब्लेम्सपासून पळा, लपून राहा? ते नको व्हायला. जे आहे ते , आहे तसे स्विकारता आले पाहिजे - ह्याची ही एक पहिली स्टेप होती. >>> यु सेड इट गर्ल!!

मी तुमचे लेख वाचलेले नाहीत, तुम्हाला (माबोकर या नात्याने) ओळखतही नाही.

पण
" आम्ही जर मुलाच्या ऑटीझममुळे मुखवट्यामागे लपणार असू तर उद्या ह्यातून मुलाला काय मेसेज जाईल? प्रॉब्लेम्सपासून पळा, लपून राहा? ते नको व्हायला."
याबद्दल _/\_.
इथे सर्वांना टोपणनावाबद्दल सांगुन तुम्ही योग्यच केलेत, आणि याची तुम्हालाही खात्री पटली असेलच.
तुम्हा तीघांनाही शुभेच्छा.

भाग्यश्री उर्फ मदर वॉरीअर

म वॉ नावाने लिहीताना तुम्ही स्वतःच मन मोकळ करताना, तुमच्या त्याच लिखाणाने ईतरांनाही नकळत
धीर देत होतात,

तुमचा सार्थ अभिमान आहे !!

तुम्ही बस्के या आयडीने लिहिलेले लिखाण अपवादानेच वाचले असेल. परंतु तुम्ही स्वमग्नता एकलकोंडेकर/मदर वाॅरियर या आयडीने लिहिलेले लिखाण प्रत्येक वेळी वाचले आहे.

आणि आज तुमच्या या लेखामुळे तुमच्याबद्दल मनातील आदर द्विगुणित झाला. कारण ज्या पद्धतीने तुम्ही संपूर्ण परिस्थिती हाताळलीत आणि आज मनातील द्वंद्व संपुष्टात आणलेत ते खुप कठीण असते.

यू आर इनडीड अ वॉरीयर ! अश्या सगळ्या परीस्थीतीतही स्वतःचा कॉनशन्स राखणं आणि इतक्या क्लॅरीटीने विचार करणं... बस्कू, हॅट्स ऑफ आणि बिग हग !!

मदर वॉरिअर बनण्यामागची भूमिका पटली आणि ते रिव्हिल करायचीही. तुझे लेख खूप उपयोगी आणि मार्गदर्शक आहेत. असेच लिहीत रहा, व्यक्त होत रहा. खूप अभिमान आहे तुझा आणि राहील. हॅट्स ऑफ!

मवॉचे लेख वाचले आहेत. तुमची भूमिका पटलीच. लिहीत रहा. व्यक्त होत रहा. शेवटी पोटाशी धरणारा आणि पोटाशी धरला गेलेला ह्या दोघांनाही एकमेकांचाच आधार आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा!

बस्के, हॅट्स ऑफ इन्डीड .. तुम्हाला अगदी मनापासून शुभेच्छा!

>> शेवटी पोटाशी धरणारा आणि पोटाशी धरला गेलेला ह्या दोघांनाही एकमेकांचाच आधार आहे.

सुंदर विचार! Happy

म वॉ चे लिखान नेहेमीच प्रेरणादायी होतं आणि त्यामागचा चेहेरा कोणाचा असा प्रश्नच कधी मनात आला नाही.

बस्केचे लिखाण पण आवडायच्च शिवाय माबोच्या उपक्रमांत सहभाग शिवाय मैत्रिण चा डोलारा उभा करणे यामुळे बस्कूचं कौतुक नेहेमीच वाटत आलय. पण आता हे दोन्ही चेहेरे एकच आहेत हे समजल्याने तुझ्याबद्दलचा अभिमान आणि कौतुक मनात मावत नाही.

तुझ्याकडून शिकण्यासारखं कितीतरी आहे. तुला, निनादला आणि नीलला मनःपूर्वक शुभेच्छा!

गॉड ब्लेस यू ऑल!

बस्के, तू खरचं ग्रेट आहेस. तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा!

बाकी मागच्या पानावर मैत्रेयी आणि अगो च्या प्रतिक्रियांना +१

डु आय्डि घेण्यामागची कारणं काहिहि असोत, पण आता तो झटकुन टाकण्यातलं धैर्य आणि प्रामाणिकपणा खुप भावला. सगळ्यांनाच जमत नाहि ते. मुल्गा नशिबवान आहे तुमचा...

बस्के हा लेख लिहिण्यामागची भुमिका लेख आणि वरची प्रतिक्रिया याद्वारे योग्यपणे पोहोचली आहे.

तुझं बाकी लिखाण वाचलं की नाही हे आठवत नाही पण मदर वॉरियर म्हटल्यावर सगळा संघर्ष डोळ्यापुढे उभा राहतो. लिहित राहा. तुला ज्या आयडीने व्यक्त व्हायचं आहे त्याने व्यक्त हो. तुझ्या लिखाणामुळे आमच्यासारख्या सगळ्याच पालकांना आधार्/प्रेरणा मिळते.

बिग हग Happy

बस्के, प्रत्येक वेळी प्रतिसाद नसेल दिला पण तुमचे सगळे लेख वाचते. तुमच्या अचाट धैर्याचे, प्रयोगशीलतेचे, सकारात्मक वृत्तीचे कौतुक वाटते. खर्या warrior आहात तुम्ही. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना मनापासून शुभेच्छा!

आयला बस्के तू आहेस मदर वॉरियर?

म्हणजे नेहमीच्यापैकीच कोणीतरी असेल असे वाटले होते. पण ती तू असशील असे नव्हते वाटले.

हॅट्स ऑफ टू यु !

बस्कू, We all love you and we are always with you dear. नील तर संयुक्तामुळे त्याच्या जन्मापासून माहित आहे, फेसबूकवर पाहिलेलाही आहे त्यामुळे आमचाच आहे. आता मोकळं वाटतंय ना? Happy

मी ह्या आयडीकडे 'डुप्लिकेट आयडी' म्हणून कधीही बघितलं नाही तर अ‍ॅनॉनिमसली व्यक्त होण्याची गरज म्हणून एका खर्‍या व्यक्तीने घेतलेले सार्थ टोपणनाव आणि प्रामाणिक, कळकळीचे लेखन अशा नजरेतूनच कायम मदर वॉरियरचे लेख वाचले.

+१००

मुळात डुप्लिकेट आयडी हा शब्दप्रयोगही इथे लागू होत नाही. एखादा लेखक गद्य एका नावाने व पद्य दुसर्‍या नावाने लिहितो तसे काहीसे हे. आणी हो, अनेकदा ड्यू आयडींच्या मुखवट्यांमागचे चेहेरे जाणून घेण्याची उत्सुकता वाटते पण पण म.वॉ. ह्या आयडीबद्दल तसं कधीच वाटलं नाही या परागच्या वाक्यालाही अनुमोदन.

तुम्हा तिघांना अनेक शुभेच्छा !

बस्केनं हे लिहिलंय ते आपल्याला कळवायला लिहिलेलं नाहीये. तिनं तिच्या वाटचालीत एक महत्त्वाचा टप्पा पार पाडलाय आणि हे उघड करण्याची हिंमत दाखवली आहे. >>>

मामी, त्यांनी कशासाठी लिहीलंय हे तुम्ही सांगितलंत त्याबद्दल आभार. मी कशासाठी अशी प्रतिक्रिया दिली ते कळवतो. माझी आणि बस्केंची ओळख नाही, ना मवॉची. मवॉ यांची कळकळ जाणवली तेव्हां त्या कुठल्या ताणातून जाताहेत हे जाणवलं होतं. त्यांनी तो आयडी त्रास द्यायला काढलेला नाही हे सांगण्याची आवश्यकता नाही. उलट इतरांसाठी मार्गदर्शक ठरलेला आयडी होता तो. उत्सुकता असेल किंवा काहीही पण मवॉ म्हणजे कोण याची चौकशी सुरू झाली त्यामुळे त्यामुळे त्यांना अ‍ॅडीशनल ताण आला. या संदर्भात ते लिहीलेलं होतं. असो.

उघड करण्याची हिंमत वगैरे बद्दल नो कॉमेण्ट्स. या बाफवर ही पोस्ट लिहावी लागली याचं वाईट वाटतंय.

बस्के तुमच्या जिद्दीला प्रणाम! प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देली गेली नसेल पण तुमचे सर्वच लिखाण मी नेहमीच वाचते. माझ्याबाबतीत तरी ऑटीझम अवेरनेस तुमच्यामुळेच आला आहे. तुम्ही लिहित रहा मोकळ्या होत रहा. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

Mother warrior... Hats off to you and a big hug,, great ashes! Saglya pratisadanshi me sahamt aahe.
Bhagyashree.. we love you and very proud of u!! Happy

Aval taai..tumhi nehmich khup chhan bolta..agadi manatla!!

तुम्ही बस्के या आयडीने लिहिलेले लिखाण अपवादानेच वाचले असेल. परंतु तुम्ही स्वमग्नता एकलकोंडेकर/मदर वाॅरियर या आयडीने लिहिलेले लिखाण प्रत्येक वेळी वाचले आहे.

आणि आज तुमच्या या लेखामुळे तुमच्याबद्दल मनातील आदर द्विगुणित झाला. कारण ज्या पद्धतीने तुम्ही संपूर्ण परिस्थिती हाताळलीत आणि आज मनातील द्वंद्व संपुष्टात आणलेत ते खुप कठीण असते.>>>>>> अगदी अगदी!

कपोचे - उत्सुकता असेल किंवा काहीही पण मवॉ म्हणजे कोण याची चौकशी सुरू झाली त्यामुळे त्यामुळे त्यांना अ‍ॅडीशनल ताण आला. >>> असे काही झाले नाहीये. एकादोघांनी विचारणे ह्याला मी चौकशी सुरू झाली म्हणणार नाही. माझ्या जवळच्या लोकांची उत्सुकता व आपुलकी मला समजू शकते. मी जो ताण बोलत आहे - तो केवळ अन केवळ माझ्या व माझ्या घरातील परिस्थिती अन लाईफ्स्टाईलमुळे आलेला ताण आहे. त्याचा इतरांशी संबंध नाही.
____________________________________________________________________
सगळ्यांचे खूप आभार. मला इतकं ओव्हरवेल्मिंग वाटतंय कालपासून, सगळ्यांच्या सदिच्छा वाचून. इतके गुडविल मी कधी गोळा केले कोणास ठाऊक? मला कायम वाटत आले मी माणूसघाणी मुलगी आहे. :|

जेव्हा असं वाटू लागले की, आता जरा बोलावे ह्याबाबतीत. मी एक एक करून मैत्रीणींना सांगायला सुरूवात केली खरी - पण लवकरच लक्षात आले. माझा मायबोली परिवार खूप जास्त मोठा आहे, मला सर्वांना पर्सनली सांगणे शक्यही नाहीये. तेव्हापासूनच असा लेख लिहून टाकावा असं वाटू लागले.

अँड ट्रस्ट मी - त्या लेखांमधून मी जितकी बेस्ट मदर वाटते तितकी मी नाहीये. मी माणूसच आहे, बर्‍याच चुका करणारी. लिहून फक्त समजते माझे मलाच, काय केले पाहिजे अमुक परिस्थितीत.

सर्वांचे परत एकदा आभार.

तुम्ही बस्के या आयडीने लिहिलेले लिखाण अपवादानेच वाचले असेल. परंतु तुम्ही स्वमग्नता एकलकोंडेकर/मदर वाॅरियर या आयडीने लिहिलेले लिखाण प्रत्येक वेळी वाचले आहे.>> +१

अधिक काय लिहू? तुम्ही माझ्यासाठी आणि माझ्यासारख्या अनेकांसाठी एक प्रेरणास्थान आहात, आदर्श आहात आणि राहाल.
प्लीज यापुढेही लिहित्या राहा...तुमच्या लेकाच्या ऑटिझमवर मात करण्यात उत्तरोत्तर होणार्‍या प्रगतीबद्दलही आणि इतरही अनेक विषयांवरही! खूप खूप शुभेच्छा!

बस्के धन्यवाद.

ज्या मैत्रिणी मुलाचा ऑटीझम जाणून आहेत त्यांनी बस्केला विचारले मवॉ तू आहेस का? बस्के म्हणणार नाही. बस्केच्या ओळखीच्या आयडींशी मदर वॉरिअर , कोण तुम्ही, कुठे असता करत बोलणार! सगळा खरंच सावळा गोंधळ!
माझ्या आधीच कॉम्प्लीकेटेड असलेल्या आयुष्यात हा गोंधळ मला वाढवायचा नव्हता. तो असा वाढेल असे वाटलेही नव्हते.

यामुळे माझा गैस झाला होता. क्षमस्व !

पुन्हा पुन्हा वाचते आहे. बस्केच्या जुन्या पोस्टस डोळ्यांसमोरून सरकतायत आणि मदर वॉरियरचे अनुभव, त्यातून शहाणं होणं, कमालीची जिद्द आणि सकारात्मकता! माहितीच्या महापूराबद्दल बस्केचा एक लेख इथे बहुचर्चित झाला होता. आज त्यामागचं कारण कळतंय, कदाचित आपल्या संघर्षासाठी तिने सगळं इंटरनेट धुंडाळलं असेल आणि त्यातून तो थकवा आला असेल! अशा तिच्या अनेक पाऊलखुणांवर मदर वॉरियरची सावली दिसते आहे. आता सगळे निकष, परिमाणंच बदलली असं वाटतंय. बस्के, तुझ्याबद्दलचा आपलेपणा आणि मदर वॉरियरबद्दलचा आदर्श आदरभाव असं सगळं एक होऊन हेलावून गेले आहे.
हे सगळं असं जाहीर स्वच्छ लिहून तू फक्त तुझं मन मोकळं केलं नाहीस तर इथे मनापासून आणि प्रामाणिकपणे आपल्या समस्या मांडणार्या प्रत्येकासाठी एक विश्वासार्ह वातावरण तयार केलंस. या धाग्यावर आलेल्या प्रत्येक पोस्टमधून तो विश्वास व्यक्त झालेला दिसून येत आहे. मायबोली ही फक्त एक सोशल साईट नसून जगभर पसरलेलं, विखुरलेलं नव्हे, एक कुटूंब आहे ही जाणीव झाली. तुला धन्यवाद आणि सदैव शुभेच्छा!

बस्के - मदर वॉरीअर

काही कारणासाठी तुम्हाला वेगळा आय डी घ्यावा लागला. कारण पुर्णत: समजण्यासारखे आहे. कुसुमाग्रज, केशवसुत आदी दिग्गजान्च्या काव्याचा आनन्द घेताना त्यान्ची खरी नावे काय आहेत हे आपण कुठे पडताळतो ? ते तितके महत्वाचे वाटतही नाही.

येथे तुमच्या लेखनाचा एक मोठा चाहता वर्ग तयार झालेला आहे. या वर्गासाठी तुमचे लेख, त्यात व्यक्त झालेले अनुभव हेच महत्वाचे आहे. ते कोणत्या आय डी ने लिहील्या जात आहेत याला वाचकान्च्या द्रुष्टीने खुप असे महत्व नाही रहात. तुमचा सन्देश महत्वाचा आहे आणि तो वाचकान्पर्यन्त सहजगत्या पोहोचतो.

तुम्ही मनमोकळेपणाने, तुम्हाला सोईच्या वाटणार्‍या आय डीने लिहीत रहा.... तुमचे लेखन आम्ही वाचत आहो. पुढील लेखनासाठी तसेच या आव्हानात्मक लढ्यासाठी खुप शुभेच्छा.

Pages