इस्राईलचा फिनीक्सः बेत शान

Submitted by निसर्गा on 20 March, 2016 - 06:57

इस्राईल बद्दल आधी बरच टंकलं.कितीही झालं फिरुन तरी या एवढ्याशा देशाबद्दल लिहायला काही कमतरता नाही.जेवढी निघेल तेवढी माहिती.नाविन्यता.आश्चर्य.खरोखर जसा चिन्यांचा देश अजब आणि अरभाट तसा हिब्र्युंचा देश चमत्कारीक आणि आशादायी.
'येशूचा आणि ज्युविश लोकांचा इतिहास सोडला तर इस्राईलचा असा काय खास इतिहास असणारे??'- आर्किओलॉजि (टूर)टूरचा मेल बघून मनात विचार आला. पण सोबत असलेली फोटोची अॅटॅचमेंट पाहून उत्सुकता जराशी वाढली, म्हणून करून टाकलं बूकिंग...
सोबत हवामानाची 'नोट' पण होती- उष्ण कोरडे ३०º से. च्या वर... मनात आलं रोज आपण १५º से. मधे कुडकुडतो ... तिथे एवढा काय फरक असणारे...???इथे पण स्वत:वर अती आत्मविश्वास दाखवून सोबत स्कार्फ, स्वेटरं, जर्कीन घेउन निघालो, बसजवळ पोहचल्यावर समजलं काही आमच्यापेक्षा ही आत्मविश्वासू लोकांनी पाउस येईल या भीतीने छत्र्या ही सोबत घेतलेल्या... म्हणलं.. 'छ्या!! आपण विसरलोच राव' Uhoh . इस्राईलच्या हवामान खात्याचा चांगला अनुभव असूनही असल्या गोष्टी मनात... नाही नाही...डोक्यात येउन गेल्या. पण तिथे पोहचल्यावर हा 'overconfidence' चा फुगा जोरात फुटनार होता.
कॅमेर्याला आधीच बजावून ठेवलेला 'बाबा रे, आज तुला क्षणभरही उसंत नाही बरं का!'... ५-६ फोटो काढून त्याला trailer पण दाखवलेला…
जाताना मस्त हिरवीगार शेते लागली ...
हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणाच्या मखमालीचे... या ओळी ओठांवर खेळत होत्या...

12719279_1126926170665355_3808988850335459339_o.jpg12748120_1126926207332018_1762219353492005062_o.jpg12794795_1126926173998688_4100272055931974689_o.jpg

टूर होती माउंट गिल्बोआ डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या बेत शान-(beit she'an) शहराची... २-२.१५ तासांचा प्रवास पोहोचलो बाबा -बेत शान राष्ट्रीय उद्यानात... बस मधून उतरलो ते स्कर्फ्,मफरेल आणि जर्किन्स बसमध्ये ठेऊनच. ऊन मी म्हणत होतं. जगातल्या सर्वात ऊष्ण भागांपैकी एक भाग असणार बेत-शान.अंग तापलं होतं.उन्हाळा एवढा की तो टाळण्यासाठी उन्हाळ्यात इथली शेतकरी लोकं फक्त सकाळी आणि संध्याकाळी शेतात काम करतात.

12778883_1126926270665345_5035004048313375138_o.jpg

‘वसंत’असल्याने झाडांवरची फुले गोड हसत होती…

12764326_1126926347332004_7682152982844362117_o.jpg

सोन्या सारखी दिसणारी फुले पाहिली अन आठवला सप्टेंबरमधला सोनकीचा हरीश्चंद्रगडाचा सडा.

12794799_1126926483998657_6899219013186533753_o.jpg12771646_1126926527331986_6305303309102850127_o.jpg12771506_1126926410665331_1181332421430043125_o.jpg

आम्ही एका छोट्याशा डोंगरावर ऊभे होतो आणि समोर दिसत होते,इजिप्शीयन गव्हर्नरच्या बंगल्याचे अवशेष .कोण कुठला बापडा इजिप्शियन गव्हर्नर...आला इकडे,केलं राज्य...बंगला बी बांधला..

10379741_1126926907331948_8546571728609940261_o.jpg

इतिहासाचं आणि आपलं नातं कायमच बेंच आणि झोपेचं राहिलंय.(काय सांगता.इतिहासाच्या तासाला एकदा तरी झोपला होता असं स्वताशी तरी कबूल करा) ...
पण आमचा गाईड फारच उत्साही.शाहीराच्या आवेशात नसला तरी त्याची वाक्य त्याचं प्रभुत्व दाखवित होती.त्याचा त्याच्या कामावर असलेला विश्वास आणि आवडसुद्धा.
आता आमच्या या बोलघेवड्या गाइडने सांगितलेली गोष्ट अशी...
सफर करू उत्तर इस्राईलच्या इतिहासाची… एका २३ वेळा नष्ट होऊन पुन्हा पुन्हा बांधलेल्या साम्राज्याची...... गाईडचा 'टोन' एक सलग ऐकू येत होता आणि लांबलचक कांगदाची भेंडोळी सुटावी तसं भासत होतं. शहराची गोष्टच न्यारी...पडझडून उभं राहण्याची हिम्मत न्यारी...ढासळलेल्या विटांवर पाय देऊन हुंकारण्याची...आणि एक नव्हे,दोन नव्हे तब्बल तेवीस वेळा पाया ते कळस रचण्याची कमाल गोष्ट...

इस्राईल किती सहनशील आणि चिकाटीचं..!?
फार फार वर्षांपूर्वी- म्हणजे साधारण ५००० वर्षांपूर्वी ताम्रयुग सुरूवात होत असताना जॉर्डन नदीच्या काठी लोक राहायला आले. भरपूर पाण्याचा साठा आणि कसदार सुपिक जमिन असल्याने हे लोक डोंगरातल्या गुहेत राहु लागले. पोटापाण्यासाठी शेती करू लागले. चांगले बस्तान बसल्यावर तिथे त्यांनी एक गावच प्रस्थापित केले. त्या गावाचे नाव- बेत शान. नावाप्रमाणे शानदार असे हे गाव.पण काही वर्षांनी आगीत हे शहर भस्मसात झाले. आगीत त्यावेळी शहरं भस्मसात होत.उगाच शहरं कशी आगीत होरपळत असतील असा विचार आला.पण मग रोम आठवलं.म्हटलं असं आग लागणं युद्धनिष्पत्त असावं.

Canaanite/ Egyptian period
त्यानंतर ताम्रयुगाच्या मध्यंतरात १५ व्या शतकात, इजिप्शीयन राजा- तिसरा थुटमोस याने जोशिआ राजावर चढाई करून हा भाग जिंकून घेतला. त्याने हे शहर पुन्हा वसवले आणि नाव दिले-रेतेनु. पुढची ३५० वर्षे हा भाग इजिप्शीयन राजवटीकडेच राहीला. लोहयुगाच्या सुरूवातीच्या काळात हे त्यांचे प्रशासन केंद्र बनले.

Bibilical period
११ व्या शतकाच्या सुरूवातीला इस्रायली राजा साउल याने इजिप्शीयांवर आक्रमण केले.पण त्याला हे राज्य जिंकता आले नाही. या युद्धात साउल आणि त्याची ३ मुले मात्र मारली गेली. यात या शहराचे बरेच नुकसान झाले. १० व्या शतकात पुन्हा एका इस्रायली राजाने-डेविडने आक्रमण करून हा भाग जाळून टाकला. त्याचा मुलगा सोलोमन याने हे राज्य पुन्हा एकदा वसवले. हे प्रशासन केंद्र झाले. सोलोमनच्या मॄत्युनंतर यातला काही भूभाग पुन्हा एकदा इजिप्शीयनांकडे गेला आणि काही भूभाग असिरीयन लोकांनी जिंकून घेतला.

Helinistic period (Greek and Mediterranean)
ग्रीक पौराणिक कथांनुसार, तिसर्याू शतकात हे शहर द्योनिसॉस(god Dionysos) देवाने शोधले व पुन्हा एकदा वसवले. त्याला सांभाळणार्या आयाला इथे दफन केले म्हणून त्याने या शहराचे नामकरन "निसा"(Nysa) असे केले. तसेच ग्रीक इतिहासात काही ठीकाणी या शहराचा उल्लेख "सिथोपोलिस" (scythopolis) असा केला आहे.
दुसर्या शतकात ग्रीक राजवटीचे सर्वात मोठे शहर होते. पण हासमोनियन्सनी (एक जुनी इस्रायली राजवट) पुन्हा एकदा हे उद्ध्वस्त केले.

Roman period
ऱोमन काळात, साधारण पहिल्या शतकाच्या सुरुवातीला हे शहर प्रशासन केंद्र बनले. रोमन बांधणी नुसारया भागाची रचना केली. तेल या भागाच्या दक्षिण आणि पूर्व भागाकडून पुन्हा एकदा उभारणी झाली. पण एका मोठ्या भूकंप धक्क्यात हे शहर पुन्हा मोडून पडले.

Byzantine period
ख्रिस्त लोकांनी हे शहर उभारून इथला एरीया ४०० एकरनी वाढवला. लोकसंख्या ४०,००० झाली आणि शहराभोवती ४.५ किमीची भिंत उभारली गेली

Arab period
अरब काळात,६३६AD मध्ये शहराचे नामकरण झाले- बेइसन आणि उतरणीचा काळ सुरू झाला. नवीन राजानी लोकांच्या सहनशीलतेचा अंत बघून कठोरपणे राजवट सुरू ठेवली.एका मोठ्या भूकंपानंतर याचा अंत झाला.

Ottoman period (turkish empire)
पुन्हा काही सेनानींनी किल्ला बांधला, पण लवकरच तो जमीन दोस्त ही केला गेला... त्यानंतर बराच काळ बेइसन हे छोटेसे गाव राहिले.१३०८ मध्ये मात्र हे शहर इजिप्त कडून सिरीयाकडे केल्या जाणार्‍या औद्योगिक वाहतूकीचे केंद्र बनले.

१९४९ मध्ये सर्व राजवटींचा अंत होऊन- इस्राईलचा पहिला मेयर नोआ मर्डिंजर याने हे शहर पुन्हा उभे केले. तेच आजचे "बेत शान". अर्थात मधल्या काळात या भागावर विजय मिळवण्याचा खूप प्रयत्न झाला. असे २३ वेळा जमिनदोस्त झालेले हे साम्राज्य आज अनेक ऐतिहासिक खुणा घेऊन दिमाखात काळाची साक्ष देत ऊभे आहे.

तर हे रामायण- महाभारत का घडलं असावं??? तर बेत शानची भौगोलिक परिस्थिती- सी ऑफ गॅलिली, जॉर्डन नदी आणि इथली कसदार सुपीक जमीन… जॉर्डन रिवर व्हॅली आणि जेझराईल व्हॅली मध्ये वसलेले हे शहर.
आजही इजिप्त कडून सिरीयाकडे केली जाणारी वाहतूक याच मार्गाने केली जाते.
हीब्र्यु युनिवर्सिटी आणि पेनसिल्व्हानिया युनिवर्सिटी मध्ये इथल्या आर्कीओलॉजीचा अभ्यास सुरू आहे.

गव्हर्नरच्या बंगल्याच्या पुढे गेल्यावर डोंगरावरून दिसणारा हा व्हियु-

12779249_1126927063998599_3655081984440921541_o.jpg12794661_1126927047331934_4746406418735826846_o.jpg

नॅशनल पार्कच्या जवळ असलेल्या कॅफेटेरीयाजवळ असलेली ही रोमन साम्राज्याची प्रतीकृती

12794788_1126928013998504_8105170288829195435_o.jpg12764353_1126928027331836_2762713039074461312_o.jpg

पॅलॅडीयस स्ट्रीट

12792118_1126927700665202_8463365749081473734_o.jpg12792337_1126927957331843_737512646927905799_o.jpg

ग्रीक पुराणात उल्लेख असलेल्या द्योनिसोस देवाच्या मंदिराचे हे काही अवशेष...

12418935_1126927917331847_3488975942979072338_o.jpg11694936_1126927793998526_8241153593589483619_n.jpg12800104_1126927797331859_8594805874384843403_n.jpg

पॅलॅडीयस स्ट्रीटच्या नैऋत्येला असलेले रोमन काळातील स्नानगॄह. इथे काही संगमरवरी फरशांचा वापर केला आहे

12768134_1126928173998488_1683319226866814034_o.jpg12768338_1126928350665137_3295243740922893394_o.jpg

इथे २ उबदार असे हॉल्स आहेत. जमिनीखालून गरम हवेने पाणी गरम करण्याच्या रोमन प्रणालीचा वापर केला जात असे (hypocaust method).

12778887_1126928223998483_9056168127412480649_o.jpg12790905_1126928170665155_3578637815156513262_n.jpg

तर या आंघोळीसाठी लागणार्यास अक्सेसरीज्... पेडिक्युअर -मॅनिक्युअर ई.
12783654_1126928300665142_8808096682061897013_o.jpg12794740_1126928180665154_4264335331515733133_o.jpg

हे काय असेल असे वाटते???
रोमन काळातील सार्वजनिक शौचालय... अर्थात अवशेष...
सो कमोड स्टाईल जरी ओल्ड असली तरी सगळ्यांनी कसरत करत बसून बघितलच आणि हौस म्हणून गाईडकडून फोटोही काढून घेतले Biggrin
या खालच्या पन्हाळीतुन स्वच्छ पाणी वाहत असे.त्यात स्पंज बुडवून स्वच्छतेसाठी वापरत असत. टिश्यु- बिश्यु नव्हते न त्या काळी Proud
तर ही श्रींमंतांची स्वच्छतागृहे... खास टर्कीवरून मागवलेल्या संगमरवराचा वापर इथे केला आहे...

12718367_1126928607331778_8275893005317482403_n.jpg12771944_1126928623998443_2359371623552733814_o.jpg
हे अर्धगोलाकार रोमन काळातील शॉपिंग मॉल...

12764698_1126928457331793_4431898657600532132_o.jpg

ही काही दुकाने आणि आतील रचना... पण हे स्नान गृहाला जोडून होतं, ते का ते नाही बुवा समजलं

12783596_1126928527331786_5452748210413304096_o.jpg12764419_1126928427331796_7993682678924156130_o.jpg

हे थिएटर सुमारे १ AD च्या सुरूवातिला बांधले गेले. इथे ७००० सीट्स होत्या, डोंगराचा काही भाग वापरून हे थिएटर बांधले आहे. स्टेजसाठी जे खांब आहेत त्यासाठी ग्रॅनाईट वापरले आहे.

12698341_1126928753998430_1838112674437533459_o.jpg12764348_1126928797331759_5501846980493294666_o.jpg12764582_1126928830665089_2352788950755134544_o.jpg12799073_1126928700665102_1789434557587333207_n.jpg

प्रार्थनास्थळी पूजेच्या विधीसाठी लागणारे पाणी इथे साठवले जायचे. रोमन काळातील शहररचनेमधील हा एक महत्वाचा भाग

12768155_1126928603998445_3340799738621495118_o.jpg
आम्ही सुरूवात छोट्याशा डोंगरावर केली तो हा डोंगर...हा जुन्या साम्राज्याचा उत्तरेकडचा भाग - तेल
20160226_132345.jpg

इस्राईल आपण पाहतो ते लांबून....मानलं पाहिजे या इस्रायली लोकांना, जिथे जाईल तिथे नवीन गोष्ट बघायला मिळते.चिन्यांसारखे मिचमिचे डोळे यांच्या कडे नसतील तरी दूरदृष्टी आणि तिक्ष्ण विचार याचा मिलाफ असलेल्या देशात मला रहायला मिळाल याबद्दल आयुष्याचे आभारच मानायला हवेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान नवीन माहिती.
मागे पण मी एक दोन वेळी निसर्गाच्या गप्पा या धाग्या वर उल्लेख केला होता.
मी शाळेत असताना वडिलांनी " इस्राइल...दुधामधाचा देश " अश्या काहीश्या नावाचं एक पुस्तक आणून दिलं होतं. त्यआचं गारुड अजूनही मनावर आहे. त्याचे लेखक वि.स. वाळिंबे का? आणि इथे कुणी वाचलंय का? आणि सध्या ते मिळेल का?
तर अगदी शाळ्करी वयापासून इस्राइल पहायची इच्छा आहे.

मस्त माहिती. मला ते रोमन स्टाईल खांब, स्नानगृह वगैरे बघून जॉर्ड्नमधल्या जेराशची आठवण झाली.

इस्राईल म्हणलं की मला आजोबांकडे गाणं शिकायला येणारी लिओरा आयझॅकच आठवते.. ती सांगायची त्यानुसार. इस्राईल मध्ये वय वर्ष १८ नंतर प्रत्येक मुलाला आणि मुलीला ३ वर्षांसाठी सैनिकी शिक्षण अनिवार्य होते.. सध्या काय आहे काहीच माहिती नाही.. आणि तिचा संपर्कही नाही...

दोन्ही लेख मस्त.
आधुनिक काळातला इस्राएल म्हणजे ग्रीन हाऊसेस मधे पिकवलेली समृद्धी, पाण्याचा अतिशय कल्पक वापर, त्यासंदर्भाने असलेली व्यवस्था हे पहिलं आठवतं. त्याबद्दलही लिहाल का?

धन्यवाद सर्वांना_/\_
@हिम्सकूल
अजुन ही असचं आहे... मुलांना ३ वर्षे आणि मुलींना २ वर्षे सैनिकी शिक्षण व सेवा करावी लागते... काही जण ही सेवा पुढे सुरू ठेवतात...त्या नंतरही युद्धजन्य परीस्थिती असेल तेव्हा ऑर्डर्स आल्या की रुजू व्हावे लागते...
नेपाळच्या भूकंप ग्रस्तांसाठी इथून बरीच मदत गेली होती... तेव्हा काही टीम्स पण पाठवल्या गेल्या. त्यात माझे इथले सहकारी पण गेले होते( अर्थात अचानक रूजु होण्याचे आदेश त्यांना मिळाले होते), त्या वेळी ही माहिती मिळाली.

@नीधप
मला अगंच म्हणा... लहान आहे मी Happy
आधुनिक काळातला इस्राएल म्हणजे ग्रीन हाऊसेस मधे पिकवलेली समृद्धी, पाण्याचा अतिशय कल्पक वापर, त्यासंदर्भाने असलेली व्यवस्था हे पहिलं आठवतं.>>>जरूर लिहीन. मी इथे त्या संदर्भातच अभ्यास करतेय

मी इथे त्या संदर्भातच अभ्यास करतेय >> अरे वा. हे माहित नव्हते. अजुनच छान.
अभ्यासपुर्ण मत व निष्कर्ष वाचायला आवडतील.
त्यांच्या चांगल्या गोष्टींचे अनुकरन इथे करायचे झाल्यास कसे करु शकतो, त्यात काय बदल करावे लागतील असे काही अभ्यास असेल तर चांगले.

मस्त फोटोज आणि माहीती.
<<आधुनिक काळातला इस्राएल म्हणजे ग्रीन हाऊसेस मधे पिकवलेली समृद्धी, पाण्याचा अतिशय कल्पक वापर, त्यासंदर्भाने असलेली व्यवस्था हे पहिलं आठवतं. त्याबद्दलही लिहाल का? >>> नी +१ , फोटोजसहीत लिहाल तर अजुन मस्त मालिका होऊ शकेल.

त्या कमोडचे तंत्र काही समजले नाही. >>> ते शिळोप्यातल्या गप्पा मारण्याचं ठिकाण वाटतयं Biggrin