सामाजिक उपक्रम २०१६

Submitted by मो on 9 March, 2016 - 21:20


नमस्कार,

१० मार्च २०१६, सावित्रीबाई फुले यांचा ११९ वा स्मृतीदिन. १९व्या शतकातील समाजसुधारक स्त्रियांमध्ये सावित्रीबाईंचे स्थान मानाचे आहे. पतीच्या खांद्याला खांदा लावून, मानसिक, शारीरिक अवहेलनेला सामोरे जाऊन, स्त्रीशिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणार्‍या सावित्रीबाईंनी स्त्रियांकरीता केलेले कार्य कालातीत आहे. स्त्रीशिक्षणाच्या बरोबरच स्त्रियांशी संबंधित इतर सामाजिक क्षेत्रातही सावित्रीबाईंचे फार मोठे योगदान आहे. पीडित विधवा स्त्रियांना आत्महत्या किंवा भ्रूणहत्या यांपासून रोखण्याकरता बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना, विधवांच्या मुलांचे संगोपन, केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न या आणि इतर अनेक सामाजिक कार्यातून समाजाला आशेचा किरण दाखविणार्‍या सावित्रीबाईंना त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रणाम!

सामाजिक उपक्रमाचे हे आपले सातवे वर्ष. या वर्षीचा उपक्रम आपण सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस अर्पण करणार आहोत. हा उपक्रम तसा मायबोलीकरांना नवा नाही. मायबोलीकरांच्या साथीने गेली ६ वर्षे स्वयंसेवक हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आले आहेत. स्त्रिया आणि मुलांकरीता कार्य करणार्‍या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो. यावर्षी महाराष्ट्रातील भीषण दुष्काळ पाहता गरजू शेतकरी, त्याचप्रमाणे आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन मदत करणार्‍या संस्थांचाही आपण उपक्रमात समावेश केला आहे.

या उपक्रमात दरवर्षी ज्यांना सरकारकडून फारशी मदत मिळत नाही (वा मिळतच नाही) किंवा संस्था मुख्यत्वे फक्त देणगीदारांवर चालते अशा गरजू संस्थांना प्रामुख्याने वस्तुरुपात मदत करण्यावर आपला भर असतो. यावर्षी निवडलेल्या संस्थांना गरज असलेल्या गोष्टींची यादी मागवण्यात आली आहे.

गेल्यावेळेप्रमाणेच देणग्या खालील पद्धतीने स्वीकारल्या जातील,

१) ज्यांना देणगी द्यायची आहे त्यांनी स्वयंसेवकांपैकी कोणालाही संपर्क करुन तुम्ही किती देणगी देणार आहात इतकेच कळवावे. यासाठी ३१ मार्च ही मुदत ठेवत आहोत.

२) एप्रिलपासून, किती देणगी मिळत आहे ते पाहून सर्व संस्थांना साधारण समान निधीवाटप करण्यात येईल. त्याचवेळेस त्या निधीतून त्या संस्थेसाठी दिलेल्या यादीतून काय सामान घेता येईल, ते कोठून घेता येईल वगैरे ठरवले जाईल.

३) देणगीदारांचे गट करुन कोणी कोणत्या संस्थेला देणगी पाठवायची, संस्थेच्या अकाउंटची माहिती इत्यादी कळवण्यात येईल. त्यानंतर तुम्ही संस्थेच्या खात्यावर रक्कम जमा करु शकता. संस्थेच्या अधिकृत टॅक्स खात्याची माहिती इथेही लिहिण्यात येईल.

४) देणगीदारांनी देणगी पाठवल्यावर स्वयंसेवकांपैकी कोणालाही त्याबद्दल कळवणे महत्वाचे आहे. त्याप्रमाणे संस्थेला कळवले जाईल.

५) सर्व देणगीदारांनी देणग्या पाठवल्याचे आम्हाला कळवले की प्रत्येक संस्थेकडून खातरजमा केली जाईल.

६) सर्व जुळले की मग वस्तू विकत घेण्यासाठी पाऊल उचलले जाईल.

७) वस्तू खरेदी झाली व संस्थेला पोचली की इथे सांगितले जाईल.

ही पद्धत गुंतागुंतीची वाटेल पण देणगीदारांनी योग्य त्या संस्थेला फक्त योग्यवेळी देणगी पाठवायची आहे. बाकी काम उपक्रमाचे स्वयंसेवक करतील.

काही संस्था अभारतीय चलन पण स्वीकारतात. ज्यांना वेगळ्या चलनामधे देणगी द्यायची आहे त्यांनी संपर्क किंवा विपुद्वारे स्वयंसेवकांशी संपर्क साधावा. जे मायबोलीचे सभासद नाहीत परंतु मदत करण्यासाठी उत्सुक आहेत त्यांनी सुनिधीशी lataismusic@yahoo.com या ईमेलवर संपर्क साधू शकतात.

या वर्षीच्या उपक्रमाद्वारे मदत केल्या जाणार्‍या संस्था खालीलप्रमाणे आहेत.
(सर्व संस्थांची माहिती पहिल्या काही प्रतिसादांमध्ये टाकली आहे. तसेच खालील संस्थांच्या नावांवर टिचकी मारल्यास तुम्हाला ती माहिती दिसू शकते)

१. भगीरथ ग्रामविकास संस्था, कुडाळ, सिंधुदुर्ग
२. सुमति बालवन, कात्रज, पुणे
३. अनामप्रेम, अहमदनगर
४. शबरी सेवा समिती, कर्जत, रायगड
५. दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळी, यवतमाळ
६. माताबालक उत्कर्ष प्रतिष्ठान, सांगोला, सोलापूर
७. परिवर्तन संस्था, डोंबिवली, मुंबई

सामाजिक उपक्रम स्वयंसेवक चमू -
अरुंधती कुलकर्णी, मो, सुनिधी, अतरंगी, कविन, महेंद्र ढवाण, पूर्वा, निशदे, गायत्री१३

मागील काही वर्षी केल्या गेलेल्या सामाजिक उपक्रमांबद्दल खाली वाचता येईल - -
सामाजिक उपक्रम २०१५
सामाजिक उपक्रम २०१४
सामाजिक उपक्रम २०१३
सामाजिक उपक्रम २०१२
सामाजिक उपक्रम २०११
सामाजिक उपक्रम २०१०

आतापर्यंत खालील संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे वस्तुरुपी मदत केली गेली आहे - -

शबरी सेवा समिती, भगीरथ ग्रामविकास संस्था, सुमती बालवन, अपंग निवासी कल्याण केंद्र सटाणा, सावली सेवा ट्रस्ट, मैत्री, गुरुकुल, कोथरुड येथील मुलींची अंधशाळा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संस्थेचे नाव:- माताबालक उत्कर्ष प्रतिष्ठान, सोलापूर

पत्ता:- देशपांडे लेन, केळकर हॉस्पिटल समोर, सांगोला, सोलापूर. महाराष्ट्र:-४१३३०७.

संस्थेचे कार्य:-स्त्रियांचे आपल्या पुरुषप्रधान समाजातील दुय्यम स्थान सर्वश्रुत आणि काहीसे गृहीत धरलेले आहे. शहरातील सुशिक्षित, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी महिलांचेही सामाजिक आणि कौटुंबिक स्थान हे कित्येकवेळा दुय्यमच ठेवले गेल्याचे सर्रास दिसून येते.शहरामध्ये महिलांची ही अवस्था असेल तर ग्रामीण भागातील अशिक्षित, अर्धशिक्षित कुटुंबातील महिलांची काय परिस्थिती असेल याची कल्पना येईल.

माताबालक संस्था मुख्यतः ग्रामीण भागातील मुले आणि महिला यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. माताबालक संस्थेचे कार्य गेली २५ वर्षे अव्याहतपणे चालू आहे. माताबालक संस्थेचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही पूर्णपणे महिलांनी चालवलेली चळवळ आहे. संस्थेतर्फे महिलांसाठी आरोग्य शिबिरे, सेल्फ हेल्प ग्रुप्स, साक्षरता वर्ग, व्यावसायिक प्रशिक्षण वर्ग चालविले जातात. संस्थेकडून महिलांना स्वावलंबी होता यावे म्हणून बिनव्याजी लघुकर्ज दिले जाते ज्याच्या परतफेडीचे प्रमाण १००% आहे. संस्थेने आतापर्यंत ७० महिलांना उद्योजिका बनवून स्वावलंबी बनविले आहे.

संस्थेने महिलांचे आरोग्य सुधारावे, त्यांना त्यांच्या आजारपणामध्ये योग्य ते उपचार आणि मार्गदर्शन मिळावे यासाठी गावोगावी २० आरोग्यदूत प्रशिक्षण देऊन तयार केले आहेत.

संस्थेकडून २ प्राथमिक शाळा चालविल्या जातात ज्यात फक्त क्रमिक अभ्यासक्रमावर भर न देता खेळ, छंद, कला, व्यक्तिमत्व विकासालाही तेवढेच महत्त्व दिले जाते.

संस्थेचे सद्य प्रकल्प आणि आर्थिक अंदाज:-

१. निर्धूर चूली:- प्रत्येकी रुपये १४००/- ( धूरविरहित चुलींची निम्मी रक्कम महिलांना बचतगटामधून बिनव्याजी कर्जरूपाने घ्यावी लागेल) निम्मा खर्च संस्थेद्वारे उचलला जाईल.
संस्थेतर्फे  १००० कुटुंबाना निर्धूर चूली द्यावयाच्या आहेत. आजही जगातील एक तृतीयांशपेक्षा जास्त लोक स्वयंपाकासाठी जैविक इंधने ( लाकूड, कोळसा, शेण वगैरे) वापरतात. जैविक इंधने वापरल्याने होणारे आरोग्याचे व प्रदूषणाचे प्रमाण प्रचंड आहे. महाराष्ट्रामध्ये फुफ्फुसांच्या विकारांचे प्रमाण लक्षणीय आहे.

निर्धूर चुलीचे फायदे.
जळण ४० ते ५०% कमी वापरले जाते. परिणामी वृक्षतोड कमी होते. जळण कमी विकत घ्यावे लागल्याने आर्थिक बचत. ८०% धूर कमी होतो. कार्बन डायॉक्साईड चे उत्सर्जन कमी होते. त्यामुळे प्रदूषण कमी होते शिवाय स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला, घरातील आबालवृद्धांना धुराचा त्रास कमी होतो.

२. शाळेतील विविध प्रयोगशाळांसाठी तसेच संगणक वर्ग, संगीत वर्ग यासाठी साहित्य घ्यावयाचे आहे.

३. शेळीपालन:- महिलांना शेळी खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य केले जाईल. शेळीची निम्मी किंमत महिलेला बचतगटातून लघुकर्जाद्वारे घ्यावी लागेल. शेळीचे पिल्लू बचतगटातील दुसऱ्या  महिलेला विकणे बंधनकारक राहील. दुसरी महिला शेळीचे पिल्लू विकत घेताना त्यांना अर्थसहाय्याची प्रक्रिया समान राहील.

सामाजिक उपक्रमाच्या निधीनुसार संस्थेकडून जास्तीत जास्त परिवारांना निर्धूर चुली देण्यासाठी निधीचा सदुपयोग करण्यात येईल.

पंजीकृत क्रमांक:- एफ ७८१,  सोलापूर.

आयकर सवलत:- ८० जी 

संपर्क :- सौ चित्रा जांभळे

फोन नंबर : +९१२१८७-२२०७४१/२२१०७३

ईमेल आयडी:- matabalak@yahoo.co.in

संकेतस्थळ: - www.matabalak.org

संस्थेचे नाव: अनामप्रेम
नोंदणी क्रमांक: महा./६५/०६/अ. नगर

पत्ता: अनामप्रेम भवन, गांधी मैदानाजवळ, अहमदनगर

संस्थेचे कार्य:

२००५ मधे काही उत्साही तरूणांनी एकत्र येऊन अनामप्रेम या संस्थेची स्थापना केली. ही संस्था मुख्यतः अपंग, अंध व मूक-बधीर तरूणांसाठी काम करते. या संस्थेला सरकारी अनुदान मिळत नसून आपल्यासारख्या देणगीदारांच्या मदतीवरच संस्थेचे वेगवेगळे उपक्रम चालू असतात. संस्था रजिस्टर्ड असून संस्थेला दिलेल्या डोनेशनला: ८० जी खाली सवलत आहे.

    संस्था सध्या चालवत असलेले उपक्रमः
  1. प्रकाशवाटा: अंध मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीतून त्यांना नोकरीसाठी सक्षम बनवण्यासाठी काढण्यात येणारे मराठी ब्रेल भाषेतील एक अद्वितीय मासिक
  2. कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर
  3. इंग्रजी बोलण्याचा वर्ग
  4. हिंमत भवनः ८० मुलामुलींसाठीचे शेल्टर होम
  5. आधारः अंध व अपंगांना दैनंदिन जीवनातील समस्यांवर मात करून स्वावलंबी बनवण्यासाठीचा उपक्रम
  6. हेलन केलर लायब्ररी: ब्रेल पुस्तकांची लायब्ररी
  7. प्रकाशगानः अनामप्रेम येथील तरूणांचा ऑर्केस्ट्रा
  8. मंगल बंधन: अंध, अपंग व मूक-बधीर यांच्यासाठी चालवले जाणारे विवाह जुळवणी केंद्र

या तरूणांनी कायम देणगीदारांवर अवलंबून रहाण्यापेक्षा त्यांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन स्वतंत्र व आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. त्यासाठी वरील उपक्रमांच्या जोडीने संस्था 'व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर' सुरू करत आहे.
हे ट्रेनिंग सेंटर' २.५ एकर जागेत बांधले जात असून एप्रिल महिन्यापासून बॅचेस चालू करायचा त्यांचा मानस आहे.

आताची गरज:
१. 'व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर' च्या बांधकामाच्या निधीसाठी मदत
२. १५ कॉम्प्युटर्स
३. ५० प्लॅस्टिक खुर्च्या
४. प्रिंटर/स्कॅनर/कॉपिअर

सामाजिक उपक्रमाच्या निधीनुसार संस्थेच्या प्राधान्याप्रमाणे वरीलपैकी एका कार्यासाठी निधीचा सदुपयोग करण्यात येईल.

संपर्क:
१. अजित माने
क्रमांक:+91- 7350013801

२. अजित कुलकर्णी
क्रमांक:- +91- 7350013805 / +91-9011020174,
इमेल:- ajitbkul@gmail.com

संस्थेचे नाव: परिवर्तन महिला संस्था

पत्ता: रजिस्टर्ड ऑफ़ीस:- C/o Adv. मिसेस स्मिता परचुरे, विश्व सदन, विवेकानंद पुरम, लातुर ४१३ ५१२
मुख्य शाखा: मिसेस ज्योती पाटकर, सुदामा स्मृती हनुमान नगर, प्रगती कॉलेज जवळ, डोंबिवली (पूर्व) ४२१ २०१

संपर्क क्रमांक:- ०२५१ २८८३१२४/ ९३२२२१७०२४
इमेल:- info@parivartanmahila.org & jyoti_30@yahoo.com

संस्थेचे कार्य:

१. मुक्त बालिकाश्रम - अनाथ मुलींकरीता चालवलेला आश्रम (सध्या ४५ मुली तिथे आहेत)
२. दिलासा डे केअर सेन्टर (फ़ॉर सिनिअर सिटीझन) (I will chk whether it is free of cost or they charge something)
3. कम्युनिटी डेवेलोपमेन्ट प्रोग्रॅम्स ऍट मोखाडा ऍन्ड गणेशपूरी
4. इतर प्रकल्पांमधे सेल्फ़ हेल्प गृप्स, एड्स झालेल्या महिलांना मदत, काउन्सिलिंग, व्यवसायास मदत, प्रिवेन्शन / रेस्क्यु ऑफ़ गर्ल फ़्रॉम ह्युमन ट्रॅफ़िकिंग

संस्था रजिस्टर्ड असून दिलेल्या डोनेशनला: ८० जी खाली सवलत आहे. या संस्थेला सरकारी मदत मिळत नाही व ही संस्था पोलिटिकल पार्टीशी संलग्न नाही.

आताची गरज काय आहे हे १-२ दिवसात सांगणार आहेत

संस्थेचे नाव : - दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळी, यवतमाळ.

संस्थेचा परिचय -
गेली कित्येक वर्षे महाराष्ट्र शेतकऱयांच्या आत्महत्येचा प्रश्न सोडविण्यासाठी झगडतो आहे व हा प्रश्न दिवसेंदिवस अजूनच बिकट होत चालला आहे. या वर्षी सामाजिक उपक्रमाअंतर्गत दीनदयाळ या संस्थेला मदत करण्यामागे आपल्या शेतकरी बांधवांसाठी, बळीराजासाठी काहीतरी करायला हवे ही जाणीव होती.

दीनदयाळ ही संस्था कोणत्याही शेतकऱ्याला आर्थिक मदत न करता प्रत्येक प्रश्न मुळातून सोडविण्यासाठी त्यावरील दीर्घकालीन उपाययोजनेवर काम करते.

संस्थेकडून आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी, कुटुंब आधार योजना, आत्महत्याग्रस्त परिवाराच्या मुला-मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था, शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रकल्प, मानसिक आणि भावनिक आधाराकरिता समुपदेशन या योजना राबविल्या जातात.

याशिवाय शेतकऱ्यांवर आत्महत्या करायची वेळ येऊ नये या दृष्टीने कृषी संशोधन प्रकल्प, जलभूमी विकास प्रकल्प, सेंद्रिय शेती प्रकल्प, शेतीपूरक उद्योग कार्यक्रम इत्यादी प्रकल्प राबविले जातात.

संस्थेचे विविध प्रकल्प आणि त्याला येणारा खर्च.

१. कुटुंब आधार योजनेअंतर्गत शेतकऱयांच्या कुटुंबाना व्यवसाय सुरु करण्यास मदत करण्यात येते. यात गिरणी चालविणे, शिवणकाम, शेळीपालन, नूडल्स बनविणे, दुग्धव्यवसाय, भाजीचे दुकान असे शेतीपूरक व्यवसाय चालू करून दिले जातात. त्याचा खर्च अंदाजे २०,००० ते ४०,००० रु. पर्यंत येतो.

संस्थेने आतापर्यंत १२० परिवारांना मदत केली आहे. अजून २०३ परिवार प्रतीक्षेत आहेत.

२. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुला-मुलींना शिष्यवृत्ती (निवासी) राहणे, खाणे, शाळेची फी, गणवेश, शैक्षणिक साहित्य या सर्वाचा एकूण वार्षिक खर्च :- २०,०००/- रु. प्रत्येकी.

संस्थेने ६५ विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठी हॉस्टेलची सोय केली आहे. त्यांच्या शिक्षणाचा खर्च संस्थेकडून केला जातो

३.आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुला-मुलींना शिष्यवृत्ती (घरी राहून शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी) शैक्षणिक साहित्य, गणवेष, शाळेची फी, शाळेला बसने येण्याजाण्याचा खर्च.
एकूण सर्व वार्षिक खर्च:- १०,००० रु. प्रत्येकी.

संस्थेकडून ५० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.

सामाजिक उपक्रमाच्या निधीनुसार संस्थेच्या प्राधान्याप्रमाणे वरीलपैकी एका कार्यासाठी निधीचा सदुपयोग करण्यात येईल.

अमेरिकेतील saveindianfarmer ही संस्थासुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत आहे. आपण दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळी आणि saveindianfarmer या दोन्ही संस्थांना एकत्र मदत करणार आहोत. आपले जे सभासद अमेरिकन डॉलर्स मध्ये देणगी देणार असतील त्यांना ती देणगी saveindianfarmer कडून देता येईल. त्यांना अमेरिकन कायद्याप्रमाणे करामध्ये सूट मिळेल.

आयकरातील सवलत :- ८०जी,

संस्थेचा पत्ता:- विवेकानंद छात्रवास, रामकृष्ण नगर, मुलकी, वडगाव, यवतमाळ-४४५००१, महाराष्ट्र.

संपर्क :- श्री कद्रे +९१९८९०२१७३८७, deendayalytl97@gmail.com

नोंदणी क्रमांक :- महाराष्ट्र /३९४९/९७ यवतमाळ.

संकेतस्थळः- http://www.deendayalvidarbha.org/farmer/about-us.html

संस्थेचे नाव :- भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग

पत्ता :- मुक्काम पोस्ट झारप,
तालुका:- कुडाळ,
जिल्हा:- सिंधुदुर्ग-४१६५२०

संस्थेचे कार्यक्षेत्र:-

आपल्या देशाच्या संतुलित आणि सर्वांगीण प्रगतीसाठी खेड्यांचा विकास हा अत्यावश्यक आहे. अमर्याद वाढणारी शहरे आणि बकाल होत जाणारी गावे हे देशाच्या प्रगतीसाठी हानिकारक आहे. शहरातील समृद्धी, पायाभूत सुविधा, दर्जेदार साधनांची व सोयींची उपलब्धता, शैक्षणिक आणि वैचारिक प्रगती प्रत्येक गावापर्यंत पोचणे गरजेचे आहे.

आजही आपल्या देशातील सर्व लोकांना वीज, पाणी, दोन वेळ पोटभर जेवण, शिक्षण यासारख्या मूलभूत गरजा आपण पुरवू शकलेलो नाही. करोडो लोक आजही रोज संध्याकाळी अर्धपोटी आणि अंधारात झोपी जातात. हातावर पोट असणाऱ्या आणि हंगामी कामे करणाऱयांचे होणारे हाल तर आपल्या कल्पनाशक्तीच्यासुद्धा पलीकडचे आहेत.

भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान गावांच्या आणि खेड्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. गावातील सोयीसुविधा पर्यावरणपूरक पद्धतीने सुधारणे, शैक्षणिक दर्जा वाढविणे, शेतीचे उत्पादन वाढविणे, ज्ञानकेंद्रीत शेती करणे, यासाठी विविध उपक्रम संस्थेतर्फ राबविले जातात. तसेच स्थानिक लोकांचे अंगभूत गुण, कौशल्य हेरून त्यांना पैलू पाडण्याचे काम पण संस्था अतिशय उत्तमप्रकारे पार पाडत आहे.

संस्थेचे प्रकल्प आणि त्याचा अंदाजे खर्च:-

१. लमाणी वस्तीसाठी सोलर दिव्यांची योजना:- रस्ते, बांधकाम यासाठी लमाणी लोकं नदीकिनारी पालं टाकून झोपड्यांमध्ये राहतात. तिथे विजेची सोय नसते. लहान मुले, महिला यांच्यासाठी काळोख सुरक्षित नसतो. अशा वस्त्यांचा सर्व्हे करून त्यांना सवलतीमध्ये सोलर दिवा (LED) देणे. १०० स्क्वे.फु. साठी या दिव्याचा प्रकाश पुरतो. आपण कुडाळ येथील लमाणी वस्तीमध्ये असे दिवे दिले आहेत.

खर्च:- एका सोलर दिव्याची किंमत ७००/- रु. आहे. लमाणी कुटुंबांना तो दिवा पूर्णपणे मोफत दिला जाणार नाही. त्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार काही ना काही किंमत जसे कि १०० ते २०० रुपये द्यावी लागेल.

२. कातकरी मुलांचे वसतिगृह व त्यांना खेळ शिकविण्यासाठी प्रशिक्षक योजना:-
गाव वेताळ बांबर्डे येथील वसतिगृहामध्ये कातकरी समाजातील एकूण १८ मुले आहेत. यासाठी शासनाचे काही अनुदान नाही. कातकरी समाजाची ही शाळेत जाणारी पहिलीच पिढी आहे. त्यांना लागणारा किराणा 'भगीरथ' देते. श्री उदय आईर येथील व्यवस्थापन पाहतात. येथील सर्व मुलांनी शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हास्तरापर्यंत बाजी मारली आहे. त्यांना चांगले क्रीडा प्रशिक्षक दिल्यास तसेच प्रथिनयुक्त आहार दिल्यास (अंडी) ही मुले अजून प्रगती करतील. आठवड्यातून २ वेळा या मुलांना कोचिंग देणे गरजेचे असेल. एका भेटीसाठी ५०० रुपये खर्च येईल असे वाटते. अंदाजे खर्च:- रुपये ३००० ( दरमहा प्रशिक्षक मानधन खर्च), पोषण आहारासाठी दरमहा ५४० अंडी लागतील (५४०*६/प्रति अंडे=३२४०/- रु. दरमहा)

सामाजिक उपक्रमाच्या निधीनुसार संस्थेच्या प्राधान्याप्रमाणे वरीलपैकी एका कार्यासाठी निधीचा सदुपयोग करण्यात येईल.

संपर्क:- डॉ प्रसाद देवधर, +९१९४२२५९६५००

ईमेल:- bhagirathgram@gmail.com

आयकर सवलत:- ८०जी

नोंदणी क्रमांक:- एफ/२१७४/ सिंधुदुर्ग

संकेतस्थळ:- http://www.bhagirathgram.org/

संस्थेचे नाव: शबरी सेवा समिती
नोंदणी क्रमांकः F/26509 मुंबई

पत्ता: आनंद, डॉ. फडके हॉस्पिटल, कोतवालनगर, कर्जत (जि. रायगड)

संस्थेचे कार्य:
शबरी सेवा समितीचे मायबोली सामाजिक उपक्रमातील हे चौथे वर्ष! शबरी सेवा समितीच्या विविध उपक्रमात याआधीही आपण मदत केलेली आहे व त्याच्या विनियोगाची माहितीदेखील त्यांनी वेळोवेळी आपल्याला पाठवली.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला काही तात्पुरते मार्ग घेऊन जाण्याबरोबरच त्यांना दीर्घ काळासाठी स्वावलंबी बनवण्यावर शबरी सेवा समितीने भर दिला आहे. गेल्या वर्षी सुरु केलेला
आंब्याच्या झाडांच्या वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा प्रकल्पही त्यातीलच एक. याच प्रकल्पासाठी यावर्षी त्यांनी आपल्याला मदतीचे आवाहन केले आहे.

आताचे प्रकल्प आणि त्याचा खर्च
अ) आंब्याच्या झाडांचे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन.
मागील वर्षी शबरी सेवा समितीने जव्हार तालुक्यातील १५० शेतकऱ्यांसाठी सुमारे १५०० आंब्याच्या झाडांचे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करण्याचा प्रकल्प पार पाडला. यापैकी जवळपास ९५% झाडे आजही सुस्थितीत वाढत आहेत. सदर प्रकल्प शेतकऱ्यांना स्वावलंबी होण्यासाठी मदत करत अहे.
यावर्षीही या प्रकल्पासाठी शबरी सेवा समितीला आपली मदत हवी आहे. हा प्रकल्प जून व जुलै महिन्यात राबविला जाईल. २०० शेतकऱ्यांना प्रत्येकी १५ रोपटी दिली जातील. अशा पद्धतीने सुमारे ३००० झाडांचे वृक्षारोपण करण्यात येईल.
एका झाडाची किंमत(वृक्षारोप, खत इ. धरून): रु. १२५
एकूण किंमत : १२५ * ३००० = रु. ३,७५,०००
यापैकी ७५,००० रुपये शेतकरी गोळा करणार आहेत तसेच शबरी सेवा समिती स्वत:कडून १,५०,००० रुपये देणार आहे. या वर्षी संस्थेसाठी जितका निधी जमा होइल तो अधिकाधिक रोपटी घेण्यासाठी वापरला जाईल.

सदर प्रकल्प यशस्वी झाल्यास सुमारे २०० शेतकऱ्यांना स्वावलंबी होण्यास मदत करेल.

संपर्कः श्री. करंदीकर
क्रमांक:०२१४८-२२२१०२, ९९२०५१६४०५
ईमेलः shabaridevasamiti@yahoo.co.in

website : http://www.shabarisevasamiti.org/

IT exemption
देणगीदारांना ८० जी अंतर्गत कर सवलत मिळू शकेल.

संस्थेचे नाव: राधाबाई हार्डीकर प्राणिजात मंगल संस्था (आपण मदत करीत असलेले संस्थेचा प्रकल्पः सुमति बालवन, पाखरमाया)
पत्ता: १२१५२, कांचनश्री, शिरोळे रोड, फर्ग्युसन कॉलेज समोर, शिवाजीनगर, पुणे, ४११००१
फोनः २५५३१८८१

संस्थेचे कार्य:
२००१ साली स्थापना झालेल्या राधाबाई हार्डीकर प्राणिजात मंगल संस्थेद्वारे कात्रजच्या पुढे असलेल्या गुजर-निंबाळकरवाडी ह्या गावात आर्थिक दृष्ट्या हालाखीची परिस्थिती असलेल्या मुला-मुलींकरता सुमती बालवन ही शाळा तर गरजू आणि अनाथ मुलांकरता पाखरमाया अनाथाश्रम चालवला जातो.

शिकायला शाळा आणि राहायला निवारा येथे ह्या संस्थेचे काम संपत नाही, तर सुरु होते! मुलांना ही शाळा व संस्था म्हणजे आपले घर वाटते. एखाद्या घरातले मूल जितक्या विश्वासाने व मोकळेपणाने वावरते त्याच मोकळेपणाने येथील मुले वावरतात. त्यांच्यावर प्रेम करणारी, त्यांना आधार देणारी, त्यांना शिस्त लावणारी व वेळप्रसंगी त्यांना रागावणारी मायेची माणसे इथे त्यांना लाभली आहेत. सकारात्मक विचारांना कष्ट व प्रयत्नांची जोड देण्याचे बाळकडू येथे मुलांना लहानपणापासून मिळते. येथील मुले स्वस्थ बसत नाहीत. आपले छंद, अभ्यास यांच्या जोडीला मोकळ्या वेळेत शाळेत व परिसरात श्रमदानही करतात. सुमति बालवन शाळा व पाखरमाया अनाथाश्रम शाळेत सध्या साधारण १५० विद्यार्थी शिकत आहेत आणि त्यातील साधारण २५ मुलं ही वसतिगृहात राहतात. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच, लघूउद्योगाचे शिक्षण देऊन लवकर स्वावलंबी बनविण्याकडे शाळेचा कल आहे. अनाथाश्रम आणि वसतिगृहातील मुलांचा राहण्याचा, शाळेचा खर्च, सकस आहार, वैद्यकीय मदत हे सर्व संस्थेमार्फत केले जाते.

सध्या खालील वस्तू विकत घेण्यामध्ये सुमति बालवनला आपल्या मदतीची अपेक्षा आहे.

मोठ्या कचरापेट्या (प्राण्यांच्या आकाराच्या) - ६ (२५००-३००० रुपये)
अ‍ॅल्युमिनिअमची शिडी - १ (५००० रुपये)
तवा - १
कॉफी मग्ज - २४ (६०० रुपये)
जेवण वाढायचे डाव - ४ (४०० रुपये)
स्टीलचे पेले - २४ (६०० रुपये)
चमचे - २४ (२५० रुपये)
मुलींकरता अंतर्वस्त्रे -१६ (८०० रुपये)
मुलींकरता अंतर्वस्त्रे -३८ (१५०० रुपये)

रजिस्ट्रेशन क्रमांकः महाराष्ट्र/८४६/२००१/पुणे (ह्या संस्थेच्या देणगीकरता 80G चा फायदा मिळणार नाही. सध्या संस्था त्यावर काम करत आहे)

मो, इथल्या माहितीसाठी धन्यवाद.
माझ्या अनुभवातले दोन शब्द इथे अ‍ॅड करते

२०१५ साली 'विद्युल्लता' या फोटो प्रदर्शनाच्या निमित्ताने मी सांगोला येथील 'माताबालक उत्कर्ष प्रतिष्ठान' ला आणि त्याच्या संस्थपिका डॉ. संजीवनी केळकर यांना भेटुन त्यांचे फोटो शूट केले होते. सांगोल्या सारख्या गावाच्या ठिकाणी यांचे कार्य प्रचंड मोठे आहे. तिथल्या अनेक स्त्रीया या संस्थेमुळे आज स्वतःचा व्यवसाय चालवत आहेत. इथली शाळा अतिशय मोठी आणि सुंदर आहे. त्यातल्या प्रत्येक वर्गाला दोन दरवाजे आणि मागच्या दरवाज्या पुढे प्रत्येक वर्गाचे एक अंगण आहे. इथे मुलं मातीत खेळतात, वेगवेगळे प्रोजेक्ट करुन बघतात, भाज्या वगैरे लावतात. ते वर्ग मला फार आवडले होते. त्या शिवाय प्रचंड मोठ प्रांगणही आहे तिथे खेळ व इतर कार्यक्रम होतात. मुलांमधली उद्योजिकता वाढवण्या साठी शाळेच्या गेट जवळ एक दुकान आहे. त्यात मुलं फुलं हार इत्यादी करुन विकू शकतात.

यावर्षी विद्युल्लताच्या निमित्ताने मी परिवर्तन संस्थेचे कामही पाहुन आले. परिवर्तनच्या बालिकाश्रम व दिलासा डेकेअर पाहुन आले. दोन्हीकडे अतिशय छान, स्वच्छ व्यवस्था आहे. तिथे रहाण्यार्या मुली, आज्ज्या आनंदी दिसतात हे महत्वाचे. ज्योतीताई यांच्या कामाचा धडाका खुप आहे.
परिवर्तनचे मोखाडा येथील कामही आमच्या एका टिमने जाऊन पाहिले आहे. अशा दुर्गम ठिकाणी बर्याच सोयी आणि रोजगार उपलब्ध करुन दिला आहे शिवाय शैक्षणिक सुविधा, सोलार दिवे इत्यादी सोयीही आता तिथे आहेत.

यावेळी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत व जास्त करून ग्रामीण भागांत काम करणाऱ्या संस्था उपक्रमात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत हे यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणता येईल. सर्वांचे कार्य खूपच व्यापक, प्रेरणादायी व दिलासा देणारे आहे.

काही दिवसांपूर्वी मी एका आदीवासी पाड्यावर गेले होते. तिथल्या महिलांशी चर्चा करताना त्या म्हणाल्या की लाकुडफाटा विकून येणारा पैसाच त्यांच्याकडे येतो. नवरे दारूडे असल्याने त्यांचा काही उपयोग नाही. मुलांची शिक्षणे करायला, रोजी रोटी कमवायला त्यांना काहीतरी रोजगार हवा आहे. आदिवासी पाडा शहरापासून लांब आहे. अशा महिलांना काय रोजगार देता येईल ? पर्सनली लक्ष देणे शक्य नाही. त्यांच त्यांनीच करायला हव अस काहीतरी हव. म्हणजे एखाद उत्पादन तयार केल तर ते संपवलही त्यांनीच पाहीजे.

चांगला उपक्रम आहे हा.

स्वयंसेवकांपैकी कोणालाही संपर्क करायचा म्हणजे सामाजिक उपक्रम चमू खाली दिलेल्या नावांपैकीच ना?
तसेच किमान देणगी किती असावी?

सावली खूप चांगली माहिती शेअर केलीस

मानव देणगीची कोणतीही कमाल / किमान मर्यादा नाही. स्वेच्छेने, यथाशक्ती यथामती देणगी देता येईल

विपू, ईमेल किंवा तुमच्याकडे आमचे कोणाचे नंबर असल्यास एसएमएस / व्हाॅट्स अॅप अशा कोणत्याही माध्यमाने संपर्क करू शकता. पुढची माहिती संपर्कातून मिळत राहील

धन्यवाद ! Happy

जागू, कोणत्या भागातल्या पाड्यामधल्या स्त्रिया आहेत?? त्या भागात काम करणारी व आदिवासींसाठी प्रयत्न करणारी सेवाभावी संस्था माहितीत असेल तर त्यांच्यामार्फत नक्कीच काहीतरी करवून आणता येईल. किंवा अशा संस्थेची माहिती काढून त्यामार्गे मदत करता येते. व्यक्तिश: आपल्याला केलेल्या मदतीचा फॉलोअप, तेथील स्त्रियांना रोजगारासंबंधीचे प्रशिक्षण, वस्तू / उत्पादनाचे मार्केटिंग या गोष्टी जमतीलच असे नाही. सेवाभावी संस्था येथे मार्ग काढू शकतात.

ज्यांनी काल संपर्कातून देणगी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यांच्या नावांची नोंद करून ठेवली आहे

धन्यवाद
- उपक्रम टिम

जागू, आमच्या उरण केंद्रात जाऊन "चरखा अन्नपुर्णा' योजना ते राबवतायत का विचार आणि त्या पाड्यावर त्यांना काम करायला जमेल का विचार. आमच्या केंद्रातर्फे आम्ही काही वर्षांपुर्वी ही योजना शहापूर तालुक्यातील पाड्यांवर राबविली होती. पाड्यावर जरा चरख्याच्या लड्यांचा हिशेब करता येईल इतपत कुणी शिकलेल्या बर्‍या घरात चरखा ठेवायचा आणि बाकिच्या घरांमधल्या पुरुष्/स्त्रियांनी वेळ होईल तसा येवून चरखा चालवायचा. एक लडी सूत कातलं (२ बॉबिन्स) की आम्ही पाव किलो तांदूळ व थोडी मूगडाळ देत होतो. सूतासाठी लागणारे पेळू आम्ही नेवून द्यायचो. एक लडी सूत कातायला १ तासापेक्षा कमी वेळ लागतो. सूत तुटलं, पेळू घसरला, वादी तुटली, नथणी उडाली.... असे प्रॉब्लेम्स आमची कुणाची वाट न बघत बसता कसे सोडवायचे ते त्यांना शिकवून ठेवले होते. आठवड्यातून एकदा जावून जमलेल्या बॉबिन्स घेवून ज्यांनी सूत कातले त्यांना तिथे ठेवलेल्या रजिस्टरप्रमाणे डाळ तांदूळ मापून देत असू. दारूमध्ये पैसे जाणार म्हणून पैसे न देता शिधा देत होतो. घरातली मुलंबाळं उपाशी राहात नाहीत आणि बायकांनी पुरुषांनी वीटभट्टीवर वगैरे मिळवलेली मजूरी इतर खर्चासाठी राहात असे. अर्थात आदिवासी स्त्रिया आणि पुरुष दोन्ही दारू पिवून पडतात. पण आपल्याला जितकं जमेल तेवढ आपण करायचं. कुणाला पुरे पडू शकत नाही आपण.

अश्विनी खर आहे ग. मी करते चौकशी उरण केंद्रात.

अकु आदिवासींदी आहे तिथे संस्था. त्यांच्याशीही बोलून पहाते.

कविन मी त्या काकांना करते फोन धन्यवाद.

लोकसत्ता चतुरंग पुरवणीत उद्योगभरारी सदरात शकुंतला खडतरे यांच्याविषयीच्या लेखात सांगोल्याच्या माताबालक उत्कर्ष प्रतिष्ठानकडून त्यांना सुरुवातीला कशी मदत मिळाली याचा उल्लेख आहे.

लोकसत्ता चतुरंग पुरवणीत उद्योगभरारी सदरात शकुंतला खडतरे यांच्याविषयीच्या लेखात सांगोल्याच्या माताबालक उत्कर्ष प्रतिष्ठानकडून त्यांना सुरुवातीला कशी मदत मिळाली याचा उल्लेख आहे.= +१०००

यावेळी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत व जास्त करून ग्रामीण भागांत काम करणाऱ्या संस्था उपक्रमात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत हे यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणता येईल. सर्वांचे कार्य खूपच व्यापक, प्रेरणादायी व दिलासा देणारे आहे. +१

अनेकानेक शुभेच्छा Happy

तनिष्का मार्च अंकामध्ये मी माताबालक प्रतिष्ठानच्या डॉ. संजीवनी केळ्कर यांची घेतलेली मुलाखत आली आहे.

Pages