मसाईमारा- भाग 02 : बिग फाइव आणि मसाई गांव

Submitted by अ'निरु'द्ध on 9 March, 2016 - 13:33
lioness

मसाईमारा : बिग फाइव आणि मसाई गांव
(Masai Mara Big 5 And Masai Village)

( या आधीचा भाग : मसाई मारा- भाग 01 : जंगल लॉज आणि लॉग हट : एक आनंदनिधान

मसाईमाराला भेट देण्यामागे पर्यटकांची दोन मुख्य आकर्षणं असतात . त्यापैकी एक म्हणजे बिग फाइव.
मसाईमाराच्या जंगलात अनेक प्राणी असतात,दिसतात. पण त्यापैकी हत्ती, सिंह, बिबळ्या, गेंडा, आणि जंगली म्हैस यांना बिग फाइव मानलं जात. हे सर्व प्राणी एका जंगलात, एका सहलीत बघायला मिळतात हे मसाईमाराचे मोठे वैशिष्ट आणि आकर्षणही. आम्हालाही आमच्या सहलीत हे बिग फाइव मुबलक प्रमाणात पाहायला मिळाले .

मुंबईहून रात्रीच्या फ्लाईटने नैरोबीला सकाळी पोहोचल्यावर मारा सिंबा या आमच्या जंगल लॉज मध्ये पोहोचायला आम्हाला दुपारचे ४-४.३० वाजले. पार्क राउंडची वेळ already झालेली होती. ,म्हणून आम्ही लॉजमध्ये check in करण्याऐवजी direct पार्क राउंडलाच गेलो. एक राउंड होता होता आमच्या Driver Cum Guide ने एका गवताळ कुरणाकडे बोट दाखवून एक सिंहीण शिकारीसाठी गवतात दबुन बसल्याचे सांगितले. आम्हाला मात्र पहिली ५ मिनिटे ती सिंहीण काही दिसलीच नाही. नंतर मात्र ती अचानक एका WILDER BEAST वरती झेपावताना दिसली. तिचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला; पण आमच्या बिग फाइवच्या प्रथम दर्शनाचा ओनामा झाला. मसाईमारा काय चीज आहे त्याची झलकही दिसली. दुर्दैवाने माझ्या कॅमेऱ्याची Bag सर्व सामानाच्या खाली असल्यामुळे मला एकही फोटो काढता आला नाही.
पण ह्या सगळ्याची कसर मात्र दुसऱ्या दिवशी सकाळच्या पार्क राउंडमध्ये भरून निघाली. बाहेर पडल्या पडल्या १ले दर्शन झाले ते गवताळ भागातल्या एका खडकावर पसरलेल्या वनराजांचे.

प्रचि १ : कोवळ्या उन्हात अंग शेकणारा वनराज….

प्रचि २ : डोळे मिटून उन्ह खाणारी वनराजांची आणखी एक भावमुद्रा....

प्रचि ३ : सकाळची साफसफाई -०१...

प्रचि ४ : सकाळची साफसफाई – ०२…

प्रचि ५ : बाजूलाच हे आणखी एक राजे निवांत पसरलेले होते...

प्रचि ६ : क्लोज अप ऑफ जखमी शेर...

मसाईमाराच्या सिंहाना मसाई सिंह किंवा पूर्व आफ्रिकन सिंह म्हणून ओळखल जातं. भारतीय सिंहापेक्षा हे वजनाने आणि लांबीने जास्त असतात. ह्यांची आयाळहि जास्त दाट आणि गडद असते. कळपाला स्थैर्य आणि सुरक्षितता देण्यासाठी इतर सिंहाबरोबर लढाया करण्यात सिंहांची जास्त शक्ती खर्च होत असल्यामुळे ह्यांच्यामध्ये शिकारीची प्रमुख जबाबदारी सिंहिणीवर असते. पण सिंहिणीने शिकार केल्यावर शिकार खाण्यासाठी मात्र सिंहच पहिला नंबर लावतात. सिंह हा सामाजिक (Social) प्राणी समजला जातो. कळपाने राहतो आणि शिकारही एकत्र मिळून केली जाते. विशेष म्हणजे सिंहीण आपल्या छाव्यांबरोबरच इतर छाव्यांनाही दुध पाजते.

पुढे गेल्यावर हा एक छोटासा कळप दिसला. त्यात वनराज एकच होते, पण त्यांच्या वनराण्या मात्र तीन तीन होत्या. एवढ्या राण्या असूनही महाराज स्थितप्रज्ञ होते…. कि म्हणूनच स्थितप्रज्ञ होते ते माहिती नाही. Happy ...
हे सर्व जण WILDER BEAST च्या सकाळी कधी तरी केलेल्या शिकारीवर ताव मारून निवांत बसले होते.

प्रचि ०७ : पाऊलवाटेवरच बसलेले वनराज आणि वनराज्ञी...

प्रचि ०८ : वनराज जवळून...

प्रचि ०९ : दुसरी राणी थोडीशी बाजूला गवतामध्ये बसलेली... (हिच्या चेहऱ्यावरचे भाव एवढे आवडले कि त्याचा Cropped Photo मुखपृष्ठ म्हणून वरती दिलेला आहे.)

प्रचि १० : अर्धवट खाल्लेली शिकार (WILDER BEAST )...

(हे प्रकाशचित्र धोरणात बसत नसल्यामुळे काढून टाकले आहे - वेमा)

प्रचि ११ : तिसरी राणी बिनधास्तपणे सफारी Vehicle च्या जवळून जाताना...

प्रचि १२ : जरावेळाने महाराज उठले. त्या सुसंस्कृत महाराजांनी आमच्याकडे पाठ केली आणि मोकळे झाले...

तिथल्या सिंह सिंहिणीना माणसांची काही पडलेली नसायची. माणस असू देत, गाड्या असू देत, त्यांनी त्यांच्या निवांतपणात, लोळण्यात काही फरक नाही पडायचा. एका सिंहिणीने एकदा आमचा रस्ता cross केला होता; पण तो शिकारीसाठी. पण एक वनराज तर आख्खा कळप एका बाजूला असताना पर्यटकांच्या १५-२० मोठ्या मोठ्या सफारी गाड्यांच्या मधून रस्त्या पलीकडच्या कुरणात उगाचच एक फेरी मारून पुन्हा पहिल्या कुरणात परत आले. जणू आम्ही त्याच्या खिजगणतीतच नव्हतो. आणि नसायचोच...
हे कधी माणसांना बघून बिचकले नाहीत , दचकले नाहीत कि कोणावर गुरगुरलेही नाहीत.. सम्राटही तसेच आणि सम्राज्ञीही तशाच. कसली भय भीती तर नसायचीच. कदाचित त्या निर्भयतेमधून ही स्थिर अवस्था प्राप्त होत असेल.

ध्रुव भट्ट यांच्या "अकुपार" मध्ये आईमांच्या तोंडी एक वाक्य आहे - " स्हावज जाणे , के आ आपडी वैईड नंई" (सिंहाला माहित असते कि हा आपल्या बरोबरीचा नाही)

ह्या वाक्याचा प्रत्यय जागोजागी मसाईमाराला आला होता... (म्हणजे हे पुस्तक मी नंतर वाचलं पण जाणवलं होतं ते हेच , भावना तीच, खुणगाठही तीच)
हे खानदानी जनावर कदाचित म्हणत असेल...
"तुमची माझी काय बरोबरी …. ?
तुमच्यावर गुरकावून हल्ला करून माझाच मान कमी होईल.

प्रचि १३ : थोडे अजून पुढे गेल्यावर झाडाच्या सावलीत बसलेला हा अजून एक सिंह. खोडी केल्यावर आईने रागे भरलेल्या मुलासारखा चेहरा करून बघणारा ……
कि पथ्यामुळे आवडत्या वस्तू खायला न मिळालेले पदार्थ नातू खातोय त्याकडे बघणारा आजोबांचा चेहरा…...?

सकाळची पार्क राउंड संपता संपता आमच्या जंगल लॉजच्या वाटेवर दिसलेला हा हत्तीचा कळप
ह्या मध्ये तीन वेगवेगळ्या वयाची लहान पिल्ले होती.

प्रचि १४ : हत्तींचा कळप...

प्रचि १५ : त्यातला एक मोठा हत्ती...

प्रचि १६ : आणि एका झुड्पाशी झट्या घेणारा त्याहून एक मोठा पाठमोरा हत्ती...

त्यानंतर दुसऱ्या पार्क राउंड मध्ये एकमेकांच्या बाजूला लोळणारी आणि थोडीशी प्रेमात, लाडात आलेली हि सिंहाची जोडी

प्रचि १७ : Camoflaged In Grass...

पुढे जाताना एक हत्तींचा कळप आमचा रस्ता (कि त्यांचा …?) ओलांडून गेला. दोन्ही बाजूनी सफारी गाड्यांची रांग लागलेली.
प्रचि १८ : त्यातल हे एक पिल्लू. नुकतच सुळे फुटायला लागलेलं…

ह्या कळपातला एक महाकाय नर हत्ती

प्रचि १९ : समोरून...

प्रचि २० : पूर्णपणे बाजूनी...

प्रचि २१ : कातरलेल्या कानाचा विस्तार...

भारतीय हत्ती हाच मुळात एक मोठा प्राणी आहे. पण आफ्रिकन हत्ती त्याच्यापेक्षाही उंच, धिप्पाड आणि वजनदार असतो. एवढच नाही तर त्याचे कानही भारतीय हत्ती पेक्षा खूप मोठे असतात. त्यामुळे कान पसरलेला आफ्रिकन हत्ती समोरून पाहिला तर अतिशय भव्य वाटतो...

दुसऱ्या दिवशी आमचा दौरा जंगली म्हशींचा (African Buffalo or Cape Buffalo) कळप आणि गेंडे बघायला बाहेर पडला. रानम्हशींच्या नेहमीच्या ठिकाणी गाईड कम ड्रायव्हरने गाडी नेली. एक अख्खा कळप दिसला ,पण तो कळप खूप अस्वस्थ वाटत होता. आमचा गाईड हि म्हणाला त्यांच काहीतरी बिनसलय म्हणून .
मोठे रेडे आणि म्हशी फळी करून गाडीच्या जवळ येत होत्या. फार जवळ नाही पण हुलकावणी म्हणून. त्यातून त्याचे सूचनावजा हंबरण्याचे आवाज. (Warning Sounds )
फोटो खूप काढले…. पण थरथरत्या हाताने …. एकच फोटो बरा आला तो हा…..

प्रचि २२ : ह्या म्हशींच्या कानाची त्वचा खूप पातळ असते आणि त्यातल्या रक्त् वाहिन्याही. त्यामुळे उष्मा वाढला कि त्यांचे कान लाल दिसतात. कधीकधी हलका रक्तस्त्रावही होतो. त्यांच्या अंगावरच्या त्रासदायक किड्यांना खाणारे पक्षी (ह्या प्रचिमधला Yellow Billed Ox pecker) म्हणजे ह्यांचे मदतगार. म्हणून म्हशींच्या अंगावर त्यांचे नेहमी स्वागतच असते.
हे पक्षी शत्रूची चाहूल लागल्यावर सूचनाही देतात, त्याचाही म्हशींना फायदा होतो (A Perfect Symbiosis)...

आफ्रिकन जंगली म्हैस आपल्या रानगव्यापेक्षा वजनाने कमी असते. पण रानगवा संकोची, लाजाळू, मारामारी टाळण्याकडे कल असलेला आहे तर आफ्रिकन जंगली म्हैस खूपच Aggresive. अतिशय घातकी प्राणी. आफ्रिकेतील अनेक माणसं दरवर्षी मारत असल्यामुळे ह्याला
" The Black Death " किंवा "Widow Maker " असही म्हटलं जातं...

त्यानंतर आम्ही गेलो ते ज्या भागात सर्व साधारणपणे गेंडे दिसतात त्या भागात. त्या दिवशी आणि नंतरही दिसलेल्या गेंड्यांचे काही प्रचि:

प्रचि २३ :

प्रचि २४ :

प्रचि २५ :

प्रचि २६ :

आफ्रिकन आणि भारतीय गेंड्यामधले २ प्रमुख फरक म्हणजे भारतीय गेंडा हा वजनाने जास्त असतो पण त्याला एकच शिंग असते, तर आफ्रिकन गेंडा वजनाने हलका असून त्याला २ शिंगे एका मागोमाग असतात आणि त्यातलं पुढचं शिंग मागच्यापेक्षा जास्त मोठं असत. शिंगाचा तथाकथित औषधी उपयोग आणि त्यामुळे मिळणारी मोठी किंमत हेच त्यांच्या ऱ्हासाचे मोठे कारण आहे. आफ्रिकेत काळ्या गेंड्याप्रमाणेच पांढऱ्या रंगाचेही गेंडे असतात आणि ते जास्त लांब, उंच आणि वजनदार असतात. आमच्या ट्रीपमध्ये आम्हाला मात्र हा पांढरा गेंडा बघायला मिळाला नाही.

आमच्या तिथल्या वास्तव्यात आम्हांला सिंहांनी शिकार करण्याचे तीन प्रयत्न दिसले पण त्यातला एकच प्रसंग आमच्या समोर यशस्वी झाला. आमची गाडी संथगतीने जात असताना डाव्या बाजूने एका सिंहीणिने आमचा रस्ता Cross केला.

प्रचि २७ : रस्ता ओलांडणारी सिंहीण...

प्रचि २८ : त्यानंतर ती आधीच पुढे जाऊन बसलेल्या जोडीदारणीच्या शेजारी बसली...

प्रचि २९ : दोन्ही जोडीदारिणी जवळून...

प्रचि ३० : त्यानंतर त्यातली एक सिंहीण उठून सावजाच्या दिशेने चालायला लागली...

ह्या सर्व प्रकारात तोपर्यंत त्यांना किरकोळ का होईना पण छोट्या झुडपांचा आसरा होता. एका वेळेला एक सिंहीण उठायची. दबकत दबकत चाहूलही लागू न देता थोडं अंतर कापून पुढे जाऊन बसायची. खर तर दबकायची. एक सिंहीण पुढे जाऊन मुरून बसली कि मागची सिंहीण त्याच पद्धतीने पुढे जायची. हळूहळू त्या झुडुपांच्या भागातून पूर्णपणे गवताळ भागात पोहोचल्या.

प्रचि ३१ : गवताळ भागातील सिंहिणीची जोडी...

एकमेकांमधले अंतर वाढवत आणि सावज Cover करत त्या त्यांच्या सावजाजवळ, झेब्र्यापाशी पोहोचल्या. झेब्र्याच्या पाठीमागच्या बाजूला असलेली सिंहीण त्याच्या जास्त जवळ पोहोचली होती. ती योग्य ठिकाणी पोहोचल्यावर झेब्र्याच्या तोंडाकडच्या सिंहीणीने अचानक पुढून झेप टाकली. झेब्रा दचकला, उधळता उधळताच वळला आणि हल्ला केलेल्या सिंहीणी पासून दूर पळता पळता पाठीमागच्या सिंहीणीच्या तावडीत सापडला. तिथल्या सिंहीणीने दोन्ही बाजूनी त्याच्या मानेवर पंजे टाकून त्याचा गळा पकडला आणि स्वतःच्या वजनाने आणि पंजाच्या ताकदीने जमिनीवर लोळवला. त्याच्या वर राहिलेल्या पुठठयाकडच्या भागावर प्रथम हल्ला केलेल्या सिंहीणीने झडप घातली आणि त्याला एका कुशीवर कलंडवला. झेब्रा जमिनीवर आडवा झाला. दीड-दोन मिनिटे जागेवरच धडपडला आणि निपचित पडला. तोपर्यंत गळा धरलेल्या सिंहीणीचे तोंड लाल रक्ताने माखलेलं होते.
फक्त आता शिकार होणार म्हटल्यावर आम्ही सर्वानीच कॅमेऱ्यातला MOVIE MODE ON केल्यामुळे ह्या प्रसंगाचे चलत चित्रीकरण आहे पण फोटो नाहित....

पण ह्या बिग फाइव च्या बरोबरीने आणखीन एक लक्षात घ्यायचा महत्त्वाचा घटक म्हणजे या गवताळ प्रदेशात रहाणारी "मसाई माणसं".
जसे हे बिग फाइव इथल्या निसर्गाचा, पर्यावरणाचा घटक तसेच हे स्थानिक आदिवासी मसाई पण त्याच निसर्गाचा, पर्यावरणाचा घटक. ह्या मसाई माराच्या प्रदेशातील प्राण्यांसोबत रहायचं कधी साथीने तर कधी संघर्ष करत; पण संघर्ष करायचा तोही कारणापुरताच…. हे मसाई म्हणजे अतिशय कष्टाळू जमात. पण ह्यांची आमची गाठभेट झाली ती एकदाच. तीही आमच्या हॉटेलच्या माध्यमातून. आमच्या जंगल लॉजच्या बाहेरच थोड्याश्या अंतरावर एक मसाई गाव (Masai Village ) होते. अगदी एकुलते एक गाव. जणू आमच्या entertainment साठी एखादा सेट उभारल्यासारखे. आजूबाजूने कुठेही दुसरे मसाई गांव नाही.
हॉटेलच्या माणसाने सांगितल्याप्रमाणे आम्ही जवळच असलेल्या त्यांच्या वस्तीपर्यंत गेलो. संपूर्ण वस्तीला काटक्यांचे कुंपण होते. तिथल्या एका माणसाने त्यांच्या मुखियाला बोलून आणलं . त्यांनी त्यांचे charges सांगून त्यात काय काय समाविष्ट आहे त्याची मोडक्या तोडक्या इंग्रजीमध्ये कल्पना दिली.

त्यांच्या सांगण्यानुसार सुरुवातीला ते त्यांचा पारंपारिक नाच दाखवणार, नंतर त्यात आम्हाला सहभागी करून घेणार, त्यानंतर मसाई गावात प्रवेश, त्यांचे राहणीमान, घर बघण्याची संधी, त्यांच्या स्त्रियांचा पारंपारिक नाच, मसाई मुलांचे , गावकऱ्यांचे फोटो काढण्याची संधी आणि त्यांनी हाताने बनवलेल्या वस्तू बघणे, विकत घेणे असा एकंदरीत कार्यक्रम होता. थोड्याफार घासाघाशीनंतर उभयपक्षी रक्कम मान्य झाली. गावामध्ये निरोप गेले आणि भराभर ८/१० मसाई तरुण बाहेर आले. त्यांच्या हातात वेगवेगळ्या आकाराच्या काठ्या होत्या. आणि एकाच्या हातात होतं सिंहाचे डोक्याच्या भागाचे आयाळी सकट कातडं.
आधी त्यांनी त्यांचा पारंपारिक नाच करून दाखवला आणि नंतर आमच्यापैकी एकेकाच्या डोक्यावर ते सिंहशिरचर्म ठेऊन आम्हालाही सामील करून घेतलं .

प्रचि ३२ : सिंहशिरचर्मा सह अस्मादिक...

प्रचि ३३ : मसाई झोपडी -०१...

प्रचि ३४ : मसाई झोपडी-०२...

प्रचि ३५ : झोपडीचा अंतर्भाग...

प्रचि ३६ : घराबाहेरचा छोटा गोठा...

प्रचि ३७ : मसाई मुखिया...

प्रचि ३८ : मसाई मुखियाच्या कानातील अलंकार : फोटो फिल्मची डबी (मुखियाचे फोटो काढण्याच्या बदल्यात त्याला वेगळे अतिरिक्त पैसे द्यावे लागले)...

प्रचि ३९ : मसाई मायलेक...

प्रचि ४०: मसाई मायलेक, पाठमोरे...

प्रचि ४१: मसाई बालक...

प्रचि ४२: मसाई स्त्रिया आणि तरुणी - पारंपारिक नाचापूर्वी...

प्रचि ४३: मसाई स्त्रिया पारंपारिक नाच...

प्रचि ४४ : गावातला सार्वजनिक गोठा (इथे सर्व गुरं रात्री एकत्र करतात आणि ३/४ तरूण तिथे त्यांच्या रखवालीसाठी थांबतात)...

प्रचि ४५ : मसाई कुटिरोद्योग : प्राण्यांची हाडं , शिंग, दात आणि लाकूड यापासून
बनवलेल्या वस्तू ...

प्रचि ४६ : मसाई ग्रामोद्योग...

हे सर्व मसाई काटक, चिवट, सडपातळ,उंच आणि चकचकीत काळ्या वर्णाचे. अगदी गोरा वर्ण शरमावा असा लख्ख काळा वर्ण, अंगावर रंगीबेरंगी भडक कपडे, हातात काठी, अंगावर, गळ्यात प्राण्यांच्या हाडांचे, दातांचे , शिंगाचे, मण्यांचे दागिने, माळा. आणि कायम हसतमुख...

हे सर्व बघितलं पण सर्व गोष्टी का कोणास ठाऊक बेगडी, कृत्रिम वाटल्या. एखाद्या Presentation सारख्या, दिखाऊ, आणि वरवरच्या. मुळात ते गाव नांदत वाटायच्या ऐवजी सेट उभारल्यासारख वाटलं. असं वाटलं कि हे सर्व कलाकार आहेत. दिवसा येतात, कलेची किंमत सांगतात, किंमत नक्की करतात आणि कला दाखवतात . संध्याकाळी निघून जातात आपापल्या घरी. रात्री गाव ओसाड होत असावं. कोणी राहातच नसेल.
हॉटेलची युक्ती : त्यांच्या Tourist ना एक Attraction देण्याची
आणि पर्यटकांची हौस : Authentic Massai Village बघण्याची.
निव्वळ व्यवहार....

त्यामुळे Authentic मसाई माणसं बघितली तरी ती सर्वसाधारण कल्पना येण्याइतपतच. आणि तसही ज्या गोष्टी, एखादी जमात, तिच्या परंपरा, त्यांची संस्कृती हे कळायला काही वर्षे घालवायला पाहिजेत ते एका भेटीस, तेही २ तासांच्या हे कसं शक्य आहे ?
त्यामुळे जेवढ दाखवलं तेवढं बघितलं आणि जितकं दिसलं तितकं कळलं असं म्हणायचं... वास्तवाचा आभास म्हणा ना…..

ह्या मसाई जमाती सारखाच बिग फाइव मधला चपळ, काटक आणि शिकारी प्राणी म्हणजे बिबळ्या (African Leopard)

जसे सिंह, हत्ती मुबलक दिसतात तसा हा नाही. मुळात सिंह आणि हत्तींना शत्रू फार कमी. जवळ जवळ नाहीच. परत हे कळपाने रहातात आणि कळपाचे सामर्थ्य मोठं. म्हणून हे उघड्यावर असतात. कायम दिसतात आणि मुबलक ही दिसतात. रानम्हशीही कळपाने राहणाऱ्या. सर्वत्र नाही पण कुठे कुठे त्यांच्या विशिष्ट area त नक्की दिसणार, तेही कळपांनी. गेंडा एकांडा शिलेदार, कधी कधी जोडीने फिरणारे, पण ह्यालाही शत्रू कमी. त्यामुळे बिनधास्त फिरणार आणि दिवसाही दिसणार. संख्या कमी पण तरीही एका विशिष्ट क्षेत्रात आम्हाला ४ वेगवेगळे गेंडे दिसले.

पण बिबळ्या एकांडा शिलेदार. शत्रू चिक्कार त्यामुळे बिचकून रहाणारा आणि लपून छपून वावरणारा. ह्यांची संख्याही कमी त्यामुळे क्वचितच दिसणारा Big 5 मधला मेंबर. दिसणं म्हणजे पर्वणीही आणि नशिबही.
आमच्या नशिबाने मसाई मारा ला प्रवेश केल्यावर हॉटेलचे check in हि करायच्या आधी घेतलेल्या संध्याकाळच्या पार्क राउंड मध्ये याचे अस्पष्ट दर्शन झाले. मसाईमाराला प्रवेश केल्याच्या पहिल्याच संध्याकाळी एका झाडाखाली ४/५ जिप्स थांबलेल्या दिसल्या. आपल्याकडच्या पारंपारिक सवयीनुसार थांबून जिथे गर्दी पहात होती तिथे म्हणजे झाडावर पहायला सुरवात केली... नेहमीप्रमाणेच आधी काहीच दिसल नाही...
तरीपण गर्दीवर विश्वास ठेवून बघायचा वसा काही सोडला नाही...
आणि मग थोड्याच वेळात फांदीवर उठून उभ्या राहिलेल्या आणि झाडाच्या पाना फांद्या मधे कॅमाॅफ्लॅज झालेल्या चलाख, चपळ, उमद्या जनावराचे दर्शन झाले...

प्रचि ४७ : African Leopard...

बिबळ्याने त्याच फांदीवर पुढे आणून ठेवलेल्या हरणाचे Kill पण दिसले...

प्रचि ४८ :

अंधार पडल्यामुळे आम्हाला निघायला लागले पण "झाडावर ठेवलेली शिकार झाडावरच खाणारा बिबळ्या" पहायची दुर्मीळ संधी दवडायची नाही म्हणून सकाळ संध्याकाळच्या सफारी राउंड्सच्या सुरवातीला आणि शेवटी त्या झाडापाशी जायचा परिपाठ आम्ही चालूच ठेवला..
पण दर्शन काही झाले नाही..
दोन दिवस (४ राउंड्स) झाले. ३ र्‍या दिवसाचा सकाळचा ५ वा राउंड पण निराशाजनक ठरला...
पण मारा नदीवरून संध्याकाळी परत येताना मात्र बिबळ्या महाराज पावले...
परिपाठाप्रमाणे बिबळ्याच्या झाडापाशी आलो तर तो हरणाचे KILL एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर हलवत होता...

प्रचि ४९ : KILL वरच्या फांदीवर योग्य जागी नेऊन ठेवताना...

सुदैवाने आमच्या शिवाय एकही गाडी आसमंतात नव्हती... त्यामुळे लोकांचा कोलाहल नाही, अधीर, अत्युत्सुक हालचाली नाहीत की चांगल्या जागेसाठी वसवस नाही...
सारं कस निवांत... इथे झाडाखाली आम्ही निवांत, तिथे झाडावर बिबळ्या निवांत.. आणि हरिण कशाच्याही पलीकडे निवांत... जन्मल्यापासून जगण्यासाठी त्याची चाललेली धडपडच संपलेली..
प्रचि ५० :

Candle Light Dinner खुप खास असतं... पण त्याही पलीकडचं हे Sun Set Dinner पहायला मिळालं त्याला तोड नाही. ३०-३५ फुट उंचावर गर्द झाडाच्या फांदीवर नेऊन ठेवलेले भक्ष मावळत्या सूर्याच्या पार्श्वभूमीवर शांतपणे खाणारा बिबळ्या.

प्रचि ५१: अर्थात मधेच त्याने एकदा आमच्या नजरेला नजर देऊन पाहिलेही...

त्याला कोणी वाटेकरी नाहीत.. म्हणून कसली घाईही नाही. खाली फक्त आमची व्हॅन.. त्याच्या हिशोबाने किरकोळीत असलेले आम्ही ४ मित्र आणि आमच्याहून जास्त प्राणीप्रेमी स्थानिक गाईड. त्याला कुठेही Disturb न करता आम्ही तो भोजन सोहोळा डोळे भरून पहात होतो..... एक जीव गेला होता.. तर एका जीवाची आजची सोय झाली होती...
आनंद होत होता... की दु:ख होत होतं.... की दोन्हीही... माहित नाही...
पण निसर्ग नियम मात्र पक्का होत होता. आतून कळत होता..

प्रचि ५२ :

उन्हं झपाट्याने उतरत होती. सूर्य अस्ताचलाला चालला होता. संपूर्ण घटनेने आमचा ताबाच घेतला होता. हे अदभूत दृष्य, हा दुर्मिळ प्रसंग आम्ही भारावून जाऊन पहात होतो. निस्तब्ध... नि:शब्द....
आख्ख्या वातावरणाने मोहिनीमंत्र घालून आमची नजरबंदीच केली होती...
पण मग आमचा गाईड भानावर आला.. पार्क राउंड्सची वेळ संपत आली होती.. मग आम्ही नाइलाजाने निघालो...
पण ते गारुड मनावर बाळगत... ज्याचा अमीट ठसा आजही मनावर जसाच्या तसा आहे....

आज आकाश निरभ्र होते. (आदल्या दिवशीच पाऊस पडला होता.) लॉजवर परतताना संध्याकाळ गडद होत गेली. आणि अजून एक अविस्मरणीय दृश्य डोळ्यासमोर उभं राहिलं ; मसाईमारातला सूर्यास्त .
सर्व साधारणत: आपल्याकडे सूर्योदय आणि सूर्यास्त हे दोन्ही केशरी रंग छटांत होतात पण मसाईमाराच्या स्थानानुसार किंवा काय माहित नाही पण सूर्यास्तावेळी निळ्या रंगाच्या छटा दिसतात. विस्तीर्ण गवताळ कुरण, घननिळी संध्याकाळ आणि मसाईमारातील Typical अकॅशियाच्या विशिष्ट छत्रीसारख्या (Topiary) आकारामागे मावळणारा सूर्य.

प्रचि ५३ : मसाईमारा - निळा सूर्यास्त

आता आपल्याकडे होणाऱ्या प्रत्येक केशरी सूर्यास्तानंतर हि मसाईमाराची " नीलसंध्या " आठवतेच असे नाही, पण शहरापासून दूर असताना किंवा मावळत्या संध्याकाळी एखाद्या वाहनामधून प्रवास चालू असताना संध्याप्रकाश कमीकमी व्हायला लागला आणि अंधार पडू लागला कि मात्र गाडीच्या तालावर आणि वाढत्या अंधाराच्या पार्श्वभूमीवर ही मसाईमारामधली "कृष्णसंध्या "मनात प्रवेश करते...
तिच्या Big Five सह, आभासी का होईना पण वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या त्या मसाई लोकांसह, त्यांच्या त्या खेड्यासह … आणि मग आठवते त्यांच्याशी निगडित एकेक घटना आणि एकेक थरार.... अगदी लख्खपणे….
आणि साद घालते…. हा सर्व थरार पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी …

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त .

ह्या निमित्ताने हे गाणं आठवलं.

खाली सलाम दुआ ........
https://www.youtube.com/watch?v=iHu5ThBsNfI

शॉर्ट कट रोमियो हा शिन्मा मसाई मारा मध्ये काही भाग चित्रीत केले आहे.

किती सुंदर लिहिलेत. फोटो सुंदर की वर्णन सुंदर.. नक्की काय ते ठरवता येत नाहीये. दोन्ही तितकेच अप्रतिम.

प्रतिसादाबद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद...
पहिल्या भागापेक्षा हा भाग जरा जास्तच मोठा झालाय.. म्हणून काटछाट करावी का याबद्दल शंका होती.. म्हणजे अजूनही साशंकच आहे.. पण एवढ्या छान प्रतिसादामुळे चालून जाईल अस वाटतय...
Sanjeev.B ह्यांच्या युट्यूब व्हिडिओमुळे खरच ते दिवस पुन्हा डोळ्यासमोर आले...

पुन्हा एकदा प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार....

सुंदर लिहिलेत निरु..
मला सग्ळे फोटो दिसले नाही नेट स्लो असल्यामूळे .. पण जेवढे दिसले तेवढे भारीच..

हे सगळे इथे मराठीमधे तपशीलवार लिहुन दिल्याबद्दल धन्यवाद. Happy

म्हशींबाबत.....
>>>>> आफ्रिकेतील अनेक माणसं दरवर्षी मारत असल्यामुळे ह्याला <<<< यातिल "मारत" शब्द मरत असा हवाये का? "दरवर्षी यांच्या हल्ल्यात मरत"

@ limbutimbu.... <<<अतिशय घातकी प्राणी. आफ्रिकेतील अनेक माणसं दरवर्षी मारत असल्यामुळे ह्याला "The Black Death" किंवा "Widow Maker" असही म्हटलं जातं...>>>
अस मूळ वाक्य आहे...

"हा" घातकी प्राणी आफ्रिकेतील अनेक माणसं दरवर्षी मारत असल्यामुळे ह्याला
" The Black Death " किंवा "Widow Maker " असही म्हटलं जातं...
अस म्हणायच आहे... (ती मरत नाहीत... हा मारतो.. हिंसक वृत्तीचा असल्यामुळे)...

@ टीना..... ह्या प्रश्नाचं उत्तर मी कस देणार..? ते तर तुमच्या सारख्या तज्ञांनीच द्यायला पाहिजे.. Happy
I mean it Seriously.
आणि खर सांगायच तर तसा Mindset तेव्हाही नव्हता आणि आताही नाही म्हणून तुम्ही विचारेपर्यंत हा प्रश्नच मला पडला नव्हता...
पण हे दोन भाग लिहिता लिहिता तिथे परत जावसं खूप वाटतय.. जर खरच जाउ शकलो तर नक्की विचारुन सांगेन..

मस्त फोटो आणि वर्णन. बघायलाच पाहिजेच्या लिस्ट मध्ये गेलं हे ठिकाण.

बाकी सिंहाच्या झाल्यावर पुढे लगेच हत्तीचाही पाठमोरा फोटो बघून ते ही मोकळे होताना दिसतील की काय अशी शंका वाटली. Lol ते नाही का इथे अमेरिकेत एखाद्या नावडत्या व्यक्तीला "मून" करतात म्हणजे पँट काढून पिछवाडा दाखवतात तसं हे प्राणी त्यांची नापसंती दाखवत असतील लगेच पाठमोरी होऊन मोकळे होत असं काहीसं. Lol

वाह मस्त मजा आली..
वाईल्ड अ‍ॅनिमल्स.. एकाचवेळी कुरुप भयानक रुबाबदार सारेच वाटतात..
सुर्यास्ताचा फोटो लाजवाब..
मसाई लोकांची बिजनेस मेंटेलिटी बघून मजा वाटली..
बायकांचे फोटो पॅकेजमध्येच आणि मुखियाच्या फोटोचे एक्स्ट्रा पैसे हे आणखी भारी. Happy

खुपच सुरेख लिहिलय!!! फार छान. भाषा एकदम ओघवती आहे.... घटने मधला थरार आमच्या पर्यंत पोहोचला.... बिबळ्याचा क्लोज अप अप्रतिम....

फोटो तर सुरेख..... शेवटचा निळा सुर्यास्त एकदम कातिल......

(खरं तर मी जाम जळते आहे .... भारतातली जंगलं ( सारिस्का, कॉर्बेट २ वेळा, गीर २ वेळा, ताडोबा) पाया खालुन, जीप ने फिरुनही एकही वाघ किंवा सिंह न दिसलेली मी अजुन काय करणार.... प्रत्यक्षात हे लोक पहायचे म्हणजे बहुतेक मसाईमारा ला च जावे लागणार असे दिसते...... मी गेल्यावर सगळे लपुन तर बसत नसतिल ना?)

@ मोहन की मीरा....
मग आता मी ताडोबा आणि कान्हाला दिसलेल्या एकूण 7 वेगवेगळ्या वाघांचे फोटो टाकले तर काय होणार तुमचे...
Jokes Apart.... पण सिझनला, म्हणजे एप्रिल, मे मधे गेलात तर हे प्राणी दिसण्याची शक्यता खूप वाढते.. कारण एक म्हणजे पानगळीमुळे विरळ जंगल आणि दोन... तहानेमुळे पाणवठ्यावर येणारे प्राणी...

छान आहेत फोटो. मी प्राणी प्रेमी आहे त्यामुळे जास्तच आनंदाने बघितले. मण्यांचे दागिने पण बनवते त्यामुळे ते फोटो पण आव्डले. आपल्या इथे ओरिसात असे बारीक मणी ओवलेल्या माळा हेड बँड कानातली नाकातली असतात. सिमिलर ब्राइट व कलर फुल.

निळा सूर्यास्त फोटो बघून चित्र काढावे असे वाटते इतका तो सुरेख आला आहे.

नीरु...

माझं लक (?) माहित नाही तुम्हाला.... मी एप्रिल...मे मधेच गेले आहे तिकडे अत्तापर्यंत..... भारतिय प्राणी घाबरतात मला ( पडे फिर भी टांग उप्पर)...

अफ्रिकन प्राणी कदाचीत दोस्ती करतिल.....

@ ऋन्मेऽऽष..... <<< बायकांचे फोटो पॅकेजमध्येच आणि मुखियाच्या फोटोचे एक्स्ट्रा पैसे हे आणखी भारी. स्मित >>>

कुछ भी हो..... बाॅस आखिर बाॅस होता है...
Everybody May check his/her Own Experiences.. Happy Happy

Pages