१ मार्च - डाऊन द मेमरी लेन (ह्रिष्यामि च पुनः पुनः)

Submitted by फेरफटका on 1 March, 2016 - 15:38

१३ वर्षांपूर्वी, १ मार्च ला रात्री/पहाटे १ वाजता उठलो, सगळ्या रूममेट्स ना उठवलं. सगळे कुंभकर्ण कसे पटापट उठून आले, कॉफी पिऊन, अर्ध्या मैलावर असलेल्या एका 'लिट्ल ईंडिया' मधे पोहोचलो. (हे टोपण नाव तिथे रहाणार्या संख्येने आणी वागण्याने सुद्धा कमाल असलेल्या देसी स्टुडंट्स मुळे पडलं होतं).

दुसर्या मजल्यावर एक केबल कनेक्शन घेऊन, मधे स्प्लिटर टाकून ४ अपार्ट्मेंट्स मधे पोहोचवलं होतं. त्या १५० स्क्वेअर फूटाच्या खोलीत पन्नासएक जण जीव मुठीत घेऊन बसावा, तसं पाय पोटाशी घेऊन बसले होते. मांडी घालण्याची चैन परवडणारी नव्हती आणी जागा सोडणं हे ईंजिनीअरींग ची किंवा मेडिकल ची मिळालेली फ्री सीट सोडण्याईतकं कल्पनातीत होतं.

टॉस जिंकुन पाकिस्तान ने बॅटींग घेतली आणी काळजी वाटायला लागली. आत्तापर्यंत दर वेळी भारताने पहिली बॅटींग केली होती. पण ठीक आहे, बघू कसं होतं असा एकमेकांना धीर देत टीव्ही कडे पहात होतो. पाकिस्तान कडे असे काही खेळाडू आहेत ज्यांना बहुदा फक्त भारताच्या विरुद्ध मॅच असली की च खेळायला काढतात. त्या यादीतलं एक नाव म्हणजे सईद अन्वर. पट्ठ्या लौकीकाला जागत खेळला आणी बघता बघता पाकिस्तान चे २७३ झाले. बॉलिंग ला अक्रम, वकार आणी तेव्हाचा भेदक शोएब होते. सगळ्यांचे चेहेरे कॉफीमेकर मधल्या कॉफीपेक्षा जास्त काळे ठिक्कर पडले.

एका ईंटरनॅशनल स्टुडंट सेंटर मधे ओळख झालेल्या अमेरिकन डॉक्टर ला हे क्रिकेट असतं तरी काय असा पडलेला प्रश्न सोडवण्यासाठी 'ये परवा सकाळी १ वाजता असं आमंत्रण दिलं होतं. तो पहाटे ४ वाजता डोनट्स आणी ऑरेंज ज्यूस घेऊन आला. त्याचं फर्स्ट ईंप्रेशन बहुदा क्रिकेट बघताना बुद्धीबळाच्या गांभीर्यानं बघतात असं झालं असावं.

लंच ब्रेक मधे, आय सी यू च्या बाहेर उभे असणार्या नातेवाईकांचं धैर्य तोंडावर ठेऊन, 'बघू, काय होतं. अजुन आपली बॅटींग आहे' वगैरे गोष्टी स्वतःला सुद्धा पटेल, न पटेल अशा बेतानं बोलत होते. बहुदा सचिन एका बाजुने उभा राहील आणी दुसर्या बाजुने आपण अ‍ॅटॅक करू (कारण मागच्या तीन्ही मॅचेस मधे असच केलं होतं, पण तेव्हा पहिली बॅटींग होती) किंवा सचिन स्वतःच हल्ला करेल अशा चर्चा दबक्या आवाजात चालू होत्या.

अर्ध्या तासाने आपली बॅटींग सुरू झाली. त्या वर्ल्डकप मधे पहील्यांदाच सचिन ने स्ट्राईक घेतला आणी काहीतरी वेगळं घडणार ह्याची चाहूल लागली. अक्रम, वकार, शोएब, रझाक ह्या चौकडी ला तोंड देण्यासाठी प्रत्यक्ष क्रिकेटच्या देवालाच तांडव करावं लागणार होतं. पहीलाच बॉल अक्रम ने शॉर्ट ऑफ गूड लेंग्थ, ऑफ स्टंप लाईन वर टाकला. डावखुर्या अक्रम चा तो बॉल सचिन सोडुन देईल असं वाटण्याच्या आतच, सचिन च्या एका डिफेन्सीव्ह पुश वाटावा अशा फटक्याने कव्हर बाऊंड्री च्या बाहेर गेला. आमच्या जीवात जीव आला. पण अजुन शोएब च्या ओव्हर ची धास्ती होतीच. २ वाइड आणी ३ सरळसाध्या बॉल्स नंतर पुढच्या तीन चेंडुत शिडात वारं भरावं तसं आमच्या सगळ्यांच्या फुप्फुसात हवा भरली गेली आणी ईतका वेळ शांतपणे सामना बघत बसलेला तो डॉक्टर बसल्या जागी कोसळला. आधीच्या बुद्धीबळाच्या सामन्याची जागा आता कुस्तीच्या आखाड्यानं घेतली होतॆ. सचिन सुटला होता. तो मैदानात पाकिस्तान बोलिंग चं जे करता होता, ते आम्ही टीव्ही समोर शब्दांनी करत होतो. पुढचा दीड तास, सचिन ने आम्हाला 'हा क्षण बघायला आपण जिवंत आहोत' ह्याबद्दल धन्यता वाटायला लावली. सचिन आऊट होईपर्यंत पाकिस्तानी बोलर्स च्या मनोधैर्याची त्यानं शकलं केली होतॆ. उरलेल्या १०० धावांत ती शकलं नीट उचलुन, व्यवस्थित गिफ़्ट पॅक करून त्यांच्या हातात ठेवायचं पुण्यकर्म द्रविड-युवराज जोडीनं केलं. ईतक्या शांतपणे आणी 'क्लिनीकली' त्यांनी उरलेलं काम पूर्ण केलं की पाकिस्तान ला आपण कधी हारलो हे कळलं देखील नसावं.

मॅन ऑफ मॅच सेरेमनी च्या सुरुवातीला रॉबर्ट जॅकमन नं आमच्या सारख्या असंख्य प्रेक्षकांची धन्यता चार शब्दात मांडली. 'थँक यु सचिन तेंडुलकर'.

हा लेख त्या मॅचचा वृत्तांत नाही तर केवळ एका क्रिकेटवेड्याने केलेलं एक संकीर्तन!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आठवण !
बर्‍याच बाबतीत "अग्गदी अगदी" झालं.
आम्ही बे एरियात एका देसी रेस्टॉ. मधे पाहिली होती ही मॅच. पाकी बॅटिंग होऊन गेल्यावरची मनःस्थिती अगदी अशीच होती. तेव्हा मधल्या ब्रेक मधे त्या रेस्टॉ. वाल्याने सर्व्ह केलेला तो बडीशेप घातलेला चहा आणि ते " बाबूजी जरा धीरे चलो.. " या आयटम साँग चा व्हिडिओ ! हेही इतकं क्लिअर आठवतं !! आता ते "बाबूजी ... " गाणं कुठे लागलं तरी तो रात्री २ ला प्यालेला चहा आणि मॅच ची एक्सायटमेन्ट आठवते. Happy

जबरी! त्या आठवणी पूर्ण जाग्या केल्या परत या लेखाने!

आमच्या येथे रात्री सुरू होणार होती मॅच. आमच्या घरीच सगळी गँग जमली होती. हापिसातील एका अमेरिकन मित्रालाही उत्सुकता होतीच दिवसभराच्या चर्चेनंतर, त्यामुळे तो ही आला होता. गेट टुगेदर असल्याने येणार्‍यांनीही भरपूर पदार्थ आणले होते. रात्रभर जागून दंगा करत पाहिली मॅच. सुरूवातीला पाक जबरी होते पण त्यांची इनिंग संपेपर्यंत 'मूमेण्टम' थोडा आपल्या बाजूला आला होता. पण तरीही धास्ती होतीच. नंतर दोन तास सचिन ने जे काय केले त्याला तोड नाही.

मात्र मी द्रविड-युवराज ला ही येथे श्रेय देइनच. सचिन ने खच्चीकरण केले होतेच. पण तरीही १०० बाकी होते तो आउट झाल्यावर. या दोघांनी कसलेही टेन्शन घेतले नाही.

त्या अमेरिकन पंटरलाही मॅच संपेपर्यंत थोडेफार कळू लागले होते. ३-४ रन्स हवे असताना वकार ने वाईड दिला तेव्हा तो ही हसला, "at least don't make it easy" म्हणत :). त्याला मी सांगितले की तुला कोणीही क्रिकेट शौकीन कधी भेटला तर त्याला सांग सचिनची ती इनिंग मी लाइव्ह पाहिली आहे, आणि बघ त्यांचे चेहरे कसे होतात ते!

maitreyee, फारएण्ड, धन्यवाद. मायबोलीवर मी प्रतिक्रिया देत असलो तरी लेख असा पहिल्यांदाच लिहीत होतो. तुमच्या प्रतिक्रिया वाचुन छान वाटलं. धन्यवाद!

सगळ्यांच्या मेमरी मधे ती ईनिंग फ्रेम होऊन बसली आहे. अगदी काल-परवा घडल्यासारखं वाटतय सगळं. द्रविड ने त्या वर्ल्डकप मधे सचिन चा दंगा झाल्यावर 'मागचं आवरण्याचं' काम चोख बजावलं होतं. पाकिस्तान विरुद्ध युवराज बरोबर, न्यूझिलंड विरुद्ध कैफ बरोबर त्यानं मॅचेस 'क्लोज' करून दिल्या होत्या.

लेखाचं टायटल बदला जमल्यास. Happy "पुण्यस्मरण " वगैरे वाचून उघडलाच गेला नसता हा लेख.चुकून क्लिक झाला , ते बरं झालं Happy

फेरफटका - खूपच मस्त लेख !!
ती मॅच विसरणं शक्यच नाही. त्या दिवशी झटकुन सगळे सचिन हेटर्सहि गट बदलुन आमच्या आस्तिक कंपुमधे सामील झाले होते. ते दोन तास सचिन जे काही खेळला त्याला खरच तोड नाही.
ठळकपणे लक्षात राहिलेत ते ३ शॉट्स !! एक से बढकर एक होते; पहिली थर्ड मॅन वरुन मारलेली जोरदार थप्पड होती; दुसरा मधे येउन मारलेला शॉट म्हणजे " मी तुझ्या ४ पावल पुढे आहे" असं स्टेटमेंट होतं ; आणि शेवटचा कमाल स्ट्रेट ड्राइव्ह म्हणजे "आय अ‍ॅम द बॉस हीअर" होता !!! पाकी गोलंदाज नामोहरम झाले होते त्या झंझावाताने !! शारजातील मियांदाद च्या षटकाराने जे ह्या कट्टर शत्रुंच्या लढतीत पारडे पाकी बाजुला झुकले होते ते आपल्या बाजुला झुकले आणि मला वाटते ते अजुनहि तसेच आहे !!
सचिन आउट झाला तेव्हा सगळेच फार हळहळलो होतो ; पाकी कीपर् ( बहुतेक तौफीक) स्पष्ट शिव्या देताना दिसतो- त्याला त्याहुन तिखट शिव्या आम्ही टी व्ही समोरुन त्याला घातलेल्या !
पण फा म्हणले आहेत तसे द्रविड आणि युवराज ने मस्त खेळ केला !
थँक यु फेरफटका आणि थँक यु सचिन फोर द एंटरटेन्मेंट !!!

माझ्या द्रविड युवी विषयी लिहीलेल्या वाक्याचा अनपेक्षित अर्थ निघतोय असं मला पुन्हा वाचताना जाणवलं. दुरुस्ती करतो.

माझी माबोवरची एक जुनी पोस्ट..
मला सामना वृत्तपत्रातर्फे बक्षिस म्हणुन हा सामना मिळाला होता.. अगोदर भारत - इंग्लंड सामना (नेहरा फेम) ठरला होता, पण visa लांबल्यामुळे भारत पाक सामना दिला.. कालच पाहील्या सारखी ही मॅच व्यवस्थित आठवतेय.. १ मार्च २००३ -- शिवरात्रीचा दिवस.. सकाळी हॉटेल मध्ये veg म्ध्ये काय असे विचारले तर potato, tomato आणि beans असे उत्तर मिळाले.. टोमॅटोची puree असेल असा विचार करुन किचनला गेलो.. तर त्याने अगोदरच्या व्यक्तिला ज्या hot plate वर बिफ गरम करुन दिले होते त्यावरच माझे टोमॅटोचे दोन large slice गरम करुन दिले.. शिव शिव.. सेंच्युरियन वर तर क्रिकेटचा कुंभमेळा असल्यासारखी गर्दी होती.. सुदैवाने मला दुसर्‍या rowत जागा मिळाली होती.. सचिन प्रक्टिससाठी आला आणि प्रेक्षकांनी त्याच्या नावाचा जयघोष सुरु केला.. मग तो बापडा परत गेला.. आपण पहीलेच षटक १० चेंडुंचे टाकले.. पाकड्यांनी व्यवस्थित सुरुवात करत धावफलक हलता ठेवला होता.. आप्ल्याला २७४ चे टार्गेट मिळाले.. ह्या मॅचपर्यंत आपण एव्हढ्या धावांचा यशस्वी पाठलाग केला नव्हता.. ब्रेक मध्ये काहीतरी खाउन घ्यावे म्हणुन बाहेर आलो.. स्नॅक कॉर्नरला तोबा गर्दी होती.. आणि अचानक संचारबंदी जाहीर व्हावी अश्या प्रकारे सर्व जण पांगले.. कारण आतम्ध्ये सचिनने धडाका उडवीला होता.. शोएबने पहील्याच षटकानंतर गोलंदाजी थांबीवली.. तब्बल १८ धावा सचिनने चोप्ल्या.. माझ्या पुढील रांगेत नाना आणि त्याचा मुलगा मल्हार बसले होते.. मल्हारने लगेच एक पोस्टर बनवीले.. rawalpindi express derailed नंतर अवघ्या ५ षटकांत भारताच्या ५० धावा लागल्या.. ६वे षटक मात्र अडचणीचे गेले सेहवाग आणि नंतर पहिल्याच चेंडुवर गांगुली बाद झाला.. आपल्या ५७ धावा असताना रझ्झाक कडुन सचिनला जिवदान मिळाले आणि त्यावर विश्वास नबसुन वासिम अक्रम जोरात ओरडला "तुझे पता है की तुने किसका कॅच छोडा है" नंतर मात्र कैफ व सचिनने जास्त पडझड होवु दिली नाही.. crampमुळे सचिन बेजार झाला होता म्हणुन सेहवाग runner बनुन आला.. सचिन शतकाच्या समिप आला होता.. माझ्या बाजुच्या डिस्प्ले स्क्रिनवर त्याचा शतकी फोटो घेण्यासाठी मी सज्ज झालो आणि तो दुर्दैवाने बाद झाला.. अजुन १०० धावा हव्या होत्या मात्र युवराज आणि द्रवीडने विजयाला गवसणी घातली.. आणि शिवरात्रीला जगभर दिवाळी साजरी झाली.. आफ्रिकेत देखिल सर्वत्र भारताचे झेंडे घेवुन रस्ते housefull झाले होते..

काल संझगिरींनी सुद्धा ह्या मॅचची सचिनच्या इनिंगची क्लिप शेअर केली आहे चेपुवर... जे काही ठराविक शॉट्स त्या लिंक मध्ये आहेत ते भन्नाट आहेत... शोएबला मारलेली फ्लॅट सिक्स जबरी होती..

सतिश, तुम्ही हा सामना मैदानात जाऊन प्रत्यक्ष पाहीला - वाह! खरच नशीबवान आहात.

असंही वाचनात आलय, की सचिन ला एका बाजुने नांगर टाकायला सांगितलं होतं आणी लंच ब्रेक मधे एक वाटीभर आईस्क्रीम खाता खाता त्याने, फक्त मान डोलावली होती, पण 'देवा'च्या मनात काही वेगळंच होतं.

:). संझगिरी म्हंटले असते तो नांगर टाकायच्या ऐवजी त्याने तो गरागरा फिरवून पाकड्यांच्या डोक्यावर हाणायला सुरूवात केली.

शारजातील मियांदाद च्या षटकाराने जे ह्या कट्टर शत्रुंच्या लढतीत पारडे पाकी बाजुला झुकले होते ते आपल्या बाजुला झुकले आणि मला वाटते ते अजुनहि तसेच आहे !! >>> यस, एक्झॅक्टली! मी याच सायकॉलॉजिकल इफेक्ट बद्दल लिहीले होते २-३ वर्षांपूर्वी.

इनिंग ब्रेक मधे कोणातरी पाकी खेळाडूने मारलेल्या कॉमेन्ट मुळे सचिन चिडला होता असे जॉन राईटने लिहीले आहे.

सतिश ..सहीच! किती लकी आहात तुम्ही!!
शारजातील मियांदाद च्या षटकाराने जे ह्या कट्टर शत्रुंच्या लढतीत पारडे पाकी बाजुला झुकले होते ते आपल्या बाजुला झुकले आणि मला वाटते ते अजुनहि तसेच आहे !! >>> अ‍ॅग्री १००%. आत्ता लेटेस्ट वर्ल्ड कप मधे कॉमेन्टरी ला शोएब होता तेव्हा पाक हरायच्या मर्गावर असताना त्याची वैतागलेली कॉमेन्टरी ऐकून हीच चर्चा झाली होती मित्रमंडळींमधे.
"तुझे पता है की तुने किसका कॅच छोडा है" >> हे आताही वाचून अंगावर काटा आला!!

फारएण्ड, खूप मोठा ईफेक्ट आहे तो. शोएब परत कधीच तितका भेदक वाटू शकला नाही. कलकत्त्याच्या ज्या २ यॉर्कर्स नी शोएब ची भिती घातली होती, ती त्या एका ओव्हरने पार पळवून लावली.

खरं तर सचिन चा मोठेपणा, नुसता आकड्यांनी सिद्ध न होता, ह्या अशा दूरगामी परिणामांमुळे सिद्ध होतो. त्याच्या सिनिअर्स ना 'अरे हा जर उभा राहू शकतो, तर आपणही हात-पाय हलवायला हवे' असं वाटणं, किंवा, समकालीन (द्रविड) खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणं हे केवळ स्वप्न नसून, ते प्रत्यक्षातही येऊ शकतं हा आत्मविष्वास वाटणं आणी नंतर येणार्या सेहवाग पासून कोहलीपर्यंत च्या २ पिढ्यांना आक्रमक बॅटींग ची, game read करण्याची एक टेंप्लेट देणं, हे सचिन चं फार मोठं कॉन्ट्रीब्यूशन आहे.

वाह मजा आणलीत फेरफटका..

गांगुली बाद झाल्यावर मी डोक्याला हात मारल्याचे आठवतेय. सचिन आज मूडमध्ये आहे तर हे लोकं का घाण करत आहेत. उभे राहा ना फक्त. आता सचिनही स्लो होणार वगैरे वगैरे सगळी भाकिते धुडकावून लावत त्या वर्ल्डकपमधील त्याच्या सुपरफॉर्मवर भरवसा ठेवत त्याने चालूच ठेवलेला एटेक.. जबरदस्त!

द्रविड युवराज जोडगोळीच्या कौतुकाशिवाय हा लेख किंवा त्या मॅचची आठवण पुर्ण होऊच शकत नाही. त्यांनी उर्वरीत सामन्यात कुठलेही नाट्य घडू दिले नाही आणि सचिनची जबरदस्त खेळी पाहिल्याच्या समाधानात तसेच राहू दिले.

अवांतर - पाकिस्तानशी विश्वचषकात सचिन असताना जिंकलेल्या पाच पैकी चार सामन्यात तोच सामनावीर होता. 2015 च्या सहाव्या सामन्यापासून त्याची जागा घ्यायला कोहली आलाय. इथेही पावलावर पाऊल Happy

वीरू - अब क्या करना है?
सचिन - क्या करनेका है? बस मारने का?

मैदानात येताना ह्या दोघात हे बोलने झाल्याचे सेहवागने सांगीतले आहे.

मी तेंव्हा इंडीला राहत तो. अपार्तमेंटमधील सर्वांना ( गोर्‍या लोकांना) पुढचे काही दिवस मध्यरात्रीपासून आरडाओरडा असेल, प्लिज, प्लिज सहन करा असे सांगून झाले. पण आदल्याच्य मॅचला भारत जिंकताना अपार्टमेंटच्या बाहेर आवाजाच्या तक्रारीमुळे पोलिस आले होते. शेजार्‍यांना व पोलिसांना हजारदा समजावून सांगीतले की मॅच आहे. त्यांना वाटले की आम्ही सॉकर गेम पाहत असल्यामुळे आवाज करत आहोत. पण क्रिकेट इज जंटलमेन्स गेम यु नो !

त्यात ही पाकची मॅच. मग आवाज होणारच होता. सगळ्यांना मनातल्या मनात ओरडा हे हजारदा सांगून झाले होते, पण मॅचच्या दिवशी ( की रात्री) आरडाओरडा चालू झाला तो झालाच. त्या आदल्यादिवशी प्रत्येक शेजार्‍याकडे केक आणि फुलं नेउन दिली. आवाज होणारच पण कृपया पोलिसांना कळवू नका, आम्ही कमी आवाज करतो असे सांगीतले. पण आवाज झालाच. पोलिस मात्र आले नाही. शेजार्‍यांची कृपा.

मॅच बद्दल काय लिहिणार? रेस्ट इज हिस्ट्री. Happy

सगळ्यांच्या आठवणी कशा त्या थर्डमॅनवरून मारलेल्या सिक्सभवती, मिड्विकेट ला मारलेल्या चौकाराभावती, त्या रझाक ने सोडलेल्या कॅचभवती आणी अक्रमच्या हताश प्रतिक्रियेभवती रेंगाळताहेत. वाह!

हा त्या मॅच चा रिपोर्ट नाहीचै. त्या मॅचबद्दलच्या, त्या वेळच्या आपल्या आठवणींबद्दल आहे.

या मॅच चा इफेक्ट इतका होता की तो वीकेण्डभर (ही मॅच शुक्रवारी रात्री झाली) कोणालाही भेटलो तरी दुसरा विषय नव्हता बोलायला.

ती थर्ड मॅन वरची सिक्स होती तसे शॉट मारायचा प्रयत्न आधी कितीतरी वर्षे सचिन चा चालू असावा. १९९७ च्या भारतातील इण्डिपेण्डन्स कप मधे तो अशाच शॉट ला थर्ड मॅन ला कॅच देउन आउट झाल्याचे लक्षात आहे. मात्र इथे रेग्युलर बाउन्स आणि शोएबचा स्पीड दोन्हीचा अंदाज घेउन त्याला खात्री झाली असेल की बॉल प्रेक्षकात जाईल.

पुढच्या ओव्हर मधे सेहवाग ने वकारलाही तशीच मारली होती.

"या मॅच चा इफेक्ट इतका होता " - आज १३ वर्षानंतर सुद्धा ईतक्या लोकांना, ईतके डिटेल्स आठवावेत, ही त्या मॅचची आणी सचिन ची कमाल आहे.

शारजातील मियांदाद च्या षटकाराने जे ह्या कट्टर शत्रुंच्या लढतीत पारडे पाकी बाजुला झुकले होते ते आपल्या बाजुला झुकले आणि मला वाटते ते अजुनहि तसेच आहे !! >> मला वाटते कि चौहान ने पाकिस्तानमधल्या ODI मधे साकलेनला मारलेल्या सिक्स नंतर 'हम भी कुछ कर सकते है' अशा आवेशात आपण खेळायला लागलो होतो. ९६ कि ९७ मधे ढाक्यात पहिला ३००+ चेस केला होता पाकिस्तानविरुद्ध, (कानेटकर फेम) ती सव्याज परतफेड होती. त्यातही सचिन साकलेनच्या पाठी हात धुवून लागला नि बाकीच्यांनी तोच टेंपो कायम ठेवला होता. २००३ च्या World Cup मधल्या match चे वैशिष्ट हे म्हणूया कि अक्रम, वकार, शोअब हे तिघेही असताना पूर्ण नामोहरम केले होते.

खरं तर सचिन चा मोठेपणा, नुसता आकड्यांनी सिद्ध न होता, ह्या अशा दूरगामी परिणामांमुळे सिद्ध होतो >> वादाला निमंत्रण का देतोयस मित्रा Wink

असामी, तो ढाक्यातला चेस जानेवारी १९९८ मधला. सचिन तेव्हा नुकताच कप्तानपद गेलेला व त्यामुळे "मोकळा" झालेला होता. आधी वर्ष दीड वर्ष त्याला हाणामारी करताना न पाहिल्याने या ढाक्यातील टूर्नामेण्ट मधे पहिल्या मॅच पासून त्याची पूर्वीची धुलाई दिसू लागल्यावर 'सचिन इज बॅक' हे लक्षात आले होते.

पारडे आपल्याकडे झुकण्याच्या बाबतीत मात्र मला हीच २००३ ची मॅच इफेक्टिव्ह वाटते. राजेश चौहान ची १९९७ मधली सिक्स किंवा कानेटकर ची १९९८ मधली फोर तू म्हणतोस तशी 'हम भी कुछ कर सकते है' वाली होतीच, पण त्याच्या आजूबाजूला इतर मॅचेस मधे मार खाणे चालू होतेच. या इतर मॅचेस मधे पाक विरूद्ध खेळताना दडपण असायचे. ते या २००३ वाल्या मॅच पासून नंतर दिसले नाही. पाकची भीतीच गेली.

फा शी सहमत
या आधी आपण कधी जिंकत होतो तर कधी सपशेल हारत होतो. कुठलाहि पाकी सामना म्हणजे त्यांच्या गोलंदाजांची अन सईद अन्वर ची जाम दहशत असायची !!
ह्या २००३ च्या सामन्यात युवी अन द्रविड प्रमाणेच कैफ (जरी २०-३० च्या मधेच स्कोअर केला तरि) खूपच महत्वाची ईन्निंग्स खेळला होता.
त्यांच्या त्या सामन्यातील कीपरच नाव तौफीकच होतं का ?

जबरी लेख आणि प्रतिक्रियांमधून सगळ्यांच्या आठवणीही. पुण्यात 'The corinthian club' ने हा सामना स्क्रीन केला होता. मी आणि माझे दोन सचिनभक्त मित्र गेलो होतो. ज्या मित्राने हे पासेस आणले होते, तो आमच्या तिघां मधला सचिन भक्तेस्ट कॅटॅगरी मधला होता. बाकीचे आम्ही दोघे भक्त, भक्तर (bhakt, bhakter, bhaktest) या कॅटेगरीतले. अजूनही आठवतंय, सचिन बॅटींग ला आला तेव्हा आम्ही तिघेही जमीनीवर मांडी घालून ज्या स्थितीत बसलो होतो, ते तसेच ! आमच्या भक्तेस्ट मित्राने इकडे तिकडे जराही हलायची मुभा दिली नव्हती, मान सुद्धा इकडे तिकडे नाही करायची ...आजूबाजूला कितीही प्रेक्षणीय स्थळे असली तरी ! सचिन नव्वदीत असताना भक्तर ला निसर्गाच्या हाकेला ओ द्यायची इच्छा झाली होती. यावर भक्तेस्ट ने त्याला धमकी दिली होती, की हललास तर आपली दोस्ती तुटली ! पण याला सचिन ९८ वर पोचल्यावर सहन करण्यापलीकडे परिस्थिती झाल्याने तो उठला, आणि विकेट पडली.
मॅच फायनली जिंकेपर्यंत भक्तेस्ट, भक्तर ला खुन्नस देत, शिव्या घालत होता Happy

फेरफटका... वा काय आठवणी जागवल्या आहेस.. मर्मबंधातली ठेव Happy

मित्राच्या सायबर कॅफेत ती इनिंग एकत्र बघत होतो. सचिनने शोएबला थर्डमॅनला फेकल्या वर रस्त्यावर येऊन धिंगाणा केला होता आणि BEST वाला बस थांबवून ती मजा बघत होता.

खूप मोठा ईफेक्ट आहे तो. शोएब परत कधीच तितका भेदक वाटू शकला नाही. कलकत्त्याच्या ज्या २ यॉर्कर्स नी शोएब ची भिती घातली होती, ती त्या एका ओव्हरने पार पळवून लावली >>> +१११

खरं तर सचिन चा मोठेपणा, नुसता आकड्यांनी सिद्ध न होता, ह्या अशा दूरगामी परिणामांमुळे सिद्ध होतो. त्याच्या सिनिअर्स ना 'अरे हा जर उभा राहू शकतो, तर आपणही हात-पाय हलवायला हवे' असं वाटणं, किंवा, समकालीन (द्रविड) खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणं हे केवळ स्वप्न नसून, ते प्रत्यक्षातही येऊ शकतं हा आत्मविष्वास वाटणं आणी नंतर येणार्या सेहवाग पासून कोहलीपर्यंत च्या २ पिढ्यांना आक्रमक बॅटींग ची, game read करण्याची एक टेंप्लेट देणं, हे सचिन चं फार मोठं कॉन्ट्रीब्यूशन आहे. >> १००% सहमत

सतिश... देवाचा चमत्कार लाईव्ह बघायला मिळाला... खरच नशिबवान तुम्ही.

मित.. same pinch मी देखिल सचिन शतकाच्या समिप आला होता.. तेव्हा माझ्या बाजुच्या स्क्रिनवर त्याचा शतकी फोटो घेण्यासाठी सज्ज झालो आणि तो दुर्दैवाने बाद झाला.. त्यानंतर मॅच जिंके पर्यंत तो स्क्रिन पाहीला नाही..

असामी, मी पण फारएण्ड शी सहमत आहे. राजेश चौहान आणी कानिटकर च्या त्या चौकारांनी 'आपण पाक विरुद्ध जिंकु सुद्धा शकतो' हा आशावाद जागवला होता (कानिटकर फेम मॅच मधे सुद्धा सचिन ने सुरुवातीला मोठा हल्ला चढवला होता), पण 'त्या' सिक्सनंतर, 'पाकिस्तान ला हरवू' असा आत्मविश्वास निर्माण झाला.

Pages