१३ वर्षांपूर्वी, १ मार्च ला रात्री/पहाटे १ वाजता उठलो, सगळ्या रूममेट्स ना उठवलं. सगळे कुंभकर्ण कसे पटापट उठून आले, कॉफी पिऊन, अर्ध्या मैलावर असलेल्या एका 'लिट्ल ईंडिया' मधे पोहोचलो. (हे टोपण नाव तिथे रहाणार्या संख्येने आणी वागण्याने सुद्धा कमाल असलेल्या देसी स्टुडंट्स मुळे पडलं होतं).
दुसर्या मजल्यावर एक केबल कनेक्शन घेऊन, मधे स्प्लिटर टाकून ४ अपार्ट्मेंट्स मधे पोहोचवलं होतं. त्या १५० स्क्वेअर फूटाच्या खोलीत पन्नासएक जण जीव मुठीत घेऊन बसावा, तसं पाय पोटाशी घेऊन बसले होते. मांडी घालण्याची चैन परवडणारी नव्हती आणी जागा सोडणं हे ईंजिनीअरींग ची किंवा मेडिकल ची मिळालेली फ्री सीट सोडण्याईतकं कल्पनातीत होतं.
टॉस जिंकुन पाकिस्तान ने बॅटींग घेतली आणी काळजी वाटायला लागली. आत्तापर्यंत दर वेळी भारताने पहिली बॅटींग केली होती. पण ठीक आहे, बघू कसं होतं असा एकमेकांना धीर देत टीव्ही कडे पहात होतो. पाकिस्तान कडे असे काही खेळाडू आहेत ज्यांना बहुदा फक्त भारताच्या विरुद्ध मॅच असली की च खेळायला काढतात. त्या यादीतलं एक नाव म्हणजे सईद अन्वर. पट्ठ्या लौकीकाला जागत खेळला आणी बघता बघता पाकिस्तान चे २७३ झाले. बॉलिंग ला अक्रम, वकार आणी तेव्हाचा भेदक शोएब होते. सगळ्यांचे चेहेरे कॉफीमेकर मधल्या कॉफीपेक्षा जास्त काळे ठिक्कर पडले.
एका ईंटरनॅशनल स्टुडंट सेंटर मधे ओळख झालेल्या अमेरिकन डॉक्टर ला हे क्रिकेट असतं तरी काय असा पडलेला प्रश्न सोडवण्यासाठी 'ये परवा सकाळी १ वाजता असं आमंत्रण दिलं होतं. तो पहाटे ४ वाजता डोनट्स आणी ऑरेंज ज्यूस घेऊन आला. त्याचं फर्स्ट ईंप्रेशन बहुदा क्रिकेट बघताना बुद्धीबळाच्या गांभीर्यानं बघतात असं झालं असावं.
लंच ब्रेक मधे, आय सी यू च्या बाहेर उभे असणार्या नातेवाईकांचं धैर्य तोंडावर ठेऊन, 'बघू, काय होतं. अजुन आपली बॅटींग आहे' वगैरे गोष्टी स्वतःला सुद्धा पटेल, न पटेल अशा बेतानं बोलत होते. बहुदा सचिन एका बाजुने उभा राहील आणी दुसर्या बाजुने आपण अॅटॅक करू (कारण मागच्या तीन्ही मॅचेस मधे असच केलं होतं, पण तेव्हा पहिली बॅटींग होती) किंवा सचिन स्वतःच हल्ला करेल अशा चर्चा दबक्या आवाजात चालू होत्या.
अर्ध्या तासाने आपली बॅटींग सुरू झाली. त्या वर्ल्डकप मधे पहील्यांदाच सचिन ने स्ट्राईक घेतला आणी काहीतरी वेगळं घडणार ह्याची चाहूल लागली. अक्रम, वकार, शोएब, रझाक ह्या चौकडी ला तोंड देण्यासाठी प्रत्यक्ष क्रिकेटच्या देवालाच तांडव करावं लागणार होतं. पहीलाच बॉल अक्रम ने शॉर्ट ऑफ गूड लेंग्थ, ऑफ स्टंप लाईन वर टाकला. डावखुर्या अक्रम चा तो बॉल सचिन सोडुन देईल असं वाटण्याच्या आतच, सचिन च्या एका डिफेन्सीव्ह पुश वाटावा अशा फटक्याने कव्हर बाऊंड्री च्या बाहेर गेला. आमच्या जीवात जीव आला. पण अजुन शोएब च्या ओव्हर ची धास्ती होतीच. २ वाइड आणी ३ सरळसाध्या बॉल्स नंतर पुढच्या तीन चेंडुत शिडात वारं भरावं तसं आमच्या सगळ्यांच्या फुप्फुसात हवा भरली गेली आणी ईतका वेळ शांतपणे सामना बघत बसलेला तो डॉक्टर बसल्या जागी कोसळला. आधीच्या बुद्धीबळाच्या सामन्याची जागा आता कुस्तीच्या आखाड्यानं घेतली होतॆ. सचिन सुटला होता. तो मैदानात पाकिस्तान बोलिंग चं जे करता होता, ते आम्ही टीव्ही समोर शब्दांनी करत होतो. पुढचा दीड तास, सचिन ने आम्हाला 'हा क्षण बघायला आपण जिवंत आहोत' ह्याबद्दल धन्यता वाटायला लावली. सचिन आऊट होईपर्यंत पाकिस्तानी बोलर्स च्या मनोधैर्याची त्यानं शकलं केली होतॆ. उरलेल्या १०० धावांत ती शकलं नीट उचलुन, व्यवस्थित गिफ़्ट पॅक करून त्यांच्या हातात ठेवायचं पुण्यकर्म द्रविड-युवराज जोडीनं केलं. ईतक्या शांतपणे आणी 'क्लिनीकली' त्यांनी उरलेलं काम पूर्ण केलं की पाकिस्तान ला आपण कधी हारलो हे कळलं देखील नसावं.
मॅन ऑफ मॅच सेरेमनी च्या सुरुवातीला रॉबर्ट जॅकमन नं आमच्या सारख्या असंख्य प्रेक्षकांची धन्यता चार शब्दात मांडली. 'थँक यु सचिन तेंडुलकर'.
हा लेख त्या मॅचचा वृत्तांत नाही तर केवळ एका क्रिकेटवेड्याने केलेलं एक संकीर्तन!!
मी काल पुन्हा हायलाइट्स
मी काल पुन्हा हायलाइट्स पाहिले.
मला आजवर द्रविड-युवराजच्या बॅटिंगमुळे - १०० रन शिल्लक असताना आपण य वेळा हारलो होतो त्यापुर्वी - आपण जिंकलो असे वाटत असे. काल क्षणचित्रे पाहताना जाणवले की सचिनचा सुरुवातीचा हल्ला - पाच ओव्हरमध्येच ५० रन आणि मग लवकरच १०० रन्स या तितक्याच मोलाच्या. आपण एकदम पुढेच गेलो त्या मॅचमध्ये त्या सुरुवातीच्या हल्ल्यामुळे.
वन ऑफ ऑल टायम ग्रेट मॅच
मी तेव्हा दहावीची परीक्षा
मी तेव्हा दहावीची परीक्षा देणार होतो, ५ मार्च पासून... आम्ही सगळे मित्र एकत्र येऊन अभ्यास करायचो (अभ्यास कमी आणि टाईमपासच जास्त...) ह्या मॅचसाठी घरच्यांची परवानगी मागितली होती की, आम्ही फक्त अर्धीच मॅच पाहू आणि मग अभ्यासाला बसू... पण झाले उलटेच!!! पाकची पूर्ण बॅटींग पाहिल्यानंतर, सचिनचा धडाका पाहतांना अभ्यासच काय, सगळंच विसरलो, आणि मॅच जिंकल्यानंतर, चौकात होणार्या सेलिब्रेशन मध्ये दंगा, आरडा-ओरडा, नाच करून रात्री थकून झोपून गेलो
त्यादिवशी सचिन प्रेम उतू गेले होते
ते आजतागायत कमी नाही झालेय 
पुन्हा एकदा डाउन द मेमरी लेन
पुन्हा एकदा डाउन द मेमरी लेन
जबरी.. परत परत वाचायल सुद्धा
जबरी.. परत परत वाचायल सुद्धा मजा येते आहे.
Pages