एअरलिफ्ट (AIRLIFT)

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 January, 2016 - 08:59

पंधरा-वीस पंचवीस वेळा ट्रेलर पाहिले होते तेव्हाच हा चित्रपट कोणाच्या परीक्षणाची वाट न पाहता बघायला जायचे हे ठरवले होते. आज तो निर्णय चुकला नव्हता यावर शिक्कामोर्तब करून आलो.

हा चित्रपट निघाला नसता तर माझ्यासारख्या अज्ञानी लोकांना कधी समजलेही नसते की ईराकने कुवैतवर केलेल्या हल्ल्यात तब्बल पावणेदोन लाख भारतीयांचे जीव धोक्यात होते. त्यांना एअरलिफ्ट करणे म्हणजेच हवाई मार्गाने तिथून सुखरूप हलवणे याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. एवढ्या लोकांना परत आणने केवळ भारतीय एअरफोर्सच्या विमानांना शक्य नव्हते म्हणून सोबतीला एअर ईंडिया, ईंडियन एअरलाईन्सच्या विमानांची मदत घेतली गेली ज्यांनी खरे तर असे वॉर झोनमध्ये जाण्याची रिस्क घेणे अपेक्षित नसते. दुसर्‍या देशात अडकलेल्या आपल्या देशवासीयांची अशी सुटका करण्याचे हे जगाच्या ईतिहासातील सर्वात मोठे उदाहरण आहे. अशी अभिमानास्पद कामगिरी पडद्यावर बघणे आणि त्याबद्दल जाणून घेण्याची संधी सोडायची नव्हतीच. याऊपर एक कलाकृती म्हणून देखील हा चित्रपट खूप आवडला.

इराकचे रणगाडे कुवैतच्या रस्त्यावर फिरत आहेत. त्यांचे उन्मत्त सैनिक कुवैती नागरीकांची लुटालूट करत आहेत. जीव घेणे हा निव्वळ पोरखेळ बनला आहे. कधी कोण कुठून येऊन मारेल याची श्वाश्वती नाही. ना कसला कायदा, ना कानून. कुवैतचे सरकार सर्व नागरीकांना तसेच मरण्यासाठी सोडून पसार झाले आहे. हे कधी थांबेल याची कल्पना नाही. कोणीतरी येऊन आपली सुटका करेल याची वाट बघायची एवढेच आपल्या हातात उरलेय. अश्या परिस्थितीत कुवैतमधील एक भारतीय उद्योगपती (अक्षयकुमार) पुढे सरसावत, उद्भवलेल्या परिस्थितीनुसार स्वत:कडे नेतृत्व घेत, आपल्या काही सहकार्‍यांच्या मदतीने सर्व भारतीय निर्वासितांना एका छत्राखाली आणत त्यांच्या निवार्‍याची आणि सुरक्षिततेची काळजी घेतो. सर्वांच्या सुटकेचे प्रयत्न करत अखेर भारत सरकारशी संपर्क साधून त्यांच्यासोबत सुखरूप भारतात परततो, असा एकंदरीत प्लॉट आहे.

अक्षयकुमारला त्याच्या खिलाडीपटांपासून फॉलो करत असल्याने एक अभिनेता म्हणून त्यात घडत असलेले बदल बरेचदा थक्क करतात. या चित्रपटाने त्याला आणखी एक पातळी वर नेले आहे. त्याची विनोदाची शैली आवडतेच पण त्याच्यातील संयत अभिनेता जास्त आवडतो. आता त्यातही खूप सहजता येऊ लागलीय. या भुमिकेचे बेअरींग पहिल्या द्रुश्यापासूनच तो जबरदस्त पकडतो. पुढचा चित्रपट आपण त्याच्या नजरेने आणि त्या परिस्थितीत स्वत:ला त्याच्या जागी ठेवून बघतो.

हिरोईनला तुलनेत तितकेसे फूटेज नसल्याने ती कदाचित शोभेची बाहुली बनून राहिली असती. पण निम्रत कौर जेवढी छान दिसते तेवढीच ती लक्षातही राहते. तिच्या वाट्याला आलेल्या एकदोन भावखाऊ प्रसंगांचेही तिने आपल्या डायलॉगबाजीने चीज केले आहे. एक गंमत म्हणजे तिचे रूप बघून मला सारखी भिती वाटत होती की इराकी सैन्य कुवैती समजून हिलाच धरताहेत की काय..

ईतर छोटीमोठी पात्रे जी या प्रवासात भेटतात त्या प्रत्येकाने आपापले काम चोख बजावलेय. कुठलेही पात्र वा प्रसंग अनावश्यक वाटत नाही. चित्रपटाची लांबी वाढवत त्या पात्रांना आणखी खुलवले असते तरी बघायला आवडले असते. अर्थात, थिएटरमध्ये पैसे मोजून गेलोय आणि चित्रपट चांगला निघालाय तर तो आणखी बघावासा वाटणे ही हाव देखील यामागे असू शकते.
पण चित्रपट मुख्यत्वे अक्षयकुमारने केलेल्या प्रयत्नांभोवतीच फिरत राहिल्याने आपल्या इथून भारतीय अधिकार्‍यांनी जे काही प्रयत्न केले असतील ते तितकेसे प्रभावीपणे दाखवण्यात आले नाहीत असे मला वाटते. जर परीक्षकाच्या भुमिकेतून मला कुठे मार्क कापावासा वाटला तर तो मी इथे कापेन.

चित्रपटातील संगीत आवडले. सुरुवातीचे कुवैती आयटम सॉंग "दिदी" या अरेबिक गाण्यालाच भारतीय तडका देऊन त्याचे "दे दी" बनवल्याने आपण कुवैतमध्ये आहोत हे थोडक्यात प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यास यशस्वी ठरते. त्यानंतर लगेचच मुख्य घडामोडींना सुरुवात होते आणि पुढे येणारी गाणी कुठेही चित्रपटाचा मूड खंडीत करत नाहीत. शेवटचे केके च्या आवाजातील "तू भुला जिसे" गाणे त्यातील शब्दांसह बॅकग्राऊंड म्युजिकचे काम करते. तर मध्यंतराला जेव्हा सर्वांना एक सुटकेचा मार्ग दिसतो तेव्हा एक पंजाबी ठेक्याचे गाणे ताल धरते. पण चित्रपटातील माझे सर्वात आवडीचे गाणे, "तेनू ईतना मै प्यार करा, एक पल विच सौ बार करा.." https://www.youtube.com/watch?v=skPuv-EppEg .. वाह! अर्जित सिंगचा जादुई आवाज कमाल करून जातो. चित्रपटाची कथा थ्रिलरला साजेशी असूनही तो पुर्ण तसा न बनवता काही हळूवार प्रसंग दाखवलेत, त्यापैकी अक्षय आणि निम्रत कौरच्या नात्यातली पैलू हे गाणे तितकेच हळूवारपणे उलगडून जाते.

शेवटाकडे जाताना अतिरंजित ड्रामा टाळला आहे. तरीही जेव्हा भारताचा ध्वज फडकतो तेव्हा अंगावर शहारा येतोच. दूरदेशी अडकलेल्या भारतीयांसाठी तिथे भारताचा ध्वज फडकताना बघणे हा कसा आधार ठरू शकतो हे आपल्यालाही जाणवते. हा एक प्रसंग आणि त्यानंतर जेव्हा एअर ईंडियाचे पहिले विमान भारतीयांना घेऊन भारताच्या दिशेने उड्डाण करते तेव्हा, या दोन प्रसंगी थिएटरमध्ये आपसूक हलक्याश्या टाळ्या वाजल्या. घरी टिव्हीसमोर क्रिकेटची मॅच बघणे आणि स्टेडियममध्ये जाऊन भारताला जिंकताना बघणे या दोघांमधील फरक त्या टाळ्यांनी अधोरेखित केला. हा अनुभव घ्यायला तरी हा चित्रपट बघायला जायलाच हवे.
- समाप्त -

तळटीप - हे परीक्षण नाहीये तर मला चित्रपट आवडला म्हणून त्याबद्दल चार लोकांना सांगावेसे वाटले ईतकेच.

सर्वांना येत्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान परीक्षण. चित्रपट बघावासा वाटतोय नक्कीच.
फक्त लेखाचं शीर्षक मिसलीडिंग आहे. मला वाटलं उठा ले भगवान म्हणजे चित्रपट अगदी पकाऊ आहे की काय Happy

छान लिहिलेय. अक्षय माझाही खुप आवडता. आणि अलिकडे तो विचारपूर्वक चित्रपट करतोय.

गल्फ वॉर होत होती, तेव्हा मी ओमानमधेच होतो. त्या काळातल्या बातम्या माझ्या अजून लक्षात आहेत. खलीज टाईम्समधे एका भारतीय स्त्रीचे मनोगत होते. ती गरोदर असल्याने प्रवास करू शकत नव्हती, तिला एका कुवैती कुटुंबानेच आधार दिला होता. ती शेवटपर्यत तिथेच होती.

माझ्या एका सहकारी मुलीचे बाबा तिथे अडकले होते, त्यांनी जॉर्डनपर्यंत चालत प्रवास केला होता, मग तिथून भारतात आले.

केवळ भारतीयच नव्हे तर बांगला देशी आणि इतरही आशियाई देशातील लोक तिथे अडकले होते. बांगला देशींना, रशियन विमानांनी सहाय्य केले पण ती कार्गो विमाने होती. त्यात बसायला सीट्स नव्हत्या. बिचारे स्वतःला दोर्‍यांनी बांधून आले.

मला अवश्य बघायचाच आहे हा चित्रपट.

फक्त लेखाचं शीर्षक मिसलीडिंग आहे. मला वाटलं उठा ले भगवान म्हणजे चित्रपट अगदी पकाऊ आहे की काय >>>> + १०००००००००००००००००००००

बापरे चालत.. पिक्चर मध्ये दाखवल्यानुसार 1000 किमी अंतर आहे ते..

पद्मावती, स्वस्ति.. हा हा, हो खरेय Happy

अक्षय साठी नक्की बघणार!! परीक्षण छान लिहील आहे.

फक्त लेखाचं शीर्षक मिसलीडिंग आहे. मला वाटलं उठा ले भगवान म्हणजे चित्रपट अगदी पकाऊ आहे की काय >>>> + १००

छान लिहिलंय पण शीर्षक वाचून वाटलं कि सिनेमा बघून देवाने तुम्हाला उचलून न्यावं अशी तुम्ही विनंती करत आहात आणि तुम्ही सिनेमा ची चिरफाड करण्या साठी हा धागा सुरु केलाय. त्यामुळे शीर्षक बदलता आलं तर परीक्षणाला योग्य तो न्याय मिळेल.
पण संपूर्ण परीक्षण वाचल्यावर हा सिनेमा बघायचाच असा निर्धार मात्र केलाय.

कालच पाहिला....

अतिषय उत्तम सिनेमा !!!. एकदम फोकस.... एकही प्रसंग उगाचच नाही. परत खरी घटना आहे. एअर इंडिया व इतरांनी मिळुन ४८८ उड्डाणे केली. गीनेज बुक मधे सुद्धा ह्याची नोंद आहे. कारण येवढे मोठ्ठे रेस्क्यु ऑपेरेशन आज पर्यंत झालेले नाही.

अक्षय ने त्याच्या आज पर्यंतच्या भुमिकांमधली उत्क्रुष्ट भुमिका केली आहे. एकंदर कुवेत मधले वातावरण फारच प्रभावी उभे केले आहे. अक्षय आणि त्याच्या बायकोचा श्रीमंतीचा माज, इतर भारतिय उद्योजकांची मानसिकता, फक्त पैश्या भोवती फिरणारी आयुष्ये, एका घटनेने एकदम चक्काचुर होवुन जमिनीवर येतात.... इराकी सैनिकांचे सगळे प्रसंग फारच उत्तम वठले आहेत. निमरत कौर एकदम मस्त.... निनाद कामत, भारतिय अधिकारी कोहोली, जॉर्ज च्या भुमिकेतला कलाकार..... अप्रतिम !!! साध्या साध्या भुमिकेतही उत्तम मुद्राभिनय करणारे लोक घेतले आहेत. १९९० मधे तेंडुलकर ची डेब्यु मॅच, माधुरीचं तेजाब मधले गाणे, इ. दाखवुन त्या वेळचा काळ सुरेख उभा केला आहे.

परदेशात आपण कितीही पैसे कमावले तरी कसे निराधार असतो हे ह्या सिनेमाने प्रकर्षाने दाखवले......

सिनेमाच्या शेवटी त्या वेळच्या वर्तमान्पत्रातिल कात्रणे, तेंव्हाचे फोटो, आणि ते साकार करणार्‍या खर्‍या हीरोंचे फोटो दाखवुन मजा आणली आहे.

ते पहिले विमान टेक ऑफ घ्यायला सज्ज असताना, विमानात पायलट व इतर क्रु येतो तेंव्हा विमानात टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत होते, तेंव्हा दोन टाळ्या मी ही वाजव्वुन घेतल्या.... एवढी रंगले होते !!!!

शिर्षक बदलले म्हणून आत येऊन वाचला Happy

माझाही जायचा विचार होता या चित्रपटाला.. आता तो एकदम पक्का झाला. हा मला आवडेल अशा टाईपचा चित्रपट आहे, आणि असे खूप कमी येतात त्यामुळे हा नक्कीच सोडणार नाही..
बर झाल हा लेखनप्रपंच केलास, thanks रुन्म्या.

आता मला बघायलाच हवा..( बहुतेक एमिरेट्सच्या विमानातच बघायला मिळेल ) त्या दिवसातल्या काही आठवणींना उजाळा मिळेल. मी त्या काळात मस्कत मुंबई प्रवासही केला. गल्फ एअरचे मुख्य ठिकाण मनामा ( बहारीन ) होते पण तिथे विमाने ठेवणे धोक्याचे होते, म्हणून त्यापैकी बरिचशी विमाने मस्कत मधे आणून ठेवली होती. कुवैत एअरलाईन्सचे एक विमान बरेच महिने, मस्कतला आणून बाजूला पार्क करुन ठेवले होते, ते आम्हाला रोज जाता येता दिसायचे.

सी एन एन हा चॅनेल त्याच दिवसात गाजला. लढाईचे जवळ जवळ थेट प्रक्षेपण तो करत असे !

खरच थिएटर मधे लोकानी टाळ्या वाजवल्या.. मजा

अक्षय मस्त्च..

कुठेही अतिरेक नाही वाटला..

हल्ल्याचे पहिले चित्रिकरण भयानक आहे.. म्हणजे रिअ‍ॅलिस्टिक च पण भिती वाटली खरोखर असा हल्ला झाला असेल तेव्हा काय त्रास झाला असेल .. भिती वाटली असेल..

जॉर्ज च्या भुमिकेतला कलाकार..... >>> +७८६ .. धमाल कॅरेक्टर आहे ते.. मस्त केलेय काम त्याने.. आज आमच्या ऑफिसमध्येही या चित्रपटाच्या चर्चेत त्याचे नाव आणि तिरसट डायलॉग आठवले गेले..
- तलवारमधील बदली होऊन आलेला पोलिस अधिकारी तोच होता तो..

चित्रपट पाहीला.. खुप आवडला ... कुवेती मेजर चे कामही लक्षात रहाण्याजोगे ... फक्त एकच वाटले की भारतीय विमानांनी त्या सर्व लोकांना सोडवले ... तो भाग अत्यल्प दाखवलाय ...

काल पाहिला. खुप आवडला. काही ठिकाणी डोळे भरुन आले. खासकरुन क्वीन आलिया एयरपोर्ट वर जेव्हा तिरंगा फडकतो. अक्कीने मस्त भुमिका निभावलीय. निम्रत पण मस्त. मि. जॉर्ज अगदीच लक्षात रहातो. आणि इराकी मेजर पण. बर्‍याच बारकाईच्या गोष्टी दाखवल्यात.
जर सिनेमा बघितला नसता तर एवढं मोठं रेस्क्यु ऑपरेशन कधी झालं होतं हे कधीच माहित झालं नसतं.

काल पाहिला मी. मला प्रचंड आवडला. अक्षय चा काम मस्त आहे. गाणी पण खुप आवडलीत.

अवांतर, हा धागा शोधण्यासाठी ऋन्मेऽऽष चा लेख शोधत होते(शोध मधे टाईप करण्यापेक्ष्या क्लिक करण्यावर जास्त वि श्वास :प ). रोज पहिल्यापानावर ४ असतात पण आज चक्क ५ व्या पानावर एक दिसला. ठिक आहेस ना ऋन्मेऽऽष?

इराकी मेजर आधी कुठेतरी पाहिल्या सारखा वाटत आहे..
कुठे काम केल आहे का त्याने..?
काम मात्र मस्त..

Pages