एअरलिफ्ट (AIRLIFT)

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 January, 2016 - 08:59

पंधरा-वीस पंचवीस वेळा ट्रेलर पाहिले होते तेव्हाच हा चित्रपट कोणाच्या परीक्षणाची वाट न पाहता बघायला जायचे हे ठरवले होते. आज तो निर्णय चुकला नव्हता यावर शिक्कामोर्तब करून आलो.

हा चित्रपट निघाला नसता तर माझ्यासारख्या अज्ञानी लोकांना कधी समजलेही नसते की ईराकने कुवैतवर केलेल्या हल्ल्यात तब्बल पावणेदोन लाख भारतीयांचे जीव धोक्यात होते. त्यांना एअरलिफ्ट करणे म्हणजेच हवाई मार्गाने तिथून सुखरूप हलवणे याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. एवढ्या लोकांना परत आणने केवळ भारतीय एअरफोर्सच्या विमानांना शक्य नव्हते म्हणून सोबतीला एअर ईंडिया, ईंडियन एअरलाईन्सच्या विमानांची मदत घेतली गेली ज्यांनी खरे तर असे वॉर झोनमध्ये जाण्याची रिस्क घेणे अपेक्षित नसते. दुसर्‍या देशात अडकलेल्या आपल्या देशवासीयांची अशी सुटका करण्याचे हे जगाच्या ईतिहासातील सर्वात मोठे उदाहरण आहे. अशी अभिमानास्पद कामगिरी पडद्यावर बघणे आणि त्याबद्दल जाणून घेण्याची संधी सोडायची नव्हतीच. याऊपर एक कलाकृती म्हणून देखील हा चित्रपट खूप आवडला.

इराकचे रणगाडे कुवैतच्या रस्त्यावर फिरत आहेत. त्यांचे उन्मत्त सैनिक कुवैती नागरीकांची लुटालूट करत आहेत. जीव घेणे हा निव्वळ पोरखेळ बनला आहे. कधी कोण कुठून येऊन मारेल याची श्वाश्वती नाही. ना कसला कायदा, ना कानून. कुवैतचे सरकार सर्व नागरीकांना तसेच मरण्यासाठी सोडून पसार झाले आहे. हे कधी थांबेल याची कल्पना नाही. कोणीतरी येऊन आपली सुटका करेल याची वाट बघायची एवढेच आपल्या हातात उरलेय. अश्या परिस्थितीत कुवैतमधील एक भारतीय उद्योगपती (अक्षयकुमार) पुढे सरसावत, उद्भवलेल्या परिस्थितीनुसार स्वत:कडे नेतृत्व घेत, आपल्या काही सहकार्‍यांच्या मदतीने सर्व भारतीय निर्वासितांना एका छत्राखाली आणत त्यांच्या निवार्‍याची आणि सुरक्षिततेची काळजी घेतो. सर्वांच्या सुटकेचे प्रयत्न करत अखेर भारत सरकारशी संपर्क साधून त्यांच्यासोबत सुखरूप भारतात परततो, असा एकंदरीत प्लॉट आहे.

अक्षयकुमारला त्याच्या खिलाडीपटांपासून फॉलो करत असल्याने एक अभिनेता म्हणून त्यात घडत असलेले बदल बरेचदा थक्क करतात. या चित्रपटाने त्याला आणखी एक पातळी वर नेले आहे. त्याची विनोदाची शैली आवडतेच पण त्याच्यातील संयत अभिनेता जास्त आवडतो. आता त्यातही खूप सहजता येऊ लागलीय. या भुमिकेचे बेअरींग पहिल्या द्रुश्यापासूनच तो जबरदस्त पकडतो. पुढचा चित्रपट आपण त्याच्या नजरेने आणि त्या परिस्थितीत स्वत:ला त्याच्या जागी ठेवून बघतो.

हिरोईनला तुलनेत तितकेसे फूटेज नसल्याने ती कदाचित शोभेची बाहुली बनून राहिली असती. पण निम्रत कौर जेवढी छान दिसते तेवढीच ती लक्षातही राहते. तिच्या वाट्याला आलेल्या एकदोन भावखाऊ प्रसंगांचेही तिने आपल्या डायलॉगबाजीने चीज केले आहे. एक गंमत म्हणजे तिचे रूप बघून मला सारखी भिती वाटत होती की इराकी सैन्य कुवैती समजून हिलाच धरताहेत की काय..

ईतर छोटीमोठी पात्रे जी या प्रवासात भेटतात त्या प्रत्येकाने आपापले काम चोख बजावलेय. कुठलेही पात्र वा प्रसंग अनावश्यक वाटत नाही. चित्रपटाची लांबी वाढवत त्या पात्रांना आणखी खुलवले असते तरी बघायला आवडले असते. अर्थात, थिएटरमध्ये पैसे मोजून गेलोय आणि चित्रपट चांगला निघालाय तर तो आणखी बघावासा वाटणे ही हाव देखील यामागे असू शकते.
पण चित्रपट मुख्यत्वे अक्षयकुमारने केलेल्या प्रयत्नांभोवतीच फिरत राहिल्याने आपल्या इथून भारतीय अधिकार्‍यांनी जे काही प्रयत्न केले असतील ते तितकेसे प्रभावीपणे दाखवण्यात आले नाहीत असे मला वाटते. जर परीक्षकाच्या भुमिकेतून मला कुठे मार्क कापावासा वाटला तर तो मी इथे कापेन.

चित्रपटातील संगीत आवडले. सुरुवातीचे कुवैती आयटम सॉंग "दिदी" या अरेबिक गाण्यालाच भारतीय तडका देऊन त्याचे "दे दी" बनवल्याने आपण कुवैतमध्ये आहोत हे थोडक्यात प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यास यशस्वी ठरते. त्यानंतर लगेचच मुख्य घडामोडींना सुरुवात होते आणि पुढे येणारी गाणी कुठेही चित्रपटाचा मूड खंडीत करत नाहीत. शेवटचे केके च्या आवाजातील "तू भुला जिसे" गाणे त्यातील शब्दांसह बॅकग्राऊंड म्युजिकचे काम करते. तर मध्यंतराला जेव्हा सर्वांना एक सुटकेचा मार्ग दिसतो तेव्हा एक पंजाबी ठेक्याचे गाणे ताल धरते. पण चित्रपटातील माझे सर्वात आवडीचे गाणे, "तेनू ईतना मै प्यार करा, एक पल विच सौ बार करा.." https://www.youtube.com/watch?v=skPuv-EppEg .. वाह! अर्जित सिंगचा जादुई आवाज कमाल करून जातो. चित्रपटाची कथा थ्रिलरला साजेशी असूनही तो पुर्ण तसा न बनवता काही हळूवार प्रसंग दाखवलेत, त्यापैकी अक्षय आणि निम्रत कौरच्या नात्यातली पैलू हे गाणे तितकेच हळूवारपणे उलगडून जाते.

शेवटाकडे जाताना अतिरंजित ड्रामा टाळला आहे. तरीही जेव्हा भारताचा ध्वज फडकतो तेव्हा अंगावर शहारा येतोच. दूरदेशी अडकलेल्या भारतीयांसाठी तिथे भारताचा ध्वज फडकताना बघणे हा कसा आधार ठरू शकतो हे आपल्यालाही जाणवते. हा एक प्रसंग आणि त्यानंतर जेव्हा एअर ईंडियाचे पहिले विमान भारतीयांना घेऊन भारताच्या दिशेने उड्डाण करते तेव्हा, या दोन प्रसंगी थिएटरमध्ये आपसूक हलक्याश्या टाळ्या वाजल्या. घरी टिव्हीसमोर क्रिकेटची मॅच बघणे आणि स्टेडियममध्ये जाऊन भारताला जिंकताना बघणे या दोघांमधील फरक त्या टाळ्यांनी अधोरेखित केला. हा अनुभव घ्यायला तरी हा चित्रपट बघायला जायलाच हवे.
- समाप्त -

तळटीप - हे परीक्षण नाहीये तर मला चित्रपट आवडला म्हणून त्याबद्दल चार लोकांना सांगावेसे वाटले ईतकेच.

सर्वांना येत्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुवैत ते जॉर्डन = १०९१ कि.मी
गाडी ने १ मिनीट मध्ये १ कि.मी ह्या हिशेबाने
१०९१ कि.मी = १८.१८ तास

ह्या मिशन एअर इंडियाचे जे पायलट होते त्याचे पुतणे माझ्या बाजुच्या सीट वर बसले होते. त्यानी सांगितले की त्यांचे काका २ महिने जॉर्ड्न मधे होते आणि सरकार पुर्ण पणे प्रयत्न करत होते. घरचे तेव्हा फार काळजीत असायचे की युध्य भुमीवरुन विमान चालवायचे म्हणून. सगळ्यात शेवटी २ ३ वेळेला त्यांचा फोटो पण दाखवला,

आज पाहिला. आवडला. गुंतवून ठेवतो शेवटपर्यंत. एकदा बघण्यासारखा आहे. कामे छान झाली आहेत सगळ्यांची.

फक्त तो इराकी मेजर कर्नलची rank लावून का फिरत होता ते कळले नाही. Wink

चित्रपट छान! पण काही गोष्टी ओढून ताणून कथानकात बसवलेल्या वाटल्या. इराकी मेजर अजिबात कंन्विंसिंग वाटला नाही. त्याऐवजी खरखुरा इराकी दिसणारा हवा होता.

सुलू सहमत.
ते पात्र मजेशीर उभे केले होते पण फारसे कन्वेंसिंग मलाही वाटले नाही. किंबहुना दहशत वाटायला हवी होती त्या पात्राची पण तसे फारसे झाले नाही. आणि हा दोष दिग्दर्शकाकडे जातो.

कोहली मिनिस्ट्री मध्ये जॉइंट सेक्रेटरी दाखवलाय आणि एखाद्या क्लेर्क सारखा ओफिसमध्ये बसलेला दाखवलाय. दिग्दर्शकाने एकदा एखाद्या मिनिस्ट्री मध्ये जाऊन जॉइंट सेक्रेटरी म्हणजे कोण असतात ते पाहुन यायला हवं होतं.

स्वामी,
त्यावर गॅरिबाल्डी हाऊस नावाचा अत्यंत सपक चित्रपट येऊन गेला. मात्र त्याचे मराठीतले पुस्तक फार थरारक आहे.

त्या मराठी पुस्तकाचे नाव कळेल काय ?

मी अभि. हो त्याची बसण्याची जागा खटकतेच, पण मंत्र्यांच्या केबीनमध्ये थेट प्रवेश करण्याइतक त्याचं स्टेटस दाखवलय पुढे....

जेम्स बाँड

Paradh - Aishman.jpg

ISBN No: 978-81-7434-412-0
अशोक जैन
'तो' खरा कोण होता? रिकार्डो क्लेमन्ट की ऍडॉल्फ आईषमान? एक निष्पाप, साधा-सरळ अर्जेंटाइन नागरिक? की साठ लाख ज्यूंच्या सामूहिक संहाराला 'हॉलोकास्ट'ला जबाबदार असणारा नाझी नरपशू? दुसऱ्या महायुध्दानंतर तब्बल अठरा वर्षे अज्ञातवासात असलेल्या एका बडया युध्दगुन्हेगाराचा माग काढून त्याला न्यायदेवतेपुढे खेचणाऱ्या इस्रायलच्या 'मोसाद' या गुप्तहेर संघटनेची चित्तथरारक, रोमांचकारी सत्यकथा.

पृष्ठसंख्या: 196
किंमत: रु. 165
प्रथम आवृत्ती: 2008
सद्य आवृती: January, 2009
प्रकाशन अवस्था: प्रकाशित

एअरलिफ्ट पाहिला . छान आहे. खरतर या घटनेविषयी काहीच माहिती नव्हती . खरी घटना असल्याने अति नाट्य दाखवलं नाहीये. उलट तीन तासात किती बसवता येईल याचा काटेकोरपणे विचार केलेला दिसतोय. आणि ह्या प्रयत्नात दिग्दर्शक यशस्वी झालाय . अक्षय कुमार ने छान अभिनय केलाय . निमरत कौरनेही चांगलं काम केलेय . संजीव कोहली झालेल्या अभिनेत्याचा कामही छान झालेय . शेवटाकडे भारतीय तिरंगा जॉर्डनच्या भूमीवर फडकवला जातो तेव्हा तिथे आशेने वाट पाहत असलेल्या भारतियांना जे फिलिंग येऊन गेलं असेल तेच फिलिंग येऊन गेलं .

इराकी कर्नलला पाहून भीती न वाटता मजा वाटली . त्यात दिग्दर्शक कमी पडलाय . अमिने जे लिहिलेय तेच मलाही वाटले . मंत्रालयतले जॉईंट सेक्रेटरी असे बसतात Uhoh

वर दिलेलं पारध पुस्तक माझ्याकडे आहे. आईकमनच्या अपहरणाची डिटेलवार माहिती दिलीये . मस्त पुस्तक आहे

तसाही इराकी कर्नल पासून काही धोका नव्हताच . भारत हे इराकच्या मित्र राष्ट्रात होते. त्यामुळे भारतेयांना अभय होतेच.

रच्याकने. काश्मीर प्रश्नावर भारताच्या भूमिकेला पाठिम्बा देणारा सद्दाम हुसेन हा एकमेव मुस्लिम राष्ट्रप्रमुख होता....

बरेच जण हा सिनेमा संपला की कुठून जातात आणि शेवटी जे खर्‍या घटनेचे फोटो दाखवले आहेत ते इतरांनाही बघायला देत नाही. मी ते शेवटचे फोटो आणि त्याबद्दलची माहिती वाचताना किती जण मधे आलेत. डायरेक्टर लोक पण असे असतात के चांगली माहिती आणि गाणे ह्यांची वाट लावतात. इजाजत सिनेमात 'छोटीसी कहानी से.. ' हे पहिले गाणे आहे त्यावर कलाकारांची नाव वाहत राहतात.

रच्याकने. काश्मीर प्रश्नावर भारताच्या भूमिकेला पाठिम्बा देणारा सद्दाम हुसेन हा एकमेव मुस्लिम राष्ट्रप्रमुख होता....>>>> हो चित्रपटातही इराकी कर्नलच्या तोंडी सद्दाम हुसेन इंडियाको फ्रेंड मानता है अस वाक्य आहे

एअरलिफ्ट मधल्या घटनेबद्दल माहिती नसल्याने चित्रपट आवडला. पण काही काही गोष्टी खटकल्या. परराष्ट्र खात्याचा कारभार इतका ढिसाळ असेल हे पटत नाही. अडकलेल्या नागरिकांनी स्वतःच्या सुटकेसाठी केलेले प्रयत्न दाखवण्यासाठी सरकारला वाईट दाखवायलाच हवं का असा प्रश्न पडला. १९८९-९० म्हणजे संपर्काची साधने सोपी नसल्याने जो काही वेळ लागला असेल तो असेल पण इतका ढिसाळ कारभार असेल असं वाटत नाही. वर लिहिलं आहे तसं गाणी घालायचा मोह आवरायला हवा होता.
मला सारखं वाटत होतं की आता अक्षय कुमारच्या बायकोला आणि मुलीला काहितरी होणार ! पण ते टाळून इमोसनल टच दिला नाहीये हे ही आवडलं.

आत्ताच पाहिला. अतिशय सुरेख. त्या परिस्थितीत अडकलेल्या लोकांची स्थिती पाहून अंगावर काटे आले. विशेषतः कुवैत मधल्या कॅम्पात सैनिक घुसतात तेव्हा स्त्रिया आणि मुलींच्या प्रतिक्रिया पाहून. आता जगाच्या युद्धग्रस्त भागात यापेक्षा वाईट स्थिती आहे हर आठवून.

इराकी मेजर भीतीदायक वाटण्यापेक्षा खूप आतल्या गाठीचा वाटला. त्याच्या त्या स्वभावाची धास्ती वाटूनच अक्षय जॉर्डनला जायचा निर्णय घेतो. गाड्या रस्त्यावर बंद पडलेल्या उचलतात, टायर वगैरे सगळे रस्त्यावर असतेच. आणि तिथे पेट्रोलची काय कमी. असो.

सगळ्यांची कामे उत्तम. जॉर्जसारखी माणसेही असतात..
भारतीय सरकारची मदत असल्याशिवाय हे होणे जितके अवघड तितकेच सरकारची चाके खूप हळूहळू हलतात हेही खरे. ते होईपर्यंत जीव टांगणीला.

बाकि वाळवंटातल्या सरळसोट रस्त्यांवरून एका दिवसरात्रीत १००० किलोमीटर अंतर कापणे कठीण नाही. तिथल्या रस्त्यांची अवस्था खूपच चांगली दिसली ☺

शेवटी दोन विमाने तिथे उडताना आणि सहारवर उतरताना दाखवली कि. प्रत्येक उड्डाण दाखवणे शक्य नाही. आणि इथे परतलेल्यांच्या प्रतिक्रिया फोटोत दिसल्या.

https://www.facebook.com/shekharguptaofficial/posts/1074192652638869

Here are the brief facts. Kuwait fell on Aug 3, 1990. Within less than a week, Inder Kumar Gujral, our external affairs minister, was in Baghdad, the first foreign leader to reach there. He was cursed globally for embracing Saddam Hussein for the cameras. But he said to us later he had to do it to protect his people whose safety and evacuation Iraq guaranteed. He came to Kuwait, spoke to stranded Indians, took a few back with him in his IAF Il-76 and then organised the biggest airlift in the history of mankind. Our embassy in Baghdad found a bus contractor to move our people to Amman and Jordan had never closed its borders with Iraq. The first airlift took place on August 13, on the tenth day after the invasion and continued for 59 days until the last Indian wanting to return was back. About 10,000 stayed on in Kuwait, feeling safe with the Iraqis who were friendly to India and never consciously hurt an Indian.

The then Civil Aviation Minister Arif Mohammed Khan was on board the first Air India flight to land in Amman for the Airlift and Telecom Minister K.P. Unnikrishnan spent almost two months in Amman, helping out, particularly as a majority of workers were his fellow Malayalis.

I covered that Gulf War for India Today magazine from beginning until the end, first bombings in Baghdad, Scuds in Israel and finally the liberation of Kuwait. Amman was the base for all outward travel as you could drive to both Baghdad and Jerusalem. We never heard of a character like Katyal. Of course there was Sunny Mathew, popularly known as Toyota Sunny because he had flourishing agencies for the car company, and a cultured gentleman called Mr Vedi who helped the Indian community get its act together and keep the evacuation smooth. In fact, Mr Vedi was brave enough to stay put. My photographer colleague Prashant Panjiar and I were fortunate to find him as we reached Kuwait just after liberation, with debris scattered, skies blackened with oil well fires and hulls of destroyed Iraqi tanks lying all over. He looked after us, fed us, pointed us to an abandoned house we could just break into, like everybody else—fortunately it had a deep freezer filled with food which we gratefully ate from. He told us many stories of the crisis. He and Sunny had been brave, good, rich Indians, but sadly there was no story to even vaguely resemble what we are celebrating these days.

साधना, तिथल्या रस्त्यावर भन्नाट वेग मिळतो. स्पीड लिमिटच १२० वगैरे असते, आणि मोकळ्या जागी तर तेही नसते. मस्कत सलालाह रोडवर बसेसही भन्नाट वेगाने जातात. मी स्वत: मस्कत - सूर - मस्कत असा १,१०० किमीचा प्रवास एका दिवसात केला आहे. मस्कत सलालाह रोडवर २२० किमी च्या स्पीडनेही गेलो आहे.

सरकार हे 'कायम' निष्क्रीयच असते हा भारतीय मध्यमवर्गाच्या आवडत्या आणि पक्क्या समजूतीवर आधारलेला असल्याने हा सिनेमा चालणार यात शंकाच नव्हती. ऐतिहासिक सत्याचा इतका अपलाप फार कमी वेळा पहायला मिळतो.

मी तरी हा सिनेमा केवळ सिनेमा म्हणुन पाहिला, इतर सिनेमात जितके सत्य मी शोधते तितकेच सत्य या सिनेमातही शोधले. प्रत्यक्षात जे सत्य घडले त्याचा आधार घेऊन सिनेमा बनवलाय. कथा आणि कथानायक जास्त उठुन दिसावेत यासाठी जे बदल करायचे ते ते करणारच. ही काय सरकारी डॉक्युमेंटरी नाहीय. सरकार फालतु आहे हा समज या सिनेमामुळे प्रबळ होतोय आणि म्हणुनच सिनेमा चालतोय हे प्रमेय हास्यास्पद आहे.

भारतिय सिनेमात पोलिस फक्त शेवटाच्या रिळात धावत येतात, त्या आधी ते काहीही करत नाहीत. हिरोच जर पोलिस असेल तर त्याला निलंबित केल्यावरच तो चांगले काम करतो हेच गेले कित्येक दशके सिनेमात दाखवले आहे. आजवर जे चित्रपट यशस्वी झाले ते बाकी कुठल्याही गोष्टीमुळे झाले नाहीत तर केवळ पोलिस नाकर्ते आहेत हे दाखवल्यामुळे झाले असे म्हणण्यासारखे आहे.

साधना तसे नाही. चित्रपट चांगलाच आहे.काही ठिकाणी लॉजिकल लिंक्स लागत नाही म्हणून लोक प्रत्यक्षात तेव्हा काय घडले याचा शोध घेत आहेत एवढेच.

शोध घेण्यात काहीही वाईट नाही. पण वर एक कमेंट वाचली चित्रपट का चालतोय त्याचे विवेचन करणारी. म्हणुन एवढे टायपले.

चित्रपटातला लहान मोठ्या सगळ्याच कलाकारांचा उत्तम अभिनय ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे जी लोकांना खेचतेय चित्रपटाकडे. आपल्या मनातल्या भुमिकेसारखेच चित्रपटात सरकार वागतेय ही गोष्ट खेचत नाहीय चित्रपटाकडे.

True....But when you are making a film on real life incidents then it has to show facts properly. There is no need to make Ranjit Katyal character larger than life. (for example "Argo" just example only it can't be compared with Airlift :-))

तसे झाले तर हे बॉलीवुड न राहता हॉलीवुड होईल...:)

चित्रपट पाहताना कित्येक वेळा इथे गाणे हवेच होते का हा विचार डोक्यात आला. कित्येक वेळा हिरोईन हिरोकडे प्रेमळ दृष्टिक्षेप टाकते त्याचीही (कदाचित) गरज नव्हती. कदाचित आपला नवरा कसा बदलतोय हे तिला दर वेळेस नव्याने कळतेय हे दाखबणे गरजेचे वाटले असावे म्हणुन ते दृष्टीक्षेप जरी खपुन गेले तरी... हे सगळे बॉलीवुडात खपुन जाते.

Pages