घोळाण्याची भाजी अर्थात हरभर्‍याच्या ताज्या पानांची भाजी

Submitted by नलिनी on 10 December, 2015 - 05:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हरभर्‍याची ताजी भाजी - पाव किलो
लसूण पाकळ्या - ५-६ (मोठा लसूण असेन तर १-२)
हिरवी मिरची - ४-५ (झेपतील तेवढ्या)
भाजून सोललेले शेंगदाणे- पाव वाटी
मिठ चवीपुरते
तेल - १ डाव

क्रमवार पाककृती: 

हरभर्‍यावर आंब पडली की मग भाजीसाठी हरभर्‍याचे कोवळे शेंडे खुडले जातात. अर्थात भाजीवर आंब पडते त्या काळात हरभरा फुलावर आलेला असतो त्यामुळे आवश्यकतेपेक्षा अधिक भाजी खुडली जात नाही. सुकवून ठेवण्यासाठी काही एकाच दिवशी साधारण टोपले- २ टोपले (पाटी नाही ) खुडली जाते. ह्या सुकवलेल्या भाजीचा ओळखीतल्यांना वानवळा दिला जातो.
खालील पद्धतीने केल्या जाणार्‍या भाजीसाठी लागेल तशी खुडतात. म्हणून शक्यतो ही ताजी भाजी बाजारात सहसा मिळत नाही. हरभर्‍याबर आंब असते तेव्हा भाजी खुडताना बोटे काळी पडतात. जरा जास्त वेळ भाजी खुडली तर बोटाना भेगा ही पडतात.

तुम्ही भाजी जर विकत घेत असाल तर एखाद दुसरे पान तोंडात टाकून पाहा. आंबट लागायला हवे. पाने कोवळी असायला हवीत.
निवडताना त्यात काही काड्या असल्यास त्या काढून टाकाव्यात. एकावेळी थोडी भाजी हातात घेवून ५-६ वेळेस तरी झटकून (जराशी उंचावरून खाली आपटायची) घ्यावी. त्यात अळ्या असल्यास त्या खाली पडतात. (अळ्यांना पाहून ईईईईई करू नये, अलगत पेपरवर उचलून त्यांची रवानगी घराबाहेर करावी.) असे करत सगळी भाजी झटकावी. सगळ्या अळ्या निघाल्यात ह्याची खात्री करण्यासाठी परत एकदा झटकण्याचे काम करावे.
एवढे सगळे कष्ट करण्याचे कारण हि भाजी अजिबात धुवायची नाही. धुतल्यास त्यावरची आंब निघून जाते.

आता कृती.

कढईत तेल गरम करून घ्यावे.
तेल तापले की जिर्‍या लसणाची फोडणी द्यावी
वरील पद्धतीने निवडलेली भाजी टाकून व्यवस्थीत परतून, गॅस मंद करून झाकण घालावे.
मिठ मिरची मिक्सरला फिरवून घ्या, आता त्यात शेंणदाणे टाका. मिक्सर सुरू करून लगेच बंद करा. एकंदरीत दाणे जरा जाडसर राहायला हवेत.
हे वाटलेले दाणे, मिठ , मिरची भाजीत घालून परतून घ्या.
परत झाकण घालून जरावेळ झाकून ठेवा.
जारासे तेल (चमचाभरः डाव नाही) परत एकदा परतून घ्या आणि भाजी तयार.

अधिक टिपा: 

घोळाण्याची भाजी आणि बाजरीची भाकरी एकदम मस्त लागते. शिळी भाजी तर त्याहून मस्त लागते.

ह्याला आमच्याकडे घोळाण्याची भाजीच म्हणतात, ह्यात घोळ नसला तरी. बहुतेक अळ्या काढण्यासाठी भाजी जरा जास्तच घोळत बसावे लागते म्हणून असेन.

साधारण हरभर्‍यावर आंब पडण्याच्या काळात दही लावत असाल तर लक्षात येईल की तेवढ्या काळात दही नेहमीइतके आंबट होत नाही.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी आई आणि आजी सुद्धा हि भाजी अशीच करायचे.. खायला एकदम चवदार!! नलिनी धन्यवाद जुनी आठवण ताजी केलीत...

छान, शेंगदाणे वगळुन मी पण करते.एखादा छोटा उभा कांदा पण घालते पण भाजी धुवुनच करते.ती देखिल हळदीच्या पाण्यात(तशा मी सगळ्याच पाले भाज्या + फुल कोबी हळदीच्या पाण्यात धुवुनच भाजी करते)

एवढे सगळे कष्ट करण्याचे कारण हि भाजी अजिबात धुवायची नाही. धुतल्यास त्यावरची आंब निघून जाते.>> अरे देवा!!
भाजीबद्दलची सगळी माहिती खूप छान.

अशी करतात का ही भाजी.

मला काहीच माहिती नाही, खूप वर्षापूर्वी मला एका शेजाऱ्यांनी दिली सुकी पाने आणि पीठ पेरून भाजी करा सांगितलं, मी मस्तपैकी धुतली आणि पीठ पेरून केली, बापरे ती भाजी एवढी उग्र लागली आता मी नावच नाही घेत ह्या भाजीचं. आम्हाला ही भाजी खायची माहितीच नव्हतं त्यामुळे त्यांनी जसं सांगितलं तसं मी केलं. Lol

ही भाजी हिवाळ्यात येते अगदी ह्याच सुमारास नोवे. डिसे. मधे.

आंब म्हणजे ती थोडी आंबते आणि ही चव थोडी खारट आणि थोडीशी आंबट असते. आमच्याकडे ह्या भाजीत मीठही घालत नाही.

खूप छान लागते ही भाजी. आणि हो ही भाजी धुवायची नसते. आंब वाया गेले पाण्यातून की बी जीवनसत्व निघून जाते.

छान आहे, ह्याला घोळाणा म्हतात का? Happy आमचा घोळाणा -

करडईच्या पानांचा आम्ही घोळाणा करायचो. करडई फिरायला जाताना स्वहस्ते खुडून घ्यावी, शेतकरी तोडू देतात आपले शेत नसले तरी कारण तोडल्याने अधिक जोमाने वाढते. मग धुवून बारीक चिरौन फोडणीवर जर्रासा परतावा. वा वा मस्त लागते.

आंब म्हणजे काय?>>> एक आंबट घटक असतो. त्या कालावधीत पाने जराशी ओलसर जाणवतात शिवाय पानांना छान चकाकी आलेली असते. हरभर्‍याच्या [ झाडाला (ह्याला झाड कसे म्हणावे) ] डहाळीला जरा स्पर्श केला तरी ती जाणवते. बोट चाखले तर आंबट लागते.

पोटदुखीवर औषध म्हणून लोक आंब गोळा करतात. ह्याने फरक पडतो की नाही हे माहीत नाही. आमच्याकडे कधी गोळा करत नाहीत. संध्याकाळी एक स्वच्छ कापड हरभर्‍याच्या शेतावर आंथरूण ठेवतात. पहाटेच्या धुक्याने ते कापड ओले होते. ह्या ओल्या कापडाला आंब चिकटलेली असते. तर ते कापड पिळून आंब मिळवतात.

अन्जू, सुकवलेली भाजी वेगळ्या पद्धतीने करतात.(सुकवलेली भाजी पण धुवत नाहीत) सिंडीने लिहिलेली त्याची कृती.

माझी पद्धतः भाजी आणि बेसन एकत्र करून ठेवायचे . लसूण, जिरे, हिरवी मिरची, मिठ बारीक वाटायचे. तेलावर परतून मग त्यात पाणी घालून पाण्याला उकळी आणायची. त्यात भाजी आणि बेसन टाकून चांगले घोटून घ्यायचे. झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्यायची. जराश्या तेलात लसणीची फोडणी करून घ्यायची. भाजीवरचे झाकण वाफ बाहेर जाणार नाही ह्या बेताने जरासे उधडून ही फोडणी त्यात ओतायची. जरावेळ मंद आचेवर तसेच शि़जू द्यायची. भाजीला जर आंबटपणा कमी असेन तर मग त्यात एक-दोन बोटूक चिंच टाकायची की झाली भाजी तयार.

फोटो नाही Sad
सगळ्यात उत्तम भाजी म्हनजे तांदुळजा...
त्यानंतर करडई...
त्यानन्तर ही हरभरा..
त्यानन्तर पालक
मग मेथी !
याच्या पात्तळ भाजीत शेंगदाणे हवेतच. पालकासारखे. हिवाळ्यात हरभ र्‍याच्या पानांत मॅलिक असिड व ऑक्झलिक असिड तयार होते व त्यावेळी पडणार्‍या दंवामुळे ओलसर असा आंबट थेंबांचा थर हरभर्‍याच्या पानावर तयार होतो त्याला 'आंब 'असे म्हणतात. बर्‍याच्दा ओले कापड हरभर्याच्या शेतात झाडांवर पसरून ही आंब गोळाकेली जाते व कापड पिळून ती आंब औषधासाठी साठवली जाते. मात्र हरभर्‍याच्या शेतातून गेल्यास ही आंब शरीराला विषेषतः खरचटले असेल तर चांगलीच झोंबते. ह्या आंबेमुळे हरभर्‍याच्या खुडून केलेल्या भाजीस एक आगळीच चव येते.

मस्त्च. मला आवडते पण ताजी भाजी क्वचितच दिसते मुंबईच्या बाजारात.
आणि आंब खरेच पोटदुखीवर रामबाण उपाय आहे, मला स्वतःला अनुभव आहे. खेड्यामधे घरोघरी साठवून ठेवतात ती.

एका राजस्थानी बाईकडून त्यांची कृती कळली होती. मुगडाळ भिजवून वाटून त्यात हि पाने घालायची. मग त्याचे सुपारीएवढे गोळे करायचे. त्यापैकी अर्धे तळायचे आणि अर्धे याच पानाच्या पातळ भाजीत ( थोडे बेसन लावलेल्या ) शिजवायचे आणि खायच्या आधी तळलेले गोळे मिसळायचे. मसालेही असतात. छानच लागतो हाही प्रकार.

पादुकानन्द>> धन्यवाद माहितीसाठी. फोटो नाही कारण इथे ही भाजी नाही.

दिनेशदादा, मलापण ही भाजी खूप आवडते. गेल्या ३-४ वर्ष मला पण ही भाजी खायला मिळाली नाही.
भाजीचे नुसते नाव निघाले तरी खूप आठवणी गर्दी करतात. एका वर्षी मी एकटीने अर्धा एकर हरभरा टोभण्याचे (एक - एक दाणा हाताने लावणे) मशागतीचे आणि सोंगणीचे आश्वासन स्विकारले होते.

ओके. धन्स नलिनी. तुझी पध्दत छान आहे. मी काय फोडणीला पाने घालून थोड्या पाण्यात शिजवुन पिठ पेरुन केली.

दिनेशदा राजस्थानी प्रकार मस्त आहे.

ही अशी पद्धत माहिती नव्हती. छान रेसिपी आणि माहिती. करडई आणि मेथी अशा पद्धतिनं चांगली लागेल.

एका शेजाऱ्यांनी दिली सुकी पाने आणि पीठ पेरून भाजी करा सांगितलं >>> अन्जू, श्रीरामपूरच्या शेजार्‍यांनी का? Happy

नाही सिन्ड्रेला. नालासोपा-याला रहात असताना एक शेजारी मंगळवेढ्याचे होते. त्यांनी दिली होती.

श्रीरामपुरच्या शेजा-यांना, आम्हांला आवडत नाही पानांची भाजी असं मी सांगितलं. Lol

आता वाटतं उगाच सांगितलं, एक वेगळा प्रकार खायला मिळाला असता.

आमच्याकडे सांगली-कोल्हापूर भागात थोडे शेंगदाणे,डाळ्,तांदूळ भरड कुटून घेतात., तेलात जीरे,लसूण्,हिरवी मिरचीची फोड्णी करून त्यात हि भरड परतात. थोडे पाणी घालून उकळी आली कि भाजी घालून शिजवायची. मस्त लागते.

आहाहा लैच दिसांनी ह्या भाजीची आठवण. उस लागण केल्यावर बरेचदा हरभरा घेतात उसात. जर कधी शेतावर गेलो त्या काळात (किंवा घरातले कुणी) की भरपूर भाजी आणत असू.
यावरून आठवले की ताजे हरभरे खाऊन पण अनेक वर्षे झाली. हिशोब करताना शेजारी हरभर्‍याची चळत घेऊन बसायचे Happy

मस्त आठवण करून दिली.
ह्या भाजीची चव दुसर्या कोणत्याही भाजी सारखी नसते .
भाजीच्या आंबटपणात मुरलेला लसूण आणि अर्धवट भरडले दाणे. अहाहा
कुठे ग मिळणार हि भाजी आता .
माझ्या आईचे आजोळ सासवडला. तिथे त्यांच्या घरी हे पिक घेतले जायचे , त्यामुळे हा वानवळा असायचाच.

ही माझी पण आवडती भाजी. ताजी भाजी फक्त गावाकडे सिझनला जाणं झालं की मिळायची. सुकवलेली भाजी मात्र पुर्वी गावाकडून नियमित घरी यायची. आता येते का नाही आईला विचारवं लागेल. सुकवलेली भाजी आई पण बेसन लावूनच करायची.

आणि हो ही भाजी न धुताच करायची असते.
सकुरा, बहूतेक ही भाजी आपापल्या शेतातूनच घरी आणून केली जाते. सुकवलेली सुद्धा घरच्यापुरती शेतातून आणून सुकवतात त्यामूळे बहूतेक यावर किटकनाशक फवारले जात नसणार. आमचा शेताशी फारच दुरून संबंध, त्यामूळे नलिनीच जास्त व्यवस्थित उत्तर देवू शकेल.

माझ्या ऐकिव माहितीनुसार हरबर्‍यावर किटकनाशक फवारायची गरज नसते. त्याला कीड लागत नाही म्हणे.

Pages