घोळाण्याची भाजी अर्थात हरभर्‍याच्या ताज्या पानांची भाजी

Submitted by नलिनी on 10 December, 2015 - 05:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हरभर्‍याची ताजी भाजी - पाव किलो
लसूण पाकळ्या - ५-६ (मोठा लसूण असेन तर १-२)
हिरवी मिरची - ४-५ (झेपतील तेवढ्या)
भाजून सोललेले शेंगदाणे- पाव वाटी
मिठ चवीपुरते
तेल - १ डाव

क्रमवार पाककृती: 

हरभर्‍यावर आंब पडली की मग भाजीसाठी हरभर्‍याचे कोवळे शेंडे खुडले जातात. अर्थात भाजीवर आंब पडते त्या काळात हरभरा फुलावर आलेला असतो त्यामुळे आवश्यकतेपेक्षा अधिक भाजी खुडली जात नाही. सुकवून ठेवण्यासाठी काही एकाच दिवशी साधारण टोपले- २ टोपले (पाटी नाही ) खुडली जाते. ह्या सुकवलेल्या भाजीचा ओळखीतल्यांना वानवळा दिला जातो.
खालील पद्धतीने केल्या जाणार्‍या भाजीसाठी लागेल तशी खुडतात. म्हणून शक्यतो ही ताजी भाजी बाजारात सहसा मिळत नाही. हरभर्‍याबर आंब असते तेव्हा भाजी खुडताना बोटे काळी पडतात. जरा जास्त वेळ भाजी खुडली तर बोटाना भेगा ही पडतात.

तुम्ही भाजी जर विकत घेत असाल तर एखाद दुसरे पान तोंडात टाकून पाहा. आंबट लागायला हवे. पाने कोवळी असायला हवीत.
निवडताना त्यात काही काड्या असल्यास त्या काढून टाकाव्यात. एकावेळी थोडी भाजी हातात घेवून ५-६ वेळेस तरी झटकून (जराशी उंचावरून खाली आपटायची) घ्यावी. त्यात अळ्या असल्यास त्या खाली पडतात. (अळ्यांना पाहून ईईईईई करू नये, अलगत पेपरवर उचलून त्यांची रवानगी घराबाहेर करावी.) असे करत सगळी भाजी झटकावी. सगळ्या अळ्या निघाल्यात ह्याची खात्री करण्यासाठी परत एकदा झटकण्याचे काम करावे.
एवढे सगळे कष्ट करण्याचे कारण हि भाजी अजिबात धुवायची नाही. धुतल्यास त्यावरची आंब निघून जाते.

आता कृती.

कढईत तेल गरम करून घ्यावे.
तेल तापले की जिर्‍या लसणाची फोडणी द्यावी
वरील पद्धतीने निवडलेली भाजी टाकून व्यवस्थीत परतून, गॅस मंद करून झाकण घालावे.
मिठ मिरची मिक्सरला फिरवून घ्या, आता त्यात शेंणदाणे टाका. मिक्सर सुरू करून लगेच बंद करा. एकंदरीत दाणे जरा जाडसर राहायला हवेत.
हे वाटलेले दाणे, मिठ , मिरची भाजीत घालून परतून घ्या.
परत झाकण घालून जरावेळ झाकून ठेवा.
जारासे तेल (चमचाभरः डाव नाही) परत एकदा परतून घ्या आणि भाजी तयार.

अधिक टिपा: 

घोळाण्याची भाजी आणि बाजरीची भाकरी एकदम मस्त लागते. शिळी भाजी तर त्याहून मस्त लागते.

ह्याला आमच्याकडे घोळाण्याची भाजीच म्हणतात, ह्यात घोळ नसला तरी. बहुतेक अळ्या काढण्यासाठी भाजी जरा जास्तच घोळत बसावे लागते म्हणून असेन.

साधारण हरभर्‍यावर आंब पडण्याच्या काळात दही लावत असाल तर लक्षात येईल की तेवढ्या काळात दही नेहमीइतके आंबट होत नाही.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नलिनी छान माहीती भाजीची आणि रेसिपीही. आमच्याइथे एकदा पाहीली होती पण करायची माहीती नसल्याने मी घेतली नव्हती. आता दिसली काय आता शोधेन मार्केटमध्ये आणि करेन ही रेसिपी पाहून.
फक्त एक मी बदल करेन धुवण्याचा कारण अग शेतातून डायरेक्ट काढून आणली असती तर न धुवता काही वाटले नसते. पण मार्केट मध्ये उडणारी धुळ वगरेची शंका मला भाजी धुवायला लावेल.

सकुरा, हरभर्‍यावर शक्यतो हिरव्या अळ्या असायच्या, बाकी कीड नसायची त्यामुळे त्याला फवारणी नसायचीच कधी. जर हरभर्‍याच्या शेजारच्या शेतात माळव असेल जसे की मिरची, वांगी, फ्लॉवर, कोबी आणि ह्यावर फवारणी केलेली असेल तर हरभर्‍याच्या शेतात दूर आत जाऊन भाजी खुडली जाते.

हल्ली हरभर्‍यावर मावा पडला तरच फवारणी करत असावे. पण मग ही भाजी खुडली जाणार नाही. आमच्याकडे अजूनही बाजारात विक्रीला म्हणून ही भाजी फारशी उपलब्ध नसावीच.

ज्यांना भाजी धुवून घ्यायची आहे त्यांनी भाजीत चिंच घालायला हवी. भाजीवरची आंब धुवून गेली की भाजी बेचव लागणार.

परतूनी परत शेतावर गेलो की माबोकरांसाठी ह्या भाजीचा वानवळा म्ह्णून व्यवस्था करायला हवी.

नलिनी, माहिती बद्दल धन्यवाद.
मला वानवळा म्हणुन ही भाजी मिळाली होती धुन्यामुळे की काय करायला जमली नाही फेकुन दिली होती.
आता या पद्धतिने करुन बघते.

वानवळा म्हणजे काय?

हरभर्‍याची आंब आम्ही गिरगावात असताना दारावर विकायला यायची. विकणारा माणूस ती 'खाटी आंब' बाटलीत भरुन आणत असे. पोट बिघडल्यास ते उत्तम औषध आहे. आंब औषध म्हणून घेताना डायरेक्ट जिभेवर टाकायची आणि पटकन गिळायची. नाहीतर दात आंबतात.

मी एकदा ही भाजी केली होती. गवत खाल्ल्यासारखं वाटलं म्हणून परत कधी केली नाही. मला जमली नसावी करायला.

वानवळा देणे म्हणजे आपल्या शेतातील / बागेतील भाज्या, फळे, कडधान्ये तसेच खरवसाचे दूध इतरांना भेट म्हणून देणे.

Aamchya kade asate igatpuri la...... ya January month madhe swata shetavar javun fresh bhaji ghevun yevu..... koni yet asel tar

मस्त वाटतेय रेस्पी. इथे आम्हाला सोलाणे कधी कधी मिळतात त्यातच आम्ही खुश असतो. ताजी पाने मिळायचा चांस नाहीच.
पुढच्या स्प्रिंग मधे एका वाफ्यात घरातलेच तपकिरी चणे पेरुन किती भाजी मिळेल ते बघणार .

नलिनी, तूमच्या उन्हाळ्यात हरभरे पेरून बघ. भाजीपुरता पाला नक्की निघेल. ( मी केनयात केला होता प्रयोग. )

अच्चा याला घोळाणा म्हणतात काय? ठिक. आज करुन बघेन. पण न धुता करणे जरा कठिण वाटतेय. कितपत साफ आहे ते पाहते आणि मग ठरवते.

Pages