से ह वा ग!

Submitted by मार्गी on 21 October, 2015 - 04:32

वीरेंदर सेहवाग! खराखुरा वीरोत्तम! क्रिकेटशी परिचित असलेल्यांना सेहवागबद्दल काहीही सांगायची गरज नाही. पण इथे सेहवाग एक क्रिकेटर म्हणून नव्हे तर एक अभिव्यक्ती म्हणून विचार करूया. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून त्रिशतक करणारा एकमेव फलंदाज (तेही दोन त्रिशतके!); अत्यंत जलद गतीने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये फलंदाजी करणारा आणि आश्चर्यकारक प्रकारे सातत्य दाखवणारा (२००९- १० मध्ये शिखरावर असताना ५४ ही कसोटी सरासरी सलामीवीर म्हणून) आणि सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, गांगुली, लक्ष्मण अशा ता-यांच्या समोरही स्वत:चा वेगळा प्रभाव निर्माण करणारा असा हा वीरू! सेहवाग हा खरोखर मूळ स्वभावाचा फलंदाज आहे (Indigenous). ज्याप्रमाणे महाभारतात कृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं, की हा पाहा सूर्य आणि हा जयद्रथ; त्याच प्रकारे सेहवाग फक्त ही बॅट, हा बॉल आणि ही सीमारेषा इतकंच बघायचा!

सेहवाग केवळ गुणवान फलंदाज म्हणून किंवा काही अजरामर खेळ्या केलेला विक्रमवीर म्हणूनच महान नाहीय. सेहवाग ही खरं तर एक विचारधारा आहे. त्याचं मन नेहमी अखंड- uncluttered ठेवून तो खेळायचा. अगदी स्वत:च्या शैलीमध्ये खेळत जायचा. पिच, मॅचची स्थिती, अन्य घटक हे त्याला दिसायचेच नाहीत. त्या बाबतीत तर तो जराही न डगमगणारा होता. १९५ वर असताना सिक्स मारून आऊट झाल्यावरही त्याच्या चेह-यावरचं हसू कायमच! आणि गंमत म्हणजे त्याने पहिलं त्रिशतकही २९५ वरून सिक्स मारूनच पूर्ण केलं. ही जिद्द, ही विजिगिषू वृत्ती! स्वत:वर इतका प्रचंड आत्मविश्वास! अर्थात प्रचंड आत्मविश्वासासोबत अंगाशी येणारी अवास्तव जिद्दही असतेच. सिक्स मारायचा म्हंटला की अनेक वेळेस सीमारेषेवर झेलबाद होणं ही अपरिहार्यता बनते. पण सेहवाग स्वत:च्या शैलीवर नेहमी ठाम राहिला आणि खेळावर विलक्षण परिणाम करून गेला.

सेहवाग हे एक प्रतिक आहे- सिस्टीमच्या विरुद्ध जाणा-यांचं. सेहवागवर नेहमी टीका व्हायची की, त्याला फूटवर्क नाही; तो पाय हलवत नाही; तो शास्त्रशुद्ध खेळू शकत नाही इ. इ. ही वस्तुस्थिती‌ होती. पण त्यामुळे फरक काय पडला? काहीही नाही. इथे एक वेगळा मुद्दा येतो. आपण कशाला जास्त महत्त्व द्यायचं- जे पुस्तकी पद्धतीने खेळतात; तंत्रशुद्ध- निर्दोष प्रकारे खेळतात त्यांच्या खेळाला की, जे चाकोरीबाहेर आहेत, पण जे अधिक प्रभावी खेळतात- जे अधिक परिणामकारक ठरतात आणि एक सकारात्मक प्रेरणा देऊन जातात- त्यांना? अगदी क्वचित वेळेस सेहवागने पुस्तकी पद्धतीनेही खेळ्या केल्या आहेत. एडलेटमध्ये १५१ रन्स केले ती खेळी अगदी असेहवाग पद्धतीची होती! पण मुळात तो एक इंपॅक्ट प्लेअर आहे नव्हे होता; एक विस्फोटक प्लेअर होता. आणि तो नेहमी वीरू म्हणूनच राहिला. अगदी निवृत्तीची घोषणा करतानाही त्याने स्वत:ची शैली सोडली नाही- 'मला सल्ले देणा-यांचे विशेष आभार मानतो आणि माफीही मागतो, कारण मी ते सल्ले कधीच ऐकले नाहीत; माझी पद्धत दुसरी होती.;

म्हणून सेहवाग एक स्वपथगामी आहे- स्वत:च्या विचारांनी जगणा-यांचं उदाहरण आहे. परिस्थिती कितीही विपरित असो; त्याच्यावर त्याचा परिणाम व्हायचा नाही. आज सगळं जग स्टिरिओटाईपिंगच्या मार्गावर आहे. लोक आज म्हणतात की, यशस्वी व्हायचं असेल तर हे हे करावं लागेल; अमुक अमुक कोर्स करावे लागतील; अशा परीक्षा द्याव्या लागतील; असे क्लासेस द्यावे लागतील इ. इ. पण सेहवाग आपल्याला अशा मानसिकतेमधून बाहेर जाण्याचा मार्ग दाखवतो. प्रत्येकामध्ये कमतरता असतातच. सेहवागमध्ये असंख्य तांत्रिक त्रुटी होत्याच. पण तरीही त्याने जिद्दीने मोठ्या खेळ्या उभ्या केल्या. लोक त्याला नेहमी सांगायचे की, तुझं तंत्र तू सुधार. पण त्याने त्याच्यावर लक्ष देण्यापेक्षा त्याच्या जमेच्या बाजूंकडेच लक्ष दिलं. हँड आय कोऑर्डीनेशन- सटिक नजर- फटके मारण्याची शक्ती आणि जिद्द ह्यावर लक्ष दिलं आणि तो यशस्वी झाला! असा हा वीरू आपल्याला स्वत:च्या मार्गावर जाण्याची प्रेरणा देतो.

जसा क्रिकेटमध्ये सेहवाग आहे- नव्हे होता- त्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये सेहवागसारख्या लोकांची अत्यंत आवश्यकता आहे. सगळे लोक एकाच सिस्टीममध्ये जात राहिले तर त्यातली मजा जाते. सौंदर्य जातं. त्याउलट स्वत:च्या पद्धतीने काही करण्यात खूप जास्त समाधान मिळतं. सेहवाग त्यासाठीचा आदर्श प्रेरणास्रोत आहे. करिअरचं दडपण; भविष्यातल्या अपेक्षांचं ओझं, निराशा अशा गर्तेत अडकलेल्या तरुणाईला किंबहुना प्रत्येकाला सेहवागची खेळी प्रेरणा देऊन जाते. रिक्वायर्ड रन रेट कितीही असो; सेहवाग आहे ना; मग काही चिंता नाही. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात वीरूसारख्या लोकांची गरज आहे.

संपूर्ण करिअरमध्ये त्याच्या तांत्रिक दोषांमुळे त्याच्यावर टीका करणारे टीकाकार आज त्याचं कौतुक करत आहेत. मॉडर्न विव्ह रिचर्डस; क्रिकेटमधला द लास्ट समुराई; क्रिकेटमधला आधुनिक झेन मास्टर अशा शब्दांत त्याचं कौतुक करत आहेत. कारण त्याचं कर्तृत्वही तितकंच आहे. सचिनसारखा तेजोनिधी समोर असताना जिथे द्रविडही झाकोळला; तिथे सेहवागने त्याचा ठसा निर्माण केला. आकाश चोप्राने म्हंटल्याप्रमाणे आधुनिक कसोटी क्रिकेटच्या सलामी फलंदाजीसंदर्भात बीफोर सेहवाग आणि आफ्टर सेहवाग असा फरक पुढे करावा लागेल!

सचिन, द्रविड, लक्ष्मण आणि आता झहीरनंतर सेहवागने घेतलेली निवृत्ती! सचिन निवृत्त झाला तेव्हा बालपण संपलं असं क्षणात जाणवलं. सेहवाग निवृत्त होतोय म्हणजे तारुण्याचे दिवस संपले, असं वाटतंय आता! एक पोकळी. एक शून्यता! आपण ज्यांच्यासोबत जीवनातले अविस्मरणीय क्षण शेअर केलेले असतात, त्यांच्या जाण्याने एक पोकळी तर जाणवतेच; पण त्यात एक संधीही असते- त्या मार्गावर- त्या दिशेने स्वत:चा शोध घेण्याची. . .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सेहवागमध्ये जितकि गुणवत्ता होती तितके कौतुक त्याच्या वाट्याला आले नाही.त्रिशतक तेही दोनदा करणे ही कमाल होती.भल्याभल्यांनी जिथे नांगी टाकली तेथे सहवागने फणा उगारला.पण कौतुक मात्र भलेभले घेउन गेले.

सुंदर लिहीले आहे!

अ‍ॅडलेड च्या त्या डावाचे खूप कौतुक झाले. मी ती इनिंग पाहिली नाही. त्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या क्वचित केलेल्या दुसर्‍या डावातील शतकांपैकी ते आहे, आणि मॅच वाचवायला उपयोगी पडले.

IND - 4 / 0 IN 0.1 OVERS
आता असा स्कोरबोर्ड क्वचितच पहायला मिळेल

आता असा स्कोरबोर्ड क्वचितच पहायला मिळेल >>> परफेक्ट. सेहवाग ने बहुधा पहिल्या बॉल ला फोर चा पॅटर्न वर्ल्ड कप २०११ मधेही तयार केला होता. फक्त फायनल ला मारला नाही. कदाचित अजून एखादीही असेल.

वर्ल्डकप मधे बांग्लादेशबरोबरच्या मॅच पासून ते नजरेत आली. त्या आधी ३-४ वेळेला सिक्स देखील मारलेला. असे एकदोन ठिकाणी बघितल्याचे आठवते

बरोबर. वर्ल्डकप २०११ पासून त्याने तो ट्रेंड सुरू केला होता असं निदान सर्वसाधारण ईंप्रेशन तरी आहे. त्याच्या आधी, न्यूझिलंड मधे एका मॅच मधे त्याने ३ सिक्सेस मारून मॅच सुरू केली होती,

फारएण्ड, अ‍ॅडलेड चं ते शतक, त्याच्यासाठी करीअर टर्निंग पॉईंट होता. त्या-आधी त्याला ड्रॉप केलं होतं. वासिम जाफर आणी दिनेश कार्थिक ओपन करत होते आणे सब-काँटिनेंट मधे बर्यापैकी यशस्वी पण झाले होते. पण कुंबळे हट्टाने त्याला ऑस्ट्रेलिया ला घेऊन गेला आणी त्या मॅच मधे दुसर्या ईनिंग ला सेंच्यूरी मारून त्याने मॅच वाचवली होती.

लेख आवडला.

फारएण्ड, अ‍ॅडलेड चं ते शतक, त्याच्यासाठी करीअर टर्निंग पॉईंट होता. >> हो त्या इनिंगमधे तो खूप circumspect होऊन खेळला होता सुरूवातीला. त्या नंतर २०१० पर्यंत तो एकदम जबरदस्त खेळला होता.

समोर मोठी धावसंख्या असली तर वीरूचा खेळ अजून बहरायचा. शतकाचे टेन्शन तो कधी घ्यायचा नाही उलट शतक आले कि तो आक्रमक व्हायचा. वीरूवर अन्याय झाला इतर फ्लोप प्लेयर आपण वर्षानुवर्षे खेळवले नि विरुसारखा स्फोटक फलंदाज अडगळीत टाकला ह्याचा खेद वाटतो

फेरफटका, हो सेहवाग ला २००७ च्या कप नंतर बाहेर काढले होते काही दिवस. नंतरही २००७ च्या घरच्या पाक सिरीज मधे युवराज चमकल्याने (गांगुली व युवराज दोघांनाही घ्यायचे असल्याने) सेहवाग ला ऑस्ट्रेलिया टूर वर सुरूवातीला संधी मिळाली नाही. मग मात्र त्या फेमस पर्थ टेस्ट मधे अचानक घेतला, तेथे त्याने चांगली सुरूवात करून दिली आणि त्याचीही दुसरी इनिंग सुरू झाली. मग २०११ च्या कप पर्यंत तो जोरात होता, नंतरही अधूनमधून फॉर्म मधे येत होता.

२००८ च्या ऑस्ट्रेलिया सिरीज साठी डोमेस्टिक मधे काही विशेष केलेले नसताना अचानक इन्स्टिन्क्ट वर त्याला पुन्हा घेतले होते, एक्स फॅक्टर मिळेल बॅटिंग ला म्हणून. मला आठवते त्या सिरीज च्या सिलेक्शन च्या आधी इयान चॅपेल ने म्हंटले होते की सेहवाग ला घ्यावे म्हणून.

सेहवाग विषयी एकच गोष्ट नेहमी जाणवायची. तेंडुलकर, द्रविड, कुंबळे ह्यांनी जसा स्वतःच्या खेळात परिस्थितीनुरूप (मॅच ची नाही), वयाप्रमाणे बदल केला आणी स्वतःचं करियर आणी उपयुक्तता वाढवली, तसं सेहवाग ने एखादा अपवाद वगळता (रिब-केज मधले बॉल्स खेळण्याचं तंत्र बदलणं) फारसं केलं नाही. अर्थात, हे प्रत्येकालाच शक्य होत नाही.

दिवा विझायच्या आधी मोठा व्हावा त्याप्रमाणे, ईंग्लंड च्य विरुद्ध ईडन गार्डन ला दुसर्या ईनिंग मधे त्याने केलेले क्विकफायर ४८-५० रन्स ही माझ्या आठवणीतली त्याची शेवटची 'सेहवाग-स्टाईल' ईनिंग. नंतर एक IPL मधे केलेलं (चेन्नई विरुद्ध, पंजाब कडून) शतक.

सेहवाग ने त्याच्या खेळातून प्रचंड आनंद आणी तितकच फ्रस्ट्रेशन (!) दिलं.

वा! मस्त चर्चा रंगली आहे! सेहवागवर छान लेख येत आहेत सध्या. एका लेखात त्याच्या कोचांनी म्हंटलं आहे, 'सेहवागने फोर मारला तर मी त्याला विचारायचो सिक्स का मारला नाही? मग तो ग्राउंड बाहेरच्या इमारतीचे मजले टारगेट करायचा. For him, it was not matter of converting ones into twos, but fours into sixes! मी एकच गोष्ट केली की मी त्याच्या मूळ स्वभावाला अजिबात बाधा येऊ दिली नाही.' अजून काही आठवणी- किस्से असतील तर जरूर शेअर करावेत!

लेख आवडला, लेखातील एंगलही आवडला.
त्या दिवशीच वाचलेला पण ऑफिसमधून प्रतिसाद द्यायचा राहिलेला.

बहुधा द्रविड झाकोळला म्हणजे तो कमी पडला अशा अर्थाने नाही, तो डिझर्व करत होता तितके अ‍ॅप्रेशिएशन पब्लिक ने केले नाही, अशा अर्थाने असावे.