पाने आणि फुले

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

मला फुलांईतकीच किंबहुना त्यापेक्षा थोडी अधिक झाडांची पाने आवडतात. जास्वंदाचे फुल तर आवडते पण त्याहुन अधिक जांस्वदांचे कातरलेले काळपट हिरवे पान बघायला फार छान वाटते. कातरलेली पाने साध्या पानापेक्षा जास्त लक्ष वेधून घेतात. दारासमोरची रांगोळी जर गुलाबाचे फुल असेल तर खाली कातरलेली तीन पाने आखली, हिरवा रंग भरला की रांगोळी अजूनच खुलते.

गुलाब आणि जास्वंद ही दोन झाडे अशी आहेत की पाने आणि फुले दोन्ही गोष्टींचे सौंदर्य त्यांना लाभले आहे.

आपण ज्याला आपट्याची पाने समजतो ती कचनार तिचा गुलाबी रंग बघून डोळे लगेच निवतात पण असे वाटते ती पाने त्या फुलांना मॅच करत नाही.

सोनकीच्या पानांचा रंग कसला गहीरा गोड आहे. थोडासा पोपटी, पिवळा आणि हिरव्या रंगांचे मिश्रण वाटते.

अळूच्या पानावरचे पाण्याचे थेंब मोत्यासारखे वाटतात पण पान बघायला इतके काही खास नाही (अळूवडी प्रिय असली तरी!!!!)

बदामाची पाने जरा आकारानी ढब्बाळी असतात. दाट सावली देतात पण पिकून गळून पडली की अंगणात विखुरलेला तो मरुम रंगाच केर काढावाच वाटत नाही.

अमलताश म्हंटले की पिवळ्या फुलांचे झुंबर डोळ्यासमोर उभे राहते. पण इतकी सुंदर फुले देणार्‍या झाडाची पाने दिसायला अगदी सुमार असतात.

चाफ्याची पाने कधी चाफ्याच्या फुलासमवे असतात तर कधी चाफा निष्पर्ण होऊन फुललेला असतो. जाड पाने, वजनानेही जड असलेली. तोडली की देठातून लगेच दुध ओघळायला लागते. एखाद्या फांदीना डोळा आला की इतकी लुसलुशीत पाने इतकी मोठी होतील असे वाटत नाही.

कुसुंबीची पाने!! निळ्याभोर आकाशाखाली चिंचोळ्या अंगकाठीची कुसुंबी वाढायला लागली की तिची कुसुंबी पाने आकाशाला अधिक सौंदर्य प्राप्त करुन देतात. चकचक चकाकत राहतात.

करदडीची पाने! ही पाने सत्यनारायणाच्या पुजेला अथवा इतर कुठल्याही पुजेला चौरंगाच्या चार पायाला लावली की एकदम पुजा पुर्तीची भावना मनात येते.

शेवंतीची पाने ... पौष संपला की लगेच सगळे फुलझाड विरक्त होऊन जाते. मग तिच्याकडे बघावेसेही वाटत नाही.

नागलीची पाने - नखानी थोडे कुरतडले की लगेच एक छानसा गंध आपल्याला देणारी. कलशात पाच एकत्रित करुन ठेवली की लगेच मुर्तीमंत होऊन जाणारी. कलश जर चकचकीत तांब्याचा असेल तर अजूनच सुंदर रुप धारण करणारी.

आणखी एक पान जे मला फक्त बालपणीच सापडले होते. आम्ही जिथे बागेत फिरायला जायचो तिथे एक खूप जुनी मोठा व्यास असलेली विहिर होती. विहिरीला लोखंडी गोलसर कमान होती. त्या कमानीवर एक चंदेरी पानांची वेल भरगच्च होऊन चढली होती. तिची पाने कोवळी जुनी राठ कुठलीही पाने नेहमी दुमडलेली असायची. ती हातानी ताठ केली की एक सुंदर रंग असलेले पान समोर यायचे...

आमच्या घरी उन्हाळ्यात मोगरा फुलायचा तेंव्हा त्याची पाने भर उन्हात तजेलदार वाटायची. दोन पानांच्या खोपटीत एखादे फुल उमलले की पानासहीत फुल तोडायची कधी हिम्मत होत नसायची कारण अजून कळ्या त्याच खोपटीत सुगंध भरुन वाढत असतात. कळ्या तोडणे म्हणजे फार मोठे पाप वाटायचे!!!

विदर्भात हनुमान जयंतीचा उत्सव किती मोठ्या प्रमाणात साजरा होतो!! अबब!!! सकाळी पाचलाच मारुतीची गाणी सुरू होतात. मारुतीच्या प्रत्येक पारावर रुईच्या पानांची राम राम नाव लिहिलेली माळ विकायला हारवाले बसलेले असतात. कपाळावर छानस शेंदुर लावलेल असत. आमच्याघरी मी रुईची फुले, पाने आणि त्याचे कुयरीच्या आकाराचे फळ मीच आणायचो. अकोल्यात रुईची झाडे किती आहेत!!! रुईची पाने तोडली की त्यातून दुधाचे चिकट थेंब टपटपत आणि हाताला जणू फेवीकॉल लावला असे वाटे.

असो...कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाई माझी!! पानांबद्दल हे असे लिहित जाता पानेच्या पाने भरुन जातील आणि तुम्हाला किती स्क्रॉल करावे लागेल माहिती आहे! अंगणात फाटकाच्या बाजूला स्वागताला दोन उंचच उंच अशोक उभे असतात तेवढे!!!!

-- बी

विषय: 
प्रकार: 

अरेच्चा, काय आश्चर्य आहे !! आता इतक्यातच मी झाडा-पाना-फुलांवर एक ललित लिहून पोस्ट केलंय ...

बी, मस्तच लिहिलंय अगदी .... Happy

मस्त लिहिलेत.

हळदीची पानेही, पिंपळाची पाने, पळसाची पाने, केळीची पाने, कडुनिंबाची पाने, आंब्याची पाने आणि बरीच पाने आपले स्वतःचे व्यक्तिमत्त्व जगतात असे वाटते. खरेच तुम्ही म्हणालात तसे अजून पानेच्या पाने लिहिता येतील!

गज्या तू मला अजिबात तुम्ही आम्ही असे लिहायचे नाही Happy पानभर ** देईन Happy

धन्यवाद. इतक्या त्वरेनी इतक्या प्रतिक्रिया.. आवरा Happy

मस्तच ! छान निरीक्षण आहे पानांचं !.

खरे तर रंगीबेरंगी सुवासिक फुले दिसताच पानांकडे अंमळ दुर्लक्षच होते, पण घाट-रस्त्यातून प्रवास करतांना जी हिरव्या रंगाच्या विविध छटांची पखरण नजरेस पडते ती मनाला अतीव शांततेची अनुभुती देते. तेव्हा लक्षात येतं 'पर्णमहात्म्य' !

जास्वंदी आणि गुलाबाच्या पानाबद्दल अगदी- अगदी.

आवडला लेख !

शाळेत रंगात पाने बुडवून त्याचे ठसे उमटवून चित्र काढायचा एक प्रकार असायचा, त्यासाठी हमखास कातेरी कडांची पाने वापरली जात.

छान लिहिलेय.

आणखी एक पाने जे मला फक्त बापपणीच सापडले होते

हे बदला, नाहीतर ५० प्रतिक्रिया यावरच येतील. Happy

छान लिहिलं आहेस बी. आम्ही लहानपणी विद्येची पानं पुस्तकात ठेवायचो. जेवढी जास्त गुळगुळीत होतील तेवढी जास्त विद्या आली असं म्हणायचो. पुस्तकात किंवा वहीत ठेवलेल्या पिंपळाच्या पानाला किती जाळी पडते ते रोज पहायचो.

ह्यावर्षी माझ्याकडे खूप झेंडूची फुलं आली. काही पानांखाली दडून बसलेली असायची. मनात यायचं कोणी तोडू नये म्हणून पानं त्यांना लपवून ठेवत असावीत.

वेगवेगळ्या पानात खूप सौंदर्य असतं. कुठल्याही टेबलाची किंवा फुलदाणीची शोभा वाढवतात पानं.

छान लिहिलं आहेस. मला पळसाच्या पानांच्या पत्रावळी लावायला फार आवडतं. सणासुदीला तर हमखास पण एरवीही मला केळीच्या पानात जेवायला अतिशय आवडतं. चिंचेची पानं नुसती खायला कसली चविष्ट लागतात.

ते पिंपळपानाच्या जाळीचं पण आठवलं, तेव्ह्या कितीतरी वह्या पुस्तकांतून पानं लपवून ठेवलेली असायची.

आर्च, किती छान लिहितेस तूही..

सर्वांचे धन्यवाद.

हो फोटो असायला हवे होते पण सध्या माझ्याकडे तितका वेळ नाहीये. नंतर वाटल्यास नवीन लेख लिहून तिथे देईन फोटो.

मानुषी, ती सुकलेली शेंग होती. पाने नव्हती ती. ती शेंग अशी होती की आतमधे अजून एक पदर असतो त्यात. मग त्याच्या आता बिया असतात. बिया अगदी कागदी होत्या. लगेच भुरकन उडून गेल्या. शेंग मस्त वाकली जणू १०० वर्षाची आजी पाठीत वाकलेली.

बी,

सही भाउ एकदम !! फुलांप्रमाणे पाने पण खरचं किती मस्त असतात. तू जास्वंदाच्या पानाबद्दल लिहिले आहेस ते पण अगदी मस्त, मला एकदम माझी एलिमेंटरी ची परिक्षा आठवली ते जास्वंदाचे फुल काढणे सोपे वाटायचे पण पान व्यवस्थित काढायला वेळ लागायचा. Happy
दिनेशदांनी चिंचेच्या पाना बद्दल लिहिले आहे. मुंबईला बर्याच दा पानवाले मसाला पान तयार करताना त्यात ८-१० हि चिंचेची पाने टाकतात, मस्त चव लागते मग त्या पानाची.
टेबलावर तुम्ही एखादी पुष्परचना केली आणि त्यात कॉन्ट्रास्ट कलर ची दोन तीन पाने खोचलीत कि काय शोभा येते त्या सुंदर पुष्परचनेला...
बी फोटो टाक ना प्लिज...

- प्रसन्न

शेंग मस्त वाकली जणू १०० वर्षाची आजी पाठीत वाकलेली. >>>>>>>+१००
Uhoh ओह... बरोबर शेंगच होती ती. चुकून ते पानच आहे असं डोक्यात बसलं होतं.

मुंबईला बर्याच दा पानवाले मसाला पान तयार करताना त्यात ८-१० हि चिंचेची पाने टाकतात, मस्त चव लागते मग त्या पानाची. <<< ती पाने चिंचेची नसून गुंजेच्या झाडांची असतात. चिंचेची पाने आंबट असतात चवीला, तर गुंजेची पाने गोड असतात.

माझ्या ऑफीसजवळ लाल बीयांचा खच पडलेला असतो पण बहुतेक तो करंज आहे. मला वाटते करंज आण गुंजा दोन्हीची पाने चिंचेच्या पानांसारखीच असतात.

बरोबर का?

Pages