पाने आणि फुले
मला फुलांईतकीच किंबहुना त्यापेक्षा थोडी अधिक झाडांची पाने आवडतात. जास्वंदाचे फुल तर आवडते पण त्याहुन अधिक जांस्वदांचे कातरलेले काळपट हिरवे पान बघायला फार छान वाटते. कातरलेली पाने साध्या पानापेक्षा जास्त लक्ष वेधून घेतात. दारासमोरची रांगोळी जर गुलाबाचे फुल असेल तर खाली कातरलेली तीन पाने आखली, हिरवा रंग भरला की रांगोळी अजूनच खुलते.
गुलाब आणि जास्वंद ही दोन झाडे अशी आहेत की पाने आणि फुले दोन्ही गोष्टींचे सौंदर्य त्यांना लाभले आहे.
आपण ज्याला आपट्याची पाने समजतो ती कचनार तिचा गुलाबी रंग बघून डोळे लगेच निवतात पण असे वाटते ती पाने त्या फुलांना मॅच करत नाही.
सोनकीच्या पानांचा रंग कसला गहीरा गोड आहे. थोडासा पोपटी, पिवळा आणि हिरव्या रंगांचे मिश्रण वाटते.
अळूच्या पानावरचे पाण्याचे थेंब मोत्यासारखे वाटतात पण पान बघायला इतके काही खास नाही (अळूवडी प्रिय असली तरी!!!!)
बदामाची पाने जरा आकारानी ढब्बाळी असतात. दाट सावली देतात पण पिकून गळून पडली की अंगणात विखुरलेला तो मरुम रंगाच केर काढावाच वाटत नाही.
अमलताश म्हंटले की पिवळ्या फुलांचे झुंबर डोळ्यासमोर उभे राहते. पण इतकी सुंदर फुले देणार्या झाडाची पाने दिसायला अगदी सुमार असतात.
चाफ्याची पाने कधी चाफ्याच्या फुलासमवे असतात तर कधी चाफा निष्पर्ण होऊन फुललेला असतो. जाड पाने, वजनानेही जड असलेली. तोडली की देठातून लगेच दुध ओघळायला लागते. एखाद्या फांदीना डोळा आला की इतकी लुसलुशीत पाने इतकी मोठी होतील असे वाटत नाही.
कुसुंबीची पाने!! निळ्याभोर आकाशाखाली चिंचोळ्या अंगकाठीची कुसुंबी वाढायला लागली की तिची कुसुंबी पाने आकाशाला अधिक सौंदर्य प्राप्त करुन देतात. चकचक चकाकत राहतात.
करदडीची पाने! ही पाने सत्यनारायणाच्या पुजेला अथवा इतर कुठल्याही पुजेला चौरंगाच्या चार पायाला लावली की एकदम पुजा पुर्तीची भावना मनात येते.
शेवंतीची पाने ... पौष संपला की लगेच सगळे फुलझाड विरक्त होऊन जाते. मग तिच्याकडे बघावेसेही वाटत नाही.
नागलीची पाने - नखानी थोडे कुरतडले की लगेच एक छानसा गंध आपल्याला देणारी. कलशात पाच एकत्रित करुन ठेवली की लगेच मुर्तीमंत होऊन जाणारी. कलश जर चकचकीत तांब्याचा असेल तर अजूनच सुंदर रुप धारण करणारी.
आणखी एक पान जे मला फक्त बालपणीच सापडले होते. आम्ही जिथे बागेत फिरायला जायचो तिथे एक खूप जुनी मोठा व्यास असलेली विहिर होती. विहिरीला लोखंडी गोलसर कमान होती. त्या कमानीवर एक चंदेरी पानांची वेल भरगच्च होऊन चढली होती. तिची पाने कोवळी जुनी राठ कुठलीही पाने नेहमी दुमडलेली असायची. ती हातानी ताठ केली की एक सुंदर रंग असलेले पान समोर यायचे...
आमच्या घरी उन्हाळ्यात मोगरा फुलायचा तेंव्हा त्याची पाने भर उन्हात तजेलदार वाटायची. दोन पानांच्या खोपटीत एखादे फुल उमलले की पानासहीत फुल तोडायची कधी हिम्मत होत नसायची कारण अजून कळ्या त्याच खोपटीत सुगंध भरुन वाढत असतात. कळ्या तोडणे म्हणजे फार मोठे पाप वाटायचे!!!
विदर्भात हनुमान जयंतीचा उत्सव किती मोठ्या प्रमाणात साजरा होतो!! अबब!!! सकाळी पाचलाच मारुतीची गाणी सुरू होतात. मारुतीच्या प्रत्येक पारावर रुईच्या पानांची राम राम नाव लिहिलेली माळ विकायला हारवाले बसलेले असतात. कपाळावर छानस शेंदुर लावलेल असत. आमच्याघरी मी रुईची फुले, पाने आणि त्याचे कुयरीच्या आकाराचे फळ मीच आणायचो. अकोल्यात रुईची झाडे किती आहेत!!! रुईची पाने तोडली की त्यातून दुधाचे चिकट थेंब टपटपत आणि हाताला जणू फेवीकॉल लावला असे वाटे.
असो...कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाई माझी!! पानांबद्दल हे असे लिहित जाता पानेच्या पाने भरुन जातील आणि तुम्हाला किती स्क्रॉल करावे लागेल माहिती आहे! अंगणात फाटकाच्या बाजूला स्वागताला दोन उंचच उंच अशोक उभे असतात तेवढे!!!!
-- बी
लेख उशीरा वाचला. वृक्षगुंजेला
लेख उशीरा वाचला. वृक्षगुंजेला मराठीत रतनगुंज म्हणतात. हिंदीत रती म्हणतात. रत्तीभर सोने हा शब्दप्रयोग आपल्याला माहीत असतो. यातली रत्ती किंवा रती किंवा रतन म्हणजे ही गुंजेची बी हे साधना यांनी दिलेल्या माहितीत आलेच आहे. वेल गुंजेला नुसतीच गुंज म्हणतात. हिच्या बियांवर डोळ्यासारखी काळी वर्तुळे असतात. या वेलीचे खोड अगदी ज्येष्ठमधासारखे लागते आणि कित्येक ठिकाणी त्याच्या काड्या ज्येष्ठमधाऐवजी वापरतात. पानांचा काढाही खोकला आणि कफासाठी घेतला जातो. बिया मात्र विषारी असतात.
पर्णवर्णन आवडले. लहानपणी पानफुटीची, पिंपळाची पाने वहीत ठेवून देत असू त्याची आठवण झाली. झिपरी, कातरी अशी अनेक पाने शोभेसाठी वेण्यांमध्ये वापरली जायची ती निरखायला आवडायचे. चांदवड, कुडा, पळस अशी मोठी पाने बश्यांऐवजी वापरली जात. अलीकडे फुलपुडीसाठी कुडा वापरतात. एकदा चाराची पानेसुद्धा पुडीसाठी वापरलेली दिसली होती. पानांचे रंगसुद्धा किती वेगवेगळे. पिंपळाची कोवळी पाने लालगुलाबी तर गावठी बदामाची जून पाने लालभडक. काही गडद हिरवी तर काही फिकट, काही पोपटी, स्पर्शही तसेच. काही जाड पण मऊ गुळगुळीत अनंतासारखी तर काही खरखरीत, काही अॅलामांडासारखी ठसठशीत शिरा असलेली, काही लव असलेली. काहींच्या टोकांशी तणावे फुटलेले नागकांडीसारखे तर काहींच्या देठापाशी तणावे वाटाण्यासारखे. अजब किमया आहे निसर्गाची.
बी, मस्त लिहिलयस! Good
बी, मस्त लिहिलयस!
Good observation!
Pages