टोमॅटोचं सार

Submitted by मॅगी on 7 October, 2015 - 11:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पिकलेले लालबुंद टोमॅटो ४
लसूण पाकळ्या ४-५
आल्याचा लहानसा तुकडा
हिरव्या मिरच्या ४
कढीलिंब ७-८ पाने
दाण्याचं कूट ४-५ चमचे
जीरं १ टीस्पून
हळद १ टीस्पून
हिंग अर्धा टीस्पून
तूप २-३ चमचे
साखर २ चमचे
मीठ चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

१. हिरव्या मिरचीचे तुकडे आणि आलं, लसणीची रफ पेस्ट करून एका वाटीत काढून ठेवा.
२. टोमॅटो कूकरमध्ये शिजवून घ्या. हलक्या हाताने टोमॅटोची सालं काढून, मिक्सर मध्ये प्यूरी करा.
३. टोमॅटो प्यूरी एका पातेल्यात काढून त्यात दोन ते तीन कप पाणी, दाण्याचं कूट, मीठ आणि साखर घालून ढवळा. पातेलं गॅसवर ठेऊन मीडियम हीट वर उकळी काढा.
४. त्याचवेळी एका फोडणी पॅन मध्ये तुप गरम करून त्यात जीरं, हिंग, हळद, कढीलींब, मिरची, आलं आणि लसूण घालून फोडणी करा. हि फोडणी टोमॅटो प्यूरीमध्ये ओता आणि नीट ढवळून अजून 5 मिनीटं ऊकळा.
५. गॅस बंद करून, बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घाला.
सार रेडी!!

Tomato saar.jpg

गरमागरम वाफाळत्या भातावर ओतून ताव मारा!!
मी नुसतंच वाटीत घेऊन पिते :p

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ मोठया वाटया
अधिक टिपा: 

आवडत असल्यास पाण्याऐवजी ताक किंवा नारळाचं दूध वापरू शकता.

माहितीचा स्रोत: 
आईची नेहमीची पद्धत
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टोमॅटो फारच आवडते आहेत आणि एकंदरीत फारच सोपी वाटतेय त्यामुळे नक्कीच करणार. Happy

मी नुसतंच वाटीत घेऊन पिते >> मला पण असंच आवडेल. Happy

मी कुकरमध्ये शिजवून घेते आणि मग सालं काढून मिक्सरला फिरवतानाच त्यात आलं, मिरच्या, कढिपत्ता, कोथिंबीरही फिरते. सगळं एकजीव होतं. मग वरून तूप, जिर्‍याची फोडणी. दा कु नाही. गरम भातावर किंवा नुसतं प्यायला मस्त लागतं.

सार माझं पण फेवरेट! ही रेसिपी वेगळीच दिसतेय.
मी लसूण नाही घालत सारात. दाण्याचा कूट पण नाही. खोबरे घालते मात्र. या पद्धतीने बघेन ट्राय करून.

मी असं केलं तर सूप म्हणते त्याला. दाण्याचं कुट नाही घालत.(फोडणी ऑप्शनल) .

सार केलं तर प्युरी नाही करत, फोडी करते टोमाटोच्या आणि फोडणीत घालून, झाकण ठेऊन वाफवते पाणी घालून आणि ओले खोबरे घालते. फोडणीत चार मेथीचे दाणेपण घालते. दा. कु. नाही घालत.

असं करून बघेन आता.

ओह, म्हणजे दाण्याचं कूट माझ्या आईचीच ऍडीशन असावी.

मूळ रेसीपीत नसला तरी आलं लसूण पेस्ट करतानाच मी त्यात थोडासा कांदाही घालते. छान वेगळी चव येते त्याने. स्पेशली सार नुसतं प्यायचं असेल तेव्हा.
नक्की करून पहा आणि फोटो दया इथे Happy

मी टोमॅटोचं सार करताना मिक्सरमध्ये टोमॅटोची प्युरी केली की त्यात थोडं मुगाचं वरण घालते. सार घट्टपण होतं आणि पोटभरीचंदेखील. वरून चरचरीत फोडणी आणि सार उकळताना त्यात किंचित गू़ळ. मी लसूण घालत नाही. फक्त आलं आणि कोथींबीर. हिरव्या मिरची ऐवजी रस्सम पावडर किंवा लाल तिखट.

प्राजक्ता, शोरब्यासाठी टोमॅटोचे मोठे तुकडे मिरची, आलं, लसूण आणि गरम मसाला घालून शिजवतात आणि सालं न काढता गाळून घेतात वरून तेल जिर्‍याची फोडणी देतात. मीठ साखर इ. सारासारखंच.
गरम मसाल्यामुळे तिखट लागत असेल..