कॅलिफोर्निया २०१५ : (८) सॅन फ्रान्सिस्को

Submitted by मामी on 27 August, 2015 - 04:15

आधीचे भाग -
कॅलिफोर्निया २०१५ : (१) ट्रिप - एक आखणे
कॅलिफोर्निया २०१५ : (२) पूर्वतयारीचे तपशील
कॅलिफोर्निया २०१५ : (३) लॉस एंजेलिस
कॅलिफोर्निया २०१५ : (४) डिस्नीलँड, लास वेगास, ग्रँड कॅनियन
कॅलिफोर्निया २०१५ : (५) पुन्हा एकवार एले
कॅलिफोर्निया २०१५ : (६) पॅसिफिक कोस्टल हायवे
कॅलिफोर्निया २०१५ : (७) लॉस आल्टोसचा मुक्काम

सॅन फ्रान्सिस्को हा आमचा शेवटचा मुक्काम होता. आम्ही रहात होतो त्या ठिकाणापासून सॅन फ्रान्सिस्को दोन अडिच तासाच्या अंतरावरच होतं. १२ जुलैला नेहमी प्रमाणेच सकाळी उठून बांधाबांध केली. बाकी सामान परवडलं पण किचन मधल्या गोष्टी विशेषतः फ्रीज आणि फ्रीझरमधल्या गोष्टी आईसबॉक्समध्ये बर्फासकट बसवणं म्हणजे एक कलाच होती. एकीकडे पुन्हा पुन्हा घरात जाऊन जाऊन सगळे कप्पे, ड्रॉवर्स तपासणे, उशा- गाद्यांखाली लपलेल्या वस्तू गोळा करणे, बॅकयार्ड तपासणे, घर जास्तीत जास्त स्वच्छ करून कचरा बाहेर गार्बेज बिनमध्ये टाकणे ही कामंही होतीच.

आम्ही पहिल्या दिवशी जेव्हा या घरात आलो तेव्हा आम्हाला उशीर होणार होता म्हणून तसं आमच्या घर मालकिणीला सांगितलं होतं. तिनं घराबाहेर एका ठिकाणी चावी ठेवली होती, कुठे ठेवलीये ते आम्हाला कळवलं होतं आणि निघून गेली होती. घरात वेलकम वाईन आणि चॉकलेटस ठेवायला मात्र विसरली नव्हती ती. Happy

दोन दिवसांनी आम्हाला मिक्सरची गरज भासली होती आणि शोधल्यावर घरात मिक्सर नाही हे लक्षात आल्यावर आम्ही तिला मेसेज केला. तर ती कुठेतरी दौर्‍यावर होती. पण संध्याकाळी आम्ही बाहेरून फिरून येईपर्यंत तिच्या एका सहकार्‍याने एक मिक्सर आमच्या घराबाहेर आणून ठेवला होता. त्या मिक्सरबरोबर पुन्हा चॉकलेटस आणि बिस्किट्स. सो स्वीट! आता जातानादेखिल ती म्हणाली होती की कदाचित येईन म्हणून पण तिला नाहीच जमलं. तिनं सांगितल्याप्रमाणे आम्ही चावी किचन काउंटरवर ठेऊन निघून आलो. अशा तर्‍हेने अगदी अजिबात एकमेकांची तोंडं न बघता आम्ही तिच्या घरात सहा दिवस राहून आलो. गॉड ब्लेस हर.

सॅन फ्रान्सिस्कोला पोहोचलो ते आधी तडक गोल्डन गेट ब्रिजवर गेलो. आधी ब्रिजवरून गेलो, मग ब्रिजखालच्या विस्टा पॉइंटवरून बे आणि ब्रिज पाहिला मग शेजारची टेकडी चढून बॅटरी स्पेन्सर पॉइंटला जाऊन वरून ब्रिजचं दर्शन घेतलं. ढगांत लपलेले गोल्डन गेटचे भलेमोठे खांब पाहिले. खूप लाड केले गोल्डन गेट ब्रिजचे. खरंतर हा ब्रिज सोनेरी नाहीये. त्याचा जो काही रंग आहे त्या रंगाला international orange कलर म्हणतात. मग या ब्रिजला गोल्डन गेट का बरं म्हणतात? १८४६ मध्ये (म्हणजे कॉलिफोर्नियातील गोल्ड रश सुरू होण्याअगोदर दोन वर्षं) एका आर्मी ऑफिसरनं - जॉन फ्रीमाँट - म्हणे या बे ला उद्देशून उद्गार काढले की "हा बे (पॅसिफिकला जोडत असल्याने) पूर्वेकडील देशांशी व्यापाराचं गोल्डन गेटच आहे." त्यावरून ते नाव आलंय म्हणे. कशाचं काय अन कशाचं काय!

प्रचि १ : गोल्डन गेट ब्रिज खालच्या विस्टा पॉइंटवरून

प्रचि २ : बॅटरी स्पेन्सर टेकडीवरून ( फोटोत ब्रिजला चिकटून जो चौरस दिसत आहे तिथून प्रचि १ काढलं आहे.)

प्रचि ३ : टेकडीवरून गोल्डन गेट ब्रिजचं रुपडं

गोल्डन गेट ब्रिज मनसोक्त बघून झाल्यावर आम्ही आमच्या नविन डिपार्टमेंटमध्ये येऊन दाखल झालो.

सॅनफ्रान्सिस्को एक मजेशीर शहर आहे. या शहराला फॉग सिटीही म्हणतात. धुक्याचं शहर. खरंच बरेचदा ढग आणि धुकं इथे मुक्कामाला असतं. अर्थात स्वच्छ सूर्यप्रकाशही असतोच. आम्हाला आमच्या घरमालकानं एक महत्त्वाची टिप दिली की सॅन फ्रान्सिस्कोमध्ये फिरताना घरातून निघताना तुम्हाला जरी गरम होत असेल तरीही सोबत जॅकेट वगैरे तत्सम काही गरम कपडे घेऊनच निघा. शहराच्या एका भागात जरी गरम वाटलं तरी दुसरीकडे गेल्यावर चांगलीच थंडी वाजू शकते. संध्याकाळी तर थंड वाटायचंच.

शहरभर टेकड्या आणि टेकड्यांवर एकमेकांना खेटून असलेली घरं. एक घर दुसर्‍यापासून ओळखता यावं म्हणून त्यांना वेगवेगळे रंग दिलेले. खूप गोड दिसतात ती घरं.

प्रचि ४

प्रचि ५

बरं सगळी घरं पहिल्या मजल्यावर. कारण खाली गॅरे़ज. त्याशेजारून पायर्‍या चढून वर गेलं की घर. इतर ऐसपैस अमेरिकन घरांच्या तुलनेत ही घरं तशी छोट्या जागेत दाटीवाटीनं बसवलेली दिसतात. शिवाय पावलोपावली लाँड्र्या. इतक्या लाँड्र्या का बरं या प्रश्नाचं उत्तर आमच्या घरी गेल्यावर कळलं. घरात वॉशिंग मशिनच नाही. आता ते कदाचित गॅरेजमध्ये असेलही पण आमच्या लँडलॉर्ड सायबांनी आम्हाला घराजवळच्या दोन तीन लाँड्र्यांचे पत्ते देऊन त्या वापराव्यात असं सुचवलं. आम्हीही चँपियनगिरी करून आधीच्या घरून आतापर्यंतचे दोन-तीन दिवसांचे कपडे न धुताच आणले होते. विचार केला होता की नव्या घरी जाऊनच धुऊ आता म्हणून. ते असं उलटलं.

सॅन फ्रान्सिस्कोला घर घेताना जास्त चॉईस उरला नव्हता. शिवाय आम्ही सगळं लक्ष फोकस केलं होतं ते घर सपाटीवर असण्याकडे. टेकडीवर नको, जवळच बसथांबा हवा, किमान ३ बेडरूम्स वगैरे. या महत्त्वांच्या पॅरामीटर्समध्ये वॉशिंगमशिन सारख्या बारीकसारीक गोष्टी बघितल्याच गेल्या नव्हत्या. त्याची ही सजा.

मग आधी जाऊन कोपर्‍यावरच्या लाँड्रीत कपडे टाकून आलो. तो दुसर्‍या दिवशी सकाळीच लगेच देणारही होता. या घराजवळही एक छानसं ग्रोसरी स्टोअर होतं. घराखालीच एक चायनीज रेस्टॉरंटही होतं.

हे झाल्यावर बहिण आणि नवरा जाऊन सॅन फ्रान्सिस्को एअरपोर्ट वर गाडी सोडून आले. आता पुन्हा पब्लिक ट्रान्स्पोर्ट. आणि तो ही सॅन फ्रान्सिस्कोचा! आमची जामच दाणादाण उडवून दिली इथल्या बसेस, ट्राम्स आणि केबल कार्सनं. खरं तर आमच्या घरापासून निघणारी बस इथल्या मार्केट स्ट्रीटवरून मग पुढे फिशरमन्स वार्फला जायची. हीच बस उलट्या दिशेनं पकडली तर गोल्डन गेट पार्कला जायची. त्यामुळे खूपच सोईचं व्हायला हरकत नव्हती खरं तर पण त्यातल्या त्यातही या बसनं नको जीव करून सोडला. (हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. रायगडनं इथे लिहिलंय त्याबद्दल : सॅन फ्रॅन्सिस्कोच्या 'मुनी' )

इथे मिळणार्‍या सिटीपासमध्ये बरीच महत्त्वाची ठिकाणं आणि बसप्रवास कव्हर होतो. तो नक्की घ्यावाच. या पासमध्ये बस आणि मेट्रो अनलिमिटेड राईडस ( यांना इथे मुनी म्हणतात.) आणि केबल कार्स अनलिमिटेड राईड्स असतात. शिवाय, कॅलिफोर्निया अ‍ॅकेडेमी ऑफ सायन्स, एक बे क्रूज, फिशरमन्स वार्फवरचा अ‍ॅक्वेरियम (किंवा मॉनरे चा अ‍ॅक्वेरियम - काहीतरी एक) आणि एक्स्प्लोरेटोरियम अशी आकर्षणं सामील असतात.

गोल्डनगेट ब्रिज खालोखाल फेमस म्हणजे फिशरमन्स वार्फ आणि त्यातलं पिअर ३९. हे प्रकरण सदैव नुसतं उत्साहानं फसफसलेलं. समोरच दिसणारा निळा बे, अल्काट्राझ तुरुंग, गोल्डन गेट, शेजारीच असलेली गिरार्डेलि चॉकलेटची फॅक्टरी, पिअर ३९वरची असंख्य सीफूड रेस्टॉरंट, सुंदरशी सुवेनिर शॉप्स, सील्स करता पिअरशेजारी पाण्यात ठेवलेले तरंगते लाकडी प्लॅटफॉर्मस, येजा करणार्‍या असंख्य बोटी ..... मस्त भारलेलं वातावरण. आम्ही निदान ४-५ वेळातरी पिअर ३९ वर गेलो आणि प्रत्येकवेळी तिथलं फेमस 'क्लॅम चाउडर इन सावरडो ब्रेड बोल' खाल्लंच.

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

पिअरवरून दिसणारा टेकडीवरचा कॉईट टॉवर. या टॉवरशेजारून पायर्‍या उतरून खाली यायला जागा आहे. या पायर्‍या खूप फेमस आहेत. आजूबाजूला घरं आणि झाडं आणि ही छोटीशी पायरीवाट आम्ही उतरून आलो.

प्रचि ९

अल्काट्राज तुरुंगाचं बेट. नामचिन खतरनाक कैदी इथे ठेवले जात. आता इथे कैदी नाहीत पण तुरुंगाची वारी आपल्या सारख्या सामान्य लोकांना करायची असेल तर करता येते. गाईडेड टूर्स आहेत. असं म्ह्णतात की इथल्या तुरुंगात कैद्यांना आंघोळीला मुद्दाम गरम पाणी देत असत. त्यांना थंड पाण्याची सवय झाली तर इथल्या समुद्राच्या महाथंड पाण्यातून पळून सोपं होईल. ते होऊ नये म्हणून.

प्रचि १०

दोनदा तर मी आणि बहिण दोघीच गेलो. मुलांना ( पुन्हा एकदा) नवर्‍याबरोबर मिनियन्स सिनेमा बघायला पाठवून आम्ही दोघीच पिअरवर आलो. तिथल्या एका रेस्टॉरंटमध्ये वारुणीचे घुटके घेत क्लॅम चाउडर, चिकन विंग्ज आणि क्रॅब केक्स खात होतो. तर समोरून एक ४-५ लोकांचा घोळका गेला. आम्ही दोघी एकाच वेळी चित्कारलो. बहिणीला त्यात मार्क झुकेरबर्ग दिसला तर मला 'ट्वायलाईट' चा हिरो रॉबर्ट पॅटिंसन दिसला. हे खरेच आहेत की आपल्याला भास होताहेत की वारुणीचा परिणाम ते कळेना. बाकी आजूबाजूचे कोणी त्यांच्याकडे ढुंकूनही बघत नव्हते. पण आपल्याला हेच दोघे दिसले यावर आम्ही टिकून होतो. काय की!

इथेच एक्प्लोरेटोरियम नावाचं अफलातून विज्ञान म्युझियम. पण तेवढंच नाही म्युझियमपेक्षाही अनेक पटीनं जास्त काहीतरी. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर The Exploratorium isn't just a museum; it's an ongoing exploration of science, art and human perception—a vast collection of online experiences that feed your curiosity. एक आठवडातरी लागेल सगळं व्यवस्थित बघायला. मुलांनी आणि त्यांच्याइतकंच आम्हीही खूप एंजॉय केलं इथे.

अशीच दुसरी एक देखणी जागा म्हणजे गोल्डन गेट पार्क. प्रचंड मोठ्या जागेवर असलेलं हे पार्क. काय नाही इथे? फाईन आर्टचा डी यंग म्युझियम, कॅलिफोर्निया अ‍ॅकॅडेमी ऑफ सायन्सेस च्या भव्य वास्तू, पोलो ग्राउंड, जॅपनीज गार्डन, बोटॅनिकल गार्डन,कॉन्सर्वेटारी, गोल्फ कोर्स, स्टेडियम, तलाव, धबधबा, जंगल ..... सगळं केवळ महान आणि बहुतांशी गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट!

इतकी सुंदर जागा, इतकी सुंदर संकल्पना. लोकं देखिल याचा पुरेपुर फायदा घेताना दिसत होते. सायकलिंग, सेगवे, बोर्ड स्केटिंग, बोटिंग, जॉगिंग करत होते. कित्येक लहान मुलांच्या टूर्स आल्या होत्या आणि ते चिल्ड्रन्स पार्कमध्ये खेळत होते. अगदी नुसतं तळ्याकाठच्या एखाद्या झाडाखाली पुस्तक वाचत आख्खा दिवस आनंदात घालवू शकता. एका मैदानात खुर्च्या वगैरे मांडून बहुतेक भाषणाची तयारी सुरू होती.

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

<

धबधबा आणि बोटिंगकरता तलाव

प्रचि १४

आम्ही त्या पार्कच्या प्रेमात पडलोच.

एक दिवस मुलांबरोबर कॅलिफोर्निया अ‍ॅकॅडेमी ऑफ सायन्सेसला भेट दिली. मस्त जागा पण सेम एलेच्या नॅचरल हिस्टरी म्युझियम सारखीच. मुलांना मात्र खूप मजा आली. पेंग्विन फिडिंगचा शो देखिल होता. इथे प्लॅनेटोरीयमही होतं. खरंतर आधी एलेला देखिल ग्रिफिथ ऑब्झर्वेटरीमध्ये एक शो पाहिला होता. आणि शो सुरू होताच दमल्यामुळे सगळे गाढ झोपले होते. तरीदेखिल (आणि किंबहुना म्हणूनच) इथेही सगळ्यांना शो बघायची जोरदार घाई. आम्ही म्हणतही होतो की पांघरूणं, फ्लॉस वगैरे घेऊन यायला हवं होतं. वाटत होतं तसंच पुन्हा या शो मध्येही सगळ्यांनी पाऊणतासाची घनघोर झोप काढली. आणि मग ताजेतवाने होऊन पुढच्या मोहिमेवर निघालो. आता प्लॅनेटोरियममधला शो = हक्काची झोप असं समीकरणच झालंय.

पण एकदा आम्ही दोघीच भटकायला बाहेर पडलो ते इथेच आलो. त्या सुंदर पार्कात भरपूर भटकलो. एक सुंदर कॉन्झर्व्हेटरी पाहिली.

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

डि यंग म्युझियमबाहेरचा परिसर

प्रचि १९

सॅन फ्रान्सिस्कोचा प्रसिद्ध लॉम्बार्ड स्ट्रीट पाहिला. हा रस्ता उंचावरून खाली नागमोडी वळणं घेत येतो. इथून कार चालवत खाली जायचं म्हणजे एक चॅलेंजच आहे.

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

लॉम्बार्ड स्ट्रीट बघायला (जर कार नसेल तर) आधी एक पॉवेल-हाईड रुटची केबल कार पकडायची. या केबल कार्सना प्रचंड गर्दी. त्या जिथून सुरू होतात त्या थांब्यावर भल्या मोठ्या रांगा लागलेल्या असतात. आम्ही अशाच एका रांगेत उभे असताना एका जुन्याजाणत्या रहिवाश्यानं येऊन आम्हाला सांगितलं की इथे उभे राहू नका. दोन तास रांगेतच उभे रहाल. त्यापेक्षा एक स्टॉप वरच्या अंगाला जा. तिथेही थोड्या लोकांना घेतात बसमध्ये. आम्ही तसंच केलं आणि त्यामुळे चौथ्या बसमध्ये जागा मिळाली लगेच. खाली थांबलो असतो तर नक्कीच आठ तरी बसेस डोळ्यासमोरून गेल्या असत्या. क्या केबल कार्स म्हणजे एक महदाश्चर्यच! किती ते उंच चढ आणि खोल उतार त्या रस्त्यावर. काही उतारांवर तर बसमधला कंडक्टर उतरून ब्रेक लावतो. आम्ही बसमध्ये नुसते डुचमळत राहतो. पण तो ही मस्त अनुभव.

केबलकारचा रस्ता वर खाली करत किती वरून येतोय बघा

प्रचि २४

आणि मग खालीही तसाच उतरून जातोय

प्रचि २५

सॅनफ्रान्सिस्कोचा आणखी एक हायलाईट म्हणजे मंगोलियन हॉट पॉट. बहिण केव्हाची याबद्दल भरभरून सांगत होती. त्यामुळे यंदाच्या अमेरिकावारीत या प्रकरणाला भेट देणं मस्टच होतं. एलेमध्ये जायला जमलं नाही पण इथे शेवटी जमवलंच. कोण एक्साईटमेंट! टेबलावर एक भलं मोठं सुपाचं घंगाळ येतं. त्यात एक स्पायसी आणि एक ब्लांड अशी दोन सुपं. हे टेबलवरच्या हॉटप्लेटवर ठेवलं जातं आणि आतली सुपं उकळू लागतात. मेन्युमधून आपल्याला हवे ते खाऊचे ऑप्शन्स मागवायचे. अनेकानेक व्हेज नॉनव्हेज ऑप्शन्स असतात. ते कच्चेच असतात. आपण ते आपल्याला हव्या त्या सुपात सोडायचे आणि शिजले की खायचे. अधून मधून सूप ही प्यायचं. महाचविष्ट सूप आणि ऐकूणातच मस्त बैठक जमते. तास-दीडतास सहज सावकाश गप्पा मारत जेवण होतं. मुंबईत एकाच ठिकाणी हे मिळतं. आता जाऊन पहायला पाहिजे कसं आहे ते.

प्रचि २६

या घराला असलेल्या तीन बेडरुम्सपैकी एका बेडरूममध्ये गेल्या गेल्या लेकीनं तिचा पॉलिमर क्लेचा संसार थाटला. थोड्यावेळानं तिच्या मावसभावंडांपैकी कोणीतरी त्यातलं काहीतरी बघत असताना ते टेबलावरून खाली पडलं म्हणून बाई अपसेट झाल्या आणि त्यांनी भावांना त्या रुममध्ये जाण्यास बंदी घातली. झालं! आता हे कळल्यावर मोठ्याला सारखं त्याच रुममध्ये जावसं वाटायला लागलं. तो आपला संधी शोधून तिथे जायला बघतोय आणि लारा पहार्‍याला रुमबाहेर उभी असा खेळ सुरू झाला. तो दिवसभर पुरला. शेवटी वैतागून अरिननं जाहिर रित्या अनाउन्स केलं की "मी प्रेसिडेंट झाल्यावर सगळ्यात पहिले पॉलिमर क्ले बॅन करणार!!!!" ऐकून इतकं मोठं ध्येय ठेवल्याबद्दल आनंदावं की प्रेसिडेंट झाल्यावर अजेंडावर असलेलं पहिलं काम बघून रडावं ते कळेचना!

शेवटच्या फिरण्याच्या दिवशी आम्ही बे क्रूजही केली. फार मस्त मजा आली. डेकवर उभं राहून भणभणत्या वार्‍यात गोल्डन गेट ब्रिजच्या खालून, अल्काट्राझला वळसा घालून एक तासाची भटकंती झाली.

बोटीतून सॅन फ्रान्सिस्को सिटी

प्रचि २७

गोल्डन गेट ब्रिजखाली

प्रचि २८

अल्काट्राझ

प्रचि २९

या नंतर घरी गेल्यावर आम्हाला पासांची गरज नव्हती. पास ७ दिवसांचे असतात असं वाचलं होतं पण आम्ही घेतलेले पास ९ दिवस चालणारे होते. शिवाय आम्ही मॉनरेला आणि बाकीच्या म्युझियम्स मध्येही बरेच अ‍ॅक्वेरियम्स बघितल्यानं पुन्हा इथला बघण्याचा उत्साह मुलांनी दाखवला नाही. ते अ‍ॅक्वेरियमचे पासेस तसेच राहिले होते. मग आम्ही अ‍ॅक्वेरियमच्या दाराशी जरा उभे राहिलो. एक मोठा गृप अ‍ॅक्वेरियम बघायला आला आणि तिकीट काढायला लागला तेव्हा त्यांना सांगितलं की आमच्याकडे आहेत पासेस. फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला ४ अ‍ॅडल्ट आणि २ लहान मुलांचे पासेस मिळतील. ते खुश आणि आमचे पासेस कारणी लागले, वाया नाही गेले म्हणून आम्ही खुश. त्यांचे १०० डॉलर्स तरी वाचले असतील.

सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आम्ही थोडीफार खरेदीही केली. इथल्या मंडळींसाठी गिफ्टस वगैरे घेतल्या. आहेत त्या बॅगांच्यात आणि वजनात सगळं बसलं देखिल समहाऊ. पण एक महाघोटाळा झाला.

सॅनफ्रान्सिस्कोहून डोमेस्टिक फ्लाईट पकडून आम्ही एका रात्रीपुरतं एलेला येणार होतो. या फ्लाईटमध्ये केवळ एकच मोठी बॅग चेक इन करायची ठरवली कारण बाकीच्या बॅगांना पैसे पडणार होते. पण बॅगा भरताना मात्र आम्ही इंटरनॅशनल फ्लाईट प्रमाणे भरल्या ना. एले-मुंबई प्रवासात सगळ्याच बॅगा चेकइन करणार होतो. केवळ एक लॅपटॉप आणि पुस्तकं वगैरे असलेली बॅगपॅक बरोबर असणार होती. आम्ही दूरदृष्टी दाखवून लांबच्या प्रवासाप्रमाणे सामान भरलं आणि त्यामुळे सॅन्फ्रान्सिस्कोच्या एअरपोर्टवर सेक्युरिटीत आमच्या बॅगेत अनेक ऑब्जेक्शनेबल वस्तू सापडल्या की राव! आता????? इतका साधा मुद्दा कसा काय लक्षात नाही आला? वैताग नुसता. बरं या सगळ्या गोष्टी नेमक्या होत्या लाराच्या - पॉलिमर क्ले, टूल्स, बस्केनं दिलेलं क्रीम वगैरे असं सगळं. त्या लोकांनी त्या गोष्टी बाजूला काढल्या म्हणताना लारानं तिकडे टिपं गाळायला सुरूवात केली. ते कोण देवदूत होते कोण जाणे पण लहान मुलगी रडतेय आणि हे तिचं सामान आहे कळल्यावर सगळ्या गोष्टी अगदी पाण्याच्या बाटलीसकट त्यांनी निमुटपणे बॅगेत पुन्हा भरल्या. देवाचा महिमा अगाध आहे. आता हा महत्त्वाचा धडा कधीच विसरणार नाही.

सॅनफ्रान्स्किस्कोहून निघायच्या आदल्या दिवशी एअरपोर्ट ड्रॉपकरता एक व्हॅन बुक केली. तो वेळेआधीच आला खरं तर पण आमचं आवरत होतं तर शांतपणे थांबलाही. ब्रेकफास्ट, बाकीच्या खाऊची योग्य विल्हेवाट लावणे, घराची स्वच्छता आणि अर्थात बांधाबांधा यात सकाळ पटकन निघून गेली. सामान व्हॅनमध्ये चढवलं, घरमालकाला बाय बाय केलं आणि निघालो. रस्त्यात अजून दोघांना व्हॅन पिकअप करणार होती. ते करून आम्ही एअरपोर्टला पोहोचलो.

आमचं एलेचं फ्लाईट आणि बहिणीचं सिअ‍ॅटलचं फ्लाईट यात खरं तर दोनेक तासाचा फरक होता. आमचं फ्लाईट आधी होतं. पण काय योगायोग बघा, आमची विमानं नेमकी शेजारशेजारच्या गेटांवरून सुटणार होती. त्यामुळे तिथेही आम्ही एकत्र होतोच. शिवाय आमचं फ्लाईट डिले होत गेलं आणि चांगलं दीड तास डिले झालं. त्यावेळी मेक्सिकोत वादळ सुरू होतं आणि त्यामुळे फ्लाईट इथे एलेहून पोहोचलंच नव्हतं. पण दीड तासानं झालं एकदाचं बोर्डिंग सुरू आणि आम्ही एकमेकांचा निरोप घेतला ....... पुन्हा एकदा स्काईपवर भेटण्यासाठी.

मग एले, तिथे रात्री मुक्काम आणि दुसर्‍या दिवशी (२० जुलैला) दुपारी २ वाजता मुंबईचं फ्लाईट पकडून तब्बल ५० दिवसांनी २२ जुलैला पहाटे १ वाजता आमच्या घरी परतलो. बॅक टू रुटिन!

(समाप्त)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त झालाय हा भाग सुद्धा. आमच्या एक दिवसीय ट्रीप च्या आठवणी आल्या. खुप पायपीट आणि सगळ्या ट्रान्झिट वापरल्या होत्या. ती बोट राईड मस्तच होती अगदी. आमच्या बरोबर सिगल्स उडत होते. आणि खाली सगळे सिल्स दिसत होते खडकांवर. केबलकार ही आवडली होती. फक्त चायनाटाऊन मध्ये जायचे राहिले आहे Happy

मस्त. एसेफ इज बेस्ट. क्रुकेड स्ट्रीट केबल कारचे चढ आणि गो गे पार्क सगळं भारी. कितीही वेळा गेलात तरी मस्त फील.

आहाहा.. लव फ्रिस्को!!!! एकेक दृष्य डोळ्यासमोर आलं, चौडर सावर डो ची चव सुद्धा आली जिभेवर.. यम्म!!

मस्त वर्णन केलंयस.. वार्फ वरील गर्दी जिवंत झाली.. ते सुविनेर शॉप्स खरंच अजब भूल घालतात , काही अगदी वेगळ्याच वस्तू असतात नै??
अलकाट्रझ ला जाताना समुद्राचे चॉपी वॉटर.. इतकं चॉपी वॉटर अजून कुठे अनुभवलं नाही,
प्रेसिडेंट चा अजेंडा Rofl
हॉटपॉट.. सुकियाकी .. भाऊ भाऊ... स्लर्पी फूड!!!

मस्त, आवडली ट्रिप तुझी..

आम्हालाही मस्त टुअर घडवलीस. खुसखुशीत लिहिलंयस त्यामुळे उत्सुकता शेवटपर्यंत टिकून राहिली.
हा नवा फॉर्म छान आहे प्रवासवर्णनाचा.

पुढचा बेत केव्हा आहे आता? Happy