मायबोली गणेशोत्सव २०१५ - पाककृती स्पर्धा - 'अशी ही अदलाबदली' - मुदतवाढ!!

Submitted by संयोजक on 10 September, 2015 - 22:51

FoodCollageWithText&Logo.jpg

नमस्कार!

मायबोलीच्या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असते पाककला स्पर्धा! अनेक चतुर कल्पना लढवत संयोजक मंडळ ही स्पर्धा अधिकाधिक आव्हानात्मक करण्याचा प्रयत्न करत असते आणि पाककलेत पारंगत असलेले खवय्ये मायबोलीकरही भरघोस प्रतिसाद देऊन 'हम भी कुछ कम नहीं' हेच दाखवून देत असतात. गणेशोत्सवाला खर्‍या अर्थाने लज्जत व रंगत चढते ती याच उपक्रमाने! तर यंदाही आम्ही ही परंपरा पुढे नेत तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक आगळीवेगळी पाककला स्पर्धा! 'अशी ही अदलाबदली'!!

अनेकदा असं होतं की एखादी पाककृती वाचल्यावर त्यातले जिन्नस आपल्याला सहजी उपलब्ध नसतात किंवा पथ्याला अनुकूल नसतात किंवा बच्चेकंपनीला आवडणारे नसतात. अर्थातच आपण विचार करू लागतो की, याऐवजी दुसरं काही वापरलं तर चालेल का? तर हो! आम्ही दिलेल्या काही निवडक पाककृतीत जे 'मुख्य घटक' दिले असतील त्या जागी तुम्हाला दुसरे "बदली घटक" वापरून त्या पदार्थाचा नवा प्रकार सादर करायचा आहे. यासाठी खालील नियम काळजीपूर्वक वाचा व काही प्रश्न असतील तर जरूर विचारा!

स्पर्धेचे नियम :

१) स्पर्धेकरिता ठरावीक कालांतराने मूळ पाककृती व त्या पाककृतीमधील बदलायचे घटक प्रसिद्ध करण्यात येतील. (प्रत्येक पाककृतीमध्ये १, २ किंवा जास्तीत जास्त ३ घटक बदलण्यास सांगितले असेल.)

२) बदलण्याकरिता देण्यात आलेला प्रत्येक घटक बदलून त्याजागी नवीन घटक घालणे अनिवार्य आहे. उदा. ३ घटक बदलण्यास सांगितले असतील तर केवळ १ किंवा २ घटक बदलून चालणार नाही. तिन्ही घटक बदलणे अनिवार्य असेल.

३) बदलण्यास सांगितलेल्या घटकांऐवजी तुम्ही कुठले घटक घातले आहेत याची पाककृतीच्या सुरुवातीस ठळक अक्षरांत नोंद असणे आवश्यक आहे.

४) पाककृतीतील इतर कुठलेही घटक वगळता येणार नाहीत.

५) बदललेला घटक मूळ घटकाऐवजी पाककृतीत मुख्य घटक म्हणून आणि सजावटीत वापरू शकता. फक्त सजावटीकरिता वापरता येणार नाही. बदलून कोणता पदार्थ घालावा यावर काहीही बंधन नाही. तसेच बदलून घालायचा पदार्थ कच्चा, चिरून, सोलून, वाळवून, कशाही प्रकारे शिजवून, भाजून, उकडून, गार करून,तळून, बेक करून, क्रश करून, वाटून, लाटून कसाही वापरू शकता.
६) नवीन पदार्थाच्या चवीवर बंधन नाही. म्हणजेच मूळ पाककृती गोड असेल व त्यात बदलायचा घटक म्हणूनब गूळ / साखर दिला असेल तर तुम्ही गुळाच्या जागी तिखट घालून तिखट पदार्थ बनवू शकता व मूळ पाकृ तिखट असेल तर तुम्ही तिला गोड करू शकता. चवीसाठी वापरण्यात येणार्या पदार्थांवर उदा.मीठ, तिखट, मसाले, मिरची, लसूण, आलं, साखर, मध, गूळ वगैरे वर आणि पाण्याच्या वापरावर प्रमाणांचं बंधन नाही. हे पदार्थ तुम्ही बदली घटकांव्यतिरक्तही वापरू शकता! तयार पदार्थाचा आकार बदलल्यास हरकत नाही, उदा. वड्यांऐवजी मोदक इ.ब थोडक्यात, तुमची कल्पकता वापरून मूळ घटक बदलून तुम्ही काहीही बनवू शकता!!
७) सामिष पदार्थ वापरता येणार नाहीत. पाककृती संपूर्ण शाकाहारी असवी. अंडेही नको. जिलेटिनचा वापर नसावा.

८) तयार पदार्थाचे प्रकाशचित्र अनिवार्य आहे. कृतीची (पायर्‍यांसहीत) प्रकाशचित्रे द्यायला हरकत नाही.

९) एक सदस्य जास्तीत जास्त दोन प्रवेशिका देऊ शकतो. एकाच पाककृतीत वेगवेगळे बदली घटक वापरून दोन वेगळ्या पाककृती बनवल्यास त्या दोन प्रवेशिका म्हणून धरण्यात येतील. विजेतेनिवड मतदान पद्धतीने होणार असल्याने एकाच स्पर्धकाच्या दोन्ही प्रवेशिका निवडून आल्यास हरकत घेता येणार नाही.

१०) एका प्रवेशिकेत एकच पाककृती असावी.

११) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'मायबोली गणेशोत्सव २०१५' या ग्रुपचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे. (ह्यासाठी मायबोली सदस्यत्त्व आवश्यक आहे.) हा ग्रूप गणेशचतुर्थीच्या दिवशी (म्हणजेच १७ सप्टेंबर २०१५, भारतीय प्रमाणवेळ) खुला होईल.

१२) आपली प्रवेशिका 'मायबोली गणेशोत्सव २०१५' ह्या ग्रूपमध्ये गणेशचतुर्थीच्या दिवसापासून (म्हणजेच १७ सप्टेंबर २०१५, भारतीय प्रमाण वेळ) २९ सप्टेंबर २०१५, अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ पर्यंत प्रकाशित करावी.

१३) मायबोलीवर वा इतरत्र पूर्व प्रकाशित पाककृती येथे देता येणार नाही.

१४) धाग्याचे शीर्षक <अशी ही अदलाबदली>-<मूळ पाककृतीचे नांव>असे असावे. नवीन पाककृतीचे नाव मजकुरात सुरुवातीस लिहावे.

१५) नियम क्रमांक ९ मध्ये नमूद केल्याप्रमाणे विजेत्यांची निवड मतदानपद्धतीने केली जाईल. मतदान करण्याकरता मायबोली सदस्यत्व आवश्यक आहे

पाककृती क्रमांक १ : 'अशी ही अदलाबदली' - पाककृती क्र.१ : गाजर आणि चणा डाळ वडी

पाककॄती क्रमांक २ : 'अशी ही अदलाबदली' - पाककृती क्र.२ : ब्रह्मघोटाळ्याचे पराठे

पाककॄती क्रमांक ३ : 'अशी ही अदलाबदली' - पाककृती क्र.३ : मद्रासी सांबार कांद्यांची कलेजी

पाककॄती क्रमांक ४ : 'अशी ही अदलाबदली' - पाककृती क्र.४ : स्पायसी सॅलड स्टॅक

पाककॄती क्रमांक ५ 'अशी ही अदलाबदली' - पाककृती क्र.५ - ओटसचे मोदक

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बुद्धीला चालना द्यावीच लागेल . खूपच डोक लढवलेल दिसत विषय निवडतांना . खऱ्या अर्थाने परीक्षा आहे

हो, प्रभा. डाळीच्या जागी बेसन वापरू शकता.
अरूंधती, तुमच्या प्रश्नावर फेरविचार केल्यावर बदललेला निर्णय सांगताना आनंद होत आहे की असे घटक चालतील.फक्त पाककृतीत लिहीताना 'अपरिहार्य कारणास्तव बदल करून वापरलेला घटक' असे नमूद करावे. असा घटक फक्त अपवादानेच वापरता येईल.

नमस्कार,

एखद्या पाकृ मधे साहित्यात प्रमाणात पाणी (१ कप / अर्धी वाटी वगैरे) वापरले असल्यास बदललेल्या पाकृमधे तेव्हढे पाणी पण वापरणे आवश्यक आहे का?

की नियम ४ नुसार पाण्याचे प्रमाण कमी/जास्त करता येइल किंवा पूर्णतःच वगळता येइल?

अजुन एक किडा डोक्यात. पाकृ वडीची आहे, मी सगळे नियम पाळुन पाकृ करताना वडीच्या जागी त्याला मोदकाचा किंवा लाडूचा आकार दिला तर चालेल का? की वडीच्या जागी वडीच हवी?

मला वाटते असे चालणार नाही.

गोडाच्या जागी तिखट वापरता येते असे वर लिहिलेय. पण तिखट वापरले तर मिठाचाही आधार घ्यावा लागतो. म्हणजे एक गुळ बदलताना मी त्याजागी तिखट टाकते आणि सोबत जास्तीचे मिठही टाकावे लागते. हे चालेल ना?

तसेच तिखट म्हटले की त्यात एकतर मिरची पुड किंवा मसाला पुड ज्यात मिरची पुड + इतर मसाले या दोघांपैकी एक असे चालेल का?

जास्तीची स्टेप म्हणून तळणं नाही चालणार झंपी. न तळताच प्रवेशिका पाठवा पाहू! Happy
बरोबर साधना. नाही चालणार तसे, आपल्याला घटक पदार्थच बदलायचे आहेत फक्त.

साधना, चार वड्या कर, फोटो काढ, स्पर्धेसाठी धाड!!
उरलेल्याचे मोदक कर. पाच कुमारीकांना दे. पाच कुमारांना दे. पाच माहेरवाशिणींना दे. पाच घरजावयांना दे. पाच सासवांना दे. त्यांना चावून तुकडा मोडायला आला तर तुझ्या प्रवेशिकेला भरघोस मतं मिळतील असा त्यांचा तुला आशीर्वाद!!!! Biggrin

ही सगळी मंडळी काही कामाची नाही. खातील आणि वर नावेही ठेवतील.
त्यापेक्षा सगळ्या माबोकरांनाच पाच पाच वड्या पाठवते आणि सांगते मलाच द्या हो वोट म्हणुन Wink

साधना, बरोबर पॉइंट आहे. तिखट एक घटक पदार्थे म्हणून गुळाऐवजी वापरला जरी, तरी त्याचे प्रमाण गुळाएव्हढेच म्हणजे अर्धी वाटी इतके घ्यावे लागणार, हे लक्षात येताच मोदक न करताही तिखट जहाल लागले.

अरे बदली घटकाचे प्रमाण तेच ठेवायचे असे कुठे लिहिले आहे?
नका उगाच घोळ घालू. (माझ्या) मनात योजलेली पाकृ ढेपाळेल अश्याने.

वडीच्या जागी वडीच हवी? माझे इमले हवेत विरले की हो. ..... बदली घटकाचे प्रमाण तेच हवे असे लिहिले आहे कुठेतरी.

मंजूडी, पहिल्या पाककृतीवर यावर चर्चा झाली आहे. प्रमाणाचा नियम लिहीला नसला तरी ते गृहीत आहे. समजा उद्या बटाटेवड्यात बटाटा हाच घटक बदलायचा ठरलं, तर तो जिन्नस साधारण त्याच प्रमाणात घ्यावा लागेल ना? थोडं मागेपुढे चालू शकतं पण वाटीचं प्रमाण चमच्यात करू नका असं सांगितलं आहे.

अहो पण बटाटेवड्याची स्वीट कचोरी करायची ठरवली तर बटाट्याच्या प्रमाणात खोबरं घेता येईल पण आलं-लसूण-मिरचीच्या प्रमाणात साखर/गूळ घेऊन पुरणार नाही ना?

बरोबर. तीच तर कसोटी आहे! Happy तुम्ही सगळे चतुर लोक ती नक्की जिंकाल, प्रयत्न करा!
भरत मयेकर, इमले विरू देऊ नका. दोन वड्या फक्त आमच्यासाठी करा. Happy

आम्ही हे पदार्थ घरी करायचे एकदा डिक्लेअर केले आणि ते स्पर्धेसाठी आहेत हेही डिक्लेअर केले की घरची मंडळी कामे सोडुन पाहात बसतील आम्ही काय करतोय ते. आणि मग झालेला पदार्थात वाटीभर गुळाच्या जागी वाटीभर तिखट घातले तर मग पुढे काय आमचे काय होईल ते सांगायला नको. पुढचा गणपती येईतो ह्या गंमती पुरतील घरच्यांना. Happy Happy

संयोजक, उदाहरणार्थ, ओट्सच्या मोदकात बदलायचे घटक तुम्ही दिले आहेत दुधी आणि गूळ. त्यात मी एक वाटी दुधीच्या जागी गाजर बिजर कोबी बिबी ढेमसं बिमसं घेऊ शकते हो.. पण अर्धी वाटी गुळाच्या ऐवजी अर्धी वाटी लाल तिखट/ हिरव्या मिरच्या/ चिंगू चटणी/ शेजवान सॉस घालू शकते का हो?
माझ्या पाककलेवर कायमची बंदी येईल... त्याला जबाबदार तुम्हीच! मग मला सांगू नका. Wink Light 1

संयोजक,

तुम पेहला बोलनेका नै.. तळणं नहि करनेका. Happy माय नहि करती अब.

-----------------
संयोजक,
मायबोलीकर किती चिकित्सक आहेत माहिती आहे ना, मग सर्व नियम एकदाच वरती द्या की.

वडी ला वडीच पाहिजे.

वडी= वडीच पाहिजे, लाडू, जिलेबी नाही चालणार....
पराठे = पराठे
तळणं साठी ज्यास्तीच तेल नाहि चालणार.
प्रमाण तेच पाहिजे.

अर्धी वाटी तिखटात रावण पिठलंच होइल. नाहितर म्हाद्या.

Thanks sanyojak...

Mhanaje....thodakyat...

Vadee chi vadeech....shijavun ..thapun....no frying, baking or freezing allowed...

Modakache saaran ghalun bharalele modakach...no nivagrya, pedhe, jilabya....modak vaafavunach...no frying, baking, freezing allowed....

Parathe....parathech banavaayache....purya chalanar Nahit...

Fakt ghatak badalayache pan prakar n procedure badalayachi nahi...

Barobar Ka sanyojak?

असे नियम केले तर मजा येणार मग.... (तुम्ही तळणं नाही म्हटले म्हणून आमची दांडी तशीही बादच आहे) तेव्हा मी फक्त बघ्याचं काम करणार.

आधीच कोणी वरती म्हटल्याप्रमाणे मोदकाला =मोदक असेल तर मोमोज नाहितर डिमसम होतील तिखटाचे.

फक्त घटक बदलायचे, प्रक्रिया आणि पदार्थ बदलायचा नाही यात तेवढी गंमत नाही. कल्पकतेला खूपच मर्यादित वाव आहे. Sad

त्यामुळे माझे अर्धवट उभारलेले इमले स्पर्धेसाठी न येता आता स्वतंत्र पाककृती म्हणून आकार घेणार. मायबोलीवर येणार की नाही ते टेस्टर्सनी लावलेल्या निकालावर अवलंबून..
स्पर्धेसाठी नवा इमला शोधतो.

लोकहो, तुमच्या शंका विचारात घेऊन नियमात आवश्यक ते बदल केले आहेत! तसदीबद्दल क्षमस्व! देर आए, दुरूस्त आए! आता पटापट प्रवेशिका येऊ द्या, मोजकेच दिवस उरले आहेत! Happy
आतापर्यंत आलेल्या प्रवेशिका या बदलांमुळे बाद होणार नाहीत याची नोंद घ्यावी. सहभागींनी आणखी एकेक प्रवेशिका द्यायचा प्रयत्न करावा. धन्यवाद.

थोडक्यात, जे वापरलेत तेच घटक वापरुन, जे बदलायला सांगितलेत तेच घटक बदलुन, तुम्हाला जी हवी ती शाकाहारी पाकृ करा.

धन्यवाद संयोजक. मुळ नियमांमुळे मोदकाच्या जागी मोदकच येत होते. पण आता बदललेल्या नियमांमुळे डोकेबाजांना भरपुर वाव आहे.

भरत, तुमचे इमले घ्या परत बांधायला.

Pages