अंजीर बर्फी

Submitted by पूनम on 11 February, 2009 - 05:48
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

जुन्या मायबोलीवर सुक्या अंजीराच्या कृति आहेत, अंजीर फळाच्या नाही सापडल्या, म्हणून मीच प्रयोग केला Happy

अर्धा किलो तयार अंजीर (साधारण २ वाट्या गर निघेल इतके)
पाऊण वाटी साखर
एक वाटी मिल्कपावडर
पाऊण वाटी काजूपावडर
अर्धी वाटी दूध
सजावटीकरता पिस्ता आणि बदाम काप

क्रमवार पाककृती: 

१. अंजीर धुवून, त्याचे साल आणि देठ काढून गर काढून घेणे. (हा गर दोन वाट्या आहे असे गृहित धरून बाकी पदार्थांचे प्रमाण दिले आहे)

२. या गरामध्ये पाऊण वाटी साखरेमधली २ चमचे साखर घालून मिश्रण एकत्र करून नुसतेच ठेवायचे १० मिनिटे. गराला थोडे पाणी सुटते. १० मिनिटानी हे मिश्रण मंद गॅसवर ठेवायचे. पाणी उकळेल. गर शिजल्यावर, गराची थोडी चव बघायची. कधीकधी अंजीराच्या बीया कडू निघू शकतात. त्यासाठी आधी चव बघून घ्यायची (ही टीप mmm333 यांची)

३. मग उरलेली साखर आणि थोडे दूध घालून घोटायचे. साय असेल तर आत्ताच घालायची (साय ऐच्छिक). दूध आटले की आधी मिल्कपावडर घालायची. मिल्कपावडर घातली की मिश्रण आळेल, पण बर्‍यापैकी सैलच असते. मग अंदाज घेऊन काजू पावडर घालायची.

४. भरपूर आटले की साधारण घट्ट गोळा होतो. (इतर वड्यांसारखे हे मिश्रण कडेने सुटत नाही)

५. ताटात पसरून वड्या पाडण्याऐवजी, एखाद्या खोल भांड्यात मिश्रण उतरवावे. बर्फी जाड पडायला हवी. गार झाल्यावर पिस्ता-बदामाने सजवावे.

वाढणी/प्रमाण: 
साधारण २० वड्या होतील
अधिक टिपा: 

१. ही बर्फी नारळाच्या बर्फीसारखी खुटखुटी होत नाही, मऊसर रहाते- मलई बर्फीसारखी.

२. खूप वेळ गॅसवर ठेवायचे असल्याने जाड बुडाचे भांडे घ्यावे.

३. अंजीराचा सुरेख वास येतो. त्यामुळे शक्यतो कोणताही इसेन्स, वेलदोडे घालू नयेत.

माहितीचा स्रोत: 
माझा (बर्‍यापैकी जमलेला) प्रयोग
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंजीर घालून शिरा केलाय, आता बर्फी करुन बघेन.

अरे वा, ओल्या अंजिराचे पण काहितरी करता येते तर. मला अंजिरे खुपच आवडतात. पण एकावेळी किती खाणार !

सहीय! खूप दिवसांपासून अशी रेसीपी शोधत होते.

मस्तच. ट्राय करुन बघते.
----------------------
एवढंच ना!

पूनम, तू एक चुक केलीस, फोटो नाही टाकलास. त्यामुळे काहीतरी राहून गेले असे वाटले Happy

असो.. कृती छान!

अंजीरं बदललीस का गं ? 'बदलून' असं दिसतंय म्हणून विचारलं Happy

धन्स सगळ्यांना. नक्कीच करून बघा, मस्तच होते.

बी, फोटो काढायला विसरले. (शिवाय, फोटोवरून नवीन चर्चा.. त्यामुळे नकोच तो :)) तुम्ही कोणी केलीत, तर काढा फोटो न् टाका इकडे..

मिलिंदा, धागा सार्वजनिक केला, इतकाच बदल केलाय Happy
-----------------------------------
Excitement. Routine. Boring.

अंजीराचे साल कसे काढलेस पूनम?

पूनम, मी तुझ्या कृतीने करून पाहिली ही अंजीर बर्फी.. फक्त बदल एवढाच केला की दोन वाट्या गराला एक वाटी साखर आणि एक वाटी काजू पावडर घेतली. बाकी प्रमाण तसंच... मस्त खुटखुटीत झाली बर्फी. ताज्या अंजिरांचा खुप मस्त वास येतो ह्या बर्फीला. अगदी विकतची अंजीर कतली असते अगदी तशीच चव लागली ह्या वड्यांची...

mmm333, तुझी टीप पण अगदी भारी आहे हां... मी असेच अंजीर खीर आणि शिर्‍यात पण वापरले. एकदम मस्त चव आली.

काय सांगते मंजू ...अंजीर शिर्‍यात व खिरीत....?
आता मी नाही सोडणार......करूनच बघणार!

mmm3 - अंजीर शिर्‍यात मस्तच लागत. वर जर पेढे, बर्फी असल्यास (घरात काही कारणाने उरलेली) तर बहारच (स्वानुभव, केलाय आणी खाल्ला - खिलवलाय). अननस शिजवुन पण शिर्‍यात घातल तर मस्त लागतो पईन्यापल शिरा (मी केला नाही अजुन पण खाल्लाय).

अंजीर सध्याच्या मौसमात मिळतात का? मिळत असतील तर छान.. ह्याची प्रिन्ट आउट काढून मातोश्रींना दिली की अंजीराची बर्फी मिळायची प्रोबॅबिलिटी बरीच वाढेल..

वर मी काहीतरी विचारले आहे त्याची कृपया नोंद घ्यावी.

अजून एक -- अंजीराचा गर कसा काढतात.

अंजीर आणि उंबराचं फळ यात काही फरक आहे का?

असो..
- बी

बी, खरेच का रे तुला कळत नाही अंजीराचा गर कसा काढावा? तसेच आहे समजून सांगते, फक्त वरचे बोंड कापून एक चमचा घे नी काढ गर. फळ एकदम नाजूक असते तेव्हा तू रागात चमचा घातलास तर सालच येइल.

पूनम, तू सांग ग कसा गर काढलास ते बीला. नाहीतर अजून प्रश्ण येतील बी चे.
बाकी कृती छानच. आणि डरनेका कायको फोटो टाकनेको? कोणी काय का म्हणे ना.. तो भेंडीचा फोटो लोकांना लक्षात का असेना. Happy
फोटो बघून मजा येते गं खरेच..

बी, आलास तू? बरे झाले. मी तुला विपू मध्ये मेसेज टाकणार होते. दुसरी पद्धत सांगते,अरे काय कर चांगली बाजारून फळ आण. आता प्रत्य्के फळाला किंचीत स्लीट दे.(जसे टोमॅटोला देतो ना साल काढायला) एका गरम पाण्यात टाक नी २ सेंकदात काढ. ती स्लीट पुर्ण ओढून काढ. सगळी साल नीट निघेल.
उंबर फळ वेगळे रे...

अंजीराची साल काढणे तसे सोपे आहे कि, देठ चाकूने अर्धवट कापून एका बाजूला ओढला कि त्याची साल निघते. मुंबईतील सगळे ज्युसवाले तसेच करतात.
अंजिर हे त्या कूळातले जरा पुढारलेले फळ. त्या कूळातील झाडाना, म्हणजे उंबर, वड, पिंपळ फूले येत नाहीत. त्याला थेट फळेच लागतात. पण आपण ज्याला फळे समजतो ती फूले असतात. त्याच्या आत छोटी छोटी फुले असतात. या फळाना एक छोटेसे छिद्र असते. आणि त्या छिद्रातूनच किटक अंडी घालतात. या छिद्राच्या तोंडाशी नरफुले असतात आणि आत मादीफुले. या दोघांच्या फूलण्याचा काळ वेगळा असतो, त्यामुळे स्वपरागीभवन टळते. या किटकांशिवाय या झाडात बीजधारणा होणे शक्यच नाही.
तसेच वड पिंपळ आणि उंबरासारखी झाडे, रुजण्यासाठी कावळ्यासारख्या पक्षाचीही गरज असते. त्यांच्या पोटाची ऊब मिळाल्याशिवाय या बिया रुजत नाहीत. म्हणून शक्यतो अनेक फळे झाडाखाली पडली असली तरी वडा पिंपळाखाली, त्याची रोपे नसतात. ती असतात जिथे या पक्ष्यांची विष्ठा पडलेली असते तिथेच.
अंजीराची लागवड मात्र कलमाने करतात. तसेच चांगली फलधारणा होण्यासाठी झाडाना चाकूने जखमा कराव्या लागतात. लागवडीखालची झाडे सहसा फार वाढू दिली जात नाहीत. ( आपल्या मायबोलीकर अजय, च्या सातार्‍याच्या घरी, खुप वाढलेले आणि भरपूर फळे लागलेले अंजिराचे झाड आहे )
अंजिराच्या बिया काढायची गरज नसते.
उंबर मात्र अवश्य खावे. अगदी किटक असले तरी फुंकुन खावे. उंबराच्या झाडाखालुन उंबर खाल्ल्याशिवाय जाऊ नये असा संकेत आहे. उंबर खाल्ल्याने बराच वेळ तहान वा भूक लागत नाही. वनवासी लोकात, मुलगी देताना, सासरच्या घराजवळ उंबराचे झाड आहे ना याची खात्री केली जाते. सासरी जेवायला मिळाले नाही तरी, लेक उपाशी राहणार नाही, अशी अपेक्षा ( हा उल्लेख डॉ. राणी बंग यांच्या गोईण मधला )
चोर्ला घाटात, एका अवघड जागी भरपूर उंबरे लागलेले झाड होते. आणि त्या झाडावर चढून, गिर्‍याने माझ्यासाठी भरपूर उंबरे काढली होती.
उंबराच्या पानावर देखील गाठी असतात, आणि त्या गाठीत जिवंत किटक असतात, उंबराचे अनेक
औषधी उपयोग आहेत. तसेच उंबराजवळ विहिर खणल्यास तिला हमखास पाणी लागते, असा संकेतही आहे.
आणि उंबरावरून उंबरठा हे खरेच आहे.
उंबर आपल्याकडे पहिल्यापासून आहे. अंजिर नंतर आले. त्यामूळे आदम आणि इव्ह यांच्या सारखा पौराणिक उल्लेख आपल्याकडे नाही.

उंबर मात्र भावगीतातही आहे.
उंबरामधले किडेमकोडे, उंबरी करती लिला,
जग हे बंदी:शाला, जग हे बंदी:शाला ( सूधीर फडके )

बघा एका बी पायी, किती खरडलं मी ते.

कोणी अननस राईस केलाय का? मस्त होतो.

पूनम, आज केली मी ही बर्फी.
तुझ्या कृतीने केली पण आणि नाही पण. काल तुझी कृती वाचली पण वेळच झाला नाही करायला. आज अंजीरं सोलुन ठेवली आणि काहीतरी बाकीचीच कामं मधे आली त्यामुळे आठवेल तशी केली .... Happy

कंडेन्स्ड मिल्क, काजुची पुड, साखर आणि अंजीरं हे वापरले.

ओल्या अंजीराच्या कृतीसाठी धन्यवाद Happy
.
anjir barphi.jpg

वा, कृती मस्त, एकदम युनिक आणि आरतीचा फोटोही छान !
ओले अंजीर नुसतेच आवडीने खाल्ले जातात. त्याचा शिरा आणि वड्या होत असतील असं डोक्यात सुद्धा आलं नाही कधी. रेसिपीसाठी म्हणजे सुके अंजीरच माहिती.

पूनम हाच तो ना तुझा सुप्रसिद्ध अंजिर बर्फी बा.फ. Wink

तब्बल पाच वर्षांनी नेते लोकांसारखा वर आला की Happy

काय मस्त फोटो आहे आरती.:स्मित: धन्यवाद तुला, या वड्यान्च्या निमीत्ताने मला पूनमची रेसेपी मिळाली. पूनमला पण धन्यवाद.:स्मित:

मंजूडी,
उकललेल्या म्हणजे अश्याच ना ?

barphi suti.jpg

काजुची पुड करताना काही तुकडे तसेच राहिले. पण ते मधे मधे आलेले मस्त लागत आहेत. पुढच्यावेळी मुद्दाम थोडे जास्त घालीन Happy

धन्यवाद मंजूडी Happy

पण तु म्हणतेस तशी माझी खुट्खुटीत बर्फी नाही झाली. चितळेंच्या आंबा बर्फीपेक्षा थोडी मऊ म्हणु शकतेस.

Pages