उरलेल्या अन्नाचा सदूपयोग -१ (भाताचे पदार्थ)

Submitted by प्राप्ती on 24 August, 2015 - 16:46

'पानात वाढलंय तेवढं पूर्ण संपवायचं नाहीतर देवबाप्पा रागवेल' असं म्हणून आजोबा नेहेमी दम भरायचे आणि आम्हीही मग निमूट पानातलं सगळं नेमानं संपवायचं. एकतर चौरस आहार मिळावा म्हणून सगळे पदार्थ पोटात जाणे आवश्यक आणि दुसरे अन्न वाया जाऊ देऊ नये हा उद्देश. आपल्याकडे बालपणापासून देण्यात आलेले असे संस्कार त्यात आता तर दाल-आटे का भाव पण एवढे वाढलेत कि अन्न टाकून देणे न खिशाला परवडणारे ना मनाला पटणारे. पण घरात जरा मोठा परिवार असला कि अन्न उरण्याची समस्या मोठी असते. बरेचदा पाहुणे येऊन गेले कि, एखादा समारंभ आटोपल्यावर , लहान-मोठा कार्यक्रम झाल्यास किंवा एखाद्या दिवशी नेमकी दोन माणसं बाहेरून जेवून येतात आणि अन्न उरतं. अश्या उरलेल्या अन्नाचा वाया न जाऊ देता योग्य नायनाट लावणे किंवा सदूपयोग करून घेणे कौशल्याचे काम आहे. एवीतेवी हे प्रत्येक गृहिणीला अनुभवाने छान येत असतं. म्हणूनच आपण आपल्या उरलेल्या अन्नाच्या रेसिपीज एकमेकींशी शेअर करूया. मला माहिती असलेल्या आणि नेहेमी करत असलेल्या रेसिपी खालील प्रमाणे,

१) उरलेला भात किंवा खिचडी :-

* फोडणीचा भात :- हा घराघरात बनणारा पदार्थ असल्याने त्याबद्दल फारसे लिहिण्याची गरज वाटत नाही. पण उरलेल्या भातातून साधा कांदा-मिरची घालून फोडणी घातलेला, लेमन राइस, कर्ड राईस, दक्षिणेत करतात तसा चिवडा फोडणी घालतात तसा डाळ्या, शेंगदाणे गोडलिंब(कडीपत्ता) घालून केलेला भात, रावण भात, मेतकुट भात, चिंचेचा कोळ घालून केलेला फोडणीचा भात, मसाले भात, भाज्या घालून केलेला पुलाव असा कुठलाही भात करता येतो. अपनी अपनी चोइस.

* पराठे :- उरलेला भात किंवा खिचडी परातीत काढून त्यात कणिक(पाणी न घालता पीठ भिजवायला आवश्यक आहे तेवढी), ओवा, तिखट, मीठ, धने-जिरं पूड आणि आवडेल तो मसाला घालून,कोथिंबीर किंवा कसुरी मेथी पेरून हाताने भात mash करत पोळ्यांना भिजवतो तसे भिजवायचे. मग मध्ये तेल लावून त्रिकोणी किंवा साधे पराठे लाटून तव्यावर दोन्ही बाजूने तेल सोडून छान खरपूस भाजून घ्यायचे. लोणची, चटणी, सॉस किंवा अगदी असाच रोल करून मुलांना वाढायचे अतिशय चविष्ट मुलांना आवडणारा पराठा तयार.

* राईसबॉल :- उरलेला भात किंवा खिचडी परातीत घेऊन त्यात हवे ते सगळे मसाले टाकायचे किंवा नुसतेच थोडे मीठ घालून तांदळाच पीठ घालून mash करून भिजवून घ्यायचे. सारणासाठी दोन बटाटे उकडून घेऊन त्यात आवडेल तेवढे चीज किसून घालायचे थोड तिखट अन मीठ घालून कोथिंबीर घालून मिक्स करायचे. एका पसरट वाटीत मैदा आणि कॉर्नफ्लोर घालून मिश्रण तयार करायचे. कढाईत तेल ओतून ते गरम करायला ठेवायचे. आता हाताला पाणी लावून लाडवाच्या आकाराचे भाताचे गोल गोळे तयार करायचे ते तयार करतांना त्यात फक्त एक टेबलस्पून सारण भरायचं. सगळे गोळे तयार झालेत कि मैद्याच्या मिश्रणात बुडवून तेलातून ब्राउन होईपर्यंत तळून काढायचे. अंडी खाणाऱ्यांनी मैदा मिश्रणाऐवजी फेटलेली अंडी वापरली तरी चालेल. हे राईसबॉल आवडेल त्या सॉस बरोबर खायला द्या किंवा मुलांच्या डब्यात देत येतील.

* भाताचे कानुले :- भात परातीत घेऊन त्यात तांदळाचे पीठ, अर्धा वाटी तीळ, मीठ थोडी साखर, लिंबाचा रस घालून पीठ भिजवतात तसे भिजवायचे. मग हाताला तेल लावून कुरकुरे असतात तसे लाम्बोळके (किंवा आवडेल त्या आकारात) कानुले तयार करायचे हे ईडली पात्रातून दहा मिनिट वाफवून घ्यायचे. त्यानंतर कढई gas वर ठेवून त्यात जिरं मोहरीची फोडणी करून त्यात हे कानुले टाकायचे आणि छान खरपूस होईस्तोर परतवून घ्यायचे. वाढतांना वरून कोथिंबीर आणि किसलेले खोबरे पेरून द्यायचे.

* कटलेट :- भात एका पसरट भांड्यात घेऊन त्यात घरी असतील नसतील तेवढ्या सगळ्या भाज्या (कोबी, गाजर, फुलकोभी, बीट, दुधी, भोपळा, पालक) धुऊन किसून घालायच्या, न्युट्रीला चंक्स उकळत्या पाण्यातून काढून बारीक करून घालायचा, दोन उकडलेले बटाटे mash करून, हे सगळे जिन्नस एकजीव होईपर्यंत मिळवायचे आणि कटलेटला आकार देऊन ब्रेडक्रम्स किंवा रव्यात घोळवून ब्राऊन रंगात तळून काढायचे.

उरलेल्या भाताचे सगळ्यांना आवडेल असे चविष्ट पदार्थ करून बघा एकदा.

पुढल्या पोष्टीत उरलेल्या पोळ्यांपासून तयार करता येणारे विविध पदार्थ बघूया.

त्यापुढे बघणार आहोत

उरलेली भाजी

उसळी

शिरा

मिठाई

चिवडा-शेव

इत्यादी उरलेल्या पदार्थांपासून तयार होणारे नवे पदार्थ.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच!!

कृपया, शिळ्या अन्नाची आहारमूल्ये लक्षात घेणार का? पानांत टाकू नका हे जसे महत्त्वाचे तितकेच ताजे अन्न खाणे, चुकून जास्त झाले असेल तर indirect टाकण्याऐवजी direct टाकणे केव्हाही चांगले. सेवाभावी संस्था आहेत ज्या सण-समारंभाला उरलेले अन्न घेऊन जातात.

नका हो शिळ खाऊ.. Sad हे.मा.वै.म. इकडे गुजरातेत तर सकाळचे अन्न संध्याकाळी झाडूवाली घेऊन जाते.

.

राजसी-शिळे म्हणजे अगदिच नै हो. सकाळचे रात्री किंवा फारफार तर रात्रीचे सकाळी..तेही फ्रीज वगैरे मध्ये ठेऊन साठवलेलं असतं. 2 च वाट्या भात उरला असेल तर कूणाला देणार आणी नासला नसेल तर का फेकायचा अशी वेळ येते त्यासाठी हे सर्व

2 च वाट्या भात उरला असेल तर कूणाला देणार आणी नासला नसेल तर का फेकायचा अशी वेळ येते>> मूळात अशी वेळ 'वारंवार' येऊ देऊ नका एवढंच म्हणणं आहे.
शिळं संपवायचं म्हणून त्यात अधिकच्या तेल-तिखट-मसाल्यांची भर पडते. त्यापेक्षा शक्यतोवर जेवढं संपतं तेवढंच करण्याची सवय लावून घेणे चांगले.

शक्यतोवर जेवढं संपतं तेवढंच करण्याची सवय लावून घेणे चांगले. >>
बरोबर. पण एकत्र कुटुंबात नाही होत असं. १-२ पोळया ,१ वाटी आमटी /भात असं थोडफार उरतच.
डाळी, भाज्या, कांदा यांचे वाढते भाव पहाता टाकून द्यायची इच्छा होत नाही. मोलकरीण नेतातच असे नाही
पूर्वी माझी आई, साबा दारात येणार्‍या गायीला घालायच्या. आता शहरात गायी, जनावरे पण नसतात.
सारखचं अन्न द्यायला रोजच्या घाईत कोणाला शोधत बसायचे?

वरच्या पाकृ कधीतरी करायला नक्कीच चांगला ऑप्शन आहे.
काही विल्हेवाटीचे उपाय असतील तर ( बायो-खत सोडून) तर जरूर शेअर करा.

मंजूडी-तशीच सवयअसते हो सर्वांनांं.
अनूभवाने आपलं आपलं कळतं सगळ्यांना. वर काही विशेष प्रसंग लिहीलेत बघा असे प्रसंग क्वचीतच येेतात सगळ्यांकडे ही पोस्ट त्यासाठी आहे.

शिळं अन्न शक्यतो खाऊ नये हे खरेच. तरीही
पण एकत्र कुटुंबात नाही होत असं. > अगदी ! शिवाय असं काही केल्यावर मिळणारे टोमणे हे काही वेळा जास्त अपायकारक असतात.

मला आवडला हा धागा.
इथे फक्त रेसीपींची चर्चा करूयात का? शिळं अन्न खावं की खाऊ नये यासाठी दुसरा धागा आहे बहुदा Happy
स्पॉक , प्लिज इथे तरी नको हे असले प्रतिसाद!

आमच्या शेजारच्या काकू शिळ्या भातापासून/ उपिटापासून वडे सुद्धा करतात Happy रेसीपी अर्थातच मला माहीत नाही

उरलेली भाजी वा आमटी चांगली असेल आणि नुसती खायला लोक कंटाळा करणार असतील तर चक्क ज्वारीच्या पिठात वा भाजणीत मिक्स करायचे. कांदा बारीक चिरून आणि तिखट, मीठ वगैरे. तेल भाजीत/ आमटीत असतेच त्यामुळे जास्तीचे नाही घालायचे. छान मळून त्याची थालिपिठे लावायची.
याचे नाव 'उरसुर हेतेढकल थालिपीठ'

शिळ्या भातापासून करण्याचा 'आंबूसघार्‍या' नावाचा एक पदार्थ आहे.
बी या एका आयडीने त्या पदार्थाची वर्तमानपत्रातली की साप्ताहिकातली लिंक कुठल्याश्या चर्चेत दिली होती. आणि त्यावरून मनुस्विनी या आयडीने तो पदार्थ करून इथे त्याची पाककृती दिली होती.

हे ऐकीव आहे. खरंच असं करतात का ते माहित नाही.
आमटी भात मुद्दामून जास्त करायचा. छान कालवायचा. किंचित जास्तीचे मीठ घालायचे. आणि त्याचे बारीक घास करून कडक उन्हात सडकून वाळवायचे. वाळून पार कडकडीत झालेत असं बघून मग कोरड्या डब्यात, कोरड्या हाताने भरून ठेवायचे. अडीनडीला पटकन तळण म्हणून किंवा थोडा वेळ भिजवून ठेवून भाजी म्हणून करायलाही वापरता येतात हे सांडगे सदृश घास.

धन्यवाद स्पॉक Happy

नी, आम्ही हे थालिपिठ करतो आणि त्याची चव नुसत्या थालिपिठापेक्षा कैक पटीने ऑसम असते.
उरलेल्या भाताचा आमच्याकडे नेहमीच पुलाव होतो. पुलाव म्हणजे फ्लॉवर, मटार,बटाटा,फरसबी वगैरे भाज्या चिरायच्या.फोडणीला टाकायच्या,तिखटमिठ आणि उरलेला भात.
सगळ्या भाज्या पोटात जातात. भाताचे एचव ऑसम होते.

मला भाताचे वडे आवडत नाहीत.

ते सांडगे आमच्या इथे बरेच जण करतात. तळल्यावर चांगले लागतात पण मला हायजेनिक वाटत नाहीत सो मी नाही खात.

उरसुर हेतेढकल थालिपीठ हे माझेही पेट आहे एकदम पण सध्या थापणे क्रिया जमत नसल्याने काही दिवस बंद. Sad

Pages