उरलेल्या अन्नाचा सदूपयोग -१ (भाताचे पदार्थ)

Submitted by प्राप्ती on 24 August, 2015 - 16:46

'पानात वाढलंय तेवढं पूर्ण संपवायचं नाहीतर देवबाप्पा रागवेल' असं म्हणून आजोबा नेहेमी दम भरायचे आणि आम्हीही मग निमूट पानातलं सगळं नेमानं संपवायचं. एकतर चौरस आहार मिळावा म्हणून सगळे पदार्थ पोटात जाणे आवश्यक आणि दुसरे अन्न वाया जाऊ देऊ नये हा उद्देश. आपल्याकडे बालपणापासून देण्यात आलेले असे संस्कार त्यात आता तर दाल-आटे का भाव पण एवढे वाढलेत कि अन्न टाकून देणे न खिशाला परवडणारे ना मनाला पटणारे. पण घरात जरा मोठा परिवार असला कि अन्न उरण्याची समस्या मोठी असते. बरेचदा पाहुणे येऊन गेले कि, एखादा समारंभ आटोपल्यावर , लहान-मोठा कार्यक्रम झाल्यास किंवा एखाद्या दिवशी नेमकी दोन माणसं बाहेरून जेवून येतात आणि अन्न उरतं. अश्या उरलेल्या अन्नाचा वाया न जाऊ देता योग्य नायनाट लावणे किंवा सदूपयोग करून घेणे कौशल्याचे काम आहे. एवीतेवी हे प्रत्येक गृहिणीला अनुभवाने छान येत असतं. म्हणूनच आपण आपल्या उरलेल्या अन्नाच्या रेसिपीज एकमेकींशी शेअर करूया. मला माहिती असलेल्या आणि नेहेमी करत असलेल्या रेसिपी खालील प्रमाणे,

१) उरलेला भात किंवा खिचडी :-

* फोडणीचा भात :- हा घराघरात बनणारा पदार्थ असल्याने त्याबद्दल फारसे लिहिण्याची गरज वाटत नाही. पण उरलेल्या भातातून साधा कांदा-मिरची घालून फोडणी घातलेला, लेमन राइस, कर्ड राईस, दक्षिणेत करतात तसा चिवडा फोडणी घालतात तसा डाळ्या, शेंगदाणे गोडलिंब(कडीपत्ता) घालून केलेला भात, रावण भात, मेतकुट भात, चिंचेचा कोळ घालून केलेला फोडणीचा भात, मसाले भात, भाज्या घालून केलेला पुलाव असा कुठलाही भात करता येतो. अपनी अपनी चोइस.

* पराठे :- उरलेला भात किंवा खिचडी परातीत काढून त्यात कणिक(पाणी न घालता पीठ भिजवायला आवश्यक आहे तेवढी), ओवा, तिखट, मीठ, धने-जिरं पूड आणि आवडेल तो मसाला घालून,कोथिंबीर किंवा कसुरी मेथी पेरून हाताने भात mash करत पोळ्यांना भिजवतो तसे भिजवायचे. मग मध्ये तेल लावून त्रिकोणी किंवा साधे पराठे लाटून तव्यावर दोन्ही बाजूने तेल सोडून छान खरपूस भाजून घ्यायचे. लोणची, चटणी, सॉस किंवा अगदी असाच रोल करून मुलांना वाढायचे अतिशय चविष्ट मुलांना आवडणारा पराठा तयार.

* राईसबॉल :- उरलेला भात किंवा खिचडी परातीत घेऊन त्यात हवे ते सगळे मसाले टाकायचे किंवा नुसतेच थोडे मीठ घालून तांदळाच पीठ घालून mash करून भिजवून घ्यायचे. सारणासाठी दोन बटाटे उकडून घेऊन त्यात आवडेल तेवढे चीज किसून घालायचे थोड तिखट अन मीठ घालून कोथिंबीर घालून मिक्स करायचे. एका पसरट वाटीत मैदा आणि कॉर्नफ्लोर घालून मिश्रण तयार करायचे. कढाईत तेल ओतून ते गरम करायला ठेवायचे. आता हाताला पाणी लावून लाडवाच्या आकाराचे भाताचे गोल गोळे तयार करायचे ते तयार करतांना त्यात फक्त एक टेबलस्पून सारण भरायचं. सगळे गोळे तयार झालेत कि मैद्याच्या मिश्रणात बुडवून तेलातून ब्राउन होईपर्यंत तळून काढायचे. अंडी खाणाऱ्यांनी मैदा मिश्रणाऐवजी फेटलेली अंडी वापरली तरी चालेल. हे राईसबॉल आवडेल त्या सॉस बरोबर खायला द्या किंवा मुलांच्या डब्यात देत येतील.

* भाताचे कानुले :- भात परातीत घेऊन त्यात तांदळाचे पीठ, अर्धा वाटी तीळ, मीठ थोडी साखर, लिंबाचा रस घालून पीठ भिजवतात तसे भिजवायचे. मग हाताला तेल लावून कुरकुरे असतात तसे लाम्बोळके (किंवा आवडेल त्या आकारात) कानुले तयार करायचे हे ईडली पात्रातून दहा मिनिट वाफवून घ्यायचे. त्यानंतर कढई gas वर ठेवून त्यात जिरं मोहरीची फोडणी करून त्यात हे कानुले टाकायचे आणि छान खरपूस होईस्तोर परतवून घ्यायचे. वाढतांना वरून कोथिंबीर आणि किसलेले खोबरे पेरून द्यायचे.

* कटलेट :- भात एका पसरट भांड्यात घेऊन त्यात घरी असतील नसतील तेवढ्या सगळ्या भाज्या (कोबी, गाजर, फुलकोभी, बीट, दुधी, भोपळा, पालक) धुऊन किसून घालायच्या, न्युट्रीला चंक्स उकळत्या पाण्यातून काढून बारीक करून घालायचा, दोन उकडलेले बटाटे mash करून, हे सगळे जिन्नस एकजीव होईपर्यंत मिळवायचे आणि कटलेटला आकार देऊन ब्रेडक्रम्स किंवा रव्यात घोळवून ब्राऊन रंगात तळून काढायचे.

उरलेल्या भाताचे सगळ्यांना आवडेल असे चविष्ट पदार्थ करून बघा एकदा.

पुढल्या पोष्टीत उरलेल्या पोळ्यांपासून तयार करता येणारे विविध पदार्थ बघूया.

त्यापुढे बघणार आहोत

उरलेली भाजी

उसळी

शिरा

मिठाई

चिवडा-शेव

इत्यादी उरलेल्या पदार्थांपासून तयार होणारे नवे पदार्थ.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे ऐकीव आहे. खरंच असं करतात का ते माहित नाही.
आमटी भात मुद्दामून जास्त करायचा. छान कालवायचा. किंचित जास्तीचे मीठ घालायचे. आणि त्याचे बारीक घास करून कडक उन्हात सडकून वाळवायचे. वाळून पार कडकडीत झालेत असं बघून मग कोरड्या डब्यात, कोरड्या हाताने भरून ठेवायचे. अडीनडीला पटकन तळण म्हणून किंवा थोडा वेळ भिजवून ठेवून भाजी म्हणून करायलाही वापरता येतात हे सांडगे सदृश घास.
----------------------------
आम्ही करतो भाताचे सांडगे
पण आमटी नाही घालत
उरलेल्या भातात डाळीच पीठ ( बेसन) ,लाल तिखट,हळद ,मीठ ,तीळ आणि ओवा घालून थोडस तेल घालायचं आणि छोटे घास करून उन्हात कडक वाळवायचे
तळून खायचे मस्त लागतात चवीला

मस्त की मनरंग.
मी भात मुद्दाम उरवते कारण फोचाभा मला प्रचंड आवडतो. सांडगे वाळवणे तेही मुंबईत हे शक्यच नाहीये आणि एवढी उस्तवार करणे माझ्यापलिकडचे आहे. Happy

आमच्याकडे उरलेल्या पोळीचे लाडू असतात कधीतरी.
पोळीच्या चुर्‍याचा उपमाही चांगला लागतो.

उरलेल्या भाताच्या चकल्याही चांगल्या लागतात.

उन्हात वाळवण शक्य झाल नाही तर ओव्हनमध्ये जमू शकेल का ?

आमच्याकडे ओव्हन नाहीये त्यामुळे मला नक्की माहिती नाही

उरलेल्या भातात दही घालून चवीपुरत मीठ ,साखर घालून मिक्स करायचं मग त्यात मोहरी ,मिरच्या ,कढीपत्ता ,शेंगदाणे ,हळद आणि हिंगाची फोडणी द्यायची ,वरून थोडी कोथिंबीर
खूप टेस्टी लागतो दहीभात

प्राप्ती, छान धागा..!
मी उरलेल्या भाताचा नेहमी फोडणी चा भात करते. कटलेट आणि राइस बाॅल मस्त.. आमच्या कडे तर रात्री शक्यतो खिचडी असते.
दुसर्‍या दिवशी शिळी खिचडी गरम करून खायला खूप छान लागते.
मनुजा,यांनी सांगितल्याप्रमाणे दही भात पण छान. फक्त त्यात हळद,साखर आणि शेंगदाणे न टाकता मी लाल सुक्या मिरच्या टाकते.
शिळ्या पोळ्यांचा तिखट चुरमा ही आवडतो. ३-४ पोळ्या उरलेल्या असतील तर बनवते.
नीधप यांनी सांगितलेले थालीपीठ ही उरलेल्या भाज्या आणि वरण संपवण्यासाठी नेहमीच करते.

तुमच्या पुढील रेसिपीज साठी उत्सुक.!

.

.

समारंभाला केलेले जेवण उरले तर ठिक, पण रोजच्या जेवणाचा अंदाज हवाच. आणि तसेही आयत्यावेळी कुणी जेवायला आले तर कूकरमधे वरणभात १५/२० मिनिटात होऊ शकतो. आयत्यावेळी करता येतील असे अनेक पदार्थ असतात. कधी कधी काही पदार्थांची तयारीही करुन ठेवता येते.

शिळ्या अन्नाचा वापर करतानअ, परत ते आणखी तेल वापरून तळा.. वगैरे कल्पना मला पटत नाहीत.

साबा , उरलेल्ल्या भातात थोडे बेसन , थोडे कणिक , मिरची , कान्दा मीठ वगैरे घालून पातळ भिजवून धिरड्यासारखी घालतात.

माझा ऑटाफे - भातात इटालियन हर्ब्स , मीठ घालून सारखा करून घ्यावा आणि चमचाभर बटर टाकून एक मिनिट मावेत ढकलायचा .
पाहिजेतर सोबत पापड .

समारंभाला केलेले जेवण उरले तर ठिक, पण रोजच्या जेवणाचा अंदाज हवाच. आणि तसेही आयत्यावेळी कुणी जेवायला आले तर कूकरमधे वरणभात १५/२० मिनिटात होऊ शकतो. >> आमच्या अडीच माणसांच्या स्वयंपाकात ह्याआधी शिळे कधी उरले होते हे आठवावे लागेल इतक्या क्वचित अन्न उरते. फोडणीची पोळी, पोळीचा लाडू खायला मुद्दाम जास्त पोळ्या करुन आम्ही त्या उरवतो.

पण तीच तीनाची पाच माणसे झाली की थोडे तरी अन्न उरतेच. करतानाच कमी पडायला नको ह्या धास्तीने थोडे जास्त केले जाणे, एखाद्याच्या नावडीची भाजी असेल तर त्याने ती कमी खाणे / न खाणे, दुसरेच काहीतरी खायची लहर येणे आणि त्यावर आपले नियंत्रण नसणे, चार लोकं गप्पा मारत एकत्र जेवताना कमी-जास्त खाल्ले जाणे अशा गोष्टी घडतात. पोळ्या विचारुन तरी करता येतात पण भाताचा अंदाज बरेचदा कमीजास्त होतो. शिवाय पोळ्यांना बाई असेल तर ती ठराविक पोळ्या लाटून जाते आणि मग त्या उरतात असा अनुभव आहे. त्यामुळे पाचाऐवजी दहा माणसांचे जेवण होण्याइतका अंदाज चुकू नये हे बरोबर असले तरी थोडेफार शिळे उरणे न टाळता येण्याजोगे आहे.

आपण खाणार नसलेले शिळे अन्न मोलकरणीला देऊ नये ह्याच्याशी सहमत. आमच्याकडे ओला कचरा वेगळा काढून त्याचे खत बनवत असल्याने ते अन्न सत्कारणी लागल्याचे समाधान आहे. पण ते नसते तरी मी फेकलेच असते ( परदेशात राहताना कधीतरी फेकावे लागलेले आहेही ! )

थालिपीठं, फो भा, फो पो, पो ला वगैरे यशस्वी कलाकार. वरची कानुल्यांची कृती वेगळी आहे. एकदा त्यासाठी जास्त भात करायला हवा Happy

गोड आवडत असल्याने कधी चुकुन भात उरला तर त्याची खीर बनवते. ड्रायफ्रुटस घालून थंडगार खिर यम्मी लागते. Happy
वरण उरल तर त्याचे दुसर्‍या दिवशी सकाळी पराठे / थालीपीठाची भाजणी असेल तर थालीपीठ बनवते. किंवा वरणात बेसन घालून कांदा भजी मस्त होतात.

आमच्या अडीच माणसांच्या स्वयंपाकात ह्याआधी शिळे कधी उरले होते हे आठवावे लागेल इतक्या क्वचित अन्न उरते. फोडणीची पोळी, पोळीचा लाडू खायला मुद्दाम जास्त पोळ्या करुन आम्ही त्या उरवतो.>>>> अगदी महिनोंनमहीने असेच होत असते. पण कधीतरी अन्न उरलंच तर ... ची ही सोय आहे. आणि कधीतरि म्हणुन आपण बाहेरचा समोसा, पिझ्झा, बर्गर एखादवेळी चालवून घेतोच ना .. मग घरचा उरलेला एखादा पदार्थ तोही एखादवेळी अश्या पध्धतीने चालवून घ्यायला काय हरकत आहे ?

आम्ही खदखदया (काहीजण खुदखुद्या म्हणतात) भात पण करतो शिळ्या भाताचा. तूप जिऱ्याची फोडणी करायची, कडीपत्ता टाकायचा, मिरच्या टाकायच्या. लसूण आणि आल्याचे तुकडे, किंचित मेथीदाणे आवडत असल्यास. मग त्यात भात टाकून ताक आणि थोडं पाणी टाकायचं आणि मीठ घालायचं. मी ओवा आणि थोडी मिरपूड पण घालते.

थोड्या वेळाने भात खदखदला की बंद करायचा gas. वरून कोथिंबीर घालायची. साखर ऑप्शनल.

मला नाही वाटत हल्ली पुर्वीसारख अन्न शिळ होत कारण हल्ली जवळपास सर्वांकडेच फ्रिज असतो. आपण फ्रोजन फुड कितीदा खातो. तेही लॉजिकली शिळेच असते ना!!!. उलट त्यात केमीकल्स असतात आणखी अपाय पोचवायला. रात्रीचे संध्याकाळी आणि संध्याकाळचे सकाळी अन्न खाल्ले तर ते उलट चवीत मुरते फक्त कुठलेही अन्न उघडे पाघडे ठेवू नये. आणि शक्यतोवर थंड जागी जसे की फ्रिजमधे ठेवले तर ते नासत नाही. फ्रोजन फुड फ्रिजमधे ठेवल्यामुळे ते नासत नाही. त्यामुळे सांगण्याचे तात्पर्य म्हणजे हल्ली अन्न शिळे जरी असले तरी ते खाण्याइतपत चांगले असते.

हल्ली तर आठवड्याभराचा स्वैपाक करुन ठेवतात नोकरी करणारे जोडीदार आणि रोज एक एक डबा संपवतात.

आमच्याकडे वडिलांना बोकडाचं मटण मुद्दाम शिळं करून खायला आवडायचं. चव जास्त मुरल्याने खरंच चांगलं लागतं.

-गा.पै.

मला नाही वाटत हल्ली पुर्वीसारख अन्न शिळ होत कारण हल्ली जवळपास सर्वांकडेच फ्रिज असते. आपण फ्रोजन फुड कितीदा खातो. तेही शिळेच असते. उलट त्यात केमीकल्स असतात आणखी अपाय पोचवायला. रात्रीचे संध्याकाळी आणि संध्याकाळचे सकाळी अन्न खाल्ले तर ते उलट चवीत मुरते फक्त कुठलेही अन्न उघडे पाघडे ठेवू नये. आणि शक्यतोवर थंड जागी जसे की फ्रिजमधे ठेवले तर ते नासत नाही. फ्रोजन फुड फ्रिजमधे ठेवल्यामुळे ते नासत नाही. त्यामुळे सांगण्याचे तात्पर्य म्हणजे हल्ली अन्न शिळे जरी असले तरी ते खाण्याइतपत चांगले असते>>> मलाही असेच वाटते.

प्राप्ती, तुम्ही प्रत्येकाला स्पष्टीकरण का देताय? तुम्ही लिहायचं काम करा ना. ज्याला या बाफचा उपयोग होईलसा वाटतोय तो इथे येऊन वाचेल आणि प्रतिसाद देईल. इथे काहीजण शिळ्या अन्नाविषयी आपापले दृष्टीकोन मांडताहेत, म्हणजे ते तुम्हाला खोडून काढताहेत असा त्याचा अर्थ होत नाही ना?

इथे काहीजण शिळ्या अन्नाविषयी आपापले दृष्टीकोन मांडताहेत, म्हणजे ते तुम्हाला खोडून काढताहेत असा त्याचा अर्थ होत नाही ना?>>>>> अरेच्छा ! मी कधी काढला असा अर्थ. Uhoh आणि मी स्पष्टीकरण देत नाहीये हो दिनेशदांच्या पोस्टला रिस्पेक्ट म्हणून उत्तर दिलय आणि मुद्दा लक्षात आला महत्वाचा वाटला तो लिहिला. त्यात काय एवढं उगाच

म्हणजे ते तुम्हाला खोडून काढताहेत असा त्याचा अर्थ होत नाही ना? >>> खोडून काढणं बाजूला ! मी ह्या धाग्याच्या बाजूने दिनेशदांना उद्देशून पोस्ट लिहिलीय तरी माझी वाक्यं कोट केली आहेत !!

बी, वरी तांदळाच्या आंबूसघार्‍या छान आहेत. ही मनःस्विनीने लिहिलेली पारंपारीक आंबूसघार्‍यांची कृती. एकदा करुन बघायच्या आहेत.
तिनेच लिहिलेले शिळ्या भाताचे पकोडे / वडे

आमच्याकडे शिळ्या पोळ्या कुस्करुन त्यात उरलेली भाजी ओतून ते फोडणीत घालतात. त्याला आम्ही 'ढसका' म्हणतो.

माझ्या बालपणी तर आमच्याकडे केवढे शिळे उरत असायचे. आई रोज भाकर्‍याच करायची. सात भावंड म्हणून भरपुर स्वैपाक असायचा. आई रोज उन्हात भाकरीचे तुकडे सुकवायला ठेवायची. रविवार आला की पहाटे आम्ही बत्ता घेऊन भाकरीचे ते तुकडे बारीक कांडायचो. त्यात लांब चिरलेले दोन तीन कांदे आणि लाल शेंगदाण .. पिळलेले लिंबू असे सर्व एकजीव करुन मोठ्या कढईत फोडणी घालायचो. असे वाटायचेच नाही की जे खात आहोत ते शिळे आहे. एकदम खमंग चव लागायची. सगळे जण आतुरतेनी रविवार उजाडण्याची वाट बघायचे. सोबतील कधीकधी आई ताक पण ठेवायची.

आणि मी स्पष्टीकरण देत नाहीये हो दिनेशदांच्या पोस्टला रिस्पेक्ट म्हणून उत्तर दिलय>>> ओह्ह... ओके ओके! म्हणजे राजसी यांना आणि मला रिस्पेक्ट म्हणून तुम्ही उत्तर दिलंय. ओके!

सकुरा आमच्याकडेही एक म्हण आहे वर्‍हाडात - "अनाचे तन करु नये". अन म्हणजे अन्न आणि तण म्हणजे तणकट्/गवत्/कचरा या अर्थी. किती छान अर्थपुर्ण म्हणी असतात भाषेत.!!!!

Pages