उरलेल्या अन्नाचा सदूपयोग -१ (भाताचे पदार्थ)

Submitted by प्राप्ती on 24 August, 2015 - 16:46

'पानात वाढलंय तेवढं पूर्ण संपवायचं नाहीतर देवबाप्पा रागवेल' असं म्हणून आजोबा नेहेमी दम भरायचे आणि आम्हीही मग निमूट पानातलं सगळं नेमानं संपवायचं. एकतर चौरस आहार मिळावा म्हणून सगळे पदार्थ पोटात जाणे आवश्यक आणि दुसरे अन्न वाया जाऊ देऊ नये हा उद्देश. आपल्याकडे बालपणापासून देण्यात आलेले असे संस्कार त्यात आता तर दाल-आटे का भाव पण एवढे वाढलेत कि अन्न टाकून देणे न खिशाला परवडणारे ना मनाला पटणारे. पण घरात जरा मोठा परिवार असला कि अन्न उरण्याची समस्या मोठी असते. बरेचदा पाहुणे येऊन गेले कि, एखादा समारंभ आटोपल्यावर , लहान-मोठा कार्यक्रम झाल्यास किंवा एखाद्या दिवशी नेमकी दोन माणसं बाहेरून जेवून येतात आणि अन्न उरतं. अश्या उरलेल्या अन्नाचा वाया न जाऊ देता योग्य नायनाट लावणे किंवा सदूपयोग करून घेणे कौशल्याचे काम आहे. एवीतेवी हे प्रत्येक गृहिणीला अनुभवाने छान येत असतं. म्हणूनच आपण आपल्या उरलेल्या अन्नाच्या रेसिपीज एकमेकींशी शेअर करूया. मला माहिती असलेल्या आणि नेहेमी करत असलेल्या रेसिपी खालील प्रमाणे,

१) उरलेला भात किंवा खिचडी :-

* फोडणीचा भात :- हा घराघरात बनणारा पदार्थ असल्याने त्याबद्दल फारसे लिहिण्याची गरज वाटत नाही. पण उरलेल्या भातातून साधा कांदा-मिरची घालून फोडणी घातलेला, लेमन राइस, कर्ड राईस, दक्षिणेत करतात तसा चिवडा फोडणी घालतात तसा डाळ्या, शेंगदाणे गोडलिंब(कडीपत्ता) घालून केलेला भात, रावण भात, मेतकुट भात, चिंचेचा कोळ घालून केलेला फोडणीचा भात, मसाले भात, भाज्या घालून केलेला पुलाव असा कुठलाही भात करता येतो. अपनी अपनी चोइस.

* पराठे :- उरलेला भात किंवा खिचडी परातीत काढून त्यात कणिक(पाणी न घालता पीठ भिजवायला आवश्यक आहे तेवढी), ओवा, तिखट, मीठ, धने-जिरं पूड आणि आवडेल तो मसाला घालून,कोथिंबीर किंवा कसुरी मेथी पेरून हाताने भात mash करत पोळ्यांना भिजवतो तसे भिजवायचे. मग मध्ये तेल लावून त्रिकोणी किंवा साधे पराठे लाटून तव्यावर दोन्ही बाजूने तेल सोडून छान खरपूस भाजून घ्यायचे. लोणची, चटणी, सॉस किंवा अगदी असाच रोल करून मुलांना वाढायचे अतिशय चविष्ट मुलांना आवडणारा पराठा तयार.

* राईसबॉल :- उरलेला भात किंवा खिचडी परातीत घेऊन त्यात हवे ते सगळे मसाले टाकायचे किंवा नुसतेच थोडे मीठ घालून तांदळाच पीठ घालून mash करून भिजवून घ्यायचे. सारणासाठी दोन बटाटे उकडून घेऊन त्यात आवडेल तेवढे चीज किसून घालायचे थोड तिखट अन मीठ घालून कोथिंबीर घालून मिक्स करायचे. एका पसरट वाटीत मैदा आणि कॉर्नफ्लोर घालून मिश्रण तयार करायचे. कढाईत तेल ओतून ते गरम करायला ठेवायचे. आता हाताला पाणी लावून लाडवाच्या आकाराचे भाताचे गोल गोळे तयार करायचे ते तयार करतांना त्यात फक्त एक टेबलस्पून सारण भरायचं. सगळे गोळे तयार झालेत कि मैद्याच्या मिश्रणात बुडवून तेलातून ब्राउन होईपर्यंत तळून काढायचे. अंडी खाणाऱ्यांनी मैदा मिश्रणाऐवजी फेटलेली अंडी वापरली तरी चालेल. हे राईसबॉल आवडेल त्या सॉस बरोबर खायला द्या किंवा मुलांच्या डब्यात देत येतील.

* भाताचे कानुले :- भात परातीत घेऊन त्यात तांदळाचे पीठ, अर्धा वाटी तीळ, मीठ थोडी साखर, लिंबाचा रस घालून पीठ भिजवतात तसे भिजवायचे. मग हाताला तेल लावून कुरकुरे असतात तसे लाम्बोळके (किंवा आवडेल त्या आकारात) कानुले तयार करायचे हे ईडली पात्रातून दहा मिनिट वाफवून घ्यायचे. त्यानंतर कढई gas वर ठेवून त्यात जिरं मोहरीची फोडणी करून त्यात हे कानुले टाकायचे आणि छान खरपूस होईस्तोर परतवून घ्यायचे. वाढतांना वरून कोथिंबीर आणि किसलेले खोबरे पेरून द्यायचे.

* कटलेट :- भात एका पसरट भांड्यात घेऊन त्यात घरी असतील नसतील तेवढ्या सगळ्या भाज्या (कोबी, गाजर, फुलकोभी, बीट, दुधी, भोपळा, पालक) धुऊन किसून घालायच्या, न्युट्रीला चंक्स उकळत्या पाण्यातून काढून बारीक करून घालायचा, दोन उकडलेले बटाटे mash करून, हे सगळे जिन्नस एकजीव होईपर्यंत मिळवायचे आणि कटलेटला आकार देऊन ब्रेडक्रम्स किंवा रव्यात घोळवून ब्राऊन रंगात तळून काढायचे.

उरलेल्या भाताचे सगळ्यांना आवडेल असे चविष्ट पदार्थ करून बघा एकदा.

पुढल्या पोष्टीत उरलेल्या पोळ्यांपासून तयार करता येणारे विविध पदार्थ बघूया.

त्यापुढे बघणार आहोत

उरलेली भाजी

उसळी

शिरा

मिठाई

चिवडा-शेव

इत्यादी उरलेल्या पदार्थांपासून तयार होणारे नवे पदार्थ.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अन्न फार उरवू नये आणि बरंच शिळं उरलं असेल तर शिळासप्तमी करत तेच अन्न (त्याच किंवा अन्य फॉर्ममध्ये) फार खात बसू नये या मताची मी आहे. पण तरी कधी निगुतीने केलेला पदार्थ (थोडा) उरला किंवा मसाला मुरून दुसऱ्या दिवशी जास्त छान लागणारा पदार्थ उरला तर बरेच वाटते! Proud (जसे मूडाखि, पावभाजीची भाजी, छोले, उसळी, बिर्याणी वगैरे).

त्यामुळे इथल्या पाकृ करून पाहेनच असे नसले तरी शिळ्या अन्नाचे काय काय करता येते व करू शकतो हे बघायची उत्सुकता निश्चित आहे. पदार्थ आंबला की त्याची खुमारी काहीजणांच्या मते वाढते. पण त्याचबरोबर तो पदार्थ पचायला जरा जड होत असावा. पदार्थावर जेवढे जास्त प्रोसेसिंग तितका तो पचायला जड बनत जातो असे वाचले आहे. त्यामुळे माझा पास. इथले पदार्थ वाचून ज्ञानात भर पडेल कदाचित.

ईडली डोसे दहीवडे दही हे पदार्थ फरमेन्टींग करुनच बनवतात. त्यातून प्रोबायोटिक्स मिळतात.

शिळे अन्न खाऊ नये आणि बेताचेच करावे ह्याच मताची मी पण आहे. पण रोज एव्हढे मोजून सगळे लोक जेवतातच असे नाही. रोज ३ पोळ्या खाणाऱ्या माणसाने एखादे दिवशी २ च खाल्या तर काय करणार? त्यामुळे १ पोळी आणि भाजीही उरतेच. किंवा अगदी वाटीभर भात उरला, अर्धी वाती वरण उरलं असं होतंच. भूक नसताना जबरदस्ती खाणे हे तर शिळ अन्न खाण्यापेक्षा वाईट. हे असं थोडसं उरलेलं अन्न अजिबात फेकून देववत नाही. शिवाय सतत गरम वगैरे केल्याने अन्नाचे पोषण मूल्य कमी होते. फ्रीज मध्ये ठेवल्याने नाही. हे असं सकाळचं संध्याकाळी खाण्यात काहीच वावगं वाटत नाही.

सध्या फिटनेस चा झटका येतो मधे मधे, मग मुद्दामहून कमी स्वयंपाक करायचा आणि सलाद भरपूर करुन जेवणा अगोदर फस्त करायचा. किंवा थोडं कमी खायच व जेवणानंतर जलजीरा अथवा १ स्कूप वॅनिला आईस्क्रीम गट्टम करायचं.
समजा उरलंच तर कुस्करा, पोळीचा लाडू, फेवरेट. वरण, आमटी भाजी उरली असेल तर त्यात मुरमुरे थोडं फरसाण, बुंदी(खारी) असं टाकून खायचं.
ज्या दिवशी उशिरा जेवण झालं असेल तर रात्री च्या वेळी फक्त, मसाला दूध, किंवा आईस्क्रीम अशी पेये वरच भागवायच. याला आम्ही "इंद्रसभा" करणे असं म्हणतो. Proud

दोन गोष्टीत कन्फ्युजन झालेय इथे...

१. पानात टाकू नये... म्हणजे ताटात वाढलेला पदार्थ कुणी अर्धवट खाउन उरला तर काय करायचे.

२. घरात केलेल्या स्वयपाकातील उरलेल्या अन्नाचे काय करायचे ?

दोन स्वतंत्र मुद्दे आहेत.

पदार्थ आंबला की त्याची खुमारी काहीजणांच्या मते वाढते. पण त्याचबरोबर तो पदार्थ पचायला जरा जड होत असावा.
<<

आंबणे ही विघटनाची / सूक्ष्मजंतूंकडून कुजवण्याची प्रक्रिया आहे. उलट पचायला सोपे होते. दाक्षिणात्य स्वयंपाकात मुद्दाम आम्बवून वापरतात वस्तू, कारण अशीही उष्ण हवेत पिठं फार वेळ टिकणार नाहीत.

पाव करताना यीस्ट घालतो आपण. त्या यीस्टच्या शोधापूर्वी भिजवलेला 'डो' कुबट अंधार्‍या कपाटात ठेवून देत असत अन मग "शिळा" झाल्यावर भाजायला घेत असत. चीज, दही बनवण्याची प्रक्रिया अशीच इंटेन्शनली सूक्ष्म जीवांच्या मदतीने कुजवण्याची आहे.

वरती पैलवानानी लिहिलंय की (शिजवलेलं) मटन शिळं करून चांगलं लागतं. ते मसाला आतवर मुरल्याने.

शिकार केलेल्या प्राण्यांचे उदा. हरिण, रानडुक्कर इ. मांस मुद्दाम न शिजवताच धुरावर टांगून ठेवतात १-२ दिवस. जेणेकरून ते थोडे "टेंडराईज" होते. अर्थात, आंबून पचायला अन शिजायला हलके होते.

अशा अनेक मुद्दाम शिळं करण्याच्या पाककृती आहेत.

वाळवणं, लोणची इ. तर जुने करून खायचेच अन्न पदार्थ आहेत.

*

धागा पाहताच "शी बै! तुम्ही शिळं कसं काय खाता? (गरीब वगैरे आहात का? या चालीवर)" असले प्रश्न येतील हे डोक्यात आलंच होतं.

शिळं, अन नासलेलं अथवा काँटामिनेटेड, यातला फरक ध्यानी घेऊन अन्न वाया जाणार नाही याची खबरदारी घेणे मला तरी सेन्सिबल वाटते.

फारच अन खरंच ताजं हवं, तर सरळ झाडावर चढून फळं खाणे, कुरणात जाऊन चरणे, अन शिकार मारून खाणे हेच उपाय योग्य होत. Wink

माहितीबद्दल धन्यवाद, दीमा! आता इडली, डोसा वगैरे आवडीचे पदार्थ खाताना नि:शंक मनाने खाणे सोपे झाले! Lol

बी,

>> एक म्हण आहे वर्‍हाडात - "अनाचे तन करु नये".

पहिले अर्थ लागला की तन म्हणजे शरीर. जाम हसलो. अन्नाचं शरीर करायचं नाही तर दुसरं काय करणार ? ! Uhoh Rofl

आ.न.,
-गा.पै.

>>>आंबणे ही विघटनाची / सूक्ष्मजंतूंकडून कुजवण्याची प्रक्रिया आहे. उलट पचायला सोपे होते. दाक्षिणात्य स्वयंपाकात मुद्दाम आम्बवून वापरतात वस्तू, कारण अशीही उष्ण हवेत पिठं फार वेळ टिकणार नाहीत.<<

अगदी हेच लिहिणार होते. पण त्यातही आंबणे मध्ये कसा पदार्थ आंबला व कुठल्या घटकाचा हे महत्व आहे. नाहीतर सगळेच आंबलेले(वाईट बॅक्टेरीया मूळे, चुकीच्या तापमानामूळे) वगैरे चांगले असेही नाही. त्यामुळे, तो कुठला पदार्थ, कुठला घटक व कुठल्या प्रक्रियेमूळे आंबला हे महत्वाचे.
आंबवणं हि जैविक-रसायनिक प्रक्रिया असते , आणि प्रत्येक आंबवलेलं अन्न शिजवल जातच असंही नाही. वेगवेगळे प्रकार आहेत. आणि कारणं आहेत. शेवटी प्रश्ण, मुल्यांकाचा आहे ना, आणि त्याचबरोबर केलेल्या विश्षिट प्रक्रियेने त्यातील जीवन्सत्वांत वाढ झाली का आणि ती शरीराला कशी उपयुक्त असू शकतात.
तेव्हा रोजची, आमटी आणि लोणची तुलना नाहि होवू शकत. जरी ते वर वर पहाता, 'शिळं' ह्या लेबलखाली कोणी लावू पहात असेल तर/(अशी तुलना खरतर चुकीची आहे).

अरूधंती,

तुम्ही नक्की बरोबर माहीती नसताना अश्या पोस्टी का टाकता? आधी सुद्धा असेच वाचले आणि आता परत वाचले म्हणून विचारतेय.

लिहिणर न्हवते, पण तुम्ही खूपच विरोधाभासी लेखन केलेय अगदी ह्याच विषयवार, तेव्हा सुद्धा मी विचारलेले प्रश्ण. पण तुम्हाला बहुधा उत्तर येत न्हवते म्हणूनच तुम्ही दुर्लक्ष केले असणार असं मानते मी आता ह्या तुमच्या पोस्टी वाचून

एका बीबी वर लिहिता की, अक्ख जग शिळं अन्न खातं(त्यात अगदी सरसकटीकरण करून चीज पासून सगळे अन्न प्रकार अगदी वाळवण, साठवण पासून ह्यांची अगदी एकमेकांशी एकाच लेवलवर आणून तुलना केली जी अगदी अ‍ॅपल आणि ऑरेंज पद्धतीची होती. आणि मोकळे झालात).
तेव्हा त्या लेखिकेला दर्शवलं की, शिळं अन्न सापेक्ष आहे. आणि एक प्रकारे दिशाभूलच केलीत. जेव्हा की प्रश्ण तिथे रोजच्य शिजवलेल्या अन्नाचा होता(जेवणाचा डबा प्रामुख्याने). तिथे चीज आणि लोणची उदाहरण म्हणून कशी दाखवू शकता?

आणि आता इथे लिहिता, तुम्ही अगदी शिळं अन्नाच्या विरोधात आहे. तुम्ही जर स्वतः शिळं अन्नाच्या विरोधात आहात मग तिथे कशाला जगाची उदाहरणं देत होतात?

वर आणखी सरसकट थाप, आंबका पदार्थ जड होतो? प्रत्येक आंबका पदार्थ प्रत्येकाला पचतोस असे नाही. आणि त्याचीही कारणे आहेत. म्हणून तो पदार्थाचा दोष नसतो. Wink

हे कळून न घेता, एकाच गटात टाकून , उगाच कोणाला दिशाभूल होइल अश्या पोस्टी टाकू नका.

लोकं तुमचे वाचून इडली खायला घाबरतील. म्हणे कोणी अरुंधतीबाईने मायबोलीवर लिहिलय, आंबट पदार्थ जड म्हणून. Wink पण इडली खावून कोणाचे पोट खराब होते , म्हणून तो माणूस लगेच हे सांगत फिरू शकत नाही, इडली बेक्कार असते. पचायला जड असते. हा, आता तो माणूस आपले पोट खराब आहे हे स्वीकारायला मागत नसेल तर काय करणार... Proud

अर्धी चर्चा शिळे अन्न खाऊ नये की खावे यावरच,
देशातील ५० टक्के जनतेला दोन वेळच्या अन्नाची मारामार असताना आपण हा चॉईस ठेवू शकतो याचे सर्वांनी आभारच मानायला हवे खरे तर..

@ शिळा भात,
आमच्या घरच्या दिग्गजांच्या मते फोडणीचा भात शिळ्या भाताचाच चांगला होतो, आणि खरेच आमचा फोडणीचा भात सॉल्लिडच असतो Happy

शिळ्या अन्नावरून एक प्रश्न पडला,
प्रत्येक ताज्या शिजलेल्या अन्नपदार्थाची एक्स्पायरी डेट भिन्न भिन्न असेल ना.
कोणी यावरून वर्गीकरण करू शकेल का?

वा फारच कामाचा दिसतोय धागा. कधीकधी सकाळी लवकर निघावं लागतं कामाला अश्यावेळी रात्रीच थोडा भात मांडला तर सकाळी यातलं काहीतरी झटपट करता येईल. मस्त

हल्ली सकाळच्या जेवणातल्या उरलेल्या अन्नाला संध्याकाळी शिळं म्हणायची/समजायची पद्धत आहे का? Uhoh
इथे बरेच जणं आस्वपू करतात मग त्याचं काय करायचं किंवा ज्यांना रोज स्वयंपाक करणं काही कारणाने शक्य नसेल पण घरचं जेवण मग ते दोन दिवसांपूर्वीची भाजी, आमटी का असेना, पण बरं वाटत असेल विकतच्या अन्नापेक्षा त्यांनी काय करायचं?
शेवटी जे आपल्याकरता वर्क आउट होतं तेच करायला हवं. आठवड्यातून तीन चार वेळा बाहेरून पिझ्झा, बर्गर किंवा अगदी पंजाबी जेवणारे सतत त्यातली पोषणमूल्य बघतात का?

माझा म्हणण्याचा अर्थ अगदी साधा होता अन आहे. झाडूवालीला सुध्दा कधीतरी सकाळचे उरलेच जे की मी ही खाईन या क्वालिटीचे आहे असे अन्न मी तरी देते (नाहीतर ती त्यातले काही अन्न कुत्र्यांना(भटक्या) टाकत घरी जाताना दिसते. Happy - समजा सकाळच्या ३ पोळ्या काही कारणाने उरल्या तर त्यातली एक कोणीतरी खाणार आहे अन २ मग अजून शिळ्या करून सकाळी कुस्कुरा करून खाण्यापेक्षा आजच रात्री झाडूवालीने खाल्ली तर काय हरकत आहे? अन तीच गोष्ट भाजी कोशिंबिरींची सकाळच्या. माझ्या मातोश्री इकड आल्या की फ्रिजात दुस-या दिवशी सकाळी खाण्यासाठी ढकलण्याचा प्रयत्न करतात. मी आपले माझे मत सांगितले.

मी आपले माझे मत सांगितले.>> खरंय अनघा.
बर्‍याच घरांमध्ये 'घर रिकामं ठेवायचं नाही', 'आलंच कोणी मध्यरात्री तर असू दे' इत्यादी कारणांस्तव अन्न उरवण्याची पद्धत आहे. आणि उरलंय म्हणून ती शिळवड दुसर्‍या दिवशी खाल्ली आणि खिलवली जाते, त्यात अधिकचे मसाले, तेल वगैरे घालून. हे आजचं उद्या, उद्या दुपारचं उद्या रात्री, उद्या रात्रीचं परवाला असं चक्रच चालू राहतं. त्या संदर्भाने मी लिहिलं होतं की जितकं खपतं तितकंच करण्याची सवय असावी. मध्यरात्री अचानक आला कोणी पाहुणा तर त्यालाही जरा बसवून थंड दूध/ सरबत वगैरे देऊन पंधराव्या मिनिटाला गरम गरम ताजा वरण भात जेवायला वाढावा.

रुजुता दिवेकर बाईंनी चार तासाच्यावर झालेले अन्न शिळं असं फारच बिंबवलं आहे त्यांच्या पुस्तकात. आता ते रोजच्या धवपळीच्या आयुष्यात जिथे नोकरी घर सांभाळून कसरत असते त्यामुळे हे फक्त हाताशी चार पाच नोकर असलेल्यांना ठिक असावे वाटते.

मला आठवते मी इथे एका मराठी मुलीकडे गेलो होतो. ती भारतात जाणार होती महिन्याभरासाठी आणि नवरा सिंगापुरातच राहणार होता. तर तिने, महिन्याभराच्या भाज्या आणि पोळ्या करुन ३० डबे तयार करुन फ्रिजर मधे टाकले होते. मी थक्क झालो होतो.

उरलेल्या भाताचा तेलात फोडणीवर एम टी आर पुलीओगरे मसाला घालून त्यावर परतून जबरदस्त प्रकार होतो.
बरेचदा ताज्या भाताचा पण छान होतो.

उरलेल्या भाताची एक ऑसम रेसिपी

साहित्य :

एक मोठी वाटी दुधीचा कीस

चार चमचे तूप

दोन वाट्या भात

अर्धा कप दुध

थोडा सुकामेवा

कंडेन्समिल्क एक कॅन

विलायची चवीला

कोकोनट पावडर

कृती :

दुधीचा कीस नॉनस्टिक पँन मध्ये घेऊन जरा मोकळा होईपर्यंत परतून घ्यायचा. तूप आणि सुकामेवा टाकून पुन्हा होऊ द्यायचा. आता भात टाकून अगदी परतायला लागेल तेवढ थोड थोड दुध सोडून पाचेक मिनिट परतायचे gas कमी ठेवून त्यात कंडेन्समिल्क टाकायचे. बुडाला लागू नये हि काळजी घेत मिश्रण जमायला लागले कि gas बंद करून त्यात विलायची पावडर घालायची. लाडू वळून कोकोनट पावडर मध्ये घोळवून खायला घ्यायचे. मनभरून पोटभरून खाउन झाले कि खायला द्यायचे Lol Proud

उरलेला भात वाळवून भाकरीच्या पिठाबरोबर दळायला देतात ते पहिले आहे व आइड्या आवडलेलीही आहे. तसेच उरलेल्या वाटल्या डाळीचे सांडगे पण केलेले पाहिले आहे.

अन्न ताजे असायला हवे हे पटते, पण आपल्यासारख्या गरीब देशात अन्न वाया जाऊ न देणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य असायला हवे, त्यामुळे मोजकाच स्वैपाक करणे हे बरोबरच आहे पण थोडेफार कमीजास्त झाले तर ते जरा चवीत अदलाबदल करून वापरणेजोगे करून लवकरात लवकर संपवावे हे सुद्धा पटते. आमच्याकडे रात्रीच्या स्वैपाकाला सुरुवात करताना प्रत्येक मेंबरच्या भुकेचा अंदाज घेऊन त्यानुसार स्वैपाक करण्याची पद्धत आहे (त्यावरून अगदी कामवाल्या बाईनेही टोमणे मारले आहेत, आम्ही दुर्ल़क्ष करतो) त्यामुळे बरेचदा अन्न उरत नाही, पण फोपो, फोभा व भाकरीचा काला, आमटी भाजी उरली तर थालिपिठ. हे लगेचच्या दुसर्‍या दिवशीच्या न्याहरीला संपवणे हे फारच सोपे वाटते व आवडतेसुद्धा.

गरज नसताना खूप जास्त पूर्वतयारी करून ठेवणे मात्र फारसे पटत नाही.

माझ्याकडे रोज साडेतीन माणसांचा स्वयपांक असतो पण एक कणसुध्दा अन्न उरत नाही. सकाळ-संध्याकाळ दोन्ही वेळा ताजेचं करतो. कधीतरी पाहुणे वगैरे असतील तर स्वयपांक जास्त होतो पण तेव्हा हमखास उरतो. पण साबांच म्हणणं असत, की जे आहे ते शक्यतो त्याच प्रकारात सम्पवा, अगदी पुन्हा तळुन वगैरे नाहीच आणि सकाळंच संध्याकाळी शिळं होत नाही.
त्यामुळे कधी फ़ोडणीचा भात आणि फ़ोडणीची पोळी यापुढे मजल गेली नाही.
आणि यापेक्षा जास्त अस की एक अलिखित नियम माझ्या आजेसासर्‍यांपासुन आहे की घरातल्या स्त्रियांना शिळं खाउ द्यायचं नाही. आणि अर्थातचं लहान मुलांनाही. त्यामुळे एखादी पोळी वाटीभर भात असं काही असेल तरी नवरा संपवतो. आता सासरे नाहीत पण त्यांनीही असेपर्यन्त हेच केले.
आम्हांला दोघांनाही फ़ोडणीचे प्रकार प्रिय म्हणुन सुट्टीच्या दिवशी साबा ताज्या पोळ्या, भात जास्त करुन मधल्या वेळच्या खाण्यात फ़ोडणीचे प्रकार करुन देतात. अश्या वेळी हे वरचे प्रकार मला ट्राय करता येतील.

अहो, तूप आणि सुकामेवा>> म्हणू नका पूर्ण आरक्षण समाप्ति बाफ इकडे यायचा. अर्थात तिकडे "सुखे मेवे, तुप" म्हणत आहेत आणि इथे 'तूप, सुकामेवा' त्यामुळे नक्की काही सांगता येत नाही .

लेफ्टओव्हर नावाचा नेफ्लिवर रिअ‍ॅलिटी शो आहे. उरल्या सुरल्या पदार्थांचे काही करायचे असा.
त्यात कोणी माई का लाल फोडणीचा भात आणि फोडणीची पोळी करेल या आशेवर मी अधुन मधुन तो शो बघत असतो. Proud

Pages