विपूतल्या रेसिप्या - ६ दाल तडका

Submitted by योकु on 20 August, 2015 - 14:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- पाऊण वाटी मुगाची डाळ (साधी, विनासालाची)
- पाव वाटी तूरडाळ
- दोन चमचे चणाडाळ
- पाव चमचा मेथ्या
- मध्यम आकाराचा एक कांदा
- मध्यम आकाराचा एक टोमॅटो
- थोडी कोथिंबीर
- तीन हिरव्या मिरच्या
- आवडत असेल तर पेरभर आल्याचे ज्यूलिअन्स
- पाच ते सात लसणाच्या पाकळ्या
- पाव ते अर्धा चमचा धणे
- दोन ते तीन लवंगा
- दोन चमचे जिरं
- अर्धा चमचा बडीशेप
- मोठी चिमूटभर हिंग
- थोडी कसूरी मेथी
- लाल तिखट
- हळद
- मीठ
- तेल किंवा तूप

क्रमवार पाककृती: 

- सगळ्या डाळी धूवून अर्धा तास तरी भिजू द्याव्या
- कांदा, टोमॅटो, मिरच्या, कोथिंबीर धूवून बारीक चिरून घ्यावं
- आल्याचे ज्यूलिअन्स करून पाण्यात घालून ठेवावे
- लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्याव्या
- धने लाटण्यानी खरंगटून घ्यावे

- आता डाळिंमधलं पाणी काढून टाकून, नव्या पाण्यात सगळ्या डाळी एकत्र शिजायला ठेवाव्या
- शिजतांना, कांदा, टोमॅटो, मेथ्या, धने, लवंगा, थोडी कोथिंबीर, हळद, मीठ घालावं
- नीट सगळं शिजलं की पाणी घालून कन्सिस्टंसी अ‍ॅड्जस्ट करावी
- बाऊलमध्ये ही डाळ काढून तयार ठेवावी

आता तडका -
भरपूर तेल (आवडत असेल तर साजुक तूप) गरम करून, त्यात क्रमानी जिरं, बडीशेप, हिंग, लसूण, कसूरी मेथी, हिरव्या मिरच्या, लाल तिखट घालून चरचरीत फोडणी डाळीवर ओतावी.

विपूतून सांगीतलेला दाल तडका तयार आहे. आल्याचे ज्यूलिअन्स आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सजवावं.

वाढणी/प्रमाण: 
तीन लोकांना जेवणात पुरावा
अधिक टिपा: 

- पूर्ण तुपात केला तर बर्‍यापैकी तुपाळ होते डाळ
- तेल + बटर असंही वापरता येईल पण साजुक तुपाची चव काही वेगळीच लागते
- तडका पेशंटली करावा, जराही जळला तर ती चव पूर्ण डाळीला लागते
- परत तेच! फार काही वेगळा नाही पण तडक्यातले जिन्नस वेगळे, त्याची म्हणून एक वेगळी चव जाणवतेच Happy
- यासोबत, तळलेल्या बंपर हिरव्या मिरच्या असतील तर स्वर्गीय चव साधते असं विपूकर्तीनं सांगितलेलं आहे अन मी ते करूनही पाहीलंय; खरोखरच अप्रतीम!
- अशी डाळ, पराठे, तळलेल्या मिरच्या + प्लेटभर ग्रीन सलाद; जबरदस्त काँबो.

माहितीचा स्रोत: 
मृ, मृण, मृण्मयी, विपू
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा, मस्त रेसिपी आहे. नक्की करणार ! धन्यवाद मृण ( ३० % ) आणि योकु ( ७० % ) Light 1

डाळीतच कांदा-टोमॅटो घालून कुकरमध्ये शिजवता येईल हे माझ्या आत्ता-आत्तापर्यंत डोक्यातच नव्हते. कांदा-टोमॅटो परतून वरुन शिजवून घोटलेली डाळ ओतायची हेच माहीत ! हल्लीच कळले इथली दुसरी एक रेसिपी वाचून.

मस्त! माझी पण हीच पद्धत, फक्त पाच डाळी घेते, त्यात मुगाची डाळ जास्त, त्यापेक्षा कमी तुरीची आणि मसुराची डाळ आणि थोडी चण्याची आणि उडदाची डाळ.
फोडण्या दोन घालते, एकदा लसणीचे बाऽरीक तुकडे थोडेसे करपवून आणि एक फोडणी सुक्या मिरच्यांची.

अशा डाळीबरोबर सुवासिक, गरमागरम पांढरा (साधा) भात, भातावर लोणकढं तूप, लिंबू, सोबत कैरीचं लोणचं हे काँबो अफलातून लागतं. किंवा मग जिरा राईस. मला भाताबरोबर अशी डाळ खायला जास्त आवडेल. (तुझ्या अगोदर लिहिलेल्या दाल तडक्यासोबतही पांढरा भात सुंदर लागतो.)

अहाहा चव आहे या पदार्थाची. खूप खूप धन्यवाद रेसिपी विपुत लिहिणारीला आणि तिला बाहेरचा प्रकाश दाखवणारीला.

मस्त एकदम.

बरं, ते 'तळलेल्या बंपर हिरव्या मिरच्या' म्हणजे तिखट-कच्च्या-हिरव्या दे दणादण ठसका आणणार्‍या त्याच का? त्या नुसत्याच तळुन खायला घ्यायच्या का?

सुनिधी, पोपटी रंगाच्या लांबट मिरच्या असतात ना त्या घ्यायच्या. फार काही तिखट नसतात त्या. एक चीर देऊन तळून घ्यायच्या अन वर गरम असतांनाच थोडं मीठ शिवरायचं.
समोसे, कचोरी, ढोकळा, फाफडा या फरसाण आयटेम्स बरोबरही या मिरच्या मस्त लागतात.