पेपर रस्सम (मिळाग रस्सम)

Submitted by नंदिनी on 12 August, 2015 - 05:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. कोळत घातलेली चिंच- लिंबाएवढी.
२. काळी मिरी दाणे चमचाभर
३. जीरं चमचाभर
४. लसणाची एखाददुसरी पाकळी.
५. सुकी मिरच्या २ (मद्रासी मिरच्या असल्यास दोन तीन घ्या. संकेश्वरी वगैरे असेल तर एखादी ठिक)
६. तूर डाळ दोनेक चमचे

फोडणीसाठी: तेल आणि तूप, मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि लाल सुकी मिरची.

क्रमवार पाककृती: 

१. मिरी, जिरे, लसूण, मिरची आणि तूरडाळ एका पॅनमध्ये कोरडीच परतून घ्या. डाळ चांगली तांबूस होऊ द्यात.
२. हे सगळं गार अक्रून मिक्सरमधेय ओबडंधोबडं वाटून घ्या. फार वस्त्रगाळ पूड करत बसू नका.
३. कोळत घातलेली चिंचेचा पल्प काढून तो पाण्यात मिक्स करून घ्या. (उरलेली चिंच फेकू नका, ती आम्टीत घालून वापरा)
४. आता पाणी उकळत ठेवा. त्यात चवीनुसार मीठ घाला. चांगलं खळखळून उकळत राहू देत.

५. त्यात वर केलेली रसम पावडर घाला. दोन तीन मिनिटे उकळू द्या. दरम्यान तेलातुपाची फोडणी करून घ्या. रसमला चरचरून ही फोडणी मारा. हवं असल्यास वरून कोथींबीर घाला.

६. फोडणी घातल्यावर रस्सम उकळू नका. सरळ पेल्यात ओतून घ्या आणि फू फू करून प्या. (मिरीच्या वाफेनं नाक मो़कळं होइल आणी गरमागरम रस्समने घशाला त्वरित आराम)

७. रस्सम अति उकळू नका.

वाढणी/प्रमाण: 
ते घसेदुखीवर अवलंबून आहे.
अधिक टिपा: 

सर्दी अथवा घसेदुखीनं त्रास होत असेल तर हे रस्सम अतिशय इलाजकारक आहे. यामध्ये मुख्य पदार्थ मिरी आहे हे लक्षात घेऊन मग इतर पदार्थ घालायचे आहेत. सर्वसाधारणपणे बाजारात मिळणारी रसम पावडर मी यात घालत नाही (घातली तरी किंचितच)

रस्सम हे साधारण पातळ सुपासारख्या कन्सिस्टन्सीचे हवे. आंबट आणी तिखट या दोन्ही चवी बरोबर साधल्या तरच रस्सम टेस्टी लागतं. त्यामुळे भसाभसा रस्सम पावडर घालून त्याची चव बिघडवू नये.

रस्समवर फोडणी ऑप्शनल नाही. ती चरचरूनच बसली पाहिजे. पण अतितेल घालू नका. किंचित तेलातुपावर कढीपत्ता आणि हिंगाचा तो अस्सल स्वाद येईल अशीच फोडणी बसायला हवी. क्ढीपत्ता ताजा असल्यास रस्सम तुम्हाला दुवा देईल.

रस्समचे अनेक प्रकार आहेत. पैकी दालरस्सम, टोमॅटो रस्सम, पेपर रस्सम, लेमन रस्सम आणि गार्लिक रसम हे प्रसिद्ध आहेत.

रस्सम भातासोबत खातात, पण मला ते सुप म्हणून अतिशय आवडतं.

इतर रस्समची अथवा रस्सम पावडरची रेसिपी हवी असल्यास लापि वाजवणे मस्ट आहे.

यात बटाटे किंवा पनीर घालायचं असेल तर आजूबाजूला कोण तमिळी नाही ना याची खात्री करून मगच घाला.

माहितीचा स्रोत: 
सेल्व्ही, शेजारीण, आणि इंटरनेट
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम सही! अतीशय चविष्ट प्रकार. धन्यवाद नन्दिनी.:स्मित: माझ्या मद्रासी शेजारणीने शिकवले मला हे पण मी ही मिक्स पूड टॉमेटोच्या रसम मध्ये घालुन करते. मी जास्त भात खात नाही, पण रसम असले की ढिगभर भात सुद्धा खाते.

रस्सम मला पण खूप आवडतं. ऊटीला मिळालं होतं तसं पुण्यात अजून मिळालं नाहीये Sad , मधे आरतीने दिलेल्या कृतीने केलं. आता ह्या प्रकारे करून बघेन.

आज काय माबो वर जीभ खवळु आइटम (appetizer अन तोंडी लावणे) चा महोत्सव दिसतो आहे!!! तिकडे बेफिंचा आकांत ठेचा इकडे पेपर रस्सम मुखरसाची सुनामी उफाळली मुखात!!! तुफान प्रकार दिसतो आहे!!

बाकी
बटाटे किंवा पनीर घालायचं असेल तर आजूबाजूला कोण तमिळी नाही ना याची खात्री करून मगच घाला.

ठो ठो ठो!!!! Lol

रस्सम साध्या पाण्यात? तूरडाळ शिजवल्यावर त्यातलं पाणी घेतात ना?
रस्सम करावं म्हणून खास मद्रासी दुकानातनं मसाला आणलाय त्या पाकिटावरच्या कृतीत लिहिलंय तसं. रस्समला काही मुहूर्त नाही लागला अजून Sad

आहाहा. रसम प्रचंड आवडते - अगदी उडप्याकडचे रसम पण ओरपून पितो इतका रसमच्या प्रेमात आहे.

टोमॅटोशिवाय रसम ही कल्पना पचायला जड जातेय पण तरीही हे करून बघण्यात येइल.

मिरीच्या वाफेनं नाक मो़कळं होइल >> मोकळ होऊन ते भांड्यात पडायला नको म्हणजे मिळवलं Wink

मी टोमॅटो रस्सम करत अस्ते..इतर माहिती नै..
मस्त रेसिपी नंदिनी..पावसाळ्यामधे पाण्यामुळे सर्दी व्हायची दाट शक्यता असते त्यावर उपाय म्हण्य्न हा प्रकार छान आहे..करुन बघण्यात येईल Happy

आत्मधून, तुम्हाला मुहूर्त मिळाला की कळवा.. मी आणि माधव नक्की येऊ. Proud
मीही त्याच्यासारखाच रसमच्या प्रचंड प्रेमात. (स्वप्नाळू डोळ्यांचा भावला)

भारी दिसतंय... करून चाखून पाहायला हवं.

आत्मधून तूरडाळ भाजून त्याची पावडर करून घातली आहे ना ह्या रस्सममध्ये...

टीना, ई!!!

माधव, इतकीच इच्छा असेल तर यातच एखादा टोमॅटो घातलात तरी चालेल.

आत्मधून, रसमच्या अनेक पद्धती आहेत. तुम्ही म्हणताय ती वेगळी पद्धत. यातही हवं अस्लं तर तूरडाळीचं शिजवलेलं पाणी घालू शकता, त्यानं रस्समला दाटपणा येतो. परुप्पु रस्सम (दाल रस्समममध्ये) मात्र तुरीचेच पाणी घेऊन रस्सम करतात. त्यासाठी तूरडाळ भरपूर पाण्यात शिजवावी लागेल.

रस्सम हे साधारण पातळ सुपासारख्या कन्सिस्टन्सीचे हवे. आंबट आणी तिखट या दोन्ही चवी बरोबर साधल्या>> या दोन अटींची पूर्तता करेल इतपत पाणी घ्यायचं.

सगळ्या प्रकारचं रस्सम ग्लासात घेवून प्यायला आवडतं. अजून थोडा पाऊस पडून हवा जरा थंड पडली की करण्यात येईल पेपर रस्सम. सध्याच्या इतक्या उकाड्यात आणि गर्मीत गरम गरम काहीही पिणं शक्य नाहीये.

धन्यवाद नंदिनी.

वाहवा! झक्कास काम केलंयस. उद्या करते.

यात बटाटे किंवा पनीर घालायचं असेल तर आजूबाजूला कोण तमिळी नाही ना याची खात्री करून मगच घाला. >>> मी पण आजूबाजूला नसेल याची खात्री करून घ्या. रस्सममध्ये बटाटे, पनीर, अंडी घातली तर माझ्यापासूनही खतरा संभावतो.

लापि वाजवत आहे.

चला.. आवडत्या वस्तूची रेसिपी. आता मी तुला म्हणले होते ती रेसिपी पण शोध आणि टाक.
रस्सम पावडर शिवाय खडा मसाला टाइप रस्सम.

रसम्‌ आजपर्यंत जमलेच नाही, नेहमी काहीतरी बिघडलेय, हे करून पाहणार, जमले तर माबो रसम्‌ गटगसुद्धा करायची तयारी आहे.

रस्सम भातासोबत खातात, पण मला ते सुप म्हणून अतिशय आवडतं.
>>
+७८६
ते भाताबरोबर (सुद्धा) खायचे असते (खाऊ शकतो) हा शोधही मला फार उशीरा लागला..

मी करते नेहमी. अम्ही गुंटुर रसम चारु म्हणून प्रकार आहे तो करतो बरोबर सोना म सुरीचा गरम भात, दही.( नंतर च्या हेल्पिंग ला) आणि अप्पलम. नाकु चाला इष्टम. सर्दी साठी पर्फेक्ट

काही तमीळ पुरुष पण हे रसम फर्मास बनवतात.

आवडता प्रकार आहे, खरेतर सगळेच रसम प्रकार अतिप्रिय
पण सर्दी, घसादुखी यावर हाच प्रकार बेष्ट
मी लसूण न भाजता आणि थोडा जास्त घालतो

रसम अतिशय म्हणजे अतिशय आवड्तं.....पण कधी स्वतः ला आवडेल असं करायला जमलेलं नाही! आता ह्या प्रकारे करून बघेन...

रसम्+भात्+गोड दही = सुपर हिट जेवण...तेवढ्या साठी चेन्नई ला जायला आवडायचं Happy

मस्तं रेसिपी. खूपच छान आहे.
माझी एक मैत्रीण अननस वापरुन पण रस्सम करायची.
कडाक्याच्या थंडीत गरम रस्सम भात आणि पापडम....स्वर्ग.

Pages