बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नारळी भाता बरोबर दुसरा कोणता मेनु चांगला लागेल?

आमच्या कडे अळुवड्या असतात, नारळीभाताबरोबर.

मी नेहमी नारळीभाताबरोबर हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबू, खोबरं घातलेली झणझणीत मटार उसळ करते. ही हिरवीगार उसळ केशरी रंगाच्या भाताबरोबर दिसायला सही दिसते डिश मधे!

मला स्वःतासाठीच काहीतरी बेत करायचाय... काय करु प्लीज तुमचे सजेशन्स द्या... भात, पोळी, भाजी खाण्याचा जाम कंटाळा आलाय, मॅगी, नुडल्स ई. खाण्याची ईच्छा नाही... सध्या फ्रीज मध्ये फक्त टमाटे आहेत आणी बाहेर कांदे आणी बटाटे. काहीतरी छानस सुचवा प्लीज अस काही तरी जे बनवायला सोप्प खायला मजेदार असेल Happy .... एकट एकट जाम बोर होतय त्यात काय खाऊ सुचत नाही ... Sad

सास, कांदा बारिक चिरायचा, टॉमॅटो गर काढुन बारिक चिरायचा, थोडी हिरवी मिरची, असेल तर कोथिंबीर, थोड मीठ, मिरपुड आणि चीज घालुन मस्त कालवायच. हे सारण ब्रेड मधे घालुन टोस्ट करायच नाहीतर शीळ्या पोळीत घालुन रोल करायचा आणि तव्यावर भाजायचा. सोबत मॅश्ड पोटॅटो... हाणायच... Happy

बटाटे किसून त्याची तव्यावर रोस्टी बनवायची. हवे असल्यास चीज. मीठ मिरपूड. वरून. टोमॅटो सूप. गार्लिक ब्रेड
मॅगीचा मसाला घालून आलु पराठा. रस्सा तर ग्रेट्च.

संकष्टि आहे रवीवारी. काय बेत करावा? एकदा मि इथे दोड्का भाताबद्द्ल वाचलेल. प्रयत्न करुन बघायचा आहे. पण बरोबर काय? कांदा लसुण नाहि वापरत मि.

वा! काय काय मेनु दिलेत सगळ्यांनी आभार Happy ... काल मी मसाला पापड करुन खाल्ले मस्त पैकी बटर लावुन पापड भाजले त्यावर टम्यॅटो, कांदा बारीक चिरुन घातला आणी ३ पापड हादडले Happy .... मग ऊडदाची डाळ भीजत घातली आणी सकाळी सकाळी मस्त पैकी डोसे आणी बटट्याची भाजी करुन खाल्ली Happy

मोगरा त्या दोडका भाताबरोबर एखादे लोणचे चालेल. त्यात ताक असल्याने वरुन ताक घ्यायची पण गरज नसते, दाण्याची चटणी पण चांगली लागेल.

दिनेशवस नेवेद्य असल्यामुळे पंचपक्वांन करावि लागतात. परत गोड काहिअतरी हवच. शिवाय १० - १५ माणस असणार आहेत त्या दिवशि.

नेवैद्याला गोड म्हणजे खीर लागतेच. पुरणही लागेल. पंचपक्वान्न म्हणतात खरे, पण हे सगळे प्रकार केवळ पानाला लावण्यापुरतेच करतात. ( खरे तर पाच प्रकारच्या खिरी करतात, यात शेवया, मालत्या, नखोते, गव्हले आणि बोटवे असे प्रकार असतात. ) श्रावणात अळूची पातळ भाजी, ओल्या मटाराची उसळ, पिवळे वरण, अळूवडी, तांदळाची खीर, बटाटे वा गिलक्यांची भजी, कढी, काकडीचे धोंडस, घावन घाटले, खांडवी, मोदक असे प्रकार छान वाटतात. लाल भोपळा, गवार, खतखते हे पण "चालणारे" पदार्थ.

शनिवारी वीस- पंचवीस माणसं यायची आहेत संध्याकाळी जेवायला. नेहेमी फक्त नॉन व्हेज खाणारी माणसं - सगळेच यंदा श्रावण पाळत आहेत. कांदा लसूण चालेल एवढीच जमेची बाजू.
मला पावभाजी- भेळ सोडून दुसरं काही सुचत नाही. पण हे प्रकार सुद्धा मलाच बोअरिंग वाटताहेत.

सासरची मंडळी आहेत त्यामुळे बटाट्याची भाजी, भरली वांगी , उसळ असले मराठी प्रकार फारसे खपत नाहीत पास्ता /पिज्झा ची ही तीच गत.

काय करू मी ? लवकर मदत करा ( खवैय्ये) पार्लेकर !

प्रतिसाद ankyno1 | 13 August, 2009 - 07:35
शोनू...
मिसळ किंवा रगडा-पॅटीस करता येईल...
(चमचमीत होईल आणि कांदा लसूण वापरता येईल...)

प्रतिसाद maitreyee | 13 August, 2009 - 07:59
शोनू, व्हेज बिर्यानी, मिर्ची का सालन आणि श्रीखंड कर. श्रीखंड आधी करून ठेवता येतं, अन आवडतं सगळ्यांना. शिवाय ऐन वेळेवर थोडे पकोडे वगैरे तळ, छान वाटेल हे काँबो

प्रतिसाद shonoo | 13 August, 2009 - 08:05
व्हेज बिर्यानी मला जमत नाही अजिबात : ओशाळवाणी बाहुली :

रगडा पॅटिस, मिरची का सलान चालेल.

श्रीखंडा या 'ew!!' म्हणतात हे लोक

प्रतिसाद Mrinmayee | 13 August, 2009 - 08:08
शोनू, देसी चायनीज (कॉर्न सूप, व्हेज फ्राईड राईस, हाका नूडल्स, मंचुरियन) आणि गोडाला चॉकलेट्/मँगो मूस.

प्रतिसाद maitreyee | 13 August, 2009 - 08:13
श्रीखंडाला इऊ म्हणतात!! कमाल आहे हं !!
प्रतिसाद shonoo | 13 August, 2009 - 08:17
मृ
मस्त आहे आयडीया. मॅंगो मूस ची कृती टाकशील का ?

प्रतिसाद slarti | 13 August, 2009 - 08:29
बराबर पाईंट ! पण आपला अगदीच लिग्नाईट नका समजू हो बाकी मृचा मेनू उत्तमच.
गोड पदार्थांची गंमत असते. भारतातील एका प्रांताचे गोड पदार्थ दुसर्‍या प्रांतीयांना आवडत नाहीत, पण परदेशातील आवडतात हा मलाही आलेला अनुभव आहे.

प्रतिसाद Anjali28 | 13 August, 2009 - 08:47
शोनू,
अल्पनाने दिलेली 'आलू टमाटर' ची भाजी खूप छान होते. तसेच दिनेशच्या पध्दतीने पालक पनीर पण मस्त होते. मी एकदा South Indian लोकांसाठी हा मेन्यू केला होता - आलू टमाटर, पालक मटार पनीर, लेट्यूस काकडी मूगाचं वरून हिंग आणि भरलेल्या मिरचीची फोडणी घालून कोशींबीर, व्हेज पुलाव, टोमॅटो घालून वरण, सुरळीच्या वड्या आणि पोळ्या. सु. व ऐवजी कोबीचे वडे / भजी पण खूप छान लागतात. आणि करायला पण सोपे. भाज्या, फोडणीचं वरण आदल्या रात्री करून ठेवता येईल. ऐन वेळेस पुलाव टाकणे, वडे तळणे, कोशींबीर, पोळया एव्हढच राहतं. त्यातूनही पोळ्या करुन देणारी कोणी असेल तर अजून तुझं काम सुटसुटीत होइल. स्वीट डिश म्हणून मृ म्हणते त्याप्रमाणे मँगो मूस. एकदम जंगी बेत होइल.

छोले पूरी/नान, रायता/कोशिंबीर, पुलाव राईस, फोडणीचा दहीभात (मस्ट), बन्सीचे पापड्/भरल्या मिरच्या तळून/मुंग पकोडी/कांदा पकोडी, आवकाय, डबल का मीठा/फिरनी, आईसक्रीम. इतक्या लोकांसाठी करतांना पोळ्यांच्या फंद्यात पडू नये. विकतचे नान आणून गरम करावे, नाहीतर पूर्‍या/भटूरे तळावे. भटूरे बेस्ट.

बटाटा, टोमॅटो, ब्रोकोली, फ्लॉवर चा रस्स गोडा मसाला घाउन मस्त होतो. काळे चणे बरेच साऊथ इंडियन्स आवडीने खातात असे ऐकलेय तो पण करता येईल. तसेच भरल्या वांग्याची भाजी किंवा मिरचीका सालन पण बरेच हिट होते. तसेच चिन्नु म्हणते तसा दहिभात मस्ट आणि पोळ्या विकत आणता येतात का ते पहा.

कॉलिफ्लावरचा खीमा आणि ब्रेड किंवा बटाट्याचं कालवण (रस्सा नाही फिशच्या कालवणासारखच) भात. कोबीच्या वड्या (कांदा, आलं लसूण, कोथिंबीर, मिरची, बडिशोप, धणे, दालचीनीचा तुकडा, २-३ लवंगा, एखादा वेलदोडा घालून वाटण घालून वड्या). स्वीट डिश - कुलफी.

आमचे south indian शेजारी आमच्याकडे जेवायला आल्यावर आतापर्यंत सगळ्यात आवडलेले item ::
बगारा बैंगन , कांद्याची पुदिना घालुन चटनी (किंवा कांद्याची भरपुर पुदीना घालुन कोशिंबीर), अंबाडीची भाजी ,व्हेज बिर्याणी,सांडगे पापड (आपल्या पद्धतीचे.घरी केलेले),दही वडे, साबुदाण्याचे वडे, आमसुल घातलेली आमटी ( आणि रंगीत पाणि(ते मी करत नाही) Proud )

साउथ इन्डिअन लोकांना अजून एक आवड्लेला पदार्थ - फालूदा.... सर्व तयारी आधी करुन ठेवता येते. आणि लोकांना महीती देखिल नसतो हा पदार्थ. आणि भरपूर कौतूक होते Happy

मश्रूम मटर मसाला. ( हिरवे) जीरा राइस ( पांढरा) गाजर हलवा. ( केशरी) १५ ऑ. निमित्त.
कान्दा भजी. इत्क्या लोकांसाठी पोळ्या अशक्य आहे.

सगळ्यांना धन्यवाद.
हाका नूडल्स, चिली पनीर, एक-दोघे जण खातील त्यांच्यासाठी चिली चिकन, व्हेज फ्राइड राइस हे घरी करणार. चायना टाऊनमधून व्हेज अन चिकन डंपलिंग्ज आणणार.
देशी दुकानात कुल्फी फ्लेवर आइसक्रीम मिळालं तर फालुदा, नाहीतर रसमलाई .
असा बेत ठरलाय .

बघारा बैंगन, मिरची का सलान अन डबल का मीठा या आधीही दोन-तीन वेळा केलंय याच ग्रूपसाठी. पण त्यांना आवडतात हे प्रकार हे मात्र खरंय .

रोझ , मायबोली सर्च मध्ये तुम्ही थाई ग्रीन करी टाईपले की दिनेशदांची ही खालची रेसिपी मिळेल..

काहि थाई शाकाहारी पदार्थ.

थाई रेड करी

चार सुक्या कास्मिरी मिरच्या, ऊघडुन बिया काढुन कोमट पाण्यात दहा मिनिटे भिजवाव्यात. एक छोटा कांदा कापुन घ्यावा. आठ दहा लसणाच्या पाकळ्या सोलुन घ्यावा. मोठ्या असतेल तर चारच घ्याव्यात. अर्धा ईंच आले तुकडे करुन घ्यावे. लेमन ग्रास मिळाले तर एक काडी बारिक कापुन घ्यावी. आपल्याकडे बाजारात गवती चहाच्या पाती विकायला असतात, त्याचे झुडुप जवळ असले तर त्याचा जमीनीकडचा भाग घ्यावा. ( आपल्याकडे बाजारात फ़क्त पानेच विकायला असतात. ) ते नाही मिळाले तर एका छोट्या लिंबाची फ़क्त पिवळी साल किसुन घ्यावी. त्याच्या आतला पांढरा भाग घेऊ नये. दीड चमचा धणे, अ चमचा जिरे व पाच सहा मिरीदाणे जरा शेकुन घ्यावेत, पण आपल्यासारखे खमंग भाजु नयेत.
या सगळ्याची पेस्ट करायची आहे मिक्सरमधे केली तर आधी धणे, जिरे व मिरे बारिक करुन घ्यावे, व नंतर बाकिचे सामान घालावे. मिरच्या भिजवलेलेच पाणी वापरावे.
शक्य असेल तर दगडी खलात हे वाटावे. तो नसेल तर एखादा गोल दगड तरी घरात ठेवावा. ( तो ठिसुळ नसावा, नाहितर वाटणात त्याचे तुकडे येतात. ) दगडी खलात वाटले तरच याला छान चव येते.

आता मिळत असेल तर १०० ग्रॅम टोफ़ु किंवा पनीर तलोन घ्यावे. भाज्यांमधे बेबी कॉर्न, एक गाजर, आठ दहा ब्रोकोलि चे तुरे पाच सहा मश्रुम घ्यावेत, भाज्या आपल्या आवडीप्रमाणे घ्याव्यात. बांबुचे कोंब घेतले तर टिनमधले घ्यावेत. ताजे कोंब विषारी असतात व ते चोवीस तास कापुन पाण्यात भिजवुन ठेवावे लागतात. सगळ्या भाज्या कापुन घ्याव्यात.

तेल तापवुन त्यात हि रेड पेस्ट घालावी व परतावी. मग भाज्या घालाव्यात आणि एक कप नारळाचे दुध घालुन भाज्या शिजु द्याव्यात. मग त्यात आणखी एक कप नारळाचे दुध, अर्धा चमचा सोया सॉस, आणि लिंबाची पाने पाच सहा घालावीत. व भाज्या शिजु द्याव्यात ( ही लिंबाची पाने काफ़िर लाईम नावाच्या एका वेगळ्या लिंबाची असतात. त्यांचा आकार 8 सारखा असतो. या लिंबाचा आकार अगदी छोटा असतो व त्यात रस फ़ारच कमी असतो. लिंबापेक्षा पानाचाच ऊपयोग करतात. हि पाने नाही मिळाली तर कडीपत्ता वापरावा. ) भाज्या नीट शिजल्या कि तळलेले पनीर वा टोफ़ु घालावे. चवीप्रमाणे मीठ घालावे. चवीपुरती साखर व लिंबुरस घालावा. वरुन बासिल पाने किंवा तुळशीची पानी आठदहा घालावीत. भाताबरोबर खावी.

थाई ग्रीन करि

या करीची कृति वरच्याप्रमाणेच फ़क्त लाल मिरचीच्या ऐवजी हिरव्या मिरच्या आठ दहा घ्याव्यात.

भाज्यामधे झुत्सीनी, फ़रसबी, छोटी वांगी वैगरे घेता येतील.

थाई क्रिस्पी भाज्या

पाव कप तांदुळ वा तांदळाचे पीठ घ्यावे. पीठ मंद आचेवर जरा भाजुन घ्यावे. किंवा तांदुळ तसेच कोरडे भाजुन त्याचे पीठ करुन चाळुन घ्यावे. त्यात एक लेमन ग्रास बारिक चिरुन घालावे. पाऊण कप कॉर्न फ़्लोअर, एक टेबलस्पुन सोया सॉस, अर्धा चमचा मिरची पुड ( शक्यतो भरड, म्हणजे फ़्लेक्स ) व मीठ घालुन त्यात साधारण पाऊण कप थंडगार पाणी घालावे.

एक टेबलस्पुन लिंबाचा रस, एक टेबलस्पुन तेल, ४ कास्मिरी मिरच्या, १ टेबलस्पुन ब्लॅक बीन सॉस ( बाजारात मिळतो ) ३ टेबलस्पुन तयार मॅंगो चटणी वा चिंचेचा कोळ, १ टेबलस्पुन सोया सॉस, १ ईंच दालचिनी, एक टेबलस्पुन टोमॅटो केचप, एक टेबलस्पुन मध आणि मीठ हे सगळे बारिक वाटुन घ्यावे. बीन सॉस नाही मिळाला तर सोया सॉस जास्त घालावे.

आता फ़्लॉवर, ब्रोकोलि, मश्रुम, बेबी कॉर्न, सिमला मिरच्या, भेंडी, वांगी याचे लांबट तुकडे करुन घ्यावेत. सर्व भाज्या साधारण चार कप असाव्यात.

या सगळ्या भाज्या कॉर्नफ़्लोअरच्या मिश्रणात बुडवुन तेलात कुरकुरीत तळुन घ्याव्यात. काहि सिमला मिरच्यांचे तुकडे बाजुला ठेवावेत.

खायच्या वेळी तेल तापवुन त्यात १ टेबलस्पुन लसुण पेस्ट घालावी. एका कांध्याचे आठ तुकडे करुन परतावेत, त्यात सिमल्या मिरच्यांचे बाजुला ठेवलेल तुकडे घालावेत
मग त्यात वाटण घालावे. २ मिनिटे परतुन त्यात पाव कप पाणी घालावे. त्यात तळुन घेतलेल्या भाज्या घालुन हलक्या हाताने परतावे. वरुन बसिल वा तुळशीची पाने घालावी. हवी तर फ़ोडणीत एखादी हिरवी मिरची परतुन घ्यावी.

Hi,
४ वर्षाच्या मुलांना (१५ ते २० जणांसाठी ) वाढदिवसाचा खाऊ काय द्यावा ? शाळेत द्यायचा आहे. सगळे अमेरिकन आहेत. टिचर म्हणतात गोड नको. शुगरने मुल hyper होतात.

Pages