कॅलिफोर्निया २०१५ : (४) डिस्नीलँड, लास वेगास, ग्रँड कॅनियन

Submitted by मामी on 3 August, 2015 - 10:55

आधीचे भाग -
कॅलिफोर्निया २०१५ : (१) ट्रिप - एक आखणे
कॅलिफोर्निया २०१५ : (२) पूर्वतयारीचे तपशील
कॅलिफोर्निया २०१५ : (३) लॉस एंजेलिस

११ तारखेला सकाळी मेट्रोनं डाऊनटाऊनमधल्या 7th Street / Metro Centre Station ला उतरलो आणि स्टेशनबाहेरूनच अनाहिमला जाणारी बस पकडली. या बसनं आम्हाला प्रचंड फिरवलं फिरवलं आणि एकदाचं डिस्नीच्या हॉटेलात आणून सोडलं. अर्धादिवस गेला होता. पण उरलेला दिवस घालवला आम्ही डिस्नीलँड पार्कात.

डिस्नीलँड मध्ये जास्तीतजास्त राईडस कमीतकमी वेळात करण्याचे काही फंडे आहेत. नेटवर सगळे आणि त्याहूनही अधिक कितीतरी टिप्स, चीट्स वगैरे उपलब्ध आहेत. उदा. पार्क हॉपर टिकेट्स, मॅजिक आवर, फास्ट-पास सिस्टिम, पेरेंट स्वॉप सिस्टिम, वर्षातील कोणकोणत्या दिवशी कमी गर्दी, आठवड्याच्या कोणकोणत्या दिवशी कमी गर्दी, कोणत्या क्रमानं राईडस कराव्यात असं बरंच काय काय आहे. अगदी अ‍ॅप्सही निघालीयेत. वाचून गेलं की सोईचं पडतं. राईडस व्यतिरीक्त इतर अनेक शोज असतात. त्यांच्या वेळा ठिकठिकाणी लावलेल्याही असतात. या शोजचे पासेस आधीच घेऊन ठेवावे लागतात तरच आत प्रवेश मिळतो.

डिस्नीच्या पार्कांत चालायला मात्र चिक्कार लागतं. एक दोन दिवसांत पार्कस करायचे तर भारी धावपळ होते. पण एकंदरीत वातावरणात इतका उत्साह दाटलेला असतो की आपणही त्या उत्साहात मस्त सामिल होऊन जातो. या पार्कांचे वार्षिक पासेसही असतात ते तसे घेऊन सुट्टीच्या दिवशी बच्चेकंपनीला घेऊन येणारे कितीतरी जणं. पण केवळ लहान मुलंच नव्हे अगदी म्हातारेकोतारेही किती उत्साहानं पार्कात बागडत असतात ते पाहून आनंद वाटतो. आमच्याकडे चार दिवस होते त्यामुळे वेळ भरपूर होता.

डिस्नीमध्ये पहिल्याच दिवशी संध्याकाळी एका पिझ्झेरियात पिझ्झा खाल्ला आणि मग बिल भरताना क्रेडिट कार्ड चुकून विसरलो. लक्षात आलं त्यावेळी आम्ही पार्काच्या दुसर्‍या टोकाला होतो. मग त्या रेस्टॉरंटाला फोन करून सांगून ठेवलं आणि रात्री परत जाताना कार्ड ताब्यात घेण्याचं ठरवलं. तसं ते घेतलंही. पण या घटनेमुळे पुढे एक महान रहस्य निर्माण झालं ते आत्ता परवा उलगडलं.....

झालं काय की, डिस्नीचा मुक्काम सोडल्यावर एकदा क्रेडिट कार्डावर केलेल्या खर्चाचे बँकेकडून आलेले स्टेटमेंट बघत असताना ११ जूनला कोणत्यातरी रायगडमधल्या एका हॉटेलात रु. ३,५००/- खर्च केल्याचे दिसत होते. आम्ही थक्क! हे कुठून आलं? हे कसं शक्य आहे? बरं त्या रेस्टॉरंटचं बिल वेगळं दिसत होतं. कार्ड त्या रेस्टॉरंटमध्ये ३-४ तास राहिलं असेल पण ते तर कोणा जबाबदार व्यक्तीच्या ताब्यात असणार. समजा कोणी ते मुद्दाम वापरलं तरी रायगडमधल्या हॉटेलाकरता?????? चिडचिड होण्यापेक्षाही आम्ही प्रचंड अचंबित झालो होतो. पिझेरियाचा मालक भारतीय आहे की काय? त्याची एक शाखा डायरेक महाराष्ट्रात आहे की काय? अश्या कायच्याकाय शक्यता डोक्यात! रक्कम जास्त नव्हती पण हे रहस्य काय आहे याचीच उत्सुकता होती. ट्रिपमध्ये असताना या रहस्याचा पाठपुरावा केला नाही पण भारतात परत आल्यावर बँकेकडे तक्रार केली. त्यांनाही काही डिटेल्स देता येईनात. मग ते हॉटेल नेटवर शोधलं आणि फोटो बघून आठवलं की आपण मागे कधीतरी या हॉटेलात गेलो आहोत. पण माझ्या दादरच्या बहिणीला विचारलं तेव्हा खुलासा झाला की मागच्यावर्षी बरोबर ११ जूनला आम्ही सगळेच माझ्या आईच्या वाढदिवसानिमित्त त्या भागात फिरायला गेलो होतो आणि त्या रेस्टॉरंटमधे जेवलो होतो. ते बिल एक वर्षानंतर कसं काय क्लेम केलं गेलं देव जाणे!

१५ तारखेला सकाळी ८ वाजता लक्सबस अमेरिकानं आम्हाला आमच्या हॉटेलखालूनच पिक-अप केलं. आणि ५-६ तासात आम्ही लास वेगासला पोहोचलो. मधल्या रस्त्यात जे वाळवंट लागतं ते ही बघण्यासारखं. याच रस्त्यावर अमेरिकेतला सगळ्यात मोठा सोलार पॉवर प्रोजेक्टही आहे.

एले मध्ये आम्हाला चांगलं हवामान मिळालं होतं. एलेचा उन्हाळा फार काही जाणवला नाही कारण हवा ढगाळच होती. संध्याकाळी थंडही होत होतं. मात्र लास वेगास ला भट्टी धडाडून पेटलेली. चपात्या लाटून रस्त्यावर ठेवल्या तर २ मिनिटांत भाजून निघतील अशी महाभयानक गरमी. गरम वारा अगदी पार रात्रीपर्यंत तसाच गरम असायचा. सकाळी ५ -५.३० वाजता कडकडीत उन्हं. आणि ही म्हणे केवळ सुरूवात होती. बापरे! कसे काय राहत असतील लोकं? लास वेगासची सुप्रसिद्ध हॉटेल्स आतून पाहिली. कसिनो मध्ये जाऊन खेळण्याची हौस काय, इच्छाही आम्हा दोघांकडे नाहीये. त्यामुळे ती एक मुख्य अ‍ॅक्टिविटी ऑप्शनला. खरंतर मायबोलीकर चिन्नूनं खास फोन करून खूप काही काही टीप्स दिल्या होत्या. पण त्या काही वापरल्या गेल्याच नाहीत. तरीही थँक्यू गं चिन्नू. Happy इथेही एलेच्या वेगास बफेसारखा एक बफे सापडला - तोडाई बफे. झक्कास!

लास वेगासला आल्यावर ग्रँड कॅनियनला जाणार्‍या टूर्सची चौकशी सुरू केली. ठिकठिकाणी त्यांचे बुथ्स असतातच. सर्वजण हेच सांगत होते की आम्ही एक दिवस जाणार आणि दोन रात्री राहून येणार असलो तरी दोन्ही वेळी पूर्ण दिवसाच्या टूरचे पैसे भरावे लागतील. कारण अर्थात आमच्या तीन सीटस त्यांना तशाच राखीव ठेवाव्या लागतील. पण आम्ही चौकशी सुरू ठेवली. आणि मग एक टूर कंपनी सापडली - स्वीटटूर्स नावाची. जाताना आणि येताना फक्त त्या त्या एका वेळचे पैसे द्यावे लागणार होते. एकदम परफेक्ट! शिवाय जाताना हूवर डॅमदेखिल बघायला घेऊन जाणार होते. चला जशी हवी तशी टूर मिळाली. आणि खरचं अतिशय छान व्यवस्था होती स्वीटटूर्सची. सर्व पॅसेंजर्सना त्यांच्या त्यांच्या हॉटेलातून पिक-अप करून एके ठिकाणी गोळा करून मग टूर्सप्रमाणे वेगवेगळ्या बसेसमध्ये बसवून नेतात. दोन्ही वेळेस आमचे बसचालक कम गाईड अतिशय छान होते. भरभरून माहिती सांगत होते. बसमध्ये सकाळचा नाश्ता बॉक्सेस मधून दिला. पूर्णवेळ ज्यूस, कोल्डिंक्स, थंड पाणी होतं. जाताना मध्ये दोन स्टॉप्स, येताना एक स्टॉप. एकदम शिस्तशीर काम! खूश झालो. तुम्हाला सगळ्यांनाच मी ही टूरकंपनी रेकमेंड करेन.

कोणत्याही हॉटेलरूममध्ये असतो तसा बेलाजिओच्या हॉटेलात फ्रिज होता. रूममध्ये गेल्या गेल्या जवळच्या काही खाद्यवस्तू ठेवाव्यात म्हणून मी फ्रिज उघडला तर तो खचाखच भरलेला. दारवा, स्नॅक्स, चॉकलेटं वगैरे इतरही हॉटेलांतून ठेवलेली असतात. या वस्तू सहसा कॉम्प्लिमेंटरी नसतात (जे काही कॉम्प्लिमेंटरी असतं त्यावर तसा टॅग लावलेला असतो.) म्हणजे आपण जर त्यातील काही वस्तू वापरली तर त्याचे पैसे भरावे लागतात. पण मी आधी कधीही फ्रीज असा भरगच्च भरलेला पाहिला नव्हता. ' काय की बाई, असेल इथली पद्धत. आता जागा करायला हवी' असा विचार करत आतील सामानाची हलवाहलव करणार इतक्यात नवरा मागून ओरडला ' खामोश! अज्जिबात सामान हलवू नकोस.' तो फ्रीज नव्हताच मुळी. ते एक कपाट होतं - छोट्या फ्रीजसारखं दिसणारं. आणि ती सिस्टिम अशी की आतली एखादी वस्तू तुम्ही नुसती जागेवरून उचलली तरी त्याखाली असलेल्या सेन्सॉरवरून ती हॉटेलच्या सिस्टिमला कळणार आणि त्या वस्तूचे पैसे तुमच्या रुमवर लागणार. मग तुम्ही ती वस्तू वापरा किंवा पुन्हा परत तिच्याजागी ठेऊन द्या. काय त्रास! मी फोटूच काढून घेतलाय त्या फ्रीजचा.

पण मंडळी, सावध रहा.

ग्रँड कॅनियन! हा एक महान अनुभव आहे. आम्ही आधी हे प्रकरण एका दिवसात उरकू पहात होतो ते नंतर इथे दोन रात्री राहण्यापर्यंत प्रगति झाली. आणि योग्य निर्णय घेतला गेला याचा आनंद झाला.

सर्वसामान्य पर्यट्कांसाठी ग्रँड कॅनियनच्या दोन भागांत भेट देण्याची सोय आहे - साउथ रिम आणि वेस्ट रिम. तसं नॉर्थ रिमही आहे पण ती सिरीयस हायकर्स, शांतपणे फोटोग्राफी वगैरे करणार्‍या लोकांसाठी. पैकी वेस्ट रिम ही रुढार्थानं ग्रँड कॅनियन नॅशनल पार्कचा भाग नाही. पण तिथे रहात असलेल्या नेटिव्ह अमेरिकन हावासुपाई जमातीच्या मालकीच्या जागेवर आहे. इथून जो ग्रँड कॅनियन दिसतो तो साऊथ रिमवरून दिसणार्‍या ग्रँड कॅनियनच्या तुलनेत काहीसा उणाच आहे खरंतर. पण इथेच तो सुप्रसिद्ध काचेचा वॉकवे बांधलाय जेणेकरून इथे टुरिस्ट येत राहतील आणि त्या जमातीला अर्थार्जन होत राहिल. शिवाय वेस्ट रिम ही लास वेगासहून अगदी जवळ पडते. त्यामुळे एका दिवसात ट्रिप करण्यासाठी ही योग्य ठरते. साऊथरिमची एका दिवसाची ट्रिप बरीच दगदगीची होऊ शकते. बर्‍याचश्या हेलिकॉप्टर टूर्स वेस्ट रिमलाच घेऊन जातात.

पण साऊथ रिमवरून खर्‍या अर्थानं ग्रँड कॅनियन भेटतो. (मी नॉर्थ आणि इस्ट रिम इथे धरल्या नाहीयेत. पहिल्यांदा ग्रँड कॅनियनला भेट देणारे साऊथ किंवा वेस्ट रिमवालेच असतात.) अनेक पॉइंटस आहेत आणि प्रत्येकावरून कॅनियनचं वेगळं स्वरूप दिसतं. खाली उतरून जाणारे ट्रेल्सही आहेत. खेचरावरूनही ट्रेल्स करता येतात. पार्कात फिरण्यासाठी वीजेवर चालणार्‍या बसेस आहेत. त्यामुळे अगदी या टोकापासून त्या टोकापर्यंतचे सगळे पॉइंट्स कव्हर करता येतात. कुठेही उतरा, त्या ठिकाणचा कॅनियन मनसोक्त पहा आणि पुढची बस पकडून पुढच्या पॉइंटवर जा. चंगळ. पार्काचं व्हिजिटर सेंटरही मस्त आहे. खूप माहिती मिळते.

आम्ही राहिलो होतो त्या दरम्यान या पार्कात स्टारपार्टी नावाचा रेंजरचा आकाशदर्शनाचा कार्यक्रम सुरू होता. त्या दिवशी सूर्य मावळता मावळता म्हणजे सुमारे ७.३०-७.४५ च्या दरम्यान आम्ही मेन व्हिजिटर सेंटरमागच्या कार पार्किंगपाशी पोहोचलो. तिथे गेले काही दिवस आपापले टेलिस्कोप्स घेऊन हौशी आणि प्रोफेशनल खगोलप्रेमी मंडळी हजेरी लावून होती. कसले भारी टेलिस्कोप्स होते. कोणी सूर्यावर, कोणी चंद्रावर, कोणी गुरूवर, कोणी मंगळावर फोकस लावून बसले होते. आम्ही जमलेले सगळे एका टेलिस्कोपवरून दुसर्‍या टेलिस्कोपवर अश्या उड्या मारत मेजवानी चाखत होतो. बघायलाही मिळत होतं आणि माहितीही मिळत होती. एकतर काही मिलियन डॉलर्समध्ये किंमत जाईल असा एकदम स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजी असलेला टेलिस्कोप होता. त्यातून आम्ही चक्क दुसरी एक गॅलक्सी पाहिली. महान!

मग रात्री ९ वाजता रेंजरचा कार्यक्रम तिथेच सुरू झाला. जवळजवळ २००-२५० लोकं पूर्ण अंधारात उभी राहून आकाशाचं अदभूत जाणून घेत होते. किती सुरेख अनुभव होता तो.

दुसर्‍या दिवशीची संध्याकाळ खास कॅनियनच्या सूर्यास्ताकरता राखून ठेवलेली. सनसेट पॉइंट म्हणून प्रसिद्ध असलेल्या हुपी पॉइंटवर जमलेल्या गर्दीत आम्हीही होतो. चिक्कार फोटो काढले पण हवामान खूप उत्तम नसल्याने खास नाही आलेत.

एक नितांत सुंदर अनुभव घेऊन आम्ही २० तारखेला लास वेगासला परत आलो. आणि २१ तारखेला पुन्हा एकदा लक्सबसनं एले डाऊनटाऊनमध्ये रहायला आलो.

(क्रमशः)

पुढचे भाग -

कॅलिफोर्निया २०१५ : (५) पुन्हा एकवार एले
कॅलिफोर्निया २०१५ : (६) पॅसिफिक कोस्टल हायवे
कॅलिफोर्निया २०१५ : (७) लॉस आल्टोसचा मुक्काम
कॅलिफोर्निया २०१५ : (८) सॅन फ्रान्सिस्को

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलय.
तुम्ही हॉटेल रुम घेताना सांगु शकता की तुम्हाला मिनी फ्रिज रिकामा करुन हवाय. मग त्यांचाच स्टाफ येऊन रिकामा करुन जातो आणि आपण फ्रिज वापरु शकतो.

बाप्रे तेरी और क्रेडिट कार्ड की अजब कहानी है .. Happy

मस्त ट्रिप.. नो विजिटिंग कसीनो इन वेगास??? आणी ते जरा आऊट्स्कर्ट्स्वर असलेले आऊटलेट मॉल्स पाहिले कि नै?? सुपर डील्स मिळतात तिथे ब्रँडेड गुड्स वर!!!

हेलीकॉप्टर राईड मधून ग्रँड केनियन छान दिसला होता पण कोलाराडो, निळ्याशार अजगरा सारखी दिसली होती..

तुझी बाय रोड जाण्याची आयडिया भारी आवडली.. नेक्स्ट टैम..!!!

भारीच आहे हे Happy निवांत वेळ देऊन सोयी बघून सुशेगात भटकण्याची ही स्टाईल खुपच आवडली. नुसतं वाचतानासुद्धा इतकी मजा येतेय.. आम्हाला पण मस्तपैकी सोबत फिरवतेयस.

चारही भाग सलग वाचून काढले! बाप रे.. गरगरायला लागलंय मला Lol

धन्यवाद मंडळी.

तुम्ही हॉटेल रुम घेताना सांगु शकता की तुम्हाला मिनी फ्रिज रिकामा करुन हवाय. मग त्यांचाच स्टाफ येऊन रिकामा करुन जातो आणि आपण फ्रिज वापरु शकतो. >> माहितीबद्दल धन्यवाद, मकु.

दिनेशदा, फोटो टाकले आहेत. बाकी अगदी नेहमीच्या यशस्वी पर्यटन स्थळांचे फोटो टाकणार नाहीये. जर काही वेगळं ठिकाण वगैरे असेल तर टाकेन.

साहिल शहा, वर्षुताई, ......... Lol आम्ही क्रे. कार्डाला खूप कामाला लावलं होतं त्यानं त्याचा वेळोवेळी सूड घेतला बहुतेक.

मामी छान लिहिल आहे. आवडतेय ही सिरीज.

एक अवांतर - ग्रँड कॅन्यन मधून वाहणार्‍या कोलोरॅडो नदीच नाव पूर्वी ग्रँड रिव्हर होत. त्या नावावरून ह्या कॅन्यन च नाव ग्रँड कॅन्यन पडल.

मस्त झालाय हा सुद्धा भाग मामी.

ग्रँड कॅनियन साऊथ रिम खरच खुप सुंदर आहे. आम्ही वेगास हून रात्री निघून तिथे सन राईज बघायला गेलो होतो. वेगास मध्ये दुपारी ८० फॅ असताना इकडे सकाळी ३० फॅ तापमान होते आणि सगळी लोकं कुडकुडत होती. पण सूर्य वरती यायला लागला आणि त्या डोंगरांचे रंग बदलायला लागले की सगळं बाकी विसरून भान हरपले.

पुढच्या वेळेस कॅनियन मध्ये खाली उतरून मुक्काम करायचा आहे आता. Wink

मस्त! ग्रॅन्ड कॅनियन हे प्रकर्ण एकदा पहायचंय!
आणि बाय रोड काय मज्जा !
आम्ही असंच एकदा ओनलाइन कार हायर करून दोघीच (मी आणि लेक) मस्त २ दिवस फिरलो होतो.
बफेलोपासून नायगारापर्यन्त. मग नायगारा बघून झाल्यावर फ्लाइट डीलेमुळे हातात ४/५ तास होते. तेव्हा जवळच्या वायनरीज पहात गेलो. सगळं सुंदर कन्ट्रीसाईड! . आयुष्यातलं पहिलं आणि (बहुतेक शेवटचंही) वहिलं वाइन टेस्टिन्ग केलं होतं. गावाचं नाव आठवत नाही. ल पासून काहीतरी होतं छोटंसं सुंदर गाव. बहुतेक लॉकपोर्ट नाव होतं गावाचं.