मका + कांद्याचं थालीपीठ

Submitted by योकु on 17 July, 2015 - 15:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- २ स्वीट्कॉर्न्स
- २ कांदे
- २ हिरव्या मिरच्या
- मूठभर कोथिंबीर
- वाटीभर कणीक (गव्हाचं पीठ)
- अर्धी वाटी ज्वारीचं पीठ (ऑप्शनल)
- पाव ते अर्धा टी-स्पून लाल तिखट
- अर्धा टी-स्पून हळद
- चवीपुरतं मीठ
- अर्धा चमचा जिरं
- तेल, थालीपीठं भाजायला

क्रमवार पाककृती: 

- मक्याच्या कणसाचे दाणे काढून घ्यावेत. धूवून एका मिक्सरपॉट्मध्ये ठेवावे. यात जिरं घालून वाटून घ्यावं. खातांना मधे-मधे दाणे आलेले आवडत असतील तर ओबडधोबड वाटले तरी चालतील.
- कांदा, कोथिंबीर आणि मिरच्या शक्य तितक्या बारीक चिराव्या
- वाटलेला मका, चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर सगळं एकत्र करावं. यात मीठ, लाल तिखट, हळद, (आवडत असेल तर दोन चिमूट ओवा) मीठ घालावं.
- नीट एकत्र करावं. यात आता हळूहळू पीठं घालावी. थोडं पाणी वापरून थालीपीठाचं पीठ तयार करावं. (थोडं थलथलीत असतं हे पीठ)
- या पीठाची चव घेऊन पाहावी. थोडं तिखट लागायला हवं या स्टेजला.
- नॉन्स्टीक तव्यावर चमचाभर तेल घालून बेताच्या आकाराची थालीपीठं लावावीत. तेल घालून खरपूस झाल्यावर गरम गरम थालीपीठ लोण्याच्या गोळ्याबरोबर, सॉसबरोबर खायला द्यावीत.

ThaaleepeeTh.jpg

वरच्या फोटोतला सॉस, चटपटा सॉस मिळतो तो आहे.

वाढणी/प्रमाण: 
वरच्या प्रमाणात बेताच्या आकाराची ४ ते ५ थालीपीठं व्हावीत.
अधिक टिपा: 

- यात घेतलेलं सगळंच साहित्य कच्चं आहे. त्यामुळे पेशन्स ठेवून मंद आचेवर थालीपीठं नीट आतपर्यंत शिजू द्यावी. तसंही थालीपीठ खूप घाईघाईत केलं तर नीट होत नाही हा अनुभव आहे.
- मका + कांदा यांची थोsssडी गोड पण मस्त चव जाणवते.
- यामध्ये विशेष वेगळं असं काही नाही, एक वेगळं कॉम्बो वापरून नेहेमीसारखी थालीपीठं केली, मस्त लागली चवीला म्हणून इथे शेअर करतो आहे.
- भरपूर लोण्याबरोबर गरमगरम मटकावली असता खूपच चविष्ट लागतात; सुस्ती येते. तस्मात नंतरच्या वाम/दक्षिण/ उत्तर/पूर्व कुक्षीची सोय आधीच पाहून ठेवावी.

माहितीचा स्रोत: 
बायडी ;)
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यम्मी! थालिपिठ कसही कधिही आवडत , गोडुस चव न आवडणार्‍या नाखट लोकानासाठी कॉर्न वगळला जाइल.

अर्धी वाटी ज्वारीचं पीठ (ऑप्शनल)>> हे मस्ट आहे नाहितर मग त्याला धिरडे म्हणावे लागेल.

मस्तच पण ना तू ना अजून फोटो द्यायचे असते. खरे तर थेट पदार्थाचा फोटो फार उपयोगी पडत नाही. त्याच एवजी जर प्रोसेसींगचे फोटो असेल तर जास्त बरे पडतात.

मधे इथे कुणीतरी नुस्त कांद्याच थालीपीठ दिलं होत. इतके बदाबद कांदे. कांद्याचा उपयोग कितपत करावा ह्याबद्दल बहुतेक सुगरणीला माहिती नसाव. जाऊ दे..

कालच स्विटकॉर्न मका आणला, त्यामुळे आता हे थालिपिठ नक्की करुन पाहते.

कांद्याचे थालिपिठ वाचुन उत्सुकता चाळवली कारण मला कांदा आवडतो. थालिपिठाची कृती सापडली. त्याखालच्या कमेंटी खुप मनोरंजक वाटल्या पण वरची कमेंट मात्र १८० अंशात फिरलेली आहे.

http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/116006.html?1157634594

मस्त य दिसत य..

गोडुस चव न आवडणार्‍या नाखट लोकानासाठी कॉर्न वगळला जाइल. >> मलाही नाही आवडत गोडूस चव पण कॉर्न असलेले स्पाईसी पदार्थ आवडतात..

च्च साधना, तू नेमकी तीच लिंक दिलीस ज्याबद्दल मी बोलत होते. Uhoh
योकु, रात्रीतून प्लेट फिरवलीस का रे? कालच्या फोटोत सॉस उजव्या हाताला होता.

नाही तर! प्लेट तशीच आहे. मला आताही सॉस उजव्याच हाताला दिसतोय.
मी आज सकाळी फोनवरून पाहीलं तेव्हा मात्र फोटो उलटा दिसत होता. नकळे काय जादू ती! Uhoh

छान आहे पण मी स्वीट्कॉर्न्सऐवजी गावठी मका वापरेन, मला नाही आवडत ते.

मी थालीपीठ नेहेमीच नुसत्या कांद्याचं न करता एखादी पालेभाजी किंवा कोबी, दुधी असं टाकतेच कांद्याबरोबर. आता मक्याचे दाणे टाकून करेन.

आम्ही भाजणीचं करतो थालीपीठ. क्वचित भाजणी नसेल तर विविध पिठांचे करते.

२००६ ते २०१५!समथिंग्ज नेव्हर चेंज!!! Lol

मी तांदळाचंव्ज्वारीचं पीठ वापरून थालिपीठं करते. कणकेची केली तर चिवट होतात. कणिक भाजून घेतली तर चिवट होणार नाहीत का?

कोरडी कणीक एका कपड्यात बांधून ती पुरचुंडी कूकरमधे १५ मिनिटे वाफवायची
मग कोरडीच चाळून घ्यायची. त्या कणकेचे पदार्थ चिवट होत नाहीत.

दिनेशदा, कणिक बंद डब्यात ठेवून वाफवायची का? कारण उघडी ठेवून वाफवली तर कदाचित वाफेमुळे ओलसर होऊन जाईल. आणि चाळायची कशाला हे कळले नाही. मी तर कणिक कधीच चाळत नाही. आई मात्र दळून आणते आणि म्हणून कदाचित चाळत असेल. पण मी पिल्सबरीची कणीक वापरतो आणि चाळत नाही. उलट कोंडा वाया जाऊ देत नाही जेंव्हापासून फायबरबद्दल कळले. हे मला कधीतरी २००६ नंतरच कळले.

नंदीनी. अपने अंदर भी कभी कभार झांककर देखा करो. मै वही.. दर्पण वही..

योकु कृती चटकदार आहे. बरय नवीन प्रयोग आवडलाय. रोज तेच ते पोहे उपमा खाऊन कन्टाळा आलाय. पण मका घातलाय म्हणून सॉस आहे का? लोणी किन्वा लोणच्या बरोबर छान वाटेल ना?

योकु फोटो मस्त.
अन्जूला सेम पिंच. नेहमी भाजणीचे थालिपीठच होते, आता कधीतरी असे मिश्र पीठाचे करून बघेन. सगळी पिठं असतात घरात खरंतर.. पण थालिपीठ म्हणजे भाजणीलाच हात जातो.
थालिपीठात घालण्यासाठी मिनि फुप्रोमध्ये कांदे/ कोबी/ मेथी/ दुधी/ पालक इत्यादी बारीक चिरून घेतलं की पुरेसं ओलसर होतं. जास्त झिगझिग होत नाही.

केल केल मी पण केल, एकटी पुरतच केल आणी ,..थालिपीठात कॉर्न? काहीही... ह चे! तुच्छ कटाक्ष परतवुन लावत खाल्ल..भारी लागत.