पपईचे धपाटे

Submitted by अंजली on 29 June, 2015 - 14:22
papaiche dhapate
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चांगल्या पिकलेल्या, गोड असलेल्या पपईचे तुकडे २ मोठया वाट्या
पाच सहा भाकरी होतील एवढे ज्वारीचे पीठ
२ चमचे डाळीचे पीठ
१ चमचा ओव्याची पूड
२-३ चमचे तीळ
१-२ चमचे धने जीरे पूड
हव्या त्या प्रमाणात तिखट
मीठ
हळद
आवडत असल्यास बारीक चिरून कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

पपईच्या तुकड्यांचा मिक्सरमधे रस करून घ्या.
ज्वारीच्या पिठात सर्व जिन्नस मिसळून भाकरीच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवून घ्या. भिजवताना अजिबात पाणी घालायचे नाही.
भाकरीसारखेच पिठावर थापून घ्या.
भाजताना तव्यावर पीठ लावलेली बाजू येईल अशा पद्धतीनं टाका.
दोन्ही बाजूनं तेलाचा हात लावून भाजून घ्या.
खाताना बरोबर तूप, लोणी किंवा दही, ताक-दूध, दही-दूध घ्या. मिरचीचा ठेचा किंवा दाण्याची चटणी, जवसाची चटणी वगैरे बरोबर मस्त लागतो.

वाढणी/प्रमाण: 
५ ते ६ मोठे धपाटे होतील.
अधिक टिपा: 

भाजताना पाणी लावायचे नाही. तसेच थेट आचेवर न भाजता तव्यावरच भाजायचे.
धपाटे २-३ दिवस (भारतातल्या हवामानात) सहज टिकतात. इथे ४ दिवस तरी टिकायला हरकत नाही. त्यामुळे जेष्ठ नागरीकांसाठी प्रवासाला जाताना खाण्याच्या पदार्थांसाठी उत्तम पर्याय आहे. लाल भोपळा घालूनही सुरेख होतात. पपई, भोपळा नसेल तर नुसता कच्चा मसाला, भरपूर तीळ, ओवा घालूनही छान होतात.

माहितीचा स्रोत: 
आई, काकू.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेगळाच आहे प्रकार. मस्त वाटतोय. गोड-तिखट काँबो कसं लागत असेल? चाखून पाहायला हवं.
फोटो बेश्ट. सुरेख दिसतायत धपाटे. Happy

योकु,
किंचीतसं गोड - तिखट काँबो मस्त लागतं. शिवाय बरोबर चटण्या, ठेचा किंवा कुट्टा असेल तर गोड चव एवढी जाणवत नाही.
टिना,
थेट आचेवर भाजायचा नाही. तव्यावरच भाजायचा.

मंजूडी,
लाल भोपळा शिजवून त्याची प्युरी करून घ्यायची. घारग्यांसाठी करतो तशीच. पण आमच्यात भोपळ्याचे घारगे करत नाहीत, धपाटीच असतात ;).

मला पपईचे धपाटे माहित नव्हते. उसाचे धपाटे, पडवळाचे धपाटे तर कधी कधी नुसत्या हातानेच धपाटे मारलेले आहेत.
Happy

अरे वा... मस्त प्रकार ....

मुलगी पपई खात नाही. ह्या प्रकारात नक्की खाईल....

करण्यात येतिल....

मस्त दिसताहेत. तोंपासु..
पण मला मुळात भाकरीच धडपणे थापता येत नाही - त्यावर ती उचलून तव्यावर टाकायची... तेव्हा कितपत जमणार हा प्रश्न्च आहे Proud

ओक्के अंजली.

घारग्यांपेक्षा हेच आवडेल जास्त. कारण घारगे गोड. कधीतरीच (पक्वान्न म्हणून) खायला छान. मी एरवी कच्चा भोपळा किसून कणीक घालून पराठे करते. आता ज्वारीचं पीठ वापरून हे धपाटे करून बघेन नक्की.

वा ! मस्त दिसत आहेत ! रंग सुरेख.
इथे आम्ही आणलप्ल्या ज्वारीच्या पिठाच्या भाकर्‍या अजिबात चांगल्या होत नाहीत. हा प्रकार करून बघितला पाहीजे.

Pages