पुडाची वडी/ कोथिंबीरवडी/ सांभारवडी

Submitted by योकु on 6 July, 2015 - 13:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

- २ मोठ्या जुड्या कोथिंबीर
- २ ते २.५ वाट्या बेसन/ चण्याच्या डाळीचं पीठ
- दोन चमचे खसखस
- तीन चमचे सुकं खोबरं
- तीन चमचे चारोळी
- दोन चमचे पांढरे/ लाल तीळ
- लाडात असाल तर थोडे काजू, बेदाणे (शक्यतो घालत नाही या पदार्थात)
- दोन चमचे घरचा काळा मसाला
- एक चमचा तिखट (मिसळणाच्या डब्यातल्या चमच्यानी) किंवा आवडीनुसार जास्त ही घेता येईल.
- अर्धा चमचा हळद
- चवीनुसार मीठ
- भक्क्क्क्कम तेल (वडी भर तेलात तळायची असते)

वर तिखटाकरता सोडून जी चमच्याची मापं दिली आहेत ती आपल्या नेहेमी खाण्याकरता वापरायच्या चमच्याची आहेत.

क्रमवार पाककृती: 

- कोथिंबीर निवडून, साफ करून, धुवावी. कपड्यावर, कागदावर पसरून पाणी नीट सुकू द्यावं. यात थोडंही पाणी राहाता कामा नये.
- आता ही स्वच्छ केलेली कोथिंबीर बारीक चिरावी. चिरलेली कोथिंबीर कमीतकमी ४ ते ५ ओंजळीभरून तरी व्हावी.
- एका कढईत तेलावर खसखस भाजून घ्यावी. तीळ- चारोळीही भाजावी. सुकं खोबरं सुद्धा परतावं. एका ताटलीत हे सगळं एकत्र करून जरा चुरून घ्यावं. फार नको. चारोळी, खोबरं हे जाणवलं पाहीजे.
- चमचाभर तेलाची फोडणी करून त्यात थोडं हळद/ तिखट परतून घ्यावं त्यातच चुरलेलं मिश्रण घालावं. नीट सगळं कालवून हे कोथिंबीरीत घालावं. यात मीठ घालावं. कोथिंबीर फोडणीत टाकायची नाही. तिला पाणी सुटेल न काहीच करता येणार नाही.
- चण्याच्या डाळीत तेलाचं मोहन, हळद, तिखट, मीठ घालून घट्ट भिजवून गोळा तयार ठेवावा.
- एका पसरट ताटलीत, तेल + काळा मसाला + चिमूटभर मीठ असं कालवून तयार ठेवावं.
- आता चण्याच्या भिजवलेल्या पिठाची बेताची पोळी लाटावी. पीठ वापरू नये लाटतांना. हवं तर तेलाचं बोट लावावं. पोळी समपातळीत हवी. तशीच फार पातळही नको अन फार जाडही नको. नाहीतर सारण भरल्यावर / तेलात फुटण्याची भिती.
- यावर तेल + मसाल्याचं मिश्रण हातानी नीट अन भरपूर लावावं.
- भरपूर कोथिंबीरीचं सारण घालावं. घट्ट पॅक करावं त्रिकोणी लंबाकारात. खुळखुळा होता कामा नये. नीट सगळीकडून बंद करावं. हेच खरं किचकट काम आहे कारण सारण त्यामानानी कोरडं असतं. अश्या सगळ्या वड्या करून ठेवाव्या. ओलसर नॅपकिन खाली ठेवल्या तर सुकणार नाही.
- आता या वड्या भर तेलात तळाव्या. तेल खूप गार नको पण अगदीच कडकडीतही नको.
- सोनेरी रंगावर काढाव्यात. एकाचे दोन तुकडे करावे सुरीनी. गरम गरम सर्व कराव्या Happy

वाढणी/प्रमाण: 
खाल तसं. वरच्या प्रमाणात ४ लोकांच्या जेवणात साईड-डिश म्हणून पुराव्यात.
अधिक टिपा: 

- हवं असेल तर कांदा-लसूण आधी फोडणीत परतून घेऊ शकता. हिरवी मिरचीही घालता येईल.
- आलं शक्यतो वापरत नाही यात
- सारणात एका लिंबाचा रस पिळला तर एक छान चव येते.
- पिठाच्या पोळीला लावण्याकरता मसाल्याचं जे मिश्रण सांगीतल आहे, त्यात काही लोक्स जरा चिंचेचा कोळही घालतात. त्यामुळे एक अ‍ॅडेड टँग मिळतं.
- कोथिंबीर ही चिरावीच लागते. तीही बारीक. फुप्रोतून काढाल तर गिचका होऊ शकतो.
- बेस्ट उपाय म्हणजे आदल्यादिवशीच कोथिंबीर निवडून, धूवून सुकत ठेवावी.
- लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की कोथिंबीर गरम कढईत घालायची नाही. तिला पाणी सुटलं तर खेळखंडोबा. शंका असेल तर फोडणीही जरा गार करून घालावी.
- बरोबर श्रीखंड करायची पद्धत आहे. कढीबरोबरही या उत्कृष्ट लागतात. (नागपूर ला डिस्ट्रिक्ट कोर्ट्जवळ या वड्या कढीसोबत मिळतात. अप्रतीम!)
- चवीला अन पोटालाही लय भारी असतात.
- एखाद-दुसरी वडी समजा फुटलीच तर ती तळतेली कोथिंबीर वेगळी ठेवावी.
त्याचा फोडणीचा भात करावा - ती कोथिंबीर कढईत घ्यावी, त्यात साधा/ पांढरा भात मोकळा करून घालावा. मस्त पैकी परतून तिखट, मीठ पाहावं; अ‍ॅडजस्ट करावं; चविष्ट भात तयार!

माहितीचा स्रोत: 
आजी, स्वयंपाकाला येणार्‍या काकू
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मृण्मयीईईईईई! तू आणलेल्या पुडाच्या वड्यांची चव अजूनही जिभेवर आहे.

योकु, आयुष्यात पहिल्यांदाच पण भरपूर पुडाच्या वड्या खाल्ल्यात खास नागपुरहून आलेल्या. पदार्थ अगदी तोंपासु असला तरी एवढी खटपट असल्याने करेन की नाही माहित नाही.

इन द मीन टाइम, कुणी नागपुरात जाणार असाल तर बर्डी (सीताबर्डी)ला अभ्यंकर रोडवर, मुंजे पुतळ्याजवळ 'सुरुची' नावाचं दुकान आहे. आजुबाजूच्या हल्दीराम आणि इतर दुकानांच्या गर्दीत हे अगदी बकाल आणि छोटसं दुकान वाटतं. (वर्षानुवर्षं ते तसंच आहे.) तिथून पुडाच्या वड्या मागवता येतील. प्रवासात न्यायला स्पेशल पॅकिंग करतात. भरपूर तिखट, अजीबात मिर्च्या नकोत असल्या स्पेसिफिकेशन्ससगट करून देतात.
वड्या आपल्यासमोर प्याक करतात. (फक्त तंबाकू हातावर चोळणारा मालक आपल्या वड्या भरत नाही ना एवढी खात्री करा.)

योकु, धागा हायजॅक केल्याबद्दल माफ कर. Happy

पण मी काय म्हंते, ठाण्यापेक्षा बागराज्य काय किंवा शिट्टी काय तसं जवळ पडेल Proud

क्या बात है!! तातडीने रेसिपी टाकल्याबद्दल धन्यवाद! नक्की करुन पाहण्यात येईल. मी खाऊन आता २० एक वर्षं झाली असतील, पण गरम गरम पुडाच्या वड्यांची टेस्ट अजून जिभेवर आहे :).

मृण्मयी, माफ काय त्यात! माझेच हात सुरसुरत होते काहीतरी टायपायला!

सायो या वड्या मी फक्त खाल्याच आहेत. केल्या नाहीत अन कधी करीन का तेही नाही माहीत. प्रत्यक्ष करतांना पाहिलेलं आहे मात्र.

श्रिखंडाबरोबर या वड्या फारच उत्कृष्ट लागतात हे नम्रपणे पुन्हा सांगू इच्छितो Wink

भयानक आवडतात ह्या वड्या. पण ह्या वेळी पुण्याला गेले तर काका हलवाई की कुठे तरी पुड्याच्या वड्या नावाखाली बाकरवडी सारखं दिसणारं काहितरी मिळालं ते अजिबात नाही आवडलं प्रकरण Uhoh

आई ने तिच्या एका नागपुरी मैत्रिणीकडून रेसिपी घेइन केल्या होत्या त्या अशा दिसत होत्या बाकरवडीसारख्या नाही.
खर्‍या कशा असतात?

Pudachyaa vaDyaa 1.jpgPudachyaa vaDyaa 2.jpgPudachyaa vaDyaa 3.jpg

योकु,

क्या ब्बात है !! व्वा !!
आमच्या नागपुरात काय अक्ख्या विदर्भात अश्याच करतात पुडाच्या वड्या, आणि हो श्रीखंड मस्ट ह्याच्या बरोबर. इकडे पुण्य नगरीत अगदीच न तळलेल्या/वाफावलेल्या वड्या मिळतात कोथिंबीर वडी नावानी...अगदीच नरड्या खाली उतरत नाहीत त्या Wink
>>एखादी वडी समजा फुटलीच तर ती तळतेली कोथिंबीर वेगळी ठेवावी. त्याचा फोडणीचा भात करावा - ती कोथिंबीर कढईत घ्यावी, त्यात भात मोकळा करून घालावा. मस्त पैकी परतून तिखट, मीठ पाहावं; अ‍ॅडजस्ट करावं चविष्ट भात तयार!<< अगदी अगदी !!
मृण्मयी..'सुरुची' च्या छान असतात, थोड्या तिखट असतात, पण टेस्टी एकदम. दुकान मालकांचे नाव भांबुर्डेकर बहुदा !!

येस्स... मृण्मयी, अगले टाईम फिरसे मै भी रहूम्गी फिरसे!
सिंडे, मृण्मयीने नागपूरहून आणलेल्या त्या अतिशय सुंदर चविष्ट खुसखुशीत अवर्णनीय पुडाच्या वड्यांपुढे संत्र्याच्या बर्फीला भाव मिळाला नव्हता.. Wink

नाही नाही. संत्र्याच्या बर्फीला भाव होता कारण मला वडी तिखट लागली की एक संत्रा बर्फी खात होते. मग परत वडी Uhoh मी ३-४ वड्या आणि तितक्याच बर्फ्या खावून पोट भरुन टाकलं होतं.

सांभार वडी खायची झाल्यास अमरावती च्या रघुवीर हॉटेल ची सर्वोत्तम!! मैद्याची पारी असते त्याला तूफ़ान प्रकार!! तसेच अमरावती नागपुर रोड वर गुरुकुंज मोझरी (राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे) इथे एक हॉटेल आहे (नाव विसरलो) त्याच्या सांबार वड्या पण अप्रतिम!!!.

योकु घरगुती पुडाच्या वड्यांची रेसिपी शेयर केले बद्दल बालके बापुसाहेबांकडून आभार स्विकारावेत

बरीच खटपट दिसते आहे. पण, होणार वडी ही जाम खंगरी..हां...!
लागणारे साहित्य मध्ये एक मिसिंग आहे - लाड.
साईड डिश पुरण्याची कल्पना भारीये, करून बघणार! Proud

अगले टाइम फिरसे... <<<<< मृण्मयी अक्का, तुमची जूनी विपू बघा. हमने भी पूछा था आपको, अब अगली बार याद रखना मेरेकु. Happy तुम्ही ठाण्यात पुडाच्या वड्या वाटल्यात आणि मला बोलावलसुद्धा नाही. Uhoh

योकु, रेसीपी मस्तच. शुम्पी फोटो एकदम तों.पा.सु. आहे.

खुपच मस्त रेसिपी आहे. शुंपी, फोटोज सुरेख Happy

कोल्हापूरला शाहूपूरीत 'वहिनी'मधे पण अल्टिमेट पुडाच्या वड्या मिळतात. वेटिंग असतं. नेक्स्ट टाईम आणल्या की फोटो टाकेन.

मी ही कधीच नाही खाल्लेली पुडाची वडी.. खायची आहे कधीपासून....थॅन्क्स योकु...रेसिपी हवीच होती. आता नक्की करणार. Happy

सांभार वडी न बा ..
खर सांगते याला कोथिंबीर वडी तर कोणच नाही म्हणत.. वाचतानाही कसस होताय मला..

योकु , पाकृ टाकल्याबद्दल अतिशय आभारी आहे..
शूम्पी , प्रचिंबद्दल तर _/\_ .

कितीही लाडाचे असले तरी सुकामेवा यात घालणे म्हणजे पाप आहे पाप..

कातिल आहेत फोटो. पुडाची वडी कोल्हापूरला पण जबरदस्त मिळते. त्यांच्यासमोर बाकरवड्या अगदीच फिक्या पडतात.
खाणार्‍यांनो चित्रावळ काढून ठेवा नाहितर पोटदुखिला सामोरे जा.

औरंगाबादला स्वैपाकघर मध्ये मस्त मिळतात पुडाच्या वड्या. त्या भागातून जाताना (जवळपास दररोजच जाणं होतं) त्यांचा मेन्यु काय आहे बघून पुडाच्या वड्या असल्यास घेवून येणं हे औरंगाबादला गेल्यावर नेहेमीचंच झालंय.

गेल्यावेळी जावेनी घरी बनवल्या होत्या. पण त्यावेळी आम्ही चुकून कोथिंबीर कढईत घातली. मग ते सुटलेलं पाणी सुकवणं इ. व्याप करून झाले. बर्‍याच खटपटीनंतर शेवटी जमल्या होत्या वड्या. (मी सारण भरायचं काम केलं होतं. Happy )

योकु रेसेपी मस्त आहे. आणि शुम्पीच्या फोटोतल्या वड्या आहाहा..

ह्या अशाच दिसणार्या वड्या आईने एका दिवाळीत देखील केलेल्या.
लैच खमन्ग.
तोन्डात नळ सुरु झालाय फोटो पाहुनच.
Lol

Pages