पुडाची वडी/ कोथिंबीरवडी/ सांभारवडी

Submitted by योकु on 6 July, 2015 - 13:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

- २ मोठ्या जुड्या कोथिंबीर
- २ ते २.५ वाट्या बेसन/ चण्याच्या डाळीचं पीठ
- दोन चमचे खसखस
- तीन चमचे सुकं खोबरं
- तीन चमचे चारोळी
- दोन चमचे पांढरे/ लाल तीळ
- लाडात असाल तर थोडे काजू, बेदाणे (शक्यतो घालत नाही या पदार्थात)
- दोन चमचे घरचा काळा मसाला
- एक चमचा तिखट (मिसळणाच्या डब्यातल्या चमच्यानी) किंवा आवडीनुसार जास्त ही घेता येईल.
- अर्धा चमचा हळद
- चवीनुसार मीठ
- भक्क्क्क्कम तेल (वडी भर तेलात तळायची असते)

वर तिखटाकरता सोडून जी चमच्याची मापं दिली आहेत ती आपल्या नेहेमी खाण्याकरता वापरायच्या चमच्याची आहेत.

क्रमवार पाककृती: 

- कोथिंबीर निवडून, साफ करून, धुवावी. कपड्यावर, कागदावर पसरून पाणी नीट सुकू द्यावं. यात थोडंही पाणी राहाता कामा नये.
- आता ही स्वच्छ केलेली कोथिंबीर बारीक चिरावी. चिरलेली कोथिंबीर कमीतकमी ४ ते ५ ओंजळीभरून तरी व्हावी.
- एका कढईत तेलावर खसखस भाजून घ्यावी. तीळ- चारोळीही भाजावी. सुकं खोबरं सुद्धा परतावं. एका ताटलीत हे सगळं एकत्र करून जरा चुरून घ्यावं. फार नको. चारोळी, खोबरं हे जाणवलं पाहीजे.
- चमचाभर तेलाची फोडणी करून त्यात थोडं हळद/ तिखट परतून घ्यावं त्यातच चुरलेलं मिश्रण घालावं. नीट सगळं कालवून हे कोथिंबीरीत घालावं. यात मीठ घालावं. कोथिंबीर फोडणीत टाकायची नाही. तिला पाणी सुटेल न काहीच करता येणार नाही.
- चण्याच्या डाळीत तेलाचं मोहन, हळद, तिखट, मीठ घालून घट्ट भिजवून गोळा तयार ठेवावा.
- एका पसरट ताटलीत, तेल + काळा मसाला + चिमूटभर मीठ असं कालवून तयार ठेवावं.
- आता चण्याच्या भिजवलेल्या पिठाची बेताची पोळी लाटावी. पीठ वापरू नये लाटतांना. हवं तर तेलाचं बोट लावावं. पोळी समपातळीत हवी. तशीच फार पातळही नको अन फार जाडही नको. नाहीतर सारण भरल्यावर / तेलात फुटण्याची भिती.
- यावर तेल + मसाल्याचं मिश्रण हातानी नीट अन भरपूर लावावं.
- भरपूर कोथिंबीरीचं सारण घालावं. घट्ट पॅक करावं त्रिकोणी लंबाकारात. खुळखुळा होता कामा नये. नीट सगळीकडून बंद करावं. हेच खरं किचकट काम आहे कारण सारण त्यामानानी कोरडं असतं. अश्या सगळ्या वड्या करून ठेवाव्या. ओलसर नॅपकिन खाली ठेवल्या तर सुकणार नाही.
- आता या वड्या भर तेलात तळाव्या. तेल खूप गार नको पण अगदीच कडकडीतही नको.
- सोनेरी रंगावर काढाव्यात. एकाचे दोन तुकडे करावे सुरीनी. गरम गरम सर्व कराव्या Happy

वाढणी/प्रमाण: 
खाल तसं. वरच्या प्रमाणात ४ लोकांच्या जेवणात साईड-डिश म्हणून पुराव्यात.
अधिक टिपा: 

- हवं असेल तर कांदा-लसूण आधी फोडणीत परतून घेऊ शकता. हिरवी मिरचीही घालता येईल.
- आलं शक्यतो वापरत नाही यात
- सारणात एका लिंबाचा रस पिळला तर एक छान चव येते.
- पिठाच्या पोळीला लावण्याकरता मसाल्याचं जे मिश्रण सांगीतल आहे, त्यात काही लोक्स जरा चिंचेचा कोळही घालतात. त्यामुळे एक अ‍ॅडेड टँग मिळतं.
- कोथिंबीर ही चिरावीच लागते. तीही बारीक. फुप्रोतून काढाल तर गिचका होऊ शकतो.
- बेस्ट उपाय म्हणजे आदल्यादिवशीच कोथिंबीर निवडून, धूवून सुकत ठेवावी.
- लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की कोथिंबीर गरम कढईत घालायची नाही. तिला पाणी सुटलं तर खेळखंडोबा. शंका असेल तर फोडणीही जरा गार करून घालावी.
- बरोबर श्रीखंड करायची पद्धत आहे. कढीबरोबरही या उत्कृष्ट लागतात. (नागपूर ला डिस्ट्रिक्ट कोर्ट्जवळ या वड्या कढीसोबत मिळतात. अप्रतीम!)
- चवीला अन पोटालाही लय भारी असतात.
- एखाद-दुसरी वडी समजा फुटलीच तर ती तळतेली कोथिंबीर वेगळी ठेवावी.
त्याचा फोडणीचा भात करावा - ती कोथिंबीर कढईत घ्यावी, त्यात साधा/ पांढरा भात मोकळा करून घालावा. मस्त पैकी परतून तिखट, मीठ पाहावं; अ‍ॅडजस्ट करावं; चविष्ट भात तयार!

माहितीचा स्रोत: 
आजी, स्वयंपाकाला येणार्‍या काकू
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शूम्पीला हद्दपार करा! सही फोटो टाकलेत.

>> तुम्ही ठाण्यात पुडाच्या वड्या वाटल्यात आणि मला बोलावलसुद्धा नाही

आरती,एकडाव माफ करून टाका. पुढच्यावेळी तुम्हालापण आमंत्रण. 'पुडाच्या वड्या वाटल्या' हे वाचल्यावर इलेक्शनच्या वेळी पुढार्‍यांची माणसं गल्ल्यंमध्ये फिरून साड्या, धोतरं आणि पैसे वाटतात तसं मायबोलीकरांची घरं हुडकून मी वड्यांची पुडकी वाटत फिरतेय असं काहीतरी डोळ्यांपुढे आलं. Proud

फडणवीसांना सांगा; म्हणावं ठाण्यातून मतं हवी असतील तर पुढल्यावेळी नागपूरी पुडाच्या वडीचे पार्सलं वाटा. उथळसरात २ जास्तच द्या पार्सलं. Biggrin

मस्त आहे. पण तळणी कमी केल्याने मी बेक्ड केल्यात. पण जिन्नस जवळपास सारखेच असल्याने, आम्ही बाकरवडी म्हणतो. Happy

आमची पण रिक्षा......

माझी मामी करत असे अश्या वड्या . ती त्याला बाकरवडी म्हणत असे. चितळेंच्या बाकरवडी पेक्षा खूपच वेगळ्या आणि खमंग.

ओ तायांनो, बाकरवडी वायली न पुडाची वडी/सांभारवडी वायली. Wink

पुडाच्या वडीत कोथिंबीरीचंच सारण असतं, बाकी घटक अगदी कमी असतात/चवीपुरतेच. वर दिलंय की >>> चिरलेली कोथिंबीर कमीतकमी ४ ते ५ ओंजळीभरून तरी व्हावी...

काल पुडाच्या वड्या करून बघितल्या. छान लागल्या. 'ऑथेंटीक' चव कशी असते हे माहित नाही, त्यामुळे जश्या लागल्या त्या चांगल्या वाटल्या. Happy
शिवाय योकुने पाकृ प्रमाणासकट दिलेली नाही, त्यामुळे सगळे घटक अंदाजानेच घातले.

IMG_20150707_194555.jpg

मृण्मयीला विचारलं अश्याच दिसतात का? तर तिने धोरणीपणे अश्या'ही' दिसतात असं उत्तर दिलं. Lol

योकु, रेसिपीकरता धन्यवाद Happy

मी ऑथेंटिक वड्या खाल्ल्या आहेत. आपल्या त्या ह्यांच्या सासूबाईंनी (आपल्या त्या त्यांच्या आई) केल्या होत्या. एक पार्सल मला पाठवशील तर मी सांगेन चव ऑथेंटिकच आहे की काय.

साबा विदर्भातल्या अस्ल्याने त्याच्या गाईडन्स बर्हुकुम करुन बघायला पाहिजे,
पग्या, तुझ्या भारि दिसतायत वड्या,

एकदा टीव्हीवर दाखवल्या होत्या त्यात ओले खोबरे आणि गोडा मसाला होता. नागपूरच्याच बाईनी केल्या होत्या. चारोळी नव्हती त्यात. मी तशा घरी केल्या होत्या पण खसखस नव्हती माझ्याकडे म्हणून ती नव्हती टाकली.

आवडल्या होत्या नवऱ्याला.

सगळे फोटो तोंपासू!
मी या वड्या अमेरीकेत येण्याआधी एका मैत्रीणीकडे खाल्ल्या होत्या. मैत्रीणीचे सासर नागपूरचे असल्याने तिने तिकडचा खास प्रकार म्हणून केल्या होत्या.

मीपन केली होती..

हे सारण :

हि बांधलेली पुडी :

तळलेले फोटू काढायचा पेशन्स नाही राहीला... Proud

आज परत बनवायचा विचार आहे..
कालपरवा मंडईत १०रुपड्याला गावरानी सांभाराच्या दोन जुड्या मिळाल्या.

Pages