मासे ५०) शेवंड

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 May, 2015 - 07:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३-४ शेवंड
३ मोठे कांदे (चिरुन)
आल, लसुण, मिरची, कोथिंबीर पेस्ट
४-५ लसुण पाकळ्या (फोडणीसाठी)
पाव चमचा हिंग,
१ चमचा हळद
२ चमचे मसाला किंवा १ चमचा मिरची पूड
१ चमचा गरम मसाला
१ वाटी सुके खोबरे किसून
फोडणीसाठी तेल
चवीपुरते मिठ
अर्धे लिंबू किंवा थोडासा चिंचेचा कोळ

ह्या फोटोत कोलंबी सोबत शेवंडी आहेत.

From mobile 2015

क्रमवार पाककृती: 

शेवंड ही दिसायला कोलंबीसारखी परंतू मोठ्या आकाराची डोक्यावर खडबडीत काटे, मधला भाग साधारण स्प्रिंग सारखा, लांबलचक शेपट्या कवच टणक असलेली असते. शेवंडीच्या डोक्यावरच्या शेपट्या काढाव्यत. पाठचे शेपूट काढावे व त्याचे आकारमानानुसार दोन किंवा तिन तुकडे करावेत.

ह्या तुकड्यांना आल,लसुण्,मिरची, कोथिंबीर चे अर्धे वाटण चोळून ठेवा.

आता गॅसवर भांडे गरम करून त्यात तेल घालून लसुणपाकळ्या ठेचून फोडणी द्या.

त्यावर कापलेल्या कांद्यापैकी अर्धा भाग कांदा परतवा. बदामी रंगाचा होऊ द्या. नंतर त्यावर उरलेली आल-लसुण पेस्ट घाला.

त्यावर हिंग, हळद, मसाला घालून परतवा व शेवंडीचे तुकडे घालून थोडे पाणी घालून झाकण ठेऊन शिजवत ठेवा.

आता उरलेला कांदा व खोबरे भाजून घ्या व त्याचे वाटण करा.

साधारण 10 मिनीटे तरी शेवंड चांगली शिजू द्या व त्यावर आता कांदा खोबर्‍याचे वाटण, गरम मसाला, लिंबू किंवा चिंचेचा कोळ, मिठ व ग्रेव्ही पातळ हवी असेल तर थोडे पाणी घालून परतवून थोडा वेळ पुन्हा शिजू द्या म्हणजे सगळे जिन्नस चांगले मिसळती. थोड्या वेळाने गॅस बंद करा.

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ जणांसाठी
अधिक टिपा: 

सर्वप्रथम सगळ्या मायबोलीकरांचे मनापासून आभार कारण तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे आज मला हा ५० व्या माश्याचा प्रकार गाठता आला. अगदी मांसाहार खाणार्‍यांनी व न खाणार्‍यांनीही मनापासून जी दाद दिलीत त्याबद्दल मला खरच धन्यता वाटते. धागे काढताना खुप जणांनी मला पुस्तक काढण्याचा सल्ला दिला तेंव्हा मी म्हणत होते की ५० रेसिपीज झाल्या की मी पुस्तक काढणार आहे व आज इथे तुमच्या बरोबर शेअर करताना अतिशय आनंद होत आहे की त्या शब्दाला जागून माझे लवकरच माश्याच्या रेसिपीज चे पुस्तक येत आहे. तुमच्या शुभेच्छा अशाच कायम रहाव्यात. पुन्हा एकदा धन्यवाद.

आता शेवंडीविषयी.

शेवंडी चे मांस साधारण कोलंबीसारखेच असते. तिच्या डोक्यातही मांसल भाग असतो त्यामुळे डोके न फेकता ते घेतात. ताजी शेवंड कडक असते. तर डोक्यापासून वेगळी होत चाललेली जरा जास्त वेळ झालेली असते.
हिचे कवच टणक असल्याने जरा जास्त वेळ शिजवून घ्यावी.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु, खरं आहे . मी सुद्धा मासे खात नाही तरी तुझी प्रत्येक रेसिपी अगदी चवी ने वाचते.

पुस्तकाबद्दाल अभिनंदन मनापासून.

५० व्या पाक क्रुतीबद्द्ल आणी येणार्या पुस्तकाबद्दलही
त्रिवार अभिनंदन !!

आपल्या पाकक्रुती वाचण्यासारख्या आणी स्वतः करायला भाग पाडणार्या असतात.

जागू, पुस्तकाबद्दल मनापासून अभिनंदन!!

त्या पुस्तकाचा मला काहिच उपयोग नसला तरी मैत्रिणींना सजेस्ट नक्की करेन.

विनंती: पुस्तकात मासे पा.कृ. सोबतच मालवणी वगैरे खास कोकणी / गोअन मसाल्यांची पा.कृ. आणि ईतर तुम्हाल सुचतील त्या टिप्स / पा.कृ. देता येतील का?

थोडक्यात मासे पा.कृ. चे एक "संपुर्ण पॅकेज" एकाच पुस्ताकात असेल तर चांगले.

जागू अभिनंदन आणि शुभेच्छा!
>>तांदळाची भाकरी सोबत घेऊन ती शेवटची प्लेट पळवावीशी वाटत्येय.>>+१

जागुतै, ५० व्या रेसिपीबद्द्ल आणी पुस्तकाबद्दलही अभिनंदन. Happy

ही रेसिपी करुन बघण्यात येईल. सध्या बाजारात बर्‍यापैकी शेवंड मिळताहेत.

सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल मनाभासून धन्यवाद.

माझ्या पद्धतीच्या मसाल्याची रेसिपी मी टाकणार आहे.

अरे वा.. मस्त दिसताहेत हे शेवंड. करुन पाहिन का ते सांगता येणार नाही पण पुस्तक मात्र नक्कीच संग्रही ठेवण्याजोगे असणार आहे.

जबरदस्त जागूताई! शतकमहोत्सवाकरिता शुभेच्छा! Happy आता शेवंड आणून पहिलेच पाहिजे.
आ.न.,
-गा.पै.

जागू मस्त रेसिपी .
अभिनंदन!!! पुस्तकाच्या प्रतिक्षेत ...पब्लिकेशन सोहळ्या साठी आम्हाला बोलावायला विसरू नकोसः-)

Pages