मासे ५०) शेवंड

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 May, 2015 - 07:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३-४ शेवंड
३ मोठे कांदे (चिरुन)
आल, लसुण, मिरची, कोथिंबीर पेस्ट
४-५ लसुण पाकळ्या (फोडणीसाठी)
पाव चमचा हिंग,
१ चमचा हळद
२ चमचे मसाला किंवा १ चमचा मिरची पूड
१ चमचा गरम मसाला
१ वाटी सुके खोबरे किसून
फोडणीसाठी तेल
चवीपुरते मिठ
अर्धे लिंबू किंवा थोडासा चिंचेचा कोळ

ह्या फोटोत कोलंबी सोबत शेवंडी आहेत.

From mobile 2015

क्रमवार पाककृती: 

शेवंड ही दिसायला कोलंबीसारखी परंतू मोठ्या आकाराची डोक्यावर खडबडीत काटे, मधला भाग साधारण स्प्रिंग सारखा, लांबलचक शेपट्या कवच टणक असलेली असते. शेवंडीच्या डोक्यावरच्या शेपट्या काढाव्यत. पाठचे शेपूट काढावे व त्याचे आकारमानानुसार दोन किंवा तिन तुकडे करावेत.

ह्या तुकड्यांना आल,लसुण्,मिरची, कोथिंबीर चे अर्धे वाटण चोळून ठेवा.

आता गॅसवर भांडे गरम करून त्यात तेल घालून लसुणपाकळ्या ठेचून फोडणी द्या.

त्यावर कापलेल्या कांद्यापैकी अर्धा भाग कांदा परतवा. बदामी रंगाचा होऊ द्या. नंतर त्यावर उरलेली आल-लसुण पेस्ट घाला.

त्यावर हिंग, हळद, मसाला घालून परतवा व शेवंडीचे तुकडे घालून थोडे पाणी घालून झाकण ठेऊन शिजवत ठेवा.

आता उरलेला कांदा व खोबरे भाजून घ्या व त्याचे वाटण करा.

साधारण 10 मिनीटे तरी शेवंड चांगली शिजू द्या व त्यावर आता कांदा खोबर्‍याचे वाटण, गरम मसाला, लिंबू किंवा चिंचेचा कोळ, मिठ व ग्रेव्ही पातळ हवी असेल तर थोडे पाणी घालून परतवून थोडा वेळ पुन्हा शिजू द्या म्हणजे सगळे जिन्नस चांगले मिसळती. थोड्या वेळाने गॅस बंद करा.

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ जणांसाठी
अधिक टिपा: 

सर्वप्रथम सगळ्या मायबोलीकरांचे मनापासून आभार कारण तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे आज मला हा ५० व्या माश्याचा प्रकार गाठता आला. अगदी मांसाहार खाणार्‍यांनी व न खाणार्‍यांनीही मनापासून जी दाद दिलीत त्याबद्दल मला खरच धन्यता वाटते. धागे काढताना खुप जणांनी मला पुस्तक काढण्याचा सल्ला दिला तेंव्हा मी म्हणत होते की ५० रेसिपीज झाल्या की मी पुस्तक काढणार आहे व आज इथे तुमच्या बरोबर शेअर करताना अतिशय आनंद होत आहे की त्या शब्दाला जागून माझे लवकरच माश्याच्या रेसिपीज चे पुस्तक येत आहे. तुमच्या शुभेच्छा अशाच कायम रहाव्यात. पुन्हा एकदा धन्यवाद.

आता शेवंडीविषयी.

शेवंडी चे मांस साधारण कोलंबीसारखेच असते. तिच्या डोक्यातही मांसल भाग असतो त्यामुळे डोके न फेकता ते घेतात. ताजी शेवंड कडक असते. तर डोक्यापासून वेगळी होत चाललेली जरा जास्त वेळ झालेली असते.
हिचे कवच टणक असल्याने जरा जास्त वेळ शिजवून घ्यावी.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान रेसिपी.
तुमच्या "माश्याच्या रेसिपीज" ह्या पुस्तकाला अनेका-अनेक शुभेच्छा!

जागू, पुस्तकासाठी शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन.
मासे अज्जिबात न खाणारी असूनही मी तुझी प्रत्येक पाककृती आवर्जून येऊन वाचते, काही मत्स्याहारी नॉन-माबोकरांना लिंक्ससुद्धा पाठवल्या आहेत Happy

अशीच लिहिती रहा. शतकपूर्ती होऊदेत...

मस्तच ग जागू! मी मासे खात नाही पण तुझी ही लेखमाला वाचते.
पुस्तकाबद्दल अभिनंदन! मी एक प्रत नक्की घेणार!

सगळ्या शाकाहारींचे मनापासून आभार.

सगळ्यांना प्रतिसादाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद.

मी मासे खात नाही पण तुझी ही लेखमाला वाचते. <<< बापरे... हे म्हणजे 'ब्रॅण्डी कित्ती चांगली असते ना? आम्ही थंडीत पायाला चोळतो' असं (सभ्य भाषेत सांगायचं तर) झालं......... Proud

अरे वा! अभिनंदन! तुमच्या रेसिपीजच्या जोरावरच इकडे उसगावातले वेगवेगळे मासे आणून करण्याचं धाडस केलं. Happy

जागू, अभिनंदन Wink

लॉबस्टर एकदाच हॉटेलात खाला होता, चव विशेष आवडली नाही. आता कधी मिळाला तर तुझ्या या रेसिपीनं करून बघावं.

ही रेसिपी आज पाहिली.पुस्तकासाठी अभिनंदन.
शेवटचा फोटो...य्म्म्म Happy

Pages