डोसे प्रकार

Submitted by आरती. on 17 April, 2015 - 04:42
masala-dosa
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. पेपर डोसा / साधा डोसा
डोसा राईस / कोणताही जाड तांदूळ - ४ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
मेथी दाणे - १ टी स्पून
प्रत्येक डोश्याच्या जिन्नसमध्ये जो तांदूळ दिला आहे तोच वापरून वेगवेगळ्या चवीचे डोसे चाखा. Happy प्रत्येक प्रकारच्या डोश्याची एक वेगळी चव आहे.

मसाला डोसा ची बटाट्याची भाजी

फोडणीत उभा चिरलेला कांदा, राई, चणाडाळ, उडिद डाळ. हि. मि. कढीपत्ता, घालून डाळींचा रंग लालसर झाला की त्यात थोडी हळद घालायची त्यात २ टे. स्पून पाणी घालून थोड उकळू देऊन मग त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, चवीनुसार मीठ घाला आणि ढवळून घ्या. पाणी आटत आल की त्यात ओल खोबर आणि कोथिंबीर घाला.

२. सेट डोसा / स्पंज डोसा / आंबोळ्या / पोळ्ये

डोसा राईस - २ वाटी
उकडा तांदूळ (लाल, पिवळा किंवा ईडली राईस) - २ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
मेथी दाणे - १ टी स्पून
P26-05-13_06.31[1].jpgP26-05-13_06.32[1].jpg

३. दावणगिरी डोसा
उकडा तांदूळ (लाल, पिवळा किंवा ईडली राईस) - ४ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
साबुदाणा - १/२ वाटी
चणा डाळ - १/४ वाटी
मेथी दाणे - १ टी स्पून

४ - थंडीतील सेट डोसा हा थोडा कडवड लागतो. Happy
डोसा राईस - २ वाटी
उकडा तांदूळ (लाल, पिवळा किंवा ईडली राईस) - २ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
मेथी दाणे - १/४ वाटी
हळद - २ टी. स्पून
kadu dosa.jpg

५ - सेट डोसा (अजून एक प्रकार)
डोसा राईस - २ वाटी
उकडा तांदूळ (लाल, पिवळा किंवा ईडली राईस) - २ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
मेथी दाणे - १ टि. स्पून
चणा डाळ / चटणी डाळ - १/४ वाटी
मुगाची डाळ - १/४ वाटी

६ - नाचणी डोसा
नाचणीच पीठ - ४ वाटी
उडदाची डाळ - १/४ वाटी
मेथी - १/४ टी स्पून
पोहे - १/२ वाटी

७- नीर डोसा,

जूना कोणताही तांदूळ - ४ वाटी ( नविन तांदूळाचा थोडा सांभाळून करावा लागतो पण चविष्ट होतात म्हणून ही टीप. Happy
ओल खोबर - २ टे. स्पून
साखर - १ टी. स्पून
मीठ - चवीनुसार
neer dosa.jpg

८. मूग डोसा (पेसाराट्टू)
मूग - २ वाटी
बेडगी मिरची - ४-५
काळी मिरी - ७-८
आल - १/२ इंच
मीठ - चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

१. सकाळी तांदूळ व मेथी एकत्र भिजत घाला. उडिद डाळ वेगळी भिजत घाला. साबुदाणे थोडे जास्त पाणी घालून भिजत घाला. संध्याकाळी वाटायच्या १५ मि.अगोदर पोहे भिजत घाला. चण्याची डाळ/ चटणी डाळ/ मूगाची डाळ ही तांदूळाबरोबर भिजत घाला.

२. ग्राइंडर किंवा मिक्सरमध्ये तांदूळ + मेथी दाणे + पोहे + चण्याची डाळ/ चटणी डाळ/ मूगाची डाळ / साबुदाणे एकत्र बारीक वाटून घ्या. उडदाची डाळ कमीत कमी पाणी घालून बारीक वाटून घ्या.

३. एका डब्यात मिश्रण ओतून घ्या. त्यात चवीपुरते मीठ घाला. चमच्याने मिश्रण एकाच दिशेने फेटा. १ टे. स्पून कच्चे तेल मिश्रणावर चमच्याने घाला आणि डब्याला झाकण लावून ठेवा.

४. सकाळी मिश्रण फुगून वर येईल. चमच्याने एकाच दिशेने ढवळून घ्या.

५. बीडाचा तवा तेल लावून गरम करून घ्या. चमच्याने मिश्रण तव्यावर घालून डोसे काढा.

नाचणीच्या डोश्यासाठी

सकाळी उडीद डाळ आणि मेथी वेगवेगळ भिजत घाला. संध्याकाळी दोन्ही एकत्र बारीक वाटून घ्या.
त्यात नाचणीच पीठ, चवीपुरत मीठ, थोड पाणी घालन एकाच दिशेने ढवळून पीठ आंबवायला ठेवा.
सकाळी पेपर डोसे काढा. ह्याचे सेट डोसे मला नाही आवडत. हा डोसा गरम खायला जास्त चांगला लागतो.

नीर डोसा

रात्री तांदूळ भिजत घाला. सकाळी तांदूळ, ओल खोबर, साखर घालून मिक्सरवर वाटून घ्या. एका भांड्यात हे मिश्रण काढून घ्या आणि त्यात चवीप्रमाणे मीठ आणि पाणी घाला. हे मिश्रण पातळ हव.

बिडाच्या तव्याला तेल लावून तापवून घ्या. गॅसची फ्लेम मोठीच ठेवा. मिश्रण तव्यावर ओता आणि लगेच फ्लेम स्लो करा. मंदाग्नीवर हा डोसा करतात. हव तर दुसर्‍या बाजूने एक सेंकंद भाजा. हे डोसे जाळीदार आणि पांढरे शुभ्र होतात. प्रत्येक वेळी डोसा घालताना फ्लेम मोठी हवी. घालून झाल्यावर फ्लेम स्लो करा.

मूग डाळ डोसा

मूगाची डाळ रात्री भिजत घाला. सकाळी डाळ, बेडगी मिरची, काळी मिरी, आल घालून वाटून घ्या. चवीनुसार मीठ घालून लगेच डोसे करा.

डोश्याच्या पीठाचे अजून काही प्रकार

पेपर डोशाच पीठ तव्यावर पसरवल की लगेच त्यावर थोड जिर आणी उभा बारीक चिरलेला कांदा स्प्रिकंल करा. थोड तेल घालून जिर आणि कांदा दाबून घ्या. डोसा फोल्ड करून खायला घ्या. उन्हाळ्यात हा डोसा बनवला जातो. क्रिस्पी जिर कांद्याचा डोसा यम्मी लागतो. नुसता किंवा चटणीबरोबर. Happy

सेट डोशाच पीठ तव्यावर पसरवून त्यावर कच्च अंड फोडून घालून त्यावर मीठ , काळीमिरी पूड, कोथिंबीर, हि. मि. बारीक कापून स्प्रिकंल करतात आणि दोन्ही बाजूने खरपूस भाजतात.

वाढणी/प्रमाण: 
खाल तेवढे
अधिक टिपा: 

१. डोसा राईस आणि ईडली राईस मॉलमध्ये सहज उपलब्ध आहेत. केरला स्टोअर्समध्ये फक्त ईडली राईस मिळतो.
२. पीठात कच्चे तेल घातल्यावर पुन्हा ढवळू नये.
३. पीठ आंबल्यावर त्यात पाणी घालू नये त्याने डोसे नीट होत नाहीत. जी काही कंन्सिस्टंसी पीठाची करायची असेल ती डाळ तांदूळ वाटल्यावर लगेच करावी.

मूगाचा डोसा
उपवासाला चालतो. रोजच्यासाठी बनवायचा असेल तर डोसा तव्यावर पसरवल्यावर त्यावर कांदा बारीक चिरून स्प्रिंकल करा.

क्रिस्पी पेपर डोश्यासाठी टिप्स
तवा व्यवस्थित तापवून घ्या. गॅस मिडीयम फेल्मवर ठेवा. रुमाल मीठाच्या पाण्यात किंवा साध्या पाण्यात बुडवून तापलेला तव्यावर ओला रूमालने पुसून घ्या. त्यावर चमच्याने मधोमध पीठ घालून संपूर्ण तव्यावर पसरवा. एक टिस्पून तेल / बटर / घी डोश्याच्या वरच्या बाजूला सगळीकडे लागेल अस शिंपडा आणि पसरवून घ्या

सेट डोसा, दावणगिरी डोसा बनवताना प्रत्येक वेळेस तव्याला तेल /बटर/ तूप लावून मग त्यावर पीठ घालून तुम्हाला हव्या त्या जाडीचा डोसा पसरवा.

सेट / दावणगिरी डोसे प्रवासासाठी उपयुक्त. २-३ दिवस सहज टिकतात. सॉफ्टही राहतात.
प्रवासासाठि नेताना हे डोसे थंड करून डब्यात भरायचे. त्याला अजिबात वाफ सुटायला नको तसेच पाण्याचा हात लावू नका.

माहितीचा स्रोत: 
आई आणि अम्मा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विश्या, धन्यवाद, पण स्पंज डोश्याचा फोटो कुठे आहे? >>> तव्यावर करत करतच खायला प्रारंभ केला होता त्यामुळे फोटो नाही काढले - पुढील वेळी नक्की .

हे माझे झब्बू.. कालच केले होते. डोश्यात साबुदाणा मी पहिल्यांदाच वापरला. छानच झाले होते. ( दावणगिरी मायनस पोहे, कारण ते नाही मिळत इथे. )

वा काय सही दिसत आहेत पण ह्यावर ती तमिळ लोकांची डाळीची पोडी हवीच हवी. दिनेशदा तुम्हाला ती पोडी माहिती नाही!!!!???

आरती., दोश्यांच्या इतक्या वेगवेगळ्या प्रकारांच्या पाककृती (आणि व्यवस्थीत प्रमाण) इथे दिल्याबद्दल धन्यवाद! नक्की करून बघणार.

तुमच्या स्पंजदोश्याचा फोटो भारी आहे! नीरदोश्याचा तर अप्रतिम!

ते नीर डोसे कसले कातील दिसताहेत.

पांढरेशुभ्र नीर डोसे आणि बाजुला नारळ / कोथिंबीरीची हिरवी चटणी! डोळे आणि रसना दोन्ही इंद्रिये तृप्त होतात.

सेट/स्पंज दोसा मी कधीच केला किंवा खाल्ला नाहीये. आता करून बघेन.

इथे मायबोलीवरच ह.डाळ घातल्यानं दोसे छान सोनेरी होतात असं वाचलं होतं तेव्हापासून दोसे करताना मेथीदाण्यांसोबत मी थोडी ह.डाळ पण घालते.

अल्पना.... पोवर ग्रीड गुरगाव मध्ये साउथ ईंडीयन दुकान आहे.तिथे मिळतात तांदुळ.

हा धागा महान आहे. आता माबोवर डोसे लाट येणार.

मस्त प्रकार आणि मस्त प्रमाण आणि मस्त रेसिप्या. धन्यचवाद आरती..

मला सोना मसुरी मिळाला.
म्हणतात ना काखेत कळसा . रोजच्या वाण्याकडे होता . त्यांनीच विचारले डोसा राईस का ?

दावणगिरी डोसा:

Dgiri Dosa.jpg

थँक्स आरती.!!
हा डोसा खाऊन आमचे पिताश्री फारच खुश झाले. डोसा होता होता मस्त ताजं काढलेलं लोणी डोस्यावर घालत होते. काय मस्त वास येत होता.
माझ्या हातून पीठ थोडं पातळ झालं. पुढच्यावेळी कटाक्षाने पाणी बेताने घालायला हवं. आणि चण्याची डाळ न घालून चालेल, कारण चण्याच्या डाळीमुळे कुरकुरीत डोसा होण्याकडे झुकत होता. मी जो दावणगिरी खाल्ला होता तो मस्त मऊ मऊ लुसलुशीत होता. बहुतेक तो स्पंज डोसा असावा.

आमचे पिताश्री फारच खुश झाले. <<<<< खूप छान वाटल मंजूडी. फोटो मस्तच आहे. ती जाळी वाफ जाण्यासाठी वापरतात का?
अग चणाडाळ हवीच त्याच प्रमाणही खूप कमी आहे.. त्याने कुरकुरीतपणा नाही येत नाही. पीठ घट्ट हव एकदम पातळ नको.

अगं ती जाळी मावेतली आहे. झालेले डोसे पानात पडले नाहीत तर मी त्यावर ठेवत होते, वाफ धरू नये म्हणून.

चणाडाळ हवीच म्हणतेस... ठीक आहे. नाही वगळणार. पुढच्यावेळी पाणी कमी घालेन. खरंतर तांदूळही घरात होता तोच वापरला होता. कोलम होता. खास उकडा तांदूळ किंवा सोनामसुरी आणायला हवा.

ती जाळी मावेतली आहे. <<<< ओह मस्त आयडीया आहे. मीसुद्धा वापरेन. धन्यवाद. Happy
खास उकडा तांदूळ आणून एकदा बनव. सोनामसुरी हा रॉ राईस आहे. दावणगिरी फक्त उकडा तांदूळापासून बनवायचा मस्त सॉफ्ट होतो.

मला सगळ्या प्रकारचे डोसे , घावन प्रकार उत्तम जमतात. बिडाच्या तवा वापरते ह्या साठी मी. पण नीर डोसे नव्हते जमत

आरती तुझ्या रेसिपीने मी आज केले आणि मस्तच जमले. पांढरेशुभ्र , मऊ लुसलुशीत आणि जाळीदार. क्रोशाचे नाजुक रुमालच जणुं ! खुप खुप धन्यवाद. फोटो नाही काढला आज . पुढच्या वेळेस नक्की काढते.

शांकली , पीठ खुपच पात्तळ करावे लागते. डोसा घालताना गॅस मोठा आणि नंतर लहान ही टिप ही फॅालो कर

आरती, मी करते तो स्पंज डोसा त्याचे प्रमाण असे आहे

हे आमच्याकडचे काही प्रकार, वेगळे लिहिण्याएवजी इथे लिहिते. चालेल ना?

स्पंज डोसा:
अडीच कप इडली राईस,
१/२ कप कालाजीरा राईस,(आंबेमोहोर सुद्धा चालेल, सुरती कोलम ठिक आहे, सोनामसूरी अगदी शेवटचा उपाय),
१/४ कप साबूत उडीद डाळ,
१ चमचा(टेबल्स्पून) चणा डाळ,
१ चमचा मूगाची डाळ,
२ चमचे (टेबल्स्पून) जाडे पोहे
१ लहान चमचा मेथी,
चवीला मीठ
आणि नखाएवढा गूळाचा खडा. (हे सिक्रेट आहे ह्या रेसीपेचे. ) Happy
अतिशय चवीष्ट होतो. हलका सोनेरी रंग येतो.

डाळी धूवून वेगळ्या भिजत घालून वाटून घ्यायच्या. तांदूळ एकत्र घालून बारीक वाटायचे.

अगदी मस्त हलका डोसा होतो. चहाबरोबर मस्त लागतो. किंवा नारळाच्या दूधात बुडवून. नुसत्या गूळाच्या खडयाबरोबर सुद्धा.

नारळी डोसा:

वरचेच प्रमाण घेवून फक्त नारळ्याच्या दूधात '' वाटायचे. आणि घट्ट दही कालवून मग बीडाच्या तव्यावर करायचे. अतिशय मस्त लागतात.

नारळाचा खिस टाकून वाटू नका. नारळाच्या दूधाने वेगळीच चव येते. आंबताना नारळाच्या दूधातील ज्यास्त साखर मिळते.

मलबारी डोसा:

शेजारची केरळी मुस्लीम करायची. आई तिच्याकडून रेसीपी घेवून करायची.

२ वाटया इडली राईस,
१ कप खिसलेले खोबरे,
१ लहान चमचा मेथी,
पाव वाटी नारळाचे पाणी,
अतिशय बारीक वाटून घ्यायचे.
दुसर्‍या दिवशी एक अंडे फोडून खूप फेटायचे. मग ते आंबलेल्या पीठात अलगद एकत्र करायचे. आणि एक लहान चमचा वॅनिला ईसेन्स घालायचा.
ह्याचे गोड वेरिएशन म्हणजे, आवडीनुसार साखर घालायची.

आणि अतिशय पातळ असे डोसे घालायचे. अगदी क्रेप सारखे. क्रेप सारखेच होतात.

साखर न घालता केलेले चिकन करी किंवा मलबारी मटण करी बरोबर खायचे.
साखरेचे असेच खाउ शकतो. त्यात केळ्याचे बटर व लवंगात परतलेले काप घालून आम्ही खायचो लहानपणी.

>>>बिडाच्या तवा वापरते ह्या साठी मी<< +१

आमच्याकडे डोसे/घावण, आंबोळी, धिरडी, थालीपीठं फक्त बीडाच्याच तव्यावर करतात/केलेत.
जी चव बीडाच्या तव्यावर येते ती कशावरच येत नाही असे मला वाटते.

Pages