एपिक चॅनेल

Submitted by स्वप्ना_राज on 22 January, 2015 - 09:50

"एकांत" ह्या एपिक चॅनेल वर दर गुरुवारी रात्री १०:३० वाजता (रिपिट टेलिकास्ट - शुक्रवार रात्रौ ८:३०) लागणार्‍या कार्यक्रमामध्ये भारतातल्या एके काळच्या गजबजलेल्या पण आता ओसाड झालेल्या जागांबद्दल माहिती देतात. हा कार्यक्रम बहुतेक नोव्हेंबर २०१४ पासून सुरु झाला असावा कारण हे चॅनेलच मुळी तेव्हा सुरु झालं. माझे सुरुवातीचे काही भाग चुकले असावेत. राजस्थानमधलं भानगढ, त्रिपुरातलं उनाकोटी आणि गुजरातमधलं लखपत ह्यावरील भाग मी पाहिले. आणि त्यावरची माहिती 'संथ चालती ह्या मालिका' इथे पोस्ट केली. ती कायमस्वरुपी साठवून ठेवावी अशी सूचना झाली म्हणून हा धागा काढला.

हे चॅनेल इथे उपलब्ध आहे - https://docs.google.com/spreadsheets/d/19tI8WWcHdygXnFWpwtOwRrco61eS-1GhemitlPpLVWo/pubhtml?gid=0&single=true

कार्यक्रमांचं वेळापत्रक - http://www.epicchannel.com/schedule

ह्या बीबीवर पुढील एपिसोडस ची माहिती आहे:

एकांतः
१. लखपत, २. उनाकोटी ३. कित्तूर किल्ला ४. न्यारमा ५. अंदमान सेल्युलर जेल ६. विलासगढ ७. हळेबिडू
८. शेखावतीमधलं रामगढ ९. काश्मीरमधलं मार्तंड मंदिर १०. शिवसागर - अहोम साम्राज्याची राजधानी ११..गुजरातचं चंपानेर १२. श्रीनगरच्या हरीपर्बत वरचा किल्ला १३. लडाखचा 'चिकटन' किल्ला
१४. अंदमान निकोबारचं रॉस आयर्लंड १५. जंजिरा किल्ला १६. लखनौ रेसिडेन्सी १७. विष्णुपुर १८. विजयदुर्ग
१९. बटेश्वर २०. हंपी २१. कुलधरा २२. कुंभालगढ २३. असिरगड २४. बिजापूर २५. कांगडा फोर्ट (हिमाचल प्रदेश)
२६. जागेश्वर २७. रामनगर २८. लेह पेलेस २९. किल्ला मुबारक ३०. मेहरोली आर्किओलॉजिकल पार्क
३१. तलक्कड, मालंगी आणि वोडीयार राजे

देवलोक - सीझन १:
१. रंग २. जीवजंतू ३. स्वर्ग नरक ४. शक्ती ५. गणपतीबाप्पा ६. देवदेवतांची शस्त्रं ७. देवतांची वाहनं ८. गंगा ९.तीर्थ १०.युग ११. देवांचं अन्न १२. सृष्टीची रचना १३. दिशा १४. देवी-देवतांचे विवाह १५. देवी-देवतांचे रूप बदलणं
१६. विष्णूचे अवतार, १७. ग्रह-नक्षत्र १८. पुराण, वेद ह्यातील वनस्पती १९. पूजा आणि विधी

देवलोक चा सीझन २ सुरु होणार आहे. त्याचा वेगळा धागा काढून इथे लिंक देईन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतात सूर्याची ३ मंदिरं. एक गुजरातमधलं मोटेरा, दुसरं ओरिसातलं कोणार्क. इथलं तर तिसरं काश्मीरमधलं मार्तंड. <<<< चूक.. कोकणात सूर्याची बरीच मंदिरं आहेत. कशेळीचं सूर्यमंदिर प्रसिद्ध आहे आणि इथे अद्याप सूर्यपूजा चालू आहे.
(कोकणातली मंदिरं भव्य मंदिरं नाहीत हे मान्य आहे. पण बहुतेकदा भारतातल्या याच तीन मंदिरांचा उल्लेख केला जातो. मग आमच्या भावना दुखावतात. आम्ही तर कोणार्कला त्या गाईडला पण तावातावाने कशेळीबद्दल सांगितलं होतं. Proud )

मंड ळी जावेद जाफरीचा वन्स मोअर म्ह णून एक कार्यक्रम आहे तो ही जरूर बघा. जुन्या चित्रपटांचे तो विनोदी परीक्षण व त्यावर भाष्य करतो. तुफान आहे. मी मेरा सायाचे पाहिले. पहिली बायको मेल्यावर नवरा शोकात असताना दुसरी मीच ती बायको म्हणून येते त्याला तो म्हणे वकील साब तो शॉक रह गये पुरानी बीबी फिर १००
केबीपी एच स्पीड से फिरसे डाउनलोड होगई. हे व असे बरेच विनोद आहेत. हा पण मी सीरीज रेकॉर्डिंग ला लावला आहे. फार पोलिटीकली करेक्ट नसतील तेव्हा स्वतः च्या जबाबदारीवर बघा. पर्त्येकाची अभिरूची वेग ळी असू शकते.

स्वप्ना_राज
खरच खुप सुंदर चॅनल आहे हे....
मी सगळे कार्यक्रम न चुकता पाहतो....
आपल्याच देशाबद्दल खुप सुंदर माहीती मिळते आहे

चानेल चांगले आहे ह्यात शंकाच नाही पण बाकीच्या चानेलशी स्पर्धा करण्यासाठी संशोधनावर / सादरीकरणावर थोडा खर्च करावा लागेल असे मला वाटते.
भारताबद्दल अद्भुत माहिती मिळत असल्याने आपल्याला आवडते पण अद्भुतपणापुढे जाऊन आधुनिक शास्त्रसुसंगत माहिती द्यावी असे वाटते.
गेल्या आठवड्यात गुजरातमधल्या झुलत्या मिनाराचा संरचना कार्यक्रम बघितला. हे झुलते मिनार माहित झाल्यामुळे खूप आवडले. पण त्यांच्या त्या वैशिष्ट्याची शास्त्रीय उकल फार त्रोटक दाखवली. असा अंदाज आहे ते मिनार जमिनीखालून हवेच्या भूयाराने एकमेकांशी जोडले आहेत. त्यामुळे एक मिनार हलवल्यावर दुसरा मिनार सुद्धा हलायला लागतो. नेशनल जिओग्राफिकवर त्याला एखाद्या प्रयोगशाळेतील प्रयोगाची जोड दिली असती आणि अनुभव एनरिच केला असता. खरेच जर हवेच्या भूयाराने जोडले असतील तर आधुनिक विज्ञानात हे पडताळून पाहणे शक्य होईल असे वाटत राहिले.
त्यानंतर त्याच कार्यक्रमात जुनागढमधील एका दर्ग्याची (की मशीद नीट आठवत नाही) गोष्ट सांगितली. दर्ग्याच्या आंतरभागाच्या वैशिष्ट्यांचे वर्णन केले. परंतु सध्या तो दर्गा सरकारने बंद ठेवला आहे. सगळ्या दरवाज्यांना आणि खिडक्यांना जाळी लावली आहे. असे आतल्या भागाचे रक्षण करण्यासाठी केले असे सांगितले. त्यामुळे दोन गोष्टींचे वाईट वाटले. एकतर संरक्षण करणे म्हणजे ती वास्तू पूर्ण बंद करून ठेवणे ह्यासारखे कर्मदरिद्रीपण नाही. पण सगळ्या ऐतिहासिक वास्तूंवर आपल्या अमर प्रेमाची आठवण सोडून जाणारे आपले देशबांधव आठवल्यावर दु:ख कमी झाले. दुसरे इतका चांगला कार्यक्रम बनवताना थोडे आणखी कष्ट करून आतील भागाच्या चित्रीकरणाची विशेष परवानगी मिळवता आली नसती का असे वाटून गेले.

पण काहीच नाही तिथे हेही नसे थोडके म्हणून चानेल आवडते. पण स्पर्धेत ते किती टिकेल ह्याची काळजी वाटते.
अजूनही मराठी सिरीयल, बातम्यांच्या वाहिन्या, नेशनल जिओग्राफिक/डिस्कवरी आणि कार्टून मधून ह्या वाहिनीला आमच्या घरीतरी आपला शेअर वाढवता आला नाहीय. Sad

एकांतचा कालचा एपिसोड आसामच्या अहोम साम्राज्यावर होता. सराईदेव इथे ह्या साम्राज्याची बीजं पेरली गेली. सराईदेव ह्या शब्दाचा अर्थच मुळी सुंदर पर्वतांच शहर असा आहे. अहोम साम्राज्याच्या अनेक राजांच्या कबरी माणसाने निर्माण केलेल्या मातीच्या डोंगरांखाली बनवल्या आहेत. ह्यांना mai-tam असं म्हणतात. म्हणजे आत्म्यांचं निवासस्थान. भारताच्या पुरातत्त्व खात्याने ह्यातल्या एका कबरीचं उत्खनन केलेलं आहे. इजिप्तच्या पिरॅमिडप्रमाणेच ह्या राजांच्या रोजच्या जीवनातल्या वस्तू ह्या कबरीत त्यांच्यासमवेत दफन करण्यात आल्या आहेत. हे अहोम राजे मूळचे चायना, व्हियेतनाम, बर्मा आदी देशांत आढळनाऱ्या tai जातीचे. त्यांनी आपली मातृभूमी १२१५ च्या सुमारास सोडली. १२१८ मध्ये ते ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात आले. तिथे असलेल्या नागांशी त्यांचं युद्ध झालं. ह्यात सुगापा नावाच्या अहोम माणसाने नागांचा पराभव केला. आणि मग इथे त्यांचं राज्य ६०० वर्ष टिकलं. आज पूर्ण आसाममध्ये त्यांच्या साम्राज्याच्या इमारतींचे अवशेष मिळतात.

इथून ३० किमी दूर आहे शिवसागर - अहोम साम्राज्याची राजधानी. इथे ३ मुख्य इमारतींचे अवशेष आहेत. एक आहे राजमहाल. तो मुळचा ७ माजली उंच. ४ मजले जमिनीवर, ३ जमिनीच्या आत. जमिनीखालच्या मजल्यात आता जाता येत नाही. सर्व बांधकाम आधी लाकडांचे होतं.मग विटांचा शोध लागल्यावर विटांचं करण्यात आलं. ह्यातल्या ग्राउंड फ्लोअर वर तबेले असावेत. वरच्या मजल्यावर राजपरिवार. जमिनीखालच्या मजल्यात बहुधा सेवकगण असावा.

दिसायला हे लोक मंगोलियन सारखे. ते tai भाषा बोलत. आणि मुंगा सिल्कचे कपडे घालत.

दुसरी इमारत म्हणजे राजपरिवाराच्या मनोरंजनासाठी कार्यक्रम होत ती - ह्याला रौंगघर म्हणत. म्हणजे आसामी भाषेत आनंदाचं घर. बिहुची सुरुवात ह्याच काळात झाली. तिसरी इमारत barracks म्हणजे जिथे सेना रहात असे. ह्याला तलातलघर म्हणत. ह्या असल्या इमारती अनेक मजल्यांच्या - किमान ४ तरी मजले - असत. सर्व लाकडाचं बांधकाम. आता फारसं काही शिल्लक नाही.

ह्या लोकांच्या काही खास समजुती. त्यापैकी एक म्हणजे पृथ्वी अष्टकोनी आहे ही एक समजूत. म्हणून त्यांच्या बांधकामांना, अगदी देवळांना सुध्दा, आठ कोपरे. २०० वर्षांपूर्वी बांधलेल्या ह्यातल्या बऱ्याच इमारती भूकंपग्रस्त आसाममध्ये अजूनही उभ्या आहेत कारण बांधकामासाठी एक विशिष्ट प्रकारचा चुना वापरला जाई. त्यात सालं, लिंबू, ओले तांदूळ आणि बदकाची अंडी असं वापरलं जायचं. ह्या तलातलघर मध्ये २ भूयारं होती. एक राजमहालातून इथपर्यंत येणारं आणि दुसरं इथून नदीपर्यंत जाणारं. प्रजेच्या सुविधेसाठी ह्या लोकांनी खूप काही केलं. जागजागी दिसणारी पाण्याची तळी ही त्यापैकीच. ह्या तळ्याना 'सागर' म्हणत. त्यापैकी जॉयसागर हे देशातलं सर्वात मोठं मानवनिर्मित तळे होय.

हे एव्हढं बांधकाम होऊ शकलं कारण इथे 'पाईक' व्यवस्था होती. १५ ते ५० वयोगटातले लोक ह्यात असत. शांततेच्या काळात हे लोक अशी नागरी बांधकामाची कामं करत आणि युद्धाच्या काळात लढाई करत. ही 'पाईक' व्यवस्था अहोम राजांनी आपल्या मायभूमीतून आणली होती.

एवढं महान साम्राज्य लयाला गेलं कारण पुढले राजे ते सांभाळायला सक्षम नव्हते. त्यात 'महामौर्य सत्र' (हे नाव मला नीट ऐकु आलं नाही) नावाच्या एका पंथाने भर घातली. ह्यात तेव्हाच्या वर्णरचनेतले खालच्या जातीचे समजले जाणारे लोक सामावून घेतले जाऊ लागले. देव आणि गुरुशिवाय आणखी कोणाला न मानण्याचं ह्या अनुयायांनी ठरवलं. त्यामुळे राजाच्या अधिकाऱ्यांना सुध्दा ते जुमानेनासे झाले. त्यामुळे पाईक व्यवस्थेतून त्यांना बेदखल करण्यात आलं. त्यांच्याकडून होणारी कामं खोळंबू लागली. ह्यातल्या काही अनुयायांना द्वेषापोटी मारण्यातही आलं. हळूहळू राज्य कमजोर होऊ लागलं. आणि भारताला असलेला भाऊबंदकीचा शाप इथेही भोवला. राजपरिवारातल्या लोकांत गादीसाठी भांडण लागलं. त्यातल्या काहींनी बर्माच्या राजाची मदत मागितली. बर्माने ३ वेळा आसामवर हल्ला केला. त्यात ब्रिटीश ईस्टइंडिया कंपनीची भर पडली. १८३३ मध्ये तह झाला आणि एका अहोम राजाला अप्पर आसाममध्ये राज्य करायला गादीवर बसवण्यात आलं. पण १८३८ मध्ये ह्या राजाला हटवण्यात आलं. आणि खऱ्या अर्थाने ह्या साम्राज्याची अखेर झाली.

एकांतचा कालचा एपिसोड गुजरातच्या चंपानेरवर. ह्याच्या इतिहासाचे साधारण ३ भाग पडतात. पहिल्या भागात ८ व्या शतकात वनराज चावडा नावाचा राजा ज्याने आपल्या सेनापतीच्या स्मृतीप्रीत्यर्थ पावागड पर्वतावर हे शहर वसवलं. ह्या काळातली फक्त २-३ मंदिरं इथे उरली आहेत.

दुसरा भाग ५००-६०० वर्षांनंतरचा, जेव्हा राजपूत इथे आले तेव्हाचा. १४ व्या शतकात खिची चौहान (हे पृथ्वीराज चौहानाचे वंशज) राजांनी पावागड सर करून इथे आपली राजधानी केली. तिचंही नाव चंपानेर. आधीच्या शहराहून मोठं. इथे त्यांनी अनेक इमारती बांधल्या व त्यांच्या संरक्षणासाठी भोवती भिंती बांधल्या. ७ लेयर्स असलेल्या ह्या भिंतीमुळे दुरून पाहणार्याला पहाडावर शेषनाग पहुडला आहे की काय असा भास होत असे. ह्या चौहानाम्नी इथे २०० वर्षं राज्य केलं. त्यांनी इथे अनेक तलावही बांधले. पावागड पर्वतावर चारही बाजुंनी शत्रूवर मोठे दगड फेकायला 'गुलेर' होत्या (लॉर्ड ऑफ द रिंग्ज मध्ये असे दगड फेकणारी यंत्र दाखवली होती साधारण तश्या दिसत होत्या असं माझं मत). ह्या चौहानांचा अखेरचा राजा पराक्रमी, प्रजेवर त्याचं आणि प्रजेचं त्याच्यावर खूप प्रेम. ह्याच्या महालाचे अवशेष अजून इथे पहायला मिळतात. असं म्हणतात की इथे नवरात्रात साक्षात काली सुंदर मानवी स्त्रीचे रूप घेऊन गरबा खेळायला येत असे. हा राजा तिच्यावरच लट्टू झाला आणि तिचा पदर त्याने धरला. तिने आपलं खरं रूप प्रकट केलं आणि राजाला सर्वनाश होईल असा शाप दिला. मग एक खूप मोठी सेना आली आणि चंपानेरच्या नाशाला कारणीभूत झाली असं म्हणतात.ही सेना कदाचित अहमदाबादच्या अहमदशाही सुलतानाची,महमद बेगडाची असावी. त्याने पावागडवर विदेशी तोफा आणून डागल्या. चौहानांचा पराभव झाला. राजाला कैद केलं गेलं. नेहमीची इस्लाम धर्म स्वीकारायची ऑफर दिली गेली. ती राजाने स्वीकारली नाही. मग केलं त्याचं शीर कलम. पावागड सर केला आणि चंपानेर नष्ट करून तिथे वसवलं महमदाबाद. फक्त हे पावागड पर्वतावर नसून त्याच्या पायथ्याशी होतं.

तिसरा अध्याय इथून सुरु होतो. महमदाबाद कदाचित गुजरातमधलं पहिलं planned शहर असावं. त्यात तलाव, इमारती, पहाडाखाली २ किल्ले असा सरंजाम होता. चौहानांशी २० महिने युध्द चालू होतं तेव्हा इथे एक मशीदसुध्दा बांधली होती. ही महमदाबाद मधली पहिली इमारत. ह्यात २४२ दगडी खांब आहेत. त्यावरून त्याच्या विशालतेची कल्पना यावी. महमद बेगडाचं पालनपोषण म्हणे त्याच्या मावशीने केलं होतं. हा आपली भलीमोठी मिशी डोक्याला गुंडाळत असे. असो. त्याला हे शहर म्हणजे भारताची मक्का बनवायची होती असं ह्या कार्यक्रमात सांगितलं. खरं खोट इतिहास जाणे आणि तो बेगडा. इथे आणखी एक मशीद खास राजपरिवारातल्या लोकांसाठी होती. त्यात भोवती महाल आणि बाग होत्या. बागांची निगराणी करायला पर्शियाहून माळी आणवले होते. ह्या परिसराला हजारे खास म्हणत. आता ह्यातली फक्त मशीद उरली आहे.

१५२६ मध्ये इथला राजा सुलतान बहादूर ह्याने चितोड वर स्वारी केली. तिथली राणी कलमावती हिने आपला मानलेला भाऊ हुमायून ह्याला पत्र लिहून तक्रार केली. हुमायूनचा सुलतान बहादूर वर राग होताच (कारण मला नीटसं कळलं नाही). त्याने संधी साधली. सुलतान बहादूरची सेना बलदंड होती पण ऐनवेळी त्याचा तोपची शत्रूला जाऊन मिळाला. सुलतान बहादूर मांडूला पळाला. तिथून तो चंपानेरला गेला आणि जनाना, खजिना त्याने मक्केला हलवला. सुलतान बहादूर ला पकडता न आल्याने संतापलेल्या हुमायूनने वड्याचं तेल वांग्यावर काढलं आणि महमदाबाद बेचिराख केलं. फक्त मुस्लीम इमारती उदा. मशिदी वाचल्या. ह्यानंतर ४०० वर्षं इतिहास सुध्दा ह्या ठिकाणाला विसरून गेला. १९६९ मध्ये बडोदा युनिव्हर्सिटीच्या एका प्राध्यापकांनी इथे उत्खनन, संशोधन केलं. आणि मग हा इतिहास सामोरा आला.

२००४ मध्ये युनेस्को ने ह्या ठिकाणाला World Heritage Site चा दर्जा दिला.

वाह! पावागढ! अत्यंत सुंदर ठिकाण आहे! इथे सख्ख्या मित्र मैत्रिणींबरोबर गेले आहे. फार धमाल आली होती. मध्यरात्री बडोद्याहून निघालो आणि २ वाजता जाऊन चढायला सुरुवात केली. उन्हाळ्याचे दिवस होते पण तरीही रमतगमत जेव्हा माथ्यावर पोहोचलो तेव्हा पहाटेची शिरशिरी आणणारी थंडी पडली होती आणि धुक्यामुळे काही फुटावरचे देखिल स्पष्ट दिसत नव्हते! अत्यंत surreal अनुभव होता. आयुष्यातली एक अविस्मरणीय सुरेख रात्र आहे ती माझ्या! One of those which I would want to relive thousand times!

एकांतचा ह्या मंगळवारचा एपिसोड श्रीनगरच्या हरीपर्बत वरच्या किल्यावर होता. गंमत म्हणजे एपिसोड संपला तरी ह्या किल्ल्याचं नाव काही मला कळलं नाही. तर असो. ह्या कार्यक्रमाचा हा प्रोमो पहा.

हा हरीपर्बत बराच प्राचीन आहे असं म्हणतात. ह्या पर्वतावरून पाहिलं तर संपूर्ण शहर मुठीत सहज मावेल असा भास होतो. इथे एक देवीचं (सारीका किंवा शारिकादेवी) मंदिर आहे. त्याबद्दलची दंतकथा अशी. इथे एक तळे होते. त्यात एक राक्षस रहायचा आणि त्याने आसपासच्या सर्वांना हैराण करून सोडलं होतं. शेवटी देवीने एका मैनेचं रूप घेतलं आणि एक दगड चोचीत धरला. उडता उडता तो दगड त्या राक्षसाच्या अंगावर टाकला. खाली पोचेतो त्या दगडाचा झाला पहाड आणि त्याखाली चिरडून तो राक्षस मेला. हा पहाड म्हणजेच हरीपर्बत. मैनेच्या संदर्भावरून देवीचं नाव सारीकादेवी असावं असं वाटतं. ह्या कार्यक्रमात बर्याचदा लोक काय बोलतात ते (निदान मला तरी) नीटसं ऐकू येत नाही Sad

१५५७ मध्ये अकबराने तिसर्या वेळेस काश्मीरला आला असताना ह्या पर्वताच्या पायथ्याला चारी बाजूने एक भिंत बांधायला सुरुवात केली. ती जहांगीरच्या काळात पूर्ण झाली. १० मीटर उंच अशी ही भिंत आज ४०० वर्षं झाली तरी उभी आहे (बीएमसीवाल्यांना अकबराच्या काळात पाठवा रे कोणीतरी!). ह्या अश्या भिंतीला काश्मिरी भाषेत 'कलाई' म्हणतात. ह्याचा अर्थ पार न करता येणारी भिंत. ह्या भिंतीत मधूनमधून दरवाजे आहेत. त्यातला प्रमुख दरवाजा म्हणजे काठीदरवाजा. ह्यावर उर्दूमध्ये कलाई कशी बांधायची ह्याची माहिती दिली आहे ती सुध्दा व्यवस्थित टिकून आहे. ही भिंत बांधायला २०० कारागीर लागले म्हणे.

तेव्हाच्या काळात शहरात, ज्याला नागेरनगर म्हणत, मुघल दरबारातले लोक रहात. त्यांचे महाल, बागा, बाजार असं बरंच काही तिथे होतं. पण दुर्देवाने त्यातलं काही आता शिल्लक नाही. फक्त दारा शिकोहने आपल्या गुरूच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेली मशीद तेव्हढी उभी आहे. ह्या मशिदीसोबतच मदरसा, हमाम आणि सराय ही होती असं म्हणतात. इथे एक दर्गा आणि गुरुद्वारा ही आहेत.

तीन पातळ्यांवर बांधला गेलेल्या ह्या किल्ल्याला "अकबरका किल्ला' म्हणतात. पण तो खरा तर बांधला गेला अफगाण काळात (१७५२/५३-१८१९), दुर्रानी साम्राज्याच्या वेळेस. अता मोहम्मद खान ह्याने १८०८ मध्ये तो बांधला. मशीद ते किल्ला हे अंतर चालायला एक तास लागतो. ह्यावरून त्याच्या भव्यतेची कल्पना यावी. पण बाहेरून तो एव्हढा मोठा असेल ह्याची कल्पना येत नाही. हा किल्ला शहरावर नजर ठेवायच्या हेतूने बांधला होता, राजेरजवाड्यानी रहाण्यासाठी नव्हे. त्यामुळे त्यात चित्रकला, महाल किंवा ऐशोआरामाची काहीच साधनं नव्हती. सैनिकांना रहाता यावं असाच तो बांधला आहे. अफगाण राजांनी बांधला असल्यामुळे मध्य आशियातल्या किल्ल्यांशी त्याची रचना बरीच जुळते.

हा किल्ला ओसाड का झाला हे मात्र मला नीटसं कळलं नाही. पंजाबच्या महाराजा रणजितसिंह ह्याने काश्मीरवर स्वारी केली. त्याला काश्मीरमध्ल्या काही लोकांचा पाठिंबा होता. पुढे काश्मीर लाहोर दरबारचा एक भाग झालं. मग डोगरा राजा गुलाबसिंहाने हा किल्ला विकत घेतला आणि १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर ह्याचं strategic महत्त्व संपलं. एव्हढंच कळलं. २००६ मध्ये ह्याच्या renovation आणि development चं काम हाती घेण्यात आलं.

एकांतचा कालचा एपिसोड लडाखच्या 'चिकटन' च्या किल्ल्यावर. बाल्टिस्तान मधून ८व्या किंवा ९ व्या शतकात आलेल्या थाथा खान ह्याने हा किल्ला बांधला अशी एक कथा आहे. हा लोकांचा मोठा लाडका होता. त्यामुळे त्याचे २ मोठे भाऊ त्याच्यावर जळत असत. त्यांनी त्याला मारायचा प्लान केला. पण दरबारी संगीतकारांनी त्याला वेळीच गाण्याच्या माध्यमातून सावध केलं. नाचायचं निमित्त करून तो उठला आणि शालीने मेणबत्त्या विझवून अंधारात पसार झाला. तिबेट ओलांडून कारगीलमध्ये पोचला. शिपाई पाठलाग करत असताना मध्ये वाटेत एक नदी आली. थाथा खानसाठी तिच्या पाण्याचं बर्फ झालं. तो ओलांडून गेल्यावर मात्र बर्फ वितळले आणि त्यांना मागून येणाऱ्या शिपायांना पाठलाग करणं शक्य झालं नाही अशीही एक कथा आहे.

हा किल्ला बांधायला त्याने एका प्रसिध्द कारागिराला (मला ह्याचं नाव कळलं नाही) आणि त्याच्या मुलाला बाल्टिस्तान मधून आमंत्रित केलं. दोघं बापलेक विरुध्द दिशांनी किल्ला बांधायला सुरुवात करत आणि बरोबर एक वर्षाने त्यांची भेट होत असे असं म्हणतात. अशा तऱ्हेने ९ वर्षं, ९ महिने आणि ९ दिवस लागून हा नउ माजली किल्ला तयार झाला. ह्याच्यां बांधणीत अनेक वैशिष्ट्यं होती. सर्वात वर एक लाकडाची खोली होती जी हवा लागताच फिरत असे म्हणे. एका मजल्यावर कोठार, त्यावर दिवान-ए-खास, त्यावर राजाचा दरबार, मग हत्यारखाना अश्या खोल्या होत्या. मात्र सर्वात वर एका बाजूला पुजार्याची खोली आणि दुसर्या बाजूला राजाराणीची मास्टर बेडरूम ही रचना मला तरी विचित्र वाटली. हा किल्ला दोन पर्वतांना जोडणारा होता असं म्हणतात. दोन्ही भागांना जोडणारा एक सस्पेन्शन ब्रीज होता जॉ वर उचलता यायचा. शत्रूला येता येऊ नये म्हणून ही खास सोय. आता इथे जिकडेतिकडे दगडाचे ढिगारे असले तरी त्यात कुठेतरी एक भुयार होतं जे नदीपर्यंत जात असे. शत्रूचा वेढा पडला तरी किल्ल्यातल्या लोकांना पाण्याचा तुटवडा पडू नये हे कारण.

पण किल्ला बांधून झाला आणि ह्या थाथा खानच्या नियतीत खोट आली. दोघा बापलेकांनी दुसर्या कोणा राजासाठी असा अनोखा किल्ला बांधू नये म्हणून त्यांचे उजवे हात तोडून त्यांना त्याने हाकलून लावले. तसेच अनेक लोकांचे जीव घेतले, अतोनात जुलूम केला. जिथून लोकांचा कडेलोट होत असे तिथे किल्ल्याच्या भिंतीत खिळे लावलेले होते. खाली पडणारा माणूस ह्यात शरीर अडकून फाटून गतप्राण होई पण त्याचं शरीर तिथंच अडकून रहात असे. गिधाडं-कावळे त्याचे लचके तोडत. आणि शेवटी नुसती हाडं खाली जमिनीवर पडत अशी वदंता आहे. लोक असंही म्हणतात की आजही इथे खणलं तर हाडं मिळतील. त्यामुळेच ह्या किल्ल्यात भुताखेतांचा वावर असल्याचीही बोलवा आहे.

काही लोकांच्या मते हा किल्ला पूर्णपणे थाथा खान ने बांधला नसून त्याने फक्त २-३ खोल्यांच बांधल्या. १५-१६ व्या शतकात सेरी मलिक (नाव नीट कळलं नाही) ह्या त्याच्या वाम्शाजाने ते बांधकाम पूर्ण केलं.

१८३४-३५ मध्ये जम्मूच्या नवव्या राजाने लडाखवर हल्ला केला व ते annexe केलं. त्याने लेह व बाल्टिस्तान सुध्दा काबिज केलं. ह्या डोगरी राजाबरोबर झालेल्या युध्दाने जहागिरी संपल्या. किल्ला सोडून राजपरिवारातले लोक गावात घरं बांधून राहू लागले. किल्ल्याची देखभाल त्यांना जमेनाशी झाली. १९७० पर्यंत किल्ला तरीही सुस्थितीत होता. नंतर राजाच्या सासऱ्याने राजवाडा तोडून लाकडं आणि दगड गावात आपली डिस्पेन्सरी बनवायला त्याचा वापर केला. त्यानेच हे केलं म्हटल्यावर सामान्यजण कसे मागे रहातील? किल्ल्याचं दगडमातीच्या ढिगाऱ्यात रुपांतर व्हायला मग वेळ लागला नाही. त्याच्या नाशाला त्याची आपलीच माणसं कारणीभूत झाली. Sad

ही प्रोमो लिन्क - https://www.youtube.com/watch?v=6N3H2LBc4a8&index=3&list=PLTdisiBlt2krc3TSUHKfx7xLRcGngzpnI

अग, आजकाल इथे ही माहिती टाकण्यापुरतीच येते मी. वेळच मिळत नाहीये. Sad
सध्या सोम-शुक्र रात्री १०:३० वाजता बेस्ट ऑफ एकांत दाखवत आहेत. जमलं तर आणखी काही एपिसोड्स पाहून माहिती टाकते इथे.

हा एपि. पण मस्त!
हो, सध्या खूपच बिझी झाली आहेस असं दिसतंय. त्यातही वेळ काढून या नोट्स टाकते आहेस म्हणजे हॅट्स ऑफ!

स्वप्ना..राहिलेल्या ३ एपिसोड्ची माहिती एकदम वाचून काढली.
एकदम छान माहिती, आणि तुझी लिहीण्याची शैली पण. खरंच खूप धन्यवाद ह्या माहितीबद्दल!!!

एकांतचा कालचा एपिसोड अंदमान निकोबारच्या रॉस आयर्लंडवर होता. २० व्या शतकाच्या सुरुवातीला हे अंदमान निकोबार इथलं ब्रिटीशांचं Head Quarter होतं. ब्रिटीशांची रीत ही की सर्वेयरचं नाव त्या ठिकाणाला द्यायचं. जसं पोर्टब्लेअरचं नाव आर्चिबाल्ड ब्लेअरवरून पडलंय. तसंच रॉस आयर्लंडचं नाव सर्वेयर जनरल डेनियल रॉस वरून पडलंय.

ह्या आयर्लंडवर ब्रिटीश कुटुंबांच्या रहाण्याची सोय होती. त्या वेळच्या एखाद्या समृद्ध युरोपियन शहरात ज्या सुविधा असत त्या इथे होत्या - स्विमिंग पूल, चर्च, pantry. इथे एक जेलही होतं. आयर्लंडच्या मागच्या बाजूला मोठ्या तोफा, एक दीपस्तंभ होता. हे St. Andrews Church आयर्लंडच्या मध्यभागी होतं. जेणेकरून सर्वांना तिथे येणं सोयीचं पडेल. आज भिंती, छत काहीही उरलेलं नसलं तरी हे चर्च आलिशान दिसतं त्यावरून वैभवाच्या काळात किती सुरेख दिसत असेल ह्याची कल्पना करता येते. ह्याचा बेल टॉवर चं मुळी ५ मजल्याचा होता. त्याला ८ पुली वाली बेल होती. आज ह्या चर्चला पिंपळाच्या झाडाने वेढलंय. बेल टॉवर ही सर्वात उंच इमारत असते असा संकेत आहे. त्यामुळे तो तेव्हाच्या काळात इथली सर्वात उंच इमारत असेलही. ह्या आयर्लंडवर अंदमान निकोबारमधली पहिली वीजनिर्मिती झाली. आधी दिवे आणि मग डिझेल जनरेटर चा वापर सुरु झाला. ह्या आयर्लंडवर रस्त्यांवरच काय पण प्रत्येक रहिवाश्याच्या घरातसुध्दा वीज होती. जवळच्या बेटांवरून हे उजळलेलं बेट एखादं चमकतं जहाज वाटे. म्हणून त्याला Paris Of The East म्हणत. इथे इंग्लडमधून Water Distillation Plant आणून बसवला होता. समुद्राचं पाणी प्रक्रिया करून वापरलं जाई. इथली बेकरी आज बऱ्यापैकी शाबूत आहे. ह्या आयर्लंडवरवरची ती एकुलती एक बेकरी. भट्टी, लाकडं वापरून इथे ब्रिटीश लोकांसाठी ब्रेड, पेस्ट्रीज बनवल्या जात. इथे एक बॉलरूम होती. त्यात चेंजिंगरुम्स होत्या. ती थंड करायची काहीतरी सोय होती ती सुध्दा त्यांनी सांगितली पण मला नीट समजली नाही.

इथे कमिशनरचा एक बंगला होता. त्याट टेनिस कोर्ट, गार्डरूम सह बऱ्याच खोल्या होत्या. हा बंगला सगळ्यात उंचावर होता. (म्हणजे बेलटॉवर पेक्षाही उंच???) त्याला चोहोबाजूंनी पायऱ्या होत्या. चर्चकडे जायला विशेष पायऱ्या होत्या. वरून पूर्ण बेट आणि आजूबाजूचा समुद्र दिसायचा. जवळच Infantry Barracks होत्या. इटलीच्या टाईल्स, बर्माहून लाकूड असं विविध प्रकारचं सामान आणून हा बंगला सजवला होता. आज टाईल्स फुटल्या आहेत आणि बंगला थोडाफार शिल्लक आहे.

१८५७ च्या बंडानंतर स्वातंत्र्यसेनानी पुन्हा बंड करू नयेत म्हणून त्यांना देशापासून दूर ठेवावं ह्या हेतूने इथे आणण्यात आलं. इथे एक पीनल कॉलनी बनवायची होतीच. गोडं पाणीही उपलब्ध होतं. इथलं बरंचसं बांधकाम ह्या स्वातंत्र्यसैनिकांनी केलंय. कामात चुक झाल्यास त्यांना शिक्षा करत. त्या अर्थी हे त्यांच्या हालअपेष्टांच स्मारकच आहे. ह्या स्वातंत्र्यसैनिकांना इंग्रज 'कुली' म्हणत - अगदी ते उच्चशिक्षित असले तरी.

१९३९ मध्ये इथे एक भूकंप झाला, इमारतींना तडे गेले. आयर्लंडला मध्यभागी एक मोठी भेग पडली. बेत बुडणार अशी अफवा पसरली आणि बरेच इंग्रज पसार झाले. पुढे दुसरं महायुध्द सुरु झालं. त्यात जपान्यांनी बेटावर हल्ला केला. कैद्यांना सोडवलं. चीफ कमिशनर ला अटक केली. इमारती नष्ट केल्या, रेकॉर्डस् जाळले. इथे एक दिवस नेताजी सुभाषचंद्र बोसही आले होते.
त्यांनी कमिशनरच्या बंगल्यावर भारतीय झेंडा फडकवला असं म्हणतात. जपानी आले आणि इथले लोक ब्रिटिशाच्या कचाट्यातून सुटलो म्हणून खुश झाले. पण हा आनंद फार काल टिकला नाही. जपान्यांनी अनेकांना इंग्रजांचे जासूद हा आरोप ठेवून समुद्रात फेकलं आणि खुशाल वरून जहाजं फिरवून मारलं. १९४५ मध्ये ब्रिटीश परत आले. पण टॉवर देशाला स्वातंत्र्याचे वेध लागले होते.

१९४७ मध्ये ह्या बेटाचं भारत सरकारकडे हस्तांतरण झाले (म्हणजे त्याच्या दुर्देवाला सुरुवात झाली म्हणायची!). भारत सरकारने आपल्या परंपरेला जागून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. इथे पुढे एक Naval Depot झाला आणि त्यामुळे बेटाचं आणि पर्यायाने त्याच्या इतिहासाचं थोडंफार संवर्धन झालं.

प्रोमो लिन्क - https://www.youtube.com/watch?v=DWWYJma8Bsg&index=2&list=PLTdisiBlt2krc3TSUHKfx7xLRcGngzpnI

स्वप्ना तुझ्या मेमरीचे कौतुक वाटतं. एवढं डीटेलींग.

आज विसरले बघायला.

ते पावागडचं मागे बघितलं. माझं आजोळ बडोदा असल्याने आईच्या तोंडून पावागड बऱ्याचदा ऐकलं. पण मला कधीच आईने नेलं नाही तिथे, लहानपणी बऱ्याचदा बडोद्याला जाऊन Sad

Pages