एपिक चॅनेल

Submitted by स्वप्ना_राज on 22 January, 2015 - 09:50

"एकांत" ह्या एपिक चॅनेल वर दर गुरुवारी रात्री १०:३० वाजता (रिपिट टेलिकास्ट - शुक्रवार रात्रौ ८:३०) लागणार्‍या कार्यक्रमामध्ये भारतातल्या एके काळच्या गजबजलेल्या पण आता ओसाड झालेल्या जागांबद्दल माहिती देतात. हा कार्यक्रम बहुतेक नोव्हेंबर २०१४ पासून सुरु झाला असावा कारण हे चॅनेलच मुळी तेव्हा सुरु झालं. माझे सुरुवातीचे काही भाग चुकले असावेत. राजस्थानमधलं भानगढ, त्रिपुरातलं उनाकोटी आणि गुजरातमधलं लखपत ह्यावरील भाग मी पाहिले. आणि त्यावरची माहिती 'संथ चालती ह्या मालिका' इथे पोस्ट केली. ती कायमस्वरुपी साठवून ठेवावी अशी सूचना झाली म्हणून हा धागा काढला.

हे चॅनेल इथे उपलब्ध आहे - https://docs.google.com/spreadsheets/d/19tI8WWcHdygXnFWpwtOwRrco61eS-1GhemitlPpLVWo/pubhtml?gid=0&single=true

कार्यक्रमांचं वेळापत्रक - http://www.epicchannel.com/schedule

ह्या बीबीवर पुढील एपिसोडस ची माहिती आहे:

एकांतः
१. लखपत, २. उनाकोटी ३. कित्तूर किल्ला ४. न्यारमा ५. अंदमान सेल्युलर जेल ६. विलासगढ ७. हळेबिडू
८. शेखावतीमधलं रामगढ ९. काश्मीरमधलं मार्तंड मंदिर १०. शिवसागर - अहोम साम्राज्याची राजधानी ११..गुजरातचं चंपानेर १२. श्रीनगरच्या हरीपर्बत वरचा किल्ला १३. लडाखचा 'चिकटन' किल्ला
१४. अंदमान निकोबारचं रॉस आयर्लंड १५. जंजिरा किल्ला १६. लखनौ रेसिडेन्सी १७. विष्णुपुर १८. विजयदुर्ग
१९. बटेश्वर २०. हंपी २१. कुलधरा २२. कुंभालगढ २३. असिरगड २४. बिजापूर २५. कांगडा फोर्ट (हिमाचल प्रदेश)
२६. जागेश्वर २७. रामनगर २८. लेह पेलेस २९. किल्ला मुबारक ३०. मेहरोली आर्किओलॉजिकल पार्क
३१. तलक्कड, मालंगी आणि वोडीयार राजे

देवलोक - सीझन १:
१. रंग २. जीवजंतू ३. स्वर्ग नरक ४. शक्ती ५. गणपतीबाप्पा ६. देवदेवतांची शस्त्रं ७. देवतांची वाहनं ८. गंगा ९.तीर्थ १०.युग ११. देवांचं अन्न १२. सृष्टीची रचना १३. दिशा १४. देवी-देवतांचे विवाह १५. देवी-देवतांचे रूप बदलणं
१६. विष्णूचे अवतार, १७. ग्रह-नक्षत्र १८. पुराण, वेद ह्यातील वनस्पती १९. पूजा आणि विधी

देवलोक चा सीझन २ सुरु होणार आहे. त्याचा वेगळा धागा काढून इथे लिंक देईन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काला पानी ह्या शब्दाचा उगम कसा ह्याबद्दल कार्यक्रमात २ गोष्टी सांगितल्या गेल्या. इथलं पाणी पावसाळ्यात काळ्या ढगांमुळे काळं दिसतं ही एक. आणि दुसरी 'काला' हा शब्द 'काल' म्हणजे मृत्यू ह्यावरून आला आहे. थोडक्यात काय तर ज्याला काळ्या पाण्याची शिक्षा झाली त्याचं मरण ठरलेलं आहे.

कैद्यांचं इथलं जीवन इतकं खडतर की भारतातले बाकीचे तुरुंग त्यामानाने स्वर्ग असं मानलं जाई. इथल्या अमानुष वागणूकीला कंटाळून कैद्यांनी त्यात सुधारणा व्हावी म्हणून अन्नसत्याग्रहाला सुरुवात केली. त्यांचा मृत्यू झाला तर ह्या शंकेने ब्रिटिशांनी सुधारणा करण्याचं आश्वासन दिलं आणि कैद्यांनी हा सत्याग्रह मागे घेतला. पण परिस्थिती जैसे थे. पुन्हा १९३७मध्ये आणखी एक सत्याग्रह झाला.ब्रिटिशांनी कैद्यांच्या नाकात नळीद्वारे दूध आणि द्रवरुप अन्न घालायला सुरुवात केली. पण अन्न पोटात जायच्या ऐवजी फुफ्फुसात गेल्याने ३ कैद्यांचा गुदमरून मृत्यू झाला. रविन्द्रनाथ टागोर आणि गांधींजींनी कैद्यांना विनंती केली की त्यांनी हा सत्याग्रह मागे घ्यावा व ब्रिटिश सरकारकडे सुधारणा करायची विनंती करावी. त्यामुळे हा सत्याग्रह मागे घेतला गेला. पुढे १९३९ मध्ये राजकीय कैदी सोडून देण्यात आले.

१९४२ मध्ये जॅपनीज फौजांनी ह्या बेटांवर ताबा मिळवला व हे जेल नेताजींच्या सेनेच्या हवाली केलं तेव्हा इथे ब्रिटिश अधिकार्‍यांना डांबून ठेवण्यात आलं होतं. १९४७ मधे हे जेल भारत सरकारच्या सूपूर्द करण्यात आलं. १९६९ मध्ये त्याचं राष्ट्रीय स्मारक करण्यात आलं.

२००४ पासून इथे एक स्वातंत्र्यज्योत तेवते आहे - इथे ज्यांनी हाल काढले त्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ.

तुम्हाला इतके डिटेल्स लक्शात कसे राहतात ? मीही कालचा भाग पाहिला पण मी २ ब्रिटिश जेलरची नावं आणि सनावळि विसर्ले.

तुम्हाला इतके डिटेल्स लक्शात कसे राहतात ? >>>>>
खरंच गं स्वप्ना, एकदम छान माहिती. खूप मस्त डीटेल मध्ये लिहीतेस तू Happy

स्वप्ना - हा एपिसोड मस्ट वॉचमध्ये होता पण काही कारणाने पाहिला नाही. तूझ्या लेखाची वाट बघत होते ... छान डिटेल लिहीतेस तू. प्राची अस्मिता म्हणतात त्याप्रमाणे एवढे डिटेल्स कसे काय लक्षात राहतात? मला असं तुझ्या सारखं डिटेल लिहायला जमणार नाही..

सध्या आमच्याकडे हेच चॅनल पाहिले जाते. सर्वच कार्यक्रम खूप छान आहेत. अगदी माहितीपर असतात.
माझ्या मुलीलाही हे कार्यक्रम आवडतात. तिचे निरीक्षण आहे की या चॅनेलवर जाहिराती नसतात. असल्याच तर त्या फक्त याच चॅनेलवरील कार्यक्रमांच्याच असतात. (मला नक्की माहिती नाही.)

'सियासत' ही माझी आवडती मालिका आहे आणि 'संरचना' Happy

मी पण ह्या चनेलची फँन आहे . जाहिराती कमी आहेत . जावेद जाफ्रीवाला अन ते एक भितीदायक सिरीयल आहे ना काय त्याच नाव ... पाहत नाही.

PracheeS, अस्मिता, मंजू - जाहिराती लागल्या की मी ते डिटेल्स आठवून बघते. कधी एखाद्या कागदावर मुद्दे लिहून ठेवते. एका जेलरचं नाव लक्षात होतं. दुसर्‍याच्या नावासाठी फादर ऑफ द मॉडर्न प्रिझन सिस्टिम वर गुगल सर्च केला. Happy

>>'धर्मराष्ट्र' सुद्धा सुंदर आहे. महाभारतातल्या पात्रांचा वादविवाद पाहायला मजा येते.

हे पहायची इच्छा आहे पण वेळ जमत नाही. ह्यातला कृष्ण फार तरुण आहे नाही???

प्राची, संरचना बद्दल लिहिणार का इथे थोडं? मला पहायला मिळत नाही हा कार्यक्रम.

आज दानव हंटर्स मध्ये राक्षसाचं रक्त ओळखण्यासाठीची कृती सांगितली - वटवाघळाच्या युरिनमध्ये शतावरी चूर्ण आणि धोत्रा मिक्स करावा. मग हे मिश्रण पाण्यात ओतावं. आणि त्यात रक्त मिसळावं. ते रक्त राक्षसाचं असेल तर मिश्रण जांभळं होतं म्हणे. Proud हसून हसून मेले मी.

आज 'लॉस्ट रेसिपिज' मध्ये गोव्यातली एका बाईने 'Apa De Camarao' नावाची रेसिपी दाखवली. तिने रात्रभर भिजवून ठेवलेला तांदूळ पाट्यावर टॉडीमध्ये वाटला. मग ओलं खोबरं टॉडीमध्ये वाटलं. दोन्ही मिक्स केलं. ह्या मिश्रणात अंड्यांचा पिवळा बलक मिक्स केला. आणि मग एका पसरट भांड्याला तेल लावून अर्धं मिश्रण त्यावर थापलं. मग ते भांडं अश्या तर्हेने ठेवलं की त्याला वरून आणि खालून आंच लागेल. मग १०-१५ मिनिटं ते शिजू दिलं.

recheado मसाला - लाल मिरच्या, लसूण, आलं, मिरी, हळद, गूळ, जिरं, चिंच हे सर्व व्हिनेगर मध्ये वाटलं. हा गोव्याचा ट्रॅडिशिनल मसाला आहे.

एका भांड्यात तेल घालून त्यात कांदा परतला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. मग त्यात हा मसाला घातला आणि शेवटी मीठ लावलेले प्रॉन्स. हे सगळं मिश्रण परतून मग ते वरच्या शिजलेल्या पॅनकेकवर घातलं. त्यावर उरलेलं बॅटर घालून ते दीड तास शिजवलं. वरुन कोथिंबीर घातली.

हा केक चहाबरोबर सर्व्ह केला. Apa म्हणजे तो पॅनकेक म्हणे.

कालचा एकांतचा एपिसोड राजस्थानमधल्या 'विलासगढ' वर होता. पूर्वी 'हडोती' म्हणून ओळखल्या जाणार्‍या ह्या भागात असलेलं हे गाव. एके ठिकाणी तग धरुन उभे असलेले चार खांब, आसपास जमिनीवर पसरलेले दगड-खडक आणि त्याभोवती विखुरलेल्या मूर्ती एव्हढीच ह्या गावाची निशाणी आज शिल्लक राहिली आहे. हे चार खांब म्हणजे पूर्वीचं एखादं मंदिर असावं. त्याचं नावच मुळी चारखंबा मंदिर पडलेलं आहे. ह्यात मध्यभागी विष्णूचं मंदिर असावं, त्याभोवती एका बाजूला सूर्याचं, एका बाजूला शिवाचं असावं असं वाटतं पण बाकी दोन बाजूच्या मंदिराबद्दल काही सांगता येत नाही. इतिहास विलासगढ बद्दल मौन बाळगून आहे. नाही म्हणायला भारतीय पुरातत्त्व खात्याने इथे एक संग्रहालय उभारलं आहे त्यात इथल्या मूर्ती एका जागी ठेवल्या आहेत. पण कालच्या एपिसोडमध्ये त्या मूर्ती उघडयावरच ठेवल्या होत्या.

पृथ्वीराज चौहानच्या वंशाचे जे ३ भाग होते त्यातल्या खिची चौहानांचं राज्य इथे होतं. हे गाव उजाड होण्याची एक कथा अशी की १२ व्या शतकात रणथंबोरच्या मुस्लिम गव्हर्नरचं इथल्या राजकन्येवर प्रेम जडलं. पण तिला ते मंजूर नव्हतं. त्या गव्हर्नरने विलासगढवर स्वारी केली. त्यात विलासगढचा पराभव झाला आणि गाव उध्वस्त झालं. त्या राजकन्येने जलजौहर केला म्हणजे पाण्यात उडी घेऊन जीव दिला.

इथून १०० किमी वर असलेल्या गागरोन वर सुध्दा विलासगढ नष्ट झाल्यावर ३०० वर्ष पर्यंत ह्या चौहानांचं राज्य होतं. गागरोनचा किल्ला अभेद्य आणि आजही बर्यापैकी शाबूत आहे. तो ५ व्या शतकात बांधला गेला. त्याचीही एक कथा अशी. दोडा राजपूतांनी हा किल्ला बांधला. खिची चौहानांची एक बहिण गंगाबाई इथे दिली होती - बहुतेक राजघराण्यात असावी. मला ती कथा नीटशी कळली नाही. एकदा नवराबायको चौसर चा डाव खेळत होते. त्यात बायकोचा पराभव झाला. त्यावरून नवर्‍याने खिची चौहानांची हार झाली असा काहीसा टोमणा मारला तो तिला सहन झाला नाही. तिने आपल्या भावांसोबत लढाई करण्याचं आव्हान नवर्‍याला दिलं. भावाला तिने हे सांगितलं तेव्हा त्याने स्वतःच्याच बहिणीच्या नवर्‍यावर शस्त्र उगारायला नकार दिला. पण बहुधा बहिणीपुढे त्याचं काही चाललं नसावं. ह्यात गगनोरचा पराभव झाला व ती बहिण सती गेली. ह्या गावाचं नाव आधी काही वेगळं असावं. कारण गंगाबाईच्या स्मृतीप्रित्यर्थ ह्याचं नाव गागनोर ठेवलं गेलं असं सांगतात.

हा किल्ला अतिशय बुलंद आणि अभेद्य. होशांग शाह घोरी आणि बुंदी राजपूत ह्यांनी त्यावर संयुक्तपणे हल्ला चढवला. पण किल्ल्यात भरपूर सामग्री, शस्त्रास्त्रं असल्याने तो पडेना. तेव्हा शत्रूने किल्ल्यात जाणार्‍या नदीच्या पाण्यात गाई मारून टाकल्या. आतल्या राजपुतांना ते पाणी वापरता येईना तसे किल्ल्याचा दरवाजा उघडुन ते बाहेर आले आणि लढता लढता वीरगती पत्करली. शत्रूची सेना मोठी असल्याने गागनोरचा पराभव झाला आणि किल्ला ओसाड झाला.

असं म्हणतात की किल्ल्यातल्या १६००० बायकांनी चितेत उडी घेऊन जोहार केला. तसं करण्याआधी कित्येकींनी हाताला सिंदूर माखून आपले हात किल्ल्याच्या भिंतीवर उमटवले. असं म्हणतात की जौहर करण्याअधी केलेली इच्छा पूर्ण होते.

ह्या गोष्टीचं दुसरं व्हर्जन गाववाले सांगतात. खरं तर ह्या युध्दात गागनोरचा विजय झाला होता. पण चुकीचं निशाण फडकवलं गेल्याने किल्ल्यातल्या बायकांना वाटलं की आपलं सैन्य हरलं. आपल्या अब्रूचं रक्षण करायला त्यांनी जौहर केला. विजयी सैन्य किल्ल्यात जाताच त्यांना हे दृश्य पाहून धक्का बसला आणि त्यांनी किल्ल्यात ह्यापुढे पाय न ठेवण्याची प्रतिज्ञा केली.

चौहान वंशाच्या प्रत्येक गोत्राचं कोणी ना कोणी ह्या लढाईत गेलं. त्या सर्वांचं एकत्र पिंडदान केल्याखेरीज त्यांना ह्या किल्ल्यात पाय ठेवता येत नाही म्हणे. म्हणून आजही ते प्रवेशद्वारावर माथा टेकवून परत फिरतात. आत जात नाहीत.

चार दिवसापूर्वी एकांतमध्ये अंदमानचं सेल्युलर जेल बघितलं. अंगावर काटा आला.

कसे राहत असतील तिथे. स्वातंत्र्यवीर सावरकर १० वर्ष होते तिथे.

काल लॉस्ट रेसिपी मध्ये आदित्य बाल लखनौला गेला होता.
त्याने एक अमेझिंग रेसिपी दाखवली. मोती पुलाव.
बकरीच्या बारीक आतड्यांमध्ये एग व्हाइट भरून थोड्या थोड्या अंतरावर दोर्‍याने बांधून मोती बनवले. मग ते पाण्यात घालून शिजवले. थंड झाल्यावर अंड्याचे शिजलेले मोती बाहेर काढले. इतके सुरेख मोती!!! मग हे मोती आणि मटार घालून पुलाव बनवला. हिरवे आणि पांढरे मोती घातलेला पुलाव खूप सुरेख दिसत होता. Happy

धन्स लोक्स!

चॅनेलच्या साईटवरच्या माहितीनुसारहे चॅनेल टाटा स्काय १३३, एयरटेल १२५ (एस्डी), १२६ (एच्डी), व्हिडिओकॉन (११७), हॅथवे (२५) आणि रिलायन्स २२३ वर उपलब्ध आहे.

ह्यातला कृष्ण फार तरुण आहे नाही???>>>>हा कृष्ण - गौरव घाटणेकर "तुजवीण सख्या रे" या स्टार प्लस वरिल मालिकेत कादंबरी मराठे चा प्रियकर दाखवला होता. छान दिसतो.

"यम किसीसे कम नहीं" मधला यम क्युट वाटतो. आणि त्याची गुजराती बाईको(जी गुजराती कम भय्यांनी जास्त वाटते.) त्याचा उचापती म्हेवना, चित्रगुप्त(पांडे), यमाचा इंजिनियर छाप असिस्तेंत, त्याचा रेडा. खूपच जमून आले आहेत कलाकार.

Pages