एपिक चॅनेल

Submitted by स्वप्ना_राज on 22 January, 2015 - 09:50

"एकांत" ह्या एपिक चॅनेल वर दर गुरुवारी रात्री १०:३० वाजता (रिपिट टेलिकास्ट - शुक्रवार रात्रौ ८:३०) लागणार्‍या कार्यक्रमामध्ये भारतातल्या एके काळच्या गजबजलेल्या पण आता ओसाड झालेल्या जागांबद्दल माहिती देतात. हा कार्यक्रम बहुतेक नोव्हेंबर २०१४ पासून सुरु झाला असावा कारण हे चॅनेलच मुळी तेव्हा सुरु झालं. माझे सुरुवातीचे काही भाग चुकले असावेत. राजस्थानमधलं भानगढ, त्रिपुरातलं उनाकोटी आणि गुजरातमधलं लखपत ह्यावरील भाग मी पाहिले. आणि त्यावरची माहिती 'संथ चालती ह्या मालिका' इथे पोस्ट केली. ती कायमस्वरुपी साठवून ठेवावी अशी सूचना झाली म्हणून हा धागा काढला.

हे चॅनेल इथे उपलब्ध आहे - https://docs.google.com/spreadsheets/d/19tI8WWcHdygXnFWpwtOwRrco61eS-1GhemitlPpLVWo/pubhtml?gid=0&single=true

कार्यक्रमांचं वेळापत्रक - http://www.epicchannel.com/schedule

ह्या बीबीवर पुढील एपिसोडस ची माहिती आहे:

एकांतः
१. लखपत, २. उनाकोटी ३. कित्तूर किल्ला ४. न्यारमा ५. अंदमान सेल्युलर जेल ६. विलासगढ ७. हळेबिडू
८. शेखावतीमधलं रामगढ ९. काश्मीरमधलं मार्तंड मंदिर १०. शिवसागर - अहोम साम्राज्याची राजधानी ११..गुजरातचं चंपानेर १२. श्रीनगरच्या हरीपर्बत वरचा किल्ला १३. लडाखचा 'चिकटन' किल्ला
१४. अंदमान निकोबारचं रॉस आयर्लंड १५. जंजिरा किल्ला १६. लखनौ रेसिडेन्सी १७. विष्णुपुर १८. विजयदुर्ग
१९. बटेश्वर २०. हंपी २१. कुलधरा २२. कुंभालगढ २३. असिरगड २४. बिजापूर २५. कांगडा फोर्ट (हिमाचल प्रदेश)
२६. जागेश्वर २७. रामनगर २८. लेह पेलेस २९. किल्ला मुबारक ३०. मेहरोली आर्किओलॉजिकल पार्क
३१. तलक्कड, मालंगी आणि वोडीयार राजे

देवलोक - सीझन १:
१. रंग २. जीवजंतू ३. स्वर्ग नरक ४. शक्ती ५. गणपतीबाप्पा ६. देवदेवतांची शस्त्रं ७. देवतांची वाहनं ८. गंगा ९.तीर्थ १०.युग ११. देवांचं अन्न १२. सृष्टीची रचना १३. दिशा १४. देवी-देवतांचे विवाह १५. देवी-देवतांचे रूप बदलणं
१६. विष्णूचे अवतार, १७. ग्रह-नक्षत्र १८. पुराण, वेद ह्यातील वनस्पती १९. पूजा आणि विधी

देवलोक चा सीझन २ सुरु होणार आहे. त्याचा वेगळा धागा काढून इथे लिंक देईन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो दिनेशदा, आज ६ भाग बॅक टू बॅक होते. मला बांगलादेशच्या निर्मितीवरचा भाग अर्धा तास पहायला मिळाला. त्यात काही ओरिजिनल फूटेज सुध्दा दाखवलं. रॉचे काही माजी अधिकारी माहिती देत होते. हा भाग पूर्ण पहायला मिळाला नाही ह्याचं भारी वाईट वाटलं.

मी ही फॅन झालेय या चॅनेलची. स्वप्नाच्याच पोस्ट वाचुन हे चॅनेल लावले गेले. कालचे 'कहासुनी' मधले तारामतीचा भाग थोडासा बघितला..
मध्ये मध्ये ते चित्रात्मक माहिती देतात ती ही मस्त असते. काल कहासुनी संपल्यावर 'काजु' ची पुर्ण माहिती दिली. काजुचा उगम, भारतात कसा आला, खाण्यायोग्य कधी बनवला, वगैरे..

धन्स गं स्वप्ना..

कालचे 'कहासुनी' मधले तारामतीचा भाग थोडासा बघितला..<<< रूपमती ना?

कित्तूर किल्ल्याचा एपिसोड नक्की बघनार. माझ्या आज्जीचं माहेर कित्तूर. धारवाडला गेलं की कित्तूरच्या किल्ल्याला एक तरी भेट व्हायचीच. बर्‍याच कथा दंतकथा प्रचलित आहेत. त्यापैकी कार्यक्रमात किती येतात ते बघू.

एकांतचा आजचा एपिसोड कर्नाटकातल्या कित्तूर किल्ल्यावर आणि ह्या किल्ल्याशी जिचं नाव जोडलं गेलं आहेत्या राणी चेनम्मावर.

बेळगाव जिल्ह्यातला हा किल्ला १६ व्या शतकात कित्तूरच्या शासनकर्त्या देसाई घराण्याने बांधला आणि तिथे आपली राजधानी केली. चेनम्माचा जन्म १७७८ चा. तिचा विवाह कित्तूरचा राजा मलसराजा (नाव नीट कळलं नाही) ह्याच्याशी कसा झाला ह्याची गोष्ट हिंदी चित्रपटात शोभेल अशी. झालं असं की लहानपणीच चेनम्माने घोडेस्वारी आणि तिरंदाजी शिकून घेतली होती. एकदा ती जंगलात शिकारीला गेली होती तेव्हा मलसराजाही तिथे शिकारीला आला होता. दोघांचेही बाण एकाच सिंहाला लागले. पण चेनम्माचं म्हणणं असं की माझ्याच बाणाने सिंह मेला. ह्या तडफदार पोरीवर राजा फिदा झाला आणि १५ वर्षांची चेनम्मा कित्तूरच्या राजाची दुसरी बायको झाली. हे राजघराणं इतकं श्रीमंत की १८ व्या शतकाच्या सुरुवातीला खजिन्यात १५ लाख रुपये नगद आणि दागदागिने होते.

ह्या खजिन्याचा मोह बाजीराव पेशव्यांनाही आवरला नाही आणि त्यांनी राजा मलसराजाला कैदेत टाकलं. तिथे त्याची प्रकृती खालावली. त्याच्या जीवाचं काही बरंवाईट झालं तर जनता बंड करेल ह्या भीतीने पेशव्यांनी त्याला मुक्त केलं. पण कित्तूरच्या वाटेवर असतानाच तो मॄत्यू पावला. त्याची पहिली पत्नी रुद्रम्मा देवाधर्माला लागली. तेव्हा चेनम्माने मलसराजा आणि रुद्रम्माचा मुलगा शिवलिंगप्पा ह्याला गादीवर बसवलं. पण तो कमजोर निघाला आणि अल्पायुषी ठरला. राज्याची सूत्रं पुन्हा चेनम्माकडे आली. तिने चांगला राज्यकारभार केला.

ह्या खजिन्यावर इंग्रजाम्ची नजर होतीच. १८२४ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या धारवाडच्या कले़क्टरने कित्तूरवर स्वारी केली. पण चेनम्माने त्याला किल्ल्यात पायसुध्दा ठेवू दिला नाही. धारवाडचा कले़क्टर युध्दात मारला गेला. ह्या युध्दात इंग्रजाम्चा पराभव झाला आणि चेनम्माची कीर्ती सर्वदूर पसरली.

पण एका बाईकडून हार खावी लागल्याने इंग्रजांची प्रचंड छीथू झाली. पण नुसत्या खजिन्यासाठी कित्तूरवर हल्ला केला तर बाकी राजे सावध होतील म्हणून इंग्रजांनी एक वेगळाच मार्ग अवलंबला. ज्या राजांना स्वतःचं मूलबाळ नाही किंवा जे इंग्रजांच्या मते (!) चांगले राज्यकर्ते नाहीत त्यांना गादीवरून हटवून ते राज्य इंग्रजांच्या आधिपत्याखाली आणायचा एक कायदा त्यांनी केला होता. चेनम्माचा स्वतःचा मुलगा दत्तक घेतलेला होता. हेच कारण पुढे करून त्यांनी मुंबई आणि म्हैसूर वरून फौजा मागवून १८२९ मधे पुन्हा कित्तूरवरस्वारी केली.

चेनम्माला असं काहीतरी होईल ह्याची कदाचित कल्पना असावी. म्हणून पहिल्या युध्दानंतरच तिने मुंबईच्या गव्हर्नरशी तहाची बोलणी लावली होती - फक्त एका अटीवर की आपल्या दत्तक मुलाचा अधिकार मान्य केला जाईल. ह्या बदल्यात पहिल्या युध्दात कैदी बनलेल्या इंग्रजांना सोडायची तयारी तिने दाखवली. मुंबईच्या गव्हर्नरने आधी त्या कैद्यांची सुटका करवून घेतली. आणि मग स्वारी केली. अ॑र्थात चेनम्माने युध्दाची तयारी सुरु केली होतीच. पण भारताला असलेला फितुरीचा चिरंतन शाप इथेही भोवला.काही लोकांनी इंग्रजांकडून पैसे आणि सत्तेचं आश्वासन मिळताच दारुगोळ्यात शेण कालवलं आणि कित्तूरचा पराभव्झाला. चेनम्मा आणि तिच्या दत्तक मुलाला जवळच्याच एका किल्ल्यात बंदी म्हणून ठेवण्यात आलं. तिथे काही वर्षांनी त्या दोघांचा मृत्यू झाला.

राणी कैद झाली तरी कित्तूरवासियांनी हार मानली नाही. संगोली रायण्णा नावाच्या एका सामान्य माणसाने इंग्रजांवर हल्ले करून त्यांना जेरीस आणलं होतं. पण इथेही फितूरीने घात केला. इंग्रजांनी त्याला पकडलं आणि कित्तूरजवळच्या नंदगड इथे फाशी दिलं. ह्यानंतर थोड्याच काळात चेनम्माच्या दत्तक मुलाचा मृत्यू झाला आणि कित्तूरचा विरोध मावळला. एका इतिहासाची अखेर झाली.

दिपु, आपुनको थॅन्क्स बोलना कानूनन अपराध है. इसके लिये आपको ५००० रुपये जुर्माना और बामुशक्कत कैद हो सकती है Proud

नंदिनी, माझं आजोळ बेळगावला होतं पण कधी ह्या किल्ल्याला भेट दिली नाही. कार्यक्रमात जेव्हढं सांगितलं तेव्हढं मी लिहिलं. आता बाकी दंतकथा तू सांग ना.

एकांतचा आजचा एपिसोड लेह पासून २५ किमी दूर असलेल्या न्यारमावर. इथे ११ व्या शतकात निर्माण झाली एक बौद्ध युनिव्हर्सिटी. आणि ती निर्माण करण्याचं श्रेय जातं लोचावा झॅन्गपो नावाच्या माणसाला. असं म्हणतात की ह्याच्या जन्माचं भाकीत खुद्द गौतम बुद्धांनी केलं होतं. लहानपणी सुध्दा ह्याला सोडून आईवडील कामाला जात तेव्हा तो इतर मुलांसारखा खेळत न बसता ध्यान लावून बसत असे. त्याच्या चेहर्यावरचं तेज पाहून आईवडिलांनी त्याला तिथल्या राजाकडे नेलं. हा राजा बौध्द धर्माचा अनुयायी होता व दरवर्षी काही मुलांना बौध्द धर्माच्या अभ्यासासाठी पाठवत असे. त्याने झॅन्गपोला २० मुलांसोबत काश्मीरला अभ्यासासाठी पाठवलं. तिथून जिवंत परत येणारा हा त्यां बॅच मधला एकमेव विद्यार्थी. येताना तो आपल्यासोबत ३२ कारागीर घेऊन आला. त्यांनीच न्यारमा बांधलं. असं म्हणतात की की झॅन्गपोला काही एकदा सांगितलं की तो ते लक्षात ठेवे आणि त्याचं तिबेटी मध्ये भाषांतर करे. म्हणून त्याला 'लोचावा' म्हणजे अनुवादक म्हणतात. तिबेटमध्ये त्याला बुद्धाचा दुसरा अवतार मानतात. न्यारमा मध्ये एका वेळी १०००-१५०० विद्यार्थी शिकत असत. इथे तेव्हा काढण्यात आलेल्या चित्रांपैकी एक अजून एका गुहेत तग धरून आहे. बाकी काही खांब ठीकसे इथल्या मॉनेस्टरीच्या प्रार्थनागृहात लावण्यात आले आहेत. अनेक इमारतीतूनही अशी चित्रं होती पण छत कोसळल्यावर आतला भाग उघडा पडला आणि हवा, उन ह्यांचा परिणाम होऊन ही चित्रं नष्ट झाली. Sad

आता मात्र ही जागा पूर्ण ओसाड आहे. पण ती का ओसाड झाली ह्यावर मात्र कोणी काहीच सांगू शकत नाही. काही लोकांच्या मते १३ व्या शतकात तुर्की आक्रमणाच्या वेळेस ती उध्वस्त झाली. पण १-२ मुस्लीम अभ्यासकांच्या मते (अर्थातच!) हे सत्य नाही. त्यांच्या मते ११ व्या शतकात न्यारमा निर्माण झालं तेव्हा बौध्द धर्मात पंथ नव्हते. पण पुढे ते निर्माण झाल्याने न्यारमावर त्याचा परिणाम झाला. स्थानिक जनतेला बौध्द धर्माची फार माहिती नसल्याने सुध्दा न्यारमाचं महत्त्व कमी झालं असावं. काही मतप्रवाहानुसार न्यारमासाठी आर्थिक पाठबळ स्थानिक राजाचं नव्हतं तर दुसऱ्याच राजाचं होतं. पण जेव्हा तो दुसरा राजा ते पाठबळ देऊ शकला नाही तेव्हा स्थानिक राजांनीही ते देऊ न केल्याने न्यारमाचा ह्रास झाला. ह्या परिसरात आलेल्या पुरामुळेही कदाचित वाताहत झाली असावी असंही म्हटलं जातं पण निश्चित अशी माहिती कोणाकडेच नाही.

लोचावा झॅन्गपो ह्यांचा पुनर्जन्म हिमाचल प्रदेशात झाला आहे असं म्हणतात. कोणी सांगावं कदाचित त्यांच्याकडून पुन्हा न्यारमाचा उद्धार होईल. Happy

आज एपिकवर 'राजा, रसोई और अन्य कहानिया' च्या एपिसोडचा अर्धा भाग पाहिला. हिमाचल प्रदेशवर होता. एका बाजूने पंजाब आणि दुसर्‍या बाजूने जम्मूला जोडला गेलेला हा प्रदेश असल्याने इथल्या स्वयंपाकावर दोन्हीचा प्रभाव आहे. इथल्या राजाला काश्मीरी वाजवान इतका आव्डला की त्याने आपल्या आचार्‍यांना तसाच वाजवान बनवायची सूचना केली आणि जन्माला आलं 'धाम'. मूग, उडीद, मसूर अश्या अनेक प्रकारच्या डाळींपासून बनवलेल्या ग्रेव्हीज ही ह्या धामची खासियत. मसुर डाळ ही भारतात उपयोगात आणली जाणारी सर्वात प्राचीन डाळ आहे म्हणे. ह्याच्या जोडीला आजकाल लोबिया, राजमा, चणे, तूरडाळ ह्यांचाही वापर होतो. तापलेल्या कोळश्यांवर मोहरीचे तेल टाकून ते तेल आणि कोळसा डाळीत घातले की त्याला एक प्रकारचा सुगंध येतो. ही प्राचीन स्वयंपाकाच्या पध्दतीपैकी एक पध्दत आहे.

पूजा किंवा लग्नाच्या वेळचं जेवण फक्त ब्राह्मण लोक बनवू शकतात. त्यांना बोटी असं म्हणतात. पूर्वीच्या काळी ह्यांना मोबदला म्हणून एक धान्याचं पोतं दिलं जात असे. सकाळी लवकर उठून स्नान करून धोतर नेसून हे बोटी लोक ३-४ तासात १०००-२००० लोकांचा स्वयंपाक सहज करत. ह्या डाळीत मद्रा म्हणून एक डाळीचा प्रकार खास प्रसिध्द आहे. ह्यात मावा आणि दही घालतात. बटाटे आणि चणा, किंवा काजू आणि मश्रूम अश्या कॉम्बिनेशन मधे हा मद्रा बनतो. आजकाल जर्दाळू घालूनही हा बनवतात.

हे जेवण वाढतात ते साल किंवा वडाच्या झाडाच्या सुकलेल्या पानांपासून बनवलेल्या पत्रावळीने. हा अनेकांचा रोजगार आहे.

गुरुद्वारामध्ये कशी पंगत बसते तसं ह्या धामचीसुध्दा पंगत बसते. सगळ्यांना एकसारखी वागणूक. कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही. आणि सगळ्यांचं जेवून होईतो, मग ते लहान मूल असलं तरी, कोणीही ताटावरून उठायचं नाही असा दंडक आहे. पंगतीचा शेवट गूळ घातलेल्या गोड भाताने होतो.

सामान्यांच्या धाम मध्ये मुख्यत्त्वे भाज्या पण राजपरिवारांच्या धाममध्ये जास्तकरुन मांसाचा वापर. एका राजघराण्यातल्या व्यक्तीने ह्याचं कारण असं सांगितलं की दिल्लीकडे जाण्याचा मार्ग ह्या प्रांतातून त्यामुळे नेहमीच लढाईची धामधूम. ह्यात पीक वगैरे कोण घेत बसणार. बरं संकट आलं आणि जंगलात पळावं लागलं तर बोकड वगैरे बरोबर नेता येतात. म्हणून मटणाचा वापर जास्त. ह्या राजांच्या स्वयंपाकघरातल्या अनेक पदार्थांच्या कृती अजूनही गुलदस्त्यात आहेत.

स्वप्ना, आम्ही अगदी आठवणीने येतोय गं.
तू लिहित रहा.
टिव्ही पाहणं काही आमच्या नशीबात नाही.
Wink

ते धाम वाचून मलापण अल्पनाचा लेखच आठवला.
आपल्या मराठी जिभेला यांच्या गोड रस्सेवाल्या डाळी आवडणार नाहीत. तरिही एकदा हे धाम आणि वाजवान खाऊन पहायला हवे.

>>Raja, rasoi air Anya kahaniyan is often historically inaccurate.

ह्म्म्म...पण तरी मला हा कार्यक्रम आवडतो. छान माहिती देतात. ७०% माहितीसुध्दा अचूक असेल तरी खूप काही पदरात पडलं म्हणायचं. त्या लिंकबद्दल धन्यवाद. मदरा आणि माणी दोन्हीच्या कृती सेव्ह केल्यात. ट्राय करून पाहते.

रमाकांत कोंढा, साती धन्यवाद. मी ह्यावेळच्या एकांतवर लिहिलं नाही कारण कोणी इथे येत नाही असं वाटलं होतं. म्हणून म्हटलं कशाला लिहा. आता त्यावरचीही माहिती टाकेन इथे.

मी पण येते इथे! मध्यंतरी एक Food paradise India नावाची ६ तासांची BBC documentary पाहिली युट्युबवर त्यात ह्या धामचं जेवण कसं बनवतात, पंगत कशी बसते असं सगळं दाखवलं होतं!

आज एपिक रात्री ११ वाजता लावले तर दादासाहेब फाळके यांनी 'राजा हरिश्चंद्र' कसा काढला आणि त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने कसे कष्ट घेतले हे दाखवत होते पण मला शेवटचे थोडेच बघायला मिळालं.

rmd, जिज्ञासा, अन्जू, मित, साधना धन्यवाद Happy इथे कोणाच्या काही पोस्टस नसल्याने कोणी येतं की नाही अशी शंका आली होती.

काल मी 'Lost Recipes' पाहिलं. एक गोड पोर्तुगीज म्हातारी तांदुळाच्या शेवयांच पुडिंग दाखवत होती. छान वाटलं बघायला.
या चॅनेल वरचे बरेच शो बघण्यासारखे आहेत असं वाट्तय. सुरुवात तरी छान आहे.
स्वप्ना माहित करून दिल्याबद्दल धन्यवाद !!

एकांतचा आजचा एपिसोड अंदमानच्या सेल्युलर जेलवर. आधी इथे ओपन जेल होतं. पण कैद्यांना त्यामुळे दहशत बसणार नाही म्हणून इथे सेल्युलर जेल बांधायचं ठरलं. कैद्यांना देशाच्या मुख्य भूमीपासून, बेटावरल्या रहिवाश्यांपासून, इतकंच काय पण दुसर्‍या कोठडीतल्या कैद्यांपासूनही तोडायचं म्हणजे त्यांचा तेजोभंग होईल अशी कल्पना होती. ह्यालाच सायलेन्ट सिस्टिम असंही म्हटलं जातं. जेरेमी बेन्थम,ज्याला फादर ऑफ मॉडर्न प्रिझन सिस्टिम असंही म्हटलं जातं त्याने हे जेल डिझाईन केलं. आणि ज्या स्वातंत्र्यसैनिकांना इथे कोंडलं जाणार होतं त्यांच्याच पायात बेड्या घालून त्यांना हा तुरुंग बांधायला लावला गेला. १८९६ मध्ये बांधला गेलेल्या ह्या तुरुंगात एकूण ७ विंग्ज होत्या. त्यातल्या २ जॅपनीज आर्मीने बंकर बनवायला पाडल्या. २ पुढे आलेल्या भूकंपात कमजोर झाल्या म्हणून पाडल्या गेल्या त्यामुळे तिथे आता ३ च विंग्ज शिल्लक आहेत.

हा तुरुंग म्हणजे स्वातंत्र्यसैनिकांची छळछावणी होती. संध्याकाळी ६ ते सकाळी ६ तो बंद होत असे. कैद्यांना एकमेकांशी बोलायची परवानगी नसे. इथे एकूण ६९८ कोठड्या होत्या. प्रत्येक साडेतेरा फूट बाय ७ फूट. त्यात एक लाकडी खाट, एक लोखंडी थाळी व एक पांघरूण. कैद्यांना वाचायला काही मिळत नसे किंवा पेपर, पेन्/पेन्सिल असंही काही मिळत नसे. टॉयलेटसाठी एक मातीचं भांडं जे त्यांना स्वत:च साफ करावं लागे. त्यांना कोलू फिरवण्यासारख्या कठीण कामाला जुंपलं जात असे. आणि ते पूर्ण झालं नाही तर अमानुष मारहाण, आठवडा आठवडा दोन्ही हात वर बांधून ठेवणे अश्या शिक्षा दिल्या जात. बर्‍याच कैद्यांना वेड लागलं तर काहींनी आत्महत्या केली. डेव्हिड बॅरी नावाचा जेलर फार कुप्रसिध्द होता. तो स्वतःला ह्या बेटांचा देव माने. कैद्याना दिवसातून फक्त ३ वेळा टॉयलेटला जायची परवानगी होती. त्यासाठीही जेलरच्या हातापाया पडावं लागे.

सात विंग्ज मध्यभागी एका वॉचटॉवरने जोडल्या होत्या. ह्यात एक घंटा होती. कोणी कैदी पळाला की ती वाजवली जाई आणि सर्व बेटावरचे गार्डस सावध होत. ह्या वॉचटॉवरमध्ये ह्या कारागृहात असलेल्या सर्व कैद्यांची नावं आहेत. ह्यात एक नाव विनायक दामोदर सावरकरांचं आहे. त्यांनी ह्या तुरुंगात १० वर्ष काढली. त्यांचे बंधूही ह्याच तुरुंगात होते. पण ही गोष्ट दोघा भावांना कळायला २ वर्ष लागली.

Pages