एपिक चॅनेल

Submitted by स्वप्ना_राज on 22 January, 2015 - 09:50

"एकांत" ह्या एपिक चॅनेल वर दर गुरुवारी रात्री १०:३० वाजता (रिपिट टेलिकास्ट - शुक्रवार रात्रौ ८:३०) लागणार्‍या कार्यक्रमामध्ये भारतातल्या एके काळच्या गजबजलेल्या पण आता ओसाड झालेल्या जागांबद्दल माहिती देतात. हा कार्यक्रम बहुतेक नोव्हेंबर २०१४ पासून सुरु झाला असावा कारण हे चॅनेलच मुळी तेव्हा सुरु झालं. माझे सुरुवातीचे काही भाग चुकले असावेत. राजस्थानमधलं भानगढ, त्रिपुरातलं उनाकोटी आणि गुजरातमधलं लखपत ह्यावरील भाग मी पाहिले. आणि त्यावरची माहिती 'संथ चालती ह्या मालिका' इथे पोस्ट केली. ती कायमस्वरुपी साठवून ठेवावी अशी सूचना झाली म्हणून हा धागा काढला.

हे चॅनेल इथे उपलब्ध आहे - https://docs.google.com/spreadsheets/d/19tI8WWcHdygXnFWpwtOwRrco61eS-1GhemitlPpLVWo/pubhtml?gid=0&single=true

कार्यक्रमांचं वेळापत्रक - http://www.epicchannel.com/schedule

ह्या बीबीवर पुढील एपिसोडस ची माहिती आहे:

एकांतः
१. लखपत, २. उनाकोटी ३. कित्तूर किल्ला ४. न्यारमा ५. अंदमान सेल्युलर जेल ६. विलासगढ ७. हळेबिडू
८. शेखावतीमधलं रामगढ ९. काश्मीरमधलं मार्तंड मंदिर १०. शिवसागर - अहोम साम्राज्याची राजधानी ११..गुजरातचं चंपानेर १२. श्रीनगरच्या हरीपर्बत वरचा किल्ला १३. लडाखचा 'चिकटन' किल्ला
१४. अंदमान निकोबारचं रॉस आयर्लंड १५. जंजिरा किल्ला १६. लखनौ रेसिडेन्सी १७. विष्णुपुर १८. विजयदुर्ग
१९. बटेश्वर २०. हंपी २१. कुलधरा २२. कुंभालगढ २३. असिरगड २४. बिजापूर २५. कांगडा फोर्ट (हिमाचल प्रदेश)
२६. जागेश्वर २७. रामनगर २८. लेह पेलेस २९. किल्ला मुबारक ३०. मेहरोली आर्किओलॉजिकल पार्क
३१. तलक्कड, मालंगी आणि वोडीयार राजे

देवलोक - सीझन १:
१. रंग २. जीवजंतू ३. स्वर्ग नरक ४. शक्ती ५. गणपतीबाप्पा ६. देवदेवतांची शस्त्रं ७. देवतांची वाहनं ८. गंगा ९.तीर्थ १०.युग ११. देवांचं अन्न १२. सृष्टीची रचना १३. दिशा १४. देवी-देवतांचे विवाह १५. देवी-देवतांचे रूप बदलणं
१६. विष्णूचे अवतार, १७. ग्रह-नक्षत्र १८. पुराण, वेद ह्यातील वनस्पती १९. पूजा आणि विधी

देवलोक चा सीझन २ सुरु होणार आहे. त्याचा वेगळा धागा काढून इथे लिंक देईन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालचा एकांतचा एपिसोड कर्नाटकातील 'हळेबिडू' वर होता. ह्याच्या नावाचा अर्थच मुळी 'जुनं शहर'. होयसाला ह्या प्रसिद्ध राजघराण्याची १२ व्या शतकातली ही राजधानी. म्हैसूर पासून १५० किमी वर. ह्या राजांची पहिली राजधानी इथून ५०-५५ किमी दूर हंगडी इथे होती. अगदी आत्ताआत्तापर्यत ह्या भागात जैन मंदिराचे अवशेष, मातीचे ढिगारे असं दृश्य दिसे. २००९-२०१० पासून भारतीय पुरातत्त्वखात्याने इथे रेस्टोरेशनचं काम सुरु केलंय.

ह्या राजघराण्याचं हे नाव कसं पडलं ह्याची कहाणी सुरस आहे. ह्या घराण्याचा मूळ पुरुष साला त्याच्या गुरूबरोबर रानात शिकारीला गेला होता. अचानक त्याच्यासमोर एक सिंह उभा ठाकला. त्याच्या गुरुंनी एक त्रिशूळ किंवा तसंच शस्त्र त्याच्याकडे फेकलं आणि म्हटलं 'होय साला' म्हणजे 'त्याला मार साला'. त्यावरून हे नाव पडलं. ह्या घटनेवरूनच होयसाला घराण्याचं राजचिन्ह जन्माला आलं जे त्यांच्या अनेक मंदिराबाहेर दिसतं. हे घराणं शूरांच तर होतंच पण कला, खास करून शिल्पकलेला प्रोत्साहन देणारं म्हणूनही त्यांची ख्याती आहे. त्यांनी १५०० हून अधिक मंदिर बांधली. त्यातली ४०-५० च आता शिल्लक आहेत.

हंगडीनंतर बेलूर हे राजधानीचं शहर बनलं. ह्याला दक्षिण भारताची वाराणसी म्हणतात. इथलं चेन्नाकेशवाचे प्रसिद्ध मंदिर ह्या राजांनीच बांधलं. ह्याचे शिल्पकार जगनाचार्य ह्यांची एक कहाणी विलक्षण आहे. त्यांचा मुलगा वडिलांना शोधत ह्या शहरात आला. तोही शिल्पकारच. त्यालाही ह्या मंदिरात काम मिळालं पण आपले वडील इथेच आहेत हे त्याला माहीत नव्हतं. इथल्या विष्णूच्या मूर्तीत काही त्रुटी आहेत असं त्याचं म्हणणं. ते ऐकताच जगनाचार्य संतापले. आणि त्यांनी त्याला ह्या त्रुटी दाखवून द्यायचं आव्हान दिलं. त्याने त्या दाखवूनही दिल्या. शिक्षा म्हणून जगनाचार्यनी आपला उजवा हात कापून टाकला. नंतर त्या दोघांना आपलं पिता-पुत्राचं नातं समजलं. पुढे दोघांनी मिळून गावात एक मंदिर बाम्धाल्म. देव प्रसन्न झाला आणि जगनाचार्यना त्यांचा उजवा हात परत मिळाला. ह्याच जगनाचार्यच्या नावाने कर्नाटक सरकार दरवर्षी शिल्पकाराला पुरस्कार देते.

बेलूरनंतरची राजघराण्याची तिसरी आणि शेवटची राजधानी 'हळेबिडू'. ह्यातलं होयसालेश्वराचं मंदिर प्रसिद्ध आहे ते सर्वात अप्रतिम कारागिरीसाठी. होयसालेश्वराची मूर्ती एका अख्ख्या दगडातून कोरून काढलेली आहे. हे मंदिर शिवाला समर्पित असून भिंतींवर उपनिषद आणि पुराणातल्या कथा चित्रित आहेत. होयसाला राजे आधी जैनधर्मीय होते. पुढे त्यांच्यातल्या विष्णूवर्धन नावाच्या राजाने हिंदू धर्म स्वीकारला. चेन्नाकेशवाचे मंदिर विष्णूचं. द्वारसमुद्र (हे बहुतेक हळेबिडूचं आधीचं नाव असावं. मला नीटसं कळलं नाही) इथले रहिवासी शिवाचे उपासक. त्यानी बेलूरच्या तोडीस तोड मंदिर बांधायचे ठरवलं. कारागिरांच्या ५-७ पिढ्या खपल्या. १०० हून अधिक वर्षं लागली. आणि 'हळेबिडू'चं शिवाचं मंदिर तयार झालं.

ह्या घराण्याच्या वीरबलाल तिसरा ह्या राजाच्या काळात अल्लाउद्दीन खिलजी आणि मलिक काफुरची स्वारी 'हळेबिडू' वर झाली. हा राजा ह्या घराण्यातील शूर राजांपैकी एक. 'हळेबिडू' नष्ट होउ नये म्हणून त्याने तह केला. पण हरिहर राया आणि बुक्क राया ह्या दोन शूर सेनापतींच्या साथीने तयारी सुरु केली. पुढे तुघलक घराण्याच्या राजवटीत पुन्हा एकदा 'हळेबिडू' वर हल्ला झाला. वीरबलालने त्याला धूळ चारली. त्याने माघार घेत असल्याचं दाखवलं. वीरबलालनेने त्याला अभय दिलं पण त्याने कपटाने वीरबलालचा काटा काढला. वीरबलालनंतर त्यःकॅं मुलगा विरुपाक्ष गादीवर आला पण वडिलांप्रमाणे तो कुशल प्रशासक नव्हता. त्याच्यापेक्षा हरिहर राया आणि बुक्क राया ह्या दोघावर लोकांचा जास्त विश्वास होता. काळाची पावलं ओळखून आणि लोकांचा कल पाहून ह्या दोघांनी तेव्हा उदयास येत असलेल्या साम्राज्यात आपला प्रदेश विलीन केला आणि होयसाला राजघराण्याची अखेर झाली.

काल हापिसातून यायला जरा उशिर झाला म्हणून जेवता जेवता नोट्स काढत एपिसोड पाहिला. चुका झाल्या असतील त्याबद्दल क्षमस्व.

वा.. बेलूर-हळेबिडू ! अनेक वर्षांपूर्वी इथली देवळं पाहिली होती. त्या काळातली स्थापत्यकला पाहून अवाक व्हायला होतं. डीश टीव्हीवर का दिसत नाही हे चॅनल Angry

आज प्रथमच येथे आलो आणि उत्तम माहिती वाचली. स्वप्ना लिहीत रहा. अतिशय उत्तम. ".... टिप्पणी ऐका" आणि ही दोन्ही क्लास आहेत!

एकांतचा कालचा एपिसोड जयपूरपासून १२५ किमी दूर असलेल्या शेखावतीमधल्या रामगढवर. शेखावतीला World's Biggest Open Air Art Gallery म्हणतात ते सुबक कोरीवकामासाठी प्रसिद्ध असलेल्या इथल्या हवेल्यांमुळे. ३ किमीच्या परिसरात वसलेलं रामगढ तेव्हाच्या काळात भारतातल्या सर्वात संपन्न शहरांपैकी एक गणलं जात होतं. ह्या शहराला ४ दरवाजे - एक फतेहपुर ला जाणारा, दुसरा चुरूला जाणारा, तिसरा दिल्लीचा तर चौथा बिकानेरचा. ह्यातलं चुरू हे शहरच रामगढच्या निर्मितीस कारणीभूत झालं. तिथे अनेक पोद्दार घराणी होती. उंटाचा व्यापार करणारे हे लोक श्रीमंत होते. तिथल्या ठाकुरांच त्यांच्याकडे लक्ष गेलं आणि त्यांनी त्यांच्या व्यापारावर कर लादायला सुरुवात केली. पोद्दार लोकांनी ह्याविरोधात उठाव केला. त्यातलं एक घराणं एव्हढं हिकमती की त्यांनी पणच केला की चुरूपेक्षा जास्त श्रीमंत आणि समृद्ध शहर वसवून दाखवू. हे शहर म्हणजेच रामगढ.

ह्या शहरात २०० वर्षांपूर्वीच्या अनेक हवेल्या आपल्या कलाकुसरीसकट आजही उभ्या आहेत. ही चित्रं काढायला फुलं, दूध, गोंद अश्या गोष्टींचा रंग बनवायला वापर केला जात असे. जर्मनीहून खास मागवलेल्या रंगात दूध/तूप मिसळून ही चित्रं काढली जात त्यामुळे आजही ती काल-परवा काढल्यासारखी दिसतात. खाली दुकान किंवा गोदाम आणि वर शेठ लोकांच्या कुटुंबाची रहाण्याची सोय अशी ह्या हवेल्याची रचना असे. एकेक् हवेली १००-१५० कुटुंब रहातील एव्हढी मोठी. पण आज ह्यातल्या अनेक हवेल्या बंद आहेत. ४-५ पिढ्यांपासून इथे कोणीही आलेलं नाही. काहींच्या वंशजांना आपली हवेली कुठे आहे हेही कदाचित माहीत नसेल. खाजगी मालमत्ता म्हणून सरकारही तिथे लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे हळूहळू त्यांची पडझड होत आहे. एके काळी कोणाची हवेली सर्वात जास्त आलिशान ह्यावरून त्यांच्या सांपत्तिक स्थितीचं मूल्यमापन होत असे आणि त्यासाठी ह्या सेठ लोकांत चढाओढ लागे.

ह्या हवेल्यात रामगोपाल पोद्दार नामक सेठाची हवेली सर्वात प्रसिद्ध आहे. १८७२ मध्ये त्याच्या निधनानंतर त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्याच्या वंशजांनी ती बांधली. ह्यात ५०० हून अधिक चित्रं आहेत. त्यात प्रामुख्याने ३ भाग दिसून येतात - रामायण, कृष्णलीला आणि तिसरा भाग काय सांगितला तो मला ऐकू आला नाही. महाभारतातील चित्रंही रेखाटली आहेत.

ह्या सेठ लोकांचा व्यापार भारतभर चाले. त्यासाठीच्या communication साठी त्यांनी एक अभिनव युक्ती शोधून काढली होती. काचेवर प्रकाश परावर्तीत करून एकमेकांना एका शहरातून दुसर्या शहरात ते भावांची देवाणघेवाण करत असत. रुईया आणि खेतान कुटुंबीय मूळचे इथलेच.

पुढे लुटारूंची भीती वाढली. स्थानिक राजे आणि पुढे इंग्रजांनी कर लादले. हा कर दिला नाही तर मालमत्ता जप्त केली जाऊ लागली. हळूहळू इथले व्यापारी हे शहर सोडून गेले आणि रामगढ ओस पडलं.

आज लॉस्ट रेसिपीज मध्ये हैदराबादची "आश" ही डिश दाखवणार होते. ती बनवायला तब्बल ८ तास लागतात आणि त्यात ७ वेळा फोडणी देतात असं प्रोमोजमध्ये दाखवत होते. कोणी हा कार्यक्रम पाहिल्यास इथे नक्की लिहा प्लीज.

ओह वॉव! भारीच स्वप्ना! Thank you इथे लिहिल्याबद्दल! रामगढ, ठाकूर वै. ऐकल्यावर मला शोले आठवला (दुसरं काय आठवणार म्हणा!)

त्यातलं एक घराणं एव्हढं हिकमती की त्यांनी पणच केला की रामगढ पेक्षा जास्त श्रीमंत आणि समृद्ध शहर वसवून दाखवू. हे शहर म्हणजेच रामगढ.>> इथे चुरू पेक्षा असं हवंय का?

जिज्ञासा, धन्स, दुरुस्ती केली आहे.
लोक्स, धन्यवाद ह्या चॅनेलचे आणि हा कार्यक्रम सादर करणार्‍यांचे मानायला हवेत. मी ते ऐकून आणि पाहून फक्त इथे लिहिते.

एकांतचा एपिसोड काश्मीरमधल्या मार्तंड मंदिरावर. श्रीनगरपासून ६० किमी अंतरावर. भारतात सूर्याची ३ मंदिरं. एक गुजरातमधलं मोटेरा, दुसरं ओरिसातलं कोणार्क. इथलं तर तिसरं काश्मीरमधलं मार्तंड. मार्तंड मंदिर सुमारे १२०० वर्षांपूर्वीचं. पण ह्या सगळ्यात सर्वात मोठं. एक दंतकथा अशी की हे मंदिर पांडवांनी बनवलं. वस्तुस्थिती अशी की हे बनवलं काश्मीरचा सर्वात प्रसिद्ध आणि सफल राजा ललितादित्य याने. ह्याची तुलना अलेक्झांडर शी केली जात असे. एके काळी ह्याने आपल्या साम्राज्याचा विस्तार चीनपर्यन्त करायचा प्रयत्न केला होता.

ह्या मंदिराच्या रचनेत जे दगड वापरले आहेत ते ह्या प्रदेशातले नाहीत. मग एव्हढे मोठे दगड इथे कसे आणले गेले? इथे एखादी नदी किंवा तिची tributary असावी. जिच्यातून ह्या दगडांची वाहतूक् मंदिर बांधणीच्या परिसरात केली गेली असावी. ह्या दगडांवर कोरीवकाम करणारी टीम सुध्दा वेगळी असे. ह्या मंदिराच्या गर्भगृहात सूर्याची मूर्ती होती. लोक म्हणतात की वर एक असं यंत्र बसवलं होतं की ज्यामुळे पूर्ण दिवस सूर्यप्रकाश मूर्तीवर पडत असे. मंदिरातली एकही अशी खोली नव्हती की सूर्योदय ते सूर्यास्त जिच्यात अंधार असेल. सर्व भिंतीवर खोदून देवीदेवतांची चित्रं बनवली आहेत. अशी एकूण ३६५ चित्रं आहेत - वर्षाच्या प्रत्येक दिवसासाठी एक चित्र.

ह्या मंदिरापासून जवळच राजा ललितादित्यने बनवलेलं शहर परिहासपूर ह्याचे अवशेष आहेत. ह्या नावाचा अर्थ होता - हसरं शहर. पण आता स्थानिक भाषेत त्याला जे नाव पडलंय (मला ऐकायला आलं नाही) त्याचा अर्थ होतो दगडांचं शहर. इथं इंडो-ग्रीक शैलीत राजा ललितादत्यने एक विष्णुमंदिर बनवलं होतं. त्यात ब्राँझ, कॉपर आदी धातूंचा वापर केला गेला होता हे त्याचं वैशिष्ट्य. ह्यात एक मुक्तेश्वराची मूर्ती होती - सोन्याची. असं म्हणतात की ती ८४००० तोळे सोन्याची होती. एक तोळा म्हणजे साधारण १० ग्रॅम्. म्हणजे ८४० किलो सोन्याची मूर्ती. ह्या मंदिरातल्या बहुतेक मूर्ती सोन्याच्या होत्या आणि हे मंदिराच्या विनाशाचं एक कारण बनलं.

आज हे मंदिर नक्की कुठे होतं हेही सांगता येणार नाही अशी ह्या परिसराची अवस्था आहे. एकूण ३ इमारतींचे plinth शिल्लक आहेत. त्या प्रत्येकाचीच लांबी १० ते १२ फुट असेल त्यावरून इमारत किती मोठी असेल ह्याचा अंदाज येऊ शकतो. ह्या परिसरात पूर्वीच्या राजधानीच्या अवशेषांसोबतच नंतर आलेल्या बौध्द धर्माच्या काळातल्या स्तूप आणि चैत्यांचे सुध्दा अवशेष मिळतात.

नंतरच्या काळात Succession Planning वरून झालेली भांडणं ह्या शहराच्या नाशाचं एक कारण. नदीच्या पात्राचा बदललेला मार्ग हे दुसरं.

मार्तंड मंदिरचा एव्हढा दबदबा की राजेमहाराजे ही त्याला हात लावायला घाबरत. ह्याला कारण झाली राजा हर्षची कथा. असं म्हणतात की ह्या राजाने ही मूर्ती मंदिरातून हलवली. पण त तो लगेच आजारी पडला. त्याने देवाची माफी मागितली आणि हुबेहूब दुसरी मूर्ती मंदिरात आणून ठेवली. तरीही मंदिराच्या आतच त्याचा मृत्यू झाला. ह्या कहाणीत फारसं तथ्य नसावं कारण मग हीच गत ४ थ्या शतकातील सुलतान सिकंदर ची व्हायला हवी होती. त्याला बुतशिकन म्हणजे मूर्तिभंजक असंच नाव पडलं होतं. त्याने ह्या मंदिरावर हल्ला केला. धार्मिक असहिष्णुता हे कारण होतंच पण मूर्तीच्या सोन्याचाही लोभ होता. जवळपास एक वर्ष त्याचे लोक हे मंदिर तोडायचा प्रयत्न करत होते. पण त्यांना यश आलं नाही तसं मंदिरात आग लावून ते निघून गेले. असं म्हणतात की जवळजवळ १-२ वर्ष हे मंदिर धुमसत होतं. लोकांनी ते विझवायचा प्रयत्न केला की नाही ह्याचा काही उल्लेख कार्यक्रमात केला गेला नाही. असो. तरीही हे मंदिर पूर्णपणे नष्ट झालं नाही.

ह्यानंतर मात्र आपल्याच लोकांची बेपर्वाई, राजांचं दुर्लक्ष, लोकांनी सुरु केलेली मूर्ती आणि दगडांची चोरी ह्यामुळे राजा ललितादित्यने बांधलेलं हे विशाल मंदिर ४००-५०० वर्षात ओसाड झालं. पण आजही जे टिकून आहे ते बघायला इथे जायलाच हवं.

हे नेटवरचे फोटो. आणि ही विकी लिंक.

कार्यक्रमाचा अ‍ॅन्कर ह्या मन्दिराच्या नावाचा उच्चार मार्तांड असा करत होता ते मात्र खटकलं.

स्वप्ना राज,

धन्यवाद !! आमच्या ईथे एपिक चॅनेल दिसत नसल्याने आम्ही एपिक चॅनेल बघतो ते ह्या धाग्यावरच !!

ते ललितादित्य आहे नाव. मस्त एपिसोड आहे. लॉस्ट रेसीपी मध्ये काल रविंद्रनाथ ठाकुरांची आव डती कॉली
फ्लॉवरची बर्फी दाखवली. पितळेची कढई थाळी व वा टी बघुनच खूप छान वाटले. बर्फीचे एक खास नाव पण आहे.
ठाकुरांच्या आताच्या घरात मध्ये आवारात ती बनवली. त्या बाईंनी एक गोडघाश्या रविंद्रनाथांची कविता म्हटली ती ही फार मजेशीर होती. आम पापड दु धात घालायचा मग त्यात केळ्याचे तुकडे घालायचे एक संदेश चुरून घालायचा. मग आपुश हापुश आवाज करत हे सर्व गोड गट्टम करायचे म्हणजे सर्वत्र एक समाधान शांती पसरते. ते बांगला मध्ये ऐकायला पण गोड वाट्त होते. कॉली फ्लॉवर उकडून तो तुपावर परतून त्यात सुकामेवा, मावा वगैरे घालून बर्फी बनवली आहे.

संरचना पण मस्त प्रोग्राम आहे. कैलाश मंदीर व अहमदाबादचे झूम ते मिनार दाखवले. रक्त व सियासत पण चांगल्या वाटत आहेत मालिका. एकूण चॅनेलचा बाज विचित्र विश्व मासीक असावे तसा आहे. गुड फाइंड.

एक महत्वाचे म्हणजे चॅनेल वरील कार्यक्रमांची हिंदी भाषा फार उत्तम क्वालिटीची आहे.

रमाकांत कोंढा, vt220 - ह्या कार्यक्रमामुळे अश्या जागांची मस्त माहिती मिळतेय. मला तर असं काही मंदिर आहे ह्याची कल्पनाच नव्हती. तरी ते सांगतात त्यातली बरीच माहिती निसटून जाते माझ्याकडून. नोटस काढल्या तरीही. Sad

हैदर चित्रपटात ह्या मार्तंड मंदिरात बिस्मिल बिस्मिल गाणे चित्रित केले आहे. परिणामकारक गाणे झाले आहे. पूर्ण गाणे आई ला उद्देशून नसून मातृभूमि ला उद्देशून आहे.

धन्यवाद अमा. टायपोची दुरुस्ती केली आहे.

>>आम पापड दु धात घालायचा मग त्यात केळ्याचे तुकडे घालायचे एक संदेश चुरून घालायचा.

बाप रे! खवय्ये मध्ये काही बायकांनी सांगितलेल्या गोड पाककृतींची आठवण झाली. आम पापड म्हणजे आंबापोळी ना?

>> कॉली फ्लॉवर उकडून तो तुपावर परतून त्यात सुकामेवा, मावा वगैरे घालून बर्फी बनवली आहे.

हायला, कॉलीफ्लॉवर होता तो? प्रोमो म्यूट वर असल्याने मला तर मॅश केलेलं केळंच वाटलं.

मला ते कवीला कॉबी म्हणतात ते आणि त्याला कॉलीफ्लोवरची बर्फी बनवून खायला दिली ते फार मजेशीर वाटले. त्यांना पुरस्कार मिळाल्या प्रीत्यर्थ सात मे ला दर वर्शी घरी बनवतात. बाहेर कुठेही ही मिळत नाही.

मी मध्यंतरी एकदा मँगो आइसक्रीम, केकचे दोन तुकडे, फळे व वर ऑरेज् मार्मालेड घालून आरामात बसून खाल्ले होते व नंतर एकदम जबरदस्त समाधान वाटले होते साबु दाणा खिचडीत ताक, सुकी भेळ , तसेच एकदा एका निवांत दुपारी फ्रेश पायनापल पेस्ट्री खाउन जबरी समाधान वाटले होते त्यामुळे ही कविता ऐकून एकदम बरे वाटले. इतक्या मोठ्या माण सा ला पण अश्या छोट्या बाबीत समाधान वाटते. ती कविता त्यांनी लहान वयात केली होती. व सांगनारी बाई आता असेल सत्तरीत पण ती ही खुदखुदत होती सो स्वीट.

स्वप्ना, अमा, मस्त माहिती! खरंच इथे वाचून समाधान मानावे लागते आहे. तुम्ही लिहीत रहा!
मार्तंड मंदिराचे वाचून ह्या इथली
काळ खूप खेळून जातो म्हणतात..ही ओळ आठवली! कालाय तस्मै नमः!

>>मी मध्यंतरी एकदा मँगो आइसक्रीम, केकचे दोन तुकडे, फळे व वर ऑरेज् मार्मालेड घालून आरामात बसून खाल्ले होते

तेव्हढं फळं आणि ऑरेज् मार्मालेड सोडलं तर मँगो आइसक्रीम, केकचे दोन तुकडे म्हणजे थोडंफार cassata आईसक्रीमच झालं की. माय ऑल टाईम फेव्हरेट. बरी आठवण केलीत. आता आणून खातेच. Proud

Pages