कुळीथ/हुलग्याच्या पिठाचे शिंगोळे

Submitted by तृप्ती आवटी on 8 February, 2015 - 22:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कुळीथ पीठ- २ वाट्या
सुकं खोबरं- २ चमचे
दाण्याचा कूट- २ चमचे
लसणाच्या पाकळ्या- ७-८
कोथिंबीर- सढळ हातानं
इतर- हळद, तिखट, मीठ, हिंग, गरम मसाला, मोहरी, धणेजिरे पूड (ऐच्छिक), पाणी

क्रमवार पाककृती: 

हुलग्याच्या पिठात खोबरं, दाण्याचा कूट, बारीक चिरलेला लसूण, हळद, तिखट, मीठ घालून मळून घ्यावं. जरा घट्टच मळावं. एकीकडे खोलगट पातेल्यात मोहरी-हळद-हिंगाची फोडणी करावी. फोडणी तडतडली की पातेलं तीन चतुर्थांश तरी भरेल एवढं कोमट पाणी घालावं. गरम मसाला, धणेजिरे पूड, मीठ आणि कोथिंबीर घालावी. तेलाच्या हातावर शिंगोळे साधारण कडबोळ्यांसारखे वळावेत. शिंगोळे नंतर चांगले फुलतात त्यामुळे जरा बारीक वळ्या वळाव्यात. पाण्याला उकळी आली की त्यात शिंगोळे सोडावेत. शिजले की शिंगोळे फुलून वर येतात. सगळे वळून झाले की झाकण घालून मंद आचेवर अगदी अर्धा मिनिट शिजवावेत.

edited.jpg

शिंगोळे तयार आहेत. गरम-गरम शिंगोळे लोणकढं तूप घालून खावेत.

वाढणी/प्रमाण: 
दोन जणांना वन डिश मील म्हणून पुरेसे होतील
अधिक टिपा: 

* शिंगोळ्याचं पीठ सुटून पाण्याला थोडा दाटपणा येतो पण आणखी दाट हवं असल्याच अर्धा चमचा कोरडं पीठ फोडणीत परतून घालायला हरकत नाही.
* शेंगोळे दिसायला फारसे आकर्षक दिसत नाहीत म्हणून मी फोटोसाठी काही शिंगोळ्यांना वेगळा आकार दिला आहे.

माहितीचा स्रोत: 
आय
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद तृप्ती. मी बर्‍याच दिवसापासुन याचीच कृती शोधत होते. पीठ आणले पण तसेच पडले आहे. नक्की करणार.

कुळथाचं पिठलं साधारण आठवड्यातून एकदा होतं, पण हे शिंगोळे कधीच खाल्ले नाहीयेत. मी करून खाणार नक्कीच!
पण पीठात दा.कु. नाही घालणार.

छान दिसताहेत शेंगोळ्या. करुन मात्र पाहणार नाही Happy

माझ्या अति नावडीच्या पदार्थात शेंगोळ्या हा पदार्थ आहे. हा पदार्थ मी पहिल्यांदा एका मित्राच्या डब्यात पाहिला आणि ते रुप पाहिल्यावर आयुष्यात परत कधीही शेंगोळ्या खाणार नाही अशी शपथ घेतली. अर्थात कुळथाचे पिठ असल्याने या शेंगोळ्या खुप पौष्टिक आहेत याची मला जाणिव आहे पण तरीही...

दुस-या एका मित्राच्या बायकोने एकदा शेंगोळ्या ब्ननवलेल्या. तिने बहुतेक बेसन वापरुन बनवलेल्या आणि त्या शेंगोळ्यांच्या पिठात भरपुर कोथिंबीर होती. मी शेंगोळ्या ऐकल्यावर नको म्हणुनच नाक मुरडलेले पण तिने कोथिंबीरीच्या शेंगोळ्या आहेत, चव घ्या म्हटले म्हणुन एक उचलुन खाल्ली. मस्त होती चवीला. तिच्या शेंगोळ्या कोरड्या होत्या. रस्सा अजिबात नव्हता.

मस्तच.

शेंगोळे मी पहिल्यांदा श्रीरामपूरला खाल्ले पण खूप वेगळे होते ह्यापेक्षा. आम्ही राहायचो त्यांच्याकडे फोडणी नाही द्यायचे आणि शेंगोळ्याला जिलब्या म्हणायचे. तीपण टेस्टी होती.

एकदा टीव्हीवर कृती दाखवली तसे मी करते त्यात दाण्याचे कुट कुळथाच्या पिठात मिक्स न करता फोडणी दिलेल्या पाण्यात घालायचं असं दाखवलं होतं.

आज हि तिसऱ्या प्रकारची शेंगोळे कृती मिळाली.

पेरू, Sad हुलगे मिळत असतील तर कॉफी ग्राइंडरमध्ये गरजेपुरते पीठ करता येइल का?

रश्मी.., करून बघा आणि सांगा कसे झाले होते Happy

मंजूडी, दाकु का नाही घालणार? हुलग्याचं पीठ जरा चिकट असतं. खोबरं आणि दाण्याच्या कुटाने खाताना तो चिकटपणा जाणवत नाही.

अन्जू, घर घर की रेसिपी वेगळी असावी असं वाटतंय Happy

साधना, Biggrin I don't blame you. शिंगोळ्यांचं रंग-रूप-आकार बघून हा पदार्थ आजन्म न खाण्याची शपथ घेतलेले दोन मेंबर घरातच असल्याने समजु शकते.

पण तुला कुळथाचं पिठलं आवडत असेल तर याची चव नक्की आवडेल. शिंगोळे तयार होताना त्या पिठाची आणि लसणाची चव उतरून तो रस्सा इतका भारी चविष्ठ होतो की बास रे बास Happy

कोथिंबीरीच्या शेंगोळ्या >>> वर्णन वाचून या साधारण कोथिंबीरीच्या वड्या करतो तशा पिठाच्या वाफेवर शिजवलेल्या असतील असं वाटतंय. किंवा मग पाटवड्या करतो तशा.

वाह! फोटो बघुनच एकदम तोंपासु. उद्याच करते. कुळीथाचं पिठलं खूप आवडतं.

हे भाताबरोबरही खाता येतील ना?

तू नुडल्स किंवा वरणफळं भाताबरोवर खात असशील तर हे पण खा Wink जोक्स अपार्ट, हा थोडा वरणफळांसारखा प्रकार आहे गं. त्यामुळे नुसतेच खायचे.

ऑन सेकंड थॉट, गरम गुरगुट्या भातावर तो रस्सा घालून खायला छान लागेल खरं तर.

कुळथाच पिठलं खूप आवडतं, कालच केलं होतं. पण हे कधी खाल्लं नाहीये. कुळथाच पीठ एकदम लिमिटेड आहे, त्यामुळे पुढचा स्टोक आला की करणार.

ऑन सेकंड थॉट, गरम गुरगुट्या भातावर तो रस्सा घालून खायला छान लागेल खरं तर. >>> माझा तर पहिलाच थॉट होता तो.

पेरु जर कुळिथ मिळाले तर ते हलकेसे गरम करुन मग दळुन बघा. कारण ते थोडे चिकट असतात. पण पीठ जास्त दिवस ठेऊ नका, सम्पवुन टाका.

तृप्ती, शेन्गोळे छानच झाले. पीठाला थोडी विरी गेल्याने कडबोळ्यान्चा आकार जमला नाही, लाम्बट केले. म्हणून फोटो टाकत नाही. पण चव मात्र छानच होती.:स्मित: मात्र एक बदल केला. पीठात लसुण घालण्या ऐवजी लसणाचा ठेचा जो केला होता, त्याचेच पाणी फोडणीला घातले. ( लसुण्+मीठ्+लाल तिखट एकत्र मिक्सीत नेहेमी वाटुन ठेवतो) धन्यवाद परत एकदा.

तृप्ती, कुपिचा तो चिकटपणा आवडतो, पिठल्यात दाकु घालायचं? ही कल्पना सहन झाली नाही Wink म्हणून शिंगोळ्यातही घालणार नाही. फोडणीत पाणी घातल्यावर आमसूल घालणार मात्र नक्कीच.

कुलिथ म्हणजे horsegram का? फोटो छान दिसतो आहे. किंवा ते मसूर म्हणून असतं ते का?

आमसूल? नका रे असं करु Happy

रश्मी, लगेच केले पण?

करणारच म्हणणार्‍यांनी केले की नाही?

फोटोचं कवतिक करणार्‍यांना धन्यवाद Happy

कुळीथ मुळात चवीला कसे असतात हेच नाही माहीत. हाप्रकार कुळीथ पीठ आणून करून पाहायला हवा!
बाकी शेंगोळे प्रकार आवडीचा आहेच. आई कणीक, ज्वारीचं पीठ, ह.डा. पीठ वापरून करते. य वर्षे झालीत आता खाऊन

फोटो अग्दी तोंपासू आहे मात्र Happy

कुळीथ मुळात चवीला कसे असतात हेच नाही माहीत.>>> कसं व्हायचं! Proud Light 1

पिठलं अतिच आवडतं त्यामुळे शिंगोळे कधी केलेच नाहीत आईकडे असताना.
काही दिवसांपूर्वी साबांनी मात्र केले ते आवडले. पण पिठलं ते पिठलंच असं मला वाटलं. साबांनी कडबोळ्यासारखा आकार न देता वळ्या अखंडच, थोड्या लहान ठेवल्या होत्या. फरसाणातल्या जाड शेवेसारख्या. पण मी पिठलेभक्त! Wink

पित्ताचा त्रास होणार्‍यांनी बेतानी .....मागे एक दिवस पिठ संपवण्यासाठी एकाच दिवशी कढण व पिठले दोन्ही केले होते तेव्हा अतोनात डोके दुखले होते...नंतर डॉ कडून समजले होते की कुळीथ पित्तकारक असतात.

मी पण पिठलेभक्त. २-२ वाट्या पिते असंच Proud अजून तरी कधी बाधलं नाहिये. बाधत नाहिये तोपर्यंत पिऊन घेते.

करणारच म्हणणार्‍यांनी केले की नाही? >>>> भटजींकडे पत्रिका पाठवली आहे. मुहुर्त काढून मिळाला की लगेच करणार आहे. उगाच गुढग्याला बाशिंग बांधून बसू नये.

Pages