कुळीथ/हुलग्याच्या पिठाचे शिंगोळे

Submitted by तृप्ती आवटी on 8 February, 2015 - 22:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कुळीथ पीठ- २ वाट्या
सुकं खोबरं- २ चमचे
दाण्याचा कूट- २ चमचे
लसणाच्या पाकळ्या- ७-८
कोथिंबीर- सढळ हातानं
इतर- हळद, तिखट, मीठ, हिंग, गरम मसाला, मोहरी, धणेजिरे पूड (ऐच्छिक), पाणी

क्रमवार पाककृती: 

हुलग्याच्या पिठात खोबरं, दाण्याचा कूट, बारीक चिरलेला लसूण, हळद, तिखट, मीठ घालून मळून घ्यावं. जरा घट्टच मळावं. एकीकडे खोलगट पातेल्यात मोहरी-हळद-हिंगाची फोडणी करावी. फोडणी तडतडली की पातेलं तीन चतुर्थांश तरी भरेल एवढं कोमट पाणी घालावं. गरम मसाला, धणेजिरे पूड, मीठ आणि कोथिंबीर घालावी. तेलाच्या हातावर शिंगोळे साधारण कडबोळ्यांसारखे वळावेत. शिंगोळे नंतर चांगले फुलतात त्यामुळे जरा बारीक वळ्या वळाव्यात. पाण्याला उकळी आली की त्यात शिंगोळे सोडावेत. शिजले की शिंगोळे फुलून वर येतात. सगळे वळून झाले की झाकण घालून मंद आचेवर अगदी अर्धा मिनिट शिजवावेत.

edited.jpg

शिंगोळे तयार आहेत. गरम-गरम शिंगोळे लोणकढं तूप घालून खावेत.

वाढणी/प्रमाण: 
दोन जणांना वन डिश मील म्हणून पुरेसे होतील
अधिक टिपा: 

* शिंगोळ्याचं पीठ सुटून पाण्याला थोडा दाटपणा येतो पण आणखी दाट हवं असल्याच अर्धा चमचा कोरडं पीठ फोडणीत परतून घालायला हरकत नाही.
* शेंगोळे दिसायला फारसे आकर्षक दिसत नाहीत म्हणून मी फोटोसाठी काही शिंगोळ्यांना वेगळा आकार दिला आहे.

माहितीचा स्रोत: 
आय
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages