कच्चे केळे+दुधी कोफ्ता करी

Submitted by सावली on 2 January, 2015 - 11:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरात किसलेला दुधी अनायासे होता, पण तो कमी होता, त्यात भर घालावी लागणारच होती. मग मागे एकदा साबांनी केलेले केळ्याचे कोफ्ते खाल्लेले आठवले. त्यामुळे दुधी + कच्चे केळे असे करुन बघायचे ठरवले.
आधी वाचलेल्या आणि घरी पाहिलेल्या पाकृ मधे काजु ग्रेवी होती, त्याऐवजी टरबुज बिया वापरल्या.

कोफ्त्यासाठी -
२ वाटी किसलेला दुधी ( पाणी पिळुन टाकुन)
१ कच्चे केळे
बेसन लागेल तसे
१ छोटा चमचा धणे जीरे पावडर , तिखट, हळद, मीठ
तळायला तेल

करी साठी
२ छोटे कांदे
२ मध्यम टोमॅटो
आल, लसुण पेस्ट
१ / २ लाल काश्मिरी मिर्च्या
२ चमचे टरबुजाच्या बिया / मगज
गरम मसाला पावडर

क्रमवार पाककृती: 

कोफ्ते
कच्चे केळे उकडुन मग सालं काढुन मॅश करायचे. ( मी मावे मधे ४ मिनीटे उकडले).
त्यात कोफ्त्याचे बेसन सोडुन इतर साहीत्य टाकायचे.
थोडे थोडे बेसन घालत पाणी न घालता मळायचे. शक्य तितके घट्ट पिठ झाले पाहीजे.
तेल गरम करत ठेवुन, तापले की पिठाचे (भारतीय) लिंबाएवढे छोटे गोळे करुन तेलात खरपुस तळुन घ्यायचे.
( मी दुधीतले पाणी नीट न काढल्याने थोडं मऊसर पिठ झालं, त्यामुळे हाताला तेल लावुन मग एकेक गोळा करुन तेलात सोडावा लागला )

करी साठी
एका कढईत थोड्याश्या तेलावर कांदा चिरुन, सोनेरी रंगावर परतुन घ्यायचा.
मिक्सर मधे टोमॅटोच्या मोठ्या फोडी, कांदा, काश्मिरी मिर्च्या आणि मगज घालुन चांगले बारिक वाटायचे.

आता आधीच्याच कढईत पुन्हा छोटा चमचाभर तेल तापत ठेवायचे.
तापले की त्यात आलं, लसुण पेस्ट टाकायची आणि चांगली परतायची.
ती जरा गोळा व्हायला लागली की हळद, तिखट, मीठ आणि गरम मसाला घालुन परतायचे.
मग वरचे वाटलेले मिश्रण त्यात ओतायचे आणि भरपुर परतायचे.
बाजुने तेल सुटायला लागले की हवे तितके पाणी ओतुन पुन्हा एक दोन उकळ्या येऊ द्याव्या.
(सुरुवातीला रस्सा थोडा पातळच असु द्यावा, मग आटतो)
आता मीठ टाकुन ढवळुन मग वरचे कोफ्ते रश्श्यात सोडावे आणि गॅस बंद करुन थोडावेळ झाकुन ठेवावे.

थोडा वेळाने पोळी / भाताबरोबर खायला घेता येईल

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात नऊ , दहा कोफ्ते झाले. - (भारतीय) लिंबाएवढे
अधिक टिपा: 

- कोफ्त्याचं पिठ घट्ट असेल तर ते नंतर रस्सा फारसा शोषत नाहीत आणि विरघळत नाहीत
- कोफ्ते न तळता उकडुन करुन बघायचे राहीले , ते पुढच्या वेळेस
- मी फोटो काढण्यासाठी म्हणुन कोफ्ते वरुन घातलेत, रश्श्यात मुरलेले नाहीत
- ४५ मिनीटात फोटोसाठी सजवणे आणि फोटो काढण्याचा वेळ धरलेला नाही Wink

Kofta_IMG_8312.jpg

माहितीचा स्रोत: 
साबा आणि प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

फोटो मस्त. माझ्या एका मैत्रिणीच्या सासूबाईंनी केलेली खाल्ली आहे अशी करी आणि कच्च्या केळ्यांचे कोफ्ते. ते कोफ्ते नुसते खायला पण छान लागतात.