१८ – त्रिवेणी धरण (Three Gorges Dam) आणि शांघाई बंडची रात्रीची सफर

Submitted by इस्पीकचा एक्का on 31 December, 2014 - 08:55

==============================================================================

ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

==============================================================================

कप्तानाच्या पार्टीनंतर गाढ झोप लागली नसती तरच आश्चर्य होते.त्यांत एका गोष्टीकडे जरा दुर्लक्ष झाले... ते म्हणजे बोट धरण ओलांडून जातानाचा अनुभव.हे धरण इतके आवाढव्य आहे की याच्यावरच्या आणि खालच्या अशा दोन्ही बाजूस बोटीने प्रवासी व सामानाची वाहतूक होते. नदीच्या पाण्यातली धरणाच्या दोन्ही बाजूची वाहतूक सलगपणे एकाच बोटीतून होण्यासाठी या धरणाच्या बाजूला प्रत्येकी पाच कृत्रिम तळ्यांच्या दोन उतरंडी बांधल्या आहेत... एक बोटींना वर जायला आणि दुसरी खाली उतरायला. यांना शिप-लॉक्स म्हणतात. वरून येताना धरणाच्या पाण्याकडचे दार उघडून बोटी सगळ्यात वरच्या तळ्यात घेतात व ते दार बंद करतात. नंतर त्या तळ्यातले पाणी कमी करून त्याची उंची दोन क्रमांकाच्या तळ्याच्या पाण्याइतकी झाली की त्या दोन तळ्यांच्या मधील दार उघडून बोटी दोन क्रमांकाच्या तळ्यात नेतात. हाच प्रकार परत-परत करत पाचव्या तळ्यातून बोटी नदीच्या धरणाच्या खालच्या भागातील प्रवाहात सोडतात. एका वेळेस चार ते सहा बोटींची अशी वाहतूक करतात. याच्या विरुद्ध कृती करून दुसर्‍या उतरंडीवरून बोटी धरणाच्या खालून वर नेतात. एका दिशेने जायला अंदाजे ३०-४० मिनिटे लागतात. या प्रकारे १०,००० टन वजनाच्या बोटी समुद्रकिनार्‍यावरील शांघाई शहरापासून नदीच्या मार्गाने २,४०० किमी दूर चोंगचिंग पर्यंत प्रवासी व मालाची वाहतूक करू शकतात.

आमची बोट रात्री शिप-लॉक्स वापरून धरण उतरून खाली जाणार होती आणि हा जगावेगळा अनुभव बोटीत बसून घ्यायची संधी म्हणजे माझ्याकरिता पर्वणीच होती.पण हे करण्यासाठी धरणाजवळ बोटींची रांग लागली होती आणि नक्की किती वाजता नंबर लागेल ते सांगता येत नाही असे रिसेप्शनने सांगितले.जेवण इतके अंगावर आले होते की केव्हा झोप लागली ते कळलेच नाही. पहाटे एक वाजता मोठ्या खाड्खाड् अश्या आवाजांनी जाग आली आणि काय झाले ते बघायला बाल्कनीत गेलो आणि पाहतो तर काय, आमची बोट शिप-लॉकमध्ये होती !नशिबाने शेवटच्या शिप-लॉकचा अनुभव मिळाला.नाहीतर ही संधी चुकल्याची रुखरुख सतत मनात राहिली असती.

रात्री बोटीतून शिप-लॉकमध्ये असताना घेतलेले फोटो.दूरवर वरच्या आणि खालच्या शिप-लॉकची दारे दिसत आहेत.

 ...............

ही शिप-लॉकस् नंतर धरणाच्या भेटीत परत नीट बघायला मिळणार होती... मात्र शिप-लॉकच्या बाहेरून. बोट धरणाच्या खालच्या बाजूस नदीत आल्यावर थोडावेळ रात्रीची मजा पाहत वेळ काढला आणि परत झोपी गेलो.

सकाळी उठलो आणि नेहमीच्या सवयीने पावले आपोआपच बाल्कनीकडे गेली.सकाळच्या धुक्यात पुढच्या हिरव्या डोंगरामागे सुंदर पांढर्‍या ढगांची सुंदर नक्षी दिसली.

नंतर धुके कमी होऊन स्पष्ट दिसायला लागल्यावर कळले की तो सरळसोट, जणू अगदी एखाद्या पडद्यासारखा उभा तासून काढलेला पांढर्‍या रंगाचा कडा आहे. चीनचा निसर्ग चकीत करण्याची एकही संधी सोडत नव्हता...

न्याहारी करून त्रिवेणी धरण (Three Gorges Dam) बघायला निघालो. हे धरण आकारमानाने जगातले दोन क्रमांकाचे पण वीजनिर्मितीत प्रथम क्रमांकाचे आहे( ब्राझीलमधील इताइपू धरण आकारमानाने जगातले प्रथम क्रमांकाचे पण वीजनिर्मितीत दुसर्‍या क्रमांकाचे आहे). या धरणाची कल्पना प्रथम सन यात सेन याने १९१९ साली मांडली.त्यानंतर चीनच्या पहिल्या राज्यक्रांतीनंतर सत्तेत आलेल्या चिअँग कै-शेकच्या नॅशनॅलिस्ट सरकारने १९३२ साली याचा आराखडा बनवण्यास सुरुवात केली.पुढे १९३९ मध्ये जपानने चीनबरोबरच्या लढाईत यिचांगपर्यंतचा भूभाग व्यापला व लढाईत पूर्ण विजय होणार असे गृहीत धरून ओतानी प्लॅन नावाचा या धरणाचा पूर्ण आराखडा बनवला.परंतू दुसर्‍या महायुद्धात पराभव झाल्याने जपानला आपले बेत तसेच सोडून परत जायला लागले.त्यानंतर नॅशनॅलिस्ट सरकारने अमेरिकेच्या मदतीने हा प्रकल्प परत हाती घेतला.१९४७ साली सुरू झालेल्या चिनी यादवीयुद्धाने हे काम परत बंद पडले.१९४९ साली कम्युनिस्ट सत्तेत आल्यानंतर माओ झेडाँग च्या पुढाकाराने हे काम परत सुरू करण्यात आले.परंतू या वेळेसही "ग्रेट लीप फॉरवर्ड", "कल्चरल रिव्हॉल्यूशन" इ. अनेक अडथळ्यांमुळे हा प्रकल्प लांबणीवर पडत गेला.१९८० पासून या धरणाची कल्पना परत जोर धरू लागली आणि सरते शेवटी १९९२ साली नॅशनल पीपल्स काँग्रेस या चीनच्या सर्वोच्च कार्यकारिणीने या प्रकल्पाला मंजुरी दिली. हे धरण बांधण्यास डिसेंबर १९९४ मध्ये सुरुवात झाली आणि जुलै २०१२ पर्यंत मुख्य धरण आणि शिप-लॉक्स बांधून झाली... हुश्य... या सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी की मी हे सगळे सोपस्कार संपल्यावर म्हणजे योग्य वेळी तेथे पोचलो होतो म्हणायचे :)!

तरीसुद्धा अजून एक गोष्ट पूर्ण होणे बाकी आहे, ती म्हणजे ३,००० टनापर्यंतच्या बोटींना वर खाली नेण्याकरिता लिफ्ट !या लिफ्टमुळे बोटी फक्त १० मिनिटात धरणाच्या वर / खाली जाऊ शकतील व सध्या धरणाच्या दोन्ही बाजूला होणारा ट्रॅफिक जॅम बर्‍याच प्रमाणात कमी होईल. प्रकल्पाच्या या भागात बर्‍याच तांत्रिक अडचणी आल्या आहेत व आतापर्यंत काही पर्याय अर्धवट सोडून दिले गेले आहेत. आता एक नवीन पर्याय विकसित होत आहे आणि सगळे निर्वेधपणे पार पडले तर ही लिफ्ट २०१४ पर्यंत वापरास खुली होईल.

हे धरण पूर्णपणे काँक्रीटने बांधलेले असून २,३३५ मीटर लांब, समुद्र सापटीपासून १८५ मीटर उंच असून पूर्ण भरल्यावर यातील पाण्याची उंची १७५ मीटर भरते.नदीच्या वरच्या व खालच्या प्रवाहाच्या उंचीत साधारण ११० मीटरचा फरक आहे.धरणाने अडवलेल्या पाण्याचा विस्तार (backwater) ६६० किमी लांब व १.१२ किमी रुंद आहे.हे धरण २२,५०० मेगॅवॅट वीज निर्माण करते.या अगडबंब धरणाचे स्थान माझ्या मस्ट सी यादीत फार वरचे होते.त्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी फार महत्त्वाचा होता.

धरणाच्या स्थानावर जायला क्रूझ कंपनीने बसचा बंदोबस्त केलेला होता.या धरणाच्या बांधकामाकरिता आलेले बरेच लोक इथेच स्थायिक झाले आहेत. त्यांच्याकरिता नवीन वस्त्या बांधल्या आहेत त्या दिसत होत्या.

अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर बसमधून सर्वप्रथम शिप-लॉक्स् चे दर्शन झाले.

.

धरणाच्या बाजूला एक निरीक्षण टेकडी विकसीत केली आहे.टेकडीच्या माथ्यावर पोचायला एका मागोमाग एक असे एकूण चार एस्कॅलेटर्स वापरून जावे लागते. त्यातला हा पहिला.

टेकडीवरच्या टेरेससारख्या भागावरून चारी बाजूंचे विहंगम दर्शन होते.एका बाजूला धरणाचे मॉडेल ठेवलेली इमारत आणि तिचे आखीव रेखीव आवार दिसते.

तर दुसर्‍या बाजूला अजूनही धुक्याने वेढलेल्या संपूर्ण धरणाचे दर्शन होते... त्याच्या अलीकडे बोटींच्या लिफ्टचे बांधकामाचे चालू असलेले दिसत आहे.

धरणापासून जरा दूर, एक पर्वत कोरून बनवलेली शिप-लॉक्स् आणि त्यांच्यातल्या बोटी दिसतात.

.

टेकडीवरून खाली उतरून धरणाची प्रतिकृती ठेवलेल्या कक्षांत गेलो.धरणाच्या वरच्या बाजूने धेतलेले हे प्रतिकृतीचे छायाचित्र. उजवीकडे धरण, मध्ये चिंचोळा बोटींच्या लिफ्ट्चा भाग आणि डावीकडे शिप-लॉक्स् दिसत आहेत.

टेकडीच्या दुसर्‍या बाजूला खाली उतरून जायला पायर्‍या आहेत... त्या परतीच्या मार्गाकडे नेतात. जर तुम्हाला धरण जवळून बघायचे असले तर विजेवर चालणार्‍या बसचे तिकीट काढायला लागते.

बसस्टॉपकडे जाताना हा सगळा परिसर इतका चकाचक का आहे त्याचे गुपित कळले... थोडासा पाऊस पडून झाडाच्या कुंड्यांवर चिखलाचे दोन थेंब उडाले होते, पण तेथील सफाईकाम करणार्‍या बाईला तेही ताबडतोप साफ केल्याशिवाय राहवले नाही.

बसचा मार्ग अगदी धरणाच्या पाण्याच्या जवळून जातो. प्रथम सगळ्यात वरच्या शिप-लोक मध्ये शिरणारी जहाजे दिसली...

मग जलसाठ्याच्या बाजूने धरण

व शेवटी बोटींच्या लिफ्टचे चाललेले काम दिसले...

धरणाचा फेरफटका संपवून परत बंदरावर आलो तर तेथे बोटींची जत्रा लागली होती.आमच्या बोटीत जायला तीन बोटी पार करून जायला लागले.

आतापर्यंत धुके बरेच निवळले होते. पहाटे पाहिलेला डोंगर आणि कडा सुस्पष्ट होऊन एकामागोमाग चार डोंगर व कडे दिसायला लागले होते. हा त्याचा माझ्या खोलीतून परत टिपलेला फोटो.

आता वेळ होती सेंचुरी स्कायला टाटा करायची.या बोटीतले चार दिवस हिंडण्या फिरण्यात आणि बोटीवरच्या कार्यक्रमांत कसे भुर्रकन उडून गेले ते समजलेच नाही.आता आमचा प्रवाशांचा बनलेला गटही विखरून जो तो आपापल्या पुढच्या गंतंव्याकडे निघणार होता.सामान गोळा करून बाहेर पडायची वेळ झाली तेव्हा अगदी कॉलेजच्या होस्टेलची रूम सोडताना वाटल्या होत्या तशाच काहीश्या भावना दाटून आल्या.लॉबीमध्ये आल्यावर अगदी जवळच्या मित्रांना सोडून जात असतानाची आलिंगने वगैरे झाली. म्हणजे एकंदरीत मला एकट्यालाच काही तसे वाटत नसल्याची खात्री पटली !

यिचांग शहराकडे जातानाची बसची सफर यांगत्सेच्या खोर्‍याचे मनमोहक रूप डोळ्यात साठवून घेत घेत झाली.इतके दिवस यांगत्सेमाईच्या अंगाखांद्यावर झुलणार्‍या बोटीवरून तिला बघत होतो. आता तिला असे दुरून पाहताना कसेसेच होत होते...

.

.

बसस्टॅंडवर गाइड आली होती.खरंतर आजचे तिचे काम होते फक्त मला जेवू घालून विमानतळावर पोहोचवायचे.पण ती म्हणाली विमानाला भरपूर वेळ आहे.तुमची इच्छा असली तर माझे गाव फिरून बघू मग विमानतळावर एक छान रेस्तराँ आहे त्यामध्ये जेवण घेऊन तुम्ही चेक-इन करू शकाल. चला गाडी चांगली दोन तास शहरभर फिरवली.

यिचांग हे मध्यम आकाराचे पण नीट नेटके आणि स्वच्छ शहर आहे.आतापर्यंत इथल्या गावा-शहरात एखादा तरी उकिरडा दिसावा यासाठी चाललेला निष्फळ प्रयत्न सोडून देण्याइतपत मी शहाणा झालो होतो. Happy ! तेव्हा गाईडने आत्मीयतेने दाखवलेले तिचे शहर बघायला जरा जास्तच मजा आली.

.

.

.

अर्धा तास फेंग शुई चा क्लास केला.चिनी "इंग्रिस" आणि तेही खास चिनी लकबीत बोलणार्‍या ललनेने बरेच काही सांगितले... पण तिला एखादी गोष्ट परत सांग असे म्हणण्याची "सिन्सीयरगिरी" अजिबात केली नाही. भिती ही की न जाणो, तीच मला नीट समजले की नाही म्हणून खात्री करायला एखादा प्रश्न विचारायची Wink !

आता मी चायना रिटर्नड् फेंग शुई मास्टर आहे, समजलात काय महाराजा Wink !

===================================================================

यिचांग ते शांघाई हे १,१११ किमी अंतर उडून जायला दीड तास लागतात. संध्याकाळी पाच वाजता शांधाईला पोचणार होतो. उडताना दिसणार्‍या खालच्या डोंगरदर्‍या आणि त्यातून दिसणारे यांगत्से आणि तिच्या उपनद्यांचे नागमोडी प्रवाह पाहताना दीड तास संपले हे कळले महानगरी शांघाई आल्याचे जाहीर करणार्‍या जिलब्यांसारख्या गुंतागुंतीच्या उड्डाणपुलांमुळे...

नंतर दिसू लागली एक आखीव रेखीव देखणी नगरी...

.

.

.

विमानतळावरून हॉटेलवर जाताना गाईडबरोबर पुढच्या दिवसांच्या कार्यक्रमाची उजळणी केली आणि मग माझे रात्रीच्या कार्यक्रमांचे बेत सांगून त्यांची तिकिटे बुक करायला सांगितले... त्यातला आज रात्रीचा कार्यक्रम म्हणजे शांघाईच्या बंडची बोटीतून रात्रीची सफर. नऊ वाजता पूर्ण अंधार झाला म्हणजे ही सफर जास्त मजेची होते तेव्हा मी साडेआठला परत येतो असे सांगून गाईड मला हॉटेलवर सोडून परत गेला.

मीही मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत मस्त शॉवर घेऊन थोडे खाऊन साडेआठला लॉबीत आलो.गाईड वाटच पाहत होता.टॅक्सी करून आम्ही बंडवर पोचलो.तिकीट काढून देऊन तो परत गेला आणि मी बोटीवर चढलो.

बंड म्हणजे शांघाईजवळ यांगत्से समुद्राला मिळते ती खाडी.या खाडीच्या दोन्ही काठांवर शांघाईच्या अनेक प्रसिद्ध इमारती आहेत.खरे तर ही सहल मी कोणताच पर्याय चुकवायचा नाही म्हणूनच केवळ करणार होतो.शिवाय सगळी संध्याकाळ हॉटेलच्या रूममध्ये लोळण्यात फुकट घालविण्यातही काही अर्थ नव्हता.पण बोट धक्क्यातून बाहेर पडली आणि शांघाई नावाची मोहनगरी तिचे रात्रीचे रंग उधळून दाखवू लागली.

.

.

काठावर अशी एकही इमारत नव्हती की जिच्यावर दिव्यांची कलापूर्ण सजावट नव्हती...

.

.

.

 ............

पर्ल टीव्ही टॉवर

शांघाई सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी सेंटर

अनेक बोटीही लखलखत्या दिव्यांनी नटून सजून प्रवाशांचे स्वागत करत लाजत मुरडत इकडून तिकडे फेर्‍या मारत होत्या...

.

.

.

जेवण नसलेल्या नव्वद मिनिटाच्या सफरीत वेळ कसा जाईल या विवंचनेत बोटीच्या पायर्‍या चढणार्‍या मला जेव्हा "प्रवाश्यांनी कृपया खाली उतरावे" अशी घोषणा झाली तेव्हा बोटीच्या घड्याळात काहीतरी गडबड आहे असे वाटले. पण माझे घड्याळही त्यांना फितूर झालेले होते... तेही ९० मिनिटे संपली असे म्हणत होते !मोठ्या नाखुशीने बोटीतून उतरलो.

रस्त्यावर हात केलेली पहिली टॅक्सी थांबली.हॉटेलमधून आठवणीने आणलेले पत्त्याचे कार्ड बघून चालकाने पटकन मान हालवली आणि बरोबर हॉटेलवर आणून सोडले.बरोबर मीटरप्रमाणेच पैसे घेतले.बायजींगच्या टॅक्सीवाल्यांचा संसर्ग शांघाईच्या टॅक्सीवाल्यांना अजून तरी झालेला दिसत नाही.कारण पुढे तीन दिवस असाच सौजन्यपूर्ण व्यवहार अनुभवला.

शांघाईची ओळख तर फार सुंदर झाली होती. आता उद्यापासून पुढचे दिवस शांघाई तिच्या कीर्तीला जागून अजून नवनवी आश्चर्ये दाखवो अशी इच्छा मनाशी धरून झोपेची आराधना करू लागलो.

(क्रमशः)

==============================================================================

ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

==============================================================================

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही प्रत्यक्षात चीन जेवढा फिरले आहात तेवढेच आमचेही फिरने झाले आहे फोटो आणि वर्णन च्या माध्यमातुन.
सुरेख फोटो आणि वर्णन.
धन्यवाद.

खुप मस्त वाटलं वाचताना.. जितक्या रसिकतेने फिरलात तितक्याच रसिकतेने ते आमच्यासमोर सादरही करत आहात.

खुप मस्त वाटलं वाचताना.. जितक्या रसिकतेने फिरलात तितक्याच रसिकतेने ते आमच्यासमोर सादरही करत आहात. >>>> +१००